मृणाल भगत

आपल्या देशाच्या पूर्वेला असलेला अंदमान निकोबार द्वीपसमूह निव्वळ नैसर्गिक सौंदयासाठीच नाही तर ऐतिहासिकदृष्टय़ाही महत्त्वाचा आहे. अशा ठिकाणी कुटुंबकबिल्यासह किंवा मित्रमैत्रिणींच्या गदारोळात न जाता एकटय़ाने केलेली भटकंती बरंच काही देऊन जाते.

Gold, charas, ganja, Mumbai airport,
मुंबई विमानतळावर सोने, चरस, गांजा जप्त
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Pune Mumbai Expressway New Link Road to Cut from Pune to Mumbai
पागोटे ते चौक मार्गामुळे मुंबई पुणे अतिजलद प्रवास; २० ते २५ किलोमीटरचे अंतर कमी होण्यास मदत
fully equipped tourist attraction in Gondia Vidarbha
नवेगावबांधमध्ये पर्यटकांसाठी सूसज्ज निवास व्यवस्था ; या आहेत सुविधा
tibetean plateau
तिबेटच्या पठारावरून विमाने का जात नाहीत? वैमानिकांच्या भीतीचे कारण काय?
Focus on making 15 major roads in the city congested pune news
गतिमान वाहतुकीचा संकल्प; शहरातील प्रमुख १५ रस्ते कोंडीमुक्त करण्यावर भर
Goa Tourism
Goa Tourism : “मोफत जेवण आणि राहण्याची मागणी करून…”, गोव्याच्या पर्यटनावर टीका करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्स पर्यटन मंत्र्यांचं चोख उत्तर!
kdmc draw 150 meter boundary line for hawkers in dombivli east railway
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात फेरीवाल्यांसाठी १५० मीटरची सीमारेषा

‘अंदमान, अंदमान, अंदमान’ या जपाने आत्तापर्यंत मी किती जणांना सतावले असेल, हे मोजणे आता तरी मी सोडून दिलेय. हा विषय आला की ‘प्रचंड टॅन होशील,’ ‘बरीच टूर पॅकेजेस आहेत. त्यांच्यातल्या एकासोबत जा की,’ ‘एकटीच अंदमानला जाणार?’, अशा प्रतिक्रिया येत. त्या ओलांडून अंदमानात जाऊन पोहोचले. आठ दिवस आणि सात रात्रींच्या या ट्रिपमधून कदाचित मोबाइलमध्ये फोटो कमी आले असतील, पण आयुष्यभर पुरेल इतका अनुभव, आठवणी मात्र गोळा केल्यात.

अंदमानला जायचे नक्की केल्यावर पहिली पायरी होती, त्याबद्दल सगळी माहिती मिळवायची. लडाखला जाताना एका टूर कंपनीसोबत गेले होते. तो अनुभव फारसा चांगला नव्हता. अर्थात लडाख तुम्हाला कधीच निराश करत नाही, पण टूर कंपन्यांच्या सनिकी शिस्तीप्रमाणे आखलेली सहल मला फारशी पटली नाही. त्यातून फक्त ठरलेला प्रदेश पाहिला जातो, अनुभवता येत नाही. सहलीला गेलोय ती जागा अनुभवायची तर स्थानिकांमध्ये मिसळून, त्यांची संस्कृती जाणून घेऊन. त्यामुळे अंदमान शक्य तितका एकटीने फिरायचे हे आधीच ठरवलेले. खरे तर भारताचाच भाग असूनही मुख्य भूप्रदेशापासून तुटलेले असे ते बेट असल्याने एकूणच अंदमान कसे असेल, याची पुरेशी माहिती आपल्याला नाही. त्यामुळे तिथे आपल्याइतक्याच सोयीसुविधा असतील ना? मोबाइलचे नेटवर्क आणि पसे काढायला एटीएम असेल ना, आपल्याला एकटय़ात गाठून एखाद्या आदिवासीने हल्ला केला तर, अशा बऱ्याच शंका मनात येतात. मुंबई-पुण्यासारख्या शहरांइतक्या सोयी तिथे नसतील, पण अंदमान एकटय़ाने फिरायला अगदीच सोयीचे आहे. उलट टूर कंपन्यांच्या तुलनेत बरेच स्वस्तही आहे. सुरुवातीला मी या ट्रिपला एकटीच निघणार होते, पण नंतर भक्ती तांबेसुद्धा जोडली गेली. मग सहा महिन्यांपूर्वी सवलतीत काढलेले विमानाचे तिकीट आणि पहिल्या दिवशीच्या पोर्ट-ब्लेअरच्या हॉटेलचे बुकिंग या जोरावर अंदमानच्या बेटावर येऊन पोहोचलो.

