स्मरणगाथा
डॉ. सुभाष गढीकर – response.lokprabha@expressindia.com
‘फुलराणी’, ‘श्रावणमास’, ‘औदुंबर’सारख्या नितांतसुंदर कविता लिहिणाऱ्या बालकवींना जाऊन या वर्षी ५ मे रोजी १०० वर्षे झाली. मराठी साहित्यात आजही बालकवींचे स्थान अजोड आहे. त्यांच्या प्रतिभेला अभिवादन..
सुंदरतेच्या सुमनावरचे
दव चुंबुनि घ्यावे
चतन्याच्या गोड कोवळ्या
उन्हात हिंडावे…
अशी मनीषा बाळगून, निसर्गाची नितांत देखणीरूपे रेखाटणाऱ्या, पण नियतीच्या आघातांनी ‘सगळी स्वप्नेच करपून गेल्याने आयुष्याची माती झाली’ असा विदारक अनुभव आल्याने ‘काळालाच आपला सखा’ मानून त्याची आराधना कारणाऱ्या बालकवींच्या मृत्यूला शनिवार, ५ मे २०१८ रोजी शंभर वष्रे पूर्ण झालीत. पण काळावरही मात करीत बालकवींची कविता आजही तितकीच उत्कट प्रत्यय देणारी, रसिक मनाला भुरळ पाडणारी आहे. बालकवींच्या निसर्ग कवितांनी आनंदित न होणारा, तर व्याकूळतेच्या अनुभवाने डोळ्यांच्या कडा न टिपणारा आणि बालकवींच्या अकाली निधनाने न हळहळणारा रसिक सापडणे दुर्लभ आहे. नाद, गंध, रंग, रूप, स्पर्श या संवेदनांची लयलूट असणाऱ्या निसर्गोत्सवाचा आविष्कार करणारे आणि त्याचबरोबर पराकोटीच्या नराश्याची भरवी गाणारे बालकवी शापित गंधर्व वाटतात.
बुधवार दि.१३ ऑगस्ट १८९० साली धरणगाव येथे बालकवींचा जन्म झाला. बालकवींचे वडील बापूराव देवराव ठोमरे आणि आई गोदाताई. बापूराव पोलीस खात्यात असल्याने त्यांच्या वारंवार बदल्या होत. त्यामुळे बालकवींच्या शिक्षणात सतत खंड पडत गेला. मात्र त्या त्या गावातील निसर्गाने बालकवींना समृद्ध केले. ज्येष्ठ भगिनी जिजींच्या सहवासात पंडिती काव्याचे वाचन त्यांनी केले. जिजींमुळे बालकवींमध्ये कवितेची आवड निर्माण झाली. पुढे नाशिकला संस्कृत तर पुण्यात त्यांनी इंग्रजीचे अध्ययन केले.
वडील वारल्यानंतर बालकवींची आíथक परिस्थिती हलाखीची झाली. त्यात कौटुंबिक स्थितीही चांगली नव्हती. थोरल्या आणि धाकटय़ा भावाचाही त्रास त्यांना सोसावा लागला. त्यामुळे बालकवींचे कौटुंबिक जीवन सुखी नव्हते. त्यातच आईच्या आत्यंतिक आग्रहामुळे, विनायक जोशी याच्या मुलीशी – पार्वतीबाईंशी बालकवींचा विवाह १६ फेब्रुवारी १९०८ साली झाला. बालकवींचे व पार्वतीबाईंचे प्रेमधागे जुळले नाहीत. त्यामुळे प्रेमासाठी आसुसलेल्या बालकवींच्या वाटय़ाला याही बाबतीत निराशा आली. ‘आपल्या वैवाहिक जीवनातील असाफल्याला, बालकवींची आई व ज्येष्ठ बंधू जबाबदार असल्याचा’ आरोप पार्वतीबाई ठोमरे यांनी ‘मी आणि बालकवी’ या आत्मचरित्रात केला आहे. या सर्व परिस्थितीला तोंड देत बालकवी वेगवेगळ्या नोकऱ्या करीत पोटासाठी धडपडत होते. त्याचा परिणाम बालकवींच्या काव्यावर झाल्याचे आढळते.
