‘लोकप्रभा’चा मी नियमित वाचक आहे. लोकप्रभाचा नवीन अंक केव्हा येतो याची आम्ही वाट बघत असतो, इतकी विविध विषयांवरील माहिती आपण दर आठवडय़ाला देत असता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दत्त जयंतीचा अंक वाचला. श्रीदत्तस्थानांची एवढी माहिती दिलीत. काही ठिकाणे मला माहीत नव्हती. आमचे सर्व कुटुंब दत्तसेवेत वाहून घेतले आहे. सावेडी रोड अहमदनगर येथे श्रीदत्त देवस्थान आहे. रामकृष्ण क्षीरसागर. क्षीरसागर महाराजांनी निर्माण केलेले दत्तक्षेत्र गेली ४० वर्षे सर्व दत्तभक्तांचे श्रद्धास्थान सर्वभक्तांना आधार वाटावा, अशा स्थानाचा आपण उल्लेख करू नये यांचे आश्चर्य वाटते. श्रीगेरीच्या जगतगुरु श्री श्री श्री भारती-तीर्थन स्वामी याच्या परम पावन कमलांनी ११ जुलै २००७ श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. या देवस्थानमध्ये आज वेद विद्येचे कार्य अखंड चालू असून ८ ते १० वर्षांचे ७०/८० बटू वेदांचा अभ्यास व पठण करत आहेत. वर्षांला ६ उत्सव मोठय़ा प्रमाणात होतात. दर उत्सवाला ५ ते ७ हजार भक्त भारताच्या सर्व भागांतून येत असतात. १५ वर्षे झाली महाराजांनी देह ठेवल्यावर अजून इतके भक्त येतात ही महाराजांवरील श्रद्धाच आहे. तरी अशा देवस्थानाचा आपण जरासुद्धा उल्लेख करू नये याचे आश्चर्य वाटते. देवस्थानची माहिती आपल्या विशेषांकात का नाही, असे फोनवरून विचारले असता लोकप्रभा प्रतिनिधीने सांगितले की प्रस्तुत देवस्थानची माहिती गेल्या वर्षीच्या दत्त विशेषांकामध्ये प्रसिद्ध झाली आहे. परंतु मला असे वाटते की आपण त्यांचा उल्लेख पुन्हा केला असतात तर लोकांना त्याचा अत्यंत आनंदच झाला असता.

महाराजांच्या कार्याबद्दल हजारो भक्त दारोदार भिक्षा मागून देवस्थानला निधी जमा करत असतात व ते स्वखर्चात सर्व भक्तीपोटी करत असतात. गेली १० वर्षे अशा प्रकारच्या सेवा हैदराबाद, बडोदा, अमरावती, भोपाळ, इंदौर, बेळगाव, नागपूर वगैरे ठिकाणी झाल्या आहेत. त्यांच्या भक्तांमध्ये मुस्लीम, ख्रिश्चन या अन्य धर्मीयांचाही समावेश आहे.
– मोरेश्वर बापट, ठाणे.

संग्राह्य़ दत्त विशेषांक

‘दत्त विशेषांक’ गेल्या वर्षीसारखाच संग्रा झाला आहे.

लातूरच्या निर्गुण पादुका असलेल्या दत्तमंदिराविषयी, बसवकल्याणच्या श्री सदानंद दत्त महाराजांच्या देवस्थानाविषयी व अन्य अनेक अल्प प्रसिद्ध असलेल्या दत्त स्थानांविषयी मौखिक व संशोधित परंपराविषयी सविस्तर व सचित्र माहिती दिल्याबद्दल आभार.

दत्तात्रेयाचा चतुर्थ अवतार मानल्या जाणाऱ्या माणिकप्रभू हमनाबादकर यांचा इथे उल्लेख करावासा वाटतो. नारायण सदाशिव पांगारे लिखित ‘श्री सद्गुरु माणिक प्रभु लीला महिमा’ हा ग्रंथ पद्यात्मक आहे. त्याची पहिली ओवी अशी आहे.