अंदमानला पोहोचण्यासाठी कोलकाता किंवा चेन्नईवरून विमान किंवा जहाज गाठावे लागते. आम्हाला जहाजाच्या प्रवासात दिवस वाया घालवायचे नव्हते, त्यामुळे चेन्नईवरून विमानाचा पर्याय निवडला. पोर्ट ब्लेअरवर पाय ठेवल्यावर आमच्यासमोर पहिले काम होते, दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाची तिकिटे काढणे. आम्ही पहिल्या दिवशीच्या हॉटेलशिवाय दुसरे कसलेच बुकिंग केले नव्हते. ऐन वेळी जी बस किंवा बोट मिळेल त्यात बसून दुसरे स्थळ गाठायचे, इतकेच आमचे ठरले होते. अर्थात पाहायची ठिकाणे आणि तिथे जायचे मार्ग, बस/ बोटीचे वेळापत्रक, तिकिटाचे दर ही माहिती आधीच आमच्याकडे होती. त्यामुळे कुठेही खासगी वाहन करायची गरज पडली नाही. दुसऱ्या दिवशी आम्हाला दिगलीपूरला जायचे होते.

पोर्ट ब्लेअरवरून किमान दहा तासांच्या अंतरावर असलेले दिगलीपूर बेट हे खरे तर अत्यंत सुंदर आणि शांत बेट. पण तिथे जाण्यासाठी लागणारा प्रवासाचा वेळ लक्षात घेता निवडक परदेशी पर्यटक, अंदमानला बदली झालेल्या नौदल अधिकाऱ्यांची कुटुंबे आणि काही भारतीय पर्यटकांशिवाय तिथे फारशी वर्दळ नसते. त्यामुळे तिथे राहण्याचे पर्यायसुद्धा कमी आहेत. आम्हाला मुळातच हॅवलॉक बेटावरची पर्यटकांची तोबा गर्दी टाळायची होती आणि दिगलीपूरचे फोटो पाहून तेथे जाण्याची उत्सुकता वाढली होती. पहिल्या दिवशी सुरुवातीला पोर्ट ब्लेअरच्या एसटी डेपोमध्ये जाऊन दिगलीपूरचे तिकीट काढले. एरवी फक्त पोर्ट ब्लेअर ते दिगलीपूर हा प्रवास खासगी वाहनाने करायचा तर किमान पाच हजार रुपये लागतात, तेथे आमच्या तिकिटाचा दर केवळ २८० रुपये होता.

