टीकायन
पंकज भोसले – response.lokprabha@expressindia.com
साठ ते ऐंशीचे दशक वैविध्यपूर्ण लिखाणाने गाजविणाऱ्या भानू शिरधनकर यांची पुस्तके आज वाचकांना माहिती नसल्याने विस्मृतीत गेली आहेत. त्यांनी अनुवादित केलेली दोन पुस्तके गेली अनेक वर्षे अनुपलब्ध होती. मेहता पब्लिशिंग हाऊसने ती दुर्मीळ झालेली पुस्तके मिळवून त्यांचे पुनप्र्रकाशन केले. त्यानिमित्ताने आपल्याकडील वाचनव्यवहारासोबत शिरधनकर यांच्या साहित्याचा घेतलेला हा शोध..
लेखक विसरण्याचा आरंभकाळ..
एकोणीसशे पन्नास ते सन दोन हजार या पन्नास वर्षांच्या कालखंडातील मराठी वाचक आणि लेखकांची पिढी बऱ्याच बाबतीत नशीबवान होती. कसदार लेखनाचे झरे रिचवणारी नियतकालिके मुबलक होती. कंपुबाजी-एकांडशाही, सोवळे-ओवळे, व्हाइट प्रिंट-न्यूज प्रिंट अशा विविध विभागणीतूनही साहित्याला खळ नव्हती. समाजातील व्यक्तीचे सुसंस्कृततेचे स्थान वाचन-लेखनाच्या वकुबावरून ठरत होते. प्रस्थापित आणखी बळकट होत असले, तरी त्यांना झुगारून बंडखोरदेखील अधिक आक्रमकतेने लिहीत-वाचत होते. परिणामी सत्तरीच्या दशकात एकाच वेळी सत्यकथा-मौजेचे बिनीचे साहित्य, लिटिल मॅगझिनवाल्यांचे अल्पो-अजरामरी लेखननिर्माण आणि वेगळी चूल मांडत रहस्य-साहसकथांचे अजबविश्व वाचकांच्या दिमतीला विचार-मनोरंजनाचे अनंत पर्याय उपलब्ध करून देत होते. लेखक पुस्तकांच्या वेगवान आवृत्त्यांनी घडत वगैरे होते, तसे वाचकांच्याही चांगल्या साहित्यधारणा तयार होत होत्या.
दोन हजारच्या आसपास नियतकालिकांची संख्या आटू लागली. समाजातील बहुतांश व्यक्तींचे छंद अथवा फावल्या वेळात इतर मनरिझावू गोष्टींतून फुरसद मिळाल्यासच वाचन-लेखनाचे आयुष्यातील स्थान उरले. नियतकालिकांची कमतरता, एकेकाळच्या साहित्यातील प्रस्थापित-बंडखोरांची बनलेली गलितगात्र अवस्था यांच्यामुळे या काळात नव्याने तयार होणाऱ्या वाचकाची साहित्याबाबत बऱ्यापैकी चुकीची धारणा होण्यास पोषक वातावरण तयार झाले.
नव्याने भरीव काही तयार होत नसल्याने जुन्याच आदर्शाची जंत्री बिंबविण्याचा प्रयोग नव्वदोत्तरीत नुकतेच वाचू लागलेल्या पिढीवर व्हायला लागला. परिणामी झाले काय की, निवडक लेखकांच्या नावांचे आणि पुस्तकांचे वहन या काळात झाले, तर शेकडो लेखकांची नावे साहित्यपटलावरून नाहीशी होण्यास आरंभ झाला. फडके-खांडेकर-अत्रे या काळात मासिकांना शताब्दी अंक काढण्यापुरते शिल्लक होते. विनोदाचे बादशाह पु.ल., कथेचे सम्राट वपु, ऐतिहासिक अनुभूतीसाठी रणजीत देसाई, थोडे सावरकरांचे विचार, थोडी दुसऱ्या महायुद्धावरची पुस्तके इतके वाचन झाले की दहावीच्या सुट्टीतला मराठी साहित्याचा क्रॅशकोर्स पूर्ण, ही दोन हजार काळातील राज्यातील कोणत्याही नगरांतील परिस्थिती होती. अन् आता शहरांसोबत गावोगावच्या खासगी लायब्रऱ्या बंद पडत चालल्याने ही स्थिती पुढे आणखी भीषण होणार आहे.
साठ्ठोत्तरीतील वाचनव्यवहाराशी आत्ताची तुलना केली, तर तेव्हा आधीच्या पिढीजवळ दुसऱ्या पिढीला वाचनदीक्षा देण्यासाठी पुस्तक-लेखकांची असंख्य नावे होती. दशकानुदशके या वाचनदीक्षेत उतरंड व्हायला लागली. खाज असलेली स्वत:हून पुस्तकांची-लेखकांची शोध घेणारी नववाचकांची संख्या या काळात रोडावत गेली.
मराठीत बेस्टसेलर्स पुस्तके घडवत एका काळावर आपला ठसा उमटविणाऱ्या बाबा कदम, चंद्रकांत काकोडकर, गुरुनाथ नाईक, शरश्चंद्र वाळिंबे, चिंतामणी लागू, श्रीकांत सिनकर या लेखकांना सर्वात पहिल्यांदा विस्मृतीत जाण्याचा फटका बसला. मुळात या लेखकांनी मुख्य प्रवाहातील वाचकांहून अधिक वाचक तयार केला होता. पण तरीही समीक्षकांनी अदखलपात्र ठरवून त्यांची हयातभर उपेक्षा केली. अत्यंत वाचनीय आणि समाजातील घटनांना समांतर असे साहित्य निर्माण करूनही या लेखकांना वाचत ठेवण्याची परंपरा दोन हजारोत्तर काळात खंडित झाली. गेल्या दहा वर्षांमध्ये सत्तरच्या दशकात छापण्यात आलेली या लेखकांची कित्येक पुस्तके लुप्त झाली असून, उरलेली कित्येक वाचनालयांमधून त्यांचा वाचकच न उरल्याने काढून टाकली जात आहेत. पाच-सात वर्षांत खासगी ग्रंथालये संपल्यानंतर ही पुस्तके दिसणेही दुर्लभ होणार आहे.
