विचारस्वातंत्र्य हे महत्त्वाचे मानवी मूल्य मानले जाते. विचार म्हणजे तरी शेवटी काय असतात? भाषेशिवाय ते शक्य असतात?, म्हणूनच भाषा कधी तरी समजून घ्यायला हवी.

भाषेचा वापर आपण सर्वजण सर्रास करत असलो तरीही त्यावर विचार कितपत करतो हा प्रश्नच आहे. भाषेचाच वापर करून आपण जगाचे वर्णन करतो आणि एका वेगळ्या अर्थाने आपण जगत असलेले जग अस्तित्वात येते. आपणही या जगाचाच एक भाग असतो त्यामुळे, त्याच प्रक्रियेतून आपणही वेगळ्या अर्थाने जन्माला येत असतो. म्हणजेच आपले नाव घेऊन कोण, असा प्रश्न जेव्हा पलीकडे एखादी व्यक्ती विचारते, तेव्हा अनेकदा सांगणारी व्यक्ती आपले वर्णन करते किंवा गुणविशेष सांगते. हे सांगताना त्यावेळेस तीदेखील भाषेच्याच माध्यमातून आपले व्यक्तिचित्र उभे करते, हा भाषेतून झालेला आपला जन्मच असतो एका वेगळ्या प्रकारचा. हे जग आणि आयुष्य खूप कठीण आहे, असे कुणी म्हणते त्यावेळेस कदाचित आपल्याला या जगाचा परिचय ज्या पद्धतीने करून देण्यात आला आहे, त्यात काही तरी गफलत असते. कारण भाषा खूप सोपी आहे. तिचा वापर कोण, कसा करतो यावर तिचे स्वरूप ठरते. या वापरातूनच माणसाचा दृष्टिकोन तयार होत असतो. हाच दृष्टिकोन समोरचा माणूस कसा आहे, त्याच्या निष्कर्षांप्रत पोहोचण्यासाठी वापरला जातो. एकुणात काय तर भाषा दृष्टिकोनही देते आणि तुमचे रूप तयार करण्याचे कामही करत असते. भाषा तर प्राण्यांनाही असते, पण माणसाची भाषा जगात सर्वात प्रगत मानली जाते. ती करत असलेले संवादाचे काम मात्र म्हटले तर अतिशय ‘प्राथमिक’ अशाच स्वरूपाचे असते. एका तत्त्ववेत्त्याने म्हटले आहे की, मासोळी पाण्यात विहरत असते तसा माणूस भाषेमध्ये विहरत असतो. परंतु आपण भाषेशिवाय जगू शकत नाही, याची जाणीव माणसाला तुलनेने कमी असते. तो भाषेबाबत फारसा गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. भाषेशिवाय तुमचे, माझे, जगाचे कुणाचेच वर्णन करणे शक्य नाही; एवढी ती आपल्या सर्वाच्या आयुष्यात महत्त्वाची आहे. विचारस्वातंत्र्य हे महत्त्वाचे मानवी मूल्य मानले जाते. विचार म्हणजे तरी शेवटी काय असतात? भाषेशिवाय ते शक्य असतात?, म्हणूनच भाषा कधी तरी समजून घ्यायला हवी.

ए. जे. बोक्चिनो या कलावंताची चित्रे पाहताना क्षणभर आपण काय पाहात आहोत, असाच प्रश्न आपल्याला पडतो. वर्तमानपत्रातील मथळ्यासारखी वाटणारी वाक्ये का निवडली आहेत आणि त्याला विविध रंग का दिले आहेत हे सुरुवातीस पडलेले प्रश्न असतात. मग आपण जाणीवपूर्वक चित्र पाहू लागतो त्यावेळेस लक्षात येते की, या कलावंताने विशिष्ट विषयाच्या मथळ्यांना विशिष्ट रंग अशी वर्गवारी केली आहे. म्हणजे पर्यावरणाशी संबंधित बातम्यांना हिरवा रंग, युद्धाशी संबंधित बातम्यांना लाल रंग तर राजकारण— निवडणुका यांच्यांशी संबंधित बातम्यांना पिवळा रंग अशी ही वर्गवारी करण्यात आली आहे. हे चित्र आपण दूरवरून पाहातो त्यावेळेस लक्षात येते की, एक मोठा कॅनव्हॉस असून त्यावर लाल रंगाचेच प्राबल्य आहे. चित्राजवळ जावून कालखंड पाहिला तर १९९० ते २००० असा कालखंड पाहायला मिळतो. एका कालखंडामध्ये १९८४ ते १९८९ असा कालखंड दिसतो तिथेही युद्धखोरीचेच प्राबल्य आहे. चित्र जरा बाराकाईने पाहाता आले व वाचता आले की, लक्षात येते युद्धाचे ढग हळूहळू कसे गडद होत गेले. केवळ मथळ्यांवरूनही हे बारकावे लक्षात येतात. इथे मथळे आणि त्यांना केलेले रंगांचे कोडिंग या व्यतिरिक्त काहीच नसते. कोणत्याही प्रकारचे, कोणतेही टिपण इथे माहिती देण्यासाठी बाजूला लावलेले नसते. तरीही आपल्याला काहीही न सांगताच कळते.. ते शब्दांच्या पलीकडले असते. खरे तर एका वेगळ्या नजरेने पाहायचे तर कदाचित ते वर्तमानपत्र, त्या दिवशी आपण पाहिलेले असेलही. परंतु आज ज्या पद्धतीने ते चित्रांतून समोर येते त्यात आपण रिडिंग बिटविन द लाइन्स करत असतो! म्हणजेच त्यामध्ये सरळ न दिसणारा अर्थ वाचण्याचा प्रयत्न करत असतो, नेमके हेच बोक्चिनोसारख्या कलावंताचे यश असते. म्हटले तर ही साधीसुधी गोष्ट आहे. मथळे एकत्र करायचे, त्याची कालक्रमानुसार मांडणी करून कलर कोडिंग करायचे. ही साधीशी वाटणारी कृती कष्टपूर्वक केली जाते आणि विचारपूर्वक त्याची अंमलबजावणी होते तेव्हा ती खूप काही अभिव्यक्त करणारी कलाकृती म्हणून आपल्यासमोर येते.

