‘तुम्हाला मुलगा नाही?’ हा सोमनाथ देशमाने यांचा ज्वलंत विषयावरील लेख (२५ डिसेंबर) वाचून सर्व मुलींच्या आईबापांना त्यातील तथ्य जाणवले असेल.

लेखकाच्या गावी म्हणजे उस्मानाबादला मीसुद्धा १५ वर्षे वैद्यकीय व्यवसाय करीत होते. पेशंटच्या माध्यमातून त्या भागातील संस्कृती, आचारविचार, भावना, समाजाची जडणघडण, जातपात सर्व कळत असते. मोठय़ा शहरांपेक्षा खेडय़ात आणि साधारण गावात पेशंट हा डॉक्टरशी जास्त जोडलेला  असतो. डॉक्टरच्या व्यक्तिगत आयुष्यातही बराच डोकावत असतो.

मला पहिली मुलगी असताना दुसरी मुलगीच झाली या घटनेचा माझ्या समस्त पेशंटना प्रचंड धक्का बसला. खूप हळहळ वाटली. चर्चेचा विषय झाला. असं होऊ कसं शकतं, (तेही मी डॉक्टर असून) म्हणजे पर्यायाने मी लिंगपरीक्षण का केले नाही? (परळी जवळ असतानाही) एकंदरीत सर्वानी मला मूर्खात काढले. त्यातही माझ्या मुस्लीम पेशंटना तर हे पचनीही पडायचे नाही की एक किंवा दोन मुलींवर कुटुंबनियोजन होऊ शकते. लिंगपरीक्षण त्यांच्यात विशेष नसले तरी मुलगा जन्माला येईपर्यंत मुली जन्माला घालायच्या, यात त्यांना काही गैर वाटत नव्हते.

आपला समाज मुलगी जन्माला घालण्याच्या किती विरोधात आहे हे विखारी सत्य मी तेथे रोज अनुभवले. माझ्या पेशंटचे माझ्यावर नितांत प्रेम आहे हे मला माहीत होते. पण त्यांच्यातील मुलींविषयीची उदासीनता उद्बोधन करूनही मी घालवू शकले नाही.

मराठवाडय़ातील पुरुषप्रधान संस्कृती आणि स्त्रियांचे कमी शिक्षण यामुळे हे परंपरागत विचार पुढल्या पिढीतही चालूच राहातात. अगदी ८-१० वर्षांची मुली-मुलेही मला विचारायची ‘आपको दो बेटियाही है? बेटा नही?’ त्यांच्या या अजाण प्रश्नाने हसावे की रडावे ते कळेना. तेथील महिलांनी मला विचारलेले प्रश्न पुढीलप्रमाणे होते.

’      दुसऱ्यांदा मुलगीच कशी झाली?

’      आधीच लिंग परीक्षण करून गर्भपात का केला नाही?

’      कदाचित तुम्हाला नसेल तर आम्हाला विचारायचे. आम्ही ‘त्या’ डॉक्टरांचे पत्ते दिले असते.

’      कुटुंबनियोजन करू नका.

’      केले असल्यास लातूरला अमुक अमुक डॉक्टरकडे जाऊन टय़ुब मोकळ्या करा.

’      वंशाला दिवा नको का?

’      म्हातारपणी काळजी कोण घेईल?

’      एवढय़ा संपत्तीचं काय कराल?

’      अजून एक चान्स घ्या.

कहर म्हणजे एखादीला दुसरीही मुलगी झाली तर तिचं सांत्वन करत इतर बायका म्हणायच्या, जाऊ दे, वाईट वाटून घेऊ नको, तलमले मॅडमला नाही का दोन्ही मुलीच?

एकदा तर सलूनवाला दाढी करता करता माझ्या नवऱ्याला म्हणाला, मुलगा-मुलगी तपासून घ्यायचं असतं. तुम्ही तर शिकलेसवरले आहात.

