संजय लीला भन्साळीसारखा दिग्दर्शक ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमात इतिहासाचा विपर्यास करतो म्हणून आपल्याला राग येतो, पण मराठी माणसांना सेनानी म्हणून बाजीरावाचं उत्तुंग व्यक्तिमत्त्व कुठे माहीत असतं?
पहिले बाजीराव पेशवे म्हटले की, मराठी माणसाच्या मनात त्यापाठोपाठ मस्तानी हेच नाव येते. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्याच ताकदीचा महाराष्ट्राला लाभलेला हा पराक्रमी पेशवा. अवघ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात ४१ लढाया लढून, त्यातली एकही लढाई न हरलेला अजिंक्य लढवय्या. वर्तमान युद्धशास्त्रातही ज्याच्या युद्धनीतीचा अभ्यास केला जातो असा असामान्य योद्धा. आपल्या कारकीर्दीत उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत मराठेशाही दुमदुमत ठेवणारा विलक्षण सेनानी. तरीही बाजीराव पेशवे या नावापाठोपाठ मराठी माणसाने मस्तानी हे नाव जोडले. ज्याचे फारसे काहीही तपशील माहीत नाहीत अशी इतिहासाच्या पडद्याआडची ही प्रेमकथा अजरामर करून टाकली आणि बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाचे सगळे तपशील उपलब्ध असताना ते मात्र नजरेआड केले.
बाजीराव पेशव्यांची कारकीर्द वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी सुरू झाली आणि वीस वर्षे तेजाने तळपत राहिली. तरीही आपल्याला त्याबद्दल फारसे काहीही माहीत नसते आणि संजय लीला भन्साळीसारख्या दिग्दर्शकाने त्याला भुरळ पडलेल्या या प्रेमकथेवर सिनेमा काढला, की आपल्याला राग येतो; पण आपणही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांच्याच रांगेतले असतो हे आपण मान्य करायला तयार होत नाही. संजय लीला भन्साळींना सिनेमाच्या बाजारात खपू शकणाऱ्या गोष्टीवर सिनेमा काढून पैसा कमवायचा आहे. त्यांचा हेतू त्यांना स्पष्ट आहे; पण शिवाजी महाराजांपासूनच्या मराठेशाहीच्या इतिहासाने रोमांचित होणाऱ्या आपल्यासारख्यांचे काय? आपल्याला तरी आपला इतिहास नीट माहीत असतो का? बुंदेलखंडातला बुलंद राजा छत्रसाल याची मुलगी, बाजीराव पेशव्यांची पत्नी असणाऱ्या मस्तानीला कलावंतीण ठरवून मराठी माणसाने जसा तिच्यावर अन्याय केला तसाच मस्तानीचा प्रियकर एवढीच बाजीराव पेशव्यांसारख्या धुरंधर सेनानीची ओळख मनात ठेवून त्यांच्यावरही अन्यायच केला नाही का?
बाजीराव पेशव्यांचे संपूर्ण कर्तृत्व सांगणे इथे शक्य नाही; पण त्याची झलकच पाहायची तर त्यांच्यासंबंधी वेळोवेळी त्यांचे निजाम, पोर्तुगीज, इंग्रज हे तत्कालीन बलाढय़ शत्रू तसेच अलीकडच्या काळातले इतिहासकार, अभ्यासक काय म्हणतात ते पाहता येईल.
व्ही. जी दिघे यांनी बाजीरावांच्या युद्धनीतीवर ‘मराठा सत्तेचा विकास’ (१७२० ते १७४०) हा पीएच.डी.चा प्रबंध लिहिला आहे. (वर्ष १९४४ ) त्याच्या प्रस्तावनेत या प्रबंधाचे मार्गदर्शक प्रसिद्ध इतिहास संशोधक सर जदुनाथ सरकार लिहितात, ‘पेशव्यांच्या दीर्घ आणि देदीप्यमान परंपरेच्या आकाशगंगेत बाजीराव बल्लाळाची तुलना कुणाशीच करता येणार नाही. त्याची धाडसी वृत्ती आणि वेगळी अशी मूलभूत विचारसरणी तसेच त्याचे पांडित्य आणि त्याच्या अमूल्य यशाचे प्रमाण मोजदादीपलीकडे आहे. त्यांचे वर्णन धडाडीचा पुरुष असेच करावे लागेल. तो खरोखरच काव्र्हालियन हिरो ‘मॅन ऑफ अॅक्शन’ होता. इंग्लंडच्या अलिखित राज्यघटनेत जसे रॉबर्ट वॉलपोल यांनी इंग्लंडच्या राजघराण्याचे अलिखित पण सर्वश्रेष्ठ स्थान निर्माण केले, तसेच भारतात मराठा सत्तेचे अढळ आणि निश्चल स्थान बाजीरावाने निर्माण केले.’
सर जदुनाथ सरकार यांच्या मते बाजीराव हे एक थोर शिपाई तर होतेच, पण ते एक जनरल म्हणून अधिक थोर होते. ‘स्वर्गात जन्मलेला एक अप्रतिम घोडदळ प्रमुख’ (हेवन बॉर्न कॅव्हलरी लीडर) असे बाजीराव पेशव्यांचे वर्णन सरकार यांनी केले आहे.
मोठे घोडदळ घेऊन अतिशय आश्चर्यकारक अशा वेगवान हालचाली हे बाजीराव पेशव्यांचे महत्त्वाचे वैशिष्टय़ होते. १७३८ मध्ये बाजीराव पेशवे मोठय़ा सैन्यानिशी दिल्लीपर्यंत चालून गेले तेव्हा आग्य्रापासून दिल्लीपर्यंतचा १२५ मैलांचा प्रवास त्यांनी शत्रूला चाहूल लागू न देता आडवाटेने दहा दिवसांत केला. म्हणजे रोजचे सरासरी १२.५ मैल झाले. शत्रूच्या तडाख्यातून सुटण्यासाठी दिल्लीपासून जयपूपर्यंत झपाटय़ाने प्रवास करताना त्यांनी १८० मैल ८ दिवसांत म्हणजे रोज २५ मैल असा प्रवास केला. हा वेग थक्क करणारा आहे.
दळणवळणाची, संपर्काची आजच्या काळाशी तुलना करता अतिशय अपुरी साधने असताना बाजीराव पेशव्यांची फौज शत्रूला चकवा देण्यात अतिशय माहिर होती. अनपेक्षितपणा या त्यांच्या बलस्थानाने तर त्यांच्या शत्रूंच्या तोंडाला फेस आणलेला होता. शत्रू कल्पनाच करणार नाही अशा उलटसुलट मजला मारणे, शत्रूला खिंडीत गाठून त्याचे अन्नपाणी तोडणे, शत्रूला चकवा देऊन आपल्याला हव्या त्या ठिकाणी त्याला यायला भाग पाडणे अशा प्रकारचे स्वत:चे युद्धतंत्रच त्यांनी विकसित केले होते. त्यांच्याजवळच्या फौजांचे सामान अतिशय हलके असे. त्यामुळे त्यांना वेगवान हालचाली करणे शक्य होत असे. आपल्या कमतरता आणि शत्रूची बलस्थाने यांचा नेमका अभ्यास करून आपले धोरण आखणे आणि परिसरातल्या निसर्गाचा पुरेपूर वापर करून घेणे या गोष्टींमुळे त्यांची ताकद दिवसेंदिवस वाढतच गेलेली दिसते.
बाजीराव पेशव्यांनी उभे केलेले जिवाला जीव देणारे सैन्य हीसुद्धा त्यांची महत्त्वाची ताकद होती. त्यासंदर्भात एक किस्सा प्रा. ना. के. बेहेरे यांच्या ‘पहिले बाजीराव पेशवे’ या ग्रंथात आहे. निजामाशी झालेल्या पालखेडच्या मोठय़ा संघर्षांनंतर नाइलाजापोटी निजाम तहाला तयार झाला. हा मुंगी शेगावचा तह प्रसिद्ध आहे. या तहाच्या वेळी झालेल्या भेटीत निजाम बाजीराव पेशव्यांना म्हणाला, ‘‘आम्ही दगाबाजी करून तुम्हाला कैदेत टाकले तर काय कराल? तुम्ही आमचा विश्वास फुकट धरिला. या वेळी कुठे आहेत तुमचे शिंदे, होळकर? ते आता तुम्हाला मदत करू शकतात का?’’ त्याच क्षणी पेशव्यांच्या बरोबर आलेल्या हुजऱ्यांनी आपल्या अंगरख्यातून लपवून आणलेल्या तलवारी सपसप उपसल्या. हुजरे म्हणून आलेले दुसरेतिसरे कुणी नव्हते तर शिंदे, होळकरच होते. असे जिवाला जीव देणारे सख्य बाजीराव पेशव्यांनी निर्माण केले होते.
बाजीराव पेशव्यांचे वैशिष्टय़ं म्हणजे ते जास्तीत जास्त काळ छावणीत असत. सामान्य शिपायासारखेच राहत, खात-पीत, कूच करीत. मोहिमेदरम्यान सैन्याबरोबर जाता-जाता ते शेतातली कणसे तोडून ती हातावर चोळून खात आणि तेच कधीकधी त्यांचे जेवण असे, अशी वर्णनेही केली गेली आहेत. एकदा शाहू महाराजांनी पेशव्यांच्या पायदळाच्या क्षमतेबद्दल संशय व्यक्त केला तेव्हा (बाजीराव पेशव्यांचा समर्थक नसलेल्या) फत्तेसिंग भोसले यांनी शाहूंना उत्तर दिले होते, ‘पेशवा त्याच्या पायदळाकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. तो आपले सगळे सैन्य दक्ष आणि आणीबाणीसाठी सज्ज ठेवतो.’
आपल्याला माहीत असलेल्या बाजीराव-मस्तानी प्रेमकथेचे विविध कंगोरे ‘मस्तानी’ या पुस्तकात द. ग. गोडसे यांनी उलगडून दाखवले आहेत. त्यानुसार तर आयुष्यभर मोगलांशी कडवी झुंज देणाऱ्या प्रणामी पंथाच्या छत्रसाल बुंदेलाला बंगश या अफगाण आक्रमकाशी लढायला बाजीराव पेशव्यांनी मदत केली. या मदतीमुळे छत्रसालाने त्यांना आपला मुलगा मानले. राज्याचा तिसरा हिस्सा दिला. पन्ना येथील हिऱ्याच्या खाणीचा हिस्सा दिला आणि मस्तानी ही आपली लाडकी लेक दिली. ही सोयरीक तेव्हाच्या काळानुसार राजकीयदृष्टय़ा महत्त्वाची. बाजीराव पेशव्यांबरोबर असलेल्या शिंदे, होळकर सरदारांना त्यात काही वावगे वाटले नाही, पण बाजीराव पेशव्यांच्या कुटुंबाला मात्र त्या सोयरीकीतले व्यापक राजकारण समजूच शकले नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यापलीकडचे त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्वही सामान्य माणसापर्यंत पोहोचले नाही आणि त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त चर्चा होत राहिली ती मस्तानीसंदर्भात.
वास्तविक ४१ लहानमोठय़ा लढाया लढून, त्यापैकी एकही लढाई न हरणाऱ्या, सगळ्याच्या सगळ्या जिंकणाऱ्या बाजीराव पेशव्यांचे कर्तृत्व जगातल्या गाजलेल्या अजिंक्य योद्धय़ांच्या तोडीचे. त्र्यंबकराव दाभाडे, निजाम यांच्याविरुद्धची डभोईची लढाई, निजामाविरुद्धची पालखेडची आणि भोपाळची लढाई, राजा छत्रसालाच्या बाजूने बंगशाच्या विरुद्ध लढलेली बुंदेलखंडातली लढाई या चार लढायांनी बाजीराव पेशव्यांचे पर्यायाने मराठेशाहीचे नाव देशभर दुमदुमले. म्हणूनच बाजीराव पेशव्यांचे वर्णन करताना इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात, ‘मराठय़ांच्या इतिहासात शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खालोखाल कदाचित कित्येक बाबतीत शिवाजी महाराजांच्या तोडीच्या, अद्भुत कृत्यांचे रसभरित वर्णन देण्यास प्रासादिक इतिहासकारच पाहिजे.’
दिल्लीवर धडक मारणाऱ्या बाजीराव पेशव्यांच्या योग्यतेचे वर्णन इंग्रज कॅप्टन ग्रँड डफ याने नेमकेपणाने केले आहे. तो लिहितो, बाजीरावाकडे आखणी करणारे डोके आणि अंमलबजावणी करणारे हात होते. याच कॅप्टन डफने केलेले बाजीराव पेशव्यांच्या दिल्लीवरील सुप्रसिद्ध स्वारीचे वर्णन वाचण्यासारखे आहे. त्यात म्हटले आहे, ‘आग्य््राापासून वीस कोसांवर दक्षिण दिशेला यमुनाकाठी उतरलेला बाजीराव सैन्यासह ईशान्य दिशेस निघाला. तेव्हा मोगलांच्या सरदारांनी बादशहाला लिहिले, आम्ही सर्व मराठय़ांना चंबळ नदीपार केले व ते आपल्या मुलखी गेले. तो दिल्लीमध्ये लोकांस फार आनंद झाला. मग रोज वीस वीस कोस मजल-दरमजल करत आडवाटेने अचानक बाजीरावाने आणि त्याच्या सैन्याने दिल्ली दरवाजाजवळ डेरा दिला. अनेक हत्ती, उंट धरले. दिल्लीतून बाहेर देवदर्शनासाठी जाणाऱ्या लोकांसही लुटले, पण कोणाची घरे मात्र जाळली नाहीत, ही त्याची सुसंस्कृती पाहून दिल्लीचे कित्येक मानकरी धीर धरून आठ हजार लष्कर घेऊन युद्धास निघाले. या युद्धात मोंगलांचा पराभव झाला. याप्रमाणे बाजीरावाचा विजय झाला. तरी पण त्याचा असा कयास होता की, मोंगलांचे लोक चहूकडून लवकर जमा होतील, म्हणून तो रात्रीच तातडीने निघून गेला.’
सिद्दय़ांविरुद्धच्या मराठय़ांच्या संघर्षांबाबत पोर्तुगीज गव्हर्नर वीरजई चौलच्या कॅप्टनला लिहिलेल्या पत्रात म्हणतो, ‘सिद्दय़ाचा जंजिरा काबीज करणे मराठय़ांस शक्य होत नसल्याने ते आता आंग्य््रााचे किल्ले बळकावण्याची इच्छा धरतात; पण आंग्य््राास नष्ट केल्याने आमचा फायदा होत असला तरी त्याचे जागी मराठे येऊन त्यांच्या कबजात समुद्रालगतची बंदरे जाणे आम्हास जास्त नुकसानकारक वाटते. याकरिता आंग्रे व मराठे यांची लढाई चालू ठेवणे आम्हास योग्य वाटते. म्हणून बाजीरावांस तुम्ही वरकरणी मदत करावी, पण त्यामुळे आंग्य्रांचे पारिपत्य त्याच्याकडून होऊ नये इतकी खबरदारी घ्यावी.’
याच वीरजईने आपल्या पोर्तुगालच्या राजाला लिहिलेल्या पत्रात मराठय़ांचे वर्णन केले आहे. त्या वर्णनावरून त्या काळात बाजीराव पेशव्यांनी आपल्या शौर्याने तत्कालीन देशभरात मराठय़ांविषयी किती दहशत निर्माण केली होती ते लक्षात येते. या पत्रात वीरजई म्हणतो, ‘शत्रूने अनेक वेळा आमच्याकडे तहाची मागणी केली आहे, तिचे कारण आमची त्यांना भीती वाटते म्हणून नव्हे, तर केवळ सध्या त्यांस कोकणात उतरण्यास होत नाही म्हणून. मराठे हे इतके प्रबळ आहेत की, त्यांनी मोंगलास जर्जर करून सोडले आहे. तेव्हा जर परमेश्वराने आम्हांस मदत केली नाही, तर मराठय़ांकडून आमच्या वसई प्रांतावर कठीण प्रसंग नक्की येणार.’
