कमी कालावधीच्या प्रवासात, अत्यंत झगमगाटी काहीतरी हवंय आणि परदेशवारीदेखील घडायला हवी असेल तर हाँगकाँग आणि मकाऊसारखा दुसरा चांगला पर्याय नाही.
चार पाच तासांचा विमानप्रवास आणि दोन-चार दिवसात परदेशवारी यामुळे गेल्या काही वर्षांत थायलंड, सिंगापूर, हाँगकाँग, मकाऊ आदी ठिकाणच्या भारतीयांच्या भटकंतीत चांगलीच वाढ झाली आहे. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनामधील हाँगकाँग आणि मकाऊ ही दोन ठिकाणं तर भारतीयांची हॉट डेस्टिनेशन्स झाली आहेत. दोन्ही ठिकाणचा झगमगाट, शॉपिंगच्या भरपूर सुविधा अशांमुळे येथे पर्यटनाची चांगलीच भरभराट झाली आहे. आज याच ठिकाणांना आपण भेट देणार आहोत.
पर्ल नदीकाठचा हा देश म्हणजे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे औद्योगिक शहर म्हणून हाँगकाँग ओळखले जाते. १९व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत येथे चीनची किंग राजवट होती. त्या वेळी इंग्रजांबरोबर झालेल्या पहिल्या ओपीयम युद्धात त्यांची हार झाली, तह होऊन या देशाचा ताबा १०० वर्षे, म्हणजे १९९९ पर्यंत इंग्रजांकडे होता.
हाँगकाँग हे लहानसेच बेट, पण इंग्रजांनी ते फ्री-पोर्ट केल्याने खरेदी-विक्री व्यवसाय येथे जोमात होता. कमी जागेमुळे त्या वेळी गगनचुंबी इमारतींचे साम्राज्य तेथे होते. पण पुढे उत्तरेला कौलून व न्यु टेरिटरी हे विभाग अस्तित्वात आले. पूर्वी तेथील कायताक विमानतळ हादेखील शहरातच असल्याने शहरातून फिरताना विमान डोक्यावरून गेलेच तर ते गच्चीला घासून जाईल की काय असे वाटायचे. नवीन फॅशनचे कपडे, वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यांची उपलब्धता, नावीन्यपूर्ण पण चायनीज खाद्यपदार्थ यामुळे पर्यटन वाढले.
वाहतुकीसाठी जुन्या भागात ट्रामचे जाळे पसरलेले. दोन विभागांत वाहतुकीसाठी नदीतून फेरी, भुयारी रेल्वेही आली.
आपण प्रथम जेव्हा एखादा देश पाहावयास जातो तेव्हा तेथील हॉप ऑन हॉप ऑफ बस सेवेचा फायदा घेतल्यास उत्तम. त्यामुळे थोडक्यात शहर दर्शन होते व आपल्याला ज्या ठिकाणी जास्त वेळ द्यायचा त्याचा विचारही करता येतो. ती सोय येथे फेरी टर्मिनलला आहेच. त्यांचे तीन वेगवेगळे रूट आहेत. हाँगकाँग बेटावरील गगनचुंबी इमारतींमुळे झालेल्या अरुंद दरीतल्या वाहतुकीची गजबज असलेल्या रस्त्यांवरून जाताना शॉपिंग मॉल्स, रंगीत देवळे, मोनेस्ट्रीज पाहण्याची मजा औरच. तसेच उंचउंच इमारतींमध्ये खोल्या अगदी लहान. त्यामुळे प्रत्येक घराच्या गॅलरीतून टीव्हीच्या एरिअलप्रमाणे दांडी बाहेर येऊन त्यावर कपडे सुकवले जातात.
