lp-cvr02दोन ऑक्टोबरच्या ‘लोकप्रभा’तील संस्कृतीच्या नावाखाली ही मुखपृष्ठ कथा वाचली. सदर लेखातील मुद्दे पटणारे असले तरी काही प्रश्न शिल्लक राहतात. मुळात आपल्या लेखाचा सारा रोख हा केवळ आणि केवळ हिंदू धर्मातील सणांविषयीच आहे. मान्य आहे की आपल्या धर्मात सर्वाधिक सण-समारंभ साजरे केले जातात. पण आपल्या देशात इतरही अनेक धर्म त्याच पद्धतीने अनेक सण-समारंभ साजरे करत असतात. रमजान ईदच्या काळात मुंबईतल्या ठरावीक ठिकाणी सार्वजनिक वाहतूकच नाही तर खासगी वाहनांना-देखील अघोषित प्रवेशबंदी असते. त्या काळात तेथे होणारे प्रदूषण हेदेखील तेवढेच हानीकारक आहे जेवढे हिंदू धर्माच्या सण-समारंभात होत असते.

दुसरा मुद्दा आपणच आपल्या लेखात मांडला आहे. तो म्हणजे बहुसांस्कृतिकता. आज आपल्याकडे उत्सवीकरणाच्या सामाजिक मर्यादा, नियम, बंधने अनेक ठिकाणी (मुख्यत: उच्चभ्रूंमध्ये) पूर्णत: नाहीशी झाली आहेत. त्यांना सोकॉल्ड हिंदू धर्मातील चालीरीती जुनाट वाटतात. पण त्याच वेळी पाश्चात्त्य सणांच्या चालीरीती ते पुरोगामीत्वचा मुखवटा लेवून सहज स्वीकारतात. मग या दुटप्पी समाजाबद्दल आपण कधी बोलणार की नाही?

एकीकडे आपण पुरोगामी, समाज अभ्यासक जगातील हिंसा-अहिंसेवर व्याख्याने झोडणार. शाकाहार कसा चांगला ते सांगणार. मद्यप्राशनावर जागतिक चर्चा करणार. पण दुसरीकडे हाच वर्ग आपल्या वैभवशाली हिंदू परंपरेवर मात्र तोंडसुख घेणार (तेदेखील एखादा पाश्चात्त्य मद्याचा प्याला घेऊन आणि बीफचा उदोउदो करत.) ही सारी विसंगती आपल्या लक्षात येत नाही का? की केवळ सॉफ्ट टार्गेट म्हणून तुम्ही आम्हाला झोडपत राहणार. एकदा कधीतरी या सर्वाचा साकल्याने विचार होणे गरजेचे आहे.
– अनिल काळे, ई-मेलवरून, नागपूर.

lp-cvr01देशोदेशी उत्सव झाला, पुढे काय?
‘लोकप्रभा’चा गणेश विशेषांक म्हणजे कायमच एक संग्राह्य़ अंक म्हणून पाहिले जाते. आपल्या पहिल्या गणेश विशेषांकाने हा निकष पुरेपूर पाळला. पण दुसरा विशेषांक काहीसा निराशाजनक ठरला.

पूर्वी मुंबईत एक दाक्षिणात्य आला की तो पुढे येणाऱ्या दहा जणांची मुंबईतली सारी व्यवस्था पाहायचा. आज तेच गणित उत्तर भारतीयांना लागू होते. यातील इतर सामाजिक मुद्दे बाजूला ठेवू या. पण या सर्वच समाजाने मुंबईत प्रत्येकाची पोटापाण्याची सोय कशी होईल हे पाहिले आहे. आज हेच गणित अपग्रेड होऊन आयटी क्षेत्रालादेखील लागू आहे. मुंबईच्या ज्या भागात आयटी क्षेत्राचा विकास झाला आहे तेथे दाक्षिणात्यांसाठी विशेष सवलतीत खानावळ आणि निवासाची व्यवस्था पुरवली जाते. यामागे व्यावसायिक गणित असले तरी ते एका विशिष्ट वर्गाला पूरक ठरणारे आहे. या पाश्र्वभूमीवर परदेशात स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी अशी काही उदाहरणे समोर ठेवली आहेत का? की केवळ उत्सव साजरे करण्यातच आनंद मानला? हे चित्र सकारात्मक पद्धतीने पालटण्यास काहीच अडचण नसावी. पण गरज आहे ती इच्छाशक्तीची. त्याचाच अभाव दिसतो.
– अजिंक्य कांबळे, ई-मेलवरून.