१९०७ मध्ये जळगाव येथे झालेल्या पहिल्या महाराष्ट्र कविसंमेलनामुळे त्र्यंबक बापूजी ठोमरे यांना ‘बालकवी’या नावाने महाराष्ट्र ओळखू लागला. या कविसंमेलनाने बालकवी साहित्यरसिकांना ज्ञात झाले असले तरी १९०३ पासूनच ते कविता करीत होते. त्यांना निसर्गाची ओढ बालपणापासूनच होती. या वयातच त्यांना राष्ट्रीय कीर्तनकार वनवासी उपाख्य रामचंद्र कृष्ण वैद्य यांचा सहवास लाभला. त्यांच्यासोबत प्रवास करताना निसर्गाच्या विविध छटा बालकवींनी अवलोकिल्या. वनवासींच्या कीर्तनासाठी काव्यरचना केली. पण अल्पावधीतच वनवासींचा उज्जैन येथे कॉलऱ्याने अंत झाला अन् बालकवींना घरी परतावे लागले. नगरच्या वास्तव्यात त्यांना रेव्हरंड नारायण वामन टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक यांचा अकृत्रिम स्नेह लाभला तर पुण्याच्या वास्तव्यात गोिवदाग्रज, दिवाकर यांचा सहवास लाभला.
अशा विविध व्यक्तिमत्त्वाच्या संस्कारांनी बालकवींचे भावविश्व संपन्न होत गेले. निसर्गाच्या सहवासात बालकवींनी जीवनाचे अनेक रंग अनुभवले. बालसुलभ कुतूहल, आनंदाने विभोर होण्याची निखळ, निरागस वृत्ती यामुळे ते निसर्गाशी समरस होऊ शकले. या निसर्गातच बालकवी रमले. निसर्गाची मधुर गाणी बालकवींनी गायिली.
निसर्गाकडे सर्वसामान्यांपेक्षा वेगळ्या नजरेने बालकवी बघतात. सृष्टीचे स्वरूप आनंदमय आहे. सृष्टीत सर्वत्र आनंद कोंदून भरलेला आहे असे ते मानतात. निसर्गात त्यांना सौंदर्याचा साक्षात्कार होतो. या सौंदर्याचा बालकवींना ध्यास लागलेला आहे. त्यासाठी बालकवी असीम आतुरतेने निसर्गाकडे धाव घेतात. ‘प्रसन्न वृत्तीत तसंच विषण्ण वृत्तीत स्फुरलेल्या निसर्गविषयक कवितांशी बालकवींच्या जीवनाचा साक्षात संबंध आहे. म्हणूनच त्या भावोत्कट, या अनुषंगाने हृदयस्पर्शी उतरल्या आहेत. बालकवींनी प्रकृतीच्या पर्यवेक्षणात रात्रीमागून रात्र आणि दिवसामागून दिवस घालवले होते. अस्तोदय, चंद्राचे चांदणे व तारामंडल, भिन्नभिन्न ऋतू, नदी, पर्वत, वने आणि निर्झर ही सृष्टीची विविधरूपे तासन्तास पाहण्यात त्यांना मनसोक्त आनंद होत असे. निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण करताना त्यांना जी सुंदरता अनुभवास येई, तिलाच त्यांनी शब्दात साकार केले आहे.’ असे पार्वतीबाई ठोमरे नमूद करतात आणि निसर्गाशी होणारी बालकवींची तादात्म्यता, लौकिकाचा त्यांना पडणारा विसर त्यातून झालेली निर्मिती याकडे लक्ष वेधतात.
