lp08‘टाचणी आणि टोचणी’ या उत्कृष्ट सदराबद्दल रवि आमले यांना मन:पूर्वक धन्यवाद. समाजात पसरलेल्या अथवा जाणीवपूर्वक पसरवण्यात आलेल्या अनेक मिथकांवर त्यांनी प्रहार केले. हे आवश्यक होते. तसे करत असताना त्यांनी विविध विषयांतील संदर्भाचा अचूक आधार घेतला, त्यामुळे हे सदर खूपच वाचनीय झाले. मात्र या सदराच्या अंतिम टप्प्यातील ‘संशयात्मा व्हा’ हा शब्दप्रयोग थोडा खटकला. त्याऐवजी ‘चिकित्सक व्हा’ असे म्हणणे उचित ठरले असते. चिकित्सक हा एक निरोगी किंवा सकारात्मक संशयवादी (healthy skeptic) असतो. अस्तित्ववादी तत्त्वज्ञानाचे प्रणेता किअर्केगार्ड (Kierkegaard) यांच्या De omnibus dubitandum est – – ‘प्रत्येक गोष्टीचा संशय घ्या’ या ग्रंथात जोहान्स क्लायमाकस हे पात्र कल्पिलेले आहे. तो प्रत्येक गोष्टीचा संशय घेतो व इतका पुढे जातो की, तेथून परत कसे यायचे हेच त्याला कळत नाही. प्रत्येक गोष्टीचा संशय घेण्यात तो आपली सर्व मानसिक शक्ती वापरतो; पण असे करूनही त्यानंतर त्याला कुठल्याही निश्चित निष्कर्षांपर्यंत अथवा निर्णयाप्रत पोहोचणे शक्य होत नाही, कारण त्यासाठी काही तरी गृहीततत्त्व मान्य करणे आवश्यक असते म्हणजेच ‘De omnibus dubitandum est’ या सूत्राचा त्याग करणे आवश्यक ठरते! विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारला तरी तेथेही गृहीततत्त्व आहेच. पंचेंद्रियांद्वारे निरीक्षण केले, बुद्धिमत्तेचा वापर केला व उदगामी तर्काच्या (inductive logic) आधारे निष्कर्ष काढले तरी एखादा शंकेखोर पंचेंद्रियांना जाणवते ते सत्यच कशावरून, असा प्रश्न विचारू शकतो. अठराव्या शतकातील प्रसिद्ध तत्त्वज्ञ डेव्हिड हय़ूम यांनी तर उदगामी तर्काच्या संकल्पनेलाच आव्हान दिलेले आहे. त्यांच्या मते कार्यकारणभाव म्हणजे केवळ निरीक्षण असते. घटना (अ) ही घटना (ब) याचे कारण आहे, असे आपण म्हणतो तेव्हा: (१) आपल्या पूर्वानुभवातील प्रत्येक निरीक्षणात ‘अ’नंतर लगेचच ‘ब’ घडलेली दिसते व (२) असे कुठलेही निरीक्षण नसते जेव्हा ‘अ’नंतर ‘ब’ घडलेली नाही; पण असे जरी असली तरी भविष्यातील निरीक्षणात असेच घडेल याची खात्री नाही. म्हणूनच कोणताही वैज्ञानिक सिद्धान्त तो खोटा ठरत नाही तोपर्यंतच खरा असतो! टोकाचा संशयवाद आपणास कुठे घेऊन जाईल, याची कल्पना वरील विवेचनावरून येईल. अतिरेकी विश्लेषण अथवा संशयवाद हा कृतिशीलतेस किंवा निर्णयक्षमतेस घातक ठरण्याची शक्यता असते. येथे मला लोकमान्य टिळकांची आठवण होते. सार्वजनिक गणेशोत्सव हे एक सदोष साधन होते असे वादाकरिता मान्य केले तरी, पूर्णपणे निदरेष साधनाची वाट पाहत बसण्यापेक्षा उपलब्ध आहे ते साधन वापरून जनजागृती करण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. तसे केले नसते तर देशाला स्वातंत्र्य मिळणे शक्य झाले नसते. म्हणूनच जेवढे चिकित्सेचे व विश्लेषणाचे महत्त्व आहे, तेवढेच किंवा त्याहूनही जास्त महत्त्व निर्णयक्षमतेला व कृतिशीलतेला आहे.
 प्रमोद पाटील, नाशिक.

