२६ फेब्रुवारीच्या अंकातील भूषण गद्रे यांची गुरुत्वीय लहरींबाबतची कव्हर स्टोरी उत्तम होती. गुरुत्वीय लहरीच्या शोधाच्या बातमीचा घेतलेला हा वेध सर्वसामान्य विज्ञान जाणणाऱ्यांपासून ते या क्षेत्रातील अभ्यासू अशा सर्वाचीच जिज्ञासा पुरी करणारा असा हा लेख होता. त्याबद्दल लेखकाचे आभार. लायगोच्या तीस वर्षांच्या अथक परिश्रमामध्ये साठहून अधिक भारतीयांचा समावेश हा अभिमानाची बाब आहे. वैज्ञानिक शोधांचा थेट उपयोग लगेच मिळत नसला तरी विश्वाकडे पाहण्याचा आयाम मिळाला हा अर्चना पई यांचा दृष्टिकोन खूप काही सांगून जाणारा आहे. आजच्या जीपीएस प्रणालीचे फायदे आपण सारेच घेत आहोत. विज्ञानाने खुले केलेल्या दालनावरील, विषयावरील हा वेगळा लेख लिहिल्याबद्दल लेखकांना धन्यवाद.
-अनिल हरिश्चंद्र पालये, बदलापूर.
संयत चर्चा खरेच होते का?
‘लोकशाही, देशद्रोह अन् सहिष्णुता!’ हा २६ फेब्रुवारीच्या अंकातील मथितार्थ वाचला. काही मते पटली, काही पटली नाहीत. गेल्या काही महिन्यांतील विविध मुद्दय़ांवरून गढूळ होत चाललेले वातावरण त्यातून जाणवले. मुद्दामच गढूळ असा शब्द वापरावासा वाटतो. देशप्रेम, सहिष्णुता, विद्यापीठीय राजकारण अशा अनेक घटनांवर दिसून आली तो निव्वळ स्वत:च घोड पुढे दामटण्याची वर्तणूक. मग ते विरोधी असोत, घटनेच्या बाजूचे असोत की अन्य कोणी. आपण उल्लेख केल्याप्रमाणे याचे थेट प्रत्यंतर दिसते ते समाज माध्यमांमध्ये. प्रस्थापित मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा विचार हल्ली करणेच सोडून दिले आहे. समाजमाध्यमांमध्ये अशा सर्व घटनांचे पडसाद अगदी त्वरित उमटतात. त्यात अनेक प्रकारची मतमतांतेर दिसून येतात. अनेक तज्ज्ञ जे प्रस्थापित माध्यमांमध्ये फारसे वावरत नाहीत त्यांची उपस्थिती अशा ठिकाणी ठळक असते. पण तेथेदेखील हल्ली झुंडशाहीने प्रवेश केला आहे. त्यामुळे चर्चा राहते दूर आणि केवळ एकमेकाला प्रत्युतर देण्यातच सारा वेळ जातो. एकंदरीतच काय हल्ली या संवेदनशील विषयावर चर्चा खरेच होते का हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे.
– अजिंक्य देवमोरे, औरंगाबाद, ई-मेलवरून.
ई-पुस्तकांच्या साहित्यमूल्यांवर प्रश्नचिन्ह…
‘ई-पुस्तके गिरवताहेत मराठी कित्ता’ ही ४ मार्चच्या अंकातील मुखपृष्ठ कथा वाचली. एकंदरीतच बाल्यावस्थेत असलेल्या ई-पुस्तकांमागचे तंत्र आणि व्यावसायिक मंत्र त्यातून समजला. पण त्याचबरोबर लेखाच्या शेवटी ई-पुस्तकांच्या साहित्यमूल्याबद्दलची टिप्पणीदेखील महत्त्वाची वाटते. किंबहुना त्यावर आत्ता अधिक प्रकाश टाकण्याची गरज दिसून येत आहे. एक व्यवसाय म्हणून ई-पुस्तकांमध्ये अनेक प्रयोग होत आहेत, त्यामुळे ते व्यावसायिक पातळीवर पुढे जात राहतील. पण त्या साहित्याची परखड चिकित्सा होणे गरजेचे वाटते. नवोदितांना ई-पुस्तकांमुळे प्रोत्साहन मिळत असले तरी त्यांच्या लिखाणावर संपादकीय संस्कार, त्यांना दिशा देणे असे प्रकार फारसे होताना दिसत नाहीत. एकंदरीतच सध्याचा भर हा भारंभार साहित्य प्रसवण्याचा वाटत आहे. साहित्य आणि तंत्रज्ञान दोहोंची प्रगती एकाच वेळी हातात हात घालून झाली पाहिजे असे ई-पुस्तकांच्या बाबतीत म्हणावे लागेल.
