बांगडय़ा हा स्रियांच्या साजश्रंगारातला महत्त्वाचा घटक. बोहल्यावर उभं राहताना बाकी सगळ्या दागिन्यांच्या आधी चढवला जातो तो हिरवा चुडा. त्याच्या आगेमागे असलेले बांगडय़ांचे इतर प्रकारही हातांना वेगळीच शोभा आणतात.
फॅशन काळाप्रमाणे बदलत जाणारी असली तरी जुनं ते सोनं हे तितकंच सत्य आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा अजूनही प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवतात. मग ते ऐतिहासिक प्रसंग असो, पारंपरिक पदार्थ असो, जुने सुरेल संगीत असो किंवा आणखी काही. मग आपले पिढीजात पारंपरिक दागिने तरी मागे का राहतील? आपली पृथ्वी गोल आहे हे शास्त्रज्ञांचे म्हणणे आता फॅशनच्या बाबतीतही पटू लागले आहे. जुन्या ठेवणीतल्या पैठण्या, कांजीवरम साडय़ा, शालू जितक्या स्त्रियांना हव्याहव्याशा वाटतात तितकीच त्यांना या वडिलोपार्जित दागदागिन्यांची ओढ असते. परंतु हे दागिने जसेच्या तसे न घालता नव्या अंगाने, नव्या ढंगाने त्यांना हवे असतात. जुनी पैठणी नेसून जुन्याच प्रकारचे पारंपरिक दागिने घातल्यावर येणाऱ्या काकूबाई लुकपेक्षा त्याच दागिन्यांना थोडा मॉडर्न टच देऊन, नवीन व्हरायटीने हे दागिने स्त्रियांना मिळणार असतील तर त्यांच्यासाठी सोन्याहून पिवळं. म्हणूनच आता बाजारात जुने दागिने नव्या प्रकाराने पाहायला मिळतात. जय मल्हार, गणपती बाप्पा मोरया, महाराणा प्रताप, सिया के राम यांसारख्या मालिका तर कटय़ार काळजात घुसली, बाजीराव मस्तानी यांसारखे ऐतिहासिक चित्रपट सध्या मोठय़ा संख्येने पाहायला मिळतायत. त्यामुळे जुन्या काळातील कपडे, दागदागिन्यांची फॅशन पुन्हा लोकांच्या पसंतीत उतरतेय. इतिहासाची पाळेमुळे असणाऱ्या या मालिका-चित्रपटातून नट-नटींच्या अंगावरचे दागदागिने त्याच पारंपरिक शैलीने परंतु नवीन डिझाइन्सच्या माध्यमातून लोकांपुढे मांडले आहेत. अशाच प्रकारचे दागिने आपल्यालाही घालायला मिळावेत यासाठी स्त्रिया उत्सुक असतात. त्यामुळे आता हे दागिने फक्त टी. व्ही. स्क्रीनवर मर्यादित राहिले नसून प्रत्यक्षात उतरले आहेत.
आजचा आपला दागिना आहे- बांगडय़ा. अगदी लहान मुलींपासून ते मोठय़ा बायकांपर्यंत सगळ्यांनाच प्रिय असणारा हा दागिना. पूर्वीच्या काळी जाळीच्या बांगडय़ा, तोडे, पाटली, रावीफुल, मोत्याची पोहळी, घोसबाळ्या, चौकडा, हिरकणी, तुरमनी-तुरबंदी असे बांगडय़ांचे एक ना अनेक प्रकार आहेत. पूर्वीच्या काळी बांगडय़ांचे किती प्रकार होते? त्यांना काय म्हणत असत? ते कधी घातले जात ते आपण पाहू-
पाटल्या
पाटल्यांमध्ये प्रामुख्याने जाळीच्या पाटल्या, तोडीचा पाटल्या, मोत्याच्या पाटल्या, पोवळ पाटल्या असे प्रकार आहेत. पेशवेकालात पाटल्या हा प्रकार जास्त आढळून येत असे परंतु अजूनही स्त्रिया हिरव्या बांगडय़ांच्या मागे एक एक पाटली घालतात. पाटल्यांवर कुयरीची, पानांची, रेषांची बारीक नक्षी कोरलेली असते. आजकालच्या धावपळीच्या युगात कामावर झालेली लग्न झालेली स्त्री ऑफिसच्या ट्राऊजर आणि कोटसारख्या युनिफॉर्मवर हिरव्या बांगडय़ांचा अखंड चुडा घालण्यापेक्षा फक्त एक सोन्याची पाटली घालणे जास्त पसंत करते. म्हणून खास अशा स्त्रियांसाठी पाटलीची ही पारंपरिक घडणावळ तशीच ठेवून त्यात आता नवनवीन डिझाइन्सचे नवीन लुक आणण्याचा प्रयत्न कारागीर करतायत. अशा सिम्पल आणि सोबर पाटल्यांना स्त्रिया मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद देतात.
