११ सप्टेंबर २०१५ ही आचार्य विनोबा भावे यांची १२०वी जयंती. आजच्या धकाधकीच्या, बाजारू गोष्टींना शरण जाणाऱ्या जीवनशैलीमध्ये त्यांचा ‘जगत् सर्व’चा विचार अधिक गरजेचा आहे..
संत ज्ञानेश्वरांचे ‘पसायदान’ हे मराठी साहित्यसृष्टीतील एक विलक्षण- सोने, चांदी किंवा हिऱ्यापेक्षा श्रेष्ठ असे कोंदण आहे. संत ज्ञानेश्वरांनी वयाची विशी पुरी व्हायच्या आत ज्ञानेश्वरी, अमृतानुभव असे महान ग्रंथ लिहून मराठी भाषेला, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला, अनेकानेक भाषांच्या शिखरावर नेऊन बसविले. या दोन ग्रंथांपेक्षा पसायदानाला वैश्विक महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांसारखे महात्मे युगायुगांत अपवादाने जन्म घेत असतात. असेच एक सत्पुरुष आपल्या महाराष्ट्रात ११ सप्टेंबर १८९५ साली जन्माला आले, त्यांचं नाव विनोबा भावे.
माणूस नेहमी आपण करत असलेल्या नित्य कामातून धडे घेऊन, मागील चुका सुधारून पुढे जायचा प्रयत्न करत असतो. मी नेहमी माझ्या अनेकानेक कामांमध्ये काही अडचणी आल्या तर विनोबाजींना आठवतो, महात्मा गांधींनाही आठवतो. महात्माजींचा पुढील विचार सर्वानाच माहिती आहे. समाजाकरिता, समूहाकरिता तसेच विशेष जबाबदारीचे काम करत असताना, आपण नेहमी आपल्या कृतीचा, समाजातील गरिबातल्या गरीब माणसांवर काय परिणाम होईल याचा विचार केला पाहिजे, असा त्यांचा सांगावा होता. महात्माजींच्या जीवनाचा ज्यांच्या विचारावर, आचरणावर विलक्षण प्रभाव पडला त्या थोर विनोबाजी भावे यांचा मी एक ‘भक्त’ आहे. आज भारतात विविध राज्यांत सरकारी, निमसरकारी पातळीवर जे चालले आहे, हाणामारी, चंगळवाद, लाचलुचपत, उधळमाधळ, भ्रष्टाचार यामुळे सुज्ञ वाचकांचे मन सुन्न होते. अशावेळी विनोबाजी भावे यांच्या काही आठवणी लक्षावधी वाचकांपुढे याव्या ही माझी प्रामाणिक इच्छा आहे.
विनोबाजींनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. मॅट्रिक उत्तीर्ण झाल्याचे सर्टिफिकेट घरी आले. त्यानंतर एक दिवस विनोबाजींच्या आईने विनूला काही कागद फाडताना व जाळताना पाहिले. आईने विचारले, ‘विनू तू काय करतोस?’ ‘विनू उत्तरला, मॅट्रिक, पदवी परीक्षा यांची सर्टिफिकेटस् नष्ट करतोय. म्हणजे मला नोकरी करण्याचा मोह होणार नाही.’ आई दिङमूढ झाल्या, कारण आईंना स्वाभाविकपणे असे वाटत होते की विनूला शिक्षकाची नोकरी मिळेल, आपल्यावरचा भार हलका होईल. असो. वाचकांना विनोबाजींचे संपूर्ण आयुष्य माहीत आहेच.
एकदा विनोबाजींकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक भेटीला वर्धा येथे गेले होते. त्यांनी महाराष्ट्रात आम्ही कसे राज्य करतो, काय काय करतो, याची माहिती दिली. विनोबाजींनी शांतपणे ऐकून घेतले व एक प्रश्न विचारला. ‘आपले मंत्रिमंडळात शेतकरी मंत्री किती? वसंतराव नाईकांनी पालोदकर, पाटील, पवार, शिंदे, राणे, देशमुख अशी दहा-पंधरा मंत्र्यांची नावे घेतली. विनोबाजींनी नाईकांना सुचविले, ‘आपण मुंबईत गेल्यावर शेतकरी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा व घरी जाऊन आपली शेती अधिक चांगली कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे.’ विनोबाजी पुढे म्हणाले, ‘शेतकरी शेतात राबराब राबतो, शेतीची मशागत करतो, बी पेरतो, योग्य ऋतूत वरुणराजा प्रसन्न होतो, वेळेत भरपूर पाऊस येतो. अर्थातच शेते पिकतात, घरोघरी धान्य येते, जग व्यवस्थित चालते. तुम्हा शेतकरी मंत्र्यांच्या असे लक्षात येईल की तुम्ही एक वर्ष मुंबईत नव्हता, म्हणून मुंबई अडली नाही, महाराष्ट्र बुडाला नाही’ एवढे परखड विचार ऐकल्यानंतर वसंतराव नाईक विनोबाजींना पुन्हा भेटले नाही. हे सांगावयास नकोच!
माझे सन्मित्र रामकृष्ण सोमय्या, वय वर्षे शहाऐंशी हे साग व अन्य टिंबर व्यवसायातील जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी आजपर्यंत चारशेवेळा जगातल्या विविध देशांचा दौरा केला आहे. एकदा या दानशूर गृहस्थांना त्यांचे एक मित्र विनोबाजींकडे घेऊन गेले. त्यांनी सोमय्यांची ओळख एक दानशूर व्यक्ती म्हणून विनोबांना करून दिली. विनोबाजी विलक्षण व्यक्तिमत्त्व. त्यांनी सोमय्या साहेबांना असा सल्ला दिला की, आपण एरवी दान करताच, पण आता एका वेगळय़ा पद्धतीचे दान दैनंदिन जीवनात करा. आपण भाजी मंडईत नेहमी जाता, भाजी खरेदी करता. नेहमीची भाजीवाली तुम्हाला कोथिंबिरीची गड्डी दोन रुपयांना सांगेल, तुम्ही घासाघीस करून दीड रुपयांना मागणार. दुध्याभोपळा किंवा अन्य भाज्या पाच रुपये किलोचा ती दर सांगेल, तुम्ही चार रुपयांनी मागाल. तुम्ही असं बघा की, ती भाजीवाली बाई रस्त्यावर, उन्हातान्हात, पावसापाण्यात भाजी विकणार, काय मिळवणार? त्या भाजीवाल्या बाईशी घासाघीस न करता तिला तिने सांगितलेल्या दराप्रमाणे पैसे द्या. हाच दानधर्म समजा. विनोबाजींनी स्वत:च्या संस्थेकरिता एक पैसा घेतला नाही, हे सांगणे न लगे!
बेळगाव प्रश्न अजूनही पेटलेलाच आहे. तो सुटलेला नाही. विनोबाजी त्यांच्या देशभरची पदयात्रा करताना वेळगाव मुक्कामी आले होते. त्या वेळी बेळगाव कारवार लढा अटीतटीने लढला जात होता. पत्रकारांनी विनोबाजींना विचारले, ‘विनोबाजी आपले बेळगाव प्रश्नाबद्दल काय मत आहे?’ विनोबाजी उत्तरले, बेळगाव काय प्रश्न आहे का? विनोबाजींचे हे वाक्य ऐकून संयुक्त महाराष्ट्राचे लढय़ाचे थोर नेते व दै. मराठाचे संपादक आचार्य प्र. के. अत्रे भयंकर भडकले. त्यांनी अग्रलेख लिहिला. ‘विनोबा आता याच!’ म्हणजे महाराष्ट्रात यापुढे पाऊल टाकू नका. आचार्य अत्रे यांनी विनोबाजींची ‘वानरोबा’ अशी जळजळीत शब्दात संभावना केली. पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की विनोबांनी आयुष्यभर संपूर्ण मानवाचा वैश्विक दृष्टिकोनातून विचार करत राहिले. ते एकटय़ा महाराष्ट्राचे वा भारताचे नव्हते. त्यांच्यापुढे जाती, पंथ, धर्म, भाषा, प्रांत, राज्य असा काहीच भेद नव्हता.
‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले!’ आचार्य विनोबाजी भावे हे नुसतेच थोर राष्ट्रसंत होते असे नसून ‘साधी राहणी व उच्च विचारसारणी’ या तत्त्वज्ञानाचे पक्के निष्ठावंत उपासक होते. तत्त्वाशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. विनोबाजींच्या भारताच्या पदयात्रेतील आंध्र जिल्हय़ातील ही घटना आहे. पदयात्रेत एका गावी विनोबाजींना ताप आला. पदयात्रेत सरकारी व इतर डॉक्टर व्यवस्थेकरिता होते. ताप मोजला तर तो दोन अंशांपर्यंत होता. डॉक्टर मंडळी औषधे देऊ पाहत होती. विनोबाजींनी या तापाला औषध नको म्हणून सांगितले. डॉक्टर मंडळी ऐकेनात. मग विनोबाजींनी स्वत:चे औषध घ्यायचे ठरविले. त्यांच्याबरोबर सतत असणाऱ्या साहाय्यकाला त्यांचे नेहमीचे औषध आणावयास सांगितले. त्याने उकळलेल्या पाण्याचा एक ग्लास पुढे केला. सर्वाच्या उपस्थितीत ते गरम पाणी प्यायले. अन्य जेवणखाण काही केले नाही. नेहमीप्रमाणे त्या दिवसाची पदयात्रा पुरी केली. नित्य सर्व गोष्टी चालूच होत्या. सायंकाळी डॉक्टर मंडळींनी ताप पाहिला. ताप पळाला होता. विनोबाजींनी डॉक्टरांना यापुढे तुमच्या दवाखान्यात तापाकरिता हे औषध चालू करा, असे सुचविले. असो. आयुष्यभर ज्यांनी इंजेक्शन, विलायती एवढेच काय, आयुर्वेदीय औषधे घेतली नाही असे विनोबाजी ‘गरिबांच्या वैद्यकाचे उद्गाते’ होत. या उपचारामुळे शरीरशुद्धी, क्लिन्झिंग होते. घाम येऊन ताप उतरतो. त्या घामामुळे शरीरातून जे जलद्रव्य जाते त्याचे भरपाई या पाण्याने होते, थकवा येत नाही, असा विचार यामागे असावा.
लोकनेते जयप्रकाश नारायण यांनी विनोबांबद्दल पुढील शब्दांत थोडक्यात विनोबांचे अनोखे व्यक्तिमत्त्व सांगितले आहे.
‘विनोबांबद्दल काही गोष्टी सांगितल्याच पाहिजेत असे मला वाटते कारण तरच विनोबांना खऱ्या अर्थाने नीट समजून घेतले जाईल. विनोबा हे राजकारणी नव्हेत, सामाजिक परिवर्तनकर्तेही नव्हेत. ते देवाने पाठवलेला पहिला आणि शेवटचा माणूस होते असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. माणसाला देवाशी जोडण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. त्यांनी सतत समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. त्यांची अशी समजूत होती की या देण्यामुळे ते कधीच रिते होणार नाहीत. उलट देव त्यांच्यात नवनवीन गोष्टी भरत राहील आणि तो त्यांना आपल्या कामाचं साधन बनवेल.’
‘गीता प्रवचने’ या सात्त्विक सांगाव्याबद्दल आचार्य विनोबाजी म्हणतात, गीता-प्रवचने हे आता भारतीय जनतेचे पुस्तक झाले आहे. भूदानयज्ञाचे वातावरण निर्माण करण्याच्या कामी त्यांचा उपयोग होत असल्यामुळे त्याच्या प्रती गावोगाव आणि घरोघर जात आहेत.
गीतेप्रमाणे ही प्रवचनेही प्रत्यक्ष कर्म-क्षेत्रात प्रगट झाली आहेत. १९३२ साली धुळय़ाच्या जेलमध्ये अनेक संत, महंत आणि सेवक गोळा झाले होते. त्यांच्या सेवेत रुजू होते. त्यामुळे साहजिकच रोजच्या उपयोगाच्या गोष्टींची यात चर्चा आहे. जीवनाशी संबंध नसलेले कोणतेही वैचारिक वाद यात आलेले नाहीत. मला असा विश्वास आहे की, खेडय़ात किंवा शहरात सामान्य मजुरी करून जगणाऱ्या श्रमिकांनाही यातून सांत्वन आणि श्रमपरिहार लाभेल.
विनोबाजी म्हणतात, ‘या प्रवचनांच्या निमित्ताने गीतेची सेवा करण्याची विशेष संधी देवाने मला दिली ही मी त्याची मोठी कृपा समजतो. ही टिपून घेण्याला साने गुरुजींसारखा सिद्ध हस्त सत्पुरुष लाभला हीही त्याचीच कृपा होय. हिंदुस्थानभर जिथे जिथे ही प्रवचने पोचली आहेत, तिथे तिथे हृदयशुद्धीची आणि क्रिया पालटण्याची त्यांनी प्रेरणा दिली आहे. माझी वासना आहे की घराघरांत यांचे श्रवण, पठन, मनन व्हावे. यात माझे काहीच नाही. तुकाराम महाराजांच्या भाषेत म्हणतो-
शिकवूनि बोल।
केलें कवतुक नवल
आपणिया रंजविलें।
बापें माझिया विठ्ठलें
– विनोबा
माझ्यासारख्या वैद्याने आचार्य विनोबा भावे यांच्याबद्दल विस्ताराने का लिहावे, हा प्रश्न जाणत्या वाचक मित्रांना पडेल. आपला भारत देश स्वतंत्र होऊन जवळपास ६७ वर्षे झाली आहेत. स्वातंत्र्यानंतर समाजाच्या, देशाच्या, शासकांपुढे ज्या समस्या होत्या त्याच्या कित्येक पट समस्या आज आ वासून उभ्या आहेत. इतक्या वर्षांत आपल्या भारतात बौद्धिक, शैक्षणिक, उद्योगधंदे, व्यापारात व अन्य अनेक क्षेत्रांत खूप खूप प्रगती झालेली आहेच. पण धर्म, भाषा, जात, पंथ, पक्षभेद यांच्या भिंती दिवसेंदिवस खूप-खूप रुंदावत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड भाववाढ, बेरोजगारी, लाचलुचपत, भ्रष्टाचार, लहान बालके व स्त्रियांवरील अत्याचार, जाती-जमातींच्या वाढत्या दंगली, यामुळे विचारी मन खूप चिंतेत आहे. एकीकडे खूप श्रीमंत लोक आणखी श्रीमंत होऊ पाहतात, त्याकरिता अवैध मार्ग चोखाळायला यांना क्षणभरही खेद वाटत नाही.
विनोबाजींना- ‘जगत् सर्व’चा आयुष्यभर विचार केलेल्या महामानवाला सहस्रप्रणाम!
वैद्य प. य. खडीवाले वैद्य – response.lokprabha@expressindia.com