दुसऱ्या दिवसाची सोय झाल्यावर पोर्ट ब्लेअर फिरायला सुरुवात केली. अर्थात पहिलं ठिकाण होतं, सेल्युलर जेल. अंदमानच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी कुप्रसिद्ध असलेल्या या तुरुंगात पाय ठेवल्याक्षणी इतिहासाची पानं सर्रकन डोळ्यासमोरून जातात. वर्तुळाकार आकारातील या तुरुंगाच्या सात इमारती आणि मधोमध त्यांना जोडणारा, संपूर्ण तुरुंगावर नजर ठेवता येईल असा मनोरा सूर्याच्या प्रतिकृतीसारखा दिसतो. तुरुंगातील सावरकरांची कोठडी, त्याकाळचे काही दस्तावेज, महत्त्वाच्या कैद्यांच्या कथा, बंड यांची माहिती तुरुंगात व्यवस्थित मांडली आहे. खरे तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना अंदमानची ओळख या तुरुंगाच्या इतिहासापुरतीच असते. तीही सावरकरांच्या शिक्षेपुरती. पण त्यापलीकडे सेल्युलर जेल आणि त्याआधीचा रॉस बेटावरील वायपर तुरुंग यांचा इतिहास बराच मोठा आणि थक्क करणारा आहे. त्याची माहिती मिळवायची असेल, तर पोर्ट ब्लेअरमधील मानव विज्ञान संग्रहालय किंवा काला पानी संग्रहालयाला भेट द्यावी लागते.

ट्रिपच्या पाचव्या दिवशी पोर्ट ब्लेअरमध्ये काही तासांची उसंत मिळाली. त्यात आम्ही काला पानी संग्रहालयात गेलो होतो. मुकेश्वर लाल याचे हे खासगी संग्रहालय आहे. मुख्य शहरापासून थोडे आत असल्याने तिथे पर्यटकांची वर्दळ कमी असते. पण एकटय़ाने बसून किती तरी वेळ वाचता येतील अशी बरीच कागदपत्रे, पत्रे, सरकारी नोंदीच्या वह्य़ा असा भलामोठा दस्तावेज इथे आहे. अंदमानवर संशोधन करताना मुकेश लाल यांना मिळालेली इत्थंभूत माहिती या संग्रहालयात व्यवस्थित मांडलेली आहे. सेल्युलर तुरुंगाआधीचा वायपर तुरुंग, तेथील सात कैद्यांच्या जोडय़ांची पद्धत, स्त्री कैद्यांमुळे ब्रिटिशांनी पुरुष कैद्यांमध्ये पाडलेली फूट, बर्मा, बंगाली कैद्यांनी सेल्युलर तुरुंगाचे केलेले बांधकाम, तेथील अत्याचार आणि बंड, दुसऱ्या महायुद्धात जपानच्या ताब्यात गेलेले अंदमान आणि हे सगळे होत असताना येथील मूळ नागरिक म्हणजेच आदिवासींच्या उदयापासूनचा इतिहास एरवी इतिहासाच्या पुस्तकात येत नाही. आज अंदमानमध्ये तेथील मूळ नागरिक म्हणजे आदिवासी, सेल्युलर तुरुंगातील शिक्षा भोगून झाल्यावर अंदमानलाच स्थायिक झालेल्या कैद्यांची पिढी आणि कामानिमित्त बंगाल, चेन्नईवरून अंदमानला स्थायिक झालेले नागरिक अशा तीन गटांत येथील लोकसंख्या विभागली आहे. भारताचा हा तुकडा कुठे तरी अलग राहिला असल्याचे सतत जाणवत राहते. अगदी आत्तापर्यंत टूर कंपन्यांच्या जाहिराती, दर वर्षी अंदमानवरून येणारे मान्सूनचे वारे आणि स्वातंत्र्यदिनी एखादा ललित लेख यापलीकडे अंदमानबद्दलची एखादीही बातमी माझ्या वाचनात नव्हती.