या सर्व चर्चेपुढे मी हात टेकले होते. पण प्रश्न संपत नव्हते. माझ्या तेथील कालावधीत मी बरेच प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. मुलगा-मुलगी भेद करू नका? मुलगी शिकली, स्वावलंबी-आत्मनिर्भर आणि कमावती झाली की ती आईवडील आणि सासूसासरे दोघांनाही अंतर देत नाही, हे ठसवण्याचा प्रयत्न केला. माझे विचार पटायचेदेखील, पण पारंपरिक पगडा जात नव्हता.

वरील सर्व तपशील पूर्णपणे खरा आहे. अजिबात अतिशयोक्ती नाही. आता अडीच वर्षे झालीत, मी नागपूरला असते. अजून तरी कुणी विचारलं नाही, ‘तुम्हाला मुलगा नाही’?
– डॉ. ममता तलमले

भविष्य विशेषांक कशासाठी?
lp07
‘भविष्य विशेषांक’  (१ जानेवारी) वाचला. मथितार्थ ‘तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी’ कर्मप्रधानतेचा संदेश देतो, पण संपूर्ण अंकच भविष्य विशेषांक का असावा? मासिकांना, साप्ताहिकांना टीआरपी मिळविण्याकरिता हे असले विशेषांक काढावे लागतात, यावर बुद्धिजीवींचा विश्वास नसतो. कृपया अंधविश्वासाला प्रोत्साहन देणारे अंक नसावे असे वाटते. नरेंद्र मोदींची जन्मतारीख १७ डिसेंबर १९५० नसून १७ सप्टेंबर १९५० आहे. तसेच दि. ४ डिसेंबरच्या अंकातील चैताली जोशींची कव्हर स्टोरी ‘नऊवारीलाच वेळोवेळी ठेंगा’ वाचली. त्यात ‘मुंगडा’, ‘हमको आजकल है’, ‘मै कोल्हापूर से आयी हूँ’ या गाण्यांबद्दल उल्लेख आहे. ‘मुंगडा’ हे उषा मंगेशकरजींचे गीत- मुंगळा मैं गुड की डली.. मराठी उच्चारण मुंगळा आहे. हिन्दी भाषिकांना ‘ळ’ हे उच्चारण येत नाही ते ‘ळ’ ला ‘ड’ म्हणतात. पण मुंगडा म्हटल्याने गाण्याची रसिकताच संपुष्टात येते असे मला वाटते.
– संध्या रामकृष्ण बायवार, होशंगाबाद (मध्य प्रदेश)

दत्त विशेषांक आवडला
lp08‘लोकप्रभा’ (२५ डिसें) चा दत्त जयंतीनिमित्त काढलेला ‘दत्त विशेषांक’ २०१४ प्रमाणेच अतिशय सुंदर, वाचनीय असा अंक आहे. विशेषत: ‘श्री दत्त संप्रदायातील परंपरा’ हा लेख आवडला. लेखात वेगवेगळे पंथ तसेच दत्त अवतारांची अभ्यासपूर्ण माहितीबरोबरच साद्यंत दत्तक्षेत्रे आणि अपरिचित दत्त स्थानांची माहिती मननीय वाटली. श्री दत्तगुरुंना त्यांच्या रूप वैशिष्टय़ांमुळे एवढं महत्त्व प्राप्त झालयं की, सगळ्या भक्तिक्षेत्रातही त्यांचा डंका चौफेर गाजतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ वैदिक किंवा पुराण संस्कृतीने दत्तगुरूंना स्वीकारलंय, असं नाही, लोक संस्कृतीनेही त्यांना स्वीकारलं. त्यामुळेच विविध गं्रथांमध्ये दत्तगुरूंचे वैदिक आणि पौराणिक देवता म्हणून वर्णन करण्यात आलं आहे. दत्तात्रेय हे दैवत महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात पुजले जाते. अंकातील दत्तगुरूंच्या सुरेख अशा चित्रांनी विशेषांकाची गोडी वाढवली आहे.
– सुनील कुवरे, शिवडी, मुंबई.