– अजित पाटील, सोलापूर, ई-मेलवरून
तेव्हा असहिष्णुता नव्हती का?
‘पुन्हा दांडीयात्रा’ हा १९ फेब्रुवारीच्या अंकातील लेख वाचला. महात्मा गांधींनी जेथून मिठाचा सत्याग्रह करून दांडीयात्रेला सुरुवात केली तेथे ३० जानेवारी २०१६ ला गांधी पुण्यतिथीच्या दिवशी देशभरातील काही संवेदनशील लोक देशात वाढत असलेल्या असहिष्णुता वादाबाबत विचारमंथन करण्यासाठी एकत्र जमले होते. आपल्या देशात सांस्कृतिक, भौगोलिक, वैचारिक तसेच जात, धर्म, वर्ग, भाषा असे बहू कंगोरे असलेली विविधता आहे. या भिन्नतेच्या पलीकडे जाऊन समान विचारांनी एकत्र येणे म्हणजे विविधतेतील एकता असा हा उत्स्फूर्तपणे आखलेला कार्यक्रम झाला त्याचे कौतुक करायलाच हवे. अनुषंगाने एक विचार मात्र मनात निश्चित आला. जनतेला हल्लीच असहिष्णुतावाद अचानक जाणवायला का लागला? डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली त्यानंतर असहिष्णुतेवर कोणी बोलले नाही. पुढे दीड वर्षांने कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यावरही दोन महिने कोणी निषेधाखेरीज काही भाष्य केले नाही. डॉ. कलबुर्गी यांची हत्या झाली आणि अचानक असहिष्णुतेबद्दल कणव उफाळून आली. तेव्हापासून काही बुजुर्गानी आपले पुरस्कार परत केले आणि ते सत्र काही काळ चालू राहिले. याचा अर्थ काय समजायचा? दाभोलकर, पानसरे यांच्या हत्या हा असहिष्णुतेचा भाग नव्हता का? यापूर्वी अशा हत्या वा हत्याकांड झाले त्या वेळी सगळे मिठाची गुळणी घेऊन का बसले? वानगीदाखल काही उदाहरणे द्यायची झाल्यास शिखांचे हत्याकांड, बाबरी पतनानंतरचे हिंदू व मुस्लीम हत्याकांड, गोध्राकांड या सर्वामध्ये असहिष्णुतेचा पुसटसा वासही कुणाला आला नाही. त्याला केवळ धार्मिक रंग देण्यात आला. आता मात्र अचानक असहिष्णुता व्यक्त केली गेली. ती दांभिकता होती की त्याला छुप्या राजकारणाचा वास होता, असा प्रश्न पडतो.
– सुधीर ब. देशपांडे, विलेपार्ले (पूर्व), मुंबई.
माझे आकाशवाणीचे दिवस
‘लोकप्रभा’च्या दि. ५ फे ब्रुवारी २०१६ या अंकात ग्रीष्मा जोग बेहेरे यांचा ‘ये आकाशवाणी है’ हा उत्तम लेख आवडला. रेडिओमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी हे मार्गदर्शन योग्य वाटले.
आकाशवाणीविषयी माझ्या आठवणी वाचकांना आवडतील ही आशा आहे. माझी आकाशवाणीवरील प्रसारित पहिली वेळ म्हणजे हैदराबाद आकाशवाणीवरून प्रसारित केलेली संस्कृत नाटिका- आमचे संस्कृत प्राध्यापक डॉ. रामलिंगम शास्त्री यांनी लिहिलेल्या नाटिकेतील माझीही दहा वाक्ये प्रसारित झाली; त्या वेळी आमच्या गुरुजींनी आकाशवाणी हैद्राबादच्या खराताबाद केंद्रातील कॅन्टीनमध्ये केलेले चहापान अजूनही स्मरणात आहे.
नंतर मी सैनिक स्कूल, कळकूटम, त्रिवेंद्रम (आताचे तिरुवनंतपुरम) येथे संस्कृत अध्यापक झालो; त्यामुळे मला आकाशवाणी तिरुवनंतपुरमवरून प्रथम इंग्रजी भाषण प्रसारित करता आले ०९ मे १९६६ रोजी. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हे भाषण होते.
त्याआधी माझी स्वर-चाचणी झाली होती. मी नागपूर विद्यापीठाचा एम. ए (राज्यशास्त्र) बिरुदधारी असल्यामुळे मला ही संधी मिळाली.
त्यानंतर हिंदी व संस्कृत भाषेतून माझी भाषणे प्रसारित झाली. दहा मिनिटांच्या स्लॉटमध्ये साधारणपणे ८-८.५ मिनिटे आपणाला मिळतात. त्यासाठी भाषण ध्वनिमुद्रित झाल्यावर लगेच धनादेश मिळतो. मला प्रथम भाषणासाठी फक्त २५ रुपये मिळाले होते; नंतर हे प्रमाण दसपट झाले.