तिथले ओशन पार्क तर लहान मुलांचा अगदी फेव्हरिट स्पॉट. लहानमोठय़ा सर्वासाठीच वेगवेगळय़ा थरारक राइड्स आहेत. वीस वर्षांपूर्वी येथील एस्कलेटर लांबीच्या बाबत जगात अग्रस्थानी होत्या. व्हिक्टोरिआ पीक हे तेथील सर्वात उंच शिखर. फ्युनिक्युलरने वर गेल्यावर तेथून कौलून द्वीपाचा नजारा छान दिसतो. ह्य दोन ठिकाणी आपण जातोच. पण त्याव्यतिरिक्त आणखीही पाहण्यासारखे नक्कीच आहे.
स्टॅनली व रिपल्स बे बीच ही ठिकाणं शहरी धकाधकीपासून दूर, शांत. स्टॅनली ही जागा टेकडीवर असल्याने भरपूर हिरवाई. चायनीज काळात काटे सावरीची लाल फुलांनी नटलेली झाडं होती. ब्रिटिशांना हा परिसर फारच भावला. गव्हर्नरने चायनीज नाव बदलले व ते स्टॅनली झाले. तेथे त्यांचे बंगले, इमारती, भव्य वास्तू उभारल्या. आजही फिरताना आपल्याला ब्रिटिशकालीन वास्तू पाहावयास मिळतात. रिपल्स बे हा किनारा डोंगरामुळे जरा आतल्या बाजूला असल्याने लाटांचा भडिमार नाही. त्यामुळे पूर्वी समुद्री चाचांचे वास्तव्य होते. पण पुढे ब्रिटिश आरमाराने त्यांना हुसकावून लावले, म्हणून हे नाव पडले. तसेच मऊमऊ मखमली वाळू, पाण्याचे तापमान सोयीस्कर असल्याने स्थानिक व पर्यटक तेथली मजा घेत असतात.
अॅबरडिन, ओल्ड फिशिंग व्हिलेजमध्ये कोळी समाज आजही तेथे तरंगत्या घरांमध्ये जुन्या जमान्याप्रमाणेच राहतात. काही घरांबाहेर मासळी सुकायला ठेवलेली असते. बांधावर त्यांची जाळी, कुत्रे, कोंबडय़ा असतात. काही ठिकाणी लहान उपाहारगृहे दिसतात. ह्य भागाला व्हेनिस ऑफ हाँगकाँग म्हणतात. त्या खाडीतल्या इलाख्यात बोटीतून चक्कर मारताना आपण तिथल्या मासळी बाजारालाही भेट देतो. येथे सर्वात मोठे चायनीज फ्लोटिंग रेस्टॉरंट आहे. एका वेळी चार-पाचशे लोकांची तेथे व्यवस्था होऊ शकते.
शीम शा शुई ह्य स्टेशनहून हाँगकाँगपर्यंत आपण ट्रेनने जाऊन पुढे केबल कारने लान ताव आयलंड येथे पोहोचतो. येथून वरखाली जाता-येताना नवीन विमानतळावर येणाऱ्या विमानांची चहलपहल पाहता येते. वर पोहोचल्यावर बसने आपल्याला आयलंडची सफर घडवून आणतात. चीनमधून आलेल्या तीन बुद्ध भिख्खूंनी झोपडी, मोनेस्ट्री बांधली होती, तीच तेथील तो-पो लीन मोनेस्ट्री. त्यात बुद्धाच्या भूत, वर्तमान व भविष्यातील अवतारांचे पुतळे आहेत. आसपासच्या फुलांमुळे परिसर सदा सुगंधित असतो.
तिथल्या उंच टेकडीवरील २१ मीटर उंचीवरुन, खाली लोकांकडे दयाळू नजरेने पाहत आशीर्वाद देणाऱ्या बुद्ध पुतळ्याच्या पायथ्याशी येतो. २६५ पायऱ्या चढण्याचे दिव्य करून आपण चौथऱ्यावर येतो. येथे पूजा करणाऱ्या भक्तांचे तीन पुतळे आहेत. त्यावर असलेल्या कमळात बुद्ध, टिआन् टॅन बिग बुद्धा, पद्मासनात बसले आहेत. हे शिल्प पूर्ण व्हायला १२ वर्षांचा अवधी लागला. जवळच असलेल्या स्त्री भिख्खूंची ननरी आहे. तिथल्या उपाहारगृहात आपण शाकाहारी दीम समचा आस्वाद घेऊ शकतो.