‘गणेश विशेषांक’ आवडले…
दि. १८ सप्टें.चा ‘गणेश विशेषांक’ हा वाचनवेडय़ा गणेशभक्तांसाठी एक अप्रतिम मेजवानीच होती. विनायक परब यांच्या असिंधुगांधापर्यंत गणेश देवता.. या कव्हरस्टोरीने गणपती बाप्पाचं जागतिक अस्तित्व, गणपती या देवतेचं ऐतिहासिक, पुरातत्त्वीय महत्त्व हे खूपच अभ्यासपूर्णपणे ‘लोकप्रभा’च्या वाचकांना उपलब्ध करून दिले. या अंकातील मूíतकला, शिल्पशास्त्र याबद्दलची माहिती फारच रोचक वाटली. गणपती ही जशी विद्य्ोची देवता आहे तशीच ती कलेचीसुद्धा देवता आहे. ६४ कलेची देवता असणारे गणपती हे कलाकारांचं, कलाप्रेमींचं आद्य दैवतच. देशोदेशीच्या गणेशभक्तीच्या माहितीसोबतच गणेशभक्तीचं अनोखं उदाहरण असणाऱ्या संतोष विणके लिखित गणेशभक्तीचा अक्षराविष्कार घडवणाऱ्या राज कांदळगावकर या कलाकाराच्या कलेचे ‘लोकप्रभा’ने घडवलेले दर्शन हे मन सुखावून जाणारे होते. एक मराठी तरुण गणेशाच्या अक्षरकलाविष्काराचा विक्रम करतो, याचाच जास्त अभिमान वाटतो. ‘लोकप्रभा’चे सर्वच अंक एवढे छान असतात की ‘लोकप्रभा’ म्हणजे एखादा रत्नपारखी असल्याप्रमाणे महाराष्ट्रातील दुर्मीळ रत्न खुल्या प्रवाहात आणणारा वाटतो. या सोबतच याच अंकातील दुमदुमणारं कलावंताचं पथक.. बाप्पा प्लीज एवढं कराच आणि रवी आमलेंचा कोण म्हणतो हे टिळकांना रुचले नसते हे लेख पण छान वाटले. ज्ञान, माहिती, मनोरंजनाची ही मेजवानी ‘लोकप्रभा’ने कायम देत राहावी, हीच शुभेच्छा..
– रवींद्र ना. इंगळे, अकोला.

lp-cvr03मेडिक्लेमचं करायचं काय?
मेडिक्लेमचं भेदक वास्तव हा लेख उद्बोधक आणि माहितीपूर्ण होता. पण एकंदरीत हे सारं वाचल्यावर आमचा तरी असा समज झाला आहे की मेडिक्लेम घेऊन पस्तावण्यापेक्षा न घेतलेला बरा. माझ्याच पाहण्यात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांना मेडिक्लेमचा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत फायदा झाला आहे. मग हा आरोग्य विमा करावा की न करावा हा संभ्रम जो निर्माण झाला आहे तो कृपया दूर करावा.
– मंदार नंदरगे, सातारा, ई-मेलवरून.

पुस्तकाचं पान, एक स्तुत्य उपक्रम..
हल्ली वाचन कमी झालं आहे असा एक सर्वसाधारण सूर लावला जातो. पण त्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नेमकं काय वाचावं, या मार्गदर्शनाचा अभाव. पण लोकप्रभामधून पुस्तकाचं पान या सदरातून ही उणीव काही प्रमाणात भरून निघते असे वाटते. वेगवेगळ्या विषयांवरील अनेकविध पुस्तकांची विलक्षण माहिती या पानातून मिळते. हा उपक्रम असाच सुरू ठेवावा.
– अंजली भोसले, कोल्हापूर, ई-मेलवरून.

‘सुने’च्या लेखिकेचा चेंगटपणा
‘होणार सून…’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय झाली आहे, त्यामुळे प्रेक्षक बघतात. (अर्थात् काही शहाण्या प्रेक्षकांनी ती मालिका बघण्याचे सोडून दिले आहे.) कामे सर्वानी सुंदर केली आहेत; कारण लेखिकेने अत्यंत सुंदर संवाद लिहिले आहेत. दोघांनीही एकमेकांना प्रतिसाद छान दिला आहे; त्यामुळे प्रेक्षकही आकर्षित झाले आहेत. पण त्याचा गैरफायदा ‘होणार मी..’ या मालिकेची ‘टीम’ घेते आहे. वाढवा लेखिका छान करते आहे; पण त्यालाही काही मर्यादा पाहिजे.

प्रथम ‘जान्हवी’ला दिवस गेले, हे न सांगण्यात अनेक भाग गेले; ज्यात काही अर्थ नव्हता; पण आता पुढच्या भागात गुपित फुटेल असं वाटल्याने बिच्चारे प्रेक्षक बघत राहिले. त्यात भरीस भर म्हणून आई-आजी परदेशी गेल्या व जाताना मी आल्याशिवाय ही गोड बातमी कोणाला सांगायची नाही, ही अट घातली. (आम्ही प्रेक्षकांनी तेव्हाच कप्पाळावर हात मारला; कारण आता आणखी काही भाग उगाच वाढवणार) आल्यावरही ‘सोहळा करणार’ या नावाखाली काही भाग विनाकारण वाढवले; तरी प्रेक्षकांनी महाकंटाळा येऊनही श्री-जान्हवी’करता मालिका बघत राहिले; कारण ते जोडपे खरोखरच गोड आहे. कामेपण मस्त करतात.