‘बाजीराव मस्तानी’च्या निमित्ताने
‘लोकप्रभा’च्या १८ डिसेंबरच्या अंकातील ‘मस्तानीशिवायचे बाजीराव’ या लेखातील ‘आपल्याला तरी आपला इतिहास माहीत असतो का?’ हा लेखिकेने विचारलेला प्रश्न आम्हा सर्व मराठी जणांना विचार करायला भाग पाडणारा वाटतो. कारण काही प्रमाणात ही खरी परिस्थिती आहे. शालेय जीवनात सगळा इतिहास शिकवला जावा, हे चुकीचं वाटतं. पण त्याव्यतिरिक्त, इतिहासकार वगळता इतर कोणी इतिहासाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतं का? तर याचं उत्तर ‘नाही’ असंच असेल. भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ सारखे विषय जेव्हा समोर येतात तेव्हा कुठे इतिहास थोडा ढवळून निघतो, पण तेही तेवढय़ापुरतंच असतं. नंतर मात्र सर्वकाही शांत. शिवाय आता नवीन भीती निर्माण झाली आहे, ती म्हणजे पाठय़पुस्तकातून शिकवल्या जाणाऱ्या शिक्षणाची. मराठी माध्यमातून शिकणाऱ्या मराठी मुलांची संख्या ही इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांपेक्षा कमी होत चालली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणात अनेक वेळा आपला इतिहास मोडून तोडून शिकवला जातो, अशा बातम्या वाचनात आल्या आहेत. तेव्हा यापुढे आपल्या मुलांसमोर कुठला इतिहास येईल त्याबद्दल चिंता वाटते.
रवींद्र गुरव, विरार (पू.).

डोळे उघडणारी कव्हरस्टोरी
lp09दि. १८ डिसेंबरचा अंक वाचनीय होता. या अंकातील विनायक परब आणि सुहास जोशी यांनी ‘जमीन=पैशांची खाण=महापूर’ या लेखात सरकार आणि महानगरपालिकांच्या गलथान कारभाराचा विस्तृत आढावाच घेतला आहे. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ असे न म्हणता ‘नेमेचि येतो मग महापूर’ असं म्हणणे रास्त व वास्तविक वाटते. महापुरात लोकांचे अतोनात नुकसान होते. मंत्र्यांची पाहणी, लोकांना आर्थिक मदत, असे का झाले याचा शोध घेण्यासाठी कमिटी नेमणे, अहवाल सादर, हे सगळे होईपर्यंत पुन्हा महापुराचा तडाखा, हे सर्वत्र नित्याचेच झाले आहे. कुठल्याही शहरात जा; लोकसंख्या वाढ, अतिक्रमण, बिल्डरांनी बळकावलेल्या जमिनी व त्यावरची अनधिकृत बांधकामे, सदोष ड्रेनेज, वर्षभरात पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्यातच मेनहोल्सवरचे झाकण काढून त्यात जितका कचरा व प्लास्टिक टाकता येईल तो टाकून त्या पार बुजवणे इत्यादी अनेक कारणे महापुराला हातभार लावतात. निसर्गनियम तर सोडाच आपण केलेले फायदे व नियम आपण धाब्यावर बसवतो. या सर्वाचा परिणाम सर्वानाच भोगावा लागतो. पण, आपली ‘चालायचंच’ ही वृत्ती आपण व्यवस्थित जपून ठेवण्यात स्वत:ला धन्य समजतो. निसर्ग-नियमांची पायमल्ली झाली तर निसर्ग आपल्याला माफ करणार नाही. हे तेवढेच खरे आहे. तेव्हा मानवनिर्मित आपत्ती हेच महापुराचे मुख्य कारण आहे. ‘जर आपण निसर्गाची काळजी घेतली तर निसर्ग आपली काळजी घेईल’, हा साधा नियम आपण समजू शकत नाही. तेव्हा महापूर आल्यास अनपेक्षित असं काहीच नाही.
याच अंकात रेखा केळकरांचा ‘नाइलाजाने झेलतो मालिका’ लेख मनोरंजक व वास्तव आहे. प्रेक्षकांच्या सहनशक्तीचे भान या सीरियलवाल्यांनी लक्षात घ्यायला हवे. सुरुवातीचे ५-२५ भाग चांगले असतात. नंतर कंटाळवाणे आणि त्यानंतर डोकेदुखी असा नित्याचाच प्रकार आहे. पण मालिकावाले ठार बहिरे असल्यासारखे वागतात. टीआरपी आणि जाहिराती यांचं प्रमाण प्रचंड वाढलंय. पण काही अपवादसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. बरेच प्रेक्षक या वैताग आणणाऱ्या मालिका ‘रिपीट’ म्हणून दोनदा बघतात. तर दुसरीकडे बरेच प्रेक्षक कंटाळवाण्या मालिका बारीक आवाजात लावून मस्त झोप काढतात. शांत झोप येण्यास काही मालिकांचा झोपेचं औषध म्हणून उपयोग होतो.
भाऊराव हेडाऊ, नागपूर. इ-मेलवरून.