तीच पन्नास वर्षांपूर्वीची पुस्तके आदली पिढी पुढल्या पिढीला सांगत असल्याने सर्वच मार्गानी सध्या मराठीतील खूपविकी पुस्तके म्हणून पाच-सात लेखकांपलीकडे साधारण वाचकांची मजल जात नाही. ब्लॉग्ज, फेसबुक, फोरम्स आपापल्या पातळीवर जुन्या विस्मृत लेखकांना जिवंत ठेवण्याचे कार्य थोडय़ा प्रमाणात करीत आहे. मात्र ते प्रयत्न इतके विखुरलेले आणि मर्यादित आहेत, की त्यांचा जोरकस परिणाम होत नाही.
वाचनव्यवहाराच्या गेल्या दोन दशकांतल्या बदललेल्या गणितामुळे साठोत्तरीच्या प्रवाहात महत्त्वाचे गणले गेलेले डझनावरी लेखक आज लायब्रऱ्यांमधून गडप झाले आहेत. मराठी नवकथेची धुरा वाहणाऱ्या कथापंचकांपैकी सर्वाची सर्व पुस्तकेही आज एकत्रितरीत्या वाचनालयात पाहायला मिळणे अवघड आहे.
प्रवासवर्णनांमध्ये स्थल-काल महतीपलीकडे वाचकाला पकडून ठेवणारे, त्याला अंतर्मुख करणारे लिखाण करणारे अनंत काणेकर आणि रा. भि. जोशी यांची पुस्तके आज सुचविली किंवा ग्रंथालयांमधून वाचलीही जात नाहीत. द.मा. मिरासदार, शंकर पाटील यांचा ग्राम्य विनोद, भाऊ पाध्ये यांची रांगडी भाषा, अनोख्या कथा लिहिणारे श्री. दा. पानवलकर, अनिल डांगे, शरश्चंद्र वासुदेव चिरमुले (नावे खूपच लांबू शकतात) यांच्या कथेवर आवर्जून कुणी चर्चा करताना दिसत नाही.
आठ-दहा वर्षांपासून कोल्हापूरच्या अजब डिस्टिब्युटर्स, रिया पब्लिकेशन्सनी स्वामित्वहक्क संपलेल्या पुस्तकांचा जीर्णोद्धार करीत स्वस्त कागदावर छपाई करून पन्नास (आता सत्तर) रुपयांमध्ये विसरल्या गेलेल्या लेखकांच्या शेकडो दुर्मीळ पुस्तकांना पुन्हा उपलब्ध करून देण्याचा झपाटा लावला. आरंभीच्या काळामध्ये राज्यभर त्यांच्या प्रदर्शनांना पुस्तके घेण्यासाठी रांगा लागल्या. पुन्हा चांगल्या वाचनाचे वातावरण तयार होईल अशी एक आशा निर्माण झाली. मात्र आता या प्रदर्शनांना अपवाद वगळता हवी तितकी रीघ नसल्याचेच दिसून येते. अन् शहरांतील रद्दीवाल्यांकडे सापडणाऱ्या पुस्तकांमध्ये या स्वस्त पुस्तकांच्या आवृत्त्यांचीच गर्दी झालेली दिसते.
एकूणच लेखकांना घाऊकरीत्या विसरले जाण्याच्या या आरंभ काळात मेहता पब्लिशिंग हाऊसने वेगवेगळ्या कारणांनी गतस्मृत झालेल्या भानू शिरधनकर यांच्या दोन अनुवादित पुस्तकांच्या केलेल्या जीर्णोद्धाराची घटना ही आजच्या वाचकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. एकोणीसशे चाळीस ते सत्तर या काळात अफाट लेखनप्रपंच करून या लेखकाने मराठी साहित्याला अत्यंत नवख्या असलेल्या विषयांची भर घातली होती. वाचनवेड, प्राणी-पक्षी, सागरी साहस, गुन्हेगारी विश्व, समुद्रामार्गे होणारी सोन्याची तस्करी, क्रीडा अशा सर्वच विषयांवर भाषिक सामर्थ्यांने त्यांनी लेखणी चालवली.
चाळीसच्या दशकापासून शिरधनकर यांनी ‘किलरेस्कर’मध्ये सागरी जीवनावरच्या आपल्या आणि इतरांकडून ऐकलेल्या अनुभवांना शब्दबद्ध करण्यास सुरुवात केली. ‘उधानवारा’, ‘सागर संग्राम’, ‘शिमाळ आलं, शिमाळ आलं!!’ ही रिपोर्ताजरूपी लेखांची सागरी जीवनावरील इत्थंभूत माहिती देणारी मराठीतील पहिली-वहिली पुस्तके शिरधनकर यांच्या नावावर आहेत. त्यामुळे जगप्रसिद्ध अमेरिकी लेखक हर्मन मेलविल यांच्या एकोणिसाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या ‘बिली बड’ आणि ‘टायपी’ या सागरी जीवनावरच्या कादंबऱ्या त्यांच्याजवळ अनुवादासाठी आल्या असाव्यात. १९६६ साली दोन्ही कादंबऱ्या ‘पाचूचे बेट’ आणि ‘शिस्तीचा बळी’ या नावाने एकाच पुस्तकाद्वारे प्रकाशित झाल्या होत्या. अनुवादित साहित्याचा आपल्याकडे कोणताच पायपोस ठेवला जात नसल्या कारणाने त्या गेली कैक वर्षे अनुपलब्ध होत्या. चार वर्षांपूर्वी जन्मशताब्दीही विसरल्या गेलेल्या भानू शिरधनकर यांची केवळ अनुवादाचीच नाही, तर स्वतंत्र पुस्तकेही आज दखल घ्यावी इतकी सुंदर आहेत. शिरधनकर यांनी आपल्या लिखाणात दर वेळी नवे विषय हाताळले होते. नव्या शब्दांना तयार करून ते रूढ करण्याचा प्रयत्न केला होता. अनेक दृष्टींनी महत्त्वाचे असूनही त्यांच्याबद्दल फार माहिती संकलित झाली नाही किंवा त्यांच्या ललितेतर साहित्याची, रिपोर्ताजची समीक्षा मराठीत झाली नाही.