ए. जे. बोक्चिनो या कलाकृतीबद्दल सांगतो, प्रकल्पासाठी मी न्यूयॉर्क टाइम्समधील प्रसिद्ध झालेले मथळे इंटरनेट आणि मायक्रो फिल्मिंगच्या माध्यमातून गोळा केले. त्याचे फॉण्टस् मिळवून, कालक्रमानुसार त्यांची रचना केली, त्यांचे रंगीत कोडिंगही केले. म्हणजेच राजकारण, गरीबी, युद्ध, पर्यावरण अशा वेगवेगळ्या विषयांच्या बातम्यांच्या मथळ्यांसाठी लाल, पिवळा, जांभळा, हिरवा असे रंग वापरले. दुरून बातमीचा मथळा वाचता आली नाही तरीही त्या रंगांच्या वैशिष्टय़पूर्ण वापरामुळे गेल्या अनेक वर्षांंमध्ये नेमके काय घडले, कोणत्या गोष्टीला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले किंवा मग जगातील प्रख्यात वर्तमानपत्राने कोणत्या विषयांना सर्वाधिक महत्त्व दिले, हे आपल्या लक्षात येते आणि कालक्रमानुसार महत्त्वाच्या विषयांचा पट सहज उलगडत जातो.

न्यू ओर्लेआन्समधील तुलान विद्यपीठातून ए. जे. बोक्चिनोने ललित कलेमध्ये पदवी संपादन केली तर फिलाडेल्फिआतील टेम्पल विद्यपीठातील टेलर स्कूल ऑफ आर्टमधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. वॉशिंग्टन डीसीच्या हेम्फिल फाईन आर्टस् च्या निवासी कला शिबिरामध्येही बोक्चिनोचा सहभाग होता.

जनसंवाद माध्यमांमधील प्रसिद्ध होणाऱ्या माहितीचे विश्लेषण, त्याचे दस्तावेजीकरण याचा वेध त्याच्या कला प्रकल्पांमध्ये असतो. हे अतिशय जिकिरीचे, कष्टपूर्वक करावे लागणारे असे कला प्रकल्प असून ते तुम्हाला समाजाचा इतिहास विश्लेषणाच्या अंगाने कथन करतात, असे बोक्चिनो सांगतो.

सौदी अरेबियाच्या राजाची अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्याशी भेट, तेल आणि लष्करी मदत यावर प्रदीर्घ चर्चा, असेच मथळे सुमारे १० वर्षांंच्या एका कालखंडामध्ये पूर्णपणे पाहायला मिळतात. तेल त्यानिमित्ताने झालेले राजकारण आणि दोन्ही देश एका वेगळ्या अर्थाने एकमेकांशी कसे खेळले, त्याचा जागतिक राजकारण आणि अर्थकारणावर कोणता व कसा प्रभाव पडला, ते संपूर्ण चित्र या कालखंडातील बोक्चिनोच्या कलाकृतीत उमटलेले दिसते.

या कलाकृतीला अधिकृत इतिहास म्हणता येत नाही. न्यूयॉर्क टाइम्स हे जगातील अग्रगण्य वर्तमानपत्र असल्याने त्या त्या वर्षांचा वेध घेणारा नकाशाच या कलाकृतीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अर्थात हे सारे न्यूयॉर्क टाइम्सच्या नजरेतून असल्याने ते अधिक महत्त्वाचे आहे. कारण कोणताही निर्णय न्यूयॉर्क टाइम्स काळजीपूर्वकच घेते याकरिताच कदाचित त्याला जगभरात अधिक महत्त्व आहे. एकाच वेळेस ही कलाकृती इतिहासावर दृष्टिक्षेप टाकते, जनमानसाच्या स्मृती चाळविते आणि त्याचवेळेस रसिकांना मनातल्या मनात प्रतिक्रिया नकळत का होईना व्यक्त करण्यास प्रवृत्त करते; यालाच समकालीनत्व म्हणणार का, याचे उत्तर आता ज्याने त्याने तपासून पाहण्यासारखेच आहे. कारण समकालीनत्वामध्ये व्यक्तिगततेलाही अनन्यसाधारण महत्त्व असते!
विनायक परब –

Story img Loader