पर्यावरण आणि मानवी जीवन
‘लोकप्रभा’च्या (२३ ऑक्टो.२०१५) अंकातील ‘आपण आणि पर्यावरण’ या ‘बदलता महाराष्ट्र’ सदराखालील पर्यावरणप्रेमींचे छोटे छोटे लेख फारच महत्त्वाचे व विचार करण्यासारखे आहेत. ‘लोकसत्ता’ने याबाबत घडवून आणलेली चर्चा म्हणजे एक अत्यावश्यक समाजकार्यच केले आहे. या स्तंभात लिहिणारे सगळेच दिग्गज, जाणकार तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच महाराष्ट्राचे वनमंत्रीसुद्धा आहेत. आतापर्यंत आपल्याकडे फलसंपदा, वनसंपदा आणि वायुसंपदा या सगळ्यांचे आपण खूप नुकसान केले. पण बेटर लेट देन नेव्हर या म्हणीनुसार उशिरा का होईना आपल्याला जाग आली आहे व पर्यावरणाचे महत्त्व कळले आहे. तहान लागल्यावर विहीर खणणे असा प्रकार सध्या चालला आहे. पर्यावरणास धोका म्हणजे मानवी जीवनास धोका हे सर्वानाच कळायला हवे. या वर्षी तर पाऊस कमी पडल्याने पावसाळा संपता संपताच महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये आठवडय़ातून दोन ते तीन दिवस पाणी मिळणार नाही असे नगपालिकेने सूचित केले होते. उन्हाळ्यात काय होईल सांगता येत नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पाण्यावरून सर्वच थरावर मारामारी चालली आहे.

उद्याच्या पिढीचे तर सोडाच, आजच्याच पिढीला भीषण पाणीटंचाई, गरमी, प्रदूषित हवा, भेसळयुक्त धान्य, अनैसर्गिकरीत्या पिकवलेली फळे, निरनिराळे रोग इ. नी ग्रासले आहे. सरकारने फक्त ‘मतांचा’ विचार न करता देशाचा विचार करून योग्य ती ठोस पावले ताबडतोब उचलायला हवीत आणि नियम मोडणाऱ्यांना कडक शासन केले पाहिजे. अतुल देऊळगावकरांनी बरोब्बर म्ह्टले आहे की सरकारदप्तरी गुन्हेगारांना शिक्षा नाही आणि चांगले काम करणाऱ्यांना बक्षीस नाही. या पृथ्वीतलावर स्वत:च्या स्वार्थापोटी स्वत:चाच नाश करणारा एकमेव प्राणी म्हणजे माणूसच आहे यात शंका नाही. आपल्या देशात कायदे खूप आहेत, पण कनव्हिक्शन रेट एकदम कमी आहे.

इफ वुई डू नॉट सेव्ह द नेचर; नेचर विल नॉट सेव्ह अस.

काय ते आपल्यालाच ठरवायचे आहे.
-भाऊराव हेडाऊ, नागपूर.

रावणाची मंदिरं इतरत्रही
‘प्रथा रावणपूजेची’ (२३ ऑक्टोबर) हा लेख वाचनात आला. अकोला जिल्ह्य़ातील सांगोळ्यामधील रावणाची दहातोंडी मूर्ती आणि कोरकू आदिवासींमधील रावण आणि मेघनाद यांच्या पूजेविषयी माहिती अनोखी होती. जोधपूरमध्येही रावणाचं एक मंदिर आहे. बिकानेर या राजस्थानातील शहराहून जोधपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंदौर नावाचं शहर आहे. या ठिकाणी लंकापती रावण आणि मंदोदरी यांचा विवाह झाला होता असं समजलं जातं. या स्थळाला ‘चौरी रावण की’ या नावाने ओळखलं जातं. मंदोदरी ही रावणाची पट्टराणी होती पण ती नेमकी कुठली याविषयी अनेक वदंता आहेत. राजस्थानमधील मंदौरमधील लोक आणि मध्य प्रदेशातील मंदसौर शहरातील लोक मंदोदरी मूळ तिथलीच मानतात. मध्य प्रदेशातील मंदसौर येथे रावणाची मूर्ती आहे तर जोधपूरमधील महेरागढ किल्ल्याच्या मागील बाजूस रावणाचं मंदिर बांधण्यात आलं आहे. हे मंदिर नव्यानेच बांधलं आहे. जोधपूरचे श्रीमाळी ब्राह्मण या मंदिरात रोज रावणाची पूजा करतात. अभिषेक करून मूर्तीला नैवेद्य दाखवला जातो. श्राद्धपक्षात रावणाचा पिंडदान विधीही केला जातो. ही सहा फूट उंच आणि दीड हजार किलो वजनाची मूर्ती बसलेल्या अवस्थेत शिवपूजा करताना आहे. गाढवाचं मुख असलेली खरान्ना देवी ही रावणाची कुलदेवता. या मंदिराच्या संकुलात खरान्ना देवीचं स्वतंत्र मंदिर आहे त्याचप्रमाणे रावणाच्या मंदिरासमोर मंदोदरीचंही मंदिर आहे. राणी मंदोदरीचं हे संपूर्ण भारतातील एकमेव मंदिर मानलं जातं. याशिवाय महादेव अमरनााथ देवालय, नवग्रह मंदिर, शनिदेव आणि हनुमानाचं मंदिर आहे. रावणाचं मंदिर बांधायला काही संघटनांनी विरोध केला होता, पण रावणाचं मंदिर बांधल्यामुळे कुठलंही संकट ओढवणार नाही हे त्या संघटनांना कळून चुकलं आणि विरोध मावळला.
– सुहास बसणकर, दादर.

