कव्हर स्टोरी
सहभाग : लता दाभोळकर, अमृता करकरे, अमिता बडे, भारती भावसार, इरावती बारसोडे, ग्रीष्मा जोग-बेहेरे, नेहा टिपणीस
टीव्ही मालिकांवर सतत टीका होत असते, तरीही या मालिका पाहिल्या जातात. म्हणूनच ‘लोकप्रभा’च्या प्रतिनिधींनी वेगवेगळ्या स्तर आणि वयोगटातील स्त्रियांना बोलतं केलं. त्यातून पुढे आलेलं चित्र अंतर्मुख करणारं आहे. कुटुंबात एकटय़ा पडलेल्या, वयोमानानुसार एकटय़ा राहणाऱ्या स्त्रियांना टीव्ही हाच त्यांचा सोबती वाटतो, टीव्हीशी त्यांनी मैत्रीचं अनोखं नातं जोडलं आहे.
साडेबारा वाजता छोटी मयूरा शाळेतून घरी आली. आईबाबा ऑफिसला गेले होते. घरी तिची आजी एकटीच होती. आजीने मयूराला जेवायला वाढलं आणि ती टीव्ही बघायला बसली. मयूरानेही जेवण केलं आणि तीही आजीच्या मांडीवर डोकं ठेवून टीव्ही बघत बसली. त्या दोघींची ही रोजची सवय. आजी बघायची त्या मालिकांमधलं मयूराला तिच्या वयानुसार फारसं काही कळायचं नाही. पण आजीबरोबर टीव्ही बघत बसायला तिला आवडायचं आणि त्या मालिकांमध्ये रंगून गेलेल्या आजीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत बसायला तिला गंमत वाटायची. आजही नेहमीप्रमाणे आजीचा टीव्ही मालिका बघण्याचा आणि मयूराचा तिच्या मांडीवर लोळण्याचा कार्यक्रम सुरू असताना लाइट गेली. आजीला वाटलं येईल पाच मिनिटांत. पण दहा मिनिटं तशीच गेली. मग आजीची चुळबूळ वाढली. तिनं मयूराला दार उघडून लिफ्ट सुरू आहे का, इतरांच्या घरात टीव्हीचा आवाज येतोय का बघायला सांगितलं. लिफ्ट बंद होती. इतरांच्या घरातूनही टीव्हीचा आवाज येत नव्हता. म्हणजे सगळ्यांच्याच घरातली लाइट गेली होती.
‘काय मेली लाइट तरी आत्ताच जायची होती? आता त्या प्रियाने मंजिरीला सत्यजीतबद्दल काय सांगितलं कसं कळणार मला?’ आजी स्वत:शीच पुटपुटली.
‘अगं संध्याकाळी बघ पुढचा भाग’, मयूरा आजीला म्हणाली.
‘रात्री, संध्याकाळी काय बघ.. संध्याकाळी तुझा बाबा त्या बातम्या लावून बसतो. ही सीरियल लाव म्हटलं की चिडचिड करतो. रात्रीच्या रिपीटला तुझ्या आईला ती तिची हिंदी बघायची असते. मग माझी वेळ हीच ना..’
‘मग माझी वेळ हीच ना..’ असं म्हणत आजीच्या गळ्यात हात टाकत मयूराने आजीला आणखी चिडवायचा प्रयत्न केला. मग काहीतरी डोक्यात येऊन तिनं आजीला विचारलं.
‘आजी, तू लहान होतीस तेव्हा टीव्ही बघताना लाइट गेल्यावर तुम्ही काय करायचात?’
‘काय करायचात म्हणजे? टीव्ही बघताना लाइट जायला टीव्ही होतेच कुठे आमच्या वेळी?’ आजी म्हणाली.
‘क्काय? टीव्ही नव्हते? तुझ्या लहानपणी टीव्हीच नव्हते? मग काय होतं? दुपारचं जेवण झाल्यावर तू आणि तुझी आज्जी काय करायचात वेळ घालवायला?’ मयूराने विचारलं.
आजी एकदम स्तब्ध झाली. एक अस्वस्थता पसरली.
‘खरंच गं, काय करायचो? मी, माझी आई, आजी सगळ्या घरी असायचो, पण काहीच आठवत नाही आता वेळ कसा घालवायचो ते.. म्हणजे घरातली कामं वगैरे झाल्यावर निवांतपणाला झोपतही असतील या बायका. पण असं घरबसल्या मनोरंजनाला काहीच नव्हतं त्या वेळी. आता बरंय गं.. त्या वेळीपेक्षा. कधीही सुरू करा. कुठेतरी काहीतरी असतंच सुरू. नाहीतर तुम्ही सगळी घरात नसताना मी काय केलं असतं? कसा वेळ घालवला असता?’
आजीचं हे सगळं स्वगत ऐकायला मयूरा जागी कुठे होती. तिला कधीच झोप लागली होती आणि आजी मात्र लाइट आल्यावर टीव्ही बघण्यासाठी अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत राहिली.
हे आहे आजच्या टीव्ही प्रेक्षकांचं वास्तव. आजची पिढी एकेकाळी टीव्ही अस्तित्वातच नव्हता, असं कसं असू शकतं, या प्रश्नाच्या भोवऱ्यात. साहजिकच आहे ते. ज्यांनी जन्मल्यापासून टीव्ही बघितलेला आहे, त्यांना टीव्ही नव्हता तेव्हा या वास्तवाची कल्पनाच करता येत नाही. टीव्ही, त्यातल्या मालिका किंवा इतर कार्यक्रम इतक्या उत्तम पद्धतीने त्यांच्यापुढे येतात की टीव्ही अस्तित्वातच नसणं ही आदिम काळातली गोष्ट आहे असं त्यांना वाटू शकतं.
पण ज्यांनी टीव्ही नसणं आणि टीव्ही असणं हे दोन्ही काळ पाहिले आहेत, त्यांनाही तेव्हा टीव्ही नसताना आपण काय करायचो, हा प्रश्न पडतो, इतकं आपलं सगळ्यांचं आयुष्य टीव्हीने व्यापलं आहे.
टीव्ही अगदी नव्याने आला तेव्हा त्याची काय अपूर्वाई होती. मुळात तो असायचा अगदी उच्चवर्गीयांच्या घरी. हळूहळू मध्यमवर्गीयांत तो कुणाकुणाला परवडायला लागला. चाळींमध्ये तर ज्याच्या घरी टीव्ही त्याची दादागिरी असंच चित्र असायचं. संध्याकाळी सुरू होणाऱ्या ‘आमची माती आमची माणसं’पासून शेवटची सत्यम् शिवम् सुंदरम्ची पाटी येईपर्यंत कळणारे, न कळणारे सगळे कार्यक्रम बघितले जायचे. चित्रहार, रंगोली, शनिवार, रविवार दाखवले जाणारे सिनेमे. कशाकशाचं अप्रूप होतं तेव्हा. दिल्लीत एशियाड झालं आणि टीव्ही रंगीत झाला. रामायण, महाभारत टीव्हीवर आलं तो, म्हणजे ते सुरू व्हायच्या आधी टीव्हीला हळदीकुंकू वाहायचा आणि सुरू झाल्यावर रस्ते ओस पडण्याचा एक काळ होता. घरोघरी टीव्हींची संख्या वाढण्याचाही हाच काळ. त्यानंतर टीव्हीचं आकाश खासगी वाहिन्यांना खुलं झालं आणि मनोरंजनाच्या क्षेत्राचे सगळे आडाखेच बदलले.
एका दूरदर्शनला केवढे पर्याय. शिवाय केव्हाही रिमोटचं बटण दाबून टीव्ही सुरू करा, चोवीस तास मनोरंजनाचा राबता सुरूच. नुसते सिनेमे हवेत, आहेत. नुसत्या मालिका हव्यात, आहेत. नुसत्या बातम्या हव्यात, आहेत. नुसते खेळ पाहायचेत, आहेत. हे सगळं तुमच्या तुमच्या भाषेत हवंय, आहे..
चोवीस तासांचा हा धबडगा सुरू झाल्यावर टीव्हीच्या व्यसनाची, त्याच्या दुष्परिणामांची चर्चाही करून झाली. आता कुणी म्हणत नसलं तरी एकेकाळी टीव्हीला इडियट बॉक्स म्हणण्याचाही प्रघात होता.
आता या सगळ्यातून आपण बाहेर आलो आहोत. आता टीव्ही असावा की नसावा, तो इडियट बॉक्स आहे का, अशा कोणत्याही चर्चा झडत नाहीत. आमच्या घरात जाणीवपूर्वक टीव्ही नाही, किंवा आम्ही मुलांना टीव्ही बघू देत नाही असं म्हणणाऱ्यांकडेही कुणी आता आदरमिश्रित कौतुकाने बघत नाही. आपल्या असंख्य वाहिन्यांसह टीव्ही आहे, तो असणार आहे, हे आता सगळ्यांनीच स्वीकारलं आहे. फक्त तो ३६ इंची हवा की ५२ इंची, एलईडी हवा की एलसीडी हवा, असे प्रश्न आता असतात.
म्हणजे टीव्ही हे आता वास्तव आहे.
त्याबरोबरच ते आहे, प्रेक्षकांसाठी करमणुकीचं साधन आणि उत्पादकांसाठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम.
या दोन टोकांमध्ये छोटय़ा पडद्यावरची मनोरंजनाची दुनिया विविध भाषांमधले विविध चॅनल्स, विविध कार्यक्रम या सगळ्या डामडौलासह झुलते आहे. टीव्हीवाल्यांच्याच भाषेत सांगायचं तर या सगळ्या डोलाऱ्याच्या केंद्रस्थानी आहेत घरोघरच्या स्त्रिया, आणि त्यांच्यापाठोपाठ लहान मुलं.
स्त्रिया आवडीने टीव्ही मालिका बघतात, त्यादरम्यान दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती बघतात. एखादी वस्तू विकत घेताना त्यांच्यावर त्या जाहिरातींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होतोच. म्हणजे उत्पादकांचा हेतू एकीकडे साध्य होतोच.
पण तरीही घरोघरच्या स्त्रियांना बघायच्या असतात त्या टीव्ही मालिका. मालिका, त्यातल्या सासू-सुना, आणखी इतरही पात्रं, त्यांची कथानकं या सगळ्यांमध्ये त्यांचा जीव घुटमळत असतो. आणि का घुटमळू नये? त्यांच्यासाठी पर्यायच तेवढे उपलब्ध आहेत.
मग हव्या त्या चॅनलवर, हव्या त्या वेळेला असं करत भरपूर मालिका उपलब्ध आहेत, म्हणून त्या खूश आहेत का?
तर तसंही नाही.
आसपास कान देऊन ऐकलं तर बहुसंख्य टीव्ही मालिकांवर रटाळपणाच्या, भडकपणाच्या, कारस्थानीपणाच्या प्रवृत्तींचं सतत समर्थन केल्याचा, त्यांना खतपाणी घातल्याचा आरोप होत असतो. पण तरीही हे सगळे दुर्गुण घेऊन येणाऱ्या मालिका पाहिल्या जातात. त्यांच्यावर घरोघरी चर्चा झडतात.
असं का?
आवडत नसल्याचं सांगत स्त्रिया या मालिका का बघतात? त्यांना त्यातून नेमकं काय मिळतं? काय मिळवायचं असतं? त्यांच्या या मालिकांकडून काय अपेक्षा असतात? त्या पूर्ण होतात का? मुळात टीव्ही मालिका बघणाऱ्या स्त्रियांचं या मालिकांबद्दल काय मत असतं?
असे अनेक प्रश्न पडले होते. हे प्रश्न घेऊन या स्त्रियांकडेच जायचं असं ठरलं. त्यांना टीव्हीबद्दल प्रश्न विचारायचे. त्यांच्याशी गप्पा मारायच्या आणि त्या गप्पांमधून त्यांचं टेलिवर्तन समजून घ्यायचं म्हणून ‘लोकप्रभा’ने एक सव्र्हे म्हणजेच पाहणी करायचं ठरवलं. कोणत्याही पाहणीसाठी काढावे लागतात तसेच या पाहणीसाठीही प्रश्न काढले. पाहणीतून मिळणाऱ्या आकडेवारीतून टक्केवारी शोधणं, त्यातून निष्कर्ष काढणं अशा स्वरूपाची ही पाहणी नाही. तर हा आहे टीव्ही पाहणाऱ्या स्त्रियांच्या मानसिकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न.
आमच्या काही प्रतिनिधींनी वेगवेगळ्या वयोगटांतल्या, वेगवेगळ्या थरांतल्या स्त्रियांशी त्या टीव्ही मालिका का बघतात, या विषयावर गप्पा मारल्या. आणि त्यामधून पुढे आलं स्त्रिया आणि टीव्ही यांचं एक अनोखं नातं. अनोखंच! तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना पद्धतीचं. टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या मालिकांमधल्या अनेक गोष्टींबद्दल त्यांचे आक्षेप आहेत, हे काय दाखवतात, कशाला दाखवतात, असं कधी असतं का, चांगली सून मिळूनही ही रिमा अशी काय वागते, मंजिरीला अक्कल कधी येणार, प्रिया कधी सुधारणार. कधी कथानक पटत नाही, कधी पात्रांचं वागणं पटत नाही, कधी चाललंय ते आवडत नाही, पण म्हणून त्या टीव्ही बघायचं काही सोडत नाहीत. करमणूक म्हणून, टाइमपास म्हणून, सोबत म्हणून त्यांना टीव्ही हवाच आहे. कारण तो त्यांचा सायबर सखा आहे, आभासी सखा आहे. अगदी हक्काचा. त्यामुळे टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या मालिकांमधलं काही आवडलं नाही की त्या हक्काने नाराजी व्यक्त करतात, तणतणतात, बडबडतात आणि मन मोकळं करून पुन्हा टीव्हीकडेच वळतात. रोजचे ताणतणाव, आपल्या माणसांकडून वेळ मिळत नसल्याचं वैफल्य, सोबतीची गरज, मनोरंजनाची निकड या सगळ्यावर त्यांचा उतारा आहे, टीव्ही मालिका. डेली सोपमधली पात्रं रोजच्या रोज दिसत असल्यामुळे त्या रोज बघणाऱ्या स्त्रियांचं त्यांच्याशी एक नातंच निर्माण होतं. इकडे डेली सोपवाल्यांनाही मालिका बरेच दिवस आणि रोजच्या रोज दाखवायची असल्यामुळे ती वाढवायच्या नादात पाणी घातलं जातं. कथानक भरकटतं. लोकांना आकर्षून घेण्यासाठी मसाला हवा. त्यासाठी कट-कारस्थानं, प्रकरणं या गोष्टी येतात. त्या आवडत तर नाहीत, पण वेळ घालवण्यासाठी, सवय झालीय म्हणून, कुतूहल म्हणून मालिका बघितली जाते.
हे सगळं काय आहे, याचा शोध घेण्यासाठी या वेगवेगळ्या वयोगटांतल्या, स्तरांतल्या स्त्रियांशी मारलेल्या गप्पांमधून जी माहिती मिळाली ती अंतर्मुख करायला लावणारी आहे. अंतर्मुख यासाठी की बिनडोकपणे टीव्ही मालिका काढल्या जातात आणि स्त्रियाही त्याच पद्धतीने टीव्ही मालिका बघतात असं सरसकटपणे विधान केलं जातं. या विधानाचे जनक कोण आहेत, ते शोधायलाच हवेत. कारण आपण टीव्ही मालिका का बघतो याची आम्हाला स्त्रियांनी इतकी विविध आणि सबळ कारणं दिली आहेत की यापुढे स्त्रियांच्या टेलिवर्तनाबद्दलचं कोणतंही विधान पुन्हा पुन्हा तपासूनच घेतलं जावं.
मुळात सगळ्यात आधी हे समजून घ्यायला हवं की, भावनिक गोष्टींना स्त्रीचा प्रतिसाद आणि पुरुषाचा प्रतिसाद वेगवेगळा असतो. स्त्रिया अधिक भावनाप्रधान असतात. आणि त्यांना त्यांच्या आसपासच्या तशाच गोष्टी आवडतात. (अर्थातच याला अपवादही आहेतच.) त्यामुळे टीव्ही मालिकांमधून दाखवल्या जाणाऱ्या भावनिक गोष्टींना स्त्रियांचा प्रतिसादही तसाच भावनिक असतो. भावनिक असणं दुबळेपणाचं, बिनडोकपणाचं म्हणून तशा रडक्या गोष्टींना प्रतिसाद देणाऱ्या स्त्रियाही भावनिक म्हणून दुबळ्या हे समीकरण पुरुषप्रधान व्यवस्थेनं निर्माण केलेलं आहे. वास्तविक या भावनिकतेनंच स्त्रियांचं भावविश्व अधिक उबदार, अधिक रंगीबेरंगी बनवलेलं आहे.
स्त्रियांशी टीव्ही मालिका या विषयावर गप्पा मारताना हेच आढळलं की आवडणाऱ्या- न आवडणाऱ्या मालिकांशी स्त्रिया भावनिकदृष्टय़ा जोडल्या गेल्या आहेत. जणू काही ती सगळी पात्रं, त्यांचं जगणं हे सगळं या स्त्रियांच्या आसपासच घडतं आहे. ते त्यांच्या वातावरणाचा, पर्यावरणाचा भाग आहे. उदाहरणच द्यायचं तर ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत एका दिवशी सगळे भाग दाखवले गेले आणि संध्याकाळी सगळ्यात शेवटी श्री आणि जान्हवीचं लग्न दाखवलं गेलं. या लग्नानिमित्त ठाण्यातल्या एका सोसायटीत पार्टी केली गेली आणि नंतर आइसक्रीमही खाल्लं गेलं.
आमच्या पाहणीमध्ये बहुतेक स्त्रिया मराठी होत्या. त्यामुळे मराठी मालिका बघण्याचं प्रमाणही आपसूकच जास्त नोंदलं गेलं आहे. त्यामागे ‘मराठी मालिकांमधलं कौटुंबिक वातावरण आम्हाला आवडतं’ं हे उत्तर आहे. मराठीतही झी मराठीच्या मालिका बघण्याचं प्रमाण जास्त आहे, आणि त्यातही ‘होणार सून मी या घरची’ ही सध्याची सरसकटपणे सगळ्यांची आवडती मालिका आहे.
हीच मालिका का आवडते याची उत्तरंही लक्षात घेण्यासारखी आहेत. या मालिकेतला समंजस प्रेमळ श्री, समजूतदार, लाघवी जान्हवी स्त्रियांना विशेष आवडली आहे. या मालिकेत कोणतंही एकमेकांविरुद्धचं, कुरघोडीचं राजकारण नाही. सखोल प्रेम, आनंद यांची या कुटुंबाला असलेली ओढ स्त्री प्रेक्षकांना अधिक भावली आहे. सात सासवा असूनही जान्हवी सगळ्यांशी प्रेमाने वागते, कुणालाही उलट उत्तरं देत नाही अशी एखादी व्यक्तिरेखा आवडण्यामागची कारणं सांगितली जातात तेव्हा ती व्यक्ती, तिचं वातावरण, तिची मानसिकता लक्षात येते. कदाचित आपल्या आयुष्यात जे हवं आहे, पण ते नाही, त्याचं प्रतिबिंब छोटय़ा पडद्यावरच्या या मालिकांमध्ये बघितलं जात असावं.
या व्यक्तिरेखांशी तुम्ही स्वत:ला रिलेट करता का, या प्रश्नाचं उत्तरही संमिश्र आहे. एक निरीक्षण असं आहे की नोकरदार स्त्रिया मालिकांमधल्या व्यक्तिरेखांशी स्वत:ला जोडून घेत नाहीत, पण तरुणी तसंच वयस्कर स्त्रियांना मात्र मालिकांमधल्या व्यक्तिरेखांशी आपलं काहीतरी नातं आहे, आपल्याला त्यांच्यामधून काहीतरी मिळतं, आपल्या आसपासच्या माणसांचं प्रतिबिंब या व्यक्तिरेखांमधून सापडतं असं वाटतं.
या मालिका का बघता, याची अनेक कारणं पुढे आली आहेत. ती सोबतच्या चौकटीत दिलीही आहेत. पण कट-कारस्थानं बघायला जाम मजा येते, असंही उत्तर दिलं गेलं आहे. या मालिका बघून जीवनातल्या नातेसंबंधांचं दर्शन होतं असं म्हणता येईल का, या प्रश्नावरही संमिश्र प्रतिक्रिया आहेत, पण अमुक मालिकेत अमुक पात्र असं वागलं, त्यापेक्षा त्याने असं करायला हवं होतं, जान्हवीसारखी सून हवी, श्रीसारखा मुलगा हवा अशी उत्तरं येतात, तेव्हा ते मालिका आणि जगणं यांच्या सरमिसळीतूनच येत असतं.
अनेकींनी या मालिकांमधली घरं, पडदे, फर्निचर या सगळ्याकडे आपलं लक्ष असतं, आणि आपण ते फॉलो करायचा प्रयत्न करतो, हे मान्य केलं आहे. जान्हवीच्या साडय़ा, तिची हेअरस्टाइल याकडेही अनेकींचं लक्ष आहे. एका तरुण मुलीने मात्र मराठी मालिकांमधून दाखवल्या जाणाऱ्या फॅशन इतक्या हास्यास्पद असतात की मला असं वाटतं की यांना रीतसर फॅशन टिप्स द्याव्यात असं म्हटलं आहे. अर्थात झोपेचा किंवा स्वयंपाकघरातला शॉट देतानाही असणाऱ्या व्यक्तिरेखांच्या भरजरी साडय़ांवर नेहमीप्रमाणे आक्षेप घेतले गेले आहेतच, पण तरीही या व्यक्तिरेखांच्या साडय़ा, दागिने, हेअर स्टाइल, मेकअप या दृश्य गोष्टींवर मैत्रिणींमध्ये चर्चा होतेच असं अनेकजणी कबूल करतात. मालिकेच्या प्रोमोमधून पुढे काय होणार याचा अंदाज येत असतो, तरीही प्रत्यक्षात काय दाखवलंय, कसं दाखवलंय या ओढीतून ते ते भाग बघितले जातात. पण काहीजणी असंही सांगतात की घरी मी एकटी असते, मालिका लावून ठेवते, माझी कामं सुरू ठेवते. संवाद कानावर पडत असतात, त्यातून काय चाललंय हे समजत असतं. ते प्रत्यक्ष बघायची गरज नसते. एकीकडे कामंही होतात, टीव्हीवर काय चाललंय समजतं आणि कुणीतरी घरात सोबतीला आहे असंही वाटत राहतं..
म्हणूनच टीव्हीशी स्त्रियांची आभासी मैत्री झाली आहे, असं म्हणता येईल. आभासी जग असा उल्लेख होतो तेव्हा त्याचा संदर्भ नेहमी फक्त इंटरनेटशीच जोडला जातो. पण आभासी जग हे काही फक्त इंटरनेटवरच आहे असं नाही. एकेकाळी घरोघरी लोकप्रिय असलेला रेडिओ हेसुद्धा आभासी जगच होतं. त्याच्याशीही लोक असेच जोडले गेले होते. प्रभात वंदन पासून जयमाला पर्यंतचे म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंतचे कार्यक्रम घरोघरी न चुकता ऐकले जायचे. ती जागा आता टीव्हीने घेतली आहे. आमच्या पाहणीत अनेकींनी आम्ही टीव्ही सुरू ठेवतो आणि आमची आमची कामं करत राहतो असं सांगितलं. घरात कुणी नसेल तर त्यांना टीव्ही ही सोबत वाटते. टीव्ही मालिका, त्यातल्या व्यक्तिरेखा, त्यातलं कथानक हे सगळंच वास्तव नसलेलं जग आहे. म्हणजेच ते आभासी आहे. या आभासी जगातले लोक, त्यांचं जगणं, त्यांचे प्रश्न या सगळ्याशी या स्त्रिया जोडल्या गेल्या आहेत. ते सगळं काल्पनिक आहे, खरं नाही, हे त्यांना सगळ्यांनाच माहीत आहे. पण तरीही त्यांना ते आपलं वाटतं. या आभासी जगात त्यांना त्यांचा विरंगुळा सापडतो. त्याचं कारण आजच्या जगण्यात, परिस्थितीत, वातावरणात दडलेलं आहे.
आणखीही एकजण सांगते.. नवरा गावाला गेला असला की घरी मी एकटी असते. चार खोल्यांच्या घरात एकटेपण खायला उठतं. अशा वेळी अगदी रात्रभरसुद्धा मी टीव्ही मालिका लावून ठेवते. सोबतीला कुणीतरी आहे, या भावनेने मला अगदी छान झोप लागते. टीव्ही बंद केला तर मात्र मी एकटेपणाच्या जाणिवेतून एक सेकंदही झोपू शकत नाही..
स्त्रियांची टीव्हीशी आभासी मैत्री आहे ती अशी..
response.lokprabha@expressindia.com
काय पाहतो..? कशासाठी..??
वेगवेगळ्या वाहिन्यांवरच्या वेगवेगळ्या मालिकांमधून स्त्रिया कोणत्या मालिका पाहतात, का पाहतात, हे समजून घेण्यासाठी पंधरा सोळा वर्षांच्या मुलीपासून ते नव्वदीतल्या आजींपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातल्या स्त्रियांच्या मुलाखती आमच्या प्रतिनिधींनी घेतल्या. या सगळ्याचजणींनी या पाहणीत अत्यंत उत्साहाने भाग घेतला. त्यांच्या मुलाखतींमधील संपादित सारांश-
१८ ते ३० वयोगट
श्रीया जोशी, विद्यार्थिनी
रिअॅलिटी शोज बघायला जास्त आवडते. ‘मास्टर शेफ ऑस्ट्रेलिया’ मी आवर्जून बघते. इतर सीरियल्स पण अधूनमधून बघते. त्यात दाखवलेले नवीन ट्रेंड्स मात्र मी फॉलो करते. वेळ पडल्यास आईच्या मागे लागते. ‘तुझं नी माझं जमेना’ बघायचे. त्यातील मनवा आणि वैभवची कॅ रेक्टरं छान होती. रिमाचे पात्र काही काही वेळीस पटायचे नाही. म्हणजे सून चांगली वागूनसुद्धा तिला मनवाचं वागणं पटत नव्हतं. हे रिमाचं वागणं मला आवडायचं नाही. आजकाल लहान मुलांनी पाहाव्यात अशा कुठल्याही सीरियल्स नाहीत. अगदी कार्टूनमध्ये पण मारामारी, भांडणे हे दाखवतातच. मला लहान भाऊ आहे, तो हे बघतो आणि तसंच वागण्याचा प्रयत्न करतो. हे बरोबर नाही. मालिका बघताना समतोल असावा. मी मालिका बघण्याचं कारण एकतर मनोरंजन व दुसरं म्हणजे मैत्रिणी भेटल्या की या बाबतीत हमखास चर्चा होतेच. मी काही बघत नसेन तर त्या बाबतीत बोलता यावं म्हणूनपण मी काही मालिका बघते.
प्राजक्ता कोशे
कारस्थानी व्यक्तिरेखा बघायला कधी कधी मजा येते. त्या पाहून कधी कधी फार हसायला येतं. मालिकांमध्ये खूप जास्त प्रमाणात ड्रामा असतो. त्या आपल्या आयुष्याशी रिलेट करणं शक्यच नाही. काही व्यक्ती मालिकांप्रमाणे पाहायला मिळतात. कधी कधी त्या मालिकांचा अनुकरणसुद्धा करतात.
या मालिका पाहून कधी कधीच वेळ चांगला जातो. एखादा पांचट विषय उगाच खेचला की डोकं आऊट होतं. कित्येकदा दुसऱ्या दिवशी मालिका पाहताना काल काय पाहिलेलं हेसुद्धा आठवत नाही. या मालिका फक्त स्ट्रेस दूर करायला वा टाइमपास म्हणून मी बघते.
