सगळा महाराष्ट्र विघ्नहर्त्यां गणपतीच्या उत्सवात मग्न असताना मुंबईत १० सप्टेंबर २०१६ रोजी के. सी. कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये खऱ्याखुऱ्या विघ्नहर्त्यांना म्हणजेच सीमेवर शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देणारा शहीद दिन ‘अनाम प्रेम’ नावाच्या संस्थेमार्फत साजरा झाला. त्याचा वृत्तान्त-
मुंबईच्या रस्त्यारस्त्यांवर गेले काही दिवस विघ्नहर्त्यां गणेशाची धूम चालू होती. तमाम मुंबईकर गणेशोत्सव साजरा करण्यात मग्न आहेत. परंतु ‘अनाम प्रेम’ परिवाराने मात्र याच वेळी १० सप्टेंबर २०१६ ला आपल्या सर्वाच्या, खऱ्याखुऱ्या हाडामांसाच्या विघ्नहर्त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वागताची आणि सन्मानाची तयारी चालवली होती. हे विघ्नहत्रे म्हणजे तिन्ही त्रिकाळ डोळ्यात तेल घालून सर्व सीमांचे आणि अतिरेक्यांकडून होणाऱ्या भ्याड हल्ल्यांना सडेतोड उत्तर देऊन आपले रक्षण करणारे भारतीय सेनेतील जवान. सियाचीनची रक्त गोठवणारी-६० सेल्सियस थंडी असो, हिमवादळे, तुटणारे कडे असो वा राजस्थानच्या वाळवंटातील रक्त उकळणारे ५० सेल्सियस तापमान असो किंवा ७६०० कि.मी. विस्तीर्ण किनारपट्टीची सीमा असो. सागराची खोली आणि हिमालयाची उंच शिखरे कायम आपल्या नजरेत ठेवणारे आणि त्यांचे प्राणपणाने रक्षण करणारे हे जवान खरे तर आपले विघ्नहत्रे नव्हेत का? गणरायाची मूर्ती कुठे जरा जरी भंग झाली किंवा त्या मूर्तीला काही अपाय झाला तर त्यासाठी अस्वस्थ होणारे आपण, या हाडामांसाचे देह जेव्हा सीमेवर छिन्नविच्छिन्न होतात तेव्हा का अस्वस्थ होत नाही? आपल्या मातृभूमीचे रक्षण करताना आणि देशवासीयांना सुखरूपपणे, शांतपणे सण साजरे करता यावेत यासाठी सीमेवर रणकुंडात आपले देह अर्पण करणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांना कसली अपेक्षा असेल? त्यांचा त्याग उच्च कोटीचा असतो. त्यांच्या कुटुंबीयांना सांत्वनापेक्षा भारतीय परिवाराच्या प्रेमाची, आदराची तितकीच नितांत आवश्यकता असते. म्हणूनच गेली अनेक वष्रे अनाम प्रेम ‘शहीद दिन’ गणेशोत्सवाच्या दिवसात आयोजित करते. अनाम प्रेम परिवार हा एक ईश्वरीय प्रेमाचा प्रवाह आहे आणि ‘प्रेम िशपीत जा’ हे ब्रीदवाक्य, तसेच भारतीय राज्यघटनेच्या ‘कलम ५१ क’मध्ये सांगितलेल्या नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांवर आधारित विविध कार्यक्रम या परिवारातर्फे वर्षभर साजरे केले जातात.
या वर्षी मुंबईच्या के.सी. कॉलेज ऑडिटोरियम येथे भारतातील विविध भागांतून आलेल्या १० शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सन्मानाने सभागृहात सर्वात पुढे बसवण्यात आले. ज्यांनी देशासाठी आपले सुपुत्र अर्पण केले त्यांच्यासाठी किमान एक दिवस पुढच्या जागा राखीव ठेवण्याचे औचित्य सर्व उपस्थितांनी दाखवले. भारतीय सन्याच्या तिन्ही विभागांचे वरिष्ठ आणि इतर अधिकारी आणि जवानांचे पुष्पवृष्टीने स्वागत झाले. अतिरेक्यांपासून रक्षण करताना झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या, परंतु परत त्याच शौर्याने परत उभे असलेल्या वीर शिपाई अदमशमसुद्दीन अत्तार यांना पालखीने जयघोषात आणि पुष्पवृष्टीत सन्मानाने सभागृहात आणण्यात आले. विजयाचा फेटा त्यांना बांधण्यात आला आणि अचानक सभागृहातील लाइट गेले.. युद्धाच्या भीषण आवाजाने सभागृह दणाणून गेले आणि मग अचानक एक मिनिट सुन्न करणारी शांतता. हेच असते एका सनिकाचे आयुष्य. सीमेवर देशाचे रक्षण करताना सुन्न करणारी शांतता किंवा मग बंदुका, बॉम्ब आणि तोफांचे कानठळ्या बसवणारे भीषण आवाज आणि परत सुन्न करणारी शांतता जी त्यांच्या घरात आणि परिवारात उरते. पंडित मििलद रायकरांनी मग व्हायोलिनवर त्या परमपिता परमेश्वराच्या प्रार्थना पंचकाचे सूर छेडले. या पंचकनंतर त्यांचा व्हायोलिन सर्वाना या कार्यक्रमाचे कारण सांगू लागला- ‘जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी..’
या पुढील कार्यक्रमात रंगमंचाचे रूपांतर रणभूमीत झाले. रंगदेवतेची जागा रणदेवतेने घेतली. राष्ट्रगीताच्या वादनाने सर्वाची छाती अभिमानाने फुलली आणि मग झाला, युद्ध प्रारंभ होताना कायम होणारा दिव्य शंखनाद आणि साक्षात वीरभद्र महादेवाच्या रुद्रवीणेचे सूर पंडित िहदराव दिवेकरांनी छेडले. कुठल्याही युद्धात विजय मिळवून देण्याची ताकद असणारी रुद्रवीणा म्हणजे एक प्राचीन वाद्य. याच्या झंकारानेच साक्षात रुद्राचे आगमन झाल्याचा भास होतो आणि ते तितक्याच ताकदीने वाजवणारे फार तर तीन-चार मोजके लोक आज भारतात आहेत; त्यापकी एक म्हणजे ११० वर्षांची परंपरा जोपासलेले माननीय पंडित िहदराव दिवेकर. रणदेवतेला जागृत केल्यावर मग सुरू झाले युद्धाचे वर्णन. हे युद्ध फक्त शत्रूशी आणि अतिरेक्यांशी नव्हते तर साक्षात क्रूर अशा निसर्गाशीसुद्धा. जगातील सर्वात उंच युद्धभूमी म्हणजे सियाचीन. तिथल्या बर्फात गाडले जाऊनही तब्बल सहा दिवस मृत्यूशी झुंज देऊन अमर झालेल्या आणि त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे इतर जवान यांची एक चित्रफीत सर्वाना सियाचीनच्या युद्धभूमीवर घेऊन गेली. त्या युद्धभूमीवर आपले जवान करीत असलेल्या रक्षणाची आणि विपरीत परिस्थितीची धग सर्व उपस्थितांपर्यंत आशुतोष ठाकूर यांनी पोचवली. यानंतर वीर जवानांच्या आयुष्यातील काही क्षण जिवंत केले गेले. एका पाठोपाठ एक, त्यांच्या शौर्य, धर्याच्या आणि त्यागाच्या रणगाथा अनाम प्रेममधील युवक-युवतींनी कथन केल्या. त्यांना जणू संजयाचे चक्षु प्राप्त झाले होते आणि ते तात्पुरत्या लाभलेल्या दिव्यदृष्टीने, साक्षात त्या सनिकांच्या रणांगणातील शौर्याचे, वीरतेचे थेट प्रक्षेपण करत होते. सोबतीला रणवाद्यांचे, नौबतींचे, युद्धाचे भयंकर आवाज असणारे पाश्र्वसंगीत वाजत होते. त्यांच्या वीरगाथेबरोबर त्यांचा जीवनपट प्रोजेक्टरवर दाखवला जात होता.