सध्याचे इथले मुख्य आकर्षण म्हणजे व्हिक्टोरिआ हार्बर येथील स्काय १०० डेक. हॉप ऑन हॉप ऑफ बसच्या कौलून फेरीत आपल्याला या भेटीसाठी कॉम्प्लीमेंटरी तिकीट मिळते. अथवा १०० हाँगकाँग डॉलर्स मोजावे लागतात. लिफ्टने तळमजल्यावरुन १०० व्या मजल्यावर जायला फक्त १ मिनिटाचा अवधी लागतो. आत असलेल्या स्क्रीनवर आपला वेग दिसू शकतो. वरच्या मजल्यावरून हवामान स्वच्छ असेल तर दूपर्यंत नजारा मस्तच दिसतो. तेथे आरामात बसून कोल्ड कॉफीचे घुटके घेत सूर्यास्त पाहण्याची मजा औरच. अर्थात पैसे मोजूनच.
ह्य शिवाय आपल्याला बऱ्याच गोष्टींची बसराइडमधून झलक पाहायला मिळतेच. ह्य सर्व भूलभुलैयातून बाहेर नेथन रोड येथील चुंगकिंग मँशन येथे आल्यावर, चुकला फकीर मशिदीत, आपल्या माणसात आल्यासारखे वाटते. एका दिवसात शर्ट, पँट, सूट शिवून मिळणारे ते एकमेव ठिकाण म्हणायला हवे. त्याबरोबरच इतरही बरेच शॉपिंग करता येते. नजरेला व रसनेला तृप्त करण्याची सर्व साधने जागोजागी दिसतात. हा अनुभव घेण्यासाठी एखादी चक्कर झालीच पाहिजे असे मला वाटते.
पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनामधले मकाऊ हे शहर हाँगकाँगपासून ६५ कि.मी. अंतरावर पर्ल रिव्हरपलीकडे, तसेच चायना येथील ग्वांडाँग भागाशी सरहद्द करून, साऊथ चायना सी यांच्या परिसरातील बेट. हा विभाग तीनशे वर्षे चीनमधील किंग राजवटीखाली होता. १६व्या शतकात पोर्तुगीजांनी या जागेवर पदार्पण केले. व्यापारासाठी आशियाई देशात फिरताना समुद्राच्या पाण्याने भिजलेला माल सुकवण्यासाठी येथे उतरण्याची त्यांनी किंग राजाकडून परवानगी मिळवली. किनाऱ्यावर झोपडी बांधून त्यांनी येथे शिरकाव केला. स्थानिक लोकांना त्या जागेचे ेनाव विचारले असता गैरसमज होऊन ‘मे गा’ असे देवीचे नाव सांगितले गेले. पुढे पोर्तुगीजांनी आपल्या भाषेत त्याचे ‘मकाऊ’ केले.
सुरुवातीला भाडेतत्त्वावर जागा घेऊन व्यापार करण्यास सवलत दिलेले पाहुणे जम बसल्यावर चायनीजना आपल्या तालावर नाचवत होते, ते अगदी १९९९ पर्यंत. उद्योगधंद्यासाठी भरभराटीची जागा, आशियातील मुख्य व्यापारी बंदर म्हणून नाव झाल्याने देशोदेशीच्या लोकांचे आगमन होत गेले. ते लोक येताना आपल्याबरोबर रीतीरिवाज, सणसोहळे, घेऊन आलेच. त्यामुळे इथे आपणास खास करून चायनीज व पोर्तुगीज संस्कृतीचे फ्युजन पाहायला मिळते. शहराच्या आतल्या भागात कोलोनिअल स्टाइलच्या इमारती, सेंट लॉरेन्स चर्च, सेंट पॉल चर्चचे भग्नावशेष आहेत.