नावडणारी मालिका : स्टार प्रवाहवरील सर्व मालिका. ‘पुढचं पाऊल’ वगरे. ‘तू तिथे मी’, ‘मला सासू हवी’ या फुकट लांबवलेल्या मालिका आहेत.
आवडती मालिका : ‘होणार सून मी या घरची’, एका लग्नाची दुसरी गोष्ट (तिसरी गोष्ट इंटरेस्टिंग नाहीये).
आवडते पात्र : श्री
नावडते पात्र : रुपाली
फार कमी वेळा पुढच्या एपिसोडमध्ये काय होणार याची उत्सुकता लागलेली असते. टìनग पॉइन्टवर थांबल्यावरच ती उत्सुकता राहाते. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’च्या वेळी मुक्ता बर्वेचा ट्रेंड आवडलेला. बाकी इतर वेळी सगळा भडकपणा वापरला जातो. आमच्या वयाच्या मुलांसाठी ‘दुसरी गोष्ट’सारख्या मालिकाच छान आहेत. बाकीच्या मालिकांमध्ये आम्हाला अजिबात रस नाही. काल्पनिक गोष्टी आवडल्या तरी लार्जर दॅन लाइफ असलेल्या गोष्टी फारशा आवडत नाहीत.
स्नेहा वारे, विद्यार्थिनी
काही मालिकांमध्ये कारस्थानी व्यक्तिरेखा असतात खऱ्या, पण त्या बघायला आवडतात. मी ज्या मालिका बघते त्यात अशा कजाग, कारस्थानी बायका जरा कमीच आहेत. नाहीच आहेत. आयुष्यातल्या प्रसंगांशी मालिका रिलेट करत नाही. करू शकत नाही असं वाटतं, कारण मी अजून तशी लहान आहे असं वाटतं. थोडय़ा फार प्रमाणात मालिकांमध्ये दाखवतात तशा व्यक्ती पाहायला मिळतात. काही व्यक्तिरेखा मात्र अतिरंजित असतात.
काही मालिका चांगल्या आहेत तर काही फारच बोअरिंग आहेत. कित्येक महिने त्यात एकच गोष्ट सुरू असते. गोष्ट पुढे सरकतच नाही काही मालिकांमध्ये, तरीही या मालिका पाहिल्या जातात. का माहिती नाही. मजा येते बघायला म्हणून पाहिल्या जातात. काही मालिकांमधल्या व्यक्तिरेखा खूप मनोरंजक असतात. बघताना हसायला येतं, म्हणून बघते. नावडती मालिका- ‘मला सासू हवी’. त्यात एकच गोष्ट आहे आणि फारसं काही घडतंच नाही त्यात. ‘तू तिथे मी’मधली प्रिया हे नावडतं पात्र आहे. ‘देवयानी’ ही मालिका पण आवडत नाही. मराठी मालिकांमधली फॅशन बघून त्यांचे कपडे, दागिने याबद्दल त्यांनाच टीप्स द्यावाशा वाटतात. ती फॅशन फॉलो करणं तर दूरच. माझ्या वयाच्या मुलींना ‘दिल मिल गयें’, ‘मिले जब हम तुम’सारख्या मालिका बघायला आवडतात. तरुण मुला-मुलींना आवडेल असे त्यांचे विषय आहेत. असे विषय मराठीत आले तर तरुण पण बघतील. अर्थात यातही कथानक आणि पात्र अतिरंजित केलेली आहेतच आणि मालिका लांबवल्याही जाताहेत. कुठल्या हॉस्पिटलमध्ये असं होतं खरंतर.. पण तरी छान टाइमपास होतो म्हणून बघते.
शर्वरी फडके, नोकरी
मला हिंदी तसेच मराठी दोन्ही भाषेतील मालिका बघायला आवडतात. हिंदीमधील ‘क्राइम पॅट्रोल’ ही गुन्हेगारी विश्वावर प्रकाश टाकणारी मालिका मी आवर्जून बघते. तसेच ‘वीरा’ ही लहान मुलांसाठीची मालिका पण बऱ्याचदा पाहते. त्यातील लहान मुलांचे काम मला फार आवडते आणि अशा प्रकारच्या मालिका लहानांनी बघाव्यात असे मला वाटते. बाकी सर्वसाधारणपणे मालिकांमध्ये सासू-सूनेचे भांडण, एकमेकींबद्दल केलेला द्वेष वगैरे दाखवले जाते. ते काही फार पटत नाही. कुठलीही मालिका किंवा त्यातील पात्र जर थोडेफार सत्याला धरून असेल तर ते जास्त आवडते. टिपिकल स्वभावाच्या नायिका असतील तर त्या आवडत नाहीत. उदा. म्हणजे ‘होणार सून मी या घरची’मधील जान्हवी हे पात्र मला पटलेच नाही. किती साधी सोशीक दाखवली आहे. आजकाल असे कोणी असते तरी का? या उलट श्री हे पात्र तोलूनमापून वागणारे. अशी पॉझिटिव्ह वागणारी माणसे आजूबाजूला तर आवडतातच, पण मालिकेतदेखील बघायला आवडतात. मालिकेत कोण काम करतेय यावर ती पाहायची की नाही हे मी ठरवते. काही वेळेला असे होते की आवडणारे कलाकार असतात, पण त्यांनी साकारलेले पात्र आवडत नाही. ‘तू तिथे मी’ ही न आवडणारी मालिका आहे. पहिले दोन भाग बघताच साधारण पुढे काय दाखवणार आहेत याचा अंदाज आला व तेव्हापासूनच ती बघणे सोडले.
प्रियंका रानडे, विद्यार्थिनी
मालिकांमधली काटकारस्थानं बघायला मजा येते. सगळ्यात जास्त बघण्यासारखे असतात ते म्हणजे खलनायिकांचे कपडे आणि मेकअप. संवाद आणि मालिाकांमधून कळतं की लोक कसे असतात. आजकालच्या मालिकांमधून शिकण्यासारखं काहीच नसतं. आपल्याच मागून आपलेच लोक कसे वागतात याचा अंदाज मात्र येतो. अशी
कटकारस्थानं करणारे लोक आहेत आणि माझ्या आयुष्यातही ते मला पाहायला मिळाले आहेत. म्हणून मी सीरियलमधल्या काही गोष्टी स्वत:च्या आयुष्याशी रिलेट करते. पण ह्य़ा आजकालच्या सीरियलचे विषय हे डोक्यात ठेवण्यासारखे नसतात. त्यामुळे ते मी टाइमपासपुरतं बघते आणि मग सोडून देते.
माझ्या सगळ्यात आवडत्या मालिका म्हणजे ‘होणार सून मी ह्य़ा घरची’, ‘तुझं नि माझं जमेना’, ‘बडे अच्छे लगते हैं’ कारण त्या कौटुंबिक मालिका आहेत. ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतली जान्हवी फार आवडते, कारण तिची मालिके तील व्यक्तिरेखा खूपच छान आहे. तिच्यातला भाबडेपणा आणि समजून घेण्याची पद्धत मला आवडते. ‘उतरण’ ही मालिका सुरुवातीला मला फार आवडायची, पण नंतर ती विनाकारण लांबवल्यामुळे कंटाळवाणी झाली आहे. त्यामुळे पाहण्यातील आनंद निघून गेला. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतली अनिल आपटेची भूमिका फार चांगली झाली असली तरीही, त्यांचा फार राग येतो, कदाचित हीच त्यांच्या अभिनयाची पोचपावती असावी. मला एखाद्या मालिकेतील एखादं पात्र आवडलं नाही तरी इतर पात्रांसाठी मी ही मालिका पाहते.
आजचा भाग संपला की मी उद्याच्या भागाची वाट बघते. खास करून ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ मालिकेबाबत. मालिकेतल्या इतर वस्तूंकडेही लक्ष असतं. ‘होणार सून’ मधील घरं कथेला अनुसरून दिली आहेत. मध्मवर्गीय मराठी माणसाची छत्री जान्हवीच्या हातात दाखवली आहे, या गोष्टी मला पटल्या. जान्हवीचे ड्रेस, केशभूषा फॉलो करते. पण तरीही माझ मतं आहे की, लहान मुलांनी मालिका बघू नयेत आणि त्यांच्या पालकांनी त्यांना क्राइमपेट्रोलसारख्या मालिका तर अजिबात दाखवू नयेत. त्यामुळे लहान मुलं विपरीत शिकतील. ‘होणार सून’सारख्या कौटुंबिक मालिका पाहिल्या तर काही हरकत नाही.
गौरी बर्वे, विद्यार्थिनी
बऱ्याचदा टीव्ही सुरू असतो म्हणूनच मालिका बघितली जाते. ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ मालिका छान वाटतेय. काही मालिकांमधले विषय खरोखर रिलेट करू शकते. ही मालिका त्याचं उदाहरण आहे. काही व्यक्तिरेखा- उदाहरणार्थ स्पृहा जोशीची खऱ्या वाटतात. ‘मला सासू हवी’, ‘तू तिथं मी’सारख्या मालिका मात्र कंटाळवाण्या आणि न आवडणाऱ्या आहेत. त्या बघतच नाही. सुरुवातीला बघितल्या पण आता नाही. मालिकांमधले कपडे, दागिने याकडे लक्ष असतं, पण फॉलो करत नाही. जीवनातल्या नातेसंबंधांचं वगैरे दर्शन मालिकेतून होतं असं मात्र वाटत नाही. टाइमपास आणि मनोरंजन म्हणूनच मालिका बघते. आवडती मालिका- ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’. कारण- बऱ्यापैकी आपल्यातली गोष्ट वाटते.
नावडती मालिका- ‘तू तिथं मी’- कंटाळवाणी. आधी बघत होते, आता बघणं सोडून दिलं.
अश्विनी डोंगरे, गृहिणी
मनोरंजन म्हणून मालिका बघते. विषयांशी रिलेट करू शकते. सासू-सुनांचं नातं, त्याचे वेगवेगळे पदर समोर येतात. कसं वागलं तर काय अर्थ निघू शकतो, हे उमगतं. सगळ्या मालिका काही छान आहेत असं मात्र वाटत नाहीत. रिलेट तर अजिबात सगळ्या होत नाहीत. काही मालिका निव्वळ मनोरंजन म्हणून बघते, तर काहींच्या बाबतीत पुढच्या भागातील उत्सुकता म्हणून बघते. मालिकांमधल्या कपडय़ांकडे आणि दागिन्यांकडे लक्ष असतं. कधी फॉलो केलं नाहीय, पण करायला आवडेल.
आवडती मालिका- ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘होणार सून मी या घरची’.
नावडती मालिका- ‘तू तिथं मी’- तीच ती रडारड असल्यानं कंटाळा आला.
मीनाक्षी बारसोडे –
केवळ विरंगुळा म्हणून मालिका बघते. पण त्यातून काही शिकण्यासारखे नसते. मालिकांमध्ये जे दाखवतात ते खूप अतिरेकी दाखवले जाते. तसे खऱ्या आयुष्यात नसते. ठरावीक मालिका बघून वेळ चांगला जातो. एका लग्नाची दुसरी आणि तिसरी गोष्ट या दोन्ही मालिका चांगल्या आहेत. काही प्रमाणात त्या आपल्या आयुष्याशी निगडित वाटतात. त्यात उगाचच कोणी कोणाचा सूड घेत नाहीत. त्यामुळेच बघायला चांगल्या वाटतात. तिसरी गोष्टमधील मोठे बाबा आणि दत्ताराम या व्यक्तिरेखा जास्त आवडल्या कारण मोहन जोशी आणि मोहन आगाशे यांनी अभिनय चांगला केला आहे. उरलेल्या मालिकांपकी आवर्जून बघावी अशी एकही मालिका नाही.
निंदता तासकर, अकाऊंटंट
मी मलिका टाइमपास म्हणून बघते आणि त्यातून काहीच शिकोयला मिळत नाही. पण कधी कधी आपल्याला कळतं की कोण कसं वागू शकतं. लोक दिसतात तसे नसतात, कटकारस्थान कसे करतात हे लक्षात येते. मालिके तले प्रश्न स्वत:च्या आयुष्याशी रिलेट करत नाही. ते मालिकेतच ठीक आहेत. मालिका बघून नातेसंबंधांचं दर्शन होत नाही. खऱ्या आयुष्यात इतकं वाईट कोणी नसतं. पण काही व्यक्तिरेखा आपल्या आसपास आढळतात.
कधी कधी मी मालिका बघून इतकी गुंगून जाते की मग मला वाटतं की हे सगळं खरंच चाललं आहे की काय? सध्या ‘होणार सून’ ही मलिका खूप आवडते, कारण स्टोरी वेगळीच आहे. प्रथमच अशी मालिका आली आहे, ज्यात ६ आया आणि त्यांचा एकुलता एक मुलगा. या मालिकेने वेड लावले आहे. त्यातला श्री मला खूप आवडतो. त्याचं कॅरेक्टर खूप छान आहे. तो स्त्रियांचा खूप आदर करतो. त्याव्यतिरिक्त त्याचा अभिनय पण छान आहे. ‘तुझं माझं जमेना’ ही मालिका आवडत नाही. सुरुवातीला छान वाटत होती, पण नंतर कंटाळवाणी झाली. ‘होणार सून’मधील अनिल आपटे नाही आवडत. तो आला की मला राग येतो. पण श्री, श्रीची फॅमिली, जान्हवी चांगले आहेत, म्हणून मी ती मालिका बघते आणि ही मालिका मला इतकी आवडते की असं वाटतं संपूच नये. स्त्रियांचे कपडे, सजावट ह्य़ाकडे फार नाही, थोडंसं लक्ष असतं. पण मी फॉलो कधीच केल्या नाहीत त्यांच्या गोष्टी. मला वाटतं लहान मुलांनी बघायची झाली तर ‘होणार सून’ आणि ‘महादेव’सारख्या मालिका बघाव्यात, ज्यातून त्यांना शिकायला मिळेल.
भाग्यश्री साठे, विद्यार्थिनी
गेली पाच वष्रे मी स्टार प्लसवरील ये रिश्ता क्या केहेलाता ही मालिका न चुकता बघते आहे. त्यामध्ये खूप भांडणं नाहीत. थोडेसेच रुसवे-फुगवे असतात. त्यामध्ये कोणी खलनायक नाही. त्यामधील अक्षरा आणि नतिक ही जोडी खूप आवडते. तिची व्यक्तिरेखा, तिचे कपडे याकडे खूप लक्ष असते. मी तिच्यासारखी साडी नेसली आहे. मालिकेमधील तिचा लढा खूप छान दाखवला आहे. त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांची स्वत:च्या आयुष्याबरोबर तुलना केली जाते. तू तिथे मी ही मालिका अजिबात आवडत नाही. त्या मालिकेमध्ये सुरुवातीपासूनच मारामारी सुरू आहे. लफडी दाखवली आहेत. त्यामुळेच ती बघायला आवडत नाही. मला सीआयडी, क्राइम पेट्रोल या मालिकादेखील आवडतात.
निकिता चव्हाण, घरकाम.
मालिका बघायला मला मनापासून आवडतात. आवडत्या मालिका म्हणजे तू तिथे मी, होणार सून मी या घरची. एखाद्या वेळी मालिका बघायला मिळाली नाही तर रिपीट जेव्हा दाखवतात तेव्हा बघते. शक्यतो चुकवत नाही. ज्या प्रकारे मालिकेतील पात्रं संवाद बोलतात ते खूप छान वाटतं. त्यांचे कपडे, दागिने बघायला आवडतात. आपण पण तसा एखादा ड्रेस घ्यावा असं वाटतं. तू तिथे मी मधील मंजिरी व सत्यजीत ही जोडी आवडते. प्रियाचं पात्र मला आवडत नाही. जास्त नकारात्मक वाटतं. होणार सून मीमधील छोटी आईचं काम बघायला मजा येते.
अश्विनी गांजापुरे, विद्यार्थिनी
स्टार प्लसवरील ये रिश्ता क्या केहेलाता ही मालिका मी आवर्जून बघते. त्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धती दाखवलेली आहे. मी पण एकत्र कुटुंबात राहते त्यामुळे मालिका अधिक भावते. त्यातील काही प्रसंगांची स्वत:च्या आयुष्याशी तुलना केली जाते. मग ते प्रसंग देखील डोक्यात राहतात. कधी कधी स्वत:ला पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरे मालिकांमधून मिळू शकतात. मला सासू हवी ही मालिका अजिबात आवडत नाही. त्यामध्ये ज्या प्रकारे कट कारस्थाने चालू असतात ती अति दाखवतात. अतिशय पाचकळ आणि पानचट मालिका आहे. पात्र म्हटले तर होणार सून.. मधील जान्हवीची व्यक्तिरेखा आवडते. तिची व्यक्तिरेखा खूपच छान मांडली आहे. मालिका बघताना केवळ कथानकाकडे लक्ष असते.
छाया शिंदे
वेळ मिळेल तेव्हा मी मराठी मालिका बघते. रोज अगदी नेमाने कुठली एकच मालिका बघणं होत नाही. या मालिकांमधली चांगली माणसं तेवढीच आवडतात. त्यांचे कपडे, दागिने याबद्दल फारसं आकर्षण वाटत नाही. एक विरंगुळा म्हणून मी या मालिका बघते. त्या बघाव्यात आणि तिथेच विसरून जाव्यात, या मताची मी आहे. तात्पुरतं मनोरंजन करून घ्यावं, हाच यामागचा मुख्य उद्देश असतो.
निकी भाटे, डॉक्टर
मी कटकारस्थानं असलेल्या मालिका बघते, कारण मला काही लोक किती मूर्खपणा करू शकतात आणि दाखवू शकतात, हे बघायला मजा येते. बऱ्याचदा त्या मालिकांमधून मालिका बनवणाऱ्यांची सर्जनशीलता बघायला मिळते. उत्सुकता ही असते की, आता लेखकाच्या डोक्यात पुढे काय आहे.
आजकालच्या मालिकांमधून काहीच मिळत नाही. निव्वळ टाइमपास होतो, एंटरटेन्मेंट होते आणि माझं असं मत आहे की, सुरुवातीला सगळ्या मालिका खूप मस्त असतात आणि मग त्या बोअरिंग होतात. मी मालिका स्वत:च्या आयुष्याशी रिलेट करीन का हे मालिकेच्या कथानक आणि परिस्थितीवर अवलंबून असतं. बऱ्याचदा कथानक आणि लेखक याविषयीची चर्चा मी आणि आई घरात करत असतो. सध्या ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ ही सुंदर मालिका आहे, कारण त्यांचं कुटुंब खूप छान आहे.
मला ‘पवित्र रिश्ता’मधली उषा नाडकर्णी खूप आवडते, कारण ती छान भांडते. मला ‘तू तिथे मी’ ही मालिका आवडत नाही आणि मृणाल दुसानीस ही नाही आवडत, कारण आजकालच्या जगात इतकं मूर्ख कोणीच नसतं. तिचा नवरा कसाही वागतो आणि तरीही तिला ते न कळावं.. असं कसं असू शकतं आणि अशा मालिका असतील तर मी अजिबात बघत नाही. बऱ्याचदा मालिकेचं कथानक काय असेल पुढे यावर चर्चा होते, पण नट-नटींचे कपडे, घराची सजावट ह्य़ावर माझं फार लक्ष नसतं आणि मी माधुरी दीक्षित आणि इंग्रजी मालिकांमधल्या काही गोष्टींना फॉलो करते.
दीप्ती गुरव, पत्रकार
मी ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ ही मालिका आवर्जून बघते. त्यातील जान्हवी व श्रीची जोडी आवडते. त्याबरोबरच ‘मला सासू हवी’, ‘तुझं माझं जमेना’ याही बघते. ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ नुकतीच सुरू झाली आहे. ती चांगली असेल असे वाटते. यापूर्वीच्या मालिकांमध्ये मला ‘उंच माझा झोका’, ‘वादळवाट’ आवडली होती. त्यातील आदिती सारंगधरचं पात्र फार विचारपूर्वक लिहिलेलं होतं व तिनेही त्याला चांगला न्याय दिला.
‘पुढचं पाऊल’ ही मालिका मला अजिबात आवडली नव्हती. ती फारच हायटेक मालिका वाटते. म्हणजे सासू सुनेचा पासवर्ड शोधून कट उभा करते इ. असं प्रत्यक्षात घडणं फार अशक्य वाटतं आणि ज्यांना माहीत नाही ते मालिका बघून शिकतील असं वाटतं. मालिकांमधील नातेसंबंध वा प्रश्न यांच्याशी मी रिलेट करू शकते. काही विघ्नसंतोषी माणसं असतातच. ती कुणाचं चांगलं पाहू शकत नाहीत. त्याच्यामुळे होणारं इतरांचं नुकसान मला माझ्या आयुष्यातील घटनांशी जोडता येतं.
अनेकदा मालिकांमधील वर्णन बेसलेस असतं. भडक व पराकोटीची कारस्थानं करणारं असतं. तितक्या प्रमाणात नसेल कदाचित, पण आजच्या काळात सासू-सुना यांचं नातं पूर्वीपेक्षा अधिक गुंतागुंतीचं झालं आहे, असं वाटतं. त्यामुळे असं राजकारण घडतच नाही असं नाही. ते घडतं आणि बायका मालिका बघतात, कारण घरी राहणाऱ्या बाईला करमणूक काय आहे. तिच्या भोवतीचं विश्व तेच आहे.
अनेकदा मालिका बघणं हा सक्तीचा भाग होतो, कारण अन्यथा तुमच्या पीयर ग्रुपमध्ये तुम्ही मागे पडता.
मुलांनी मात्र मालिका पाहू नयेत.
मालिकांचा प्रेक्षकवर्ग कायम असण्याचं कारण म्हणजे मालिकांचं पुनप्र्रक्षेपण. एखादा भाग चुकला तर नंतर पाहता येतो ही सोय आहे. बहुतेक मराठी घरांत संध्याकाळी साडेसात ते दहा टीव्ही अखंड सुरू असतो.
शिक्षणाचा अभाव व पैशांची मुबलकता यामुळे मालिकांचा टीआरपी अधिक आहे असं वाटतं. सध्या चॅनेल्स इतके आहेत की, दर वेळी सर्फिग करून काय बघायचं हे ठरवण्यात वेळ घालवण्यापेक्षा मराठी वाहिनीचं चॅनेल लावलं की झालं, अशी माझी भूमिका आहे. मला अनेक भागांचे संवादही लक्षात आहेत. मी दिवसातून दोन-तीन तास टीव्ही पाहते.
आदिती आहिर, तृतीय वर्ष, अभियांत्रिकी
मी ऐतिहासिक मालिका आवडीने बघते. सध्या मराठीतली ‘होणार सून मी ह्य़ा घरची’, तर हिंदीतली ‘जोधा अकबर’, ‘महाभारत’, ‘महादेव’ या मालिका बघते. त्यात मला ‘जोधा अकबर’, तसंच ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ आवडते. ‘तू तिथे मी’ मला अजिबात आवडत नाही. आजकालच्या शिकलेल्या मुली मंजिरीइतकं सहन करतील असं वाटत नाही. ती सरळसरळ अतिशयोक्ती वाटते.
नोकरी करणाऱ्या स्त्रिया आहेत त्या मालिका बघून सोडून देतात, पण स्टेस बस्टर म्हणून त्याचा उपयोग होतो. मीसुद्धा ८ तास कॉलेज केलं की घरी आल्यावर थोडा वेळ टीव्ही बघून रिलॅक्स होते. मग पुढील कामं आटोपते.
मालिकांमधील नातेसंबंध वा प्रश्न यांच्याशी मी अजिबात रिलेट करू शकत नाही. मालिकांमध्ये दुसरं काही कामच नाही अशा आविर्भावात लोक गैरसमज पसरवत असतात. प्रत्यक्ष आयुष्यात लोक अधिकाधिक रोखठोक आणि ओपन असण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं.
मालिका बघून झाल्यावर सहसा त्याचा भुंगा डोक्यात राहत नाही, पण अनेक बायकांच्या राहतो, असं मी निरीक्षण केलंय. या बायका त्या व्यक्तिरेखेसारख्या विचार करण्याचा प्रयत्न करतात. उदा- मंजिरी असं का वागत असेल, याचा विचार करून, तिच्या वागण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत राहतात.
मुलांनी लहान मुलांचे रिएलिटी शोज पाहावेत किंवा ऐतिहासिक मालिका बघाव्यात.
या मालिकांमधून नातेसंबंधाचं दर्शन ७० टक्के प्रमाणात होतं.
बाहेरच्या जगातली अस्थिरता किंवा तणाव इतके वाढले आहेत की लोकांना दैनंदिन जगणंही आव्हानात्मक झालं आहे. म्हणून मग त्यांच्या प्रश्नांची उत्तरं ते मालिकेतील भांडणं, कटकारस्थानं यातून शोधण्याचा प्रयत्न करतात, असं वाटतं. म्हणूनच बहुधा अनेक घरांत पुरुष प्रेक्षकवर्गही आहे. मी दोन-तीन तास टीव्ही पाहते.
प्रज्ञा परब, रेडिओ जॉकी
मी मालिका फॉर अ चेंज म्हणून बघते आणि करमणूकदेखील होते. घरी थकून आल्यावर काहीतरी हवे म्हणून मालिका बघायच्या, जेणेकरून मूड फ्रेश होतो. मालिकेतलं एखादं पात्र आवडलं किंवा हीरो आवडला की मी ती मालिका बघते. बऱ्याचशा तरुण मुली याचसाठी मालिका बघतात. कधी कधी मालिकांमधल्या प्रश्नांना आपल्या आयुष्याशी रिलेट करते, १० पैकी ३ किंवा ५ वेळा. मालिकातल्या व्यक्तिरेखा मी माझ्या आयुष्यात पाहिल्या आहेत. मालिकेतले विषय हे डोक्यात राहतात, त्यावर आम्ही मैत्रिणी चर्चापण करतो.
मला मराठी मधली ‘होणार सून मी या घरची’ आणि ‘मेरी भाभी’ या मालिका फार आवडतात. कारण त्या नवीन आहेत. मी बऱ्याचदा मालिका नवीन असताना बघते आणि मग जुनी झाली की बघायचं बंद करते. काही काळानंतर मालिका रटाळवाण्या होतात. मालिका जर संपत असेल तर एखाद्या भागात संपवून टाकावी, विनाकारण वाढवू नये. रिअॅलिटी शो आवडत नाहीत. जसं बिग बॉस. एकतर त्यातील प्रसंग घडवून आणलेले असतात आणि ते खोटेदेखील असतात. कधी कधी असा प्रश्न पडतो की, विनाकारण ही माणसं अशी का वागत आहेत. पण अमुक एक पात्र मला आवडलं नाही असं फारसं होत नाही. कारण मी करमणुकीसाठीच बघते. मालिकेतील इतर गोष्टींकडे तितकंच लक्ष असतं जेवढं घरातल्या व्यक्तींकडे असते. घरातल्या वस्तू, मालिकेतल्या स्त्रियांच्या साडय़ा, साडय़ांचा रंग फार आवडीने बघते आणि फॉलोपण करते, त्यातली एखादी खूपच आवडली तर. मुलांनी या मालिका न बघता डिस्नेवरचे आर्टअटॅकसारखे कार्यक्रम बघावेत ज्यातून काही शिकायला मिळेल.
प्रियल शिवलकर, विद्यार्थिनी
मी मालिका टाइमपास म्हणून बघते. ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ ही मलिका खूप आवडते, कारण त्यातले श्री आणि जान्हवी फार सुंदर पद्धतीने त्यांचं रिलेशन जपतात. मी क धी मालिकेतल्या प्रश्नांना स्वत:च्या आयुष्याशी जोडले नाही आणि अशा व्यक्तिरेखापण मी कुठेच पाहिल्या नाहीत. कधी कधी जर रिलेशनशिपच्या बाबतीत असेल तर, नाही तर त्यांचे विषय माझ्या डोक्यात राहात नाहीत. ‘होणार सून मी ह्य़ा घरची’व्यतिरिक्त मला ‘बडे अच्छे लगते हे’ ही मालिका आवडते. जान्हवी-श्री आणि विक्रम-नताशा या दोन्ही जोडय़ा मला आवडतात. जान्हवी-श्रीच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचं नेचर खूप छान आहे आणि ते रिलेशन फार सुंदर जपतात. विक्रम-नताशा आवडण्याचं कारण म्हणजे ‘दे गिव्ह फ्रीडम टु देअर चाइल्ड’. माझी नावडती मालिका म्हणजे ‘पवित्र रिश्ता’ आणि त्यातली अर्चना ही अभिनेत्रीही आवडत नसल्यामुळे मी ती मालिका बघत नाही. काही मालिकांची मी वाट बघते. मालिकेतल्या प्रत्येक गोष्टीकडे माझं तितकंच लक्ष असतं आणि मी स्पेशली ज्वेलरी फॉलोपण करते. मला वाटतं ‘बडे अच्छे लगते है’सारख्या मालिका लहान मुलांनी बघितल्या तर काहीच हरकत नाही, पण मालिका बघून नातेसंबंधांचं दर्शन मला कधीच झालं नाही.
अनुजा जोशी, इंजिनीअर
मी मालिका एंटरटेन्मेंटसाठी बघते, तेही फावल्या वेळात आणि सध्या त्याही मी बंद केल्यात. मला मालिकांपेक्षा ज्यातून आपण काही शिकूशकतो असे कार्यक्रम आवडतात. ‘सपने सुहाने लडखपन के’ ही मालिका मला फार आवडायची. त्या मालिकेत काही गुंड एका मुलीची छेड काढतात आणि मग ती अन्यायाविरोधात आवाज उठवते. म्हणजेच बायकांनी गप्प बसू नये, तर अशा अन्यायाविरोधात आवाज उठवावा. या मालिका बघितल्याने आपण खूप अलर्ट होतो. काय प्रसंग येऊ शकतो आणि त्या वेळेस काय करायला हवं हे कळतं. त्याव्यतिरिक्त ‘फूड फूड’, ‘ट्रॅव्हल अँड लिव्हिंग’ ही चॅनल्सपण आवडतात, कारण त्यातून नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि वेगवेगळी ठिकाणं बघायला मिळतात. मालिकांमधले सगळेच विषय डोक्यात राहात नाहीत, पण काही काही विषय डोक्यात राहतात. मालिकेत जशी पात्रं दाखवली आहेत तशी पात्रं मी कुठेही पाहिली नाहीत. मी मालिकेतल्या प्रश्नांशी स्वत:च्या आयुष्याशी रिलेट करत नाही, पण मालिकांमधून त्यातल्या नातेसंबंधांचं दर्शन मला होतं.
मला सध्या चाललेल्या रिअॅलिटी शोपैकी ‘एकापेक्षा एक’ अजिबात आवडत नाही. मालिका फार कमी बघत असल्या कारणाने आवडतं किंवा न आवडतं पात्र असं काही नाही, पण जेव्हा मी मालिका बघायची तेव्हा त्यातल्या प्रत्येक गोष्टीकडे म्हणजेच साडय़ा, दागिने यांकडे माझं तितकंच लक्ष असायचं. मी या सगळ्यासाठीच मालिका बघायची, पण मी फॉलो करत नाही. या गोष्टी बघण्यापुरत्याच ठीक आहेत. मला ‘उंच माझा झोका’ ही मालिका आवडायची आणि मला असं वाटतं की, मुलांनी अशाच मालिका बघाव्यात ज्यातून काही शिकायला मिळेल.
जबाबदारी आणखी वाढली आहे
कोणत्याही कार्यक्रमाचं नियोजन करताना आम्ही प्रेक्षकांना काय हवं असतं याचा आधी विचार करतो. प्रेक्षकांकडून आम्हाला वेळोवेळी जो फीडबॅॅक मिळतो त्यातून प्रेक्षकांची मानसिकता कळते. त्यांना काय आवडेल, काय आवडणार नाही याचा ट्रेंड कळतो. या सगळ्याचा आम्हाला कार्यक्रमाच्या नियोजनात खूप उपयोग होतो.
याबरोबरच कार्यक्रमाच्या नियोजनात महत्त्वाची ठरते ती भूमिका. झी मराठीने नेहमीच मूल्यांवर भर दिला आहे. त्यामुळेच प्रेक्षकही झीला आपल्या कुटुंबाचाच सदस्य मानतात.
टीव्हीच्या प्रेक्षकांमध्ये प्रामुख्याने स्त्रिया आहेत. त्या टीव्ही बघायला बसतात आणि त्या बघतात ते कुटुंबातले इतर सदस्यही बघतात. त्यामुळे मालिका, त्यातलं कथानक, पात्रं हे सगळं स्त्रीकडून इतर सदस्यांपर्यंत पसरतं. त्यामुळे आमचाही कौटुंबिक पाश्र्वभूमी असलेल्या मालिकांवर, तसंच कुटुंबातल्या सगळ्यांना एकत्र बसून बघता येतील अशा मालिकांवर भर असतो. हे सगळे निकष लावून मालिकांचं नियोजन केलं जातं. त्याबाबतचे अंदाज काही वेळा चुकतात, खूप वेळा बरोबर येतात.
टीव्ही मालिका हे महत्त्वाचं मनोरंजनाचं माध्यम आहे, पण त्याची सिनेमा- नाटक यांची तुलनाच होऊ शकत नाही. सिनेमा नाटक बघायला लोक घरातून उठून जातात. तिथे त्यांच्याभोवती वेगळं विश्व उभं करणं, त्यांना मानसिकदृष्टय़ा वेगळ्या विश्वात नेणं शक्य असतं. टीव्ही मालिका स्वत:च प्रेक्षकांच्या विश्वात प्रवेश करतात. त्यामुळे लोकांना घरबसल्या मालिका आरामशीरपणे पाहता यावी, त्यांचं घरबसल्या मनोरंजन व्हावं, त्यातून त्यांना जगण्याची ऊर्जा मिळावी, मूल्यं मिळावीत असा आमचा हेतू असतो.
होम मिनिस्टर या आमच्या कार्यक्रमातून एकमेकींपासून दुरावलेल्या दोन बहिणी एकमेकींना भेटू शकल्या. नक्षली हल्ल्यात ज्यांचे पती मरण पावले आहेत अशा स्त्रिया मुंबईत आल्या असताना आमची टीम त्यांना भेटायला गेली होती. तेव्हा या स्त्रियांनी सांगितलं की, आमचं दु:ख आहेच, पण आम्हालाही होम मिनिस्टरमध्ये सहभागी व्हायचंय. त्यांना मनोरंजनातून ऊर्जा हवी होती. काही स्त्रियांना होम मिनिस्टरमधून दिसणाऱ्या इतरांच्या घरांमधून आपल्या घराची रंगसंगती कशी करावी, फर्निचर कसं असावं याची प्रेरणा मिळाली. तशा प्रतिक्रिया आमच्याकडे आल्या आहेत. म्हणजे टीव्हीवरून जे काही दिसतं त्याचा लोकांच्या जाणिवांवर परिणाम होतंच असतो, पण त्यांच्या नेणिवांवरही परिणाम होत असतो. त्यामुळे ते टीव्ही मालिकांशी स्वत:ला रिलेट करतात. जोडून घेतात. घडणाऱ्या गोष्टींशी तर ते जोडून घेतातच, पण काय घडावं याच्याबाबतही अपेक्षा ठेवायला लागतात. त्यातून त्यांना टीव्ही मालिकांमध्ये त्यांच्या आयुष्याचं प्रतिबिंब दिसतं. खूपदा त्यांना मालिकांमधल्या अनेक गोष्टी पटत नाहीत, आवडत नाहीत, तेव्हा त्या खऱ्या नाहीत, म्हणूनही बघतात आणि खऱ्या असत्या तर किती चांगलं झालं असतं म्हणूनही बघतात. त्यानुसार त्यांच्या खऱ्या जीवनातही त्यांची वागायची पद्धत बदलते. आता ‘होणार सून मी या घरची’मध्ये बायको कशी हवी, तर जान्हवीसारखी, जावई कसा हवा तर श्रीसारखा हे कशामधून येतं? तर यामधूनच. म्हणून लोकांना टीव्ही मालिका हा त्यांच्या जीवनाचा आरसा वाटतो. श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेत गंगाधर टिपरेंचं कुटुंब हे आदर्श कुटुंब दाखवलं आहे. ते आदर्श आहे हे माहीत आहे, पण लोकांना वाटायला लागतं की आपल्या घरातही असंच असायला हवं. ही फॅन्टसी त्यांच्या मनात तयार होते. ‘या सुखांनो या,’ या मालिकेत ते कुटुंब घरी खाली बसून जेवायचं. त्यांनी जाणीवपूर्वक जेवायचं टेबल घेतलं नव्हतं. कारण मांडी घालून बसून जेवायची पद्धत त्यांना जास्त योग्य वाटत होती. आता ही मालिकेतली गोष्ट. पण ही पद्धत आम्हाला आवडली आणि आता आम्हीही आमच्या घरी ती फॉलो करतो असं आम्हाला अनेकांनी कळवलं. मालिकाच नाही तर रिअॅलिटी शोमध्येही आम्हाला असाच अनुभव आला आहे. सारेगमप कार्यक्रमात भाग घेण्यासाठी अनेक पालकांनी आपल्या मुलांना गाणं शिकवायला सुरुवात केली. म्युझिक इंडस्ट्रीत सीडींचा खपही वाढला. म्हणजे ती गाणी पुन्हा ऐकायला लोकांनी सुरुवात केली. टीव्ही मालिकांचा असा लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम जेव्हा आमच्यापर्यंत येऊन पोहोचतो, तेव्हा आपली जबाबदारी आणखी वाढली आहे हे लक्षात येतं.
वयोगट – ३० ते ४०
मनीषा जोशीराव, अधिव्याख्यात्या
केवळ वेळ जावा आणि काहीतरी मनोरंजन व्हावे यासाठी मी मालिका बघते. त्यातही मराठी मालिकाच बघितल्या जातात. पण तरीही त्या वास्तववादी वाटत नाहीत. त्यामधून घेण्यासारखे काहीच नसते. आयुष्यातील घटना आणि मालिकांमधील घटना यांमध्ये नकळत तुलना होते आणि त्या गोष्टी पटत नाहीत. मालिकांच्या माध्यमातून जे विचार डोक्यात नसतात त्या विचारांना उगाचच खतपाणी घातले जाते. मालिकांमधील बायका कायम नटून-थटून बसलेल्या असतात, पण खरे पाहायला गेले तर ते शक्य नसते. आठ दिवसांनंतरही मालिका पाहिली तरी काय चालू आहे ते कळते इतकी संथ गतीने मालिका चालू असते. घटना मांडताना फारच अतिशयोक्ती होते.
श्रद्धा फडके, अधिव्याख्याता
कामावरून आल्यावर काहीतरी विरंगुळा म्हणून मालिका पाहते. स्वयंपाक सुरू असताना केवळ डॉयलॉग कानावर पडले तरी चालतं. प्रत्यक्ष टीव्हीसमोर बसायची गरज नाही. त्यामुळे मालिकेच्या आहारी गेल्यासारखं वाटत नाही. अविश्वसनीय घटनांचं प्रमाण वाढलं की मग त्या मालिकेकडे पाठ फिरवणं योग्य ठरतं. राधा ही बावरीत असेच विचित्र प्रॉब्लेम्स सुरू झाल्यावर मी ती बघणं बंद केलं. तू तिथे मीचं पण काहीसं असंच आहे. रोजच्या आयुष्याशी काही प्रमाणात साध्यर्म असणारी मालिका म्हणजे होणार सून मी.. त्यातदेखील काही प्रमाणात हेवेदावे वगैरे आहेतच. पण तुलनेने कमी राजकारण, टेन्शन फ्री मालिका आहे.
एखादा एपिसोड चुकला तरी जाहिराती व प्रोमोमधून लिंक आरामात लागते. त्यामुळे चुकल्यासारखं वगैरे मुळीच वाटत नाही. साडय़ा, ड्रेस, कानातलं, गळ्यातलं खरेदी करण्यावर परिणाम होतो. एखादं डिझाइन आवडतं, तसं बाजारात मिळालं तर हमखास घेतलं जातं. मुलांना पाहण्यासारखं काहीही नाही. मालिकांमधील सणांचं साजरीकरण कधी कधी बरं असतं. असा भाग मुलांनी पाहिला तर काही प्रमाणात त्यांना आपले सण कळू शकतात असं वाटतं.
मृणाल अनगळ, गृहिणी
एखादी दुसरीच मालिका पाहिली जाते, पाहिलीच पाहिजे असं होत नाही. चुकली तर फरक पडत नाही. भांडण, कटकारस्थानाच्या मालिका मुलांसमोर न पाहणे चांगले. सध्या होणार सून मी सारख्या मालिकातून काही चांगले घ्यावं असं आहे. मालिकांमधील इतर गोष्टी दागिने, कपडे यांचे आकषर्ण जाणवते.
साक्षी करंदीकर, नोकरी
ऑफिसमधून आल्यावर केवळ वेळ घालविण्यासाठी म्हणून मालिका पाहते. बऱ्याच वेळा मालिका सुरू होतात तेव्हा चांगल्या असतात, मग त्यात पाणी घातलं जातं. अशा वेळेस ती मालिका पाहणं त्रासदायक ठरतं. काही मालिका तर कित्येक र्वष सुरू आहेत. लगेच पाहणं सोडून दिलं जात नाही, पण टाइम पास म्हणून पाहिल्या जातात. रोजच्या आयुष्याशी निगडित अशा गोष्टी खूपच कमी असतात. होणार सूनमध्ये काही प्रमाणात का होईना वेगळेपणा आहे. तरी देखील मालिकेत अडकून पडणं होत नाही. मजा म्हणून डोकं बाजूला ठेऊन मालिका पाहिल्या तर फार त्रास होणार नाही.
मालिकांमधील सजावट, घरातील फर्निचर याचा खरेदीवर परीणाम होत नाही. मात्र ते पाहताना पॉझिटिव्ह वाटतं, छान वाटतं. ‘होणार सून..’ मध्ये जान्हवीच्या साडय़ा वैगरे आवडतात. त्याचा परिणाम काही प्रमाणात तरी होतोच.
उमा तरटे, घरकाम
मी घरकाम करत असल्याने मालिका बघायला खरं तर फार वेळ मिळत नाही. पण मनापासून आवड असल्याने बघते. एखादा भाग बघता आला नाही की हुरहुर वाटते. होणार सून मी या घरची व चार दिवस सासूचे या आवडत्या मालिका आहेत. रोहिणी हट्टंगडीचं काम आवडतं. श्री, जान्हवी आवडतात व तिची आई मुळीच आवडत नाही. मी मालिका कथेकरता व अभिनयाकरता बघते. त्यांचे कपडे दागदागिने हे सगळं पाहण्यात मला मुळीच रस नाही. नातेसंबंध असलेल्या मालिका लहान मुलांनी बघू नयेत असं मला वाटतं. तारक मेहता का उलटा चष्मासारख्या मालिका बघाव्यात. कार्टून फिल्मस बघाव्यात असं मला वाटतं.
धनश्री आवळसकर, मुक्त छायाचित्रकार
जनरल करमणूक म्हणून याकडे पाहिलं पाहिजे. काही काही मालिका तर निव्वळ पकाऊ या सदरात मोडणाऱ्या असतात. त्यातून काहीही मिळत नाही. मालिकेतील गोष्टी मालिकेतच ठेवायची सवय लावून घ्यावी लागेल. सध्याचे आपल्या लाइफ स्टाइलमधले बदल हे मालिकांचेच प्रतिबिंब आहेत.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांवर याचे खूप परिणाम होतात. म्हणून आम्ही दोन महिन्यांपासून अशा मालिका पाहणंच बंद केलं आहे.
ऊर्मिला दामले, बीकॉम
कधीतरी मनाला विरंगुळा म्हणून मी मालिका बघते. सध्या ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका बघते. आणि या मालिकेमधील संकल्पनेमुळे आणि त्यातील सामाजिक जाणिवांमुळे ती मला खूप आवडते. सासू-सुनांमध्ये चांगलं नातं असू शकतं, हे या मालिकेत अधोरेखित केलं आहे आणि वास्तवात तसं असूही शकतं. प्रत्येक वेळेस सासू-सुनांमधलं नातं हे बिघडलेलंच असतं असं नाही. एक चेंज म्हणूान आणि मनाला रिलॅक्स करण्यासाठी मी ही मालिका बघते. त्यातल्या ‘श्री’ची व्यक्तिरेखा मला खूप आवडते. मला बिगबॉस किंवा अभिनेत्रींचं स्वयंवर यांसारखे कार्यक्रम अजिबात आवडत नाहीत आणि ते मी बघतही नाही.
मालिकांमधील व्यक्तिरेखांचे कपडे, दागिने, घरामधील भव्य सजावट यांच्याशी मी फार रीलेट होत नाही. आणि वैयक्तिक आयुष्यात त्या फॉलो करणं मला पटतही नाही. माणूस म्हणून जे शिकण्यासारखं आहे ते घेणंच मला योग्य वाटतं.
ज्योती पाटील, एमबीए
सध्याची ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका बघतेय. सामाजिक जनजागृती, ‘श्री’ला पर्यावरणाबद्दल असलेली आस्था अशा सामाजिक भानाच्या गोष्टींमुळे मला ही मालिका खूप आवडते. कधी तरी प्रत्यक्ष आयुष्याशीही मी ती रीलेट करते. श्रीमंत घराणं दाखवूनही भपकेबाजपणा नाही, डझनावारी दुष्ट माणसं नाहीत, समोरच्या व्यक्तीला समजून घेणारी माणसं, मध्यमवर्गीय कुटुंबात प्रत्यक्ष असणाऱ्या माणसांसारख्याच या व्यक्तिरेखा आहेत. अन्य मालिकांमधील स्त्रियांची पात्रं ज्या नकारात्मक पद्धतीने रंगवली जातात, ते या मालिकेत नाही. आणि म्हणूनच मी ही मालिका बघते.
केतकी भावे-जोशी, गायिका
जोपर्यंत मालिकेत चांगलं दाखवलं जातं तोपर्यंत पाहिली जाते. मुळात मालिकेतून दुसऱ्यांच्या दु:खाचे प्रसंग आले की पाहणं टाळतो. अनेक वेळा छान स्टोरी सुरू असताना मध्येच अशी काही वळणं येतात की ते पचत नाही, पटत नाही तेव्हा अशा मालिकांकडे पाठ फिरवली जाते. दरम्यान दुसऱ्या एखाद्या चॅनेलवर दुसरी मालिका सुरू झालेली असते. मग ती पाहिली जाते. होणार सून.. सध्या छान लव्ह स्टोरी आहे. बऱ्यापैकी रिअल लाइफ स्टोरी आहे. पण हे मालिकावाले मध्येच पकवायाला सुरू करतात. बडे अच्छे लगते हैच्या बाबत हेच म्हणता येईल.
मालिकेतील कपडे पाहून नवे पॅटर्न कळतात. बाजारात अशा वस्तू पाहिल्या की बऱ्याच वेळा खरेदी देखील केली जाते. मालिकांतील फॅशनचा परिणाम काही प्रमाणात तरी होतो. मुलांच्या बाबतीत म्हणाल तर अनेक मालिकांची गीतं त्यांना तोंडपाठ झालेली असतात. त्यापलीकडे त्यांना फारसं काही कळत नाही. मात्र अशा मालिका मुलांनी न पाहणंच योग्य. काही मालिका मुख्यत: िहदी पाहू नयेत अशी दृश्येदेखील असतात, त्या न पाहणंच श्रेयस्कर.
आरती आढाव, बीई इलेक्ट्रॉनिक्स
मी ‘राधा ही बावरी’ ही मालिका बघत असे. सुरुवातीला साधं-सरळ कथानक असलेली ही मालिका छान वाटली. पण नंतर प्रत्यक्ष आयुष्यात न घडणाऱ्या गोष्टींभोवती हे कथानक फिरू लागलं. तसंच प्रत्यक्ष आयुष्यात आपण जपत असलेल्या मूल्यांना छेद देणारं कथानक घुसवल्याने ही मालिका बघणं बंद केलं. त्यातलं सौरभ हे पात्र मला खूप आवडत असे. मी म्हणेन तेच खरं करणाऱ्या सीमा वहिनीचं वागणं पटत नसे. त्यामुळे ती व्यक्तिरेखा मला फारशी भावली नाही. या मालिकांमधून काही चांगलं मिळणार असेल तरच बघायला आवडतात अन्यथा ते बघणं मी टाळतेच. त्या व्यक्तिरेखांसारखं राहणीमान, त्यांचे दागिने, कपडे यात मला फारसा रस वाटत नाही.
आरती ओगले, खासगी नोकरी
मराठी मालिकांमध्ये मी ‘होणार सून मी ह्य़ा घरची’, ‘मला सासू हवी’, ‘एकापेक्षा एक’ बघते. मात्र रिएलिटी शो अधिक आवडतात. हिंदीमधल्या मी ‘बिग बॉस’, ‘इंडियन आयडॉल’ कधीच चुकवत नाही. मल्लिकाचा शो ‘बॅचलरेट इंडिया’ कधीकधी बघते.
मला ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ आवडते. ‘तू तिथे मी’ कधीकधी पाहते, पण नायिका फार सोशिक आहे, जास्त वेळ पाहावत नाही. नोकरीवरून सगळे दमून येतात. त्यामुळे थोडं रिलॅक्सेशन हवं असतं. मालिकांमधून करमणूक होतेच. त्यातून एखादी व्यक्तिरेखा आवडली-पटली तर मालिकेतली भावनिक गुंतवणूक वाढते.
मालिकांमधील नातेसंबंध वा प्रश्न नक्कीच रिलेट करू शकतो. मंजिरीच्या मालिकेतील चिन्मय मांडलेकरची व्यक्तिरेखा जशी आहे, तशी माणसं म्हणजे घरी बायको असून, तिच्याशी संसार सुखाचा सुरू असतानाही विवाहबाह्य़ संबंध ठेवणारे लोक माझ्या परिचयाचे आहेत. विशेष म्हणजे या संबंधातील स्त्रियाही फारशी अपराधीपणाची भावना बाळगत नाहीत.
म्हणून माझं ठाम मत आहे, जे आजूबाजूला घडतं तेच मालिकांमध्ये दाखवलं जातं.
मालिका बघून झाल्यावर विषय सहसा डोक्यात राहत नाही, पण कुणी विषय काढला तर चर्चा नक्की होते.
‘होणार सून मी ह्य़ा घरची’ – त्यातील जान्हवी व श्रीची जोडी आवडते.
‘तू तिथे मी’ – मंजिरी हे नावडतं पात्र, आजूबाजूचं जग इतकं पुढारलेलं असताना मंजिरी इतरी बावळट कशी असू शकते याचं आश्चर्य वाटत नाही तर तिचा राग येतो.
‘मला सासू हवी’मधील कॅश व अभिलाषा ही पात्रं फार नाटकी वाटतात.
उद्याच्या भागाची उत्सुकता नेहमीच नाही, कधीकधी वाटते.
मालिकेतील घरं, सजावट, त्यांचे कपडे, दागिने हे सारं मी फार काळजीपूर्वक पाहते. मध्यमवर्गीय गृहिणींचा हा वीक पॉइंट आहे. मी साडय़ा बघते, त्या नेसण्याची पद्धत, ज्वेलरी कशी घातली आहे, हेअरस्टाइल सगळं बघते व जमेल तेवढं फॉलो करते. कधीकधी गुगलिंग करूनपण याची अधिक माहिती काढते. यामुळे आपल्या राहणीमानात आपण साजेसा बदल करू शकतो. या मालिकांमधून नातेसंबंधाचं खरंखुरं दर्शन ७० टक्के होतं.
पण घरातल्या लहान मुलांनी मात्र या मालिका पाहू नयेत असं मला वाटतं. त्यांनी डिस्कवरी किंवा काही लहान मुलांचे रिएलिटी शोज पाहावेत. मालिका पाहू नयेत.
या सगळ्या मालिका बघून माझं असं मत झालं आहे की, मराठीत विषयाचं वैविध्य नाही. स्त्रिया मुख्य प्रेक्षक असल्याचं गृहीत धरल्याने अनेकदा अतिशयोक्ती दाखवतात. मात्र मालिका बघणं हा आता कौटुंबिक कार्यक्रम झाला आहे. दीड-दोन तास टीव्ही पाहते.
जया निकम, गृहिणी
मी ‘होणार सून मी ह्य़ा घरची’, ‘मला सासू हवी’, ‘एकापेक्षा एक’ या मालिका बघते, कारण मला सर्व कौटुंबिक मालिका आवडतात. ईटीव्हीवरील ‘माझे मन तुझे झाले’ ही मालिकासुद्धा छान आहे. ‘होणार सून मी ह्य़ा घरची’- त्यातील जान्हवी व श्रीची जोडी आवडते. ‘तू तिथे मी’- मंजिरी हे नावडतं पात्र, आजूबाजूचं जग इतकं पुढारलेलं असताना मंजिरी इतरी बावळट कशी असू शकते याचं आश्चर्य वाटत नाही, तर तिचा राग येतो. ‘मला सासू हवी’मधील कॅश व अभिलाषा ही पात्रं फार नाटकी वाटतात.
नोकरीवरून घरातील इतर सदस्य दमून येतात. त्यांना घरातल्या बाईशी बोलायला वेळ नसतो. मुलं संगणकावर किंवा मोबाइलवर बिझी असतात. त्यांना माझ्याशी गप्पागोष्टी करण्यासाठी वेळ नसतो किंवा शक्य नसतं. पती कामावरून आले की त्यांच्यासह थोडा विरंगुळा म्हणून मालिका बघते. हेच माझं विश्व आहे, माझी सोबत आहे.
मालिकांमधील नातेसंबंध वा प्रश्न यांच्याशी मी रिलेट करू शकते. नक्कीच. मंजिरीच्या मालिकेतील चिन्मय मांडलेकरची व्यक्तिरेखा जशी आहे, तशी माणसं, म्हणजे घरी बायको असून- तिच्याशी संसार सुखाचा सुरू असतानाही विवाहबाह्य़ संबंध ठेवणारे लोक माझ्या परिचयाचे आहेत. विशेष म्हणजे या संबंधातील स्त्रियाही फारशी अपराधीपणाची भावना बाळगत नाहीत. म्हणून माझं ठाम मत आहे जे आजूबाजूला घडतं तेच मालिकांमध्ये दाखवलं जातं.
मालिकेतील घरं, सजावट, त्यांचे कपडे, दागिने हे सारं मी फार काळजीपूर्वक पाहते. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय गृहिणींचा हा वीक पॉइंट आहे. मी साडय़ा बघते, त्या नेसण्याची पद्धत, ज्वेलरी कशी घातली आहे, हेअरस्टाइल सगळं बघते व जमेल तेवढं फॉलो करते.
कधीकधी गुगलिंग करूनपण याची अधिक माहिती काढते. यामुळे आपल्या राहणीमानात आपण साजेसा बदल करू शकतो.
मला वाटतं, मालिका पाहणं हे माझं विश्व आहे. रोज शेजारीपाजारी बायकांशी जाऊन गप्पा मारण्यापेक्षा मला घरी टीव्हीवरच्या मालिका बघायला आवडतात. त्यातून मला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. संसारात काही वर्षांनी येणारा तोचतोचपणा मालिकांतील अतिरंजित चित्रणामुळे सुसह्य़ होतो, असं वाटतं.
ऐश्वर्या जोगळेकर
मजेदार विरंगुळा म्हणून मालिका पाहाव्यात या मताची मी आहे. त्यातून प्रबोधन वगैरेचा विचार अजिबात नसतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे रिअल लाइफ स्टोरीचा अंतभार्व खूप मालिकांमध्ये दिसत नाही. किंबहुना नसतोच. एक मात्र नक्की की प्रोमोमधून खूप सुंदर चित्र उभं केलं जातं. नंतर मालिका उगाच लांबविली जाते. तेव्हा पाहणं टाळलं जातं. एका लग्नाची तिसरी गोष्ट, होणार सून मी.. या मालिका काही प्रमाणात रिअल लाइफशी जुळतात. जान्हवी, तिचे वडील ही पात्रं आवडतात.
बऱ्याच मालिकांमध्ये खूप हाय फाय वातावरण उभं केलं जातं. प्रत्यक्षात असं कमी दिसतं. पण अशा वातावरणाची कल्पना करायला काय हरकत आहे. लॉटरी लागली तर काय करणार अशी कल्पना करतोच ना, त्याचप्रमाणे. मालिकांमधील कपडे, फॅशनचा परिणाम बाजारात दिसतो. चॉइस करायला सोपं जातं. पण अशा मालिका संबंधित उत्पादनं महागदेखील असतात.
ज्योत्स्ना तासकर, केटरिंग व्यवसाय
मी मालिका टाइमपास म्हणून अजिबात बघत नाही. त्यातल्या काही गोष्टी पाहण्यासारख्या असतात. अशा मालिकांमधून कळतं की लोक कशी कटकारस्थानं करतात. पण त्यातले प्रश्न मी स्वत:च्या आयुष्याशी कधीच जोडले नाहीत, कारण मला तसं करणं चुकीचं वाटतं. मी मालिकेतल्या व्यक्तिरेखा समाजात पाहिल्या आहेत. मलिका बघून विषय डोक्यात ठेवणं माझ्या स्वभावातच नाही आणि विचार करून आणि विषय डोक्यात ठेवून काहीच फायदा नाही, म्हणून मी डोक्यात ठेवत नाही. खरं सांगायचं झालं तर इतका वेळ पण नाही.
सध्या ‘होणार सून मी’ ही कौटुंबिक मालिका असल्यामुळे खूप आवडते. लहान मुलांनी कौटुंबिक मालिका बघाव्यात. त्या मालिकेतला श्री मला फार आवडतो. त्याचं घरातलं वागणं, त्याचे संस्कार, समजूतदारपणा आणि तो एक आदर्श मुलगा आहे. माझी आवडती मालिका एकच असल्यामुळे बाकीच्या मालिका मी बघत नाही. ‘होणार सून’मधील अनिल आपटे हा माणूस मला नाही आवडत. पण मालिका चांगली आहे तर बघायला हरकत काय.. रोज मी त्या मालिकेची वाट पाहते. पुढे काय होणार याचे कुतूहल असतं. मालिकेतल्या इतर गोष्टींकडेही माझं लक्ष असतं, पण त्यांना फॉलो करायला नाही आवडत.
क्षितिजा मुर्ताडक, गृहिणी
मी मराठीत ‘होणार सून मी ह्य़ा घरची’, ‘एकापेक्षा एक’ डान्स रियॅलिटी शो बघते, तर हिंदीत ‘बिग बॉस’, ‘महादेव’, ‘जोधा अकबर’ बघते. ईटीव्हीवरची – ‘मेजवानी’, ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, स्टार प्रवाहवरची ‘पुढचं पाऊल’ याही मालिका बघते. त्यात मला ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ आवडते.
‘होणार सून मी ह्य़ा घरची’ – त्यातील जान्हवी आवडते. या मालिकेत कोणतंही राजकारण नाही. सगळ्याच महिलांना थोडं-फार अॅडजस्ट करूनच घर चालवावं लागतं, त्याचं चित्रण त्यात आहे. नाटकीपणा, भपकेबाजपणा नाही. मला वाटतं, सगळ्या जणींना आयुष्यात या टप्प्यांवरून जावं लागतं. कुठे तरी त्या हे रिलेट करत असणार. त्यामुळे मालिका इतकी लोकप्रिय आहे.
मला अजिबात न आवडणारी मालिका म्हणजे ‘तू तिथे मी’. मंजिरी व प्रिया ही माझी नावडती पात्रे आहेत. मंजिरीचा नवरा व्यभिचारी असून तिला याचा संशयसुद्धा येत नाही, ही बाब खटकते. मुलींनी किती प्रगती केली आहे आणि ही मंजिरी कुठल्या जगात जगते, असा प्रश्न पडतो. कृपया ही मालिका बंद करण्याचा निरोप संबंधितांकडे पोहोचवा. तर प्रिया ही इतकी बावळट मुलगी वाटते, की तिच्यामुळे मुली उथळ असतात, असा संदेश नकळतपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
नोकरीवरून सगळे दमून येतात. त्यामुळे थोडं रिलॅक्सेशन हवं असतं, तर गृहिणींचे आयुष्य इतके साचेबद्ध असते की त्यांना मालिकांच्या निमित्ताने थोडा चेंज मिळतो आणि त्यांच्याही नकळत महिला मालिका बघण्यात व्यसनाधीन होतात.
रोज मुलांना नवीन गोष्टी कुठून सांगायच्या म्हणून आपण जसं लहान मुलांना गोष्टी बनवून सांगतो तसं हे मालिकावाले मोठय़ांना गोष्टी बनवून सांगतात आणि गोष्टी सगळ्यांनाच आवडतात. म्हणून मालिका लोकप्रिय होतात, असं वाटतं.
मालिकांमधील नातेसंबंध वा प्रश्न यांच्याशी मी रिलेट करते. नक्कीच. जान्हवी माझी रोल मॉडेल आहे. माझंही नुकतंच लग्न झालंय. सो मी तिला फॉलो करते. जे आजूबाजूला घडतं तेच मालिकांमध्ये दाखवलं जातं यावर माझा विश्वास आहे.
अशा कारस्थानी व्यक्तिरेखा आजूबाजूच्या समाजात नक्कीच सापडतात. आता जगणंच इतकं अस्थिर झालं आहे की, अशी माणसं आत्मकेंद्री, स्वार्थी झाली आहेत.
मालिका बघून झाल्यावर त्याचा भुंगा डोक्यात राहतो- नक्कीच राहतो. तो दिवस तरी विषय डोक्यात असतो. त्यामुळे मला नेहमीच उद्याच्या भागाची उत्सुकता वाटते.
मालिकेतील घरं, सजावट, त्यांचे कपडे, दागिने हे सारं मी फार काळजीपूर्वक पाहते. मध्यमवर्गीय गृहिणींचा हा वीक पॉइंट आहे. मी साडय़ा बघते, त्या नेसण्याची पद्धत, ज्वेलरी कशी घातली आहे, हेअरस्टाइल सगळं बघते व जमेल तेवढं फॉलो करते.
मालिकांमधून नातेसंबंधाचं खरंखुरं दर्शन नक्कीच होतं. मनोरंजनासाठी काही प्रमाणात मालिकांमध्ये भपकेबाजपणा असतो, पण नात्यांची उसवणारी वीण हा सार्वत्रिक विषय झाला आहे. आता कुटुंबं लहान झाली असूनही कुटुंबांत शांतता नाही.
मुलांनी ‘मास्टरशेफ’ ही मालिका आवर्जून बघावी. बाकी कार्टून्स छान आहेत. इतर कौटुंबिक मालिका अजिबात बघू नयेत. त्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम होण्याचाच संभव जास्त आहे.
मी साडय़ा वगैरे फॉलो करत नाही, पण जान्हवी कशी सगळ्यांना समजून घेते, तिच्यातली सहनशक्ती मला खूप आवडते. म्हणून मी तसं वागण्याचा प्रयत्न करते. माझा राग नियंत्रणात ठेवण्यासाठी राग आल्यावर तिचा हसतमुख चेहरा मी मनोमन आठवते.
वासंती वैद्य, गृहिणी, ४५
होणार सून मी ह्य़ा घरची ही माझी आवडती मालिका आहे आणि त्यातील श्री हे आवडते पात्र आहे. मालिकेमध्ये काय होणार याचा विचार सतत डोक्यात राहतो. त्यामधील जान्हवीशी तिच्या सासवा कशा वागतील असे प्रश्न पडत राहतात. सून तरुण आहे पण तरीही समंजस आहे. एकत्र कुटुंब पद्धती आहे. मध्यमवर्गीय कुटुंब दाखवले आहे. त्यामुळे मालिका अधिक जवळची वाटते. त्यामधील प्रसंग आपल्या आयुष्यात घडून गेलेले असतात. मालिकेमध्ये नायकाला पाच आया दाखवल्या आहेत, पण खऱ्या आयुष्यात असं नसतं त्यामुळे हे जरा अति वाटतं. पण तरीही मालिका जरा वेगळी असल्यामुळेच बघायला मजा येते.
विदुला रानडे
अगदी खरं सांगायचं तर मी फारशा मालिका पाहत नाही. पण नाही म्हणायला ‘कॉमेडी एक्सप्रेस’सारखे हास्यप्रधान कार्यक्रम पाहायला मला आवडतं. हे कार्यक्रम हा त्या दिवशीपुरते असतात. त्यात आपण अडकून पडत नाही. तसं मालिकांचं होत नाही. एक दिवस मालिका पाहिली की दुसऱ्या दिवशी त्यात काय होणार अशी उत्सुकता निर्माण होते आणि मग आपण ती मालिका सातत्याने पाहायला लागतो. मालिकांची सतत होणारी जाहिरात यामधून त्या मालिकेचा ट्रेंड कळतो.
सध्या ‘होणार सून मी त्या घरची’ आणि ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकांचा बराच बोलबाला आहे. मी त्या मालिका पाहत नाही पण वृत्तपत्रांमधून त्याविषयी येणाऱ्या बातम्या, वृत्तवाहिन्यांवरून दाखवल्या जाणाऱ्या बातम्यांमधून त्या मालिकांमधील पात्रांच्या मुलाखती यावरून आणि एकूणच या मालिकांवर आपापसात होणाऱ्या चर्चा यामुळे या मालिका बऱ्याच लोकप्रिय असल्याचे जाणवते.
अधूनमधून मी ‘कॉमेडी एक्सप्रेस’ पाहते. पण त्यातही सादर करण्यात आलेले सगळेच विनोद फार दर्जेदार असतात असं नाही. कधी कधी त्यांचा दर्जा अत्यंत सुमार असतो, अंगविक्षेप आणि कमरेखालचे विनोदही केले जातात त्यावर निर्माते, दिग्दर्शक आणि संबंधित वाहिन्यांचे अधिकारी यांनी नियंत्रण ठेवणं अपेक्षित आहे असं वाटतं.
उन्मेषा कीर्तने
‘होणार सून मी त्या घरची’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिका पाहते. अर्थात या मालिका जेव्हा प्रसारित होतात ती वेळ कामाची असल्याने टीव्हीसमोर ठिय्या देऊन पाहिल्या जात नाहीत. पण काम करता करता ऐकल्या आणि अधूनमधून पाहिल्या जातात.
या मालिकांमधील पात्रांमध्ये दाखवलेला मोकळेपणा, एकमेकांवर असलेला विश्वास आणि समोरच्याला समजून घेण्याचा असलेला त्यांचा गुण या गोष्टी आपल्या आयुष्यात असाव्यात असं प्रत्येकाला वाटत असतं. पण प्रत्येकाच्या बाबतीत हे होतंच असं नाही त्यामुळे किमान मालिकांमध्ये हे पाहून आपण समाधान मानू लागतो आणि त्या व्यक्तिरेखा खऱ्या नाहीत हे माहिती असूनही त्यातील व्यक्तिरेखांशी, त्यांच्या दु:खांशी समरस होऊन जातो.
‘होणार सून..’ आणि ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिका मी पाहत असले तरी अनेकदा त्यांतील वातावरण ‘आपलं’ वाटत नाही. उलट ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेत जे कुटुंब दाखवलं होतं ते आपलं वाटायचं. या गोष्टी सोडल्या तर या दोन्ही मालिकांमधील कथानक सशक्त आहे. त्यामुळे या मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्या आहेत. अर्थात नवीन मालिका जेव्हा सुरू होते तेव्हा हे वातावरण असंच असतं पण जेव्हा या मालिका लांबत जातात तेव्हा मात्र त्या आवडेनाशा होतात. मालिका पाहाविशी वाटत असताना ती संपवण्यातच खरी मजा आहे हे ‘प्रपंच’, ‘आनंदवन’, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘गुंतता हृदय हे’ या मालिकांच्या उदाहरणांवरून निश्चितपणे सांगता येतं.
‘तू तिथं मी’सारखी मालिका अत्यंत बोगस आणि कंटाळवाणी अशी आहे. अशा मालिका वाहिन्यांवरून केवळ टीआरपीच्या गणितांसाठीच प्रसारित केल्या जातात. पण त्यात जे काही दाखवलं आहे ते अत्यंत उद्वेगजनक आणि संतापजनक असंच आहे. चिन्मय मांडलेककर यांच्यासारख्या संवेदनशील कलाकार, लेखकाने अशा प्रकारे काम का करावं असा प्रश्न मनात येतो. तीच गोष्ट ‘मला सासू हवी’ या मालिकेची. या मालिकेतील सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम आहे. या मालिकेच्या सुरुवातीला कथानक चांगल्या पद्धतीने सादर केलं गेले होते पण आता त्यात इतकं पाणी घातलं गेलं आहे की त्यातून दिग्दर्शक आणि लेखकाला नेमकं प्रेक्षकांना काय सांगायचं आहे हेच कळेनासं झालं आहे.
‘उंच माझा झोका गं’सारखी प्रबोधनात्मक मालिका आणि ‘तू तिथं मी’सारखी तद्दन टुकार मालिका या दोन्ही मालिका एकाच वाहिनीवरून प्रसारित केली जाते. या दोन्ही मालिकांमध्ये दाखवलेली स्त्रीची दोन रूपं दाखवली आहेत. अशा वेळी वाहिन्यांची स्वत:ची अशी काहीच भूमिका नसते का, असाही प्रश्न मनात येतो. की हे सारं केवळ टीआरपीच्या गणितासाठी केलं जातं.
हिंदी मालिकांबाबत सांगायचं झालं तर त्यामध्ये तोच तोपणा आला आहे. मालिकांच्या कथानकात फारसा दम नसल्याने त्या मालिका मनाचा ठाव घेत नाहीत. सुरुवातीला ‘बालिकावधू’ ही मालिका पाहायचे पण आता ती मालिका लांबत चालल्याने अतिशय कंटाळवाणी झाली आहे, म्हणून पाहणं बंद केलं आहे.
आरती शिवलकर, शिक्षिका
मला मालिकेतले डायलॉग आणि एकत्र कुटुंब पद्धती बघायला फार मजा येते. माझी स्वत:ची जॉइंट फॅमिली नाही आणि मला मालिकेच्या माध्यमातून एखादी फॅमिली एकत्र राहाते हे पाहून फार आनंद होतो. कधी कधी त्या मालिका बघून जीवनातल्या नातेसंबंधांचं दर्शनही होतं. मालिकांमधल्या प्रश्नांना मी स्वत:च्या आयुष्याशी रिलेट करते. मालिकांमधले विषय कधी कधी माझ्या डोक्यात राहतात. मालिकांमधल्या व्यक्तिरेखा मी समाजात नाही पाहिल्या. मला ३ मालिका आवडतात ‘पवित्र रिश्ता’, ‘कुबुल है’ आणि ‘होणार सून मी ह्य़ा घरची’, कारण त्या कौटुंबिक मालिका आहेत. त्यातले रिलेशन्स सुंदर पद्धतीने जपतात हे बघायला आवडतं. ‘होणार सून मी ह्य़ा घरची’मधली जान्हवी फार आवडते, कारण तिचा इनोसन्स, तिची विचारसरणी, त्यामुळे ती खूप सुंदर वाटते. ‘तू तिथे मी’ ही मालिका नाही आवडत आणि नावडतं पात्र सांगायचं झालं तर ‘कुबुल है’मधला तनवीर आणि ‘होणार सून मी ह्य़ा घरची’मधला अनिल आपटे नाही आवडत. तरीही मी ती मालिका बघते, कारण त्याच मालिकेतू कुटुंबातलं प्रेम बघायला मिळतं. हो.. आजचा भाग संपला की उद्याच्या भागात काय होणार याची उत्सुकता असते. घरातल्या प्रत्येक गोष्टीकडे माझं तितकंच लक्ष असतं- मालिकांमधल्या पात्रांवर आणि डायलॉगवर, पण मी त्या गोष्टींना फॉलो करत नाही. मला असं वाटतं मुलांनी कौटुंबिक मालिका बघाव्यात आणि ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ ही छान कौटुंबिक मालिका आहे.
प्रतीक्षा मयेकर, गृहिणी
‘उंच माझा झोका’सारख्या मालिकांतून आपल्याला शिकायला मिळतं. बाकीच्या मालिकांमधून छान टाइमपास होतो. मी कधीच मालिकेला स्वत:च्या आयुष्याशी रिलेट केलं नाही. पण मालिकेत दाखवलेल्या व्यक्तिरेखा आजूबाजूला दिसतात. मालिकेतून जीवनातल्या नातेसंबंधांचं दर्शन मला कधीचं झाल नाही. त्यांचे विषयही मी कधी डोक्यात ठेवले नाहीत ते तेवढय़ापुरतचं असतं. सध्याच्या मालिकेतली ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका मला फार आवडते. ही मालिका सध्या खूप छान चालली आहे. त्या मालिकेतल्या अभिनेत्रीचं म्हणजेचं जान्हवीचा संघर्ष पाहून फार वाईट वाटतं. विश्वास नाही बसत की इतक वाईटही कोणाबरोबर होऊ शकतं. याच मालिकेतला ‘श्री’ आवडते. त्याची वागण्या-बोलण्याची पद्धत, त्याचे संस्कार हे सारे भावते. तो सर्व बायकांबरोबर खूप छान आदराने बालतो. घरात एक आणि बाहेर एक अशी व्यक्ती नाही.
‘तू तिथे मी’ अजिबात नाही आवडत आणि चिन्मय मांडलेकरसुद्धा. त्या मालिकेत फारचं हेवेदावे दाखवतात, पण करमणूक होते म्हणून पाहते. काहीच ठरावीक मालिका आहेत ज्यांच्या बाबतीत मला असं वाटतं की आजचा भाग संपला की उद्या काय याची उत्सुकता मला असते. मालिकेतल्या साडय़ा आणि ड्रेस यावर माझं लक्ष असतं, पण मी फॉलो करत नाही.
प्रीती रानडे
असिस्टंट सिक्युरिटी मॅनेजर, इंडिगो एअरपोर्ट
मी मालिका करमणुकीसाठी बघते, त्यातून शिकायला मिळत असं काही नाही पण चांगलं काही असेल तर घ्यायचं नाही तर सोडून द्यायचं. अशा मालिका बघून वेळ चांगला जातो. ‘होणार सून मी ह्य़ा घरची’, ‘बालिका वधू’ आणि ‘मला सासू हवी’ ह्य़ा मालिका मला आवडतात कारण त्या छान मनोरंजन करतात.
‘बालिका वधू’ आवडण्याचे कारण म्हणजे त्यातले संदेश फार छान असतात. त्यातून शिकायला मिळतं. मी मालिका करमणुकीसाठी बघत असल्याने मी त्यातल्या प्रश्नांना स्वत:शी रिलेट करण्याचा प्रश्नच येत नाही आणि मी इतकी गुंतून मालिका बघत नाही की ज्यामुळे आजूबाजूचे लोक तसेच दिसतील. एंटरटेनमेंट हे माझं मुख्य ध्येय असल्याने आवडतं पात्र किंवा नावडतं पात्र असण्याचा संबंधच येत नाही.
‘पवित्र रिश्ता’ ही मालिका मला अजिबात आवडत नाही आणि एखादं पात्र आवडलं नाही तरी ती मी मालिका बघते, याचं कारण करमणूक आणि फक्त करमणूक. बऱ्याचदा काही काही मालिकांच्या बाबतीत असं होतं की आजचा भाग संपल्यावर उद्या काय होणार याची उत्सुकता असते पण विषय कुठलेही डोक्यात ठेवत नाही. मालिकेतल्या इतर गोष्टींकडे फार काही लक्ष नसतं. जर एखादी छान गोष्ट असेल तर आपोआपचं लक्ष जातं. पण मी त्यांचे कपडे बघून मी त्यांना कधीचं फॉलो केलं नाही, बिकॉज आय मेड माय ओन फॅशन.
माधुरी मुसळे, शिक्षिका
मी मालिका टाइमपास म्हणून बघते, पण काही काही मालिकांतून शिकायला मिळतं आणि काहीतून नाही. मालिकांमधून चांगलं आहे ते घ्यायचं, वाईट असेल तर सोडून द्यायचं; पण लहान मुलांनी मालिका बघण्यापेक्षा ‘फूबाई फू’सारखे कार्यक्रम बघावेत. मी माझ्या मुलीला ‘फूबाई फू’ बघायला लावते. मी मालिकेचे ५ ते ६ सुरुवातीचे एपिसोड बघून अंदाज घेते कीमालिका कशी आहे आणि मग ठरवते की, ती मालिका बघायची की नाही. मालिकेत उद्या काय होणार याचा विचार मी करत नाही आणि मालिकेत मी इन्वॉल्व्हपण नाही होत. मालिकेतल्या व्यक्तिरेखा मला कधी कधी बाहेर बघायला मिळतात, पण मालिकांपेक्षा ‘कॉमेडी एक्सप्रेस’, ‘फूबाई फू’ आणि ‘ग्रेट भेट’सारखे कार्यक्रम मला आवडतात.
मला ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ या मालिकेतला श्री फार आवडतो, कारण तो फार प्रामाणिक आहे. स्त्रियांचा मान ठेवतो आणि मला असं वाटतं की, त्याचे विचार त्याच्या चेहऱ्याशी तंतोतंत जुळतात. मला ‘कुंकु’ आणि ‘तू तिथे मी’ या मालिका अजिबात नाही आवडत. त्या मालिकेतले मृणाल दुसानीस आणि चिन्मय मांडलेकरही नाही आवडत. मालिकातल्या इतर गोष्टींकडेही माझं तितकंच लक्ष असतं. खास करून ज्वेलरी आणि साडय़ा. मला वाटतं त्यातूनच आपल्याला ट्रेन्ड कळतो आणि मी जान्हवीची ड्रेस स्टाइल फॉलो करते.
प्रांजली नाचणे, केटरिंग बिझनेस
मी मालिका फक्त टाइमपास म्हणून बघते. आणि आजकालच्या मालिकांमधून काही शिकायला मिळतं, असं मला वाटत नाही. ना अशा व्यक्तिरेखा मी कुठे पाहिल्यात ना मी कधी माझ्या आयुष्याशी त्यातल्या गोष्टी रिलेट केल्यात. कारण अशा इतक्या वाईट वागणाऱ्या व्यक्तिरेखा असणं शक्यच नाही. इतकं वाईट कोणी नसतंच. पण कधी कधी मालिकेत असं काहीतरी दाखवतात की त्यांचा विषय डोक्यात राहतो. आत्ताची सगळ्यात आवडती मालिका म्हणजे ‘होणार सून मी हय़ा घरची’ कारण त्यात एकत्र कुटुंबपद्धती आहे. त्या मालिकेतलं श्रीचं व्यक्तिमत्त्व मला फार आवडतं. तो स्त्रियांना मान देतो, दुखवत नाही म्हणून तो खूप आवडतो. त्या मालिकेतला खलनायक अनिल आपटे मला नाही आवडत. पण त्यामुळे मी ती मालिका बघणं बंद करावं असं मला वाटत नाही कारण त्या मालिकेतल्या इतर व्यक्ती चांगल्या आहेत. मला असं वाटतं की लहान मुलांनी ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ सारख्या कौटुंबिक मालिका बघितल्या तर हरकत नाही.
स्त्रियांच्या साडय़ा, दागिने आणि घर, घराची सजावट हय़ावर माझं खूप लक्ष असतं आणि मी क्वचित फॉलोपण करते. काही मालिका अशा आहेत की मी ज्यांची आवर्जून वाट पाहत असते. पण मालिका बघून जीवनातल्या नातेसंबंधांचं दर्शन मला तरी होत नाही.
कविता गावकर, गृहिणी
मलिका ही मी टाइमपास म्हणून बघत असली तरीही कधी कधी त्यातून शिकायला मिळतं. मी चांगलं असेल तर घेते, वाईट असेल तर सोडून देते; पण त्यातले प्रश्न मी स्वत:च्या आयुष्याशी कधीच जोडले नाहीत. मी मलिकेतल्या व्यक्तिरेखा पाहिल्या आहेत आणि फार गमतीशीर वाटतं जेव्हा तंतोतंत तशाच व्यक्तिरेखा आपण समाजात पाहतो. या मालिकांमधून वेळ खूप सुंदर जातो, पण यांचे विषय डोक्यात कधीच राहात नाहीत. मालिका लहान मुलांनी बघू नयेत असं माझं मत आहे. सध्या जेवढय़ा मालिका आहेत त्यातली सगळ्यात आवडती मालिका म्हणजे ‘होणार सून मी ह्य़ा घरची’. ही मालिका खूप आवडते, कारण त्यातला प्रत्येकाचा डायलॉग खूप छान आहे. तशीच ती कौटुंबिक मालिका आहे. त्या मालिकेतला श्री मला खूप आवडतो, कारण तो सगळ्यांना समजून घेतो आणि त्याचबरोबर स्त्रियांना मान देतो. मला ‘स्वप्नांच्या पलीकडे’ ही मालिका नाही आवडत आणि त्यातला श्रेयसपण नाही आवडत. त्यामुळे ती मालिका बघतच नाही.
काही काही मालिका मला इतक्या आवडतात, कीमी त्या न चुकता बघते आणि मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता मला असते. मालिकेतल्या प्रत्येक गोष्टीकडे माझं तितकंच लक्ष असतं आणि कधी कधी मी त्यातल्या गोष्टींना फॉलोपण करते. या मालिका बघून जीवनातल्या नातेसंबंधांचं दर्शन होत नाही.
विजया गावकर, मनसे शाखा अध्यक्ष, पाचपाखाडी ठाणे</strong>
फावल्या वेळात टाइमपास म्हणून मालिका बघायला आवडतात. त्यांचा विषय कधी कधी डोक्यात राहतो. मालिकांमधल्या व्यक्तिरेखा मला आसपास बघायला मिळाल्या आहेत. मालिकेतले प्रश्न स्वत:च्या आयुष्याशी कधीच रिलेट केले नाहीत, कारण तितका वेळच नसतो. मला मालिका बघून जीवनातल्या नातेसेबंधांचं दर्शन मात्र होतं. सध्याच्या मालिकांमधली ‘होणार सून’ ही मालिका फार आवडते, कारण ती कौटुंबिक आहे. त्यातील श्रीचं व्यक्तिमत्त्व, त्याची आईला-सहकाऱ्यांना समजून घेण्याची पद्धत आवडते. पण अनिल आपटे मला नाही आवडत. तो आला की माझं डोकं फिरतं. ‘पुढचं पाऊल’ ही मालिका मला अजिबात आवडत नाही, पण ती मालिका मनोरंजनासाठी उत्तम आहे, म्हणून पाहते. मालिकेतील घरातली सजावट, स्त्रियांच्या साडय़ा याकडे खूप जास्त लक्ष असतं. खास करून दागिन्यांकडे आणि त्यानुसार दागिने बनवतेदेखील. माझ्या मते मुलांनी मालिका आणि प्रेम प्रकरणं बघण्यापेक्षा काटरून्स बघावीत.
रोहिणी फडणीस
मी मालिका बघण्यामागचा मनोरंजन हा महत्वाचा मुद्दा असतो. गोष्टीरूप काही तरी बघायला मिळतं
आणि मनोरंजन होतं. आणि महत्त्वाचं सांगायचं झालं तर मालिकांमधल्या २५% बऱ्याचशा गोष्टी कुठे तरी घडलेल्या असतात, त्याच ते दाखवतात आणि त्यात काल्पनिक गोष्टी घालून रंगवतातही. आपल्याला सगळ्याच गोष्टींवरून शिकायला नाही मिळत पण तरीही मालिकांतली एखादी गोष्ट चांगली वाटली तर ती घ्यायची नाही तर सोडून द्यायची. कधी कधी मालिका बघून नातेसंबंधांचं दर्शन होतं.
