चार वर्षांत वासोटा किल्ल्यावर जायचे आमचे दोन्ही प्रयत्न वाया गेले होते. तिसऱ्यांदा मात्र वासोटा आमच्या नशिबात होता. तिथून दिसणारा सह्य़ाद्रीचा नयनरम्य पसारा मनात कायमसाठी साठवत परत फिरलो आणि..
कोयनेच्या खोऱ्यातील घनदाट अभयारण्यात वसलेला दुर्ग म्हणजे ‘वासोटा’. वासोटय़ाला ‘व्याघ्रगड’ म्हणून ओळखले जाते. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हा गड येत असल्यामुळे हा भाग दुर्गम आणि वन्यजीवनाने समृद्ध बनलेला आहे. गेली चार वष्रे हा किल्ला पाहण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. दोन वेळा तो सर करण्याचा प्रसंगही आला, पण काही ना काही कारणामुळे तो अयशस्वी ठरला. मुळात पहिल्याच चढाईत किल्ला सर झाला तर तो आपला सह्यद्री कसला? पहिल्यांदा आम्ही सकाळी वेळेत पोहोचू शकलो नाही, त्यामुळे वनखात्याची परवानगी मिळाली नाही आणि त्यामुळे किल्ला सर करू शकलो नाही. दुसऱ्यांदा आम्ही ३१ डिसेंबरचा बेत आखला. परंतु ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी हे दोन दिवस वन्यजीव विभागाकडून वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी परवानगी मिळत नाही. तिसऱ्यांदा आम्ही या वेळेस काही झाले तरी किल्ला सर करायचाच या जिद्दीने एक महिना अगोदर प्लान करण्यास सुरुवात केली. माझा भाऊ प्रवीण याचा वाढदिवस १ डिसेंबर रोजी असल्यामुळे आम्ही त्याच दिवसाचा बेत नक्की केला.
नवी मुंबईतील खारघर रेल्वे स्थानकाबाहेर सर्व मित्रांनी शनिवारी, ३० नोव्हेंबर २०१३ या दिवशी जमण्याचे ठरविले. सर्व जण एकत्र येईपर्यंत संध्याकाळचे पाच वाजले. शिवाय याचा मित्र, त्याचा मित्र असे करत करत १२ जण झाले. शेवटी सगळे गाडीत दाटीवाटीने बसलो आणि प्रवास सुरू झाला. आम्ही सर्व मित्र मूळचे सातारा जिल्ह्यतील जावळी तालुक्यातील कावडी गावचे. गावातील काही मित्र दुसरी गाडी घेऊन सातारा शहरात आले होते. रात्री साडेदहा वाजता आम्ही साताऱ्यातून एकूण १८ जण ‘तेटली-बामणोली’ गावच्या दिशेने निघालो. ग्रुपमधील एका मित्राची मावशी ‘तेटली’ गावामध्ये राहत होती. त्यामुळे राहण्याची सोय होता. थंड वातावरणात शुभ्र चांदण्यात आम्ही आमच्या बंधूचा वाढदिवस केक कापून सेलिब्रेट केला. जेवण आणि मौजमस्ती करता करता पहाट झाली. कोयनेच्या खोऱ्यातील जलाशयाच्या किनाऱ्यावरील बोचरी थंडी आता जाणवू लागली. गोधडय़ा कमी असल्यामुळे ताडपत्री टाकून दाटीवाटीने झोपी गेलो.
पहाटे पाच वाजता कोंबडा आरवला. सकाळची गुलाबी थंडी आणि गाढ झोप याचा आनंद जणू स्वर्गसुखच. पण वासोटा सर करण्याच्या उत्सुकतेने सारे जण पटकन उठले. शिवसागर जलाशयात मनसोक्त डुंबून चहा, कांदा-पोहे दडपून वासोटय़ाला नेणाऱ्या बोटीत जाऊन बसलो. बोटक्लबची परवानगी घेऊन मग बोटीने बामणोली या गावी जाऊन वनखात्याची परवानगी घेतली. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी आमच्या बोटीची तपासणी केली. आमच्याकडे दारू, काडेपेटी नसल्याची खात्री झाल्यावर त्यांनी वासोटय़ाकडे जाण्याची परवानगी मिळाली. एव्हाना सकाळचे साडेअकरा झाले होते. खरे तर सूर्य डोक्यावर येऊ लागला होता. कोयनेच्या जंगलामुळे त्याचा तडाखा जाणवत नव्हता.