प्रस्तुत लेखामध्ये मुंबई-पुण्यातील जुन्या पुस्तकांच्या पदपथांवरील बाजारात, रद्दीत आणि वाचनालयांमध्ये सापडलेल्या शिरधनकर यांच्या लेख, पुस्तकांमधून त्यांच्या अरभाट लिखाणावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शोधूनही त्यांचे छायाचित्र उपलब्ध झाले नाही.
शब्दांकन आणि मुलाखतकार…
अलीकडच्या काळात भानू शिरधनकर यांचे नाव हे मायाजालावर मर्यादित प्रमाणात फिरत होते, ते बाबूराव अर्नाळकर यांच्या प्रदीर्घ मुलाखतीसह. ललित मासिकासाठी डिसेंबर १९७१ साली घेतलेली ही मुलाखत मनोरमा प्रकाशनाने २०१० साली काढलेल्या अर्नाळकरांच्या काही नव्या आवृत्त्यांमध्ये प्रस्तावना म्हणून वापरली आहे. राजहंस प्रकाशनाचा ‘निवडक बाबुराव अर्नाळकर’ हा महाग्रंथ गाजण्याआधी शिरधनकर यांनी ऐसपैस घेतलेली मुलाखत दुर्मीळ दस्तावेज होती. ‘ललित’ मासिकाच्या पहिल्या-दुसऱ्या वर्षांचे अपवाद सोडता त्यांचा सहभाग बहुतांश अंकांत मुलाखती आणि शब्दांकनांत दिसतो. वाचनाविषयी बुजुर्ग साहित्यिकांच्या मुलाखतींच्या दोन पानांच्या मजकुरासह दिवाळी अंकांत त्यांची मोठय़ा लेखांसह उपस्थिती सापडते. मात्र त्या काळात दिवाळी अंकांपासून ते वेगळ्या विषयांवरील ग्रंथांनी गाजत असूनही त्यांचे व्यक्तिचित्र लिहिण्याची तसदी ते लिहीत असलेल्या प्रमुख नियतकालिकांनी घेतलेली आढळत नाही.
दहा वर्षांपूर्वी निघालेल्या ‘निवडक धनंजय’मध्ये मराठी साहित्य इतिहासाचे जाणकार अभ्यासक रविप्रकाश कुलकर्णी यांनी त्यांची एका टिपणाद्वारे दखल घेतल्याचे सापडते. ते म्हणतात की, ‘‘स्वत:ला वेगळे अनुभव घेता येत नाहीत, तर वेगळे अनुभव घेणाऱ्यांपर्यंत ते पोहोचत आणि त्यांचा अनुभव ते वाचकांपर्यंत पोहोचवत. त्यामुळे त्यांनी शिकारी, कोळी, सर्कसमधील लोक, जंगल अधिकारी यांच्या मुलाखती घेऊन विविध गोष्टी-हकिगती लिहिल्या. विशेष म्हणजे ‘किलरेस्कर’सारख्या मासिकांत त्यांच्या लेखनाला आवर्जून स्थान असे. अशा लेखनातून त्यांची काही पुस्तके आकाराला आली ती अशी. ‘उधानवारा’ (समुद्र जीवनानुभव), ‘कारवारचा काळुराम’ (शिकारकथा), ‘तराईच्या जंगलात’, ‘रानातील सावल्या’, ‘घनु वाजे घुणघुणा’ ( शिकारी लोकांचे अनुभव), ‘सर्कसचे विश्व’, ‘वाघ-सिंह माझे सखेसोबती’ (दामू धोत्रे यांचे सर्कस अनुभव) ‘ऑलिम्पिकची नवलकथा’, ‘इस्पितळाच्या वाटेवरून’, ‘पुस्तकांची दुनिया’ याखेरीज किती तरी साहित्य मासिकांमधून उपेक्षित पडले असेल ते वेगळेच.’
जंगलानुभव, वन्यप्राणी, शिकारकथा, दर्यावर्दी जीवन यांसारखे विषय आजदेखील आपल्या लेखनात दुर्मीळ आहेत. कारण लेखन करणाऱ्या मंडळींना रूढ, ठरलेल्या चाकोरीबाहेर पडताच येत नाही आणि पांढरपेशा जीवनापलीकडे जाणाऱ्यांना लेखनासक्ती नाही. त्यामुळे त्यांचे अनुभव, ती आसक्ती लेखनामध्ये उमटत नाही, असे निरीक्षण कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे. या टिपणातच त्यांनी शिरधनकर विसरले जाण्याचे कारणही दिले आहे. ‘भानू शिरधनकरांचा स्वभाव संकोची, लोकात फारसं मिसळण्याचा नव्हता. त्यामुळे ते तसे अनेकांना माहिती नव्हते. नंतर तर ते जवळजवळ विस्मृतीतच गेले.’