बिलवर
बिलवर हा प्रकार एका पारदर्शक स्फटिकापासून बनविला जातो. त्या स्फटिकाला बारीक बारीक पैलू पाडून बिलवर नावाची बांगडी तयार केली जाते. बिलवर हा शब्द अरबी भाषेतील बिलौर या शब्दापासून तयार झाला आहे. बिलौर म्हणजे पारदर्शक स्फटिक, पत्थर. लहान मुलींच्या कचकडय़ांच्या बांगडय़ादेखील बिलवर बांगडय़ांप्रमाणे असतात. विविध रंगाच्या गोलाकार बांगडय़ांना पैलू पाडून तयार केलेली नक्षी व त्याचा पारदर्शकपणा लहान मुलींच्या निरागस पारदर्शी मानासारखाच असतो. स्त्रियादेखील डिझायनर साडय़ांवर, पंजाबी ड्रेसवर अशा बांगडय़ा घालतात.
जवे
जवे हा बांगडीचा प्रकार महाराष्ट्रीय लग्नामध्ये दिसून येईल. हा प्रकार प्रामुख्याने गुजरात येथील असावा. जव या धान्याच्या दाण्यासारखे दिसणारे सोन्याचे मणी, सोन्याच्याच बांगडीवर चिकटवून जवे हा बांगडीचा प्रकार तयार केला जातो. ही बांगडी हातात सगळ्या बांगडय़ाच्या पुढे घातली जाते. जवेची जोडीदार पिछोडय़ा या हातात सर्वात शेवटी कोपराकडे घालतात व जवे मनगटावर. सोन्याच्या मण्यांपासून विविध नक्षी तयार करून, त्याला सुबक आकार देऊन अतिशय कलाकुसरीने या बांगडय़ांची घडवणूक केली जाते. नवरात्रीत देवीला तर गणपतीत गौराईला अशा प्रकारच्या जवे बांगडय़ा यंदा मोठय़ा प्रमाणात घातलेल्या आढळल्या.
गजरा
गजरा म्हटलं की आठवतो तो केसात माळावयाचा फुलांचा सुगंधित गजरा. गजरा या नावाची बांगडीदेखील काही अशाच प्रकारची आहे. दोऱ्यामध्ये फुले गुंफावीत तशाच प्रकारे मोत्यांची सर रेशमी धाग्यात गुंफून गजरा ही बांगडी तयार केली जाते. तोडे ज्याप्रमाणे खेचून उघडायचे असते त्याचप्रमाणे गजरा या बांगडीची दोन्ही टोके एकमेकांत अडकण्यासाठी सोन्याचा फासा असतो. हाताला घट्ट बसेल असा मोत्यांच्या मण्यांचा हा गजरा अगदी सुरेख दिसतो. दक्षिण भारतात अशा प्रकारच्या बांगडय़ा लग्नकार्यात घालतात. पांढरी व त्याला सोनेरी काठ असलेल्या साडीवर संपूर्ण मोत्यांच्या नेकलेससोबत अशी एक जरी बांगडी घटली तरी हाताला शोभा येते. या पारंपरिक बांगडीला आधुनिक रूप देण्यासाठी काळ्या किंवा राखाडी मोत्यांचा वापर केला जात आहे, परंतु ही बांगडी मात्र पारंपरिक पद्धतीनेच गुंफली पाहिजे.
तोडे
पारंपरिक बांगडय़ांपैकी तोडे ही बांगडी अजूनही मोठय़ा प्रमाणात वापरात आहे व तोडे हा प्रकार स्त्रियांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. तोडय़ांमध्येदेखील गहू तोडे, शिंदेशाही तोडे, जिलेबी तोडे असे अनेक प्रकार आहेत. तोडे हे चांदीचे, सोन्याचे, मोत्यांचे, इ. प्रकारचे असतात. भरभक्कम वाटणारे तोडे कडय़ासारखे खेचून स्क्रू लावून देखील घालता येतात किंवा बांगडीसारखेदेखील. बांगडय़ांमध्ये तोडे घातल्यास ते नक्कीच हाताची शान वाढवतात. तोडय़ांमध्ये कुयरीची, मोराची, देवीची, स्वस्तिकची अशा अनेक डिझाइन्स असतात. नऊवारी साडीवर तोडे काही वेगळाच भाव खाऊन जातात.
