सामान्य मराठी कुटुंबातील मुलांमध्ये असणाऱ्या न्यूनगंडांमध्ये न अडकता, काळाची पावलं ओळखत स्वत:चं करिअर आणि अनुभवविश्व विस्तारत नेणारे आनंद कानिटकर हे विरळाच. मेडिकल, इंजिनियरींग, आयटी अशा क्षेत्रातून न येताही अवघ्या पस्तिशीत, आंतरशाखीय अभ्यासाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी घेतलेली झेप वाखाणण्याजोगी आहे.

‘‘अगदी १५ वर्षांपूर्वी मला कुणी सांगितले असते की, २०१६ मध्ये मी दहशतीच्या छायेखाली असलेल्या अफगाणिस्तानातील जगप्रसिद्ध बामियान बुद्धाच्या पुरातत्त्वीय ठिकाणाच्या वारसा व्यवस्थापनाच्या कामात गुंतलेलो असेन, तर कदाचित माझा स्वत:चाही विश्वास बसला नसता. आज तेच प्रत्यक्षात आलं ते केवळ माझी आवड, ती जोपासण्यासाठी केलेला सखोल अभ्यास, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रत्येक अनुभवातून झालेले शिक्षण, जाणीव समृद्ध होण्याची प्रक्रिया यामुळेच..’’ सध्या युनेस्कोच्या काबूल कार्यालयात अफगाणिस्तानातील वारसा स्थळे, त्यांचा विकास आणि संवर्धन या प्रकल्पाचे व्यवस्थापक असलेल्या आनंद कानिटकरांचे प्रोफाइल नक्कीच वेगळे आहे. आनंद मूळचे पुण्याचे, पुणे ते काबूल हा त्यांचा आजवरचा प्रवास आंतरशाखीय अभ्यासाला आलेले महत्त्व अधोरेखित करणारा आहे. शिवाय जगभरातील भाषांचा अभ्यास प्रत्यक्ष आयुष्यात किती अधिक संधी देऊन समृद्ध करतो, तेही पुरते स्पष्ट करणारा असाच आहे.

Bipin preet singh Success Story
Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
congress leader rahul gandhi made serious allegations on pm modi in jharkhand
पंतप्रधान बड्या उद्योजकांचे हित जोपासतात; राहुल गांधी यांचा आरोप
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त

या सगळ्याची सुरुवात झाली ती शाळेपासूनच. शाळेतल्या नाटकांतून आवडीने दहावीपर्यंत आनंदने काम केले. बोर्ड परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला शिक्षकांकडून मिळाल्यानंतर त्या वर्षांपुरते ते थांबले. सीए किंवा इंजिनीअरिंगला जायचे नाही हे त्यापूर्वीच पक्के असल्याने वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन त्यात बिझनेस मॅनेजमेंट आदी काहीतरी करावे असा विचार त्यांच्या डोक्यात होता. ओघानेच आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळ मिळेल आणि नोकरीही अशी खात्री होती. भाषाप्रेमामुळे बारावीपर्यंत मराठी व संस्कृत या दोन भाषा घेतलेल्या होत्याच.

या टप्प्यापर्यंत कालिदास, अमरकोश आदींचे वाचन आनंद यांनी केले होते. गावात राहात असल्याने शनिवारवाडा, कसबा पेठ गणपती आदींबद्दलचेही आकर्षण होते. त्या आकर्षणापोटी बारावीच्या परीक्षेनंतर भारत इतिहास संशोधक मंडळात अधिक वाचनासाठी जायला सुरुवात केली. त्याच वेळेस सासवडमध्ये एक मोडी कागदपत्रांचे भेंडोळे सापडले. ते घेऊन प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकरांना १९९९ मध्ये ते भेटले.  आनंद सांगतात, ‘तोपर्यंत ऐतिहासिक कादंबऱ्यांचे वाचन केलेले होते. तिथे पहिली कलाटणी मिळाली. बेडेकरांच्या प्रोत्साहनाने भारत इतिहास संशोधक मंडळात मोडी शिकलो. साहजिकच मंडळात जाणे नियमित होऊ  लागले. त्यांनीच सुचवल्यानुसार इतिहासातील एक विशिष्ट कालखंड निवडून त्यावर वाचन व काम करण्यास सुरुवात केली. शनिवारवाडय़ासंदर्भात काम केले त्यातून खूप काही शिकायला मिळाले. तुम्हाला एखाद्या गोष्टीची अशी असोशी असेल तर त्यातून खूप गोष्टी उत्तरायुष्यात साध्य होतात. माझ्या आयुष्यात हे सारे घडत असताना इतिहासाबद्दलची आवड माझ्या लक्षात आली होती.’

दरम्यान, दुसरीकडे मित्रांनी महाविद्यालयात असताना पुरुषोत्तम करंडकसाठी ओढूनच घेतले. त्यामुळे वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये ओळखी झाल्या आणि पृथ्वी इंटरनॅशनल थिएटर फेस्टिव्हलमध्ये काम करता आले. इथेही रमायला आपल्याला आवडतं हे तेव्हा लक्षात आल्याचं आनंद सांगतात.. ‘कार्यशाळा घेणे, लहान मुलांसोबत काम करणे, थिएटर नसांनसात भिनल्यासारखी अवस्था होती. त्याच वेळेस दीपा श्रीराम यांनी त्यांच्या नाटकासाठी प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून काम करण्यास पाचारण केले. तेही सारं मन लावून केलं. त्याच वेळेस दुसरीकडे जर्मन शिकत असतानाच जर्मनीत कल्चरल मॅनेजमेंट असा विषय अभ्यासक्रमात असतो, असं कळलं होतं. त्याची माहिती काढली आणि माझ्या सर्व आवडी तिथे एकवटत असल्याचे लक्षात आले. जर्मन शिकण्याची सुरुवात नाटकामधीलच एका मित्रामुळे झाली होती. तुला संस्कृत येतं मग जर्मन नक्की येणार असं म्हणून त्यानं माझे पहिले दोन धडे घेतले होते. जर्मन शिकताना मला जगाचेच दरवाजे उघडल्याप्रमाणे झाले. अनेक नवीन गोष्टींची माहिती मिळत गेली, त्यात या कल्चरल मॅनेजमेंटचा समावेश होता. त्याच वेळी दीपाताईंबरोबर काम करणेही सुरूच असताना अलायन्स फ्रान्सिसमध्ये कल्चरल को- ऑर्डिनेटरची जागा असल्याचे कळले. तिथे गेलो आणि कामालाही लागलो.’

खरे तर त्यांना तेव्हा फ्रेंच येत नव्हते, शिकण्याची परवानगी दिलीत तर सकाळी फ्रेंच शिकून नंतर नोकरी करेन, असे सांगून आनंद यांनी त्याला रुकार मिळवला. भारतात येणाऱ्या फ्रेंच कलावंतांचे काम त्यांच्याकडून समजावून घेत ते पुण्यात लोकांपर्यंत पोहोचवायचे असे त्या कामाचे स्वरूप होते. त्याचाच एक भाग म्हणून अलायन्सच्या भारतातील १५ कल्चरल को- ऑर्डिनेटर्सच्या कार्यशाळेतही दिल्लीत सहभागी होता आले. हे सर्व करताना तिसरीकडे टिळक महाराष्ट्र विद्यपीठातून भारतविद्या (इंडॉलॉजी) या विषयात एमए पूर्ण केले होते. २००६ पर्यंत या कामात हेरिटेज मॅनेजमेंटचा फारसा संबंध आलेला नव्हता. आता तेही करावं असं ठरलं, असं आनंद सांगतात. त्या दृष्टीने शोध घेतला असता जर्मनीतील विद्यापीठांमध्ये नाही तर फ्रेंच विद्यापीठात ते काम झाले. तोपर्यंत फ्रेंचही शिकल्याचा फायदा इथे झाला. मग पॅरिसमधील स्कूल ऑफ लुव्र येथून हिस्ट्री ऑफ आर्ट अ‍ॅण्ड आर्किऑलॉजीमध्ये पदविका संपादन केली. त्यानंतर फ्रान्समधील युनिव्हर्सिटी जीन मोने, युनिव्हर्सिटी देगील स्टुडी दी नेपोली आणि युनिव्हर्सिटी ऑफ स्टुटगर्ट या तिन्हीमधून मास्टर्स ऑफ कल्चरल लँडस्केप हा अभ्यासक्रम पूर्ण करता आला. तिथे पुरातन वारसा विषयातील तज्ज्ञता प्राप्त झाली.

आपण पॅरिसमध्येच आहोत तर युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज विभागात काम का करू नये, असा विचार करून तिथे अर्ज केला आणि इंटर्नशिपसाठी बोलावणे आले. या इंटर्नशिपचा प्रचंड फायदा झाल्याचे आनंद सांगतात. कामाचा जागतिक आवाका लक्षात येणे ही खूप महत्त्वाची गोष्ट होती. २०१३ मध्ये आनंद यांना सिक्कीम सरकारसाठी काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाला जागतिक वारसा सन्मान मिळण्याच्या प्रकल्पावर नियुक्त केले गेले. त्यानंतर त्यांनी युनेस्कोच्या भारतातील दिल्ली येथील कार्यालयासाठी जुलै २०१३ ते ऑगस्ट २०१४ पर्यंतच्या कालावधीसाठी काम केले. आणि आता सप्टेंबर २०१४ ते डिसेंबर २०१५ पर्यंत ते काबूलमध्ये युनेस्कोच्या अफगाणिस्तान प्रकल्पासाठी कार्यरत होते.

या आंतरराष्ट्रीय फिरस्तीचा व अभ्यासाचा कसा फायदा झाला, या प्रश्नाच्या उत्तरादाखल आनंद सांगतात, ‘जर्मन, फ्रेंचसोबत अगदी सहज इटालिअनही शिकता आली. त्या सर्व भाषांमधून काम केले, शोधनिबंध सादर केले. मला सर्व भाषा येत असल्याने तिथे असलेल्या इतरांपेक्षा कमी त्रास झाला व विषय समजून घेणे सोपे गेले. भारतात जागतिक वारशासाठीच्या फाइल्स अतिशय ढिसाळ पद्धतीने तयार केल्या जायच्या. त्यात व्यावसायिकपणा आणण्यात यश आले. भारताच्या फाइल्स फेटाळल्या जाऊन परत यायच्या. त्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. शिवाय सर्वात मोठा फायदा झाला तो म्हणजे इतर भाषांमध्ये संकल्पना कशा मांडल्या जातात त्यांची पद्धती काय आहे, त्या व्यावसायिक पद्धतीने कशा मांडल्या जातात ते कळलं. काबूलमध्ये काम मिळालं तेव्हा घरच्यांना काहीच न सांगितल्याचं थोडं टेन्शन होते. पण सांगितल्यानंतर कुटुंबीयही पाठीशी उभे राहिल्याने काम करणं सोपं गेलं,’ असं आनंद सांगतात.

भारताबाहेर जाताना एकदा कर्जही काढावं लागलं. पण नंतर फेलोशिप मिळाली, त्याचा फायदा झाला. इस्लामिक वारशाशी फारसा संबंध नव्हता. काबूलमध्ये असताना तेही शिकता आलं. त्या त्या ठिकाणी सरकारशी संबंध कसे ठेवावेत, जपावेत हे युनेस्कोच्या कामादरम्यान खूप शिकता आलं. ‘मी जर्मन, फ्रेंच शिकलो नसतो तर मात्र माझी अनेक ठिकाणी अडचण झाली असती,’ असं आता लक्षात येतंय, असं आनंद आवर्जून नमूद करतात.

आयुष्यात आपण जे जे काही शिकतो, त्याचा कधी ना कधी आपल्याला फायदा होतोच, हे विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवायला हवे, ते सांगतात. कुठेही उभं राहून बोलायची वेळ आली तर बेधडक बोलू शकतो, हा आत्मविश्वास नाटकाने दिला. त्याचा पुढे कामादरम्यान मोलाचा फायदा झाला. अनेक संशोधक उत्तम काम करतात, परंतु त्यांना बोलता येत नाही किंवा नीट मांडणीही करता येत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नानाविध भाषा शिकल्यामुळे लोकांशी चटकन संवाद साधता येतो. एकमेकांच्या जवळ जाणाऱ्या भाषा तर वेगात शिकता येतात. त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधता येतो. इतर भाषांमधील संदर्भ मुळातून वाचता येतात त्याचा संशोधनात मोठाच फायदा होतो. कारण तुमच्या आकलनाचा आवाका विस्तारलेला असतो आणि त्यामुळे तुम्ही नेहमीच इतरांपेक्षा एक पाऊल पुढे असता. जर्मन आणि फ्रेंचमध्ये वेदांवर झालेले अप्रतिम काम वाचल्याने अधिक समृद्ध झालो, जाणीव वाढली. आंतरशाखांच्या अभ्यासामुळे जाणिवेची पातळी वाढली. काम करताना त्याचा कुठेही फायदा होऊ  शकतो. यापूर्वीही कार्ला लेणींवर काम केले असूनही काबूलमधील कामानंतर काल्र्याचे वेगळे संदर्भ लक्षात आले. त्याचा मध्य आशियातून जाणाऱ्या रेशीम मार्गाशी असलेला वेगळा संबंध उघडकीस आला. आंतरशाखीय कामामुळे हा मोठा फायदा होतो, आनंद सांगतात.

आनंदने वयाच्या ऐन पस्तिशीपर्यंत एवढी झेप घेणे हे निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. सामान्य मराठी कुटुंबातील मुलांमध्ये अनेक प्रकारचे न्यूनगंड असतात. कधी ते भाषेविषयी तर कधी प्रत्यक्ष कामाच्या संदर्भात तर कधी स्वत:विषयी. शिवाय नेहमी एक सरधोपट, सुरक्षित मार्गावरून पुढे जाण्याचा विचार इच्छा असूनही आपल्याला वेगळे काही करू देत नाही. पर्यायाने आपण वेगळ्या संधी गमावतो. यापुढे बहुतांश यश हे आंतरशाखीय बाबींमध्ये दडलेले असणार आहे. काळाची पावले वेळीच ओळखायला हवीत. आनंदने ती वेळीच ओळखली, हेच त्यांच्या यशाचे गमक आहे!
विनायक परब
response.lokprabha@expressindia.com, twitter – @vinayakparab