बोटीतील दीड तासाच्या प्रवासात प्रत्येक क्षण, प्रत्येक नजारा सतत बदलत होता. शिवसागर जलाशयाला तिकडचे लोक मिनी काश्मीर का म्हणतात याचा आम्हाला प्रत्यय आला. खरोखरच हा परिसर हेवा वाटावा इतका सुंदर नटलेला आहे. बोटचालकाने आम्ही बोटीत बसल्या बसल्या आम्हास सूचना केली की दीड तासाचा प्रवास आहे. त्यामुळे जेवण जाता जाता बोटीत करून घ्या म्हणजे गडावर भरपूर फिरता येईल.
जवळच्या प्लास्टिक बाटल्यात जलाशयातीलच पाणी भरले. ब्रॅण्डेड मिनरल वॉटरसुद्धा त्या पाण्यासमोर ‘पानीकम’ वाटेल. दीड तासाच्या प्रवासानंतर वासोटय़ाचे विलोभनीय दर्शन झाले. आम्ही बोटीतून उतरल्यानंतर कोयना अभयारण्याच्या प्रवेशद्वारावर वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी आमची तपासणी केली.
तुम्ही किल्ल्यावर जाताना तुमच्याकडे पाण्याच्या किती बाटल्या आणि कॅमेरे आहेत याची चौकशी केली जाते. तुमच्याकडून त्या बाटल्या मोजून त्यानुसार डिपॉझिट घेतले जाते. परत येताना बाटल्या कमी असतील तर तुमचे डिपॉझिट दंड म्हणून जमा केले जाते. त्यामुळे वासोटा किल्ल्याच्या परिसरामध्ये एका वर्षांत किती प्लास्टिकच्या बाटल्या जमा झाल्या असतील हे तेथील कर्मचारी डोळे बंद करून सांगू शकतात. खूप गर्द झाडी असल्यामुळे भर दुपारीसुद्धा थंडगार हवा होती आणि संध्याकाळचे सहा वाजल्यासारखे वाटत होते. दहा-एक मिनिटांचा प्रवास केल्यावर मध्येच आडवा आलेला एक ओहोळ पार करून श्रीगणेश आणि पवनसुताचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा चालण्यास सुरुवात केली. जंगलामधून चालताना वासोटा किल्ला आपले शेवटचे टोक दाखवत नव्हता. सूर्याची किरणे अधूनमधून कधी तरी अंगावर पडत होती. पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडत होता. खूप फुलपाखरे होती. चालून चालून आम्ही थकलो होतो, पण जंगल काही संपायचे नाव घेत नव्हते.
आमचे काही मित्र मागे-पुढे चालत होतो. आमच्यातील एकाने तर बोटीतून उतरताना शपथ घेतली होती की मी वासोटय़ावर पोहचेन ते न थांबता. आणि खरोखरच एक तास सहा मिनिटांच्या प्रवासानंतरच तो थांबला. अर्थातच आमच्या सगळ्यांच्या आधी. त्याच्यामुळे आम्हालादेखील जोर आला. अखेरीस बरीच दमणूक होत आम्ही सारेजण दीड तासाने गडावर पोहोचलो. खरे तर सगळेच खूप थकले होते. पण गडावरून जेव्हा खाली पाहिले तेव्हा सह्य़ाद्रीच्या मनमोहक स्वर्गीय सौंदर्याने आमचा शीण कुठल्या कुठे पळून गेला. प्रत्येक जण तो निसर्ग कॅमेऱ्यात बंद करू पाहत होता.
आम्ही गडाची तटबंदी पार केली आणि समोरच मारुतीरायाचे मंदिर दिसले. पवनसुताची एवढी रेखीव मूर्ती आम्ही कोठेही पाहिली नव्हती. तिथूनच पुढे आम्ही उजव्या बाजूस चालून गेल्यावर आम्हाला महादेवाचे मंदिर लागले. बाबुकडा पाहण्याची आम्हास खूप उत्सुकता होती. त्यासाठी जाताना वाटेतच आम्हाला पाण्याचे टाके दिसले. बाबुकडा पाहताच आम्हाला आमच्या डोळ्याचे पारणे फिटल्यासारखे वाटले. वासोटा किल्ल्याच्या कोणत्याही तटावर गेल्यास सह्यद्रीचे रौद्र रूप हमखास पाहायला मिळते. एका टोकावरून नागेश्वर गुहा दिसत होती. वासोटय़ाची एक माची िवचूकाटय़ाची आठवण करून देते. थोडा वेळ गडावर भटकंती केल्यावर आमच्या गाईड मित्राने आम्हा सगळ्यांना सांगितले की आता परतीचा प्रवास सुरू केला पाहिजे. थोडय़ा वेळाने जलाशयामध्ये मासेमारीसाठी लोक जाळे टाकायला सुरुवात करतात आणि त्यामध्ये आपली बोट अडकण्याचा धोका आहे. बोट अडकली तर आपल्याला रात्र जलाशयामध्येच काढावी लागेल. आम्ही सगळ्यांनी लगेच परतीच्या प्रवासाची सुरुवात केली.
