शिवाजी गावडे – response.lokprabha@expressindia.com
चलते चलते मेरे यह गीत याद रखना
कभी अलविदा ना कहना
असे म्हणत बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या गाण्यामुळे अनेकांना जगण्याची नवी उमेद मिळाली, तर उडत्या चाली असणारी आणि पावले थिरकवायला लावणारी गाणी हा त्यांचा परिचय होता. डिस्कोवर आधारित संगीत साकारत सर्वानाच त्यांनी आपल्या तालावर थिरकण्यास भाग पाडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बप्पी ऊर्फ अलोकेश लहरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. वयाच्या २१ वर्षी त्यांनी बॉलीवूडमधील चित्रपटांना संगीत देण्यास सुरुवात केली. १९७३ साली ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाला संगीत देऊन सुरुवात केली आणि १९७६ मधील ‘चलते चलते..’ या गीताने त्यांची खरी ओळख निर्माण केली.

७०-८० च्या दशकात डिस्को आणि रॉक म्युझिकच्या माध्यमातून बप्पी लहरी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. १९८२ मध्ये आलेल्या मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटामुळे बप्पी लहरी प्रकाशझोतात आले. सुमारे ५०० चित्रपटांसाठी त्यांनी पाच हजारांहून अधिक गाणी संगीतबद्ध केली आणि गायली. ‘नमक हलाल’, ‘शराबी’, ‘हिम्मतवाला’, ‘साहेब’, ‘गुरू’, ‘घायल’ अशा चित्रपटांना त्यांनी दिलखेचक संगीत दिले. गायक बप्पी लहरी यांनी ‘आय अ‍ॅम ए डिस्को डान्सर’, ‘ऊ ला ला ऊ ला ला’, ‘दे दे प्यार दे’, ‘बंबई से आया मेरा दोस्त’, ‘तम्मा तम्मा लोगे’, ‘पग घुंगरू बांध मीरा नाची थी’, ‘झूम झूम झूम बाबा’, ‘याद आ रहा है’, ‘जिम्मी जिम्मी आजा आजा’, ‘ओ ताकि ओ ताकि’ अशी सदाबहार गीते संगीतबद्ध केली. १९८५ मध्ये ‘शराबी’ या चित्रपटातील गाण्यांसाठी बप्पी लहरी यांना ‘फिल्मफेअर सर्वोत्तम संगीतकार’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. अंगावर परिधान केलेला आगळावेगळा पेहराव, काळे चष्मे आणि सोन्याच्या दागिन्यांमुळेही बप्पी लहरी सगळय़ात वेगळे वाटत. सोन्याच्या दागिन्यांची तर त्यांना भारी आवड होती. त्यांच्या शरीरावर प्रचंड सोने असे. गळय़ात चेन, हातात अंगठय़ा, मनगटावर ब्रेसलेट अशी त्यांची प्रतिमा होती. गणपती, कृष्ण आणि बालाजी यांची लॉकेट त्यांच्या भारदस्त चेनमध्ये असत. त्यांच्या पत्नीने सोन्याचा टी सेटही त्यांना भेट दिला होता. एवढे ते सोन्याचे चाहते होते. सोने मला लकी असून, अमेरिकन रॉकस्टार एल्विस प्रेस्लीपासून अंगावर सोने घालण्याची प्रेरणा मिळाली, असे ते सांगत. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती; परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ७०-८०चे दशक गाजवणारा हा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी त्याचा थिरकायला लावणारा ताल मात्र कायम सर्वाच्या स्मरणात राहील.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bappi lahiri shraddhanjali dd