सेल्युलर तुरुंगामधून निघाल्यावर संध्याकाळी जवळच्याच कॉब्रे समुद्रावर जाण्यासाठी रिक्षा पकडली. पोर्ट ब्लेअर ही अंदमानची राजधानी आहेच, त्याशिवाय तसेच बहुतेक बेटांवर जाण्याचा मार्ग इथूनच जोडलेला आहे. त्यामुळे पोर्ट ब्लेअर विमानतळावर उतरलेला प्रवासी टूरदरम्यान एखाद-दोनदा पोर्ट ब्लेअरवर येतोच. त्याला गुंतवून ठेवण्यासाठी इथे भलामोठा बाजार, चमचमीत पदार्थाची हॉटेल्स, समुद्री खेळ, संग्रहालये अशा पर्यटकांच्या विरंगुळ्याच्या बऱ्याच सोयी उपलब्ध आहेत. कॉब्रे समुद्र स्पीड बोटींसारख्या समुद्री खेळांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे संध्याकाळी इथे पर्यटकांची तोबा गर्दी असते. पण आम्हाला मात्र ती टाळायची होती. त्यामुळे मुख्य किनाऱ्याच्या अलीकडे फेरफटका मारण्यासाठी शांत समुद्रकिनाऱ्याचा पट्टा लागतो. वर्षभर मुंबईच्या गर्दीत हरवलेला आपला आवाज शोधण्यासाठी आम्हाला ती शांतता खुणावत होती. तिथून मंद गाण्यांच्या आवाजात मावळतीचा सूर्य अनुभवायचा, स्वच्छ पाण्यात दिसणारे वेगवेगळे मासे शोधायचे यात आम्ही दंग झालो. परतल्यावर तेथील प्रसिद्ध हॉटेलमध्ये खाल्लेल्या कोलंबी बिर्याणी आणि तळलेल्या सुरमईची चव अजूनही तोंडावर रेंगाळते आहे.

दुसऱ्या दिवशी दिगलीपूरसाठी सकाळी सातला एसटी बसमधून आमचा प्रवास सुरू झाला. निघण्यापूर्वी डेपोमध्ये दोन प्लेट इडली (चार इडल्या प्रत्येकी), चहा आणि दोन पाण्याच्या बाटल्याचं बिल फक्त १०० रुपयांत उरकलेले पाहिल्यावर हॉटेलच्या हिशोबात गल्लत झाली नाही ना, अशी शंकाही आली. पण अंदमानमध्ये एकूणच जेवणावर फारसा खर्च होत नाही. दिगलीपूर, माया बंदर या अंदमानच्या उत्तरेकडील टोकाजवळ फारशी पर्यटकसंख्या नसल्याने खाण्याचे फारसे चोचले पुरवले जात नाहीत. प्रामुख्याने तमिळ आणि बंगाली लोकांची वस्ती असल्याने त्यांच्या पद्धतीची जेवणाची थाळी सर्रास सगळ्या धाब्यांवर मिळते. त्यातही भात हे मुख्य अन्न. अंदमानमध्ये चपाती, रोटीचे प्रकार पोर्ट ब्लेअर, हॅवलॉकमध्ये पर्यटकांच्या मागणीनुसार मिळतात. १०० रुपयांच्या दक्षिण भारतीय पद्धतीच्या जेवणाच्या थाळीत भात, रस्सम, दोन भाज्या, माशाचा रस्सा, पापड, चिंचेचं सार आणि तळलेला मासा असा ठरलेला मेनू मिळतो. जंगल, थोडी वस्ती, टुमदार घरे, बारातांगचा खाडीचा रस्ता पार करत संध्याकाळी सहाच्या सुमारास आम्ही दिगलीपूरला पोहोचलो. बरे इथले तापमानसुद्धा अजबच. सकाळी किंचित गारवा, अकराच्या सुमारास अंगाला बसणारा उन्हाचा चटका आणि संध्याकाळी पुन्हा गारवा. मुंबईसारखा इथे घाम येत नाही, त्यामुळे प्रवासात चिकचिक झाली नाही. पण उन्हाची तलखी जाणवते. त्यामुळे सतत तहान लागत राहते. प्रवासादरम्यान नमूद करण्याची गोष्ट म्हणजे अजूनही मुंबईसारख्या शहरात आपण स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी संघर्ष करत असताना अंदमानमध्ये मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या छोटय़ाशा चहाच्या ठेल्यानजीकचे स्वच्छतागृहसुद्धा स्वच्छ असते. अर्थात तिथेही त्यासाठी माणशी पाच रुपयांचा मोबदला घेतला जातो, पण तशी सोयही पुरवली जाते.

