भूकंपाने तयार झालेलं तळं, ज्वालामुखीच्या क्रेटरमधलं जीवविश्व, पांढरं रण, बर्फोचं हॉटेल, नॉर्दर्न लाइट, तयार व्हायलाच ४० वषर्र् लागणारे लिव्हिंग रूट ब्रिज, लडाखची आईस हॉकी, व्हिएतनाममधलं कंदिलांचं शहर, न्यूझिलंडमध्ये जमिनीखालच्या गुहांमधील काजव्यांची गर्दी अशी जगभरातील अनोखी दहा ठिकाणे
आयुष्यभर लक्षात राहावं असं काही तरी पाहायचं असेल तर गोरोंगगोराला जावं लागेल. निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणून वर्णन करावं असं हे ठिकाण. जगातलं एकमेव क्रेटर ज्यामध्ये ज्वालामुखी उसळी मारून वर आला नाही, तर तो आतमध्ये खेचला गेला. तो लाव्हारस दुसरीकडून बाहेर पडला. पण जेथून तो भूगर्भात खेचला गेला त्या जागी मोठं विवर तयार झालं. तीच ही जागा, गोरोंगगोरा. तब्बल २२० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले गोरोंगगोरा आहे ते गरीब अशा टान्झानियामध्ये. पर्यटनासाठी विशेष काहीही नसलेल्या देशामध्ये. पण येथे येणाऱ्या अभ्यासकांनी हे क्रेटर प्रसिद्धीस आणलं. येथील समृद्ध वन्यजीवांच्या विश्वाचा वापर या देशाने खुबीने केला. पर्यटनाच्या कसल्याही सुविधा नसतानादेखील त्यांनी पर्यटन पूरक योजना आखल्या आणि आयुष्यात एकदा तरी पाहावंच असं हे ठिकाण संरक्षित केल, नावारूपास आणलं. स्वत:च असं एक वेगळं स्टॅण्डर्ड निर्माण केलं आणि जपलंदेखील. याची दखल घ्यावी लागेल.
हा सारा परिसरच ज्वालामुखी प्रवण आहे. याच भागात मुख्य डोंगरधारेपासून सुटावलेला (स्टॅण्ड अलोन) असा सर्वात उंच पर्वत किलिमांजरोदेखील आहे. ज्वालामुखी भूगर्भात खेचला गेल्यामुळे तयार झालेल्या या विवराचा परीघ २२ किलोमीटरचा आहे. त्याची सर्वाधिक खोली आहे चौदाशे फूट. वर्षांनुवर्षांच्या प्रक्रियेतून या क्रेटरमध्ये एक समृद्ध जैवसाखळी निर्माण झाली आहे. नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे या क्रेटरमध्ये बाहेरून कोणताही वन्यजीव येत नाही. एक जिराफ सोडला तर आफ्रिकेतील यच्चयावत सर्व प्राणी या क्रेटरमध्ये नांदताना दिसतात.
क्रेटरमध्ये तीन तळी आहेत, त्यापैकी दोन गोडय़ा पाण्याची, तर एकात खारे पाणी आहे. त्यामुळे एकाच वेळी गोडय़ा आणि खाऱ्या पाण्यावरील पक्षी आणि इतर वन्यजीव पाहता येतात.
गोरोंगगोरो कन्झव्र्हेशन एरिया आणि गोरोंगगोरो नॅशनल पार्क असे दोन स्वतंत्र विभाग येथे आहेत. क्रेटरमध्ये केवळ आदिवासींनाच चराईसाठी परवानगी आहे आणि उर्वरित भागात फक्त मसाई लोकांनाच राहता येते.
क्रेटरच्या परिघावर पाच हॉटेल्सना परवानगी देण्यात आली. त्यानंतर मात्र कोणत्याही नव्या हॉटेलला परवानगी दिलेली नाही. प्रत्येक हॉटेलला १०० खोल्या आणि कोणत्याही खोलीतून क्रेटर दिसावे अशी रचना आहे. हॉटेल्सची रचनादेखील क्रेटर आणि एकंदरीत वातावरणाला मारक ठरणार नाही अशी काळजी घेण्यात आली आहे. क्रेटरमध्ये वनखाते सफारी आयोजित करते. सफारीचे मार्ग ठरले आहेत. जेवणाची जागा, स्वच्छतागृहाची जागा सार काही अगदी आखीव-रेखीव आहे. हॉटेल्स तुलनेने खर्चीक असली तरी येथील पर्यटनाचे स्टॅण्डर्ड अनबिटेबल म्हणावे असे आहे. जगातील सर्वात गरीब देश असूनदेखील पर्यटनातील त्यांची मजल वाखाणण्याजोगी आहे. थोडक्यात काय तर गोरोंगोरो ‘मस्ट व्हिजिट’मध्ये आहे. बाकी काही पाहिले नाही तरी चालेल, पण गोरांगगोरो पाहावेच लागेल.
क्रेटरला लागूनच जगातील सर्वात मोठे असे १६ हजार पाचशे चौरस किलोमीटरचे सेरेंगिटी नॅशनल पार्क आहे. सेरेंगिटी म्हणजे एण्डलेस प्लेन. अंत नसलेले पठार, गवताळ जागा. येथूनच चाळीस किलोमीटरवर ओलदुवाई येथे मानवाच्या आदिम पाऊलखुणा सापडल्या आहेत. अभ्यासकांना अशाच पाऊलखुणा इथिओपियात सापडल्या, नंतर येथे. पण ओलदुवाईचा कालखंड त्याहीपूर्वीचा आहे.
केव्हा जाल : फेब्रुवारी – एप्रिल हा पावसाळी काळ सोडून केव्हाही..
कसे जाल : मुंबई – नैरोबी – किलिमांजरो
आत्माराम परब – response.lokprabha@expressindia.com