ललित मासिकाच्या सुरुवातीच्या खंडांमध्ये मराठीतील बहुतांश जुन्या-जाणत्या साहित्यिकांची तरुणपणापासूनची माहिती सचित्र उपलब्ध आहे. मात्र शोध घेऊनही शिरधनकर यांच्या पुस्तकांच्या जाहिराती आणि त्यांच्या लेखांपलीकडे फारसे हाती लागले नाही. त्यांच्या ‘उधानवारा’ या पहिल्या पुस्तकामध्ये दर्यावर्दी जीवनावरच्या अनुभवांचे चित्रण आले आहे. पहिल्या आवृत्तीची फेब्रुवारी १९५० सालाची प्रकाशन नोंद असलेल्या या पुस्तकात सागरावर चितारलेली भरपूर चित्रे आहेत. पुण्यातील दत्तवाडी परिसरात एका रद्दीवाल्याकडे सापडलेल्या ‘किलरेस्कर’ मासिकाच्या १९३७ सालाच्या संपूर्ण खंडात या पुस्तकातील पहिला लेख ‘चांदण्यातील गप्पा’ या शीर्षकानिशी आलेला आहे. मासिकातील मूळ चित्र हे खुद्द शंकर वामन किलरेस्कर यांचे आहे.
समुद्री जीवनावरचे प्रत्यक्ष अनुभव आणि त्यांतील रौद्र परिस्थितीशी झुंज देऊन बचावलेल्या व्यक्तींच्या गाठीभेठी घेत त्यांना शिरधनकर यांनी बोलते केले आहे. मराठीतील या प्रकारचे असलेले हे पहिलेच पुस्तक मुंबईतील अभिनव प्रकाशनाच्या वा. वि. भटांनी प्रकाशित केले, त्यासोबत आणखी काही वेगळ्या वाटेवरची पुस्तके प्रकाशित केल्याचा दाखला शिरधनकरांच्याच ‘चिडियाघर’ या पुस्तकात असलेल्या जाहिरातीवरून लक्षात येते.
उधानवारा या पुस्तकाच्या जाहिरातीमध्ये आणखी महत्त्वाची माहिती मिळते. या पुस्तकासोबत प्रकाशित झालेल्या इतर पुस्तकांची. मराठी साहित्यात मोलाची भर टाकणारी ही काही निवडक पुस्तके असल्याचे जाहिरातीत म्हटले आहे. प्रथम क्रमांकावर अर्थातच ‘उधानवारा’ दिसते. दुसरे नाव मात्र व्यंकटेश माडगूळकर या त्या काळात अतितरुण असलेल्या लेखकाचे ‘माणदेशी माणसं’ या पुस्तकाचे आहे. माडगूळकरांची सारीच पुस्तके आज नव्याने मिळतात, मात्र त्यांच्या पुस्तकांच्या जुन्या आवृत्त्या असणाऱ्या संग्रहकांकडेही कॉन्टिनेण्टल प्रकाशनाने काढलेली माणदेशी माणसंची आवृत्ती असते. अभिनव प्रकाशनाची माणदेशी माणसांची आवृत्ती आज दुर्लभ आहे, तसेच त्यासोबत असलेली इतर पुस्तकेही मिळणे अवघड आहे. रा. वि. पटवर्धन यांचा ‘मानवाचे पूर्वज’ हा ग्रंथ, रा. भि. जोशी यांचा काचेचे कवच हा कथासंग्रह, जॉन स्टाइनबॅक यांच्या दीर्घ कथेचा सदानंद रेगे यांनी मोती या नावाने केलेला अनुवाद ही मराठी साहित्यातील विस्मृत रत्ने आहेत.
‘उधानवारा’च्या १९६५ साली प्रकाशित झालेल्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेमध्ये शिरधनकर म्हणतात की, ‘उधानवारा’ हे दर्यावर्दी जीवनाची ओळख करून देणारे मराठीतील अगदी पहिले पुस्तक होय. यातील प्रकरणे १९४०च्या आसपास किंवा अगोदर लिहिली होती. म्हणजे आता सुमारे पंचवीस वर्षांनंतर वादळी जीवनाचे हे रौद्र दर्शन पुनरपि वाचकांना घडत आहे. या पंचवीस वर्षांच्या काळात या साहसी जीवनावर मराठी भाषेत विशेष काही लिहिले गेले आहे, असे नाही. महाराष्ट्राची एक कडा, शेकडो मैल लांबीच्या सागरी किनाऱ्याने मर्यादित झालेली आहे. ठिकठिकाणी आंत शिरलेल्या खाडय़ांमुळे ही किनारपट्टी करवतकाठी बनली आहे. खाडय़ाखाडय़ांतून आणि सागराच्या या विस्तिर्ण पृष्ठावर अनेक मराठी मासेमार आणि खलाशी आजसुद्धा पारंपरिक पद्धतीने स्वैरसंचार करीत आहेत. सागराच्या भीषण तांडवाला, कठोर रोषाला तोंड देत आहेत. त्यांच्या जीवनातील रम्य-भीषण प्रसंग वेचून कुणी लिहून काढण्याचा प्रयत्न केला तर मराठी साहित्यात नि:संशय वेगळी भर पडेल.’