आता तर कहर केला आहे. प्रेक्षकांच्या डोक्यावरून पाणी जायला लागले आहे. लेखिका पिंटय़ाचे लग्न जमवायला सतराशे-साठ विघ्ने (नकटा नसताना) आणते आहे. पण मालिकेचा भाग लांबून मालिका विनाकारण लांबते आहे. प्रेक्षकांच्या रागाचा स्फोट होईल; तेव्हा लेखिकेने आवरते घ्यावे. पिंटय़ाची आई आयुष्यात एक चांगले काम करते आहे; तर ते तिला करू द्यावे की! गावंढळ मुलीला कशाला मध्येच घुसवले? वाढवापण पाणचट झाला आहे. तेव्हा आता पाण्याबरोबर भात-पोळी प्रेक्षक खाणार नाहीत. (मालिका बघणार नाहीत.). लेखिका प्रतिभावान आहे. तिचा सिनेमापण बक्षीस पटकावून गेला आहे, ज्याचे संवाद लिहिले व दिग्दर्शनपण केले. तेव्हा आता नवीन मालिका हातात घ्यावी. शिळ्या कढीला ऊत आणणे बंद करावे. प्रतिभा आहे तिला, तेव्हा ती फुलू दे. नवीन मालिकेत प्रतिभेचे नवीन धुमारे फुटतील. आता ह्या जुन्या मालिकेतील ‘संबंधित मंडळी’ ऐकत नसतील; तर ती मालिका सोडून द्यावी. सडत बसू नये. नव्या मालिकांकरता रांग लागेल. लेखिकेला आणखी प्रसिद्धी मिळेल. प्रेक्षकांचे आशीर्वाद आहेत.

लेखिकेच्या चेंगटपणाला बक्षीस द्यावे काय? (कोणी सांगितले म्हणून वाढवत जायचे. नकार द्यायची हिंमत नाही का?)
– रेखा केळकर, कामशेत.

lp-cvr04महालक्ष्मी नव्हे, अंबाबाई
मी आपल्या साप्ताहिकाची नियमित आणि प्रथमपासून वाचक आहे. आपले साप्ताहिक मराठी मनाचा मानबिंदू आहे. नवे विषय, नवी स्थळे, नवी पुस्तके, नव्या रेसिपी यांची साद्यंत माहिती या साप्ताहिकातून मिळते.

आपला २८ ऑगस्टचा अंकसुद्धा वाचनीय आहे. ‘रांगडय़ा चवीचं कोल्हापूर’ हा सुहास जोशी याचा लेख छान आहे. पण सर्वत्रच पसरवलेला गैरसमज त्यात आहे. ‘कोल्हापूरची महालक्ष्मी’ हा तो गैरसमज. ही अंबाबाई आहे. तिच्या बहिणीचे नाव त्र्यंबोली (तीन डोळ्यांची) असे आहे. अंबाबाईच्या हातात खेटक आहे. हातावर शिवलिंग आहे. मस्तकावर नाग आहे.  गाभाऱ्याच्या वरच्या मजल्यावर मातु:लिंग आहे. एवढेच नव्हे तर नवरात्रात ज्या देवीचे नवरात्र असते दुर्गादेवीचे ते या मंदिरात मोठय़ा उत्साहात पारंपरिक पद्धतीने घट बसवून नंदादीप ठेवून साजरे करतात. शिवाय या मातेने कोल्हासुराचा वध केलेला आहे. मुलाच्या प्राणासाठी या मातेने नवऱ्याशीसुद्धा युद्ध केले. लक्ष्मीसारखी सेवा करून मेवा खाणारी ही पत्नी नाही. स्वत:चा अवकाश आणि मानमर्यादा यांचं रक्षण ती स्वत: करते. कोणतीही किंमत चुकवायची तयारी ठेवून. लक्ष्मीसुद्धा आपल्या जागी श्रेष्ठच आहे. युद्धाने प्रश्न सुटत नाहीतच, पण युद्ध न करूनही ते सुटत नाहीत.
– अनुराधा जोशी, माहीम, मुंबई.

प्राची साटम ह्यंचा ‘मेंढरे बनू नका’ हा लेख सोशल मीडियाशी जरा जास्तीच सख्य असलेल्या मुला-मुलींनी, तरुण-तरुणींनी जरूर वाचावा आणि  त्यापासून  धडा घ्यावा.
– सुरेश देवळालकर, हैदराबाद.

Story img Loader