येथे हाँगकाँगहून पॅसंेजर बोटीने जावे लागते. किनाऱ्यालगतच कोळी, समुद्रमार्गे ये-जा करणाऱ्यांना सांभाळणारी देवी ‘अे मा’ ह्य देवीचे देऊळ आहे. ताओइझम्, कन्फ्युशिअस, बौद्ध अशा चिनी प्रकारातील वेगवेगळय़ा चालींची प्रार्थनास्थळे आहेत. ह्यवरून त्यांच्या संस्कृतीची कल्पना येते. खास चिनी शैलीत असलेल्या प्रवेशातून आवारात गेल्यावर चढावावर ही ठिकाणं आपण पाहू शकतो. खाली आवारात असलेल्या देवळात कासव छापसारख्या त्रिकोणी शंकुसम उदबत्या लटकत असतात. तर काही जण तिथे लहानशा दंडुक्यासारख्या उदबत्त्या लावत असतात. जवळच घंगाळातील पाण्यात हात बुडवून त्याच्या कडय़ांवर पंजा घासत असतात, कशासाठी ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. आरतीची वेळ झाली की मोठय़ा ढोलावर दांडा आपटून सूचित केले जाते. आरती सुरू झाली की कर्मचारी एका हाताने अगडबंब लोखंडी घंटेवर टोला मारतो तर दुसऱ्या हाताने ढोलावर दांडा मारतो. कार्यक्रम अगदी सुरात चालू असतो.
समुद्री हल्ल्यांपासून संरक्षण म्हणून तटावर किंग राजवटीपासून गिआ हा किल्ला बांधला होता. टेहळणीसाठीच्या मनोऱ्यावर दीपगृह होते. त्यावरून समुद्रच नव्हे तर गावावरही नजर ठेवता येत असे. पुढे तो निरिक्षण मनोरा झाला. आजही हवामान स्वच्छ असेल तर वीस मैलांपर्यंतचा टापू दिसू शकतो.
ग्रँड लिस्बोआ ही मकाऊ येथील सर्वात उंच हॉटेलची इमारत आहे. हजारांवर स्लॉट मशीन्स आहेत. इथला २३३ मीटर उंचीचा, मकाऊ टॉवर, तिथले कन्व्हेन्शन व साहसी करमणुकीसाठी खास आहे. साहसी वीरांसाठी टॉवरच्या बाहेरच्या बाजूने असलेल्या काचेच्या प्लॅटफॉर्मवरून बंजीजंप व प्लॅटफॉर्मवरून स्काय वॉक करण्याची सोय आहे. यशस्वींना टॉवरचा टी-शर्ट भेट म्हणून दिला जातो.
पोर्तुगीज कारकीर्दीत भरभराटीला असलेले व्यापारी केंद्र त्यांच्या गच्छंतीनंतर थोडी आपटी खाऊन आता चीनचे मोठे पर्यटक केंद्र झाले आहे. नदीकिनारी लास व्हेगाससारखी मोठमोठी कॅसिनो रिसॉर्टस् जगभरातून पर्यटकांना आकर्षित करतात. कॅसिनो दुपारी बाराच्या पुढे सुरू होऊन पहाटे दोन-तीन वाजेपर्यंत चालतात. पण खरी मजा रात्रीच. त्यांची रोषणाई, संगीताच्या सुरावर थुई थुई उडणारे कारंजे, वेगवेगळे शो काही विचारूच नका.
व्हेनिशन रिसॉर्ट हे तिथले सर्वात मोठे. इथल्या शॉपिंग आर्केडमध्ये पहिल्या मजल्यावर भरपूर ब्रॅण्ड्सची दुकाने, जेवणाचे ठेले आहेत. वरचे छत आस्मानी रंगाचे आकाश आहे असा भास निर्माण केला आहे. इथे गेलो की किती वेळ गेला ते कळतच नाही. दूरवर अमेरिकेतील लास वेगासच्या मोहमयी नगरीत जाण्यापेक्षा मकाऊ जवळ असल्याने ती मजा आपल्याला येथेही मिळू शकते.
गौरी बोरकर – response.lokprabha@expressindia.com