संध्याकाळी दिगलीपूरला उतरल्यावर बाजारात थोडीशी चौकशी केल्यावर जवळच्याच एका छोटेखानी हॉटेलची माहिती मिळाली. अवघ्या ८०० रुपयात तिथे आमच्या राहण्याची सोय झाली. हे सगळे सोपस्कार आटपायला संध्याकाळचे सात वाजले. एव्हाना गावकऱ्यांची रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. त्यामुळे आम्हीही गावातील बाजारात फेरफटका मारून, दुसऱ्या दिवशीचा दिनक्रम आखून तो दिवस संपवला. घराला दरवाजा नसलेल्या शनििशगणापूरबद्दल तर माहिती होतीच. पण इथेही रात्री हॉटेलचे मुख्य दार सर्रास उघडे ठेवून बिनधास्त झोपून जाणाऱ्या बंगाली केअरटेकर बाईचे आम्हाला मनोमन कौतुक वाटले. पण इथला माणूस मनाने साधाच आहे. बऱ्याच जणांनी बंगाल आणि तामिळनाडू सोडल्यास उर्वरित भारत पाहिलेला नाही. त्यामुळे आपले राहणीमान, वागणुकीबद्दल त्यांना बरेच प्रश्न असतात.

तिसऱ्या दिवशी सकाळी सातला आम्ही रॉस आणि स्मिथ बेटावर जायला निघालो. भाडय़ाने घेतलेली स्कूटर असल्याने वेळेची चिंता नव्हती. समुद्रावर मनापासून प्रेम असणाऱ्यांसाठी रॉस आणि स्मिथ बेट म्हणजे स्वर्ग आहे. एका छोटय़ाशा भूभागाने जोडलेल्या या दोन बेटांवर सकाळच्या दरम्यान चिटपाखरू नसते. तेथे जाण्यासाठी दिगलीपूरहून स्पीड बोटीची सोय आहे. स्पीड बोट सुटते तेथूनच वन खात्याच्या माणसाकडून प्रवेश फी भरून परवानगी दिली जाते. आम्ही सकाळी नऊ वाजता तिथे पोहोचलो, तेव्हा आमच्यासोबतचे दोन परदेशी पर्यटक आणि स्पीड बोटचे चालक इतकीच माणसे तिथे होती. बाकी अख्खा समुद्र तुमच्या मालकीचा. नाचा, हुंदडा, पोहा, खेळा.. कोणीही बोलायला नाही. आम्ही थकेपर्यंत समुद्रात खेळलो, फोटो काढले, शिंपल्यांचा मागोवा घेतला. निळाशार समुद्र, पायाखालची सफेद वाळू आणि हिरव्यागार वृक्षांनी भरलेले बेट हा नजारा कोणत्याही सिनेमातील मस्त रोमँटिक दृश्यालाही लाजवेल. बाराच्या दरम्यान बेटावर माणसांची गर्दी वाढायला लागेपर्यंत आमची निघायची वेळ झालेली. परतल्यावर पोटात कावळे ओरडायला लागले होते. आसपास हॉटेल नव्हतेच, पण सकाळी एकाने खाणावळीच्या जाहिरातीचा छोटा कागद हातात दिलेला. बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एका बंगाली कुटुंबाचे छोटे हॉटेल होते. मेन्यूमध्ये फक्त बंगाली थाळी होती. आम्ही येताच त्यांनी माशाचा तुकडा तव्यावर तळायला टाकला आणि त्याच्या सुटलेल्या घमघमाटाने अर्धे पोट भरले. भात, बटाटय़ाच्या दोन भाज्या, पालेभाजी, कैरीची चटणी, माशाचे कालवण, तळलेला मासा, रसगुल्ला, खीर, पापड आणि किंमत १२० रुपये. जेवणावर ताव मारत असतानाच, खाणावळीच्या मालकाशी झालेल्या गप्पांमध्ये गावातील सध्याच्या तमिळ विरुद्ध बंगाली वादाच्या घडामोडी ऐकायला मिळाल्या. इथे खाणावळीत ताटावर बटर पेपर ठेवून त्यावर जेवण वाढतात. दक्षिण भारतीय लोकांना इतरांचे खरकटे उचलायला आवडत नाही, त्यामुळे जेवण झाल्यावर हा पेपर आपण स्वत कचऱ्यात टाकायचा, मग ते खालचे ताट उचलतात. त्यांच्या या सवयीबद्दल मला माझ्यासोबतच्या मत्रिणीने सांगितले. उरलेल्या दिवसात लाइमस्टोन गुंफा, चिखलाचा ज्वालामुखी आणि कालीपूर समुद्रावरील कासवांचे प्रजनन पाहण्याच्या निमित्ताने अख्खा गाव स्कूटरवर फिरून झाला. समुद्राच्या पाण्याचे क्षार जमा होऊन बनलेल्या लाइमस्टोन गुंफा इथे आवर्जून पाहाव्यात. दिगलीपूर किंवा बारतांगला या गुंफा पाहता येतात. नमूद करायची गोष्ट म्हणजे इथे टूरिस्ट गाडय़ा वगळता इतर चालकांच्या गाडी चालविण्यात कमालीची शिस्त दिसते. समोरच्या स्कूटरला जागा देणे, वळणावर गाडीचा वेग कमी करणे, उगाच ओव्हरटेक न करणे किंवा हॉर्न न वाजवणे, हे नियम इथे कटाक्षाने पाळले जातात. संध्याकाळी मावळतीच्या सूर्याचे गोंडस लालबुंद रूप कॅमेऱ्यात पकडण्यासाठी स्कूटरवर त्याचा बराच पाठलाग केला. पण पठ्ठय़ा काही क्षणात लपून गेला. बहुदा दिगलीपूरच्या सूर्यालाही पर्यटकांची फारशी सवय नसावी.

चौथा दिवस दिगलीपूर ते पोर्ट ब्लेअर प्रवासात गेला. पाचव्या दिवशी हॅवलॉकला जाण्यासाठीच्या जेट्टीचे तिकीट दुपारचे होते. त्यामुळे ती सकाळ पोर्ट ब्लेअरमध्ये    खरेदीमध्ये गेली. अंदमानला लाकडाच्या सुरेख शोभेच्या वस्तू मिळतात. आदिवासींच्या प्रतिकृती, जहाजांच्या प्रतिकृती, शिंपल्यांचे दागिने असा बराच ऐवज इथे खरेदी करता येतो.

हॅवलॉकला बांबूच्या छोटय़ा झोपडीवजा श्ॉकमध्ये आमच्या राहण्याची सोय झाली. एक बेड, मच्छरदाणी, बरे बाथरूम, एक पंखा आणि छोटा बल्ब इतक्या गरजेपुरत्या गोष्टी त्यात होत्या. समुद्रकिनारी खोल्या असल्याने परिसर मात्र नजर लागेल इतका सुंदर. हॅवलॉकला यायचा आमचा मुख्य उद्देश स्कुबा डायिव्हग होता. त्यामुळे सर्वप्रथम दुसऱ्या दिवशीच्या स्कुबाची नोंदणी केली आणि उरलेली संध्याकाळ किनाऱ्यावर फेरफटका मारण्यात घालवली. आमच्या हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. हॉटेल्सचे पण फारसे पर्याय नव्हते. पण आधीच्या तीन दिवसांत सतत भात, सांबर, रस्सा खाल्ल्यामुळे इथे कोलंबी फ्राय, भुर्जी आणि मुख्य म्हणजे गरमगरम चपात्या मिळाल्यावर लॉटरी जिंकल्यासारखे वाटायला लागले.