मला वाटतं मालिका फक्त मनोरंजनापुरत्या बघाव्यात आणि त्याचा संबंध स्वत:च्या आयुष्याशी जोडू नये. मालिकांमध्ये ज्या व्यक्तिरेखा दाखवतात अशा व्यक्तिरेखा मी आसपास नाही बघितल्या आणि त्यांचे विषय डोक्यातही ठेवत नाही. कारण मनोरंजन हा महत्त्वाचा मुद्दा असल्याकारणाने नाही आवडला विषय तर वेगळ चॅनल बघायचं. कारण आजकाल टी.व्ही. वर बऱ्याच मालिका लागतात. एक नाही तर दुसरी मालिका बघायची.
सध्या मला ‘होणार सून मी हय़ा घरची’ आणि ‘तू तिथे मी’ ह्य़ा मालिका फार आवडतात.
मालिकेचं कथानक आणि सगळ्यांचं काम फार छान आहे. तसचं ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ या मालिकेतली रोहिणी हट्टंगडी यांची भूमिका मला फार आवडली, कारण आजी म्हणून जशी भूमिका करायला हवी तशी तंतोतंत भूमिका त्यांनी केली आहे. मी मनोरंजनापुरत्या मालिका बघत असल्याकारणाने अमुक एक मालिका मला आवडते की नाही याचा प्रश्नच येत नाही. माझ्या मते मालिकेमधलं प्रत्येक व्यक्तिमत्त्व हे ज्याच्या त्याच्या ठिकाणी बरोबर आहे. पण अगदीच सांगायचं झालं तर खलनायिका जान्हवीची आई मला आवडत नाही. एखाद्या मालिकेतलं मला एखादं व्यक्तिमत्त्व मला आवडलं नाही
तरीही मनोरंजन हेच माझं ध्येय असल्याकारणाने मला फारसा फरक पडत नाही. काही मालिका इतक्या सुंदर आहेत की त्यांची मी वाट पाहते. मालिकांमधल्या बऱ्याचशा गोष्टींकडे माझं लक्ष असतं पण मी त्या फॉलो करीत नाही. माझ्या मते मुलांनी घरगुती मालिका बघाव्यात.
श्रद्धा जोशी, गृहिणी
मी मालिका फक्त टाइमपास म्हणून बघते. या मालिकांतून कटकारस्थानं करू नयेत, बायकांवर अत्याचार करू नयेत हे शिकायला मिळतं. या मालिकांमधले प्रश्न कधी कधी माझ्या डोक्यात राहतात, पण मी ते प्रश्न स्वत:च्या आयुष्याशी कधीच रिलेट करत नाही आणि त्यातल्या व्यक्तिरेखाही मी कधी पाहिल्या नाहीत. मला मालिका बघून जीवनातल्या नातेसंबंधांचं दर्शन होतं.
मला ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ मालिका फार आवडते, कारण त्यातला श्री मला फार आवडतो. तो फार क्यूट आहे आणि त्याची भूमिका, त्याचे लूक्स आणि त्याचं मॅच्युअर्ड असणं याही गोष्टी आवडतात. मला ‘राधा ही बावरी’ ही मालिका अजिबात आवडत नाही आणि त्यातला सौरभ नाही आवडत आणि त्यामुळे मी ती मालिकाही बघत नाही. मात्र ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ या मालिकेची मी खूप वाट बघत असते. मालिकेतल्या सजावट आणि इतर गोष्टींकडे माझं १०% लक्ष असतं आणि मी फक्त जान्हवीचे ड्रेस फॉलो करते; पण माझं असं मत आहे की, लहान मुलांनी मालिका बघूच नयेत.
सुमन आयवळे, गृहिणी
मालिकांमध्ये सासू सुनेवर करत असलेले अत्याचार अतिशयोक्तीचे वाटतात. आपल्या आसपास अनेक घरांमध्ये सासू-सुनांमध्ये चांगलं अगदी मैत्रीचं वातावरण दिसतं. तर मालिकांमध्ये भडक नातं का दाखवतात?
वेळ घालवण्यासाठी इतर काही करायची तयारी नसते म्हणून…
टीव्हीवरील मालिका सतत बघणे यामागे एकप्रकारचा टाइमपास हाच हेतू असतो. डोळ्यासमोर चालू आहे ना मग पाहायचे हा विचार प्रभावी ठरतो. दुसऱ्याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे पाहणे हा एक मानवी स्वभाव आहे. मालिकांमधील वातावरणाचा प्रेक्षकांवर हमखास परिणाम होतो. आमच्याकडे येणाऱ्या काही व्यक्तींशी बोलताना मालिकांमधील वातावरणाचा परिणाम खूप मोठय़ा प्रमाणात झाल्याचे दिसून येते. मुख्यत: नातेसंबधांवर परिणाम होताना जाणवतो. नवरा-बायकोच्या संदर्भात बऱ्याच वेळा मालिकेतील वर्तणुकीच्या आधारे बायका बंडखोर भूमिका घेताना दिसतात. पण मालिकेतील परिस्थिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांचा फारसा विचार केला जात नसल्याचे दिसून येते. मालिकांमधील वातावरणाचा हा पॅसिव्ह अॅक्सेप्टनस् असल्याचे हे द्योतक आहे. हा प्रकार वयस्कर मंडळीमध्ये होत नाही. त्यांच्या दृष्टीने वेळ घालवण्याचे साधन असल्यामुळे फारसा फरक पडत नाही. मालिकांमधील या वातावरणामागे निर्मात्यांकडून माथी मारण्याचा प्रकार कारणीभूत आहे. आमच्या मते तुम्हाला हे आवडते असे म्हणून अशा मालिका बनविल्या जातात. अशा मालिका शंभर टक्के सर्वाकडून पाहिल्या जातात असे नाही. मात्र मालिका पाहून वेळ घालविणे ही सहजसाध्य गोष्ट आहे. इतर काही करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, ऊर्जा खर्च करावी लागते. तसे करण्याची सर्वाची तयारी नसते.
समाज मनात मालिकांचे ब्युटी ट्रेंड
अर्चना जोशी,
ब्युटिशियन, ओगलेवाडी-कराड
मालिकांमधील नायिकेच्या मेक-अप, पेहराव, हेअर स्टाईलचा प्रभाव अगदी छोटय़ा-छोटय़ा गावांतदेखील जाणवतो. ओगलेवाडी आणि कराड परिसरातील अनेक छोटय़ा गावांतूनदेखील लोकप्रिय पात्राप्रमाणे सजविण्याची आपणहून मागणी केली जाते. त्यामुळे त्यासाठी मालिका पाहणे होते. लग्नासंदर्भात बोलायचे तर सध्या जान्हवीची कॉपी होताना दिसते. त्याचे कारण म्हणजे तिचा मालिकेतील लूक हा सिंपल आहे, तो या सर्व वर्गाला सूट होतो. थोडक्यात काय तर सर्वसाधारण लोकांच्या पचनी पडेल असा लूक असेल तर त्याला आमच्या क्षेत्रात मागणी वाढते.
शिल्पा करडे,
ब्युटिशियन, बदलापूर
स्वत:चं ब्युटी पार्लर असल्याने बऱ्यापैकी माझा वेळ तिथेच जातो. त्या कारणामुळे मालिका फारशा पाहिल्या जात नाहीत. पण अलीकडच्या काळात काही मालिका मुद्दाम पाहू लागले आहे. निमित्त असं झालं की, माझ्या पार्लरमध्ये एक जण आली. तिला कुठे तरी कार्यक्रमाला जायचं होतं. त्यासाठी तिला हेअरस्टाइल आणि मेकअप करायचा होता. तिने मला ‘मला सासू हवी’ या मालिकेतील अभिलाषा या मालिकेतील व्यक्तिरेखा ज्याप्रमाणे मेकअप करते तसा आणि कॅशप्रमाणे हेअरस्टाइल करून हवी आहे, असं सांगितलं. वास्तविक माझा आणि मालिकांचा फारसा संबंध नव्हता. पण तिची मागणी नेमकी काय आहे हे मला कळावं यासाठी मी ती मालिका आवर्जून पाहिली. मलाही त्या दोन्ही व्यक्तिरेखांचा केलेला मेकअप आणि हेअरस्टाइल आवडली. त्यामुळे मला आवड नसली तरी सध्याचा फॅशन ट्रेंड जाणून घेण्यासाठी का होईना मी मालिका पाहू लागले आहे. या मालिकेमधील सर्व कलाकार उत्तम अभिनय करतात पण कथानकात काहीही दम नसल्याने ती मालिका बोअर करते.
आपलं आयुष्य आणि मालिकांमध्ये दाखवलेलं आयुष्य यांची कधीच तुलना होऊ शकत नाही. मालिकांमधील जग हे आभासी आहे हे आपल्याला माहिती असंत पण पार्लरमध्ये येणाऱ्या महिला प्रत्येक मालिकेची, त्यातील व्यक्तिरखांची, त्या मालिकांमध्ये दाखवणारी कटकारस्थाने, एकमेकांची उणीदुणी काढण्यात किती समरस होऊन जातात हे त्या करत असलेल्या चर्चामधून जाणवतं. मी मालिका पाहत नसले तरी या चर्चामधून मालिकांमध्ये काय काय चालतं याची इत्थंभूत माहिती मला मिळत असते. त्यावरून सध्या ‘होणार सून मी त्या घरची’ ही मालिका आणि त्यातील जान्हवी आणि श्री या व्यक्तिरेखा बऱ्याच लोकप्रिय झाल्या आहेत इतकं मात्र नक्की.
लूक बदललेला प्रेक्षकांना चालत नाही
या सीरिअलमध्ये दाखवल्या जाणाऱ्या साडय़ा, पंजाबी सूट्स, हेअरस्टाइल याबाबत तरुणींमध्ये प्रचंड आकर्षण आहे. कित्येकदा मालिकेत एखाद्या व्यक्तिरेखेने घातलेला ड्रेससारखा हुबेहूब ड्रेस शिवून मिळेल का यांच्या चौकशा तरुणींकडून केल्या जातात. ‘पवित्र रिश्ता’मध्ये अंकिता लोखंडेच्या व्यक्तिरेखेने घातलेल्या अनारकलीजना तुफान लोकप्रियता मिळाली होती. तसेच मालिकेतील मुख्य पात्राच्या लुकमध्ये जराही फरक झालेला प्रेक्षकांना चालत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तिरेखेचा लुक तसाच कायम राहिला पाहिजे, असं आम्हाला चॅनलकडून बजावलं गेलं.
स्मिता मोरे, स्टायलिस्ट, पवित्र रिश्ता, बालाजी टेलिफिल्मस्
(शब्दांकन- मृणाल भगत)
या पाहणीत मालिका बघण्याची लोकांकडून आलेली वेगवेगळी कारणे
घरबसल्या सोप्या पद्धतीने होणारे मनोरंजन, एकटेपणावर मात करणारी करमणूक, टीव्ही हाच सोबती, चांगला टाइमपास, वय झाल्यामुळे बाहेर गर्दीत जाता येत नाही- मग काय करायचे म्हणून टीव्ही बघते, एखादी जोडी बघायला आवडते म्हणून, मनोरंजनासाठी पुरुषांप्रमाणे उठून मुलं, घर सगळं बाजूला ठेवून बाहेर जाता येत नाही म्हणून, हिंदूीपेक्षा मराठी मालिका बऱ्या म्हणून, नवरा दमून येतो-बोलत नाही- मुलं त्यांच्या विश्वात- अशा वेळी डोकं रमवायला, कटकारस्थानं बघायला मजा येते, कपडे- मेकअप यांचा ट्रेंड कळतो, डायलॉग मजा आणतात, नवनवीन गोष्टी शिकता येतात, माणसं कशी वागू शकतात हे शिकायला मिळतं, आता पुढे काय दाखवणार याचं कुतूहल वाटतं, रोज नवीन काय दाखवणार हा प्रश्न पडतो म्हणून बघते, स्टोरी कशी डेव्हलप करत नेतात ते कळण्यासाठी बघते, कुठेतरी घडलेल्या पण आपल्यापर्यंत पोहोचू न शकणाऱ्या गोष्टी पडद्यावर बघायला मिळतात. कारस्थानी मालिकांमधली स्टुपिडिटी आवडते, त्यातून लेखकाची क्रिएटिव्हिटी कळते, रिलॅक्स होण्यासाठी मालिका बघते, फॉर अ चेंज म्हणून, माझ्या आयुष्यातल्या प्रश्नांशी रिलेट होता येतं म्हणून, मैत्रिणींबरोबर गॉसिप करण्यासाठी, मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये चर्चेत सहभागी होता यावं- आऊटकास्ट झाल्यासारखं वाटू नये यासाठी, जगाबरोबर राहण्यासाठी, नातेसंबंधांचं दर्शन होतं, कारस्थानं कशी केली जातात- ती करणारी माणसं कसा विचार करतात ते समजण्यासाठी, माणसं कशी वागू शकतात- कशी बदलू शकतात ते समजतं, माणसांचं वागणं दिसतं तसं नसतं हे टीव्हीमुळे समजतं, मालिकांमधून दाखवली जाणारी एकत्र कुटुंब पद्धती आवडते म्हणून, मराठी मालिका कौटुंबिक असतात- त्या तशा असतात हे आवडतं म्हणून बघते, टीव्ही हेच विश्व- दुसरं विश्व नाही म्हणून, शेजारीपाजारी जाऊन कुचाळक्या करण्यापेक्षा आपल्या घरात बसून टीव्ही बघणं केव्हाही चांगलं म्हणून, अनेक वर्षांच्या सहवासामुळे संसारात येणारा तोचतोपणा मालिकांमधील अतिरंजितपणामुळे सुस होतो म्हणून…
४० ते ६० वयोगट
सुनंदा जप्तीवाले, समाजसेवा
होणार सून मी ह्य़ा घरची आणि एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिका मी आवडीने बघते कारण त्यामध्ये मांडण्यात आलेले विषय नेहमीचेच नसून अगदीच नवीन आहेत. त्यामध्ये कोणताही कावेबाजपणा नसतो. अशा प्रकारच्या मालिका बघायला नको वाटतात. होणार सून.. मधील नायक आणि नायिकेचे विचारही आदर्श आहेत. कधीतरी स्वत:च्या आयुष्याबरोबर मालिकेतील घटनांशी तुलना होते त्यामुळे त्या अधिकच जवळच्या वाटतात. त्या त्या भागातील विषय कधी कधी डोक्यात राहतात. पुढील भागात काय होणार याची उत्सुकता राहते व डोक्यात तसा विचारही सुरू होतो. मालिका अतिरंजित असल्या तरी त्यामध्ये चांगल्या गोष्टी मांडण्यात आल्या आहेत. होणार सूनमधील श्री हे पात्र आवडते कारण तो सगळ्यांना समजून घेणारा आहे, तो सगळ्यांना आधारही देतो. पण तरीही आपल्या आयुष्यातील नातेसंबंधांचे दर्शन त्यामधून घडते असे म्हणता येणार नाही.
अश्विनी डोंगरे, गृहिणी
सासू-सुनांचं नातं, त्याचे वेगवेगळे पदर समोर येतात. कसं वागलं तर काय अर्थ निघू शकतो, हे उमगतं. सगळ्या मालिका काही छान आहेत असं मात्र वाटत नाहीत. रिलेट तर अजिबात सगळ्या होत नाहीत. काही मालिका निव्वळ मनोरंजन म्हणून बघते.
संगीता लागवणकर, घरकाम
माझी आवडती मालिका होणार सून मी ह्य़ा घरची आहे. जास्त विचार न करता केवळ करमणूक म्हणून मी ही मालिका बघते. ही मालिका बाकीच्या मालिकांसारखी नाही. आपल्या घरातलेच प्रसंग त्यामध्ये असतात त्यामुळेच मला ती आवडते. त्यामधील जान्हवी ही नायिका अतिशय संयमी, समजूतदार, सर्वाना समजून घेणारी आहे. तसेच सोशिकदेखील आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता मुली इतक्याही सोशिक नसतात. मालिकेच्या पुढील भागात काय होणार आहे याची उत्सुकता लागून राहते. मला सासू हवी, तू तिथे मी या मालिकांमध्ये अतिशय पाल्हाळ लावली आहे त्यामुळे त्या बघायला नाही आवडत. त्या वास्तववादी वाटत नाहीत. मुलांनी मालिकांमधून काही शिकावे असे काहीही त्यामध्ये असते असे मला वाटत नाही.
नूतन करंदीकर, गृहिणी
सीरियल्स बघायला मला आवडतात, पण केवळ मनोरंजन म्हणून. काही सीरियल्स अशा असतात की एक भाग पाहिला की पुढे काय होणार, ही उत्सुकता लागते. पण अशा क्वचितच असतात. सीरियल्समध्ये स्त्रियांच्या साडय़ा, त्यांचे दागिने, निरनिराळ्या हेअर स्टाइल्स हे बघायला आवडते. नवीन फॅशन यामुळे कळतात. मी गृहिणी असल्यामुळे घरबसल्या साडय़ांचे प्रकार, सुरू असलेला दागिन्यांचा ट्रेंड यासारख्या गोष्टी कळतात. त्याचप्रमाणे मालिकेत दाखवलेले घर, घरातील सजावट वगैरे गोष्टी समजतात. सध्या सुरू असलेल्या मालिकांपैकी ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका आवडते. त्यातील सरू हे पात्र जे लीना भागवतने साकारले आहे ते खूप आवडते. काही वेळेला मालिकांमधील पात्र किंवा घटना यांचे खऱ्या आयुष्याशी साधम्र्य असते, तेव्हा ते आपलेसे वाटते. प्रश्नोत्तरे असलेले रियालिटी शोज बघायला आवडतात. उदा. के.बी.सी. अशा प्रकारचे कार्यक्रम मुलांनीही बघावेत असे मला वाटते. यामुळे सामान्यज्ञान निश्चितच वाढते. ‘फू बाई फू’ ही मालिका आवडत नाही. त्यातील विनोद बऱ्याचदा माहीत असलेला व जुना असतो.
विदुला गीध, (नोकरी)
यांसारख्या मालिकांमधल्या कारस्थानी व्यक्ती काही अंशी का होईना आपल्या आयुष्यात असतात. प्रत्येकाला अशी माणसं भेटतीलच असं नाही. पण ज्यांना अशी कारस्थानी माणसं भेटतात त्या व्यक्ती अशा मालिका बघतात. कारण त्यांना अशा मालिका बघून दु:ख शेअर केल्यासारखं वाटतं. आपण या जगात एकटे नाही हे जाणून त्यांना थोडं मानसिक समाधान मिळतं. तसेच दुष्टांना नेहमी शिक्षा मिळते हे बघून थोडं बरं वाटतं. म्हणून लोक कारस्थानी व्यक्तिरेखा असलेल्या मालिका बघतात. मालिकांमधल्या काही घटनांना आपण आपल्या आयुष्याशी रिलेट करू शकतो. त्यातल्या काही अतिरंजक असतात, भडक असतात हे नक्की, पण बऱ्यापकी आपण रिलेट करू शकतो. अशा मालिका बघून आमच्यासारख्या वìकग वुमननां थोडं बरं वाटतं. घर आणि नोकरी सांभाळताना बऱ्यापकी स्ट्रेस येतो. या मालिका पाहून तो स्ट्रेस दूर होतो. मालिकांमध्ये जे दाखवलंय ते खोटं आहे माहीत असतं, तरी त्यांना पाहून बरं वाटतं. काही एपिसोड्स जेव्हा चांगले होतात तेव्हा पुढच्या एपिसोडमध्ये काय होईल याची उत्सुकता लागते. पण ते नेहमीच होते असे नाही.
आवडती मालिका- ‘होणार सून मी या घरची’.
आवडत्या व्यक्तिरेखा- श्री आणि जान्हवी, कारण त्यांचे विचार फार सुंदर आहेत. ते लोकांना समजून घेतात.
नावडत्या व्यक्तिरेखा- होणार सून मधली जान्हवीची आई व मामा.
नावडती मालिका- ‘मला सासू हवी’, कारण त्यात मेलोड्रामा आहे आणि ‘तुझं माझा जमेना’ हीसुद्धा नाही आवडली. त्यातलं रीमा लागूंचं कॅरेक्टर नकोसं वाटलेलं.
तसेच मालिकांमधल्या इतर गोष्टी आणि ट्रेंडवर लक्ष असतं. अगदी बारीक नसलं तरी काही निवडक गोष्टींवर असतं. काही व्यक्तींच्या कपडय़ांतली सिम्प्लीसिटी आवडते.
‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘होणार सून..’ यांसारख्या मालिका माझ्या मुलांनी पाहाव्यात अशी माझी इच्छा आहे. त्यात भडकपणा नसल्यामुळे चांगली मूल्य रुजवतात असा माझं मत आहे. यांसारख्या मालिकांतून नात्यांचे ज्ञान होते. कशी नाती नसावीत यापेक्षा कशी असावीत हे दाखवणाऱ्या मालिका मुलांनी पाहाव्यात.
प्रतिभा आचार्य
मनोरंजन या हेतूनंच मालिका बघते. काही मालिकांमधली पात्र रिअॅलिस्टिक वागतात. प्रत्यक्ष जीवनात वेळोवेळी अशी माणसं भेटत असतात. मालिकांमधली कारस्थानं मात्र प्रत्यक्ष घडत असतील असं वाटत नाही, पण ते बघताना मजा येते. टाइमपास होतो. रिअॅलिटी शो तरी किती खरे असतात कोण जाणे, त्यापेक्षा मालिका बऱ्या असं वाटतं. ‘होणार सून मी..’, ‘एका लग्नाची..’सारख्या मालिका खरोखर चांगल्या आहेत. रमाबाई रानडय़ांच्या जीवनावरची ‘उंच माझा झोका’सुद्धा आवर्जून पाहिली. नवी माहिती मिळाली, मनोरंजनही झालं. जुन्या काळात बायकांनी किती सोसलंय ते कळलं. त्यापेक्षा आपण आज सुखी आहोत, असं म्हणावंसं वाटलं.
आज चालू असलेल्या मालिकांपैकी आवडती मालिका- होणार सून मी.., एका लग्नाची.. त्यातली विसरभोळी सासू- लीना भागवत आवडते. एका लग्नाची.. मधली सगळीच पात्र छान आहेत.
सीता ढेबे
स्टार प्रवाहवरच्या सगळ्या मालिका आम्ही आवडीने बघतो. त्यामुळे छान मनोरंजन होते. देवयानी, स्वप्नांच्या पलीकडे, पुढचे पाऊल या मालिका चांगल्या मांडल्या आहेत. कारस्थान नसलेल्या मालिका मला जास्त आवडतात. पुढच्या भागात काय होईल याची उत्सुकता नक्की असते.
चंपा हत्तीकाळे, घरकाम
दोन-तीन महिन्यांपूर्वी संपलेली मालिका ‘उंच माझा झोका’ ही मला सर्वात जास्त आवडली. त्यातील लहानपणीची रमा म्हणजे तेजश्री वालावलकर हिचे काम खूप आवडले. जस्टिस रानडे म्हणजेच विक्रम गायकवाड यानेही काम मस्त केले आहे. तसेच आत्ता सुरू असलेली मालिका ‘तू तिथे मी’मधील मंजिरी साकारणारी मृणाल दुसानीस देखील आवडते. गोष्ट व डायलॉग्स्करिता मी मालिका बघते. हिंदीमधील ‘पवित्र रिश्ता’ तर स्टार प्रवाहवर ‘आंबट गोड’ या मालिकासुद्धा आवडतात. एखादी मालिका आवडली नाही तर लगेच बघायचे सोडते. मालिकांमध्ये जसे कटकारस्थान दाखवतात ते काही पटत नाही. खऱ्याखुऱ्या आयुष्यात असे थोडेच घडते. आजूबाजूला पण असे बघायला मिळत नाही.
डॉ. स्वाती मडव, प्राध्यापिका
पवित्र रिश्ता, बडे अच्छे लगते है, दिया और बाती, होणारं सून मी या घरची या सारख्या नातेसंबंधांवर आधारित मालिका बघायला मला आवडतात. काही मालिका मी अभिनयाकरता बघते तर काही कथेकरता. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका केवळ मनोरंजनाकरता पाहते. यातील लेखकाची विनोद बुद्धी व कलाकरांनी त्याचं केलेलं प्रदर्शन हे बघण्यासारखं असतं. त्यातील विनोद नवीन असतात. या अशा मलिका आहेत की दुसऱ्या दिवशी काय होणार अशी उत्सुकता वाटते. आम्हा मैत्रिणींच मालिकांविषयी काही वेळा चर्चासत्र रंगतं. यातून काही इतर मालिकांबद्दल पण समजतं. होणार सून मी या घरची ही माझी आवडती मालिका आहे. त्यातील जान्हवी व श्री ही आवडती पात्रं आहेत तर जान्हवीची आई कला ही आवडत नाही. पवित्र रिश्ता व बडे अच्छे लगते है या मालिका आता वाहवत गेल्या आहेत असे वाटते म्हणून ते पाहणे सोडले आहे. एखाद्या मालिकेने ट्रॅक बदलला की ती मालिका बघावीशी वाटत नाही.
आरती वैद्य, गृहिणी
सध्याच्या मालिकांचे चित्रीकरण फार भडक असते. प्रत्यक्ष आयुष्यामध्ये असे घडतेच असे नाही. केवळ वेळ जावा म्हणून तेवढय़ा पुरत्या बघायच्या आणि नंतर सोडून द्यायच्या, डोक्यात राहतील अशा मालिका हल्ली नसतातच. मालिकांमध्ये मांडल्या जाणाऱ्या प्रश्नांची आणि स्वत:च्या आयुष्यातील प्रश्नांची तुलना फार क्वचित प्रसंगी होते. पूर्वीच्या प्रपंच, श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारख्या मालिका खरेच चांगल्या होत्या. आपल्या घरात ज्या प्रकारचे वातावरण असते तसेच त्या मालिकेमध्ये दाखवले होते, त्यामुळे बघायला छान वाटायचे. मालिकेमधल्या आबांसारखे प्रेमळ आजोबा आपल्यालाही असावेत, असे नक्कीच वाटते. हल्लीच्या पुढचं पाऊल, देवयानी यांसारख्या मालिका उगाचच वाढवल्या जातात. लहान मुलांनी बघावी अशी तर एकही मालिका नाही. आपल्या नातेसंबंधांचे दर्शन मालिकांमधून होते असे मला वाटत नाही.
प्रतिभा कुलकर्णी, नोकरी
मी नोकरी करत असल्यामुळे खरे तर खूप वेळ मिळत नाही. पण जो काही वेळ मिळतो त्यात एखाद्दुसरी मालिका बघायला आवडते. आवडलेली मालिका फॉलो करते, तसेच त्याविषयी उत्सुकता वाटते. पण खरेदीच्या वेळेस मात्र मालिकेत एखाद्या नायिकेची साडी किंवा पेहराव अवडला तर मुद्दामहून तोच घ्यायचा असे मात्र करत नाही. न आवडलेली मालिका लगेच बंद करते. ‘तू तिथे मी’ ही मालिका आवडत नाही. जाहिरातीत जेवढे दिसते त्यावरून आठवडय़ाभरात काय घडेल याचा अंदाज येतो. सीरीयलमध्ये दाखवलेले नातेसंबंध प्रत्यक्षात अपल्या घरीसुद्धा असतात, पण एकाची दुसऱ्यावर कुरघोडी, दुसऱ्याचे सदैव वाईट चिंतणे यासारख्या गोष्टी लार्जर दॅन लाइफ वाटतात. पण शेवटी मालिकोच ती, असे काही असल्याखेरीज लोक आवडीने पाहणार नाहीत असे पण वाटते. ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका छान आहे. त्यातील सर्वच पात्रांची कामं आवडतात.
