लग्न, त्यातही मुलीचं लग्न ही बाब आपल्याकडे जणू काही सार्वजनिकच असते. गंमत म्हणजे जिचं लग्न अपेक्षित आहे ती मुलगी सोडून बाकी प्रत्येकाला त्याबाबत बोलायचा अधिकार असतो. त्या मुलीचं मत विचारात घेणं कुणालाच गरजेचं वाटत नाही.

फेसबुकवर एका मैत्रिणीच्या भिंतीवर वाचलेली ही पोस्ट – ‘माझं स्टेटस ‘सिंगल’ असणं माझ्या मित्रमंडळींना (विशेषत: लग्न झालेल्या मित्रमंडळींना) एवढं का खुपतंय? मुलीचं लग्न ही इतकी सार्वजनिक गोष्ट आहे का? की असं दुसऱ्यांच्या खासगी आयुष्यात नाक खुपसणं हे सामाजिक कार्य वाटतंय?..’

या फेसबुक मैत्रिणीचं वय असेल तिशीच्या जवळपास. म्हणजे फारच उशीर झालाय की.. आता जरा सीरिअसली विचार केलाच पाहिजे.. असं वाटणारे अनेक जण सध्या तिच्या लग्नाच्या काळजीत आहेत. वास्तविक मैत्रीण फार निवांत. स्वतंत्र. लग्न मग ते कुणाचंही असो, ती वैयक्तिक बाब मानणारी. पण तिच्या आसपासच्या ‘आप्त’जनांना (म्हणजे आपल्या समाजाला) हे मान्य हवं ना! मग ऊठसूट तिला विचारत सुटणार.. लग्न कधी करणार? कुणी आहे का मनात? इतके दिवस ‘सिंगल’ कशी काय? सोपं नसतं असं सिंगल राहणं.. कुठे अडलंय नेमकं? आम्ही मदत करू का? वगैरे आणि शेवटी शहाजोग सल्ला ठरलेला- मुलीच्या जातीला हे असं इतके दिवस थांबून राहणं योग्य नाही. मुलींचं सगळं कसं वेळच्या वेळी व्हायला पाहिजे.

मैत्रीण म्हणते तसं – मुलीचं लग्न ही आपल्याकडे सार्वजनिक गोष्टच आहे. लग्नाळू मुलींची गोष्ट ही अशी कुणीही कुणालाही सांगावी, विचारावी अशी. सार्वत्रिक. त्या वयात आलेल्या मुलीचं लग्न हेच समाजाच्या दृष्टीने अंतिम ध्येय. म्हणजे एखादी पंचविशीच्या पुढे गेलेली मुलगी रस्त्यात, कार्यक्रमात, सणा-समारंभांना, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप अशा अशा व्हच्र्युअल जगांत, अगदी कुठेही बऱ्याच दिवसांनी भेटली आणि तिचं लग्न व्हायचं बाकी आहे, याचा सुगावा जरी लागला तरी संवादाची सुरुवात होते, ‘काय यंदा कर्तव्य आहे ना?’ या प्रश्नाने. त्याचं उत्तर नकारार्थी आलं तर वर उल्लेखलेले अनेक अनाहुत सल्ले. (तिशी ओलांडली असेल तर सल्ल्यांचा टोन आणखी वेगळा.. दोष देणारा.) हे बोलणाऱ्या व्यक्ती अगदी कधी तरी, क्वचित भेटणाऱ्या आणि त्यांना अगदी लग्नाला बोलवायचादेखील आपला विचार नसलेल्या असू शकतात. एकदा हा सार्वत्रिक चर्चेचा मुद्दा आहे, असं म्हटल्यावर मग सल्ला, मतं, प्रतिक्रिया याला कशाला हवंय नातं आणि मैत्री. नुसती ओळखही पुरते तेव्हा.

प्रत्यक्ष लग्न ठरवायच्या वेळी किंवा त्यात काही अडचण, काही मदत हवी असल्यास यातले किती जण मदतीला येणार हे पुन्हा विचारायचं नाही. मग अचानक ती ‘वैयक्तिक’ बाब होऊन जाते. ते प्रश्न ज्याचे त्याने सोडवायचे. कारण ते खासगी. त्यावरूनदेखील या फेसबुक पोस्टवर अनेक जण व्यक्त झाले.

मैत्रिणीच्या फेसबुक भिंतीवरच्या या पोस्टला शेकडय़ाने ‘लाइक’ आले. त्यातल्या काही मुलींनी, आम्हालादेखील असाच अनुभव येतो. पण ‘नन ऑफ युवर बिझनेस’ असं सांगण्याचं धैर्य काही होत नाही किंवा तेवढं स्वातंत्र्यदेखील नाही, असं सांगितलं. तुला लग्न करायचंय का आता, असं कुणी विचारलंच नाही. आमच्या डोक्यातही त्या वयात लग्नखेरीज दुसरा विचार नव्हता. तसा असू शकतो, असं वाटलंही नाही तेव्हा. कारण तेच लहानपणापासून ऐकत आलो.. असंही काही जणींनी शेअर केलं. आत्ताची पिढी त्या मानाने बोल्ड, असं काही आधीच्या पिढीतल्या स्त्रियांचं मत. पण तरीही काही गोष्टी वेळच्या वेळी झाल्याच पाहिजेत.. हा अट्टहास काहींनी व्यक्त केला.

मुलीचं लग्न म्हणजे आयुष्य पणाला लावायची घटना आहे अजून आपल्याकडे. मुलीचं लग्न ‘वेळच्या वेळी’ होणं, कार्य ‘यथासांग’ पार पडणं ही सामाजिक जबाबदारी असल्याच्या थाटात संपूर्ण समाज तिच्या मागे हात धुवून लागलेला असतो. मुलीचा प्राधान्यक्रम काय, तिचे त्यामागचे विचार, तिची आवड, तिची पसंती या गोष्टी महत्त्वाच्या नसतातच आपल्यासाठी. बरं.. आपल्या याच समाजात मुला-मुलींचं संगोपन या पद्धतीनं झालेलं असतं, की लहानपणापासून मुलीचं लग्न, चांगलं स्थळ मिळणं हेच अंतिम ध्येय असल्याच्या थाटात तिच्याशी वागलं – बोललं जातं. ती वयात येताना तारुण्यसुलभ भावनांबरोबर चांगल्या स्थळाचीच स्वप्नं बघते मग. त्यात वावगं काय मग? वावगं काहीच नाही. हीच तर रीत आहे. पण लग्न हेच एकमेव अवकाश असं न मानणाऱ्या मुलींचं काय मग? त्यांना तुमच्या या समाजात काही स्थान उरतं का? जरा किलकिले डोळे व्यवस्थित उघडून आसपास पाहिलंत तर अशा अवकाश विस्तारलेल्या मुलींची संख्या मोठी होतेय असं दिसेल. आपल्या आसपासची, नात्यातली, ओळखीतली एक तरी मुलगी असेलच जिचं ठरलेलं लग्न मोडलंय, जिचं लग्न ठरायला वेळ लागतोय, जिला लग्नच करायचं नाहीय, जिला इतक्यात (समाजाने ठरवलेल्या वयात) लग्न करायचं नाहीये, किंवा लग्न या विषयावर जिची मतं यापेक्षा भिन्न आहेत. अशा मुलीला आपल्या समाजप्रिय मानसिकतेने एकदा तरी ‘काय बाई तुझ्या लग्नाचं?’ असं विचारलं असेलच. लग्न ही वैयक्तिक बाब आहे, हे वाक्य मान्य असणारे अनेक असतील. पण अशा प्रसंगी मात्र आपलं समाजप्रिय मन झुंडीच्या मागे जातं आणि त्या मुलीला तिच्या सिंगल स्टेटसचा जाब विचारत राहतं.

अशा सो कॉल्ड लग्नाळू वयातील मुलींना स्थळ सुचवायचा काहींचा उत्साहदेखील वाखाणण्यासारखा असतो. एखादय़ा वेळी मुलीनं त्याविषयी नापसंती व्यक्त केली की, ‘हे कसं शोभत नाही मुलींना’ची रेकॉर्ड सुरू होते. स्थळासंदर्भात थोडी चौकशी मुलीनं स्वत: केली तर.. ‘एवढय़ा चिकित्सक वृत्तीमुळेच कुठे जमत नाही मग’, हे बोलायला पार्टी तयार.

हे सगळं का होतं.. आपण स्वत:देखील या सगळ्यात नकळतपणे कधी ना कधी सामील असतो का? मुलीचं लग्न ही खरंच एवढय़ा चिंतेची बाब असावी का? मुलगा वयात आला, तर त्यालादेखील असे शहाजोग सल्ले देणारे असतात. पण मुलांना दिले जाणारे सल्ले आणि मुलीला सांगण्यात येणाऱ्या गोष्टी याच्या टोनमध्ये फरक असतोच. पुन्हा मुलगी लग्न करते ती एका व्यक्तीशी नव्हे तर साऱ्या कुटुंबाशी. असा एक सैद्धांतिक निष्कर्ष काढलेलाच असतो. दोन कुटुंबांना जोडणारी म्हणून तिचं लग्न या समाजाला महत्त्वाचं वाटत असतं. पुन्हा ते ‘वेळच्या वेळी’ झालं की कसं पुढची कार्यही वेळेत होणार आणि या समाजाला हायसं वाटणार. म्हणजे हे खरोखरच सामाजिक काम. या अशा ‘होलिस्टिक अप्रोच’नेच आपल्याकडे लग्नाळू मुलीची आवर्जून चौकशी केली जाते.

दोन्ही कुटुंबांना जोडण्याची, जवळ आणण्याची प्राथमिक जबाबदारी मुलीचीच असते. का.. कारण ती आपलं घर सोडून नव्या घरी जाणार असते. आपल्याकडे मुलगी ‘दिली’ जाते. त्यामुळे या निर्णयात ती ‘देणारे’ आणि ‘घेणारे’ यांचाही वाटा असतोच. म्हणजे या अर्थानेही मुलीचं लग्न हा सार्वजनिक मामला. लहानपणापासूनच तिच्या मनावर हे बिंबवलं जातं की, लग्न करून दुसऱ्या घरी गेल्यावर कसं होणार वगैरे. मुलगी झाल्यापासूनच तिचं लग्न, ती चांगल्या घरात पडली पाहिजे, याचा प्रयत्न सुरू असतो. तिच्या लग्नासाठी जन्मापासूनच पै पै जमवायला हवा असतो. मुलीचं लग्न हेच तिच्या आयुष्याचं अंतिम ध्येय असल्याची जाणीव अशा प्रकारे तिला लहानपणापासून करून दिली जाते. भले मुलगी शिकली, मोठी झाली तरी आयुष्यात महत्त्वाची गोष्ट एकच. लग्न आणि मग ते झालं नाही, करावंसं वाटलं नाही, त्यापलीकडे काही गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या, तर मुलीला त्याबद्दल विचारायचा हक्क प्राप्त होतो, समाजाला.

ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट. हा असा नामविस्तार असणारं ठष्ट हे नाटक दोन वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलं. मधल्या आठएक महिन्यांच्या विश्रांतीनंतर नवीन संचात त्याचे धडाकेबाज प्रयोग सुरू आहेत. नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांमध्ये महिलांची संख्या जास्त. लग्नसंस्थेविषयी भाष्य करणारं, स्त्रीवादी विचारसरणीचं, काहीसं अंगावर येणारं हे नाटक. नाटकातली काही पात्रं एकूण लग्नव्यवस्थेविषयीच खूप वेगळी, बोल्ड भूमिका मांडतात. तर काही पात्र टिपिकल समाजाचा चेहरा दाखवणारी.. साचेबद्ध. लहानपणापासून त्याच समाजाने रूढ केलेल्या समजुती वागवणारी. नाटक संपल्यावर बाहेर पडतानादेखील साधारण अशाच प्रतिक्रिया ऐकू येतील. पटलं, थेट भिडलं, वेगळं वाटलं, पहिल्यांदाच काही जाणवलं असं म्हणता म्हणता.. ‘पण’मध्ये अडकलेल्या. समाजात राहायचं तर काही गोष्टींचे तरी विधिनिषेध पाळले पाहिजेत वगैरे म्हणणाऱ्या. आपल्याकडे बहुतेक सगळ्या ‘सामाजिक’ प्रश्नांचं नेमकं हेच होतंय सध्या. जाणवताहेत, भिडताहेत, पटताहेत, पण तरीही असं कसं बदलणार एकदम सगळं. समाज असा एका झटक्यात बदलत नसतो, असं म्हणत ‘पण’मध्ये अडकवतोय आपण त्या प्रश्नांना. त्या समाजाचा आपण एक भाग आहोत, आपण बदलतोय का आधी. आपण व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करतोय, पण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर काही नसत्या चौकशांनी आणि साचेबद्ध विचारांनी घाला घालत नाही का याचा विचार कोण करतोय? लग्नासारख्या खासगी, वैयक्तिक निर्णयाला सार्वजनिक करणं, एखाद्या मुलीचं व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेत तिला साचेबद्ध चौकटीत उभं करणं आणि तसं न करणाऱ्यांना लेबल लावून मोकळं होणं.. समाज तसाच आहे अजून असं म्हणत हे खपवून घेणं हे सगळं या ‘पण’मुळे घडतंय. कधी संपवणार आपण हे ‘पण’नंतरचे प्रश्न आणि कधी थांबवणार चर्चा लग्न ठरलेल्या, न ठरलेल्या मुलींच्या आयुष्याच्या? लग्नाच्या गोष्टींपलीकडेदेखील आयुष्यात ऐकण्यासारखं, बघण्यासारखं, चर्चा करण्यासारखं बरंच काही आहे, ते आपल्या डोळ्यांना कधी दिसणार?
अरुंधती जोशी – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader