‘नियोजनाचाच दुष्काळ’ या विषयाला वाहिलेले लेख आणि ‘मथितार्थ’ वाचले. नियोजनाचा दुष्काळ आहे, असे म्हणताना त्याच्या दोन तऱ्हा लक्षात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे नियोजनाचा खरा अभाव आणि दुसरे म्हणजे अत्यंत प्रभावी नियोजन, पण वेगळ्या उद्दिष्टाने केलेले.
विस्तीर्ण समुद्रकिनारा, पावसाळी ढग अडवून तुफान पाऊस पाडणाऱ्या पर्वतरांगा, मुबलक नद्या, असे सर्व काही निसर्गाने भारताला देऊनही पाऊस जरासा कमी झाला तरी निर्माण होणारी भीषण पाणीटंचाई सर्वच राज्यकर्त्यांना लांच्छनास्पद आहे. या पाश्र्वभूमीवर कॅलिफोर्नियासारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये सलग तीन-चार वर्षे अपेक्षेपेक्षा खूपच कमी झालेल्या पाऊसपाण्याचे त्यांनी कसे नियोजन केले ते पाहण्यासारखे आहे. महासत्तांचे वेगळेपण युद्धापेक्षाही अशा नियोजनातून दिसते. एकीकडे उपग्रहांची मालिका अवकाशात उभी केल्यामुळे आपण कसे अमेरिकेच्या पंक्तीत बसलो आहोत म्हणून आपण आपली पाठ थोपटून घेत आहोत आणि त्याच वेळी दुसरीकडे शहरातील सुखवस्तू नागरिकांपासून ते खेडय़ातील गरिबांपर्यंत सर्व जण टँकरची वाट पाहत असतात. अत्याधुनिक मोबाइल फोन, फोर-जी नेटवर्क आणि व्हॉट्सअॅप वापरून पाण्याची परिस्थिती कशी आहे याची चर्चा आपण करतो हे आपल्या ‘नियोजनाचे’ विदारक चित्र आहे. नियोजनाचा ढोबळमानाने असणारा खराखुरा अभाव यातून दिसतो.
त्याच वेळी शहरात पाणीवाटपाचे मोजमाप गुलदस्त्यात ठेवणे, त्यातून होणारी ‘अर्थपूर्ण’ पाणीगळती, अनधिकृत नळजोडण्या, अर्धा ते वीस लिटपर्यंत बाटलीबंद पाण्याची तडाखेबंद विक्री, खेडोपाडी पाणी बंद नळांऐवजी खुल्या कालव्यातून नेणे, कितीही दुष्काळ पडला तरी काही मळे कायम हिरवेगार असणे हेही दिसते. हे सर्व हुशारीने केलेल्या प्रभावी नियोजनाशिवाय कसे शक्य आहे?
मानवी संस्कृतीचा विकास नद्यांच्या काठावर झाला. तेव्हा नद्या निसर्गनियंत्रित होत्या. मग ‘विकासाचे राजकारण’(!) सुरू झाले आणि नद्यांचे नियोजन जलसंपदा / पाटबंधारे इत्यादी खात्यांकडे आले. त्यामुळे पावसाने हलकीशी ओढ दिली तरी काय झाले हे आपण पाहतोच आहोत. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत असे शाळेत शिकवले जात होते तेव्हा पाणी आणि हवा असणारच असे गृहीत धरले होते. आता ‘वाय-फाय’ हीसुद्धा मूलभूत गरज बनली आहे असे म्हणतात; पण त्याच वेळी पाण्याने जणू काही ‘मला गृहीत धरू नका’ असा इशारा दिला आहे. नियोजनाचा अभाव आणि प्रभाव असा हातात हात घालून चाललेला दिसत आहे.
– प्रसाद दीक्षित, ठाणे.