कडं
पूर्वीच्या काळी गोठ हा हस्तभूषणाचा प्रकार प्रचलित होता. लहान बाळाच्या पायातील वळं ज्या प्रकारे असते त्या प्रकारे गोठ असायचे. सोन्याचे भरीव गोलाकार वळं म्हणजेच गोठ होय. सोन्याचा साठा जास्त नसल्याने गोठ कालांतराने नामशेष झाले, परंतु त्याच गोठाची जागा आता कडय़ाने घेतली आहे. आदिवासी किंवा धनगर लोकांच्या पायातील वळं ज्याप्रमाणे असतं त्याचप्रमाणे आधी ताणून मग हातात घट्ट बसेल अशा प्रकारे दाबून कडे घालतात. काहीजण कडे फॅशन म्हणून पायातदेखील घालतात म्हणजेच पुन्हा इतिहासाची पालटणी.
ब्रेसलेट
ब्रेसलेट हा हस्तभूषणाचा प्रकार स्त्री व पुरुष दोघांसाठीही वापरला जातो. सध्याच्या काळात ब्रेसलेटला जास्त मागणी आहे. या धावपळीच्या युगात भरगच्च बांगडय़ा घालण्यापेक्षा एकच अँटिक मॅचिंग ब्रेसलेट घातलं की झालं काम. ब्रेसलेट हे वेगवेगळ्या वस्तूंपासून बनवण्यात येतं व त्याला बंद करण्यासाठी साखळीचा किंवा प्रेसिंग बटणांचा वापर केला जातो. उदा. मोत्यांपासून बनवलेले ब्रेसलेट, शिंपल्यांपासून, मण्यांपासून एवढेच नव्हे तर क्रोशाच्या-लोकरीच्या दोऱ्यांपासूनदेखील ब्रेसलेट बनवण्यात येते. सध्याच्या लेटेस्ट फॅशनमध्ये ब्रेसलेट वॉच हा नवीन प्रकार आला आहे. विविध रंगांची लेदरच्या पट्टय़ाची घडय़ाळे व त्यालाच जोडून तीनचार ब्रेसलेटचे जोड व बंद करण्यासाठी प्रेसिंग बटण अशी त्याची रचना आहे. एखाद्या खास व्यक्तीला ब्रेसलेट गिफ्ट करायचे असल्यास त्या व्यक्तीच्या नावाच्या लेदरचे मणी रंगीबेरंगी दोऱ्यात गुंफून सुरेख ब्रेसलेट तयार होते.
कफ्स
आपण वेस्टर्न वेअर घालणार असू किंवा कॉकटेल पार्टीसारख्या कोणत्या फंक्शनला जाणार असू तर कफ्स ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही. सध्या कफ्स घालण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की मुली डेली कॉलेजमध्येसुद्धा टॉपला मॅचिंग कफ घालून जातात. अँटिक सिल्व्हरच्या कफ्सला बाजारात जास्त मागणी आहे. कफ्समध्ये हाफ हेलिक्स कफ, एक्स-फॅक्टर कफ, ट्रेजर कफ, स्लिम टोटरेइज कफ, मारला कफ, फिसा कफ असे अनेक प्रकार आहेत. खरंतर बांगडय़ा या मनगटावर पूर्ण बसतील अशा असतात, परंतु कफ्सची दोन्ही टोके एकमेकांना जोडलेली नसतात. तरीदेखील हाताला घट्ट बसतील अशा प्रकारची त्याची रचना असते. आजकाल तर डायमंड कफ्स किंवा गोल्ड कफ्स किंवा गोल्ड प्लेटेड कफ्ससोबत अंगठी साखळीने जोडलेली असते. ते दिसायला अगदी सुंदर दिसते, हात भरल्यासारखा भासतो. अशा प्रकारचे कफ्स लग्नकार्यात किंवा ट्रॅडिशनल कार्यक्रमांच्या वेळी वापरतात.
असे हस्तभूषणाच्या म्हणजे बांगडय़ांचे आपण विविध प्रकार पाहिले. महाराष्ट्रात आपण फॅशन म्हणून जरी आवडीने बांगडय़ा घालत असलो तरी उत्तर भारतात बांगडय़ांना सौभाग्यलंकार मानतात. या बांगडय़ा शंखांच्या किंवा हस्तिदंतांच्या असून त्यांना वजरचुडा असे म्हणतात. बंगाली- पंजाबी स्त्रियासुद्धा लग्न झाल्यानंतर लाल मरून व पांढऱ्या रंगांच्या बांगडय़ांचा चुडा सौभाग्यलंकार म्हणून परिधान करतात. तर महाराष्ट्रीय स्त्रिया लग्नानंतर हिरव्या काचेच्या बांगडय़ा घालतात. यावरूनच स्त्रीच्या आयुष्यातील बांगडय़ांची किंमत समजून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा