01gauriब्रिटिश कोलंबियाच्या पॅसिफिक सागरात पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या व्हँकुव्हरला ब्रिटिश कॅप्टन जॉर्ज व्हँकुव्हरचे नाव दिले गेले आहे.
व्हँकुव्हर हे ब्रिटिश कोलंबियातील चौथ्या क्रमांकाचे शहर. नावात साम्य असले तरीही हे व्हँकुव्हर आयलंडवर नाही. ब्रिटिश कोलंबियाच्या पॅसिफिक सागरात पश्चिम किनाऱ्यावर आहे. राणी व्हिक्टोरियाने स्थापलेल्या या इलाक्याला ब्रिटिश कॅप्टन जॉर्ज व्हँकुव्हरचे नाव दिले असले तरीही येथील सालिश, मस्क्वीम, स्क्वामिश अशा काही जमातींचे वास्तव्य होते. त्यांना आजही फर्स्ट नॅशनल म्हणून ओळखले जाते. पण त्या वेळी ब्रिटिशांनी त्यांच्या जागा, अधिकार बळकावून आपल्या वस्त्या वाढवल्या व पुढे कराराप्रमाणे त्यांना काही भाग परत करावे लागले.
आमची व्हिक्टोरियाची सफर आटोपल्यावर आम्ही व्हँकुव्हर भेटीसाठी तयार झालो. या ठिकाणी व्हिक्टोरीआ येथून सरळ बसने किंवा थोडा प्रवास बसने, थोडा समुद्रातील फेरी, परत बस असे दोन प्रकारे प्रवास करता येतो. किंवा सी प्लेननेही आपण येऊ शकतो, पण सोबतचे सामान १५ किलोपेक्षा जास्त नेता येत नाही. बसने आपण व्हिक्टोरियातील स्वार्टहा बे या फेरी टर्मिनल येथे येतो. फेरीत प्रवासी, बसेस्, कार्स, ट्रेलर्स अशी लहानमोठी वाहनेही आपल्याबरोबर प्रवास करतात. पण त्यांच्यासाठी तळाशी मोठी जागा असते. ही जागा बंदिस्त असल्याने तेथे वाहनांचे इंजिन बंदच ठेवावे लागते. प्रवाशांनी निर्धारित गेटमधून वरच्या डेकवर जायचे असते. वरच्या मजल्यावर एसी हॉलमधे आरामशीर खुच्र्या असतात. इथे वेळ जाण्यासाठी चित्रपट, माहितीपट चालू असतात. शिवाय कॅफेटेरिया, शॉपिंगची व्यवस्था असतेच. पाहिजे तर आपण डेकवरून निसर्गाचा आस्वाद घेऊ शकतो. असा मस्त तासदीड तासाचा प्रवास करून आपण व्हँकुव्हरला येतो.
मागे एकदोन वेळा इथे आलो होतो, पण ती धावती भेट होती. त्यामुळे या वेळी चांगला आठवडाभर इथल्या जगण्याचा अनुभव घ्यावा या उद्देशाने राहिलो. पश्चिम किनाऱ्यावर असल्याने हिमयुग सरताना बर्फ डोंगर कापत गेल्याने समुद्राचा काही भाग आत येऊन तिथे फिओर्डस्, सामुद्रधुनी, काही इनलेट्स तयार झाल्या. त्यापैकी बुरार्ड इनलेट, लायन गेट, ग्रॅनव्हिल चॅनल या मुख्य तीन वाटा होत्या. पण आता बरेच ब्रिजेस् झाले आहेत.
१९व्या शतकाच्या सुरुवातीला आलेल्या युरोपिअन्स मुबलक प्रमाणात असलेल्या जंगलातील लाकडांचा उपयोग करून तेथे पहिली लाकडाची वखार, हेस्टिंग मिल, उभी केली व त्या जागेला गॅस टाऊन असे नाव दिले. हे नैसर्गिक बंदर असल्याने कॅनेडिअन पॅसिफिक शेवटचे स्टेशन बनले. सागरी वाहतूक, रेल वाहतूक सोयीची झाल्याने आशिया, युरोप, कॅनडाच्या काही भागांतून रोजंदारीसाठी लोक येऊ लागले.
जॅक डेटन हादेखील दोन खलाशी भावांबरोबर गॅस टाऊन येथे आपले नशीब अजमावण्यासाठी आला होता. हळूहळू पसरणाऱ्या वखारींमुळे कामगार वाढू लागले. त्या वेळी जॅकने लाकडी ओंडके वापरून आपला पाहिजे तिथे हलवता येणारा पहिला बीअर पब मिलच्या बाहेर उभा केला. पुढे त्याने नामी शक्कल लढवली. ती म्हणजे तिथल्या कामगारांना पाहिजे तेवढी दारू, बीअर, फुकटात देऊन एका दिवसात पक्का पब उभा केला. तो जात्याच खुशमस्कऱ्या असल्याने गिऱ्हाईकांचे मनोरंजन होत असे. ते आवडीने येत. त्याला गॅसी जॅक हे नाव पडले. आताचा गॅसी जॅक पब अद्ययावत आहे व बाहेरच त्याचा बीअरच्या पिंपावर बसून दिलखुलासपण हसणारा स्टॅच्यू आहे.