दुसऱ्या महायुद्धातील इंग्रजांचे सेनापती फिल्ड मार्शल माँटगोमरी आपल्या ‘अ हिस्टरी ऑफ वॉरफेअर’ या ग्रंथात पालखेडच्या लढाईबद्दल लिहितात, ‘१७२७-२८ च्या पालखेड मोहिमेत बाजीरावाने सेनानेतृत्वात निजामावर सपशेल मात केली. ही लढाई म्हणजे स्ट्रॅटेजिक आणि टॅक्टिकल मोबिलिटीचा मास्टरपीस होय.’ माँटगोमरी पुढे लिहितात, ‘बाजीरावाची सेना ही शुद्ध घोडेस्वार सेना होती. तलवार, भाला, काही पथकांपाशी तीरकामठा आणि एक गोल ढाल एवढीच हत्यारे त्यांच्यापाशी होती. दर दोन माणसांमागे एक घोडा असे. तोफखाना, सामानसुमान, चिलखत यांचे ओझे नसल्यामुळे मराठे मुक्त संचार करू शकत असत. १७२७ च्या ऑक्टोबरात पावसाळा संपताच बाजीराव निजामाच्या मुलखात शिरला. मुख्य शहरे, किल्ले यांना बगल देत लूट आणि जाळपोळ करताना त्यांना फक्त एकदाच निजामाचा सरदार ऐबजखान याच्याकडून माघार घ्यावी लागली. मग लगेचच ते सावरले आणि कधी पूर्वेला, तर कधी उत्तरेला, कधी पश्चिमेला अशा मुसंडय़ा मारू लागले. निजामाने काही काळ त्यांचा पाठलाग केला, पण शत्रूच्या चपळ आणि अनपेक्षित हालचालींनी गोंधळलेले त्याचे सैन्य अल्पावधीतच थकून गेले.’
‘अजिंक्य योद्धा बाजीराव’ या बाजीराव पेशव्यांवरील अलीकडच्या पुस्तकात जयराज साळगावकर यांनी हे सगळे तपशील दिले आहेत.
निजाम आणि बाजीरावाच्या दरम्यान झालेल्या पालखेडच्या तसेच भोपाळच्या संघर्षांमध्ये बाजीराव पेशव्यांनी निजामाला शरण येऊन तह करायला भाग पाडले होते. याच निजामाने बादशहाला लिहिलेल्या पत्रात बाजीरावाचे वर्णन केले आहे, ‘बाजीराव आपल्या गुणांनी मराठय़ांचे दैवत बनला आहे. नामांकित मराठे सरदार दक्षिणेत आहेत. त्यांच्या सैनिकांची संख्या मुंग्या व टोळ यांच्यापेक्षा जास्त आहे. अत्यंत सावधपणे आणि हुशारीने ते पुढील आक्रमणाची तयारी करत आहेत. बादशहाकडून सैन्य व खजिना मिळाल्याखेरीज मराठय़ांचे पारिपत्य करणे शक्य नाही. त्यांच्याविरुद्ध मोहीम लांबणीवर पडली तर हे प्रकरण अवघड होईल. मग कोणताही उपाय चालणार नाही.’ अर्थात या पत्रातली निजामाची गणिते वेगळी असली तरी आपल्या शत्रूला म्हणजे बाजीराव पेशव्यांना तो कुठे बघत होता हे त्यातून लक्षात येतं.
मराठी माणसांनी बाजीराव पेशव्यांच्या कर्तृत्वाची योग्य दखल न घेता मस्तानीच्या संबंधांवरच जास्त भर दिला असला तरी जगाने त्यांची योग्य ती दखल घेतलेली होती. त्यामुळेच बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूचे वर्णन करताना सर रिचर्ड टेम्पल म्हणतात, ‘तो जसा आपल्या माणसांमध्ये तंबूच्या कनातीखाली जगला तसाच मरण पावला. आजतागायत तो मराठय़ांमध्ये लढवय्या पेशवा किंवा हिंदू चैतन्याचा आविष्कार म्हणून स्मरला जातो.’
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com