लीलाविहार नावाची मासेमार बोट अचानक इंजिन बंद पडल्यानंतर वाहत गेली आणि तिच्यावरील अकरा खलाशी सुमारे तीन आठवडे समुद्रावर एकाकीपणे भटकत राहिले. त्या बोटीवर असलेल्या तरुण इंजिन ड्रायव्हर आबा आळंदे यांना बोलते करीत त्यांनी ‘एक कुप्पा आणि अकरा खलाशी’ हा साहसकथेची सर्व वैशिष्टय़े असलेला लेख लिहिला आहे. चौगुले स्टीम शिप्स कंपनीचे कॅप्टन जे. जी. भोसले यांचे रौद्र समुद्राशी लढताना आलेले अनुभव, बिन शिडाच्या एका साध्या होडीतून कोलकता ते अंदमान प्रवास करणारे तरुण नाविक लेफ्टनंट जॉर्ज अल्बर्ट डय़ुक यांची कहाणी. २६ जून १९७३ रोजी साकोत्राच्या सामुद्रधुनीत मोगल लाइन्सची ‘सौदी’ ही आगबोट पंधरा मिनिटांच्या अवधीत बुडाली. त्यातून वाचलेल्या दोघांची शिरधनकर यांनी मुलाखत घेऊन एक लेख लिहिला आहे.
या सगळ्या लेखनाची वैशिष्टय़े म्हणजे कित्येक नव्या शब्दांना मराठीमध्ये सामावून घेतले. गदमा (लाकडी टेकू), आठ आणे वजन (६४ मणांचा आणा), पाग (किनाऱ्याला बांधलेल्या दोऱ्या) याशिवाय दर्यासारंगांच्या रोजच्या व्यवहारातील बोलीभाषा त्यांच्या लेखनामधून उतरलेली दिसते.
मायाजालावरीलच मैत्री नावाच्या ब्लॉग (पोर्टलवर) भानू शिरधनकर यांच्या साहित्याच्या स्मृती जागविणारे लेखन काही महिन्यांपूर्वी दिसले. त्यांच्या जन्मशताब्दीच्या आधी दोन वर्षे २०१३ साली ‘मला दिसलेले भानू शिरधनकर’ नावाचा हा तपशील मंगेश नाबर यांनी त्यांच्या लिखाणाविषयीच्या निव्र्याज प्रेमातून पोस्ट केला आहे. ‘संग्रहालय’ या नियतकालिकाच्या जून १९८२च्या अंकात तो आधी लेखस्वरूपात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. शिरधनकर यांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी हे लेखन झाले होते. नाबर यांनी त्यांची कधीही भेट घेतली नव्हती. मात्र त्यांच्या एका पुस्तकाचा ग्रंथप्रदर्शनात सुगावा लागल्यानंतर त्यांना त्यांच्या लिखाणातील मौलिकता लक्षात आली. झपाटल्यासारखी मिळतील ती पुस्तके वाचून काढली. अभिनव प्रकाशनाच्या वामनराव भटांशी ओळख करून शिरधनकर यांची पुस्तके खरेदी केली.
मंगेश नाबर यांनी या पुस्तकांबाबत म्हटले आहे की, ‘शिरधनकर यांची पुस्तके वाचता वाचता मनोरंजन तर होत होतेच. पण ज्ञानातही भर पडत होती. सहसा कुणीही मराठी लेखकाने न हाताळलेल्या विषयांवर त्यांनी चौफेर लिखाण केले होते. चौफेर म्हणण्याचे कारण, त्यांत स्फुटे होती, छोटे लेख, दीर्घ लेख होते. गप्पांतून मुलाखतींतून त्या त्या क्षेत्रातील माहिती आपल्या सुबोध शैलीत त्यांनी वाचकांना मुक्तहस्ते पुरविली होती. इंग्रजी पुस्तकांचा आस्वादयुक्त परिचय होता, नर्मविनोदाने नटलेली नवलिका होती. ग्रंथवाचन आणि ग्रंथसंग्रह यांवर केलेले मार्गदर्शन होते. एवढेच काय, काळ्या वाघाचे आत्मवृत्त पण होते.
नाबर यांनी शिरधनकर यांच्या पुस्तकांविषयी खूप भारावून लिहिलेले आहे. त्यांच्या मते शिरधनकर यांचा खास विषय दर्यावर्दी जीवन असला तरी त्यांचे मन रमले, ते प्राणिजीवन आणि पक्षिजीवन या विषयांत. त्यांचे हेही लेखन भटकंतीतून केल्याचे जाणवते. नुसत्या एकवेळच्या गप्पाटप्पांतून गोळा केलेला मसा नव्हे. शिरधनकर स्वत: जंगलातून भटकलेले दिसतात.
तराईच्या जंगलात पुस्तकात रान आणि घराभोवतालच्या पशू-पक्ष्यांचे रोमांचक जीवन त्यांनी देखण्या शीर्षकांनी नटविले आहे. ‘जिवाचं मैतर तुम्ही माझ्या’, ‘फोर्डस्डेलवरील फुफाटा’. चिडियाघर या पुस्तकात त्यांच्या प्राणी-पक्षी कुतूहलाचे नमुने भेटतात. मुंबईच्या राणीच्या बागेच्या सुपरिंटेंडेंट आर. पी. वेदक यांच्याशी कुत्र्याच्या ब्रिडिंगपासून ते वाघ-सिंहाच्या देखरेखीचे दैनंदिन तपशील वाचनीय बनून येतात. सर्कसच्या शिकारखान्यातील सारीच यंत्रणा ते रंगवून सांगतात. कोकणातील बैलांच्या साठमाऱ्या आणि बैलांची आपसातली संघर्षयुद्धे यांवर इतक्या बारकाईने फक्त शिरधनकरांच्या नजरेतूनच उमटू शकतात. त्यांनी सकाळपासून रात्रीपर्यंत एका गावात पाहिलेली बैलांची उस्फूर्त झुंज आणि ती थांबवायला लोटलेल्या गावाचे वर्णन चक्क डोळ्यासमोर उभे राहते इतके जिवंत झाले आहे.