त्याच गल्लीत जरा पुढे त्या काळी कामगारांना वेळ समजण्यासाठी जमिनीखालून येणाऱ्या वाफेवर चालणारे घडय़ाळ आहे. दर पंधरा मिनिटांनी इंजिनासारखी शिट्टी वाजून धडधड होऊन घंटी वाजते. १९व्या शतकात चालू केलेले हे घडय़ाळ आजही अचूक वेळ दाखवते.
व्हँकुव्हर पाहायचे तर हॉप ऑन हॉप ऑफ बस हा उत्तम पर्याय आहे. युरोपमधील ही सेवा आपल्या माहितीची आहे. बसमधे तिकीट पंच करून आपल्याला २४ तास पाहिजे तितक्या वेळा फिरता येते. वॉटरफ्रंट येथून सुरू होऊन तिथेच परत संपणाऱ्या तासभराच्या प्रवासात आपल्याला कुठे उतरून काय पाहायचे नक्की करता येते.
वॉटरफ्रंट येथून सी प्लेनने व्हँकुव्हर हवेतून पाहता येते. त्या वेळी किती ब्रिजेस्, उंच इमारती, अफाट जंगल, हवा स्वच्छ असल्यास पोर्टलँड, ओरेगन येथील डोंगररांगा स्पष्ट दिसतात. किनाऱ्यावर असलेल्या कॅनडा प्लेस येथे फोरडी थिएटरमध्ये सिम्युलेटेड सीटवर बसून फ्लाय ओव्हर कॅनडा येथे डॉक्युमेंटरी फिल्ममधे पहिल्यापासून आक्र्टिक्टपासून खाली अंटाक्र्टिकापर्यंतची पर्वतराजी, निसर्गसौंदर्य, थोडक्यात देशाचा इतिहास, असा चित्रपट पाहायला मिळतो. तिकीट महागडे आहे, शक्य असल्यास नक्कीच पाहावे.
शहराची व्यवस्थित आखणी केलेली असल्याने सर्व रस्ते समांतर आहेत, त्यांना छेदणारे रस्ते उभे आहेत. गल्लीबोळ असे प्रकार दिसत नाहीत त्यामुळे एकटे फिरायचे म्हटले तरी हरवण्याची भीती नाही. फिरत फिरत आपण स्टॅनली पार्क येथे येतो. पार्कचे क्षेत्रफळच एवढे आहे की कुठल्याही पॉइंटवरून आपल्याला बुरार्ड इनलेट, ग्रेन व्हिल ब्रिज, समुद्र किनारा, प्रॉमीनाड, पक्ष्यांसाठी मुद्दाम केलेले तलाव असे काहीतरी नक्कीच पाहायला मिळते.
या पार्कमध्ये फिरायचे तर पूर्ण दिवसही कमीच पडतो. जिकडे नजर टाकावी तिथे हिरवीगार सृष्टीच पाहायला मिळते. दोनशे वर्षांपूर्वीची झाडे असलेल्या विभागात वेगवेगळ्या प्रकारची अगणित झाडे आहेत. फर्स्ट नॅशनल्सच्या काळातील टोटेम पोल्स त्यावरील चित्रांच्या वर्णनासहित असल्याने तो विषय आपल्याला समजतो. मत्स्यालयात जगभरातील वेगवेगळ्या जलचरांचा साठा आहे. तसेच मोठा कॅफेटेरिआही आहे. वयस्क नागरिक लहान पाहुण्यांकरिता घोडागाडी, विजेवर चालणाऱ्या मिनी ट्रेनची सोय आहे.
पूर्वी समुद्रमार्गे येणाऱ्या वाहतुकीला मानवी वस्ती असल्याचे कळण्यासाठी इनुकशुक, म्हणजे दगडावर दगड रचून भव्य मानवी रचना केली आहे. तसेच जरा पुढे चौकात वयस्क नागरिकांचा लाफिंग क्लब असावा. कारण त्या ठिकाणी दिलखुलास हसणाऱ्या व्यक्तींचे वेगवेगळ्या पोझेसमधले ब्राँझचे पुतळे आहेत. रॉजर्स ही येथील पहिली चॉकलेट्स बनवणारी कंपनी. आपल्याला स्विस लिंड्स, कॅडबरी ह्यंची सर्वत्र मिळणारी चॉकलेट्स माहिती आहेत. रॉजर्स चॉकलेट्स मात्र त्यांच्या येथील एकमेव दुकानातच मिळतात. वेगवेगळ्या प्रकारची ही चॉकलेट्स चवीला छान असतात.
व्हँकुव्हर जरी ब्रिटिश कोलंबियातील असले तरीही कॅनेडिअन पॅसिफिक रेल्वे बांधणी वेळेपासून भिन्न भिन्न देशांच्या कामगारांनी घडवलेले शहर आहे. आता तर मध्य पूर्वेतील लोकांचाही भरणा आहे. प्रत्येक धर्माला मान दिला आहे. त्याचबरोबर वेगवेगळी खाद्यसंस्कृतीही फारच लोकप्रिय आहे. येथले मंगोलिअन बार्बे क्यू, म्हणजे मोठय़ा तव्यावर वेगवेगळे पदार्थ आपल्या चवीप्रमाणे करून देतात. व्हँकुव्हरमधे मजा आली. तुम्हीही थोडा वेळ दिलात तर एन्जॉय कराल.
गौरी बोरकर – response.lokprabha@expressindia.com

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
Story img Loader