प्रत्येक रणगाथा अंगावर रोमांच उभे करणारी, अभिमानाने छाती भरून आणणारी आणि डोळ्यांत अश्रू दाटवणारी. शहीद शिपाई योगेश दिनकर दराडे, शहीद शिपाई सुनील विठ्ठल सूर्यवंशी, शहीद नायक रमेश महादेव गवस, शहीद नायक सुनील शंकर जोशीलकर, शहीद नायक पांडुरंग महादेव गावडे, शहीद हेड कॉन्स्टेबल संजीवन सिंग, शहीद कॅप्टन तुषार महाजन, शहीद मेजर ध्रुव यादव, शहीद मेजर अमित देशवाल, शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या कुटुंबीयांचा सन्मान झाला. या सन्मानाच्या वेळी ज्या कोणा व्यक्तीला टाळ्या वाजवून कौतुक करावेसे वाटेल त्यांनी या शहीदांच्या कुटुंबीयांना रक्ततिलक करावे, असे आवाहन करण्यात आले होते. या प्रत्येक कुटुंबाने त्यांच्या घरातील कर्त्यां पुरुषाचे रक्त देशाला अर्पण केले म्हणून त्यांना अनाम प्रेमच्या युवक-युवतींनी रक्ततिलक करून त्यांचे अश्रू स्नेहस्निग्ध करण्याचा प्रयत्न केला.
शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरपत्नीने आपल्या वीरपतीचे आतंकवाद संपवण्याचे आणि सीमेवरील नागरिकांच्या जीवनात फुले फुलवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय सन्यदलात सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन आपले स्थान मिळवले आहे. त्याबद्दल एक छोटे नाटय़ सादर झाले. अमर जवान स्मारकाला कर्नल अब्राहम यांनी पुष्पचक्र अर्पण केले आणि ‘लास्ट पोस्ट’ बिगूल वाजला. सर्वानी आपल्या जागी स्तब्ध राहून शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. संपूर्ण शांतता. जवान नेहमी अमर असतो म्हणून ‘राउझ’ बिगूल वाजला. मग भारताच्या विविध राज्यांचे वेश घालून आलेल्या काही निरागस चिमुरडय़ांनी अनाम प्रेमतर्फे श्रद्धांजली अर्पण केली.
साक्षात जिवंत शौर्य आणि धर्याचे दर्शन शिपाई अदम अत्तार यांच्या रूपाने घडले. स्वत: गंभीर जखमी होऊनही अतिरेक्यांशी लढून त्यांना यमसदनाला पाठवणाऱ्या या योद्धय़ाची शौर्यगाथा म्हणजे वीरश्रीचा कळसच. त्यांचा यथोचित सन्मान करताना सर्वाचे उर अभिमानाने भरून आले. अनाम प्रेमच्या सौरभ नगरे या युवकाने एका आगळ्यावेगळ्या युद्धाची घोषणा केली. एक नागरिक म्हणून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना असंवेदनशील लाल फितीच्या व्यवहारामुळे दु:ख होते आणि त्यांची फरफट होते. याविरुद्ध एकप्रकारची मोहीम उघडण्याचा संकल्प त्याने जाहीर केला.
पायदळ, नौदल आणि हवाई दलाच्या सर्व उपस्थित अधिकाऱ्यांचा आणि सनिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी तिन्ही दलांतील अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. खऱ्या अर्थाने विघ्नहर्त्यांचा सन्मान झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रार्थनाष्टकाने या रणभूमीला शांत करण्यात आले आणि प्रीतीभोजनाने या आगळ्यावेगळ्या सोहळ्याची सांगता झाली.
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com