भक्तांसाठी पथदर्शक विशेषांक
lp10‘लोकप्रभा’चा दत्त विशेषांक दत्तभक्तांना खऱ्या अर्थाने अध्यात्माची वाट दाखवणारा एक भक्तीरसपूर्ण तसेच सत्य माहिती देणारा मार्गदर्शक अंक आहे. समुद्र किनाऱ्यावरील दीपगृह जसे, सागरात नौका भरकटू नये म्हणून योग्य किनाऱ्याची दिशा दाखवते त्याप्रमाणे अध्यात्माच्या वाटेवर श्रद्धाळू माणसे भरकटू नयेत व त्यांना योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शक कोण आहेत, त्यांच्यापर्यंत कसे जायचे व आपल्या जीवनाची ‘आत्मिक उन्नती ’ कशी करुन घ्यायची यासाठी अत्यंत योग्य लेखांनी सजलेला असा हा दत्त विशेषांक वाचताना घर बसल्याच आपली दत्त परिक्रमा घडते व सद्गुरुंच्या भेटीची स्थाने व भौगोलिक माहिती ही आपल्यापाशी शिदोरी म्हणून येते. जिच्या मदतीने दत्तभक्त केव्हाही दत्तगुरुंच्या दर्शनासाठी घराबाहेर पडू शकतो.
नीळकंठ भास्कर नामजोशी, पालघर.

बरोबरी कशासाठी?
lp11‘पुरुषांच्या क्षेत्रात खेळ मांडियला’ ही लोकप्रभाची कव्हर स्टोरी वाचली. क्रीडा हे क्षेत्र इतकं पहिल्यापासून पुरुषांचं मानलं गेलं आहे की मुळात स्त्रियांनी स्त्रियांच्या संघात, स्त्रियांच्याच संघाबरोबर खेळणंही समाजाला फारसं मान्य नव्हतं. स्त्री म्हणजे नाजूकसाजूक, तिनं तसंच असलं पाहिजे, खेळण्यामुळे तिच्यात रांगडेपणा येऊ शकतो तेव्हा तिनं कशाला खेळायचं अशी वृत्ती होती. अशा वेळी क्रीडा क्षेत्रात शिरकाव करणं, स्वत:चं स्थान निर्माण करणं स्त्रियांसाठी नेहमीच खडतर गेलेलं आहे. आता बॉडी बिल्डिंगसारख्या निव्वळ पुरुषांच्या क्रीडा प्रकारात स्त्रिया उतरत आहेत, ही आनंदाची बाब आहे. टेबल टेनिसमध्ये स्त्री पुरुषांचे सामने आता आपल्याला नवीन नाहीत. आता त्यात क्रिकेटचाही समावेश झाला आहे. फक्त हे सगळं करताना आपल्याला खेळाचा आनंद घ्यायचा आहे की पुरुषांशी प्रत्येक क्षेत्रात बरोबरी करायची आहे याचा स्त्रियांनी विचार करायला हवा असं मला वाटतं. ही बरोबरी कशासाठी करायची आहे आणि ती निसर्गाविरुद्ध नाही का याची चर्चा व्हायला हवी.
नम्रता गायकवाड, पनवेल.