‘श्री गणेशाय नम:। मंगलमूर्ती श्रीगणपती। माझी करावी शुद्ध मती।

श्री माणिक प्रभुलीला चरित्र गावया चित्ती। बुद्धि प्रकाशित करावी॥’

चाळीस अध्यायात विभागलेला हा ग्रंथ म्हणजे साध्या व प्रासादिक भाषेत माणिक प्रभूंना वाहिलेली श्रद्धांजली आहे. या ग्रंथाचा अंतिम श्लोक देण्याचा मोह आवरत नाही.

‘इति- श्री माणिक प्रभुलीला चरित्र सुंदर।

परिसोत तुम्ही भाविक भक्त थोर।

विनवितसे सदाशिवा मज नारायण प्रभुदासांचा किंकर।

चाळिसावा अध्याय गोड हा॥
– गोविंद टेकाळे, ठाणे.

अंक आवडला

‘लोकप्रभा’च्या प्रासंगिक अंकांमधून येणाऱ्या माहितीपूर्ण लेखांमधून भरपूर वाचायला मिळते. हे लेख सर्वागसुंदर असतात. गणपती उत्सवातील उत्सवी बाजू, तिचे वास्तव याच्यापेक्षाही विसर्जनाचा मुद्दा अत्यंत क्लेशकारक आहे. विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रिम तलावांची उंची ७-८ फूट तरी हवी. गणपती विसर्जन करणाऱ्या व्यक्तीच्या पायाचा विसर्जन केलेल्या मूर्तीला स्पर्श होतो. असे होऊ नये म्हणून हे विसर्जन तलाव खोल हवेत. घरगुती गणपतीवाले बऱ्यापैकी पर्यावरण रक्षण करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या अंकातून हे छान मांडले आहे.

वैद्य प. य. खडीवाले यांचे सर्व लेख उत्तम असतात. सोपे पथ्य व भाजी, फळे सर्वत्र मिळणारी आहेत. सहज पाळता येणारा आहार असतो.

‘लोकप्रभा’चा सोने दागिने अंक छान होता. महाग सोने घेणे जमत नाही, पण छोटे छोटे इमिटेशनचे दागिने आवडले. दागिन्यांमधील नावीन्य वेधक होते. सर्व सराफ मंडळी नावीन्याच्या ध्यासात आहेत, हे जाणवले. रुचकरमधील पदार्थ त्यात दिलेल्या प्रमाणानुसार बरोबर होतात.

प्रसंगानुसार प्रकाशित केलेले ‘लोकप्रभा’ चे अंक उत्तम आहेत.
– पद्मजा आंबेकर, बोरिवली.

चेन्नईच्या आपत्तीचा धडा

चेन्नईत पडलेल्या तुफानी पावसामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या शहराकडे वेधले गेले. तसे पाहिले तर नैसर्गिक आपत्ती ही भारताच्या पाचवीला पुजलेली आहे. तसेच कोणत्याही राज्यात ज्यावेळी नैसर्गिक आपत्तीतून जी वाताहत होते तेव्हा त्याचे राजकारण केले जाते. कोणतेही संकट अनपेक्षित असले, तरी या दुर्घटनेमुळे एक राष्ट्रीय सत्य विशेष प्रकर्षांने असे जाणवते की, निसर्गाच्या कोपाचा शासन व लोकही फार क्वचित विचार करतात. चेन्नईत जे काही घडले. त्यामुळे शहाणे होऊन भविष्यकाळात भारतातील प्रमुख राज्यांतील शहरे, तेथील यंत्रणा सक्षम करण्याची आपत्ती आल्यास हानी कशी कमी होईल किंवा टाळता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे. एखादी आपत्ती आली की, पर्यावरणतज्ज्ञ आणि सरकार जागे होते आणि चर्चा होते आपत्ती ओसरल्यास चर्चादेखील हवेत निघून जाते. निसर्गाच्या पुढे कोणी नाही हे लक्षात ठेवावे.
– सुनील कुवरे, शिवडी, मुंबई.

तर मग कौतुक करणारे लेखही लिहू..

दि. १८ डिसेंबरच्या ‘लोकप्रभा’मध्ये ‘टीव्ही मालिका-महागुरू हा माझा लेख प्रसिद्ध झाल्यावर फोन, एसेमेस, व्हॉट्सअ‍ॅपवर लेख आवडल्याच्या प्रतिक्रिया मिळाल्या. त्यात काही फार मोठे लेखन गुण होते म्हणून नाही तर आत्यंतिक जिव्हाळ्याच्या विषयावर आपल्याला जे वाटतंय तेच कुणीतरी नेमकं लिहिलंय म्हणून. पण काही तिरकस शेरेसुद्धा मिळाले.

