अल्पवयीन मुलांसंबंधी आलेल्या तीन बातम्या कोणत्याही संवेदनशील माणसाचे मन हादरवणाऱ्या तर आहेतच; परंतु भावी पिढीच्या भवितव्याबाबत चिंता निर्माण करणाऱ्या आहेत. या घटना, आपल्या समाजाच्या संकल्पात प्राधान्य कोणत्या विषयाला हवे, हे दाखवणाऱ्याही आहेत.
गेल्या रविवारी पुण्यातील एका घटनेत एका सुखवस्तू कुटुंबातील १० वर्षांच्या आदित्य नावाच्या मुलाने पंख्याला ओढणीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्याच्या बहिणीचा त्या दिवशी वाढदिवस असल्याने त्याच्या कुटुंबातील सर्व जण जेवायला हॉटेलात जाणार होते. तेव्हा आदित्यने त्याच्या आईकडे नवीन जर्नचा हट्ट धरला. मात्र समजूत घालूनही तो ऐकत नसल्याचे पाहून त्याचे कुटुंबीय त्याला एकटेच घरी ठेवून हॉटेलमध्ये गेले. मात्र ते सर्व जण गेल्यावर जीवन म्हणजे काय, हे पूर्णपणे कळण्याआधीच आदित्यने आत्महत्या करून आपले जीवन संपवले. अशा प्रकारे पालकांकडे केलेली एखादी मागणी पूर्ण न झाल्याने तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. परंतु केवळ दहा वर्षांच्या मुलाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे, हे धक्कादायक होते.
यातून मन सावरते न सावरतेच तोच कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्हय़ातून आलेल्या एका बातमीने मन सुन्न झाले. गुलबर्गा जिल्हय़ातील चितपूर गावामध्ये चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी त्यांच्याहून लहान असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या प्रमाणांच्या पाश्र्वभूमीवर, बाल्यावस्थेतील पिढीवर संस्कार करून महिलांबाबत वेगळा दृष्टिकोण असणारी भावी पिढी निर्माण करण्याची गरज आहे. मात्र ११-१२ वर्षांच्या मुलांनी सामूहिक बलात्कारासारखी हीन कृती नियोजनपूर्वक थंड डोक्याने केल्याची दाखवणारी ही घटना महिलांबाबतची विकृती भावी पिढीच्या मनातही उतरत आहे की काय, अशी शंका निर्माण करणारी आहे.
तिसरी घटना सातारा जिल्हय़ातील. साताऱ्यातील पैठणमध्ये घडलेल्या या घटनेत एका अल्पवयीन शाळकरी मुलाने त्याच्या मित्राने त्याच्या मोबाइल फोनमधील गेम डिलीट केल्याच्या रागातून त्याची हत्या केली. अशा क्षुल्लक कारणावरून झालेल्या हत्या या बहुतेकदा दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तिकडून झाल्या असल्याचे, अनेकदा वाचायला मिळते. मात्र, केवळ मोबाइलमधला गेम डिलीट केल्याने हत्या करण्याएवढे हिंसक एका शाळकरी मुलाने व्हावे, ही अतिशय गंभीर बाब आहे.
अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेली टोकाचा निर्णय घेण्याची वृत्ती, लैंगिक विकृती आणि छोटय़ाशा कारणावरून हिंसक होण्याची वृत्ती दाखवणाऱ्या या तीन घटना भावी पिढीच्या भवितव्याबाबत चिंता निर्माण करणाऱ्या आहेत.
भारत महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत असल्याचे बोलले जाते. शिवाय भारताकडे तरुणांचा देश म्हणून जग पाहत आहे. विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या क्रिकेट संघाला अंतिम सामन्यात लागोपाठ तीन विकेट गेल्या तर, सावरण्यासाठी तातडीने उपाय करावे लागतात. वरील तीन घटना पाहून भारताच्या भावी तरुण पिढीचीही अवस्था विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात लागोपाठ तीन विकेट गेलेल्या संघासारखी झाल्यासारखे वाटत आहे.
आज अल्पवयीन असलेली मुले ही या उद्याच्या तरुण भारताचा कणा आहे. मात्र तीच अशी विकृतीची लक्षणे दाखवत असतील, तर त्यावर वेळीच आणि युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे आणि तोच आपल्या समाजाचा नवीन वर्षांचा संकल्प असायला हवा!
संदीप देवू गावडे