आजच्या नवी मुंबईतील बेलापूर या शहरात सत्तर-ऐंशी सालांपूर्वीच्या रानातील एक हकिगत फारच रंगतदार आहे. तेथे दररोज कोंबडय़ा पळविणारा बिबटय़ा वास्तव्य करून असल्याच्या अंदाजाने गावकऱ्यांनी शिकारी आर. व्ही. राणे यांना पाचारण केले. त्यांना तेथे बिबटय़ा आढळला नाही. मात्र एक कोल्हा कोंबडय़ा पळवून जाताना दिसला. त्यांच्या अंगावर चाल करून आलेल्या कोल्ह्य़ाचा राणे यांनी खात्मा केला. मात्र त्यानंतर त्या हुशार कोल्ह्य़ाची माहिती त्यांना तेथील आदिवासी लोकांकडून मिळाली. हा कोल्हा दररोज कोंबडय़ा पळवून आदिवासींच्या घरासमोर नेऊन ठेवी. मग त्याचे त्या घरात शिजविलेले अन्न खाऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या कोंबडीसह हजर होई. माणसाने शिजवलेले अन्न खायची सवय झालेल्या या कोल्ह्य़ाची कहाणी चिडियाघरमधल्या एका लेखात आहे.
‘चित्रकंठ’ या धनगोपाल मुखर्जी यांच्या ‘गे नेक’ या पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केला आहे. कबुतराच्या आयुष्यावरील ही गेल्या शतकातील एक दुर्मीळ कादंबरी आहे. रद्दीच्या दुकानात फाटक्या अवस्थेत सापडलेल्या या पुस्तकाला वाचून त्यांच्यात कबुतरप्रेम निर्माण झाले होते. त्याच्या प्रस्तावनेत शिरधनकर यांनी म्हटले आहे, ‘हे पुस्तक वाचून माझ्या मनावर विलक्षण सुखद परिणाम झाला आणि कबुतरांचे जीवन इतके आकर्षक व रम्य वाटले की लागलीच मी कबुतरे पाळण्याचे ठरवून त्यांची एक जोडीसुद्धा खरेदी करून आणली.’
मंगेश नाबर यांनी लिहिलेल्या तपशिलात ‘चोरटं सोनं’ या पुस्तकाची माहिती मिळते. या पुस्तकात चोरटय़ा सोन्याच्या चाचेगिरीच्या कथा आहेतच. पण नाबर यांना त्यातील इतर साहसलेखही आवडलेले आहेत. डॉ. मावा यांच्या गाजलेल्या ‘हीलिंग लाईफ’ पुस्तकातील नाटय़मय प्रसंग, आल्प्स पर्वतावरील शिखरावरून कोसळून पडलेल्या विमानातील वाचलेल्यांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या दोन भावांची कथा, जगप्रसिद्ध जादूगार हुदिनीच्या जीवनाची रंगतदार कहाणी आणि १९४४च्या मुंबई गोदीतील अग्निदिव्य ही पुस्तकातील मनाला भुरळ पाडणारी सुरस प्रकरणे असल्याचे नाबर यांनी म्हटले आहे.
शब्दांकन आणि मुलाखतकार शिरधनकर यांच्याविषयी वेगळाच तपशील प्रदीप कर्णिक यांच्या ‘जावे ग्रंथांच्या गावा’ या विलक्षण लेखसंग्रहात सापडतो. कर्णिक यांनी ‘कथा आठवणीतल्या कवितांची’ या लेखात ‘पडू आजारी मौज हीच वाटे भारी’ या कवितेची शोधकहाणी सांगितली आहे. काहींना कविता तोंडपाठ होती, मात्र कवी माहिती नव्हता. कविताकर्त्यांला शोधण्याची चर्चा सुरू झाली. त्यातून ही कविता भानुदास या कवीची असल्याचे पुढे आले. हे भानुदास म्हणजेच भानू शिरधनकर असल्याचे समजल्यावर त्यावर कुणाचाच विश्वास बसेना. शिकारकथा लिहिणाऱ्याने ही कविता केली असेल का, यावर पैजा लागल्या आणि शोधाअंती ती कविता शिरधनकर यांचीच असल्याचे सत्य समोर आले.
इतके वैविध्यपूर्ण लेखन करणाऱ्या साहित्यिकाची फार मोठी दखल आजवर घेतली गेलेली नाही. ‘वाघ-सिंह माझे सखेसोबती’ हे पुस्तक आज अनेक आवृत्त्यांनिशी पुस्तकांच्या दुकानात तगून आहे. इतर पुस्तकांपैकी जुनी संपत चालली आहेत. काही दुसऱ्या आवृत्त्यांपैकी पुस्तके जीर्ण बनून काही वर्षांत बेदखल होण्याच्या मार्गावर आहेत.
एक अतिदुर्मीळ पुस्तक…
श्रीकांत सिनकर आणि अरविंद पटवर्धन यांच्या गुन्हे-पोलिसीकथांआधी बरीच वर्षे आधी शिरधनकरांनी या विषयावर खिळवून ठेवणारे लेखन केले आहे. ‘गुन्हेगारांच्या मागावर’ हे दुर्लभ पुस्तक त्या विषयावरचे मराठीतील पहिले पुस्तक असावे. पण ‘कस्टमला झुकांडी’ हे पुस्तक म्हणजे समुद्रमार्गे भारतात होणाऱ्या तस्करीची आरंभापासून सर्वागीण बाजूने घेतलेली झडती आहे. फोर्टमधील पदपथांवरील पुस्तकविक्रेत्यांकडे सापडलेले हे पुस्तक त्यांच्या मृत्युपश्चात प्रकाशित झाले आहे.