दैनंदिन मालिका बघणं ही निकृष्ट, हीन दर्जाची करमणूक आहे असा एक अहंगंड स्वत:ला बुद्धिवादी समजणारे बाळगतात आणि संधी मिळेल तेव्हा मालिका बघणाऱ्यांना तुच्छतेची वागणूक देतात, टोमणे मारतात. परंतु टीव्ही मालिका बघणाऱ्या लोकांचा एक फायदा त्यांना कळत नाही. ‘तिकडे’ कोण कुणाचा छळ करतंय, कोण कुणाविरुद्ध कट रचतंय याचा आपल्यावर काहीच परिणाम होणार नसतो, त्यामुळे आपण अस्वस्थ होत नाही, आपली झोप उडत नाही. करमणूक निर्बुद्ध असली तरी टीव्ही चालू असेपर्यंत घरातल्या, वैयक्तिक विवंचना आपण दूर ठेवू शकतो. कुठेही गप्पा मारताना टिंगलटवाळी करून हसण्यासाठी हुकमी विषय मिळतात. खऱ्या माणसांबद्दल बोलून संबंध दुरावण्याचा धोका असतो, तो राहत नाही. मालिकांवर टीका करण्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या कारणांनी मनात निर्माण झालेल्या आणि साठून राहिलेल्या नकारात्मक ऊर्जेचा निचरा होऊन जातो, मन स्वच्छ व्हायला मदत होते. कसं वागावं आणि कसं वागू नये ते आपण शिकतोच, पण तेच उदाहरणासह पाहायला मिळतं तेव्हा लवकर पटतं.

नावं ठेवायची तर बघता कशाला? रिमोट आहे ना हातात? तो वापरा. इतर कितीतरी वाहिन्यांवर माहिती देणारे मनोरंजक कार्यक्रम असतात ते बघा. काय बघायचं ही निवड करू शकता ना तुम्ही? असंही काही जणांनी मला म्हटलं. ज्येष्ठ नागरिकांच्या, करमणुकीसाठी बाहेर जाणं शक्य होत नाही, अशांच्या अडचणी या लोकांना दिसत नाहीत किंवा महत्त्वाच्या वाटत नाहीत. मुलं लांब असतात, जवळ असली तरी आपला संसार, व्यवसाय यांच्यात मग्न असतात. काही कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, घर सोडता येत नाही. मग वेळ घालवायचा कसा? सामाजिक कार्य, आवडीचे उपक्रम, छंद या सगळ्याला पसा, अंतरं, शारीरिक दुखणी यांची बंधनं असतात, ती कुणाला सांगून कळत नाहीत.‘जावे त्याच्या वया, तेव्हा कळे’ आणि केवळ वय वाढलं म्हणून देवाचं नाव घेणं ही फसवणूक आहे- आपलीच. अगदी मनापासून जोपर्यंत देवाची आठवण येत नाही, तोपर्यंत मन तिथेही रमत नाही आणि दिवसा काहीही केलं तरी रात्री घरी येतोच ना आपण? मग तो वेळ कसा घालवायचा? अशा वेळी समोर दिसणारी हलती बोलती माणसं बघण्याशिवाय काय करता येईल? पुस्तक, रेडिओ यांच्यात नाही फार रमता येत अंधार पडल्यावर. मन भरकटतं. नको त्याच आठवणी काढत राहतं. अशा वेळी मनाला ताब्यात ठेवण्यासाठी टीव्ही उपयोगी पडतो. ज्ञान, माहिती देणारे कार्यक्रम बहुश: परदेशात तयार झालेले आणि इंग्रजीत असतात. नेल्सन-काळे, तर्खडकर यांच्या कृपेने कामापुरतं इंग्लिश लिहिता-बोलता आलं तरी परदेशी उच्चार सवयीचे नसतात. कळत नाही तिकडे काय चाललंय ते.