अंदमानच्या संपूर्ण प्रवासात आम्ही हॉटेलमधून लवकर निघायचो, वाटेत मिळेल तसे थांबून खायचो, त्यातही सकाळी सातला हॉटेल सोडायचो. त्यामुळे गरमागरम नाश्ता हा प्रकार आठ दिवसांसाठी बाजूलाच पडला होता. कधी नव्हे तर आईच्या हातच्या गरमगरम पोह्य़ांची आठवण इथे व्हायला लागलेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सहाला स्कुबासाठी थेट समुद्र गाठला. स्कुबा डायव्हिंगमध्ये वेग नसतो. आवश्यक ते प्रशिक्षण मिळाल्यावर प्रशिक्षकासोबत तुम्ही पाण्यात जाता आणि वाटेत दिसणारे कोरल्स, मासे, छोटे कीटक आणि समुद्राचे अंतरंग अनुभवत असता. तोंडात मास्क असल्याने संवाद बंद असतो. तुमचे पूर्ण लक्ष तुमचे श्वास आणि आजूबाजूचा जिवंत परिसर यावरच असते. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी तरी ध्यानसाधनेइतकाच मनाला शांत करणारा होता. स्कुबानंतर मात्र आम्ही पुन्हा स्कूटर भाडय़ाने घेऊन हॅवलॉकच्या भ्रमंतीला लागलो. येथील कालापथ्थर आणि राधापूर ही समुद्र पर्यटकांसाठी लोकप्रिय ठिकाणे आहेत. निळाशार समुद्र आणि पांढरी वाळू यांच्यात गुंतल्यावर इथे वेळेचे गणित लागतच नाही. हॅवलॉकला फॅन्सी सीफूडचे असंख्य प्रकार मिळतात. इतक्या दिवसांच्या सात्त्विक जेवणानंतर त्यावर ताव मारणे गरजेचे होते. आधीच्या दिवसांमध्ये आमची ट्रिप बरीच स्वस्तात झालेली. त्यामुळे इथे थोडा अधिक खर्च करायला आमची हरकत नव्हती. हॅवलॉक आमच्या सहलीचा शेवटचा थांबा होता.

मुंबईत परतल्यावर करावी लागणारी रोजची कामे, ऑफिस या सगळ्याची आठवण विमानात बसल्यावर होऊ लागली. प्रवासात सहज म्हणून मोबाइलवर फोटो पाहताना लक्षात आले, सुरुवातीचे दोन दिवस वगळता आम्ही कुठलेच फारसे फोटो काढले नव्हते. कारण समोरचा परिसर आम्हाला इतका मोहून टाकायचा की त्याला नजरेत टिपणे आम्हाला महत्त्वाचे वाटायचे. सेल्फी, कँडीड फोटो वगैरे उद्योग आम्ही अगदीच तुरळक केले होते. परतताना चेन्नई विमानतळावर आठ दिवस दडी मारून बसलेला इंटरनेटचा काटा डोके वर काढायला लागला. इतक्या दिवसांचे मेसेज, अपडेट यायला लागले. आठ दिवसांनी आम्ही परत आपल्या दैनंदिन आयुष्यात परतलो. पण सोबत या इवल्याशा बेटाच्या किती तरी गमतीजमती, आठवणी घेऊन आलो.

 

अंदमान फिरताना..

* इथे स्थानिकांशी संवाद साधा. त्यांच्याकडे सांगण्यासारख्या किती तरी गोष्टी आहेत. एसी गाडीत बसून गॉगल चढवून पाहिलेल्या समुद्रापेक्षा इथे पाहण्यासाठी बरेच काही आहे. स्थानिक वाहने, खाणावळी यांचा वापर आवर्जून करा. काळ्या पाण्याची शिक्षा भोगल्यानंतर इथेच स्थायिक झालेल्या स्वातंत्र्यसनिकांची नवी पिढी इथे वसली आहे. त्यात बंगाल, दक्षिण भारतातून कामधंद्यासाठी येणारे लोक मिसळले आहेत. या लोकांचा इतिहास एरवी वाचला जात नाही. तो त्यांच्या गप्पांतून उलगडतो.