आनंदाने बेभान होण्याच्या या वृत्तीमुळे सगळीकडे आनंदकंदाचा प्रत्यय त्यांना येतो आणि ‘इकडे तिकडे चोहिकडे’ मधून तो उत्कटपणे अभिव्यक्त होतो. पण त्याच बरोबर ही आनंदाची उत्कटता अनुभवायची असेल तर लौकिकाची-पाíथवतेची सगळी बंधने झुगारून देऊन, स्वार्थापलीकडचा विचार करीत, मत्सर, द्वेष, हेवेदावे सगळे विसरून; स्वच्छ, निर्मळ मनाने निसर्गाकडे जाणे महत्त्वाचे असल्याचे बालकवी नमूद करतात. बालकवी अशाच निर्मत्सर अवस्थेत निसर्गाकडे धाव घेतात. एक विलक्षण स्वप्निल, अलौकिक, अप्राप्य विश्वच तेथे साकार होते. या भूवर प्रत्यक्ष स्वर्गच अवतरला आहे असा भास त्यांना होतो.
सौंदय्रे शब्दातीत –
स्वर्भूवर अवतरतात
तेजाची फुटली पेठ –
दिव्यत्वाची लयलुट..
दिव्यांच्या मागुनि चाले –
विश्व, खरे कळुनी आले.
असा प्रत्यय त्यांना येतो आणि सगळे विश्वच दिव्यत्वाने भारून गेलेले दिसते. दिव्यत्वाचे गाणे गाता गाता जड देहाची सगळी बंधने गळून पडतात. स्वर्गाचे अंगणच आता खेळायला लाभलेले असते. प्रत्यक्ष ईश्वरच ज्याला कुरवाळत, जोजावत असतो; ज्याला ईश्वराचा वरदहस्त लाभलेला असतो त्याला कसली कमतरता भासणार?
बालकवींना सृष्टीतील सौंदर्याचा मोह अनावर होतो. सृष्टीत जे काही सुंदर असेल त्यात त्यांना चतन्याचे दर्शन होते. त्या अलौकिक सौंदर्याच्या साक्षात्काराने त्यांचे मन गाऊ लागते. सृष्टिसौंदर्याने बालकवींचे चित्त भारावून गेल्यामुळे त्यांच्या अनेक कवितांमध्ये हे सौंदर्यगायन ऐकायला मिळते. सृष्टीतील विविध मनोहारी दृश्ये बालकवींनी आपल्या काव्यात हुबेहूब शब्दबद्ध केली आहेत. निसर्गातील घटकांवर मानवी भावभावनांचे आरोप करण्याची बालकवींची पद्धत आहे. बालकवींच्या या वृत्तीचे निधान असणाऱ्या अरुण, संध्यारजनी, फुलराणी, निर्झरास, फुलपाखरू-फुलवेली, संध्यातारक, श्रावणमास, औदुंबर मधुयामिनी इत्यादी कवितांतील भावसौंदर्य याची साक्ष देते. बालकवींच्या या कवितेचा आस्वाद घेताना आपणही वेडावून जातो. तन्मय होतो. आगळ्यावेगळ्या आनंदात रंगून जातो.
बालकवीपूर्व कवितेत निसर्ग इतके ताजे आणि विलक्षण सजीवरूप घेऊन अवतरला नव्हता. तारका, संध्यारजनी, खळखळ वाहणारा निर्झर, फुललेली फुले, पिवळी शेते, हिरवी कुरणे या सगळ्या गोष्टी बालकवी अतिशय नजाकतीने शब्दबद्ध करतात. सृष्टीच्या सहवासात बालकवी स्वत:चे देहभान विसरून तन्मय होतात.
या तन्मयतेतूनच ‘फुलराणी’च्या मंगल विवाहाचे चित्र रेखाटले गेले. एक स्वयंवर कथाच, त्यातल्या सर्व गोडव्यासह बालकवींनी आपल्यासमोर साक्षात उभी केली. निसर्गाची नितांत रमणीय चित्रे रंगवितांनाच बालकवींनी प्रतिभाशक्तीने मोहक कल्पना चित्रेही रेखटलेली आहेत. ‘श्रावणमास’, ‘संध्यारजनी ’, ‘ताराराणी ’, ‘फुलराणी’ या कवितांमधून हे अनुभवाला येते. ‘फुलराणी’ चा प्रारंभच
हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणाच्या मखमालींचे
त्या सुंदर मखमालीवरती
फुलराणी ही खेळत होती
– अशा रेखीवदृश्य चित्रणाने होतो. एखाद्या कुशल चित्रकाराला देखील हेवा वाटावा अशा विविध रंगांच्या कुंचल्यांनी बालकवींनी ही चित्रे रेखाटली आहेत.
