आयुष्यात नेमक्या क्षणी नेमकं काय करायचं हे जर मार्गदर्शन असेल, आणि ते स्वीकारून नवनवीन आव्हानं घ्यायची तयारी असेल तर तुमचा करिअर ग्राफ हा नक्कीच वेगळी वळणं घेऊ शकतो हे अजय वाळिंबेंचा बँक क्लार्क ते कंपनी सेक्रेटरी हा प्रवास पाहिल्यावर लक्षात येतं.
सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात वाढलेल्या अजय वाळिबेंनी अगदी महाविद्यालयीन काळातच शिकवणीच्या माध्यमातून अर्थार्जनाची सुरुवात केली. महाविद्यालयात असतानाच बँकेची परीक्षा दिली आणि पदवी घेतानाच त्यांना युको बँकेत क्लार्कची नोकरीदेखील मिळाली. सरकारी नोकरी, तीदेखील बँकेतली, मध्यमवर्गीय कुटुंबाची इतिकर्तव्यताच म्हणावी लागेल अशी परिस्थिती.
अजय यांचीदेखील सुरुवातीची मानसिकता काहीशी अशीच म्हणावी लागेल. पण त्यांना आणखी शिकण्याची ओढ होती. खरे तर सीए करायची इच्छा होती. नोकरीबरोबरच वाणिज्य शाखेचं पदव्युत्तर शिक्षण आणि कायद्याचं शिक्षण सुरू होतं. नंतर त्यांनी कंपनी सेक्रेटरीच्या परीक्षादेखील दिल्या.
पण याच टप्प्यावर करिअरकडे काहीसं दुर्लक्ष होईल असं एक वेगळं वळणं मिळालं. अजयनी बँकेतील युनियनच्या कामात स्वारस्य घेतलं आणि त्यात ते गढून गेले. अर्थात त्यात टिपिकल पुढारीगिरीचा भाग नव्हता. पण या सगळ्या व्यापात कंपनी सेक्रेटरीच्या उर्वरित परीक्षा पार दुर्लक्षित झाल्या. बँकेचा पगार होताच, जोडीला शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला होता, त्यातून चार पैसे मिळत होते.
पण त्याच टप्प्यावर बँकेतल्याच एस. एस. भाटे या वरिष्ठांनी चांगलीच कानउघाडणी केली असे म्हणावे लागेल. परिणामी कंपनी सेक्रेटरीच्या उर्वरित परीक्षा मन लावून दिल्या. त्यात चांगल्या मार्काने पासदेखील झाले. पण बँकेतली नऊ वर्षांची नोकरी सोडवत नव्हती. पण अखेरीस बँक सुटली.
या नोकरीची मजेशीर कथा अजय सांगतात, ‘‘विनिती आर्गेनिक्स ही कंपनी तेव्हा शेअर बाजारात उतरत होती आणि त्यांना असिस्टंट सेक्रेटरी हवा होता म्हणून मी अर्ज केला आणि विसरून गेलो. एके दिवशी चक्क त्या कंपनीचेच सेक्रेटरी आर. टी. राजगुरू मला शोधत बँकेतच आले आणि दुसऱ्याच दिवसापासून नोकरीवर यायला सांगितले. ही घटना १९९१ ची. येथे पगार वाढणार नव्हता, पण अनुभव मिळणार होता.’’
त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. कॅम्लिन, गुजरात लायका, सिबा सीकेडी, थायसन क्रूप, फियाट, डीएचल, लिगासिस, असा प्रवास करीत ते आज फिनिक्स एआरएसमध्ये हेड लीगल आणि कंपनी सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. मात्र हा प्रवास असा एका वाक्यात संपणारा नाही.
अजय सांगतात की, प्रत्येक कंपनीत त्यांना काही ना काही वेगळा अनुभव मिळाला. लायकामध्ये जेव्हा काम सुरू केलं तेव्हा ती कंपनी आजारी कंपनी म्हणून गणली होती. त्या वेळी अनेकांनी त्यांना वेडय़ातच काढले होते. पण अशा कंपनीतल्या कामात तुमचा कस लागतो इतकंच नाही तर, खूप काही शिकायला मिळतं. तेथे मला स्वतंत्रपणे काम करता आलं. तर सिबामध्ये कंपनीचे मनुष्यबळ व्यवस्थापन, औद्योगिक संबंध, आणि विधी व प्रशासकीय काम करायला मिळालं. अनेक बाबतीत कंपनीचे धोरण ठरवता आलं. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश अडवाणींनी त्यांना याबाबत खूप मोकळीक आणि मार्गदर्शन दिल्यामुळेच ते शक्य होऊ शकल्याचं ते सांगतात. युको बँकेत असताना युनियनच्या कामाचादेखील त्यांना या कंपनीत खूप फायदा झाला.