रम्य ते बालपण
‘लोकप्रभा कार्टून विशेषांक’ (१३ मे) फार मजेशीर व मोहक वाटला. आपले बालपण आठवताना सर्वाच्या मनात बालपणीचे सोनेरी दिवस हातून निसटून गेल्याची खंत असते. या कार्टून अंकामुळे पुन्हा एकदा लहान झाल्यासारखे वाटले. लहान मुला-नातवांबरोबर खेळताना आपण आपलेच बालपण शोधत असतो. आजचा बालकांचा काळ शाळा, टय़ूशन, क्लासेस, छंदवर्ग यामध्ये पार गुरफटून गेला आहे. त्यांना खेळायला, मस्ती करायला वेळ उरलेला नाही. पालकांनी मुलांना फार बंदिस्त न ठेवता त्यांच्या मनाने, कलाने त्यांचा वेळ घालविण्याची संधी द्यायला हवी आहे. ‘लोकप्रभा’ने कार्टून विशेषांकाद्वारे घेतलेली बालकांची दखल प्रशंसनीय आहे.
हनुमान जयंतीनिमित्त २९ एप्रिलचा ‘हनुमान विशेष’ हा अंक फार माहितीपूर्ण व वाचनीय होता. रामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीची फोटो ठिकाणासहित माहिती सर्वासाठी उपयुक्त अशी होती. हनुमान, बजरंगबली, पवनपुत्र, मारुती, संकटमोचन, रामदूत, महावीर, बालाजी, ही हनुमानाची आठ नावे आहेत.
अनिल पाठक, विरार (प.)
आस्तिक-नास्तिक एक जीवनप्रवास
‘नास्तिक म्हणजे दुर्जन नव्हे’ हे पत्र वाचले. नास्तिकांना दुर्जन समजण्याचे अणुमात्र कारण नाही. नास्तिक आपले विचार कुणावरही लादत नाही वा नैतिकता-न्याय-सत्य (वास्तव) कधीच नाकारत नाही. देव-ईश्वर-परमेश्वर म्हणाल तर यांना पाहिलेलं कोण आहे? तरीदेखील बहुसंख्य लोक यांना मानतात. याचे कारण याच्या भीतीने तरी सर्व मानवजात सुरक्षित राहावी एवढय़ाचकरिता. अध्यात्मात प्रगती केलेले हेच अंतिम सत्य मानतात. यांना ‘नास्तिक’ म्हणवून घेणे आवडत नसेल, तर यामुळे काही एक बिघडत नाही. नास्तिक चार्वाक आपलाच ना? आस्तिक म्हणवणाऱ्यांनीच मानवाला स्वर्ग देऊ केला. मात्र त्याकरिता इतरांना मारण्याची-मरण्याची अट घातली. जो आस्तिक स्वत: जन्माला येताना ना तृण आणू शकला ना तृण निर्माण करू शकला, तो म्हणे स्वर्ग-नरकाचा निवाडा करणार!
धर्माने नास्तिकांना नाकारलेले नाही. कारण धर्म आपले पारलौकिक – भौतिक विचार कुणावर लादतच नाही. धर्माचे स्थान पोट नव्हे, हृदय आहे. हे खरेच आहे. आज ग्रंथप्रामाण्यालाच धर्म म्हटले जाते. यानीच मानव जातीचे अधिकाधिक नुकसान आजवर केलेले आहे, नास्तिकांनी नव्हे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते, जेथे मानवी प्रयत्न संपतात, तेथून ईश्वरी प्रयत्न सुरू होतात. आस्तिक-नास्तिक एक जीवनप्रवासच आहे स्वत: अनुभवयाचा..
– सूर्यकांत शानभाग, बेळगाव.
अरेरावीपणाचा कळस
‘अनाकलनीय विकेट’ (लोकप्रभा २९ एप्रिल) नुसार बीसीसीआयने अमिताभ बच्चन यांच्या ट्विटर कॉमेन्टमुळे हर्ष भोगले यांना क्रिकेट समालोचनापासून परावृत्त केले हे अत्यंत चुकीचे आहे. मुळात अमिताभ बच्चन यांना भारतीय जनतेता एकमेव आवाज ठरवणे हा अरेरावीपणाचा कळस आहे. आता बीसीसीआयने भोगले व भारतीय क्रिकेटप्रेमी जनतेची क्षमा मागून भोगलेंना आदरासहित परत पूर्वपदावर बसवले पाहिजे.
– चंद्रकांत लेले, भोपाळ (म.प्र.).
कार्यवाही अन्यायकारक
हर्षां भोगले यांच्यावरील प्रसाद लाड यांचा लेख वाचला. वास्तविक हर्षां यांनी त्यांचे काम नीट पार पाडले. त्यांचे ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतील नागपूर येथील सामन्याचे समालोचनही ठीक होती. त्यामुळे बीसीसीआयने त्यांच्यावर केलेली कारवाई न्यायसंगत वाटत नाही.
– गोविंद बापट, गुजरात.
पर्यावरणाशी जोडलेली श्रद्धा आणि पर्यावरणाचा ऱ्हास
दि. २९ एप्रिलचा ‘हनुमान विशेष’ हा ‘लोकप्रभा’चा अंक मनापासून आवडला. हनुमान या लोकप्रिय दैवतावरील लेख अभ्यासपूर्ण आणि चांगले होते. त्यामुळे हा अंक संपूर्ण संग्रा बनला आहे.
सदर अंकातील ‘श्रद्धेच्या अर्काचा अर्थ’ हा पंकज भोसले यांचा लेख सुंदर होता. रुई पाने (अर्कपत्रे) याविषयीची माहिती विलक्षण होती. शिवाय रुईच्या पानांचा आर्थिक व्यवसायही थक्क करणारा आहे. निसर्गाची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेऊन हा व्यवसाय सुरू आहे हे वाचून खूपच बरे वाटले. दादर पश्चिम रेल्वेलगत असणारे फूलमार्केट मुंबईतील फुले खरेदी विक्रीचे सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. इथला फूलबाजार प्रसिद्ध आहेच, पण इथे चालणारा विविध जातींच्या पानांचा व्यवसायही आपले लक्ष वेधून घेत आहे.
रुईच्या पानांबरोबरच इतर अनेक जातींची पाने या फूलबाजारात मोठय़ा प्रमाणावर विकायला येतात. कडुनिंबाची पाने या ठिकाणी वर्षभर विक्रीस ठेवलेली असतात. औषधी लेप बनविणे, आंघोळीसाठी, हारांमध्ये गुंफण्यासाठी कडुनिंबाच्या पानांना येथे रोजच मागणी असते. पण गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी मात्र यांची नेहमीपेक्षा जास्तच विक्री होते. त्यावेळी कडुनिंबाच्या पानांची जुडी पाच रुपयांपासून थेट वीस रुपयापर्यंत जाते. दुसरी प्रसिद्ध पाने म्हणजे आंब्याची पाने. प्रत्येक मंगलकार्यात आंब्याची डहाळी शुभ असल्यामुळे आंब्याची डहाळी आपल्याला हमखास आढळेल. त्याशिवाय गुढीपाडवा, दसरा, दिवाळी अशा सणांना आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण घरोघरी बांधले जात असल्यामुळे आंब्याच्या पानांनाही चांगली मागणी असते. पण काही वेळेला आंब्याच्या पानांची उपलब्धता झाली नाही तर खोटा अशोक किंवा आसुपालव या झाडांची पानेही तोरणात गुंफलेली आढळतात. केळीची पाने आणि केळीचे खांबही आपल्याला वर्षभर मिळतील.पण केळीच्या पानांना णोठय़ा प्रमाणावर मागणी असते ती श्रावण महिना आणि गणेश चतुर्थीचे पाच ते सात दिवस. या दरम्यान केळीच्या पानांचा व्यवसाय दिवस-रात्र चाललेला असतो.
श्रावण महिन्यात काही आदिवासी स्त्रियाही जेवणासाठी लागणारी केळी आणि चवईची (केळ्याची एक जंगली प्रजाती) पाने विकताना आढळतात. तसेच टोपलीतील भाजी, फळे खराब होऊ नयेत यासाठी दररोज भाजीपाला विक्रेतेही केळीची पाने विकत घेत असतात. त्याचप्रमाणे या भागात सोमवारी बेलाची पाने आणि मंगळवारी दुर्वाची मोठय़ा प्रमाणावर विक्री होते.