बालकवी म्हणजे निसर्गकवी असे समीकरण या कवितांमुळे दृढ झाले. आकाश, तारा, चांदणे, नक्षत्रे, निर्झर, लता, पक्षी, सोनेरी किरण अशा आपल्याला परिचित असलेल्यांचे हे अलौकिकरूप कधी जाणवले नाही. बालकवींना मात्र ते गवसले. कारण निसर्गाशी एकरूप होऊन त्याचे हे अनोखे रूप पाहण्याची दृष्टी बालकवींना लाभली. त्यामुळे निसर्गचतन्याने भरलेला, सजीव, जिवंत असा त्यांना वाटला आणि बालकवी त्यात रममाण झाले. पण एकाएकी विपरीत घडले-
परि आला तीव्र विषारी,
हा न कळे कुठचा वारा?
…ती स्वप्नसृष्टि जळाली
गाण्याची तार गळाली
काजळी चढे वरखाली
झाली हो माती माती
सगळ्या रंगाचा बेरंग झाला. क्षणात होत्याचे नव्हते झाले. सगळी सृष्टीच काळवंडून गेली आणि नशिबी आला तो ‘खळाळता अंधार.’
स्वर्गीय तेज मालवूनी
पाषाण क्षणार्धी झाला
हे का आणि कसे झाले ते कळेना. आपल्या या अवस्थेची जाणीव होताच कवीचे हृदय पिळवटून जाऊ लागले. स्वर्गीय आनंद निसटून गेल्याचा डंख काळीज जाळीत राहिला आणि जे वास्तव वाटय़ाला आले त्याच्याशी समरस होता येईना. आशा नाहीशी झाली. अशा अवस्थेत जगायचे कसे असा प्रश्न पडला. सगळीकडे दाटून राहिला तो काळामिट्ट अंधार. स्वर्गीचं तेज अनुभवणाऱ्याला अंधाराची संगत कशी मानवणार? त्याचे मन आक्रंदू लागलं. जिवाची काहिली काहिली होऊ लागली.
पण टाहो फोडूनही उपयोग काय? ‘स्मरणाच्या थडग्यातून’ स्मृती उफाळून येतात. दुख अधिक तीव्रतर होऊ लागते. असहय़ होते. पूर्व जीवनातील स्वर्गीय आनंदी आनंद आठवतो नि मन आजच्या स्थितीशी तुलना करायला लागते. हरपलेल्या गोष्टीसाठी आक्रंदू लागते. पण स्वार्थाचा बाजार मांडणारे जग, हे आक्रंदन कसे समजून घेणार? कवीच्या विकल मनाचा टाहो इतरांच्या काळजापर्यंत कसा पोहोचणार? ‘हृदयाच्या अंत:हृदयात’ सलणारं दु:ख इतरांना कसं कळणार?
निसर्गात मग्न असताना अचानक स्पर्शून गेलेल्या वास्तवाच्या विषारी वाऱ्याने सगळी स्वप्नसृष्टीच करपून गेल्याची तीव्र जाणीव झालेल्या बालकवींचे हळवे मन सरभर झाले असल्यास नवल नाही. सुरुवातीला उमेदीने, आत्मविश्वासाने गात निघालेला कवी अखेर मात्र अंतराळात विहार करणाऱ्या ‘बालविहगा’ला म्हणतो-
अंधाराचे पाश मनाचे
हे गळूनि जावे
असे का व्हावे? मनीचे आर्त
असे एकाएकी का प्रगट व्हावे? निसर्गाशी तन्मय होणाऱ्या, निसर्गात अलौकिकाचा, दिव्यत्वाचा शोध घेणाऱ्या कवीला याची विलक्षण खंत कवीला पोखरून काढते. ‘आनंदीपक्षा’प्रमाणे स्वच्छंदपणे विहार करण्याची मनीषा बाळगणारे मन या विवंचनांनी विकल झाले आहे. मन संभ्रमात गुरफटून गेले आहे.