थायसन क्रूपच्या बाबतीत तर अजय यांचे अनुभव खूपच भन्नाट म्हणावे असे आहेत. ही कंपनी भारतात नवीन होतीच, पण त्यांच उत्पादन असणारं इलेक्ट्रिकल स्टील ही संकल्पनाच आपल्याकडे नवीन होती. फॅक्टरी व्यवस्थापन, स्थानिक संपर्कजाळं, सर्व प्रकारची कायदेशीर प्रकरणं सांभाळण्याची कामं त्यांनी पुढाकार घेऊन मार्गी लावली. थॉमसनमुळेच अजयना इलेक्ट्रिक स्टील या विषयावरील थेट जागतिक दर्जाची परिषद नाशिकमध्ये आयोजित करण्याचा अनुभव मिळाला.
त्यानंतर काम केलेली फियाट ही देखील परदेशी, आणि आजारी कंपनी. तेथे लायकाच्या अनुभवाचा खूप फायदा झाला. त्यानंतरच्या डीएचलमध्ये या सर्वाचाच फायदा मिळाला. डीएचएलमध्ये परदेशी कंपन्यांची कार्यप्रणाली खूप जवळून पाहता आली. त्यांची व्यवस्था राबवण्याची पद्धत शिकण्यासारखी असते असे ते सांगतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कामामुळे वेगवेगळ्या देशांची कार्यपद्धती जवळून पाहता येते हे ते विशेषत्वाने नमूद करतात.
नंतरच्या काळात त्यांचा प्रवास हा काहीसा वेगळ्या वाटेवर झाला. लीगल प्रोसेसिंग आऊट सोअर्सिग म्हणजेच बाहेरील देशातून कायदेविषयक कामं आणायची आणि ती येथे प्रोसेस करायची. यामध्ये एक संपूर्ण कंपनीच सुरू करण्याचं काम त्यांनी केलं. लिगासिस सव्र्हिसेस या नावाने सुरू झालेल्या या कंपनीत ते संचालक होतेच, पण मुख्य परिचालन अधिकारी म्हणूनदेखील काम पाहत होते. येथे कंपनीचे सर्वच विभाग सांभाळत असल्यामुळे नवीन आणि वेगळं शिकायला मिळालं, मात्र त्यांचं मन काही त्यात रमलं नाही.
त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून त्यांनी चक्क चार महिन्याचा ब्रेकच घेतला. असं काही हल्ली लोकांना झेपतच नाही. मात्र योग्य प्रकारे आर्थिक नियोजन असेल तर हे सहज शक्य असल्याचे ते सांगतात.
दरम्यान, भारतात २००२ मध्ये सरफेजी कायदा अस्तित्त्वात आला. अनुत्पादित कर्जे बँका किंवा वित्तीय संस्थांकडून विकत घेण्याची प्रक्रिया या कायद्यानुसार भारतात सुरू झाली. कोटक समूहाची फिनिक्स एआरसी ही काही मोजक्या अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्यांपैकी एक. अशा प्रकारची ती देशातील दुसरी कंपनी होती. अजय आठ वर्षांपासून तेथे हेड लीगल आणि कंपनी सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. ते सांगतात की, येथे मला आजवर शिकलेल्या सर्व गोष्टींचा फायदा होतो. सुरुवातीच्या काळात अनेक व्यवस्था तयार केल्या. येथे कायदेशीर बाबी तर आहेतच पण आर्थिक घडामोडीदेखील भरपूर असतात.
अजय यांच्या करिअरचा ग्राफ असा वेगवेगळी वळणं घेत उंचावत होता, पण त्यांचं करिअर हे केवळ नोकरी एक्के नोकरी इतकंच मर्यादित नाही. नोकरी बरोबरच शेअर्सचा व्यवसायदेखील करायचे. त्यांच्या इमारतीतील लोकांना शेअर मार्केटमध्ये पैसे कसे गुंतवावे हे सांगण्यासाठी स्वत: टाइप करून न्यूजलेटरच वितरित केलं. ही गोष्ट ९१ च्या आसपासची. परिणामी त्यांचं ‘अर्थवाणी’ हे आठवडी सदर आकाशवाणीवर ९३ पासून सुरू झालं. पुढे एका नव्या मराठी वृत्तपत्रात शेअर्सवर लिहायला सुरुवात केली. नंतर ‘लोकसत्ता’ व इतर वृत्तपत्रांतून अर्थविश्वावर अनेक प्रकारे लेखन केलं. त्यांचं गुंतवणूक मार्गदर्शन अनेकांना उपयोगी पडलं आहे. मराठीतून अर्थजगतावर लिहणाऱ्यांची संख्या अगदी मर्यादित होती तेव्हापासून सुरू झालेलं त्यांचं लेखन आजही अव्याहत सुरूच आहे.
वाचन नाटक आणि चित्रपट हे त्याचे आवडीचे छंदही सांभाळतात. ठाणे आर्ट गिल्डतर्फे चित्रगंध नावाचा उपक्रम ते चालवतात. या उपक्रमाअंतर्गत दर महिन्याला एक जागतिक चित्रपट पाहायची संधी रसिकांना मिळते.
एकीकडे धोरणं नियोजन, क्लिष्ट आर्थिक काम आणि त्याच वेळी मार्गदर्शनपर लिखाण असा हा क्लार्क, युनियन ते व्यवस्थापन हा अजबच प्रवास म्हणावे लागेल.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com