जोत्स्ना कुलकर्णी, नोकरी
मी मराठीतली ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ ही मालिका बघते. हिंदी मालिका कधीकधी बघते. ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ ही मालिका मला आवडते. त्यातील जान्हवी व श्रीची जोडी आवडते.
या मालिकांमधून सामाजिक मानसिकता थोडय़ाफार प्रमाणात लक्षात येते आणि बऱ्याच गृहिणी ज्यांच्याकडे वेळ असतो व वय ५० च्या पुढील असल्याने फार जबाबदाऱ्या नसतात त्याच बायका सर्वाधिक मालिका बघतात. अनेक महिला व्यक्तिरेखांमध्ये गुंतून पडतात. एखाद्या भावनिक क्षणाला रडतातही.
* मालिकांमधील नातेसंबंध वा प्रश्न यांच्याशी मात्र मी रिलेट करू शकत नाही, कारण या मालिका अतिशयोक्तीवर आधारित आहेत, याची मला जाणीव आहे. कौटुंबिक राजकारण जे दाखवतात ते टोकाचं असतं. तसं खऱ्या आयुष्यात घडत नसावं. मालिका खोटय़ा खोटय़ा असतात, असं गृहीत धरल्याने फक्त करमणूक इतकाच माझा हेतू असतो.
पण मालिका बनवणाऱ्यांनी हा वेळ जाणीवपूर्वक व चांगला संदेश दाखवण्यासाठी केला, तर सामाजिक बदल घडू शकेल. अगदी सलग बसून टीव्ही पाहता येत नाही, पण अर्धा तास सरासरी म्हणता येईल.
मालिका बघून विषय डोक्यात सहसा राहत नाही. अनेक बायका महिला मंडळं, भिशी अशा ठिकाणी मालिका व त्यातील संवादांवर तावातावाने चर्चा करताना मी पाहिल्या आहेत.
शोभा पोळ, विमा एजंट
माझे दोन तास टीव्ही पाहणे होते. मला कौटुंबिक मालिका आवडतात. सध्याच्या मालिकांमध्ये मी ‘होणार सून मी ह्य़ा घरची’, ‘मला सासू हवी’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ बघते. त्यातही ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ मला जास्त आवडते. त्यातील जान्हवी व श्रीची जोडी आवडते. ‘तू तिथे मी’ ही मला अजिबात न आवडणारी मालिका आहे. मंजिरी ही इतकी हतबल दाखवली आहे की, डोकं बाजूला ठेवून मालिका बघावी लागते. यापुढे चिन्मय मांडलेकरने लेखन करू नये असा प्रामाणिक सल्ला. अशा मालिका का बनवाव्यात आणि का बघाव्यात याचा काहीच उलगडा होत नाही.
स्त्रिया वेळात वेळ काढून मालिका बघतात, कारण माणसांचा माणसांशी संवाद कमी झाल्याने टीव्ही हा आभासी संवाद सुरू असतो, असं वाटतं. मालिकांमधील संवाद अनेकदा नाटकी वाटतात.
मालिकांमधील नातेसंबंधांशी मी रिलेट करू शकत नाही, कारण विशेषत: सासू-सुनांच्या ज्या कुरघोडी दाखवल्या जातात त्या अगदीच अमानवी वाटतात. मला वाटतं एकत्र राहून इतकं सहन करण्यापेक्षा आजच्या मुली एक घाव दोन तुकडे करणाऱ्या आहेत. त्या सगळ्या वेगळ्या राहतात. मग प्रसंगी सवडीने करतात इतरांचं. त्यामुळे कुटुंबात इतकी अशांतता कधीच नसते, असे वाटते. नातेसंबंधांवरचा विश्वास उडावा, असे चित्रण मालिकांमध्ये असते ते फार त्रासदायक वाटते.
उद्याच्या भागाची उत्सुकता वाटते, पण म्हणून तो भाग बघितला नाही तर फार रुखरुख वाटत नाही, कारण मालिकांच्या प्रोमोमधून अख्खी मालिका कळू शकते.
मालिकेतील घरं, सजावट, त्यांचे कपडे, दागिने याकडे माझं फारसं लक्ष नसतं. ते खोटं आहे, याची जाणीव असते. मुळात आपण घरात असताना अशा भरजरी साडय़ा घालून, नटूनथटून कामं करत नाही. ते फार आक्षेपार्ह वाटतं मला.
त्यामुळे बायकांना छान दिसणं व छान कपडे घालणं इतकंच काम आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न होतो, असं वाटतं.
मालिका बघतात, याचं कारण संध्याकाळी घरी असणाऱ्या बाईला दुसरं चांगलं काही पाहण्यासारखं नसतं व पुढे पुढे हा सवयीचा भाग होऊन जातो. सवयीने मालिका बघितल्या जातात. त्या आवडतात. त्यातील व्यक्तिरेखा खूपच आवडतात असं काही नाही.
मुळात आपण सामान्य माणसे बदल स्वीकारण्यास किती तयार असतो.
अनघा जोशी, बदलापूर, नोकरी
दूरचित्रवाहिनीवरील मालिका पाहते. झी मराठीवरील ‘होणार सून मी त्या घरची’ आणि आता नव्याने सुरू झालेली ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या दोन मालिका मी आवर्जून पाहते. या दोन्ही मालिका (आतापर्यंत तरी) पूर्णत: कौटुंबिक पाश्र्वभूमी आणि निखळ आनंद देणाऱ्या अशा असल्यामुळे आवर्जून पाहिल्या जातात. या दोन्ही मालिकांमधील पात्रं आणि त्यांचं कथासार अत्यंत हलंक फुलकं मनाला स्पर्शून जाणारं असं असल्याने त्या पाहत असताना दिवसभराचा आलेला शिणवटा, मरगळ काही प्रमाणात कमी होते ‘होणार सून मी त्या घरची’ या मालिकेतील ‘जान्हवी’ हे पात्र वास्तवात असेल की नाही माहिती नाही पण ती समोरच्या व्यक्तीला आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रश्नांना ज्या पद्धतीने समजून घेते ते निश्चितपणे शिकण्यासारखं आहे. इतर मालिकांमध्ये असलेली कटकारस्थानं, आपापसातील हेवेदावे नसल्याने डोक्याला त्रास होत नाही. अशीच वास्तवापासून कोसो दूर जाणारी मालिका म्हणजे ‘तू तिथं मी.’ या मालिकेमध्ये जे काही दाखवलं जात आहे ते अत्यंत चीड आणणारं असंच आहे. यातील सर्वच पात्र अत्यंत खोटी आणि वास्तवाशी फारकत घेणारी आहेत. मालिका सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे काही भाग पाहिले पण नंतर मात्र ही मालिका पाहणं सोडून दिलं.
खरं तर कोणत्याही मालिकांमध्ये चित्रित केलेली पात्रं, त्यांची घरं, त्यातील वातावरण आपल्या वास्तविक आयुष्याशी कधीच मिळतंजुळतं नसतं. तसंच त्यातील पात्र ज्या पद्धतीने घरात वावरतात तसं आपण आपल्या घरात कधीच वावरू शकत नाही. पण तरीदेखील मालिका या क्षणिक आनंद देणाऱ्या असतात हे मात्र खरं. पण त्यातील जे वातावरण असतं ते केवळ कल्पनेत असतं. त्यामुळे मालिका पाहत असताना त्या केवळ मनोरंजनाचे एक साधन आहे याचं भान ठेवणं आवश्यक आहे.
अलका चौधरी, नोकरी, मुलुंड
कामावरून घरी जाईपर्यंत विविध दूरचित्रवाहिन्यांवर मालिकांची जंत्री सुरू झालेलीच असते. पण घरी गेल्यावर संध्याकाळची कामं असल्याने आणि मालिका पाहण्याची फारशी आवडही नसल्याने मुद्दाम दूरचित्रवाहिनीसमोर बसून मालिका पाहिल्या जात नाहीत. पण अधूनमधून ‘तुझं नि माझं जमेना’ ही मालिका पाहिली. सासू आणि सून हा पारंपरिक विषय अतिशय वेगळ्या आणि हलक्याफुलक्या पद्धतीने हाताळाल्याने ही मालिका पाहताना मजा आली. सासू आणि सून यांच्यातील नातेबंध कशा प्रकारे असायला हवेत याबाबत दृष्टिक्षेप या मालिकेतून टाकला होता. ही मालिका काही प्रमाणात आजच्या काळाशी रिलेट करणारी अशी होती. यातून या नात्याकडे पाहण्याचा कशा प्रकारे निकोपता आणता येईल याचा हलक्याफुलक्या पद्धतीने ऊहापोह करण्यात आला होता. याच्या विरुद्ध वातावरण ‘मला सासू हवी’ या मालिकेत दाखवले आहे. या मालिकेतील वातावरण आणि सतत सासूच्या विरोधात कटकारस्थान करत राहणाऱ्या दोन सुना या वास्तव आयुष्यापासून फारकत घेणाऱ्या आहते असं वाटतं.
मालिका कितीही चांगली असली तरी घरातील कामं सोडून ती मालिका पाहत बसत नाही. त्यामुळे काम करता करता त्या पाहायच्या. एखाद्या दिवशी आवडती मालिका पाहता आली नाही तरी हळहळ वाटत नाही. विविध दूरचित्रवाहिन्यांवरून प्रसारित होणाऱ्या मालिकांमध्ये अनेकदा कटकारस्थानं, आपापसातील हेवेदावे यांचा भडिमार केलेला असतो. त्या मालिकांमध्ये असलेली वारेमाप पात्रं यामुळे या मालिका पाहण्याची इच्छाच होत नाही. अशा वेळी काही रिअॅलिटी शो, विशेषत: गाण्यांचे, पाहायला बरे वाटतात.
डॉ. मनीषा पाठक, सीएमओ, कौशल्य हॉस्पिटल
मुख्यत: संध्याकाळचा तो स्लॉट रिकामा मिळतो, त्यावेळेत विरंगुळा म्हणून मालिका पाहिली जाते. त्यासाठी टी.व्ही. ला डोळे लावून बसले आहे, कामं बाजूला टाकलेली आहेत असं होत नाही. एक निव्वळ कौटुंबिक मालिका म्हणून पाहिली जाते. टिपिकल फॅमिली ड्रामा दाखविणाऱ्या मालिका टाळते. पण सध्या होणार सून मी.. बघायला सोबर वाटते. काही अंशी तरी खरेपणावर उतरणारी आहे. बिनडोकपणाचा भाग नाही. सासू-सुना प्रकार आवडत नाही.
सोनाली दामले, वकील-गृहिणी
सासू-सुना म्हणजे विळा भोपळा नातं हे जे दाखवलं जातं ते सगळीकडेच सारखं नसतं. त्यामुळे तशा मालिका भडक वाटू लागतात. न पटणारी फॅन्टसीसारखं. त्यामुळे अशा मालिका टाळल्या जातात. त्यापेक्षा काहीतरी बाईंिडग असेल तर आवडीने पाहिल्या जातात. प्रपंच, गंगाधर टिपरेसारख्या मालिकांमध्ये हे होतं. त्या मालिका कथेमध्ये बद्ध असत. आत्तासारखं पाणी घालून वाढविल्या जात नसतं. मध्येच कोणतीही पात्रं कथेत घुसविण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. अशा वेळी मेंदू बाजूला ठेऊन पाहावं लागतं, त्यापेक्षा न पाहणं चांगलं. सध्या होणार सूनमध्ये काही प्रमाणात रोजच्या जगण्याचा आधार आहे. मालिकेतील जान्हवीचा साधेपणा, मध्यमवर्गीयपणा हे कोठेतरी आपल्या आयुष्याला स्पर्शून जाणारं असतं. जान्हवीला दागिने सांभाळण्याची सवय नसते तेव्हाचा सासू- सुनेचा प्रसंग तुम्हाला स्वत:च्या आयुष्याशी साधम्र्य दाखवितो. या कथेतील नायक- नायिकेचं नातं हळुवार वाटतं. अशा मालिका पाहिल्या जातात. राधा ही बावरी सुरुवातीला अशी होती, पण नंतर बदलत गेली. अशी मालिका पाहणं बंद होतं.
मालिकेतील कपडे, दागिने, सजावट याचा परिणाम फारसा होत नाही. मात्र स्वभावाचा परिणाम नक्की होतो. पण काही ठिकाणी अंधानुकरण मात्र होताना दिसतं. जसं मुला- मुलींची नावं ठेवली जाणं.
प्रतिभा टिपणीस, गृहिणी
सीरियल मी निव्वळ टाइमपास म्हणून बघते. सीरियल बघताना कुतूहल वाटतं की, पुढे काय होणार आहे. सीरियलमध्ये नवीन नवीन घडत असतं म्हणूनच सीरियल बघायला मजा येते. आजकालच्या सीरियल्समध्ये कटकारस्थानं फारच दाखवतात, त्या मी अजिबात बघत नाही. सीरियलमधून घेण्यासारखं तसं काही नसतं, पण चांगलं असेल तर घ्यायचं, वाईट असेल तर सोडून द्यायचं. सीरियलचे काही क्षण असे असतात की, मला वाटत नसतानाही मी अचानकपणे भावनिक मुद्दा असल्या कारणाने रिलेट होते. सीरियलमधले कॅरेक्टर्स कुटुंबात नाहीत, पण माझ्या आसपास बघायला मिळतात. आत्ताची ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ ही मालिका चांगली आहे. ती मला खूप आवडते, कारण श्री खूप चांगला आहे. तेजू (जान्हवी) पण तितकीच चांगली आहे. स्टोरी खूप चांगली आहे. सगळ्यांनी अभिनयपण खूप चांगला केला आहे. या सीरियलमधलं मला श्री हे कॅरेक्टर खूप जास्त आवडलं. त्याचे स्वत:चे विचार, घराण्याचे विचार, त्याचे संस्कार, स्त्रियांना मान देतो, कधीच दुखवत नाही म्हणून तो फार आवडतो.
‘तुझं नि माझं जमेना’ ही मालिका मला अजिबात आवडत नाही. मी सुरुवातीला त्या मालिकेची वाट बघायची, पण नंतर स्टोरीमध्ये अनावश्यक असे कॅरेक्टर्स आणून स्टोरीची वाट लावली. मला ‘होणार सून मी ह्य़ा घरची’मधील शशिकला बाई आणि अनिल आपटे हे खलनायक आणि खलनायिका मला नाही आवडतं. तसंच ‘मला सासू हवी’मधली कॅश ही खलनायिका नाही आवडत, पण तरीही कुतूहल वाटतं म्हणून बघते. सध्या ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ ही माझी इतकी आवडती मालिका आहे, की मी त्या मालिकेची वाट बघते. सीरियलमधल्या साडय़ा, घर किंवा वस्तू या गोष्टींकडे मी फार लक्ष देत नाही. जर खूपच आकर्षक असेल तर मात्र लक्ष जातं. मालिकेतल्या कुठल्याच गोष्टींना मी फॉलो करत नाही. या सगळ्याचा परिणाम माझ्या मते तरुण मुलींवर होतो आणि त्या फॉलोही करतात. फॅशनकडे माझं तरी अजिबात लक्ष नसतं. मुलांनी ‘होणार सून मी ह्य़ा घरची’सारख्या मालिका बघितल्या तर मला फार आवडेल.
आशा पाटील, गृहिणी
या मराठी मालिकांमधील रडूबाई नायिका बघितल्या की कीव येते. कारण आजच्या सुना-मुली अशा नसतात. सासू सुनांची टोकाची भांडणं, सतत एकमेकींना पाण्यात पाहणाऱ्या जावा हे सगळं अतिशयोक्तीचं वाटतं. विकृती ही माणसाची प्रवृत्ती असू नये याचं भान या लोकांनी ठेवायला हवं.
कुंदा चांदोरकर, गृहिणी
वास्तविक या मालिकांमधून कोणताही विचार मिळत नाही. तरीही त्यांचं व्यसनच लागल्यासारखं झालं आहे. कारण माझ्यासारख्या वय झालेल्या, घरी असणाऱ्या स्त्रीला करमणुकीचं दुसरं साधन काय आहे? भिशी, भजनी मंडळ, नाटकं हे सगळं रोज नसल्यामुळे टीव्ही मालिका याच सोबती आहेत.
स्वाती तांबे
भडकपणा नसलेल्या मालिका मला बघायला आवडतात. त्यामुळे होणार सून मी ह्य़ा घरची आणि एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिका मी बघते. या दोन्हीही मालिका वेगळ्या धाटणीच्या आहेत. सामान्य माणसाची सामान्य मालिका आहे. त्यामध्ये कोठेही अतिशयोक्ती वाटत नाही. आपल्या जीवनावर परिणाम होऊ न देता मनोरंजन म्हणून मालिका बघायच्या. होणार सून.. मधील शरयू हे पात्र आवडते. ती एकदम साधी आणि भोळी दाखवली आहे. ती कोणतेही डावपेच खेळत नाही. तू तिथे मी, मला सासू हवी या मालिकांमध्ये जरा अतीच दाखवतात. ते पटत नाही. एका लग्नाचीमध्ये एकत्र कुटुंब पद्धती दाखवली आहे. मुलांनी जर हे बघितलं तर त्यांना एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व कळू शकते. पण आपल्या नातेसंबंधांसारखेच मालिकेमधील नाती नसतात हे मात्र खरे.
विनया मेहेंदळे, नोकरी
नोकरी करून घरी आल्यावर टीव्ही लावला तर एकही मालिका आपला मानसिक थकवा घालवू शकत नाही. एकटेपणा घालवण्यासाठी, सोबत म्हणून टीव्ही सुरू करते. सगळ्या मालिकांमधून मराठीपण आटलं आहे.
प्रज्ञा धोत्रे, नोकरी
मी झीवरच्या फक्त दोनच मालिका बघते, पण त्यातल्या एका मालिकेत आता खूप लांबड लावली आहे. कथानक लवकर पुढे सरकतच नाही. विषयही आता भलतीकडेच भरकटू लागला आहे. दुसरी मालिका आत्ता इंटरेस्टिंग वाटते आहे. पण बघू या हे किती दिवस टिकेल ते.
मंगल देव, शिक्षिका
एकत्र कुटुंबातही किती चांगल्या पद्धतीने एकमेकांना समजून घेऊन राहता येऊ शकतं याचा धडा या मालिकांमधून मिळतो. पण या मालिकांमधून दाखवला जाणारा भपकेबाजपणा मात्र विसंगत वाटतो. कारण सामान्य माणसाकडे या सगळ्या गोष्टी नसतात.
मनीषा कोयंडे, पदवीधर
टीव्हीवरच्या चांगल्या मालिका बघणं मला खूप आवडतं. मी पूर्वी ‘तू तिथं मी’ ही मालिका बघत असे. सुरुवातीला नवरा-बायकोच्या नात्यातील विश्वासावर ही मालिका आधारित होती. पण त्यानंतर मंजिरीचा अतिसोशिकपणा नकोसा वाटला. तिच्या नवऱ्याचं तिच्यावर संशय घेणं जरा अतिच वाटलं. त्यामुळे ही मालिका बघणं सोडून दिलं. सध्या ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका बघतेय. त्यातल्या जान्हवीचं संयमित वागणं खूप भावतं. तसंच घरातल्या सर्व स्त्रियांना समजून घेण्याचा ‘श्री’ चा समजूतदार पुरुषीपणा खूपच आवडतो. कौटुंबिक नातेसंबंध, त्यातला नितळपणा अशा मालिका बघायला खूप आवडतात. या मालिकांमधील काही पात्रं माझ्या प्रत्यक्ष जीवनातही कुठे ना कुठे सापडतात. त्यामुळे या मालिका स्वत:शी खूपच रीलेट करते. यातल्या अनेक चांगल्या गोष्टी मला प्रत्यक्ष आयुष्यात फॉलो करायला आवडतात. एखाद्या व्यक्तीकडे एकारलेल्या दृष्टिकोनातून बघण्यापेक्षा त्याच्याकडे विविध दृष्टिकोनांतून कसं बघायला हवं, याबद्दल शिकायला मिळतं.
‘होणार सून मी या घरची’मधील संयमित जान्हवी आणि स्त्रियांना समजून घेणारा ‘श्री’ ही पात्रं खूप आवडतात. माझ्या मुलानेही ‘श्री’सारखं असावं असं मला वाटतं. तसंच ‘तू तिथे मी’मधलं मंजिरीचं पात्र मला आवडलं नाही.
या मालिकांमधील पात्रांचे दागिने, कपडे यांचं अनुकरण करावंसं वाटत नाही. हो, एखाद्या चांगल्या व्यक्तिरेखेच्या चांगल्या वर्तणुकीचं अनुकरण करणं मला निश्चितच आवडेल.
नीलिमा देशपांडे, नोकरी, मुलुंड
काही ठरावीक मालिका पाहते. त्यात ‘होणार सून मी त्या घरची’ आणि नुकतीच संपलेली ‘तुझं नि माझं जमेना’ या मालिका पाहायचे. ‘तुझं नि माझं जमेना’ या मालिकेबाबत सांगायचं तर नंतर नंतर ही मालिका कंटाळवाणी होत गेल्याने त्यातील रस संपला होता. अर्थात त्यानंतर ती लगेचच संपली हे एकाअर्थी बरं झालं. सध्या सुरू असलेली ‘होणार सून मी त्या घरची’ ही मालिका पाहते आणि ती सध्या तरी आवडते आहे. या दोन्ही मालिकांमधील विषय, त्यात त्यातील वातावरण, सादर केलेले कथानक, त्यातील संवादांची भाषा आणि मुख्य म्हणजे त्यातील व्यक्तिरेखा या परफेक्ट असल्याने मालिका पाहताना करमणूक होते. ‘होणार सून मी..’ या मालिकेत काही सामाजिक समस्यांचा समावेश कथानकात करण्यात आला आहे. जसं टिश्यू पेपर, लेदर न वापरणं, तसंच नुकतंच या मालिकेतील श्री आणि जान्हवीचं लग्न दाखवलं. त्यात त्यांनी अक्षता न वापरण्याचा तसंच मुलीच्या आई-वडिलांनी जावयाचे पाय धुण्याचा विधी नाकारणं, असे काही प्रसंग खरोखरच दाद देण्याजोगे आहेत. तसंच या मालिकांमधील व्यक्तिरेखांच्या तोंडी असलेले संवाद हे खरोखर दर्जेदार आहेत. त्यामुळे या मालिकांवर चर्चा होते पण ही चर्चा त्यांच्या दिसण्यावर, कपडय़ांवर न करता कथानकात वापरलेल्या भाषेवर होते.
पण इतर मालिकांच्या बाबतीत असं होत नाही. उदाहरणार्थ ‘तू तिथे मी’, ‘राधा ही बावरी’, ‘मला सासू हवी’ या मालिकांमधील व्यक्तिरेखा तद्दन खोटय़ा वाटतात. त्यात असलेले ताण, राजकारण, नातेसंबंधांमधील अविश्वास यामुळे त्या मालिका पाहण्याची इच्छाच होत नाही.
सुखदा तारे, शिक्षिका
‘कौन बनेगा करोडपती’, ‘होणार सून मी त्या घरची’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिका मी पाहते. ‘कौन बनेगा..’ या मालिकेतून सामान्यज्ञान मिळतं त्याचप्रमाणे अमिताभ बच्चन यांची सादरीकरणाची पद्धत, त्यांचं भाषेवर असलेलं प्रभुत्व आणि या खेळामध्ये सहभागी होणाऱ्या प्रेक्षकांशी ते ज्या पद्धतीने संवाद साधतात यांतून बरंच काही शिकण्यासारखं असल्याने ते मी आवर्जून पाहते.
मालिकांच्या बाबतीत सांगायचं तर ‘होणार सून मी त्या घरची’ आणि ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिका कौटुंबिक असल्याने पाहायला आवडतात. यातील एकमेकांना समजून घेणाऱ्या व्यक्तिरेखा आवडतात. ‘होणार सून मी..’मधील समजूतदार जान्हवी आणि तिला मिळालेली श्रीची प्रेमळ आणि समजूतदार साथ पाहून काही क्षण आनंदात जातात.
या मालिकांबरोबरच या मालिकांची टायटल साँग्सही मनाला भिडतात.
जान्हवी राणे, नोकरी, मुलुंड
मालिका पाहते म्हणण्यापेक्षा मी मालिका ऐकते असं म्हणेन. कामावरून घरी गेल्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करता करताना टीव्हीवर सुरू असलेल्या मालिका ऐकल्याच जातात. दूरचित्रवहिन्यांवरून ज्या मालिका प्रसारित होतात त्यांचा दर्जा अनेकदा सुमार असतो. आपल्या हातात टीव्हीचा रिमोट असल्याने काय पाहायचे आणि काय नाही याचा पर्याय निश्चितपणे आपल्याला उपलब्ध आहे. नुकत्याच संपलेल्या मालिकांमधील ‘उंच माझा झोका गं’, ‘तुझं नि माझं जमेना’ या मालिका मी काम करता करता पाहायचे/ऐकायचे. ‘उंच माझा झोका गं’ मधील रमाबाईंच्या कर्तृत्वाची महती या मालिकेच्या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचली असंच म्हणावं लागेल. मी मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघाच्या वाचानालयात कार्यरत आहे. ही मालिका जेव्हा सुरू झाली तेव्हा रमाबाईंचं चरित्र किंवा त्यांच्याशी संबंधित पुस्तकांची अनेकांनी मागणी केली. या मालिकेच्या निमित्तानं का होईना लोकांमध्ये पुस्तकं वाचून त्यांची माहिती जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली हे विशेषच म्हणावं लागेल.
सध्या प्रसारित होणाऱ्या मालिका मी फारशा पाहत नाही. कारण मालिकांधील सासू-सुनांची भांडणं, जावा-जावा, भावा-भावांमधील भांडणं पाहायला मला आवडत नाही. त्यापेक्षा अधूनमधून रिअॅलिटी शो, विशेषत: मुलांशी निगडित, असे पाहायला आवडतं, पण हे कार्यक्रम पाहताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते ती म्हणजे, ही मुलं त्यांच्या वयाला न शोभणारी गाणी आणि नृत्य करतात. यावर कुणी बंधनं घालू शकत नाही का? मालिकांमध्ये प्रवाहीपणा नाही. तोच तोपणा खूप असल्याने मालिका पाहणं हे माझ्यासाठी अत्यंत कंटाळवाणं असतं.
लोकांना सध्याची आवडणारी मालिका
एकजात सगळ्यांची सध्याची आवडणारी मालिका आहे, ‘होणार सून मी या घरची’ आणि आवडणारी पात्रं आहेत, श्री आणि जान्हवी. वयस्कर स्त्रियांना आपला नातू असा असावा असं वाटतं. मध्यमवयीन स्त्रियांना आपला मुलगा असा असावा असं वाटतं तर तरुण मुलींना आपला नवरा असा असावा असं वाटतं. श्रीचा समजूतदारपणा, सगळ्या आयांना समजून घेणं, जान्हवीशी प्रेमाने वागणं, जान्हवीचं आणि त्याचं समंजस- परिपक्व नातं या गोष्टींनी सगळ्या थरातल्या महिला प्रेक्षकांना जणू काही भुरळ घातली आहे. जान्हवीच्या बाबतीतही तिचं सुसंस्कृत, मर्यादाशील वागणं, सगळ्या सासवांना जिंकून घेण्यासाठीची, श्रीशी समरस होण्यासाठीची तिची धडपड हे सगळं भावणारं ठरलं आहे. ती आजकालच्या मुलींसारखी सासवांना उर्मट उत्तर देत नाहीत, मर्यादेने वागते हे घेण्यासारखं आहे, असा उल्लेख साठीच्या पुढच्या अनेक आज्ज्यांनी केला आहे. तर तरुण मुलींना जान्हवीचे कपडे, तिची हेअर स्टाइल, तिचं बोलणं, प्रेमात पडणं हे आवडलं आहे. फक्त तिशीच्या एकीने जान्हवीचं हे सगळं गोड गोड वागणं खोटं वाटतं आणि म्हणून खटकतं असा उल्लेख केला आहे. तर एका सत्तरीच्या एका आजींनी होणार ‘सून मी या घरची’ या मालिकेतली रोहिणी हट्टंगडी यांची भूमिका आवडते असं सांगितलं. कारण त्यांना रोहिणी हट्टंगडी यांचा करारीपणा, या वयातही घरावर त्यांचा असलेला होल्ड आवडतो. लीना भागवतांची तसंच जान्हवीच्या बाबांची भूमिका अनेकांना लोभस वाटते. कचकचून बोटं मोडली गेली आहेत ती अनिल आपटे आणि शशिकलाबाई यांच्या भूमिकांना. अनिल आपटे यांना बघून तर डोक्यात तिडीक जाते असं अनेकींचं म्हणणं आहे. ही या दोघांच्या अभिनयाची पावतीच म्हणायला हवी.