‘भक्तिविलास’ या त्रावणकोर दिवाणाच्या माजी सरकारी निवासामध्ये थाटलेल्या आकाशवाणी केंद्राचा कोणावरही सहज प्रभाव पडतो. ते दिवस आठवले की ‘ते दिनो दिवसा गत:’ अर्थात तेही आमचे दिवस गेले असे म्हणावेसे वाटते!
– गोविंद ध. टेकाळे, ठाणे.
दिवाळी अंकाने जुन्या आठवणी जाग्या झाल्या
‘लोकप्रभा’ चा २०१५ चा दिवाळी अंक मी हैदराबादमध्ये असल्यामुळे उशिरा का होईना, पण मिळाला. मोजक्याच पण महत्त्वपूर्ण लेखांनी सजलेला लोकप्रभा सहृदय वाचकांना आनंद देऊन गेला. सर्वात जास्त आवडला व सुखावून गेला तो चाळीस सुन्दर चित्रांनी सजलेला विनायक परब यांचा दीनानाथ दलालांवरील रसपूर्ण लेख. काही चित्रांनी जुन्या आठवणी जाग्या केल्या. लोकप्रभाला अनेकानेक धन्यवाद.
चन्द्रशेखर खांडाळेकरांचा तोरणावरचा लेख अभ्यासपूर्ण व विविध माहितींनी परिपूर्ण व उत्तम वाटला. डॉ. उज्ज्वला दळवींचा इंटरनेट ऑन थिंग्सवरचा लेखही बौद्धिक करमणूक करणारा व कल्पनाशीलतेला चालना देणारा आहे. मनापासून आवडला. सुहास व अरुंधती या जोशीद्वयांचे लेख त्याच त्याच विचारांच्या पुनर्कथनाने खरा आनन्द देऊ शकले नाहीत. बोरकरांचा लेख बरा वाटला.
– म. बासुतकर.
सन्मानाने जगण्याचा वेगळा दृष्टिकोन
डॉ. मीनल कातरणीकर यांचे ‘प्रेमाचे प्रयोग’ हे सदर खरोखर वाचनीय असते. सदरातील लेखांमधून केवळ माहितीच मिळत नाही तर विविध विषयांना कसे हाताळावे याचेही ज्ञान मिळते.
‘लोकप्रभा’च्या ४ मार्चच्या अंकातील ‘सन्मानाने जगणे-मरणे’ हा लेख वाचला. खूप वेगळी आणि महत्त्वाची माहिती मिळाली. मी अनेकांशी हॉस्पाइसविषयी (अ-वेदना केंद्र) चर्चा केली, पण त्यांनी ‘हॉस्पाइस’ हा शब्दच कधी ऐकला नव्हता. लेखिकेने मात्र याबाबत बारकाव्यांनिशी माहिती दिली आहे. तसेच कर्करोगग्रस्तांच्या सहन न होणाऱ्या वेदनांचे चित्रही समोर आणले. याबद्दल लेखकाचे आभार. काही देशांमध्ये इच्छामरणाला मान्यता आहे. भारतात तशी मान्यता नाही, मात्र सरकारने कर्करोगग्रस्तांसाठी विशेष अपवाद करायला हवा.
– जयंत देसाई, ई-मेलवरून.
‘लोकप्रभा’चा ११ मार्चच्या अंकात लेखांचे वैविध्य आढळून आले. मथितार्थ, नाविक बंड, असे देवस्थानी दरोडे, मायबोली, वांगी पुराण, कुर्रम कुर्रम, जसवंतगड वॉर मेमोरियल, किल्लेबांधणीतील पाण्याचे महत्त्व असे सगळेच लेख खूप आवडले. प्रत्येक लेखातून माहितीही मिळाली आणि मनोरंजनही झाले.
– विद्याधर कुलकर्णी, ई-मेलवरून
आकारांचे महत्त्व पटले
हल्ली वास्तुशास्त्र नावाचे एक फॅड चांगलेच बोकाळले आहे. त्यातच फेंगशुई वगैरेचा वापर करत वेगवेगळे आकाराच्या वस्तू घरभर चिकटलेल्या असतात. असल्या फालतूपणाला पूर्ण बाजूला सारत वैशाली आर्चिक यांनी इंटिरियर या सदरातून आकारांचे महत्त्व खूप चांगल्या आणि शास्त्रीय पद्धतीने मांडले आहे. त्यांनी दिलेली उदाहरणे इतकी समर्पक आणि सहजपणे पाहता येण्यासारखी आहेत. जेणेकरून त्याचा वापर भविष्यात योग्य पद्धतीने करता येईल. अशा विषयांवरचे आणखी लेख प्रसिद्ध करावेत ही विनंती.
– सुकन्या दळवी, मुंबई, ई-मेलवरून.