निखिल बेल्लारीकर
लोकप्रभा दिवाळी २०२०
स्थलांतराचा मागोवा घेतल्याशिवाय मानवाच्या वाटचालीची संगती लागणं अशक्यच! बाहेरच्यांना स्वीकारण्याच्या या प्रक्रियेत कमी-अधिक प्रमाणात संघर्ष निर्माण झालेला दिसतो. कधी अपरिहार्यतेमुळे तर कधी अधिक काहीतरी साध्य करण्यासाठी स्थलांतरं झाली. कारणं काहीही असली, तरी अनिश्चितता, असुरक्षितता दोन्ही बाजूंना बराच काळ भेडसावत राहिली. या साऱ्या मंथनात काहींना हलाहल पचवावं लागलं, तर काहींना अमृत गवसलं. आपलं गाव-घर-माणसं मागे सोडून आलेल्या या समुदायांनी आपापली संस्कृती मात्र सोबत नेली. स्थानिक संस्कृतीशी झालेल्या त्यांच्या मिलाफाच्या पाऊलखुणा आज आपण इतिहास म्हणून अभ्यासतो. या अभ्यासाचा पैस यापुढेही विस्तारतच जाईल. कारण, ही एक न संपणारी प्रक्रिया आहे..
आर्मेनियन माणूस हा बव्हंशी हटकून व्यापारी असायचा हे समीकरण किमान पंधराव्या शतकापासून कायम होते. एका अतिशय छोटय़ा राष्ट्रातील लोकांमध्ये ही वाणिग्वृत्ती इतक्या मोठय़ा प्रमाणात वाढीस लागली कशी? मध्यपूर्व व भारत व अन्य भागांतही त्यांनी युरोपीयांच्या आधीच बाजी मारली तरी कशी? या प्रश्नाचे दोन भाग पडतात – १) मुळात आर्मेनिया प्रांताबाहेर आर्मेनियन्स इतक्या मोठय़ा संख्येने कसे पसरले व तिथून ते भारतात कसे आले? या दोहोंची उत्तरे आता संक्षेपाने पाहू.
१६०० सालानंतर भारतातील बहुतांश आर्मेनियन्स हे इराणमधून आलेले असल्याने त्यांना साहजिकच फारसी भाषेचे उत्तम ज्ञान होते. तत्कालीन भारताच्या बहुतांश भागांवर इस्लामी सत्तांचे राज्य असून, त्यांच्या राज्यकारभाराची भाषा फारसी असल्याने सरकारदरबारी आर्मेनियन्सना याचा साहजिकच फायदा झाला. फारसीचे ज्ञान व भारत आणि इराण, अरेबिया, आग्नेय आशिया या भागांशी व्यापाराचा मोठा अनुभव यामुळे भारतातील राजसत्तांशी करारमदार करताना युरोपीयांना आर्मेनियनांची मोठी मदत झाली. कैकदा ते आर्मेनियन प्रतिनिधी पाठवीत असत. डच व इंग्लिश ईस्ट इंडिया कंपन्यांमधील अनेकांनी शुद्ध आर्थिक कारणांसाठी आर्मेनियन स्त्रियांशी लग्नेही केली. त्यांच्या भांडवलाचा व व्यापारी नेटवर्क्सचा लाभ आपल्याला मिळावा, हाच एकमेव हेतू त्यांमागे होता. कंपनीच्या अधिकृत व्यापाराबरोबरच कैक जण खासगी व्यापारही करत. त्यासाठी त्यांना याची उत्तम मदत होत असे. याबदल्यात आर्मेनियन्सना इंग्लिश व डच वसाहतींत आपापले धर्माचार पाळायची मुभा देण्यात आली होती. अनेक आर्मेनियन्सनी आपला प्रभाव भारतात या ना त्या प्रकारे पाडलाच. यांपैकी एक जण व्यापारी तर दुसरा शिपाईगडी होता.
(उर्वरित लेख वाचा प्रत्यक्ष ‘लोकप्रभा दिवाळी २०२०’मध्ये. अंक बाजारात सर्वत्र उपलब्ध.)