हृदयाची गुंतागुंत कशी उकलावी?
ही तीव्र वेदना मनामनाची ठावी
अंधार भरला अपार भरला पूर
परि पार तयाच्या कोण मला नेणार?
‘हृदयाच्या अंतहृदयात’ काय बोचते ते कळत नाही. या उदासीनतेचे मूळ सापडत नाही, मनाला ग्रासून टाकणाऱ्या निराशेचे कारण कळत नाही. त्यामुळे यावरचा अक्सीर इलाजही करता येत नाही. त्या संभ्रमाच्या आवर्तातच कविमन फिरू लागले. आजपर्यंत मोहून टाकणारा निसर्गही आता नकोसा होतो.
बालकवींच्या चित्ताला ग्रासून टाकणारी उदासीनता पराकोटीला गेल्याचे ‘पाखरांस’ आणि ‘पारवा’ या कवितात प्रकर्षांने जाणवते. पाखरांच्या रूपाने बालकवी जणू काही आपलेच वेदनामय अंतकरण मोकळे करतो.
नि:श्वास धावती
सौख्यामागे सारे;
दु:खाचा वाली
कुणा कुणीहि न बा रे!’’
‘दु:खाचा वाली कोणी नसतो’ या सत्याचा अनुभव बालकवींना प्रत्यक्ष आलेला होता. प्रतिकूल स्थिती आली की सगळे काही बदलून जाते. नातेसंबंधसुद्धा. सारा डावच उधळला गेला आहे. सावरायचे म्हटले तरी जमत नाही. नराश्याचे दाट सावट बालकवींच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वालाच व्यापून, झाकोळून टाकते. यातून सुटका म्हणून ते पुन्हा निसर्गाकडे वळतात खरे; पण पूर्वीच्या उमेदीने ते निसर्गाशी तद्रूप होऊ शकत नाहीत. जीवनातल्या भयाण काळोखाचा अनुभव आल्याने कविमन कायमचे दुभंगून गेले आहे. असे का व्हावे या प्रश्नावरून मन आणि बुद्धी यांच्यात संघर्ष सुरू झाल्याने हृदयातील गुंतागुंत अधिकच वाढत जाते.
व्यामोह भयंकर
दुस्तर भरला भारी
की जीव दडपतो
मम निद्रेमाझारी
मज व्यर्थ नको ती
अमरपणाची गाणी
कुणी उठवा असल्या
गहनातूनी हलवोना
अमरपणाची गाणी गाऊन प्रश्न सुटत नाहीत. या व्यामोहातून बाहेर पडता यावे म्हणून कवी कळवळून हाक मारतो आहे. पण जगाचा नेहमीचा अनुभव पुन्हा कवीच्या वाटय़ाला येतो. कोणीही धावून येत नाही. येणारही नाही, याची जाणीव कवीला तीव्रपणे होऊ लागते. आधीच रक्तबंबाळ झालेलं मन मूकपणे विव्हळू लागते. अविरत –
दिन पक्ष मास ऋतु वर्ष भराभर गेले
हे रक्त जसेच्या तसेच साकळलेले
दिन-रजनीचे चक्र फिरत राहिले. हे सगळे संपणार तरी केव्हा? यातून मुक्ती देणारा तो महत्भाग्याचा क्षण कधी येणार याची ओढ त्याला लागली आहे.