पुस्तकावर नाही, मग सिनेमावर आक्षेप का?
रवी आमले यांनी लिहिलेला मस्तानीवरील लेख वाचला. लेख अभ्यासपूर्ण आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणं आवश्यक तर आहेच, परंतु त्याच वेळी सिनेमाबद्दल काही उल्लेख करणं योग्य होईल. हा सिनेमा ना. सं. इनामदार यांच्या ‘राऊ’ कादंबरीवर बेतलेला आहे असा उल्लेख दिग्दर्शकाने केलेला आहे. ते पुस्तक इतकी र्वष अस्तित्वात आहे त्याबद्दल कोणी ते चुकीचं आहे वगैरे उल्लेख करत नाहीत मग सिनेमावरच एवढा आक्षेप का?
राजेंद्र अभ्यंकर, इ-मेलवरून.

मराठी अंकांच्या ऐवजी जागतिक पातळीवर वापरले जाणारे अंक म्हणून इंग्रजी अंक वापरावेत या म. न. गोगटे यांच्या सूचनेशी मी सहमत नाही.
विजय परांडेकर, इ-मेलवरून.

सबलेची अबला झाली
दि. ११ डिसेंबरच्या अंकात स्त्रीशक्तीविषयी लिहिले आहे. महिलांना अबला ठरवणे हा पुरुष अहंकाराचा डाव असावा. कारण आपण पुराणात पाहिले तर भारतात निरनिराळ्या भागात जेवढी देवतांची मंदिरे आहेत, तिथे तिथे देवता शस्त्रधारी, लढवय्या व पापी असुरांचा नाश करणाऱ्या दाखवल्या आहेत. देवांवरसुद्धा जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा त्यांनी एखाद्या देवीचा धावा केलेला आहे. महादेवांनी पण मल्हार रूप घेण्याआधी राक्षसाचा नाश करण्यासाठी स्त्रीलाच पाठवले होते. याचा अर्थ खूप पूर्वी स्त्री सामथ्र्यशाली झाली होती. आजही जगात अनेक भागांत ही घराची प्रमुख आहे. आपल्याकडे भिल्ल व इतर काही आदीम जमातीत पैशाचा व्यवहार स्त्रीच पाहते. आज अनेक क्रीडा प्रकारातदेखील तिचे वर्चस्व दिसून येत आहे. याचाच अर्थ पुराणकाळापासून अनेक ठिकाणी स्त्री ही शौर्याची, सबलतेची प्रतिमा होतीच. पण मधल्या हजार वर्षांच्या काळात पुरुषी अहंकाराने तिला अबला बनवले. आज ती पुन्हा एक सबला म्हणून दिसू लागली आहे.
– डॉ. अनिल पी. सोहोनी, दोंडाइचा, धुळे.

पर्यटनाची, ट्रेकिंगची मेजवानी
‘लोकप्रभा’तील गौरी बोरकर यांचे पर्यटनवैविध्य पाहून थक्क व्हायला होते. त्या ज्या पद्धतीने जगात फिरतात, फोटो काढतात, त्यावर लिहितात त्याचं कौतुक वाटतं. अशा पद्धतीने सातत्याने फिरणं, त्याचं नियोजन करणं, ठिकठिकाणच्या हवामानाशी, खाण्यापिण्याशी जुळवून घेणं या सगळ्या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या अजिबातच नसतात. गौरी बोरकर त्या सगळ्या कशा जमवतात यावर त्यांनी वाचकांच्या कुतुहलापोटी एक लेख लिहायला हवा.
याबरोबरच प्रीती पटेल, अमीत सामंत, संदीप वडसकर, धनंजय मदन यांचे गिर्यारोहणविषयक लेख अत्यंत वाचनीय असतात. ही सगळी मंडळी ज्या पद्धतीने फिरतात, त्याची जी वर्णनं करतात ती वाचून सह्य़ाद्रीच्या डोंगरवाटा त्यांच्यासाठी पायवाटाच कशा आहेत ते लक्षात येतं. हे लेख वाचताना आपण तिथे त्यांच्याबरोबर का नाही असं तर वाटतंच, शिवाय आपणही सॅक पाठीला मारून असंच भटकायला बाहेर पडावं असं वाटायला लागतं. म्हणूनच त्यातला कुणाचाही लेख वाचला आणि डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला की आपल्याही अवतीभवती असंच जंगल आहे, सह्य़ाद्रीच्या रांगा आहेत, खुलं आकाश आहे असं वाटायला लागतं. निसर्गाचा असा गंध तनामनात भरून घेता येतो.

Story img Loader