* पसे शक्यतो गाठीशी ठेवा. पोर्ट ब्लेअर, हॅवलॉकसारख्या ठिकाणी एटीएम आहेत, पण त्यावर विसंबून राहण्यापेक्षा पसे असू द्यात. ऑनलाइन बुकिंगपेक्षा इथे हॉटेल्स प्रचंड स्वस्त दरात उपलब्ध आहेत. अर्थात अगदीच उच्च प्रतीच्या सोयी मिळणार नाहीत, पण स्वच्छ खोल्या नक्कीच असतील. वायफाय, इंटरनेटला काही दिवसांसाठी रजा द्यावी लागते.

* अंदमानची माहिती इंटरनेटवर वाचून घ्या. काही ठिकाणी आठवडय़ाच्या ठरावीक दिवशीच बोट, बसेस जातात. सरकारी विश्रामगृहात राहायचं असेल तर आगाऊ परवानगी घ्यावी लागते. या सगळ्याची माहिती असू द्यात. तुम्हाला नक्की कुठे फिरायचे आहे, काय बघायचे आहे याची यादी करा आणि त्यानुसारच ट्रिप ठरवा. कमी दिवसांत जास्तीत जास्त बेट फिरायचा हट्ट करू नका. नाही तर बराच वेळ प्रवासातच जाईल.

* अंदमानमध्ये दिवस लवकर उजाडतो आणि रात्र लवकर होते. त्यामुळे प्रवासाची सुरुवात सकाळी लवकर करणे उत्तम. येथील बहुतेक बस, बोटी सकाळच्या सुमारास असतात. त्या चुकल्या तर अख्खा दिवस त्याच ठिकाणी अडकून राहावं लागेल.

* दिगलीपूर, हॅवलॉकवर फिरताना रिक्षा भाडय़ावर प्रचंड खर्च होतो. त्यापेक्षा भाडय़ाने स्कूटर घेऊ शकता. ३०० ते ५०० रुपये भाडय़ाने इथे स्कूटर मिळते. पण तुमचा वाहनचालक परवाना न्यायला विसरू नका.

* बऱ्याच ठिकाणी रिक्षाने फिरताना एखाद्या आडमार्गावर परतीसाठी कोणतेही साधन नसल्यास रिक्षावाल्यांचे नंबर घेऊन ठेवा. गरजेच्या वेळेस त्यांना बोलावता येते. पण इथे रिक्षा मीटरवर चालत नाही. त्यामुळे रिक्षावाल्याला आगाऊ भाडे विचारा. पन्नासच्या पटीत वाढणाऱ्या दराबद्दल तुम्ही बार्गेनिंगसुद्धा करू शकता.

* अंदमानवरून परतताना नातेवाईक, घरच्यांसाठी काही वस्तू नेण्याचा मोह आवरत नाही. पण त्यांच्या किमती मात्र नीट तपासून घ्या. पोर्ट ब्लेअरपेक्षा हॅवलॉकला अशा वस्तू स्वस्त मिळतात.

* दिगलीपूरवरून परतताना हातात एखादा दिवस राखीव असल्यास माया बंदर, रंगत येथील समुद्र आणि बारातांगच्या गुंफा पाहता येतात. त्या चुकवू नका. इथे एसटी सकाळच्या सुमारासच सुटतात. त्यामुळे तुमचा दिवस त्यानुसार आखा. तुम्हाला सोयीचे असल्यास रात्रीच्या बसचा पर्यायसुद्धा असतो.

* अंदमानला तुम्ही एखाद्या टूर पॅकेजवाल्या किंवा तशा सोयी देणाऱ्या हॉटेलमध्ये राहणार तर तेथे शक्यतो सकाळी न्याहारी वगैरे मिळते, पण एकटय़ाने फिरायचे असेल, मिळेल ते हॉटेल घ्यायचे असेल तर न्याहारी मिळणे कठीण आहे. चहाच्या टपऱ्या आहेत, पण अंतर्गत भागात न्याहारी मिळेल असे हॉटेल सहजासहजी सापडत नाही.

 

Story img Loader