कवीची यातून बाहेर पडण्याची धडपड सुरूच असते, पण यश येत नाही. ‘दिव्य औषधी’ सापडत नाही. मार्ग दिसत नाही. मन सुन्न होते. प्रयत्न करूनही उत्तर मिळत नाही. गुंता कायमच असतो. त्यामुळे उदासीनता कवी मनाला व्यापून टाकते. मनाला ग्रासून टाकणाऱ्या निराशेचे कारण कळत नाही. मनाला काहीतरी हवे आहे पण नेमके काय तेच उमगत नाही. साऱ्या अस्तित्वावरच निराशेचं मळभ दाटून येते. मनाच्या घुमटात ‘अगम्य गीत घुमते’. मनाच्या संवेदनाच बधिर झाल्याने त्या निनादांचे अर्थच कळेनासे होतात. ही अवस्था हृदय पिळवटून काढते. सगळे आयुष्यच विस्कटून जाते. दुखाचे निदान असलेला हा देहच नाहीसा व्हावा असे त्याला वाटू लागते. या सगळ्यातून सुटका करणारा मृत्यूच कवीला आपला सखा वाटतो. तो त्यालाच साद घालतो –
ये काळा, ध्यान तुझे
मात्र मला लागले…
तू आता आप्त-जगा
संबंधची संपला!
पण मृत्यू तरी साथ देणार आहे का? आणि मृत्यूने तरी ही अवस्था संपणार आहेत काय? बालकवींना पडलेले प्रश्न म्हणजे संवेदनशील मनाला पडलेला काच आहे.
बालकवींच्या काव्याचा विचार करताना, अनेक समीक्षकांनी बालकवींच्या उदासीनतेच्या कारणांचा मागोवा घेतला आहे. आíथक बिकट स्थिती, कौटुंबिक अस्वास्थ्य, कवितादेवी अंतरल्याची खंत, स्वप्नसृष्टी झाकोळल्याची जाणीव, जगाच्या स्वार्थीवृत्तीचा अनुभव व त्यामुळे संवेदनशील मनाला पडणारा पीळ, क्षुद्र कारणाने येणारी उदासीनता, सौंदर्यवादी वृत्तीत अंगभूत असणारी उदासीनता, अपूर्णतेचा प्रत्यय, वैवाहिक जीवनाचे झालेले वाळवंट, पाश्चात्त्य काव्यातून आलेल्या स्वच्छंदतावादाचा प्रभाव अशा अनेक कारणांचा उल्लेख काही समीक्षकांनी केला आहे. . ‘उदासीनता’, ‘हृदयाची गुंतागुंत’, ‘काळास’, ‘यमाचे दूत’, ‘दुबळे तारू’, ‘आवाहन’, ‘पारवा’, ‘कवि-बाळे’, ‘पाखरास’, अशा कविता निराशा व्यक्त करणाऱ्या आहेत.
दिव्यत्वाचा ध्यास घेतलेल्या, आनंदकंद चाखण्याची असोशी बाळगणाऱ्या बालकवींनी १६३ कविता लिहिल्या. त्यापकी ३९ कविता अपूर्ण आहेत. ‘तू तर चाफेकळी’सारखी नितांत देखणी कविता त्यातलीच एक. बालकवींच्या अस्वस्थ, उद्विग्न मनोवृत्तीचा सृजनशीलतेवर झालेल्या परिणामाचे ते द्योतक आहे.
निराशेने कोलमडून पडलेल्या बालकवींना मृत्यू आपला आप्त वाटला. त्याला कळवळून त्यांनी साद घातली. अखेर मृत्यू आला पण वैऱ्यासारखा. रविवार दि. ५ मे १९१८ या दिवशी, वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी, भुसावळ-जळगाव रेल्वे मार्गावर असलेल्या ‘भादली’ या रेल्वे स्टेशनवर रेल्वे इंजिनखाली सापडून बालकवींचा अंत झाला.
व्यामोह भयंकरदुस्तर भरला भारीकी जीव दडपतोमम निद्रेमाझारीमज व्यर्थ नको तीअमरपणाची गाणी कुणी उठवा असल्यागहनातूनी हलवोना