साठच्या दशकात मुंबई कस्टम्समध्ये बरीच वर्षे अधिकारपदावर असलेल्या द. ग. मुगवे यांनी त्या काळात चोरटय़ा आयातीविरुद्ध अनेक मोहिमांत भाग घेतला होता. समुद्र मार्गाने, हवाई मार्गाने, जमिनीवरून येणारे सोने, हिरे, चांदी, उंची घडय़ाळे त्यांनी जप्त केली होती. या सगळ्यांतील प्रत्येक प्रसंग वैशिष्टय़पूर्ण होता. प्रत्येकातील नाटय़ वेगळे होते. हे नाटय़ मुगवे यांनी शिरधनकर यांना सांगितले. ते शिरधनकर यांनी शब्दांकित करून मासिकामध्ये प्रकाशित केले असावे. आणीबाणीच्या काळात पुस्तकाचा विषय मागे पडला आणि थेट शिरधनकरांच्या मृत्यूनंतरच हे पुस्तक ऑगस्ट १९७८ साली प्रकाशित झाले.
या पुस्तकाचा प्रकाशनकाळ पाहिला तर मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान याच्या आयुष्यावर ‘दीवार’ हा चित्रपट बनवून हिंदी चित्रसृष्टीने अँग्री यंग नायक जन्माला घातला होता. गुन्हेगारी जगतातील चोरी- स्मगलिंग यांच्या कारवाया सिनेमाच्या प्रेक्षकासाठी नव्या होत्या. आणि त्यांना या क्षेत्राविषयी अधिकाधिक कुतूहल दाटून आले होते. मराठीतील रहस्यकथा प्रचंड जोमात आल्या होत्या. गुरुनाथ नाईक, शरश्चंद्र वािळबे यांच्यानंतर गुन्हेलेखकांची नवी फळी तयार झाली आणि तिने मुंबई अंडरवर्ल्डमधील किश्शांना आपल्या कादंबऱ्यांमधून आणायला सुरुवात केली.
द. ग. मुगवे यांना या पुस्तकात एखाद्या सिनेनायकाच्या थाटात शिरधनकरांनी सादर केले आहे. मात्र तरीही हा नुसता मुगवे गौरवग्रंथ राहिलेला नाही, तर संपूर्ण भारतभर समुद्रमार्गे चालणाऱ्या तस्करीचे अंतरंग त्यातून समोर आले आहे. यातील एक भाषिक वैशिष्टय़ म्हणजे संपूर्ण पुस्तकात स्मगलिंग आणि तस्करीला शिरधनकर यांनी ‘दांडचोरी’ असा शब्द वापरला आहे. दांडावरून चालणारी चोरी म्हणून ‘दांडचोरी’ हा त्यांनीच तयार केलेला शब्द असावा. यातले कित्येक तपशील हे जाणकार अधिकारी आणि शिरधनकर यांच्या अभ्यास, निरीक्षण आणि संशोधनातून आले आहेत. भारतातील स्मगलिंगचा आद्यइतिहास म्हणून महत्त्व असलेले हे पुस्तक आज कुठल्याही लायब्ररीमध्ये उपलब्ध नाही, ही विचित्रच बाब म्हणावी लागेल.
या पुस्तकात शिरधनकर यांनी नमूद केले आहे की, १९४७ पर्यंत दांडचोरी (तस्करी) फारशी अस्तित्वात नव्हती. दांडचोरीचा उगम दारूबंदीतून झालेला दिसतो. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला, तरी पश्चिम किनाऱ्यावरील दीव, गोवा, दमण यांसारखी काही ठिकाणे पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. दारूबंदीच्या कायद्यानंतर दमणहून परदेशी दारू चोरटय़ा मार्गाने भारतात येऊ लागली. पैसेवाले लोक दमणच्या दारूवाल्यांशी संगनमत करून येथील कोळी लोकांशी त्यांची ओळख करून देत. वेसावा, मढ वगैरे मुंबईनजीकच्या भागातून हे कोळी मचवे घेऊन दमणला जात. तिथे दारूच्या पेटय़ा भरत. त्या मग चौपाटी, ब्रिचकँडी, वरळी अशा ठिकाणी आणून उतरवीत. हळूहळू परदेशी दारूच्या जोडीने घडय़ाळे, कापड, चैनीच्या वस्तू, कॉस्मॅटिक्स, औषधे वगैरे परदेशी मालाची चोरटी आयात होऊ लागली आणि त्यातूनच पुढे सोन्याचा चोरटा व्यापार सुरू झाला.
या सोन्याच्या व्यापाराची दुबईपासून भारताकडे येणाऱ्या १२०० मैलांच्या समुद्री अंतरामध्ये सुरू झालेली दांडचोरी आणि तिचे अतिसूक्ष्म तपशील येथे देण्यात आले आहेत. म्हणजे हा व्यवहार चालतो कसा, त्यात गुंतलेले लोक स्थानिक मच्छीमारांची मदत घेऊन सोने आणतात कसे, त्यांच्यात चालणारा संवाद आणि कस्टमला चुकवण्यासाठी कोणत्या क्लृप्त्या वापरतात यांची खरीखुरी माहिती येथे दिसते. मुगवे, इतर कस्टम अधिकारी, शिरधनकर यांच्या ताफ्यात असलेले हक्काचे कोळी बांधव या सर्व सूत्रांकडून त्यांनी स्मगिलगबाबतची मिळेल तितकी माहिती काढून घेतली आहे. खबऱ्यांना मिळणाऱ्या पकडलेल्या मालातील साडेसात टक्के बक्षिसीमुळे एका साधारण कोळ्याला साडेसहा लाख रुपयांची रक्कम मिळाल्याचा (१९६०च्या दशकात) उल्लेख एके ठिकाणी येतो.
