अॅनिमिया हा स्त्रियांमध्ये आढळणारा नेहमीचा आजार आहे. स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष, खाण्यापिण्याची हेळसांड ही त्यामागची महत्त्वाची कारणं आहेत. खरंतर अॅनिमियापासून मुक्ती मिळवणं फारसं अवघड नाही.
सीमा रोज ऑफिसमधून घरी यायची, लगेच आडवी व्हायची. थकव्यामुळे तिला कधी झोप लागायची तिचं तिलाही कळायचं नाही. तन्वी कॉलेज, डान्स क्लास, अभ्यासाचा क्लास करून एकदम संध्याकाळी घरी यायची. तिचंही तसंच. घरी आल्यावर थोडं आवरून ती लगेच झोपून जायची. रिद्धी तशी गावाकडची. लवकर लग्न झालेली. घरातल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी. तिचा दिवस सुरू होऊन कसा संपतो तिला कळायचं नाही. सीमाला वाटलं ऑफिसचं काम, ट्रेन-बसचा प्रवास यामुळे तिला थकायला होतंय. तन्वीला वाटलं की, एका दिवसात तीन-तीन गोष्टी केल्यामुळे थकायला होतंय. तर रिद्धीला वाटलं घरातल्या न संपणाऱ्या कामांमुळे थकवा जाणवतोय. त्यांचं थकणं दिवसेंदिवस वाढतच होतं. तिघींनी दवाखाना गाठले. काही तपासणी, चाचण्या झाल्यावर समोर आलं की तिघींनाही अॅनिमियाचा त्रास आहे. अॅनिमिया हा शब्द तिघींनीही फारसा कधी ऐकला नव्हता. सीमा, तन्वी, रिद्धी ही आजच्या स्त्रीची प्रातिनिधिक रूपं आहेत. महिलांमध्ये असलेल्या अशक्तपणाची कारणं वेगळी असतात. अॅनिमिया त्यातलाच आजार आहे.
अॅनिमियामध्ये प्रचंड अशक्तपणा जाणवतो. पण या अशक्तपणाचं स्वरूप थोडं वेगळं आहे; ते समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या शरीरातील सगळ्या अवयवांना कामं करण्यासाठी प्रत्येक पेशीला पुरवला जाणार ऑक्सिजन ज्या लाल रक्त पेशींमधून मिळतो त्या लाल रक्त पेशींममधले हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणं म्हणजे अॅनिमिया होय. अॅनिमिया हा आजार दुर्धर वाटत नसला तरी आपल्या शरीरातील प्रत्येक काम करणाऱ्या पेशीला ऑक्सिजनचं प्रमाण कमी मिळत आहे ही बाब अतिशय गंभीर आहे. यावरून या आजाराची व्याप्ती लक्षात येते. यामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. म्हणजेच प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पुरवणाऱ्या यंत्रणेत काहीतरी बिघाड आहे हे लक्षात येते.
अॅनिमिया हा आजार स्त्री, पुरुष असा दोघांनाही होतो. पण यामध्ये पुरुषांचं प्रमाण कमी आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सव्र्हेतर्फे (ठाऌर) दरवर्षी विविध निकषांच्या आधारे आरोग्यासंबंधी आकडेवारी जाहीर केली जाते. यामध्ये प्रत्येक जिल्ह्य़ातील आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. २०१५-२०१६ च्या सव्र्हेतील अॅनिमिया असलेल्यांची आकडेवारी विचार करायला लावणारी आहे. ६ महिने ते ५ वर्ष या वयोगटातील लहान मुलांमध्ये अॅनिमिया असण्याचं प्रमाण ग्रामीण भागात ५४.० टक्के तर शहरी भागात ५३.६ टक्के आहे. १५-४९ वर्ष वयोगटातील गरोदर नसलेल्या महिलांमध्ये अॅनिमिया असल्याचं प्रमाण ग्रामीण भागात ४७.७ टक्के तर शहरी भागात ४८.२ टक्के आहे. १५-४९ वर्ष वयोगटातील गरोदर महिलांमध्ये अॅनिमिया असल्याचं ग्रामीण भागातील प्रमाण ४९.९ टक्के तर शहरी भागातील प्रमाण ४८.५ टक्के आहे. १५-४९ वयोगटातील सर्व महिलांमध्ये ग्रामीण भागातील प्रमाण ४७.८ टक्के तर शहरी भागात ४८.२ टक्के आहे. १५-४९ वर्ष या वयोगटातील पुरुषांमध्ये अॅनिमिया असल्याचं ग्रामीण भागातील प्रमाण १९.७ टक्के आणि शहरी भागातील प्रमाण १५.५ टक्के आहे.
ही संपूर्ण आकडेवारी लक्षात घेतली तर पाचपैकी तीन वर्गवारी ही महिलांवर आधारित आहे. शिवाय स्त्रियांमध्ये अॅनिमिया असल्याचं प्रमाण पुरुषांपेक्षा जवळपास तीन पटींनी जास्त आहे. स्त्रियांमध्ये प्रमाण सर्वाधिक असण्याची विविध कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे मासिक पाळी. मासिक पाळीत मोठय़ा प्रमाणावर होणाऱ्या रक्तस्रावामुळे प्रचंड थकवा जाणवतो. त्यात हिमोग्लोबिन कमी होते. धडधड होणे, थकवा जाणवणं, गळून गेल्यासारखं वाटणं, भूक न लागणं, चिडचिडेपणा, केस लवकर पांढरे होणं, केस लवकर गळणं, जास्त वेळ एकाग्रतेने काम न करता येणं ही अॅनिमियाची लक्षणं आहेत. वरवर पाहता ही लक्षणं जीवघेणी वाटत नाहीत. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण ही लक्षणं गंभीर वाटत नसली तरी दुसऱ्या एखाद्या आजाराची सुरुवात ठरू शकते. मासिक पाळीत रक्तस्राव कमी-अधिक होण्यावरूनही गैरसमज आहेत. पण हा रक्तस्राव नेमका किती दिवस व्हायला हवा हे निश्चितपणे सांगता येत नाही. कारण ते प्रत्येक स्त्रीच्या शरीररचनेनुसार बदलत जातं. पण किती दिवस रक्तस्राव होतोय, त्यात काही बदल होतायत का, तो बदल नेमका कसा आणि किती आहे याचं प्रत्येकीने निरीक्षण करायला हवं.
शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाले की ते सुरुवातीला उपलब्ध असलेल्या हिमोग्लोबिनमध्ये जमवून घेण्याचा प्रयत्न करते; पण शेवटी त्यालाही मर्यादा असतात. डॉ. निखिल दातार हे एका सोप्या उदाहरणातून समजावून सांगतात. ‘पोस्टमन घरोघरी पत्रं पाठवायला जातात. हे पोस्टमन म्हणजे हिमोग्लोबिन समजूया. पोस्टमनची संख्या कमी झाली तर पत्र पोहोचवण्याची यंत्रणा मंदावेल. घरोघरी योग्य वेळी योग्य प्रकारे पत्र पोहोचणार नाहीत. सुरुवातीला उपलब्ध असलेल्या पोस्टमनला दोन तास जास्त काम करा असं सांगण्यात येईल. यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण येईल आणि नंतर पत्र पोहोचायला वेळ लागेल. यावरून हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यानंतर शरीरातील ही यंत्रणा कशी कार्यरत असेल हे समजते. यावरून अॅनिमियाचा अंदाज येईल.’
महिलांमध्ये अॅनिमिया जास्त असल्याचं आणखी एक कारण डॉ. पद्मजा सामंत नमूद करतात, ‘समाजात आजही काही प्रमाणात लैंगिक भेदभाव दिसून येतो. हे चित्र प्रामुख्याने ग्रामीण भागात दिसून येते. महिलांना मिळणारं निकृष्ट दर्जाचं जेवण, उरलेलं जेवण या गोष्टींमुळे महिला उत्तम आहारापासून वंचित राहतात. ग्रामीण भागात मुलींची लग्न लवकर होऊन त्या गरोदरही लवकर होतात. त्या कमी काळाच्या अंतराने पाठोपाठ गरोदर राहत असतील तर त्यांच्यात अॅनिमिया दिसून येतो. गरोदरपणात आणि प्रसूती झाल्यानंतर स्त्रीला मानसिक, शारीरिक ताण असतो. प्रसूतीनंतर रक्तस्राव होण्याचं प्रमाण अधिक असतं. ग्रामीण भागातील महिलांमध्ये अॅनिमिया असल्याची ही प्रमुख कारणं आहेत.’ डॉ. सामंत हे स्पष्टीकरण देतानाच गरोदर महिलांबद्दल त्या आणखी महत्त्वाची माहिती देतात, ‘अॅनिमिया असलेल्या गरोदर महिलांचं प्रमाण वाढलेलं नसलं तरी ते कमीही झालेलं नाही. प्रगत असलेल्या आपल्या देशात खरंतर हे प्रमाण कमी व्हायला हवं. गरोदर बायकांना त्यांचात अॅनिमिया आहे हे अनेकदा फार उशिरा कळत असेल, त्यांची नियमित रक्ततपासणी होत नसेल, त्यावर योग्य इलाज होत नसेल तर त्यांच्यात अॅनिमिया आढळून येणारच.’ म्हणजेच अशक्तपणा हा नेहमी दिवसभराच्या कामातूनच येतो असं नाही. तर शरीरातील हिमोग्लोबिन, लोहाचं कमी झालेलं प्रमाणही कारणीभूत असतं. एखाद्या व्यक्तीला गळून गेल्यासारखं वाटलं की ती व्यक्ती समोरच्याला लगेच सांगते की थोडा अशक्तपणा आहे, पण हा थोडा अशक्तपणा पुढे मोठा होऊन मोठय़ा आजारांना आमंत्रण ठरू शकतो. अर्थात प्रत्येक वेळी अशक्तपणा आला म्हणजे अॅनिमिया आहे असंही नाही. पण त्या अशक्तपणात सातत्य असेल तर त्या व्यक्तीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
गरोदर स्त्रियांमध्ये असलेल्या अॅनिमियाबद्दल डॉ. निखिल दातार सविस्तर सांगतात, ‘एखाद्या स्त्रीच्याच शरीरातील अवयवांना जर लाल रक्तपेशींमार्फत ऑक्सिजन पुरवला जात नसेल तर तिच्या पोटात असलेल्या बाळाला ते कसं पुरवलं जाईल? गरोदर स्त्रीच्या पोटात आणखी एक जीव असतो. गरोदरपणात खरंतर तिच्या अवयवांना दुपटीने ऑक्सिजन पुरवला गेला पाहिजे. पण अॅनिमिया असलेल्या गरोदर स्त्रीच्या शरीरात ते शक्य होत नाही. अशा वेळी पोटात असताना बाळाची वाढ न होणं, पोटात असल्यापासूनच त्याला कुपोषणाला सामोरं जावं लागणं ही चिंतेची बाब आहे.’ अॅनिमिया असल्याचं लक्षात आल्यावर त्या स्त्रीने तातडीने उपचार घेणं गरजेचं आहे. उपचार घेतले नाहीत तर तिला गरोदरपणात त्याचा त्रास होऊ शकतो. डॉ. पद्मजा सामंत सांगतात, ‘थॅलेसेमिया आणि सिकल सेल अॅनिमिया अशा काही आजारांमुळेही अॅनिमिया होऊ शकतो. थॅलेसेमिया आणि सिकल सेल अॅनिमिया हे अनुवंशिक आजार आहेत. एखाद्या जोडप्यात दोघांपैकी एकाला थॅलेसेमिया असेल आणि ती स्त्री गरोदर असेल तर थॅलेसेमिया गर्भावर परिणाम करतोय का हे तपासण्यासाठी एक चाचणी करावी लागते. थॅलेसेमिया हा खूप जीवघेणा आजार नसला तरी त्याकडे अतिशय गंभीरपणेच बघावं.’
अॅनिमिया असलेल्या एखाद्या स्त्रीला रोजच्या आयुष्यात विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. शिवाय आजची स्त्री नोकरी, व्यवसाय करणारी आहे. तिच्यावर असलेला मानसिक, शारीरिक ताणही खूप आहे. गरोदर नसलेल्या स्त्रीला अॅनिमियाच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. तर अॅनिमिया असलेल्या गरोदर स्त्रीचं काय होत असेल. तिच्यात असलेल्या अॅनिमियाचा तिच्यावर किंवा तिच्या बाळावर काय परिणाम होत असेल? प्रसूती करताना स्त्रीची प्रचंड ऊर्जा पणाला लागत असते. पण अॅनिमिया असलेल्या स्त्रीमध्ये मुळातच फारशी शक्ती नसते. मग अशा स्त्रीच्या प्रसूतीदरम्यान काय होत असेल? डॉ. निखिल दातार या शंकांचं निरसन करतात. अॅनिमिया असलेल्या स्त्रीच्या गरोदरपणात किंवा प्रसूतीनंतर निर्माण होणाऱ्या धोक्यांविषयी ते महत्त्वपूर्ण माहिती देतात, ‘अॅनिमिया असलेल्या गरोदर स्त्रियांमध्ये प्रामुख्याने दोन धोके दिसून येतात. बाळ पोटात असल्यापासून त्याचं कुपोषण होणं, त्याचं वजन न वाढणं आणि त्याची योग्य वाढ न होणं हा सगळ्यात मोठा धोका आहे. दुसरा धोका म्हणजे प्रसूतीच्या वेळी होणारा त्या स्त्रीचा मृत्यू. प्रसूतीनंतर स्त्रियांना मोठय़ा प्रमाणावर रक्तस्राव होत असतो. ज्या स्त्रीमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण मुळातच कमी आहे तिला प्रसूतीनंतर किंचित जरी जास्त रक्तस्राव झाला तरी ते तिच्या जीवावर बेतू शकतं.’ दूषित पाणी आणि अन्नामुळे पोटात होणाऱ्या जंतांमुळेही अॅनिमिया होतो. सेवन केलेलं अन्न जंतांना मिळतं आणि पर्यायाने पोटात काहीच राहत नाही. यामुळे थकवा येतो आणि हिमोग्लोबिन कमी होतं. म्हणूनच मध्यंतरी शाळांमध्ये, तरुणांमध्ये जंतूंनाशक औषधांचं वाटप देशभर करण्यात आलं होतं, अशी माहिती डॉ. दातार देतात.
ज्यांना ज्यांना अशक्तपणा येतो त्या सगळ्यांनाच अॅनिमियाच असेल असं नाही. पण या अशक्तपणात सातत्य दिसून आलं आणि त्याचं प्रमाण वाढलं तर रक्ततपासणी करावी. त्यातून हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात आहे असं दिसून आलं तर निर्धास्त राहू नये. हिमोग्लोबिनचं प्रमाण योग्य असूनही थकवा का जाणवतोय हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांना भेट द्यावी. कारण कदाचित लोहाचं प्रमाण कमी असू शकतं. ते कमी असल्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. अॅनिमियाच्या विविध कारणं, परिणामांसह त्यावरील उपाय जाणून घेणेही महत्त्वाचं आहे. त्यावरचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे योग्य आहार. डॉ. सामंत इथे एक चांगला मुद्दा मांडतात, ‘जगभरात लोहाच्या औषधांचं प्रमाण फार नाही. कारण तिथे आहार चांगला असतो. पण आपल्याकडे आहारापेक्षा औषधांवर लक्ष केंद्रित केलं जातं. योग्य कारणासाठी योग्य वेळी योग्य ती औषधं घ्यायलाच हवीत. पण त्याच बरोबरीने योग्य तो आवश्यक आहारही घ्यायला हवा.’ हिरव्या भाज्या विशिष्ट पद्धतीने शिजवून खाणं हा त्यावरील उत्तम आहार आहे. लवकर तापणारी आणि स्वस्त मिळणारी अल्युमिनिअमची भांडी आता सर्वत्र आढळून येतात. पण खरतर लोखंडी भांडय़ात भाज्या शिजवून खायला हव्यात. कारण त्यात शिजवलेल्या अन्नात त्यातले लोह मिसळते आणि ते अन्न पोटात गेल्यावर त्याचा शरीराला उपयोग होतो.
अॅनिमियाच्या वाटेला जायचं नसेल किंवा त्याला आपल्या वाटेला येऊ द्यायचं नसेल तर प्रत्येकाने आहारावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. हिमोग्लोबिनवर संपूर्ण शरीराची यंत्रणा सुरू असते. ती मंदावली की सगळंच बिघडतं. त्यामुळेच हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात कसं राहील याची काळजी घ्यायला हवी. पण म्हणून फक्त हिमोग्लोबिनसाठी चांगला आहार घेण्यापेक्षा शरीराच्या सर्वागीण योग्यतेसाठी चांगला आहार घेणं आवश्यक आहे.
हे गैरसमज दूर करा…
ल्ल एखाद्या स्त्रीला अॅनिमिया असेल तर ती सभोवतालच्या मुलींना त्याबद्दल विचारते. त्यांनाही तो त्रास आहे हे तिला समजलं की ‘हे तर सगळ्यांनाच आहे. त्यांना त्याचा काही त्रास होत नाही तर मलाही काही होणार नाही’, अशी तिची समजूत तयार होते. या समजुतीमुळे बहुतांशी स्त्रिया याकडे गंभीरपणे बघत नाहीत.
ल्ल लालसर पदार्थामुळे म्हणजे बीट, गाजर अशा काही पदार्थामुळे हिमोग्लोबिन वाढतं, हा समज काही अंशी चुकीचा आहे. त्यात लोह अजिबातच नाही असं नाही. पण तो हिमोग्लोबिन वाढवण्याचा सर्वोत्तम उपाय नाही. हिरव्या भाज्या हा त्यावरील सर्वोत्तम उपाय आहे. नैसर्गिकरित्या काहीशा काळसर असलेल्या मनुका, अक्रोड, गूळ अशा पदार्थामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं.
ल्ल औषधाच्या गोळ्या उष्ण होतील म्हणून त्या दुधासोबत घेतल्या पाहिजे, हा आणखी एक गैरसमज लोकांमध्ये आहे. त्यातच ती गोळी लोहाची असेल आणि ती दुधासोबत घेतली तर ती मातिमोलच ठरते. ती दुधासोबत घेतल्याने त्याचा शरीराला काही उपयोग होत नाही.
ल्ल वाढत्या वयानुसार बऱ्याच बायकांना मासिक पाळीत खूप रक्तस्राव होतो. मासिक पाळीत शरीराबाहेर पडणारं रक्त अशुद्ध असतं, त्यामुळे ते जितकं जास्त बाहेर पडेल तितकं चांगलं, त्यामुळे शरीर शुद्ध होतं, मासिक पाळीत भरपूर रक्तस्त्राव झाला की तो चांगला असे गैरसमज आहेत. खूप रक्तस्राव झाला की हिमोग्लोबिन कमी होतं. त्यामुळे आलेला थकवा वयामुळे आलाय असं त्यांना वाटतं, पण हा गैरसमज आहे.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com, @chaijoshi11