कोकण आणि गणेशोत्सव यांचं नातं अनोखं आहे. कोकणातील गणेशोत्सवातलं वातावरण मन प्रसन्न करतं. तेथील काही गणपती मंदिरांना पेशवेकालीन परंपरा असल्यामुळे तिथल्या मंदिरांची एक वेगळीच ओळख आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रत्नागिरी जिल्हय़ातील दापोली तालुक्यात जोग नदीच्या मुखाशी इतिहासप्रसिद्ध सुवर्ण दुर्ग किल्ल्याजवळ आंजर्ले नावाचे बंदर आहे. दापोलीपासून २० कि.मी. अंतरावर असलेलं हे निसर्गरम्य गाव. याच आंजर्ले गावात सुप्रसिद्ध ‘कडय़ावरचा गणपती’चं स्थान आहे. कडय़ावरचा गणपती हे आज कोकणातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. एके काळी पुलाअभावी द्राविडी प्राणायाम करावा लागणारा प्रवास आज नैसर्गिक विविधतेने नटलेल्या रस्त्याने सुखकारक झाला आहे.

कडय़ावरील गणपती मंदिराच्या उगम कथेबाबत अनेक वदंता असल्या तरी त्याचा निर्मिती काल खात्रीलायकरीत्या सांगणारी कागदपत्रे आज उपलब्ध नाहीत. अनेक आख्यायिकांची साक्ष खरी मानल्यास हे मंदिर १२ व्या शतकातील असून पूर्वी संपूर्ण बांधकाम लाकडी असण्याची शक्यता आहे. इ. स. १६३० पासून या देवस्थानाचे व्यवस्थापन ‘नित्सुरे’ घराण्याकडे आले असावे. त्यापूर्वी प्राचीन काळात हे मंदिर समुद्रकिनारी होते अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. समुद्रकिनाऱ्यावर ‘अजरायलेश्वर’ म्हणजे शंकर व सिद्धिविनायक अशी दोन मंदिरे होती. जसजशी समुद्रपातळी वाढू लागली तशी ही मंदिरे पाण्याखाली जाऊ लागली. आंजल्र्याच्या समुद्रकिनारी क्वचित ओहोटीच्या वेळी अशा जीर्ण जोत्यांचे अवशेष दिसून येतात.

अशा नैसर्गिक आपत्तीमुळे या मंदिरांची प्रतिस्थापना नजीकच्या टेकडीवर (म्हणजे कोकणातील भाषेत कडय़ावर) करण्यात आली. हा कालखंड इ. स. १७६८ ते सन १७८० चा असावा. त्या काळात जांभ्या दगडात या आजच्या मंदिराची निर्मिती झाली. त्रिस्तरीय स्वरूपात असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणत: २०० पायऱ्या चढून जाण्याचे श्रम घ्यावे लागत. परंतु आता मंदिरापर्यंत मोटार नेण्याची सोय करणारा रस्ता  झाला आहे.

जीर्णोद्धार करताना काळय़ा दगडावर गिलावा देऊन संगमरवरासारखे शुभ्र मंदिर उभारले आहे. आवार विस्तीर्ण असून मध्यभागी गणपती व त्या शेजारी शंकराचे मंदिर आहे. गणपती मंदिरासमोर सुदर्शन तलाव आहे.

इ. स. १९८० मध्ये मंदिराचा द्विशताब्दी महोत्सव संपन्न झाला. साधारणपणे ६५ फूट उंच असलेले हे देवालय ५० फूट x ४० फूट क्षेत्रफळाचे आहे. विशेष म्हणजे याची स्थापत्य शैली काळानुरूप मिश्र स्वरूपाची आहे. मध्ययुगीन व अर्वाचीन स्थापत्यकलेचा प्रभाव स्पष्टपणे आढळतो. मंदिरात पुरुषभर उंचीचा दगडी तट आहे. एकूण १६ कळस असणाऱ्या मंदिराचे १६ उपकलश गर्भगृहाच्या वर आहेत. कळसावर अष्टविनायकांच्या प्रतिमा आहेत. सभागृह, अंतराळ व गर्भगृह अशी रचना असणाऱ्या या मंदिराच्या एका गोपुराची उंची ४० फूट तर दुसरे गोपुर ६० फूट उंचीवर आहे. सभागृहाला ८ कमानी आणि घुमटाकृती छत आहे. सर्व घुमटांच्या टोकाशी कमलपुष्पे आहेत.

गाभाऱ्यातील गणेश मूर्ती देवता उजव्या सोंडेची असून ५ फूट उंचीची सिंहासनाधिष्ठित आहे. ही मूर्ती काळय़ा पाषाणातून घडविलेली आहे. मूर्तीच्या शेजारी रिद्धिसिद्धी यांच्या सुबक आकृत्या कोरलेल्या आहेत. ही मूर्ती दाभोळच्या पाथरवटांनी घडविल्याचे वरिष्ठ नागरिक सांगतात. मंदिरासमोरील तळय़ाशेजारी पुरातन बकुळवृक्ष आढळतात. माघी गणेशोत्सव हा येथील महत्त्वाचा गणेशोत्सव असतो.

सुवर्ण दुर्गसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या किल्ल्यासमोरील हे गजाननाचे स्थान सूर्यास्ताच्या वेळी जीवनाचे सार प्रभावीपणे मांडण्यात यशस्वी ठरते.

कोतापूर येथील सिद्धिविनायक

प्रतिनिधी

राजापूर तालुक्यातील कोतापूर येथे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये सुमारे १५५ वर्षांपूर्वी या गणपतीची प्रतिष्ठापना केली गेली. कोकणच्या निसर्गाला साजेसे असे हे छोटेखानी पुरातन मंदिर. कोतापूरचे गणेशभक्त बालाजी गोपाळ प्रभुघाटे यांनी आणि सहकाऱ्यांनी गवताचे छप्पर असलेले मंदिर १७८५ मध्ये बांधले. त्यामध्ये त्रिविक्रम गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. गोपाळ विनायक जांभेकर हे सयाजीराव गायकवाड यांच्या बडोदा संस्थानात मुनीम म्हणून कार्यरत होते. त्यांना महिपाल ही उपाधी होती. त्यांनी या गणपतीची मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गोपाळ जांभेकरांना स्वप्नात साक्षात्कार झाला आणि उजव्या सोंडेच्या २१ गणपतींची प्रतिष्ठापना करण्यास सांगितले अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यानंतर ते राजापुरातील धोपेश्वर येथे पळसुले-देसाई यांच्याकडे आले आणि गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा मानस व्यक्त केला. त्याप्रमाणे त्यांनी राजापूर तालुक्यातील कोतापूर येथील प्रभुघाटेंशी संपर्क साधून त्या ठिकाणी असलेल्या प्राचीन मंदिरामध्ये उजव्या सोंडेच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याची माहिती या मंदिराचे विश्वस्त रवींद्र प्रभुघाटे यांनी दिली.

या मूर्तीचे वैशिष्टय़ म्हणजे ही मूती नर्मदेतील प्रवाळापासून तयार केली आहे, असे सांगितले जाते. देवांतक आणि नरांतक या राक्षसांचा नाश करण्यासाठी आदिती माता आणि कश्यप ॠषीच्या पोटी माघ शुद्ध चतुर्थीला अवतार घेतल्यामुळे या गणपतीला महोत्कट विनायक असेही संबोधले जाते. गोपाळ जांभेकरांनी नर्मदेतील प्रवाळापासून अशा २१ मूर्ती तयार करून घेतल्या होत्या. कोतापूर आणि बडोदा येथील सिद्धिविनायक ज्ञात आहेत. उर्वरित मूर्तीची प्रतिष्ठापना नेमकी कोठे झाली याबद्दल माहिती सध्या उपलब्ध नाही.

कोतापूर येथील मंदिराचा दैनंदिन आणि वार्षिक खर्चासाठी पेंडखळे येथील निनावे आणि भू येथील पाध्ये कुटुंबीयांना देवस्थान इनाम जागा कसण्यासाठी त्या वेळच्या रीतीरिवाजानुसार देण्यात आली आहे. माघी गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. उत्सव काळात राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे भाविक गर्दी करत असतात. मंदिर खासगी स्वरूपाचे असून विश्वस्त प्रभुघाटे कुटुंबीय याची व्यवस्था पाहतात. ल्ल

म्हैसोंडेचा जोश्यांचा गणपती

भरत जोशी

रत्नागिरी जिल्ह्यतील दापोली तालुक्यातील मौजे म्हैसोंडे येथे श्री गणपतीचे जागृत देवस्थान सुमारे ३३० वर्षांपासूनचे आहे.  कान्होजी आंग्रे या शूर दर्यावर्दीचा जन्म म्हैसोंडे गावात झाला. त्या काळापासून हे गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. कान्होजी आंग्रेंचे गुरू आदित्य जोशी यांचे हे मंदिर दहा पिढय़ांपूर्वीचे मंदिर म्हणून सुप्रसिद्ध आहे. परंपरागत, पूर्वापार म्हैसोंडे येथील गणेशाची पूजाअर्चा आणि देखरेख जोशी ब्राह्मण समाज करीत असे म्हणून संपूर्ण जिल्ह्यत आणि पंचक्रोशीत ‘जोश्यांचा गणपती’ म्हणून प्रसिद्ध होता, तसेच आजही या मंदिराला महत्त्व आहे.

देवळाच्या समोरील असलेले  पिंपळाचे अवाढव्य झाड सन १९६५ साली वटपौर्णिमेच्या दिवशी दुपारच्या वेळी संपूर्ण झाड गणेश मंदिरावर कोसळले. धुवांधार पाऊस, वारा, वादळात पिंपळाच्या वृक्षाच्या फांद्या पडत होत्या. मंदिराच्या भिंती, वासे, कौले कोसळली पंरतु गणेशमूर्ती सुरक्षित राहिली.

दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी एकत्र येऊन गणेश मंदिराभोवतालची पडझड दूर केली. त्यानंतर अल्पकालावधीतच नवीन लहानशा गणेशमंदिराची उभारणी करण्यात आली. कालांतराने जोशी कुटुंब म्हैंसोंडे गावाच्या डोंगरापलीकडील मौजे हण्र येथील गावात स्थलांतरित झाले. परंतु माघी गणेशोत्सव हा त्याच उत्साहाने त्याच जल्लोशात साजरा केला जायचा. त्या वेळेस गणेश जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. तेव्हा उत्पन्न साठा म्हणून मौजे म्हैसोंडे येथील सखल भागातील दोन एकराची जमीन ही भातशेती म्हणून मंदिरास देण्यात आली.

शासनदरबारी ‘देवाचे शेत’ असाच ह्य जमिनीचा उल्लेख आहे. त्यातील भाताचे उत्पन्नातील अर्धा भाग माघी महिन्यातील येणाऱ्या श्री गणेश जन्मोत्सवाच्या उत्सवासाठी केला जायचा तर अर्धा भाग भाताचा उपयोग उत्सवातील भोजनासाठी केला जायचा. भाताबरोबर आमटी, भाजी, चटणी आणि १२१ मोदकांचा प्रसादाचा नैवेद्य दाखविल्यानंतर गावजेवण दिले जायचे. देवस्थानाची मोठी मोठी भांडी, कालते, पराती, द्रोण पितळ्याची ताटे, वाटय़ा, चमचे होत्या. उत्सवाच्या १५ दिवस अगोदर हे सर्व सामान साहित्य बैलगाडीने हण्र ते म्हैसोंडे समुद्रकिनाऱ्यावरून पुळणीमार्गे नेले जायचे व उरलेले सामान चार डोंगर पार करून उत्सवासाठी नेले जायचे.

गेल्या आठ- दहा वर्षांत मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. कीर्तन, भजन, प्रवचन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी, त्याच्यासमोर मोठे सभागृह बांधण्यात आले. त्यासाठी ग्रामस्थांचा आणि पंचक्रोशीतील रहिवाशांचा सहभाग लाभला.

माघ महिन्यातील गणेशजन्माच्या उत्सवासाठी हजारभर गणेशभक्त, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ अणि मुंबई, ठाणे, डोंबिवली, येथून जोशी कुलबांधव एकत्र येतात.

परशुराम गणेश

प्रतिनिधी

चिपळुणातील परशुराम मंदिराच्या गाभाऱ्याच्या डाव्या बाजूस पत्र्याच्या छप्पराचे हे गणेश मंदिर आहे. छोटाशा सभामंडपातील मंदिरात गणेशाच्या मूर्तीची गाभाऱ्यात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मंदिराच्या बांधकामाविषयी स्पष्ट उल्लेख सापडत नाही. परशुराम मंदिराच्या अनुषंगानेच याची स्थापना झाली असावी.

 मूर्तीची स्थापना १७८५ ला करण्यात आली. मोंगल आक्रमणाच्या काळात मूळ मूर्ती वसिष्ठी नदीत सोडावी लागली होती. आत्ताची मूर्ती ही पुण्यातील एका शिल्पकाराने तयार केली आहे. मूळ मूर्तीचे वर्णनदेखील सध्या उपलब्ध नाही. सध्याची मूर्ती ही शुभ्र संगमरवरी असून शांत ध्यानातील प्रसन्नमुद्रा आहे. तीनेक फूट उंचीची ही मूर्ती उकिडव्या मांडीची असून उजव्या सोंडेची आहे.

सर्व ग्रामस्थांकडून महाप्रसादाचे आयोजन केले जाते. खरा थाट असतो तो माघी गणेशोत्सवामध्ये. त्या वेळी पालखीतून पीतांबर, शाल, चांदीचा मुकुट व कुंडले यांनी सजवलेल्या मूर्तीची थाटामाटात मिरवणूक काढली जाते. चिपळूणपासून सुमारे १० किलोमीटरवर असणारे हे मंदिर आवर्जून पाहण्यासारखे आहे.

सोनगावचा बर्वेचा गणपती

प्रतिनिधी

हा पहिल्या बाजीरावांच्या आजोळचा गणपती. चिपळूणजवळील परशुराम क्षेत्रापासून दोन किलोमीटरवर सोनगाव आहे. याच सोनगावी बर्वे यांनी या मंदिराची स्थापना केली. काळ्या पाषाणातील ही मूर्ती पाच फूट उंचीची असून उजव्या सोंडेची आहे. पाय गुडघ्यात उभा मुडपला असून मागील उजव्या हातात पाश व अंकुश असून डाव्या हातात मोडका दात व नागफणीची मेखला आहे.

सोनगावच्या डोंगरात घळईत हे स्थान आहे. येथील ब्रrोंद्रस्वामींच्या गुहेतून परशुरामक्षेत्री जाण्यासाठी एक भुयारी मार्ग होता असे म्हटले जाते. हे स्थान मुंबई-चिपळूण रस्त्यालगतच आहे. मूर्तीच्या स्थापनेबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. ही मूर्ती सोनगावला बर्वेकडे आणताना तिची भुरळ पडून खोतांना ती आपल्या घरी असावी असं वाटू लागलं. त्यांनी त्या दृष्टीने काही प्रयत्नदेखील केले. पण गडय़ांनी ती मूर्ती उचलून नेण्याच्या प्रयत्न केला असता मूर्ती जड झाली खोतांच्या घरी नेण्याचे प्रयत्न फसले. त्या वेळी खोताला दृष्टांत झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यानंतर मूर्तीची स्थापना बर्वेच्या घरी करण्यात आल

response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anjarle ganpati temple
Show comments