आपल्या छोटय़ाशा परसबागेत किंवा अगदी आपल्या बाल्कनीतही सहजपणे वाढवता येईल अशी एक पालेभाजी म्हणजे ‘विलायती पालक’. अनेक नर्सरीतून याची रोपे शोभेची झाडे म्हणून विक्रीस ठेवलेली दिसतात. तसे पहिल्यास ही मृदुकाय वनस्पती शोभिवंत तर आहेच, पण तिच्या पानांचा व कोवळ्या देठांचा पालेभाजी म्हणून उपयोग करता येतो हे अनेकांना माहीत नसते. ही वनस्पती बहुवर्षांयू असल्याने ती एकदा लावल्यास दोन ते तीन वर्षांपर्यंत विनासायास व भरगच्च, गर्द वाढते. हिची पाने कोवळ्या बुंध्यासकट पालेभाजी म्हणून वापरता येतात. साधारण तीन वर्षांनंतर तिची वाढ खुंटते. त्या वेळी तिचेच साधारण ३ ते ४ इंचांचे लांब बोखे काढून त्यांपासून नवी रोपे करता येतात. विलायती पालकाला साधारणपणे एक वर्षांनंतर कंदमूळ तयार होते. कंदमुळापासूनही आपल्यास अभिवृद्धी करता येते. तसेच काही फुलांना चिमुकली फळेही धरतात. फळांतील बिया जमिनीवर पडून आपोआप रुजतात; त्यांचीही पुनर्लागवडीने अभिवृद्धी करता येते.
दक्षिण-पूर्व आशियाई देशांत हिचा वापर बऱ्याच प्रमाणात केला जातो. या वनस्पतीला ‘Ceylon spinach’ असेही म्हणतात. हिचे शास्त्रीय नाव आहे ‘Talinum triangulare’. ही मृदुकाय वनस्पती असल्याने हिची मुळे फार खोलवर जात नाहीत; त्या कारणाने तिला पसरट व उथळ कुंडीत लावणे श्रेयस्कर असते. लागवडीसाठी बागकामाची माती आणि शेणखत यांचे समप्रमाण मिश्रण करून त्यांत लागवड करावी. हिला संपूर्ण उन्हाची किंवा अर्धवट उन्हाची जागाही चालू शकते. त्यामुळे अगदी बाल्कनीत किंवा खिडकीतील कुंडीतही चांगल्या प्रकारे वाढू शकते. आपली परसबाग असल्यास तेथेही तिचा कमी उंचीची बॉर्डर करण्यास उपयोग होऊ शकतो. त्यामुळे आपल्या परसबागेची शोभाही वाढेल आणि तिचा पालेभाजी म्हणूनही वापर करता येतो. हिला गुलाबी रंगाची सुबक, छोटुकली फुलेही येतात. या कारणास्तव हिला शोभिवंत व गृहोपयोगी वनस्पती म्हणून आपल्या बागेमध्ये स्थान देणे इष्टच असते. हिच्या पानांचा व कोवळ्या देठांचा भाजीसाठी वापर केल्यास ती भाजी चवीला पालकाच्या भाजीसारखीच लागते.
विलायती पालक ही वनस्पती कीटक आणि रोग यांना सहसा बळी पडत नाही. पावसाळ्यात कधी कधी जमिनीवर लावलेल्या रोपांना गोगलगाईंचा उपद्रव होऊ शकतो. नाकतोडेही मधून मधून त्रासदायक ठरू शकतात. परंतु गोगलगाई सापडल्यास त्यांस उचलून मिठाच्या द्रावणात टकल्यास त्या मरून जातात. नाकतोडय़ांच्या बंदोबस्तासाठी तंबाखूच्या द्रावणाचा उपयोग होऊ शकतो. तंबाखूच्या द्रावणाच्या उग्र दर्पामुळे नाकतोडे या वनस्पतीला आकर्षति होणार नाहीत. तंबाखूचे द्रावण फवारल्यानंतर तीन ते चार दिवसांनी दर्प निघून जातो; तेव्हा हिचा पालेभाजी म्हणून उपयोग करावा.
नंदन कलबाग