कशासाठी? पोटासाठी!
‘लोकप्रभा’ (२५ डिसेंबर) च्या अंकातील ‘प्रौढपणातील पोटाचे विकार’ हा डॉ. अविनाश सप्रे यांचा उतारवयातील व्यक्तींसाठीचा मार्गदर्शनपर लेख वाचला. उतारवयातील अपचनाची कारणे, उतारवयात पोटात गॅस होणे, बद्धकोष्ठता, कॅन्सर इत्यादी आजारांची दिलेली माहिती ही ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची आहे. या लेखात वरील आजारांची लक्षणे ही स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहेत.

‘प्रिव्हेन्शन इज बेस्ट दॅन क्युअर’ म्हणजे आजारी पडून बरे होण्यापेक्षा आजारीच पडू नये यासाठी या लेखातील प्रत्येक बाबीचे मन:पूर्वक वाचन करून व त्याचे प्रत्यक्ष कृतीत आचरण आणून सुदृढ, सक्षम, निरोगी राहण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा अशी अपेक्षा आहे.
-धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर (औरंगाबाद)

मालिका आणि ज्येष्ठ नागरिक
‘टीव्ही मालिका माझ्या महागुरू’ हा राधा मराठे यांचा लेख वाचला आणि एकदम गंमत वाटली. मालिकांकडे बघण्याच्या या वेगळ्या दृष्टिकोनामुळे वाईट मालिका बघाव्या लागण्याचं दुख एकदम हलकं झालं. आता मीही या मालिकांमधून मला काय काय शिकता येईल, त्याचा विचार करणार आहे. पण मालिकाकर्त्यांनी या मालिकांवर होणाऱ्या तोचतोचपणाच्या, रटाळपणाच्या, अतिरंजित कौटुंबिक नाटय़ाच्या आरोपाचा गांभीर्याने विचार करायला हवा आहे असं मला वाटतं. त्याचं कारण म्हणजे या मालिका कोण बघतं याचा आधी विचार करा. घराघरातले ज्येष्ठ नागरिक हेच या मालिकांचे खरे प्रेक्षक आहेत. हाताशी भरपूर वेळ असणं, सार्वजनिक आयुष्य कमी होत जाणं, हालचालींवर मर्यादा येणं या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना घरातच थांबण्याशिवाय पर्याय नसतो. पुस्तकं वाचणं ही सगळ्यांचीच आवड असते असं नाही. त्यामुळे टीव्ही मालिका हा त्यांच्यासाठी मनोरंजनाचा स्वस्त-सोपा पर्याय ठरतो. साहजिकच त्यांच्या या मालिकांकडून जास्त अपेक्षा असतात. त्यांना आवडतील, त्यांचं चांगलं मनोरंजन होईल, त्यांना जगात काय चाललंय ते समजेल अशा मालिका बनवल्या गेल्या तर त्यांना चांगला प्रेक्षकही मिळेल.
– वनिता शिर्के, खोपोली.

Story img Loader