या पुस्तकातील प्रत्येक धाडीची कहाणी अत्यंत बारकाईने रंगविलेली आहे. वाचकाला पकडून ठेवण्याचे कसब शिरधनकरांच्या लेखणीत होतेच. मात्र त्याला दांडचोरीबाबतच्या सर्वच तपशीलांनी समृद्ध करण्याचा विडा येथे त्यांनी उचललेला दिसतो.
या पुस्तकातील काही तपशील आजच्या काळात आणखीनच रंजक किंवा अतिमहत्त्वाचे वाटू शकणारे आहेत. हिरेव्यापारी, हिरेचोर आणि निष्णात तस्करांची खरीखुरी नामावळच या पुस्तकांत पाहायला मिळते. सिंगापूरमधून भारतात होणाऱ्या तस्करीचे एक प्रकरण यात आले आहे. सामान्य व्यक्तींना, कुटुंबांना आपले कॅरियर बनवून गुजराती तस्कर मुंबईत निर्धोकपणे हिरे पाठवत असत. त्यातील एका प्रकरणात कस्टमच्या अधिकाऱ्यांच्या धाडीत एक कुटुंब पकडले गेले. त्यांना पकडल्यानंतर हिरेतस्करांना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा लावला. सापळ्यात अडकलेल्या धेंडांचे धागेदोरे थेट परदेशात वास्तव्य करणाऱ्या सुपरिचित नावाच्या गुजरात्यापर्यंत पोहोचले.
इथे शिरधनकरांनी लिहिले आहे की, ‘पकडलेल्या गुजरात्यांची नावे होती शेवंतीलाल शहा आणि कांतीलाल. शेवंतीलाल हादरून गेला आणि हिरे सिंगापूरच्या केशवलाल मोदीने दिल्याचे पुढे आले.’ दुसऱ्या एका लेखात हाच धागा विस्तारण्यात आला आहे. ‘कस्टम खात्याला संशय होता की, मुंबईच्या विठ्ठलभाई पटेल रोडवरील प्रभुनिवासमध्ये राहणारा पोपटलाल मोदी हा हिऱ्याची दांडचोरी करतो. या पोपट मोदीसोबत रतिलाल म्हणून आणखी एक गुप्त नाव पुढे येत असते. तो हाँगकाँगमध्ये राहतो. भारतात त्याचा मोहनलाल नावाचा आणखी एक भागीदार आहे.’
या पुस्तकात सुप्रसिद्ध नामावळीच्या योगायोगाची गंमत वाटते तितकीच स्वातंत्र्योत्तर काळात देशात विकसित झालेल्या दांडचोरीची आपणास अज्ञात असलेली अनेक रूपे उलगडून दाखविली जातात.
साहित्याची शोकांतिका…
या लेखासाठी तपशील गोळा करताना अनेक वाचनालयांमध्ये शिरधनकरांची पुस्तके माहिती नाहीत म्हणून धूळ खात पडली असल्याचे लक्षात आले. काही पन्नास ते साठच्या दशकात आलेली पुस्तके आज मिळत नाहीत. तर काही फार तर चारेक वर्षे जगतील इतकी जुनी झाली आहेत. ती एकदा संपली की या लेखकाचे महत्त्वाचे आणि आजही ताजे वाटणारे लेखन कधीच वाचायला मिळणार नाही.
प्रत्येक लेखक एका काळापुरता असतो. त्या काळाची झाडाझडती घेऊन तो आपल्या पश्चात उरलेल्या ग्रंथांद्वारे फारतर पन्नासेक वर्षे स्मृतीत राहतो. जगभरात या न्याय-नियमानेच साहित्यिक विस्मृतीत जात आले आहेत.
आपल्याकडे मात्र हा नियम काहीसे उफराटे वळण घेतो. साहित्य वाचण्याचे संस्कार करणारी समीक्षकांची भरभक्कम यंत्रणा पुन्हा पुन्हा पुलं, नेमाडे किंवा वपु, जीए, माडगूळकर, गाडगीळ यांच्या काळानंतर सर्वोत्तम काही आलेच नाही, यावर ठाम असतात. पण या काळातल्या इतर सर्वोत्तमांचा पाठपुरावा घेण्याचे सुचवत नाहीत.
विद्यापीठांत लावलेली पुस्तकेही वाचण्याची तसदी प्राध्यापकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत कुणी घेताना दिसत नाही. सध्या वाचनालयांमधील घटत्या वाचकसंख्येने मागणी नसलेल्या लेखकांना हद्दपार करण्याचा प्रकार सुरू झाला आहे.
शिरधनकरांच्या सध्या अनुवादित झालेल्या दोन पुस्तकांच्या जीर्णोद्धारामुळे त्यांच्या स्वतंत्र साहित्याकडे वळणारा वाचकांचा नवा वर्ग तयार झाला, तर या पुस्तकांचे पुनर्प्रकाशन सार्थकी लागू शकेल. प्रत्येक विषयावरचे मराठीतील पहिले पुस्तक लिहिणाऱ्या शिरधनकरांनी १९७० साली ‘एसएससीनंतरच्या वाटा’ नावाचे विद्यार्थ्यांना उपयुक्त पुस्तकही लिहिले होते. आज त्यांच्या छायाचित्रापासून ते व्यक्तिगत माहितीची अनुपलब्धी ही मराठी साहित्यातील ढळढळीत शोकांतिका आहे.
केवळ अनास्थेमुळे, चांगली असूनही पुस्तकांच्या दुसऱ्या आवृत्त्या न काढल्या जाण्याच्या प्रकाशन संस्थांच्या भूमिकांमुळे जुन्यातील चांगल्या लेखकांची पुस्तके दर वर्षी मरत आहेत.
शिरधनकरांचे साहित्यधन यापासून आणखी किती काळ वाचते, ते पाहण्यापलीकडे सध्या तरी काहीच करता येण्यासारखे नाही.