अजिबात न आवडणारी मालिका
पुढचं पाऊल, देवयानी, एकापेक्षा एक, शेजारी शेजारी सख्खे शेजारी या मालिका आवडणाऱ्या मालिकांच्या यादीतही आहेत आणि न आवडणाऱ्या मालिकांच्या यादीतही. पण न आवडणाऱ्या मालिकांमध्ये दोन-तीन अपवाद वगळता ठासून नाव घेतलं गेलं ते ‘तू तिथं मी’ या मालिकेचं. त्यात दादा होळकरांच्या म्हणजेच मिलिंद िशदे यांच्या बाबतीत दादा होळकर ही व्यक्तिरेखा आवडत नसली तरी शिंदे यांचा अभिनय आवडल्याचं आवर्जून सांगितलं गेलं. पण मंजिरी, सत्यजित आणि प्रिया यांना कुठलीच माफी नाही. ते करतात तो अभिनय आहे आणि तो कसा आहे याबद्दल कुणालाच बोलायचं नव्हतं, सगळा आक्षेप होता तो या व्यक्तिरेखांच्या वागण्यावर. आजच्या जमान्यात मुली इतक्या शिकल्या आहेत, जगण्याच्या व्यवहारात हुशार झाल्या आहेत, तर मंजिरी इतकी रडकी, बावळट का दाखवता, खुट्टं झालं तरी बायकांचा सिक्स्थ सेन्स जागा होतो, मग इतकं सगळं होऊनही मंजिरी अशी का, असा थेट प्रश्न आहे; तर प्रियाच्या बाबतीतही सर्व थरातल्या स्त्रियांच्या मनात खदखद आहे. सगळ्यात जास्त राग आहे तो सत्यजितवर, चिन्मय मांडलेकरांवर. असं जग, अशी माणसं चिन्मय मांडलेकर कुठल्या जगात बघतात आणि मालिकांमध्ये उतरवतात असा काहींना प्रश्न पडला आहे तर एकीने तर चिन्मय मांडलेकरांनी या मालिकेचं लेखन ताबडतोब थांबवावं असाही सल्ला दिला आहे.
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ‘तू तिथं मी’ ही मालिका अजिबात आवडत नाही असं मध्यमवर्गातल्या, उच्चमध्यमवर्गातल्या सर्व वयोगटातल्या स्त्रिया सांगतात तर या पाहणीमध्ये घरकाम करणाऱ्या काही स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यांच्यातल्या सर्व वयोगटातल्या स्त्रियांनी आवडणाऱ्या मालिकांमध्ये ‘तू तिथं मी’ या मालिकेचं नाव आणि आवडणाऱ्या पात्रांमध्ये मंजिरी आणि सत्यजित या पात्रांचं नाव घेतलं आहे.
व्हॉटस् अपवर टीव्ही मालिका
एक जोडपं एकत्र बसून टीव्हीवर आयपीएलची मॅच बघत असतं. पाच मिनिटांनी
बायको- हा ब्रेट ली आहे ना?
नवरा- नाही. नाही. हा तर ख्रिस गेल. ब्रेट ली बॉलर आहे.
बायको- ब्रेट ली एकदम मस्त आहे दिसायला. त्याने त्याच्या भावाप्रमाणे सिनेमात कामं केली पाहिजेत.
नवरा- ब्रेट लीचा भाऊ? पण त्याला कुणी सिनेमात काम करणारा भाऊ नाहीय.
बायको-अरे, ब्रूस लीबद्दल बोलतेय मी.
नवरा- ब्रूस ली? अगं तो ब्रेट लीचा भाऊ नाहीये. ब्रेट ली ऑस्ट्रेलियन आहे.
बायको- हो का? बरं जाऊ दे मग. अरे, अरे, ते बघ. दोन मिनिटांत आणखी एक विकेट.
नवरा- अगं ती विकेट नाहीये. तो अॅक्शन रिप्ले आहे.
बायको- हो का? भारतजिंकणार वाटतं ही मॅच. तसंच दिसतंय.
नवरा- अगं भारत कसा जिंकेल. ही बंगलोर विरुद्ध कोलकाता मॅच चाललीय.
बायको- तो अंपायर हेलिकॉप्टर का बोलावतोय?
नवरा- तो हेलिकॉप्टर नाही बोलवत आहे. फ्री हीट आहे.
बायको- लोकांनी तिकिटांचे पैसे मोजलेत ना? मग फ्री हीट का म्हणून? आणि आता तो कुणाला हाय करतोय?
नवरा- तो हाय नाही, बाय करतोय.
बायको- पण तो बाय का करतोय? संपली का मॅच? आणि किती रन हव्यातजिंकायला?
नवरा- ३६ मध्ये ७२.
बायको- सोप्पंय अगदी. एका बॉलमध्ये दोन रन काढायच्यात.
(नवरा वैतागून टीव्ही बंद करतो. बायको लगेचच टीव्ही सुरू करते आणि सरस्वती चंद्र मालिका बघायला लागते.)
नवरा- कोण हा सरस्वती चंद्र?
बायको- माहीत नसेल तर गप्प बसा. बोलू नका. बघू द्या मला.
या पाहणीत आवडणाऱ्या तसंच न आवडणाऱ्या म्हणून आवर्जून उल्लेख केल्या गेलेल्या मराठी मालिका
होणार सून मी या घरची, तू तिथं मी, पुढचं पाऊल, एका लग्नाची तिसरी गोष्ट, तुझं माझं जमेना, राधा ही बावरी, होम मिनिस्टर, एकापेक्षा एक, शेजारी शेजारी सख्खे शेजारी, फू बाई फू, कॉमेडी एक्स्प्रेेस, मला सासू हवी, दुर्वा, उंच माझा झोका, कौन बनेगा मराठी करोडपती, आंबटगोड, माझे मन तुझे झाले, मेजवानी, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, क्राइम पेट्रोल
एका लग्नाची दुसरी गोष्ट, कालाय तस्मै नम:, देवयानी, प्रपंच, श्रीयुत गंगाधर टिपरे, चार दिवस सासूचे, आभाळमाया, वादळवाट, उंच माझा झोका, गोटय़ा, अग्निहोत्र, पिंपळपान, गुंतता हृदय हे, सोनियाचा उंबरा, कुंकू इ.
या पाहणीत लोकांनी आवडलेल्या किंवा न आवडलेल्या म्हणून आवर्जून उल्लेख केलेल्या व्यक्तिरेखा तसंच अभिनेते
श्री, जान्हवी, जान्हवीचे मामा, जान्हवीचे बाबा, जान्हवीच्या सातही सासवा, जान्हवीची आई, मंजिरी, सत्यजित, प्रिया, दादा होळकर, कॅश, अभिलाषा, सीमावहिनी, सौरभ, राधा, केदार, श्रेयस, रमाबाई रानडे, न्यायमूर्ती रानडे, छोटय़ा रमाबाई, रुपाली, राधा (एका लग्नाची दुसरी गोष्ट), मनवा, वैभव, रीमा, तन्वीर, विक्रम, नताशा, अनिल आपटे, रोहिणी हट्टंगडी, आदेश बांदेकर, वैभव मांगले, आदिती सारंगधर, लीना भागवत, स्पृहा जोशी.
हिंदी मालिका
महाराणा प्रताप, तारक मेहता का उलटा चष्मा, प्राइम मिनिस्टर, मालगुडी डेज, बडे अच्छे लगते है, उतरण, पवित्र रिश्ता, बिग बॉस, मेरी भाभी, आर्ट अॅटॅक, सपने सुहाने लडख पन के, दिया और बाती, महादेव, बालिका वधू, कबूल है, इंडियन आयडॉल, बॅचलरेट इंडिया, जोधा अकबर, महाभारत, दिल मिल गये, मिले तब हम तुम, कौन बनेगा करोडपती हिंदी, वीरा, मास्टर शेफ ऑस्ट्रेलिया.
६० आणि पुढे
सुशीला देवधर
मालिका बघताना वेळ छान जातो. मनोरंजन होतं. आनंद मिळतो. मालिकांमध्ये कारस्थानी व्यक्ती असतात हे खरं, पण समाजात अशा काही व्यक्ती वावरताना हमखास दिसतात. काही मालिकांमधले थोडे प्रसंग आयुष्याशी रिलेट करू शकते. घरातलं वातावरण, एकत्र कुटुंबातले हेवेदावे वगैरे. पण काही मालिकांमधले प्रसंग मात्र फारच खोटे वाटतात.
मालिका संपल्यावर कुठे समवयस्क मैत्रीण भेटली तरच विषय निघतो. आजचा भाग संपल्यावर तो विषय संपतो. डोक्यात काही राहात नाही. आजचा भाग संपल्यावर उद्याची उत्सुकता असतेच. मालिकेतलं घर, सजावट, कपडे, दागिने याकडे लक्ष असतं, पण ते तितकं फॉलो केलं जात नाही.
काही मालिकांमधून जीवनातल्या नातेसंबंधांचं खरंखुरं दर्शन होत असतं. पण याला काही वाईट मालिका मात्र अपवाद आहेत. आवडती मालिका- ‘होणार सून मी त्या घरची’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’. आवडण्याचं कारण- घरोघरी दिसावीत अशी पात्र, प्रसंग, विषय. न आवडणारी मालिका- ‘मला सासू हवी’, ‘तू तिथे मी’.
पहिले काही भाग पाहून आवडल्या नाहीत म्हणून बघणं सोडून दिलं. या मालिकेतली पात्र आणि प्रसंग अतिरंजित वाटतात. आवडतं पात्र- होणार सून मी मधली सून आणि मुलगा. ही मालिका मुलांनी पाहावी असं वाटतं, कारण ती सून किती प्रेमानं वागते, कुणाला उलट उत्तर देत नाही. मुलगा कसा सांभाळून घेतो ते शिकण्यासारखं आहे.
नीला नातू
वेळ चांगला जातो म्हणून टीव्ही बघते. संध्याकाळच्या बहुतेक सगळ्या मालिका बघते. त्यातल्या काही आवडतात. काही आवडत नाहीत, तरी टीव्ही सुरू असतो त्यामुळे बघितल्या जातात. ‘होणार सून मी या घरची’ ही आवडती मालिका आहे, कारण त्यातली सून- जान्हवी हे पात्र आवडतं. ती आदर्श सून वाटते. सर्व सासवांना आपलंसं करणारी, माहेरच्या माणसांवर प्रेम करणारी, सगळ्यांना समजून घेणारी, उलट उत्तरं न देणारी, मर्यादेत राहणारी अशी ती आहे. श्रीचं पात्रही आवडतं. आदर्श मुलगा असा असला पाहिजे. नवीन सुरू झालेली ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’सुद्धा चांगली मालिका आहे. ‘तू तिथं मी’ पूर्वी आवडीनं बघत होते. आता जरा आवडत नाही. ‘मला सासू हवी’ मात्र कंटाळवाणी होत गेली. तिथल्या सुना आणि सासू आणि त्यांची कारस्थानं फार खरीखुरी वाटत नाहीत. नकारात्मक विचार करणारी पात्र त्यात जास्त आहेत.
मालिका संपल्यावरही काही वेळा विषय बोलला जातो. फिरायला जायच्या आमच्या बायकांच्या ग्रुपमध्ये मालिकांचा विषय निघतो. चर्चा होतात. सून कशी समंजस वागताना दाखवलीय याविषयी आम्ही कौतुकही करतो. तसे काही मालिकांवर, त्यातील पात्रांवर टीकाही करतो.
रतन फडणीस
घरात फारसं कुणी नसतं त्यामुळे टीव्हीवरच्या मालिकांनी छान टाइमपास होतो. बहुतेक सगळ्याच मालिका बघते. मालिकांमध्ये कट-कारस्थानं, भांडणं दाखवतात, तशी काही अंशी आसपास घडतात असं वाटतं. मालिकेतली पात्र बघताना ‘समाजात अशीही माणसं आहेत’ हे कळतं. मालिकांमधली काही पात्र आसपास वावरताना दिसतात. सगळीच काही तशी नसतात, पण काही अंशी तशी वृत्ती आढळते. काही व्यक्तिरेखा समाजात तशाच दिसतात. मालिका संपल्यावरदेखील डोक्यात त्या विषयांचा भुंगा असतोच. न आवडणाऱ्या मालिकाही बघते कारण वेळ जातो. मालिका संपते तेव्हा पुढच्या भागात काय होणार याची उत्सुकता लागून राहिलेली असते.
आवडती मालिका- ‘होणार सून मी या घरची’, कारण त्यातली सगळीच पात्रं खूप साधी दाखवली आहेत. मेकअप दागिन्यांचा फार भपका नाही. मालिकेत फार भडकपणा नाही. त्यातल्या आईआजीचं म्हणजे रोहिणी हट्टंगडीचं पात्र आवडतं. उतारवयातही ती स्त्री खंबीरपणे घर चालवताना दाखवलीय ते आवडतं. तिचा दरारा, आब आवडतो. अजिबात न आवडणारी अशी कुठली मालिका नाही. ‘राधा ही बावरी’ मालिकेतला ‘केदार’ हे पात्र आवडत नाही. फार कारस्थानी आणि दुष्ट दाखवलाय.
मुलांनी बघावी अशी मालिका- ‘होणार सून मी या घरची’. कारण यातली नातसून गोड आहे. ही नातसून कुणाला न दुखवता सगळं करतेय ते आवडतं. ते मुलांनी आदर्श सून म्हणून पाहावं असं वाटतं. नातेसंबंधांचं खरंखुरं दर्शन काही मालिकांमधून अंशत: होत असतं.
मीराबाई गुंजाळ
मी मराठी मालिका नेमाने बघते. आपल्या आवडत्या मालिकांमधला एक भाग तीन वेळा दाखला तरीही मी बघते. ‘देवयानी’ ही मालिका मला खूप आवडते. त्यात बायकांची कटकारस्थानं आवडत नाहीत. त्यावर नंतर घरात चर्चाही होते. या मालिकांमधील बायकांचा करारीपणा खूप आवडतो. घरातलं कामं उरकल्यावर एक विरंगुळा म्हणनू मी या मालिका बघते. त्यांचे दागिने, कपडे खूप आवडतात.
स्वप्ना बोरगावकर
मी मराठी मालिका ‘तू तिथे मी’, ‘मला सासू हवी’, ‘राधा ही बावरी’, ‘होणार सून मी ह्य़ा घरची’, ‘होम मिनिस्टर’, ‘कौन बनेगा करोडपती’ या बघते. यातल्या काही मालिका सुरुवातीपासून बघते आहे म्हणून बघितल्या जातात
मला आवडलेली मालिका म्हणजे ‘कालाय तस्मै नम:’.
मला असं वाटतं की, सगळ्याच मालिका टाइमपास म्हणून जास्त बघितल्या जातात. दुसरी गोष्ट म्हणजे आता अनेक ज्येष्ठ नागरिक घरी एकेकटे असतात. त्यांच्याकडे वेळही असतो आणि रिमोटचं बटण दाबलं, की कुठली ना कुठली मालिका चालूच असते. मग ती बघितली जाते.
समाजात असं चित्र दिसतं असं मला नाही वाटत. मालिकांमध्ये अतिशयोक्ती असते. हे स्वीकारूनच त्यातूनही जे चांगलं आहे तेवढंच घ्यावं, असं वाटतं.
मालिका बघणे हे जवळपास टीव्ही बघणे याला पर्यायी शब्द झाले आहे इतक्या मोठय़ा प्रमाणावर मालिका पाहिल्या जातात. एक प्रकारे हा करमणुकीसाठीचा सोपा पर्याय आहे. मालिका म्हणजे एक प्रकारे प्रदर्शनच झाले आहे. त्यामुळे आपसूकच यातील पात्रांच्या साडय़ा, आभूषणे यांच्याकडे नजर जातेच, पण आपण त्यातून काय घ्यायचं हे माहीत असल्याने गल्लत होत नाही.
‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचा तर उदोउदो फार झाला आहे. कोपरखळी मारण्याच्या नादात आदेश बांदेकर चक्क बायकांना मूर्खात काढणारे शेरे देतात आणि बायका हसून प्रतिक्रिया देतात, हे फार गंभीर वाटते. अनेकदा महिलांच्या समस्यांचा मालिकांमधून इश्यू होतो असं वाटतं. बायकांना जरा जास्तच डोक्यावर घेतलं आहे, असं वाटतं.
सरासरी दोन तास टीव्ही पाहते.
विमल खैरनार
मी रोज ‘होणार सून मी ह्य़ा घरची’, ‘मला सासू हवी’, ‘फू बाई फू’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिका बघते. त्यात मला ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ ही मालिका मला आवडते. आधीची ‘तुझं माझं जमेना’पण छान होती. ‘होणार सून..’मधील आजी अर्थात रोहिणी हट्टंगडी आवडते. ‘तू तिथे मी’ मला अजिबात आवडत नाही. मंजिरी मूर्ख वाटते. तिला नवऱ्याचा संशय येत नाही, मात्र नवरा तिच्यावर संशय घेतो तो तिला खोडूनही काढता येत नाही. अशा व्यक्तिरेखा दाखवणे थांबवले पाहिजे.
स्त्रिया मालिका का बघतात याला माझं उत्तर म्हणजे, घरी राहणाऱ्या बायकांची चांगली करमणूक होते म्हणून मालिका बघतात.
मालिकांमधील नातेसंबंध वा प्रश्न यांच्याशी मी रिलेट करू शकते. आजकाल तरुण मुलं आई-वडिलांचं तितकं ऐकत नाहीत. त्यांच्या हातात पैसा आल्यामुळे त्यांना कष्टाच्या जीवनापेक्षा आरामदायी व चैनीचं आयुष्य आवडतं, हेच सर्व मालिकांमधून दाखवतात. तसेच पैसा सर्व नातेसंबंधात कटुता आणतो याची उदाहरणे प्रत्यक्ष जीवनातही घडतात.
मालिकेतील घरं, सजावट, त्यांचे कपडे, दागिने यातलं फार कळत नाही. मालिकेच्या कथानकाकडे माझं सर्व लक्ष असल्याने या गोष्टी कुणी लक्षात आणून दिल्याशिवाय कळत नाहीत.
मुलांनी कौटुंबिक मालिका बघायला हरकत नाही. हिंदी-इंग्रजी चित्रपट व मालिकांमधील अंगविक्षेपापेक्षा हे चांगलं.
बायकांना घरातली कामं उरकता उरकता करता येण्यासारखी सहज गोष्ट म्हणजे टीव्ही बघणे, असे असल्यामुळे महिलावर्ग मोठय़ा प्रमाणावर टीव्हीचा प्रेक्षक आहे. त्यातही दिवसातून इतक्या वेळा मालिका, त्यांचे भाग पुन्हा दाखवतात, की एक प्रकारे त्याचा मारा होतो. त्यामुळे आवडीने नाही, तर काहीसा अपरिहार्यतेमुळे स्त्री मालिका प्रेक्षक तयार होतो. टीव्ही सुरू असला की घरातील इतर कामे उरकता येतात व सोबतही होते.
शालिनी ओक
मी केवळ वेळ जाण्यासााठी मालिका बघते. मी ९३ वर्षांची आहे. अजून मला व्यवस्थित दिसते, ऐकू येते आणि या वयात विरंगुळा म्हणून मालिका पाहते. बऱ्याच मालिका बघूनदेखील कोणत्या मालिकेत कोणते पात्र आहे हे माझ्या लक्षात राहते. नावडती मालिका तू तिथे मी, त्यातील प्रिया आवडत नाही. पण तरी विरंगुळा म्हणून मी ही मालिका बघते. ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका व त्यातील श्री आणि जान्हवी आवडतात.
सुषमा कर्णिक, सेवानिवृत्त
नुकतीच सेवानिवृत्त झाल्यामुळे आता माझ्याकडे बऱ्यापैकी मोकळा वेळ आहे. पण वेळ आहे म्हणून टीव्हीसमोर ठिय्या देऊन बसायला मला आवडत नाही. नोकरीला होते तेव्हाही एखाद्-दोन मालिकाच मी पाहायचे, ज्या आजही मी पाहते. त्या अशा- ‘महादेव’, ‘होणार सून मी त्या घरची’ आणि ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’.
मी थोडीशी धार्मिक असल्यामुळे असेल किंवा आता वयोमानपरत्वे झालेला स्वभाव असेल पण मला ‘महादेव’ ही मालिका पाहायला आवडते. तशी ‘होणार सून मी त्या घरची’ ही मालिकाही आवडते. त्यातील माणसा माणसांचे नातेसंबंध, आयुष्यात येणाऱ्या समस्यांचे निराकरण कशापद्धतीने संयमाने केले जाऊ शकते याचा एक वेगळाच विचार मांडण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या मालिकेमधून पर्यावरण वाचवण्यासाठी काही संदेश तसेच स्त्री-पुरुष समानता यावरही भाष्य केले आहे. अर्थात हे सांगताना काही प्रसंग ओढून ताणून आणले आहेत पण तरीही त्यात हरकत घेण्यासारखं काही नाही.
पण काही मालिकांमध्ये दाखवलेले पात्रा-पात्रांमधील हेवेदावे, त्यांच्यातील मत्सर, त्यातून निर्माण होणारी कटकारस्थानं हे पाहायला अजिबात आवडत नसल्याने त्या टाइपच्या मालिका बघणं टाळतेच. आपल्या स्वत:च्या आयुष्यात अनेक प्रश्न असतात, समस्या असतात. त्या सोडवताना आपला जीव मेटाकुटीला येत असतो. त्यात या मालिकांमधील अशा पात्रांना कोण सहन करेल. दूरचित्रवाहिन्यांवरून प्रसारित होणाऱ्या एकाही मालिकेमध्ये दाखवण्यात आलेले वातावरण आणि आपलं आयुष्य सारखं नसतं. त्यामुळे मालिका आणि आपलं आयुष्य हे कधीच एकसारखं नाही याचं भान ठेवणं गरजेचं आहे.
माधुरी आशिरगडे
मालिकांमधून नकारात्मक करमणूक होते, तरीही लोक मालिका पाहताना दिसतात. मालिकेतील भव्यता व भपकेबाजपणा डोळ्यांना आनंद देतो, मात्र एकाही मालिकेचे कथाबीज उत्कृष्ट नसते. मालिकेची कथा कुठेतरीच भरकटत जाते. एकही मालिका प्रत्यक्ष जीवनाशी रिलेट करता येत नाही.
मानसी मागीकर, अभिनेत्री
आजकाल हुषार, विद्वतापूर्ण प्रेक्षक विचारात घेऊन मालिका बनवल्या जात नाहीत. उच्च दर्जाचं साहित्य कथा कादंबरी निवडली की मालिका चांगली होणार, पण असं अपवादानं घडतं. एखादी मालिका तीन चार महिने व्यवस्थित चालते, पण नंतर तशी रहात नाही. कथानक भरकटत जाते. अग्निहोत्र, पिंपळपान, गुंतता हृदय या मालिका चांगल्या होत्या, पण आजकाल तशा मालिका मोजक्याच आहेत. या मालिकांमध्ये कोणीतरी ओळखीचे आहे म्हणून मालिका पाहिली जाते.
मालती जामखेडकर
मी घरात एकटी असते. त्यामुळे सकाळच्या वेळी रेडिओवरील कार्यक्रम आणि रात्रीच्या वेळी टीव्हीवरील मालिका यांची सोबत मला असते. टीव्हीवरील मालिकांचं सांगायचं तर त्यात काही फारसा दम नसतो तरी देखील सवयीचा भाग म्हणून त्या मालिका पाहिल्या जातात. त्या मालिका पाहत असताना वेळ चांगला जातो असंच मी म्हणेन. त्यामुळे संध्याकाळी सात वाजता सुरू झालेला टीव्ही रात्री साडेदहापर्यंत सुरू असतो.
मी फक्त मराठी मालिकाच पाहते. सध्या प्रसारित होत असलेल्या ‘होणार सून मी त्या घरची’, ‘राधा ही बावरी’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकांबरोबरच सह्य़ाद्री वाहिनीवरून प्रसारित होणारे ‘हॅलो सखी’, ‘माझी माय’ तसेच विविध वाहिन्यांवरून दाखवण्यात येणारे रेसीपीचे आणि काही चर्चात्मक कार्यक्रम मी पाहते.
‘होणार सून मी..’ या मालिकेतील वातावरण हलकंफुलकं असल्याने ती मालिका पाहाणं आवडतं. त्यातील जान्हवी आणि श्रीसारखी समजूतदार मुलं प्रत्येकाची असावीत असं वाटतं. पण प्रत्यक्षात तसं असू शकत नाही याचीही जाणीव आहे.
मालिकांमध्ये जे काही दाखवलं जातं ते फार चांगलं असतं असं नाही, पण माझ्या दृष्टीने विचार केला तर या मालिकांमधून माझा वेळ चांगला जातो ही माझ्यासाठी जमेची बाजू आहे.
शुभदा सडोलीकर
केवळ टाईम पास म्हणूनच मालिका पाहिल्या जातात. मात्र मालिका पाहून काहीही घेत नाही. पाहून सोडून देते. सध्या होणार सून मी सारख्या मालिकेतून नव्या पिढीने काही तरी शिकावे असे आहे. मालिकांच्या आहारी जाणे होत नाही, त्यामुळे क्वचितच उत्सुकता असते. आठ दिवस पाहिली नाही तरी काही फरक पडत नाही.
सिंधू शेकदार, निवृत्त
मी स्वत:च्या मनोरंजनासाठी मालिका बघते. आजकालच्या काही ठरावीक मालिको आहेत ज्यातून शिकायला मिळत आणि कधी कधी काहीच नाही. निव्वळ मनोरंजनासाठी मालिका बघत असल्याकारणाने त्याच्याशी रिलेट करण्याचा अजिबात संबंध येत नाही. मालिकेतल्या व्यक्तिरेखा कधी कधी आसपास बघायला मिळतात, जसं उदारणार्थ ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ मधले आजी आणि नातवंडांचे वाद मला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात. आजकालच्या मालिकांचे विषय खूप काही
छान नसतात त्यामुळे ते विषय विचार करण्यासारखे नसतात. पण कधी कधी त्या मालिकांमधून नातेसंबंधांचं दर्शन मला होतं. सध्या जेवढय़ा मालिका आहेत त्यातली सगळ्यात आवडती मालिका म्हणजे ‘होणार सून मी हय़ा घरची’ ही मलिका खूप आवडते, कारण ती कौटुंबिक मालिका आहे. त्यातल्या श्रीच्या पाचही आयांनी फार सुंदर अभिनय केलाय आणि त्यांचा मुलगा श्री ही तितकाच प्रामाणिक आहे, प्रेमळ आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सत्यवादी आहे. त्या मालिकेतले श्री आणि जान्हवी हे दोघेही माझे आवडते आहेत. आणि जान्हवीच्या आईने जरी खलनायिकेची भूमिका केली असली तरी उत्तम अभिनय तिने केला आहे. ‘शेजारी शेजारी सख्खे शेजारी’ ही मालिका मला अजिबात आवडत नाही आणि त्यातला वैभव मांगलेही नाही आवडत. त्याची मला ओव्हर अॅक्टिंग वाटते आणि त्यामुळे ते बघण्याचा माझा संबंधच येत नाही.
काही काही मालिकेबाबतीत मी इतकी उत्सुक असते की आजचा भाग संपला की उद्या काय होणार याची उत्सुकता मला वाटते पण याचं कारण ते मालिका बनवणारे आहेत. कारण ते दाखवतातच असं की तुम्हाला ते त्या मालिकेत गुंतवून ठेवतात. पण मालिकेमध्ये दाखवलेल्या सोन्याने मढलेल्या बायका, त्यांचा मेकअप आणि भरजरी जरीच्या साडय़ा घालून घरात मिरवतात आणि झोपतातही तशाच ही गोष्ट मला अजिबातच पटत नाही, कारण रोजच्या जीवनात आपण असं कधीही वागत नसतो त्यामुळे मी या गोष्टी फॉलो करीत नाही.
सुचित्रा साठे, निवृत्त अधिकारी
मी वेळ असेल तेव्हाच मालिका बघते. एकूणच मालिकांमधील कथा, महिलांचे कपडे, दागदागिने, भव्यदिव्य बंगले, हवेल्या हा सगळा अतिरेकच वाटतो. पूर्वी दोन रंगांच्या साडय़ा कधीच नेसल्या जात नसत. आता ती फॅशन झाली आहे.
सुहास कुलकर्णी
नियमित मालिका बघायला मिळतेच असे नाही. पण मालिका बघायला आवडतात. चांगली गोष्ट, थीम असेल तर मालिका बघायला आवडते. आजकालच्या मालिका तशा चांगल्या आहेत. क्विझ कॉन्टेस्टसारखे कार्यक्रम लहान मुलांनी पाहावे, असे मला वाटते.
या पाहणीतून आम्हाला काय जाणवलं?
सर्व स्त्रीप्रेक्षकवर्ग बिनडोक नाही
– लता दाभोळकर
‘या बिनडोक बायकांमुळेच फाल्तू मालिकाही हिट होतात. या बायकांनी टीव्ही मालिकांची गणितंच बदलून टाकली आहेत..’ आमच्या जवळच्याच एका मित्राने तावातावाने मांडलेली ही प्रतिक्रिया.. सध्या टीव्हीच्या प्रेक्षकवर्गामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे, असं एका निरीक्षणात पुढे आलं आहे. त्यामुळे स्त्रीकेंद्रस्थानी असलेल्या मालिकांची सध्या चलती असून, अशाच मालिकांची निर्मिती मोठय़ा प्रमाणात केली जात आहे. त्यात अनेक निर्थक मालिकांचा (बहुतांशी हिंदी) भरणा आहे. हळूहळू मराठी मालिकाही त्याच दिशेने वाटचाल करीत आहेत. यातील अनेक मालिकांमध्ये स्त्रीपात्रं खूपच नकारात्मक पद्धतीने रंगवली जातात. आणि अशा मालिका स्त्रिया का बघतात, असा प्रश्न अनेकदा पडतो. परिणामी या सर्व स्त्रीप्रेक्षकांना ‘बिनडोक’पणाचं लेबलही सर्रास लावलं जातंय. परंतु हे सर्वेक्षण करताना सर्वच्या सर्व स्त्रीप्रेक्षकांना ‘बिनडोक ठरवणं’ स्त्रीप्रेक्षकांवर अन्याय करणारंच वाटतं. अर्थात, या मालिका नेमाने बघणारा पुरुषवर्गही आहे. जो अनेकदा मालिकेतल्या हीरोची फॅशन फॉलो करतो किंवा या मालिकांवर आपल्या मित्रवर्तुळात चर्चाही करतो.
‘‘अनेक मालिकांमध्ये स्त्रीपात्रं खूपच नकारात्मक पद्धतीने रंगवली जातात. आणि अशा मालिका स्त्रिया का बघतात, असा प्रश्न अनेकदा पडतो. परिणामी या सर्व स्त्रीप्रेक्षकांना ‘बिनडोक’पणाचं लेबलही सर्रास लावलं जातंय.’’
समाजात मनोरंजन, अभिरुचीची गणितं बदलली आहेत. टी.व्ही या माध्यमाला नको तितकं महत्त्व प्राप्त झालं आहे. विविध वाहिन्यांमुळे अनेक मालिकांचे पर्याय लोकांसमोर आहेत. सध्याच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत ताणतणावांचं प्रमाण वाढलं आहे. त्यात मनाला विरंगुळा म्हणून या मालिकांकडे लोक वळले आहेत. कौटुंबिक समाजव्यवस्था बदलली आहे. कुटुंब लहान होत चाललं आहे. त्यामुळे या मालिकांमधील एकीकडे हवीहवीशी आणि नकोनकोशी वाटणारी एकत्र कुटुंबपद्धती याबद्दलची असलेली अनाकलनीय ओढ.. मालिकांमधली चांगल्या माणसांच्या प्रेमात पडणं त्याचप्रमाणे दुष्ट माणसांचा दु:स्वास करणं अशा अनेक गोष्टींशी हा स्त्रीप्रेक्षकवर्ग एकरूप होतो. अगदी मालिका संपली तरी मित्र-मैत्रिणींशी या व्यक्तिरेखांवर चर्चा करताना दिसतो. या सर्वेक्षणात असेही जाणवले की अनेक स्त्रिया या मालिकांच्या इतक्या आहारी जातात की यामुळे आपण घरातल्या मंडळींची मनं कळत नकळत दुखावत आहोत, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. तर काही स्त्रियांनी या मालिका म्हणजे मनोरंजनापुरत्याच मर्यादित ठेवल्या आहेत. त्यांना या मालिकेचा भार डोक्यावर व मनावर किती प्रमाणात घ्यायचा याचं त्यांचं त्यांचं गणित पक्कं आहे. धावपळीच्या जीवनशैलीत केवळ एक विरंगुळा म्हणूनच या मालिकांकडे अनेकजणी बघतात. अनेकजणी त्यातल्या कथानकाकडे सदसद्विवेकबुद्धीने बघतात. त्यातल्या अतिरंजक गोष्टीकडे कानाडोळा करतात आणि जे चांगलं आहे आणि खऱ्या आयुष्यात अनुकरणीय आहे, तेच घेतात. जे नकोसं आहे ते विसरून जातात..
पुरुषांप्रमाणे केवळ मनोरंजनासाठी स्वत:च्या मनाला हवं ते करण्याची मुभा आजही आपल्या समाजातील स्त्रियांना नाही. अशा वेळी टीव्ही हे एकच माध्यम या स्त्रियांना जवळचं वाटतं आणि ते त्यांना सहज उपलब्ध होतं. त्यामुळे टीव्हीवरील मालिका हेच त्यांचं मनोरंजनाचं एकमेव साधन असतं. जे त्यांना घरातली कामं करताकरता एन्जॉय करता येतं.
हे सर्वेक्षण करताना सरसकट सर्वच बायकांना ‘बिनडोक’ ठरवण्याचं धाडस करणं चुकीचं ठरेल, हे मात्र प्रकर्षांनं जाणवलं.
दुधाची तहान ताकावर…
– भारती भावसार
मालिका बघणे हा ‘जस्ट किलिंग द टाइम’ या इंग्रजी वाक्प्रचारासाठी शोधलेला सोपा व बहुगुणी तोडगा आहे, असे समस्त महिला वर्गाशी केलेल्या चर्चेवरून वाटते. हाती असलेला वेळ कसा घालवायचा याचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यापेक्षा तो आला तसा जाऊ देणे ही बेफिकीर वृत्ती त्यामागे आहेच. मात्र महिलांच्या भावनिक गुंतवणुकीचे मालिका निर्माते व दिग्दर्शक यांनी उत्तम भांडवल केल्याचेही स्पष्ट जाणवते. काही वर्षांपूर्वी नियमित मालिका बघणे हा नित्यक्रमातील अविभाज्य भाग नव्हताच, पण आता तो झाला आहे व मालिका बघणे, त्यातील व्यक्तिरेखा, त्यांचे संवाद यावर चर्चा करणे हा सार्वजनिक जीवनातील प्रतिष्ठेचा मुद्दा बनू लागला आहे. चर्चा केलेल्या अनेकजणींनी अमक्या भागातले तमके संवाद किती प्रभावी होते, असे दाखल्यासकट व संवादाच्या तपशिलासह सांगितले त्यावेळी, टीव्ही पाहणे, पर्यायाने मालिका पाहणे त्यांचा आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे हे स्पष्ट झाले. पण अनेकजणींना आपला टीव्ही पाहण्यात किती वेळ खर्ची पडतो याची जाणीवच नाही. तितक्या गांभीर्याने हा मुद्दा अनेकींनी घेतलेलाच नाही.
आरती ओगले म्हणाली, ‘तू तिथे मी’ही मालिका व त्यातील मंजिरी ही व्यक्तिरेखा वाईट आहे. पण तरीही मी कधीकधी ती पाहते. कारण कसं बावळट नसावं याचं उदाहरण ती आहे. आजच्या काळात बायकांना अशा व्यक्तिरेखा पाहायला आवडतात कारण त्यांनी सोसलेला सासुरवास ( ज्या आता ५० च्या पुढील आहेत) त्यांना यानिमित्ताने आठवतो. स्वतचं दुख गोंजारायची संधी मिळते. कारण असंही आत्ता ते ऐकून घेण्यात घरातील इतर सदस्यांना तितकासा वेळ नसतोच. भावनिक कोंडमाऱ्याला एक आउटलेट मिळतं, असं वाटतं.
ज्या आत्ता पन्नाशीच्या पुढील आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना एकत्र कुटुंबाचे चित्रीकरण असणाऱ्या मालिका आवडतात कारण त्यांच्या लहानपणी एकत्र कुटुंबपद्धती त्यांनी पाहिलेली आहे. आत्ताच्या काळात विभक्त कुटुंबाचा नारा असल्याने दुधाची तहान ताकावर भागवण्यासारख्या या मालिका आवडीने पाहिल्या जातात.
अनेकजणींना मालिकेतील अमुक एक व्यक्तिरेखा रोल मॉडेल वगैरे वाटते. हे आश्चर्यकारक नसून धक्कादायकही आहे. कारण टीव्हीवरील मालिका मुळात कुठल्याशा कथानकावर आधारित आहेत. त्यांना काही अंशी वास्तवाचा पाया असला तरी तो नाटय़ निर्मितीचा भाग आहे. म्हणून मुळात जे अस्तित्वात नाही, त्या आधारावर जर लोक इतके विसंबून राहून आपली मते-विचार ठरवणार असतील, तर हा प्रवास अधोगतीकडे नेणारा आहे. एका आभासी जगाशी केलेली ही भावनिक गुंतवणूक वैचारिक ऱ्हासाचे लक्षण आहे, असे वाटते.
आपण ही मालिका का पाहतो, याचे प्रत्येकाचे उत्तर निराळे तशीच त्यामागची भूमिकाही निराळी होती. मात्र टाइमपास हे सरसकट कारण अनेकींनी पुढे केले. त्यातून ताणतणाव मुक्ती होते, असेही अनेकींना वाटते.
सहज सोपे मनोरंजन
– अमृता करकरे
मराठी वा हिंदी वाहिन्यांवरील आजच्या मालिकांमधून निव्वळ करमणूक अजिबात होत नाही. काही भागांनंतर त्यांचे कथाबीज कुठेही कसेही भरकटत जाते. विशेषत: मराठी मालिकांमधून खरेखुरे मराठीपण आणि मराठी संस्कृती हरवलेली आहे. बऱ्याच मालिकांचं विकृती ही प्रवृत्ती होऊ नये याचं भान हरवलं आहे. तरीसुद्धा त्या आवडीने आणि न चुकता बघितल्या जातात. याचं कारण साधारण मध्यमवयीन तसंच साठीकडे झुकलेल्या स्त्रियांसाठी मनोरंजनाचा तो एक सोपा, सहज उपलब्ध असलेला पर्याय आहे. घरात असलेल्या, फारसं सामाजिक जीवन नसणाऱ्या स्त्रिया सतत, नियमित टीव्ही मालिका बघतात कारण त्यांच्या दृष्टीने तो एक चांगला टाइमपास आहे.
प्रेक्षकांचे वेगवेगळे प्रकार जाणवले
– ग्रीष्मा जोग बेहेरे
सध्याच्या इलेक्ट्रोनिक युगात जे वयाची आणि शिक्षणाची मर्यादा न ठेवता कोणाचेही सहज मनोरंजन करेल, सहज वापरता येईल असे साधन म्हणजे टेलिव्हीजन होय. सर्वसामान्यपणे असे दिसून आले की लोकांना टीव्ही बघायला आवडतं. काही लोक मनापासून मालिका बघतात तर काही निव्वळ वेळ जाण्यासाठी. मालिकेत स्त्रियांच्या साडय़ा, घरं, गाडय़ा, दागदागिने या सर्व गोष्टी पाहाण्यात प्रेक्षकांना रस आहे. नवनवीन फॅशन ट्रेंड्स बघायला व फॉलो करायला बऱ्याच जण्ीांना आवडते. नातेसंबंधांवर आधारित मालिका बहुतेक सगळ्यांनाच आवडतात. मात्र लहान मुलांनी या बघण्यास त्यांच्या पालकांचा विरोध आहे. रियालिटी शो किंवा कार्टून्स यासारखे कार्यक्रम मुलांनी बघावे असे त्यांच्या पालकांना वाटते. नातेसंबंधाबद्दल बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे की मालिकांमध्ये दाखवलेले नातेसंबंध थोडय़ाफार प्रमाणात खऱ्या खुऱ्या आयुष्यात, पण बघायला मिळतात. मात्र काही मालिकेत या गोष्टी बऱ्याचदा बढा चढाके दाखवतात. मालिकेची कथा, संवाद, अभिनय या सर्व गोष्टीसुद्धा पटल्या तरच प्रेक्षक मालिका बघतात. एखादा नायक किंवा नायिका जर बदलले तर लोकांना ती मालिका बघायला आवडत नाही. तसेच जर कथेचा ट्रॅक बदलला तर प्रेक्षक ती मालिका पाहाण्याचे सोडून देतात.
मालिकेचा एकही भाग न चुकवणारे प्रेक्षकही आहेत, जे आवडत्या नायक किंवा नायिकेकरता अगदी जिवे-भावे मालिका बघतात. एखादी नवीन मालिका सुरू झाली व ती जर इतर मालिकांपेक्षा थोडी जरी वेगळी असेल तर ती जवळ जवळ सर्वानाच आवडते…
‘‘काही मालिकांची लांबी वाढली म्हणून मस्करी करणारा जितका मोठा वर्ग आहे तितकाच कथा फुलायला, कथेविषयी आणि पात्रांविषयी आपलेपणा वाटायला वेळ हा लागतोच. असे मानणाराही तितकाच मोठा वर्ग आहे.’’
मालिकांसोबतचे भावबंध
– अमिता बडे
मराठी मालिका विश्व विषयातील वैविध्य जपत चोखंदळ प्रेक्षकांना आपल्या वाहिनीशी बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यातूनच महिला प्रेक्षकांना मोठय़ा संख्येने आपल्याकडे आकर्षति करण्यासाठी त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेऊन त्यानुसार मालिकांची निर्मिती केली जाते. महिलांना कौटुंबिक मालिकांकडे असलेला ओढा पाहूनच त्यानुसार बऱ्याचशा वाहिन्या मालिका तयार करतात. त्याचप्रमाणे सोबतीला नवीन मालिकांची सुरुवात, यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होते. उदाहरण द्यायचे झाले तर स्टार प्रवाहवरील पुढचे पाऊल, देवयानी, स्वप्नांच्या पलीकडे प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. ई .टीव्ही मराठी एक मोहोर अबोल, सतराशे साठ सासूबाई, कोण होईल मराठी करोडपती, कॉमेडी एक्स्प्रेस यांसारख्या मालिकांतून स्पध्रेत राहण्याचा प्रयत्न करत आहे. असे जरी असले तरी बऱ्याचशा महिलांची पसंती ही झी मराठी वाहिनीला असल्याचे त्यांच्याशी साधलेल्या संवादामधून दिसून आले. झी मराठीवरील होणार सून मी त्या घरची, एका लग्नाची तिसरी गोष्ट, राधा ही बावरी, मला सासू हवी, होम मिनिस्टर, तू तिथे मी या मनोरंजनात्मक मालिकांसोबत नुकतीच संपलेली उंच माझा धोका या प्रबोधनात्मक मालिकेला मोठय़ा संख्येने प्रेक्षकवर्ग लाभला होता.
ज्यांना सासुरवासातून सुटका हवी आहे त्यांना हसवायला झीने फू बाई फू तर ईने कॉमेडी एक्स्प्रेस पुरवली आहे. प्रवाहने सासू-सून या हीट मंत्राला विनोदाची फोडणी देऊन आंबट गोड ही नवी मालिका सादर केली जाते. याशिवाय गुन्हेगारी विश्वाचे दर्शन घडविणाऱ्या लक्ष, पंचनामा यासारख्या मालिकांना मोठा प्रेक्षकवर्ग आहे.
काही मालिकांची लांबी वाढली म्हणून मस्करी करणारा जितका मोठा वर्ग आहे तितकाच कथा फुलायला, कथेविषयी आणि पात्रांविषयी आपलेपणा वाटायला वेळ हा लागतोच. असे मानणाराही तितकाच मोठा वर्ग आहे. ठराविक भागापुरती मालिकेची निर्मिती हि स्तुत्य संकल्पना काही अंशी रुजत आहे. प्रपंच, श्रीयुत गंगाधर टिपरे, ४०५ आनंदवन, असंभव, गुंतता हृदय हे राजा शिवछत्रपती, एका लग्नाची दुसरी गोष्ट यासारख्या मालिकांनी सतत वाढत असलेल्या टी.आर.पी.च्या मोहात न पडता योग्य वेळी मालिका बंद करून नवा पायंडा पाडला आहे. त्यामुळे यांसारख्या मालिका प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहेत.
‘‘मालिकांमध्ये दाखवलेलं सगळंच खरं नसतं आणि वास्तविक आयुष्यातही मालिकांमध्ये दाखवल्याप्रमाणे घडण्याचा संभवही फारच कमी असतो. ही जाणीव आपल्या मनात जाणिवेच्या कप्प्यात कुठे तरी असतेच तरी देखील या मालिका पाहिल्या जातात.’’
वाहिन्यांचे आणि त्यावरील मालिकांचे इतके वैविध्य असताना काही अपवाद सोडले तर सासू-सून या मूलभूत संकल्पनेतून निर्माते अजून बाहेर पडलेले नाहीत. कलाकार वेगळे , विषयाची मांडणी वेगळी पण आशय तोच दिसून येतो. ‘‘मराठी मालिका अजूनही सासू -सून यातून बाहेर पडताना दिसत नाही. काही ठिकाणी सासू चांगली सून वाईट तर काही ठिकाणी सून चांगली सासू वाईट. त्यामुळे प्रारंभी नावीन्य वाटले तरी नंतर आपण नवीन काही पाहात आहोत असे वाटत नाही . आणि मग शोध सुरू होतो नवीन कथेचा.. नवीन मालिकेचा.. ’’
अखेर मालिका म्हणजे काय? आपल्या मनातील काल्पनिक कथा पडद्यावर पाहण्याचे सुख , अरे मी यातूनच गेलो आहे अशा आठवणीत रमण्याची वेळ, असे कोणाच्याही आयुष्यात घडू नये म्हणून संवेदनशील मनाला लागलेली रुखरुख, निराशेने व्यापलेल्या दिवसात हास्य मिळणाचा हक्काचा विसावा आणि दिवसभराच्या धावपळीतून स्वत:साठी ,स्वत:च्या आवडीसाठी काढलेला घटकाभर वेळ. मालिकांमध्ये दाखवलेलं सगळंच खरं नसतं आणि वास्तविक आयुष्यातही मालिकांमध्ये दाखवल्याप्रमाणे घडण्याचा संभवही फारच कमी असतो. ही जाणीव आपल्या मनात जाणिवेच्या कप्प्यात कुठे तरी असतेच तरी देखील या मालिका पाहिल्या जातात. त्यावर चर्चाही होतात. एखादी मालिका आवडून जाते आणि जुळतात ते मालिकेसोबत, त्यातील कलाकारांसोबत भावनिक बंधही वाढतो. पण या बंधाचा अतिरेक होता कामा नये याची जाणीवही राहायला हवी. हा बंध काही क्षणांपुरता राहिला तर ठिक अन्यथा.. सुज्ञास अधिक सांगणे न लगे..
मालिका ताणू नका…
– इरावती बारसोडे
सध्या झी मराठीवर चालू असलेली ‘होणार सून मी हय़ा घरची’ ही मालिका महिलांमध्ये खूपच लोकप्रिय असलेली आढळून येते. त्यामधील व्यक्तिरेखांशी एकदम एकरूप होऊन लोक मालिका बघत आहेत. पुढील भागात काय होणार याची उत्सुकता मालिका बघणाऱ्या प्रत्येकालाच असते. पण खऱ्या आयुष्यामध्ये मात्र मालिकांधील व्यक्तिरेखा आपल्या आसपास बघायला मिळत नसल्याचे सर्वाचेच मत आहे. अशा व्यक्तिरेखा केवळ मालिकांमध्येच पाहायला मिळतात. ‘तू तिथे मी’, ‘मला सासू हवी’ या मालिकांनी आपली लोकप्रियता गमावली असल्याचे दिसते. मालिका खूप काळ ताणली असल्यामुळे तसेच अतिकटकारस्थानांमुळे महिलांना या मालिका आवडेनाशा झाल्या आहेत. या मालिकांमध्ये दाखवले जाणारे नातेसंबंध आपल्या आयुष्यातील नातेसंबंधांचे दर्शन देणार असतात यावर मात्र मतभेद आढळून येतो.
नोकरदार महिलांचे लॉजिक ठरलेले असते
– नेहा टिपणीस
मालिका का पाहता, काय पाहता, याबद्दल नोकरदार महिलांचे हमखास उत्तर टाइमपास असे असले तरी काय पाहायचे याचे त्यांचे स्वत:पुरते लॉजिक ठरलेले असते. कामावरून आल्यावर त्यांना काहीतरी विरंगुळा हवा असतो म्हणून त्या मालिका पाहतात. त्या टीव्हीला चिकटून बसत नाहीत, कारण कामावरून आल्या तरी त्यांना घरची कामे असतात, ती करत करत त्यांना मालिका हवी असते. त्यामुळे त्या मालिकांच्या आहारी जात नाहीत. एखादा भाग नाही पाहता आला तरी त्यांना चुकल्यासारखे वाटत नाही. प्रोमोमधून त्या लिंक लावून घेतात. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे त्या केवळ पाहात नाहीत तर काही प्रमाणात तरी चिकित्सा करतात. त्यामुळे एखाद्या मालिकेत अविश्वसनीय घटना वाढू लागल्या, मूळ कथेत पाणी घातले जाऊ लागले की त्या मालिकेकडे त्या पाठ फिरवतात. मुलांनी काय पाहावे, काय नाही, याबाबत त्यांची मते ठाम असतात. महत्त्वाचे म्हणजे मालिकेचा परिणाम स्वत:वर खूप कमी प्रमाणात करून घेतात. त्यातील व्यक्तिरेखांमध्ये गुंतणे होत नाही, पण मालिकेतील फॅशन, सजावट या सर्वाचा खरेदीवर मात्र परिणाम होताना दिसतो.
सुहास कुलकर्णी
आमच्याकडे आमचा नातू लहान असल्याने त्याला सांभाळावं लागतं, म्हणून नियमित मालिका बघायला मिळतेच असं नाही. पण मालिका बघायला आवडतात. राधा ही बावरी, तू तिथे मी, दिया और बाती या मालिका छान आहेत. राधा ही बावरीमधील राधा म्हणजेच श्रुती मराठे ही नवीन असून काम छान करते. चांगली गोष्ट, थीम असेल तर मालिका बघायला आवडते. आजकालच्या मालिका तशा चांगल्या आहेत. क्विज कॉन्टेस्टसारखे कार्यक्रम लहान मुलांनी पाहावेत असं मला वाटतं.
विनया मेहंदळे, आकाशवाणी, पुणे.
आजच्या मालिका, चांगलं वागणं हा गुन्हा आहे, एखाद्याच्या चुकीबद्दल त्याला माफ करणं हा बावळटपणा आहे, एखाद्याकडून छळ करून घ्यायचा आणि त्याला माफ करायचं हाच संदेश देतात. मग ती ‘तू तिथे मी’मधील मंजिरी असो, ‘होणार सून मी..’मधील जान्हवी असो. आजच्या एकाही मालिकेतून निखळ करमणूक होत नाही. त्या एक टाइमपास आहेत. कमी पैशात जबरदस्त मार्केटिंग करून ओढून-ताणून दोन दोन-तीन तीन वर्षे मालिका रेटल्या जातात. मात्र त्यांचा गुणात्मक दर्जा अगदीच सुमार असतो. हो! पण उंच माझा झोका, पूर्वीची प्रपंच आभाळमाया, वादळवाट या मालिका त्याला अपवाद आहेत. मालिकांमधील गुन्हेगारीही पटत नाही. कारण बहुतांशी कुटुंबं सुस्थितीत असतात. अशा कुटुंबांतील गुन्हा वेगळा आणि गरिबीमुळे घडलेला गुन्हा वेगळा याचं भानच या मालिका हरवून बसल्या आहेत. काही नायिका टोकाच्या चारित्र्यवान, सुसंस्कृत, सणवार-कर्मकांड-उपवास करणाऱ्या दाखवतात, तर काही टोकाच्या खुनशी, निर्घृण, कटकारस्थानी दाखवल्या जातात. उदा. ‘तू तिथे मी’मधील प्रिया.. हो पण त्यांच्या अभिनयाला नक्कीच दाद द्यायला हवी. अतिशयोक्ती नाही, पण खरं तर.. जादूटोणाविरोधी विधेयक अशा खलनायकी स्त्रियांच्या बाबतीत वापरायला हवं. मालिकांमधील स्त्री-पात्रांचा दृष्टपणा आणि मालिका चालविण्यातील संथपणा टोकाचं असतं. दर शुक्रवारी एका पॉइंटला आणून ठेवायची की सोमवारी पुन्हा पुढचा भाग पाहायला स्त्रिया उद्युक्त होतात; एवढं कसब मात्र त्यांना चांगलंच जमलं आहे. मालिका पुन्हा थकलेलं मन शांत होत नाही उलट उद्विग्नताच वाढते. मध्यमवयीन, वृद्ध महिलांना रिकामा वेळ बराच असतो, त्यांचं वाचनही पेपरपुरतं मर्यादित असतं. गर्दीमुळे बाहेर फिरायला जाणं शक्य होत नाही. मग करायचं काय? तर टी. व्ही. लावून बसायचं. त्या मनोभावे तो बघतात अगदी व्यसन लागल्यासारखं.
सध्याच्या मालिकांमधील ‘होणार सून मी..मधील ‘श्री’चं पात्र चांगलं रंगवलं आहे. हा मुलगा समजूतदार आहे, पण बावळट नाही. त्याची स्टाईल वेगळी आहे. त्याचे जान्हवीसह आपल्या पाच/ सहा आयांवरही प्रेम आहे. पण त्याचबरोबर त्याला त्यांचे विकपॉइंटही माहीत आहेत.
मालिकांमधील स्त्री-पात्रांचा झकपकपणा, भारीभारी दागिने, साडय़ा, अचंबित करणारे बंगले, कोठय़ा, दररोजचे नाश्ते, जेवणातील वेगवेगळे पदार्थ पाहिले की याशिवाय जीवनात दुसरं काही नाहीच का, असं वाटायला लागतं. ज्यांना एका वेळच्या जेवणाची भ्रांत असते त्यांच्यासाठी ते स्वप्नवत असतं, त्याचबरोबर त्यांचा असंतुष्टपणा वाढवणारं असतं. या मालिका, त्याचं पाश्र्वसंगीत, त्यातील पात्रं मालिका संपल्यानंतरही आठवणीत राहतील अशी अजिबात नसतात.