काही जणांनी तावातावाने म्हटलं की मालिका काय फक्त शहरी प्रेक्षक बघतात का? ग्रामीण किंवा अल्पशिक्षित प्रेक्षक पण टीव्ही बघतात, त्यांचा विचार नको का करायला वगरे. म्हणजे ग्रामीण भागातले किंवा काही अडचणींमुळे अल्पशिक्षित राहिलेले प्रेक्षक निर्बुद्ध असतात हा उघड आरोप. समोर चाललंय ते ‘काहीच्या बाही’ आहे हे त्यांना कळत नाही असं आपण गृहीत धरायचं!

टीव्ही हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे हे चांगलं असो की वाईट, पण ते खरं आहे. मग त्या टीव्हीवर आपण जे बघतो हे कसं असावं हे आपण नाही तर कुणी ठरवायचं? टीव्हीचे ग्राहक आहोत आम्ही. मग ‘आम्ही दाखवू ते बघा’ असं नाही चालणार. जे आम्हाला आवडेल तेच बघायला मिळालं पाहिजे. तुम्ही त्याची काळजी घ्या, मग कौतुक करणारे लेखसुद्धा लिहू आम्ही.
-राधा मराठे, ई मेलवरून.

आमच्या पत्रांनी काय होणार?

दि. १८ डिसेंबर २०१५ चा लोकप्रभा वाचण्यात आला. अधूनमधून मालिका झेलण्याचे लेख ‘लोकप्रभा’त येतात. या अंकांतही मालिकांवर दोन लेख वाचण्यात आले. लेखिकांनी सुंदर रीतीने विषय मांडला. दोन लेखिकांनी ‘लेख’ लिहिले याचा अर्थ हा घ्यायचा का, की पब्लिकला व ‘लोकप्रभा’लासुद्धा टीव्ही मालिकांच्या डोसने अपचन झाले. आपण सामान्य व्यक्ती काय करणार? चॅनेलवाले हे लेख वाचणार नाही कारण जाहिरातीचा मलिदा गोळा करण्यात जास्त आनंद. लेखिकांनी उपाय सांगितलेले नाही. पूर्वीच्या काळात (तो घिसापीठा संवाद- ज्येष्ठ नागरिकांचा.. आमच्या काळात असो) फक्त १३-१६ एपिसोड्स व्हायचे. नंतर ती मालिका बंद. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे लेखकानी मालिका चॅनेलवाल्यांना लिहून द्यायची व अट ठेवायची की यात काहीही कमीजास्त तोडफोड करायची नाही. ही मालिका फक्त ४० ते ५० एपिसोडची असावी. तसे न केल्यास न्यायालयात जावे लागेल. लेखकांनी मालिकासुद्धा बोधप्रद लिहाव्यात, कुटुंबवत्सल असाव्या. महाराष्ट्रात विनोदी लेखक आहेत त्यांच्याकडून विनोदी मालिका लिहून घ्याव्या. उदाहरण द्यायचे तर सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ चिमणराव ही मालिका धमाल होती.

माझ्या लिखाणाने काहीही होणार नाही; कारण आमची कातडी गेंडय़ाच्या कातडीसारखी आहे. शेवट हाच की हाथी चलता है! कुत्ता भोकता है!
– डॉ. जयंत जुननकर, नागपूर.

प्रेक्षकांची संघटनाच हवी

राधा मराठे यांच्या ‘टीव्ही मालिका माझ्या महागुरू’ या लेखातील उपहास आवडला. एकच मालिका वर्षांनुवर्षे सुरु राहिली की त्यात अवगुण शिरणारच. रोज दाखवणार तरी काय? शिवाय किरकोळ अपवाद वगळता मालिकांसाठी लेखन करणारे फार बुद्धिमान असतील असं नाही. त्यांचं जगणं, मर्यादित अनुभवविश्व यातूनच काय ते मांडणी करणार? प्रेक्षकांना निर्बुद्ध ठरवून त्यांच्यावर रटाळ मालिका थोपवत राहणार. प्रेक्षकांना आवडतं तेच आम्ही देतो हे अजब तर्कट ही मंडळी कुठून शोधतात? रेल्वे प्रवासी संघटनेप्रमाणे टीव्ही प्रेक्षक संघटना काढून प्रेक्षकांनीच निर्मात्यांना आवडीनिवडी कळवाव्या.
– गौरी चव्हाण, अहमदनगर.