सूर्य अस्तास जात होता. एक तासात खाली उतरलो. मला वाटले मीच सर्वात आधी आलो आहे. आता आपल्याला वाहवा ऐकायला मिळणार म्हणून मी खूश होतो. चौकीजवळ जाऊन पाहतो तर माझ्या अगोदर तीन-चार मित्र.. ते १८ मिनिटांमध्ये खाली आले होते. दिवस मावळत होता. आम्ही सर्व जण खूप थकलो होतो. एखादी माहेरवाशीण सासरी जाताना जशी आपल्या घराकडे वळून पाहते तशी आमच्या सगळ्यांची अवस्था झाली होती. बोटीमध्ये आम्ही सगळे जण एक-एक चढू लागलो. सर्व जण चढण्यासाठी गडबड करत होते. आम्ही त्यांना हसत हसतच म्हणालो सगळे बसल्याशिवाय बोट सुटणार नाही. इथे काही दुसरी एसटी नाही की एक गेली की दुसरी येईल. तेव्हा मला एक मित्र म्हणाला पाय दुखत असल्यामुळे पाय पसरून बसण्यासाठी जागा पकडण्यासाठी ही सगळ्यांची धडपड चाललेली आहे. आम्ही बोटीत चढून एका कोपऱ्यात बसलो. कॅमेऱ्याची बॅटरी दिवसभराच्या फोटोशूटमुळे डाऊन झाली होती. बोटचालकाने बोट चालू केली. सगळे जण थकल्यामुळे जास्तीत जास्त जण झोप काढू लागले होते. अर्धा तास प्रवास झाला असेल. तेवढय़ात जोर जोरात आरडाओरडा ऐकू येऊ लागला. पटकन जागे होऊन पाहिले तर आमच्या बोटीतील इंजिनाने आग पकडलेली होती. ती आग विझवण्यासाठी काय करावे हे कोणालाच कळत नव्हते. बोटचालकसुद्धा साधारण आमच्या वयाचाच होता. तोसुद्धा घाबरला होता, पण मुद्दामच मी एक खेडय़ातला, मुलगा राना-वनात फिरणारा निर्भीड मुलगा असल्याचा उगाचच आव आणत होता. थोडय़ाच अंतरावर असणाऱ्या एका बोटवाल्याला आम्ही हातवारे करू लागलो. बोटचालकाने पटकन इंजीन बंद केले आणि बाजूचे गोणपाट इंजिनावर टाकले आणि ती आग विझवली. आमची बोट थांबली आहे हे त्या दुसऱ्या बोटचालकाच्या लक्षात आले. त्याने त्याची बोट आमच्या दिशेने फिरवली. बोटचालक आम्हाला सांगत होता की तुम्ही दुसऱ्या बोटीला बोलवू नका. इंजीन थोडे थंड झाल्यावर बोट पुन्हा सुरू होईल. परंतु आमच्या सगळ्यांचे चित्त काही थाऱ्यावर नसल्या कारणामुळे त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्षच देत नव्हते. दुसरी बोट आमच्या बोटीच्या शेजारी आली. त्याने व बोटीतील प्रवाशांनी काही मदत हवी आहे का अशी आमची विचारपूस केली. पण आमचा बोटचालक म्हणाला नको, होईल थोडय़ा वेळात सुरू, जा तुम्ही. ते निघून गेले. सर्वाची झोप उडाली होती. त्या बोटचालकाला सगळे जण बोलायला लागले. अरे तू हे काय केलेस. आता आपण कसे जाणार? तो शांतपणे म्हणू लागला, तुम्ही शांत बसा. काही काळजी करू नका. मी बोट चालू करतो. पाच-दहा मिनिटे त्याने प्रयत्न केला तरी बोट चालू होत नव्हती. पुन्हा सगळे जण काळजी करू लागले. अंधार पडला होता. बोटचालकाच्या मोबाइलला रेंज मिळत होती. त्याने लगेच आपल्या घरी फोन करून आपल्या वडिलांस बोट खराब झाल्याचे सांगितले. आणि दुसरी बोट घेऊन येण्यास सांगितले. दुसरी बोट येण्यास साधारणत: दीड तास लागणार होता. बोटचालकाचा बोट चालू करण्याचा प्रयत्न चालूच होता. सगळ्या जणांना आपल्या घरच्या लोकांची आठवण यायला सुरुवात झाली होती. समोरून आलेली मदतसुद्धा आम्ही नाकारलेली होती. शेवटी बऱ्याच वेळाने त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि आमची बोट पुन्हा सुरू झाली. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण ही तर सुरुवात होती. खरं संकट तर आमची पुढे वाट बघत होते. आमच्या बोटीच्या छतावर फक्त गवताची शेड टाकलेली होती. आकाशात जोरजोरात विजा कडकडत होत्या. थेंब थेंब पाऊस सुरू झाला होता. वाऱ्याचा वेगसुद्धा वाढला होता. आणि थोडय़ाच वेळात विजेच्या कडकडाटात जोराचा पाऊस सुरू झाला. सोबतीला वारा होताच. आमची बोट हेलकावे खाऊ लागली. बोटीमध्ये अशी एकही जागा नव्हती की तिथे पावसाच्या सरी येत नव्हत्या. सगळे जण एकमेकाच्या पाठी लपण्याचा प्रयत्न करत होते. अगोदरच काळोख होता. त्यात आम्ही सगळे जण उभे राहून आरडाओरड करत होतो. बोटचालकाला पुढचे काहीच दिसत नव्हते. तो आम्हाला समजवण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण त्याच्या बोलण्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. सगळ्या जणांना आता देवाची आठवण झाली होती. आम्ही सगळे जण पाठीमागे एका साइडलाच आल्यामुळे बोट पुढच्या बाजूने उचलत होती. त्यामुळे तिला वेगसुद्धा येत नव्हता. आम्हाला उत्तराखंडमध्ये झालेल्या महाप्रलयाची आठवण झाली आणि आम्ही आमच्या कुलदैवताची आठवण करू लागलो. सर्व जण ओलेचिंब झालो होतो. जोराचा वारा असल्यामुळे थंडीसुद्धा जोर जोरात लागत होती. मिनी कश्मीरचा रोमांचकारी थरार आता भयकारी झाला होता. ‘पाण्यात घाम फुटणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ आज आम्हाला समजला. पोहता न येणारे डीके, संभाजी यांचे चेहरे तर बघण्यासारखे झाले होते. आमच्यात पट्टीचा पोहणारा उमेश हसत होता. पण मी त्याचे हास्य ओळखले होते. तो घाबरत तर होता पण तो आलेल्या संकटावर ‘लाफ्टर थेरपी’ या ट्रीटमेंटचा आडोसा घेऊन येणाऱ्या संकटाला हसत हसत सामोरा जाण्याची अॅिक्टग करत होता. अंधारामुळे काहीच दिसत नसलं तरी संजय (काळू) आणि रोहिदास (बाळू) ही जोडगोळी येथून किनारा कोणत्या बाजूने जवळ आहे, याचा सव्र्हे करत होती. मी ‘डुबने वालों को तिनके का सहारा बहुत होता है’ या म्हणीनुसार बोटीत सुरक्षेसाठी काय आहे हे शोधत होतो. म्हणजे जॅकेट, टायर, लाकडी फळी वगरे वगरे. पण एक-दोन फळ्यांशिवाय बोटीत काहीच नव्हते. ते तर डीके आणि संभाजी या दोघांनी कधीच आपल्या हातात घेतले होते. मला ‘लाइफ ऑफ पाय’ हा चित्रपट आठवत होता. प्रत्येक जण जीव मुठीत घेऊन बसला होता. कदाचित देवाने आमचे चार वष्रे आयुष्य वाढवले असावे म्हणूनच चार वर्षांनंतर वासोटा अभयारण्यात येण्याची वेळ आली होती, असं वाटत होतं. पण ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ हेच खरं. थोडय़ा वेळाने पाऊस हळू हळू कमी होत गेला. थोडय़ाच वेळात आम्ही सर्व जण सुखरूप तेटली गावच्या किनाऱ्यावर पोहोचलो.
वासोटय़ाचा अनुभव जेवढा सुंदर होता, तेवढय़ाच भयानक ठरू शकणाऱ्या प्रसंगातून आम्ही सहीसलामत बाहेर पडलो होतो.