झिप्री नावाचे झाड तिच्या विशिष्ट पानांमुळे प्रसिद्ध आहे पण त्याचा वापर माफक प्रमाणात फुलांचे हार बनविण्यासाठी होतो. त्यामुळे अल्प प्रमाणात झिप्रीच्या पानांचे विक्रेतेही आहेत. देवांच्या पूजेसाठी पानांचा वापर होतो, तसेच सजावटीसाठीही विविध प्रकारच्या पानांचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. पाच ते सहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या आकर्षक पानांच्या व्यवसायाने आता चांगलाच जम बसवला आहे. यामध्ये सध्या पश्चिम बंगालमधील काही व्यावसायिक आपले बस्तान याच भागात मांडून बसले आहेत. बंगाली पत्ता किंवा कलकत्ता पान अशा नावाने सदर व्यवसाय चालतो आणि यामध्ये देखील गणेशोत्सव, नवरात्र, लग्न अशा सणांना लाखो रुपयांची उलाढाल होते.
आकर्षक कमानी सजावटीसाठी फुलांबरोबरच बंगाली पत्त्यांना चांगली मागणी आहे. यासाठी कामिनी पत्ता, सीताबेल, नेचे, फर्न, पांढरी लिलीची पाने, मनीप्लांटची मोठी पाने, शोभेच्या पाम झाडाची पाने याबरोबरच वडाच्या पारंब्या, हाथीघास (हत्तीचारा), नारळाच्या झाडाच्या कोवळ्या झावळ्या आदींचाही व्यवसाय चांगला चालतो. मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर सध्या तरी या बंगाली पानांचा व्यवसाय सुरळीत सुरू आहे. पण सगळ्यात वाईट वाटते ते दसऱ्याच्या दिवशी तेथे कचऱ्यात पडणाऱ्या आपटय़ांच्या फांद्याकडे बघून.
दरवर्षी दसऱ्याचे सोने म्हणून आपटय़ाच्या झाडांची मोठय़ा प्रमाणावर तोड होते. दुर्दैवाने आपटय़ाच्या पानांच्या साधम्र्यामुळे कांचनच्या झाडांचीही नाहक तोड होते. आपटय़ाची पाने म्हणून कांचनची पाने सहज खपविली जातात. हे आपल्या संस्कृती आणि श्रद्धेचे अज्ञानच मानावे लागेल. मार्गशीर्ष महिन्यातील वैभवलक्ष्मी व्रतासाठीही पाच प्रकारच्या झाडांची पाने लागतात. त्यावेळी देखील मोठय़ा प्रमाणावर झाडांची पाने आणि फांद्यांची तोड होते आणि विक्री न झालेल्या पण निसर्गाकडून ओरबाडल्या गेलेल्या पानांचे ढीग बघून खंत वाटते. पानांच्या या व्यवसायात मानवाची आर्थिक गणितं व्यवस्थित जुळतीलही, पण त्यामुळे निसर्गाची समीकरणे बिघडणार नाहीत याची काळजी सर्वानी घेतली पाहिजे. श्रद्धेच्या अर्काचा अर्थ त्यावेळीच खऱ्या अर्थाने सकारत्मक रूप घेईल.
– सुहास बसणकर, दादर.
तपासात गती हवी
दि. २० मेच्या अंकातील ‘ऑगस्टाफोर्स’ या ‘मथितार्थ’मध्ये विनायक परब यांनी छान विश्लेषण केले आहे. भारतातला भ्रष्टाचार थांबला, तर भारत देश जगातला पहिल्या पाच देशांत नक्कीच स्थान मिळवू शकेल. भ्रष्टाचाराची कीड देशाच्या प्रगतीसाठी हानिकारक आहे. बोफोर्स काय, एन्रॉन काय, नुसते आरोप झाले. शेवटी निष्पन्न काहीच झाले नाही. असे आरोप जेव्हा होतात, तेव्हा तपास लवकरात लवकर व्हायला हवा.
– प्रफुल्लचंद्र पुरंदरे, वेसावे, मुंबई.