बॉम्बे आर्ट सोसायटी म्हणजे आशिया खंडातील सर्वात जुनी कला संस्था. खरे तर यापेक्षाही जुन्या दोन संस्था एक कोलकात्यामध्ये व एक पुण्यात अस्तित्वात होत्या. पण आजवर तग धरून असलेली बॉम्बे आर्ट सोसायटी हीच एकमेव सर्वात जुनी संस्था राहिली आहे. मधली काही वष्रे वगळता या आर्ट सोसायटीने आजवर १२५ प्रदर्शने केली.  या प्रदर्शनांमधून सुवर्णपदक किंवा गव्हर्नर्स मेडल मिळणे हा या देशात अनेक वष्रे मानाचा पुरस्कार होता. आजही त्याला महत्त्व आहेच, पण आता आजूबाजूला उभ्या राहिलेल्या खासगी गॅलरी, चित्रकलेच्या क्षेत्रात अर्थकारणाला आलेले महत्त्व, कलाबाजारपेठ आणि लिलाव यामुळे या क्षेत्रातील परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे.  साहजिकच त्याचा परिणाम कला संस्थांवरही झाला आहे.  असे असले तरी कलेच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचा प्रवाह म्हणून याची दखल घ्यावीच लागते. विशेष म्हणजे अगदी पहिल्या प्रदर्शनापासून ते १९६० पर्यंतचा म्हणजे खासगी गॅलरींच्या उदयापूर्वीपर्यंतचा इतिहास किंवा त्या काळातील ऐतिहासिक बदल इथे निश्चितच पाहायला मिळतात. बॉम्बे आर्ट सोसायटी आज काय करते किंवा आज या सोसायटीचे महत्त्व किती व कसे, या प्रश्नावर काही जणांचे मतभेद असू शकतात, पण या आर्ट सोसायटीने केलेले आजवरचे काम दुर्लक्षून चालणार नाही. किंबहुना भारताचा एक मोठा कालखंड या आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनातून समांतरपणे उभा राहताना पाहता येतो. म्हणून हे प्रदर्शन महत्त्वाचे आहे. आजवर विविध विभागांमध्ये सर्वोच्च पुरस्कार मिळालेली चित्रे किंवा मग त्यांच्या िपट्र्स या प्रदर्शनाच्या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. हे प्रदर्शन मुंबईतील छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयासमोर असलेल्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात (एनजीएमए) सुरू आहे.

हे प्रदर्शन भरविणे हाच खूप मोठा खटाटोप होता, हे प्रदर्शनासाठी विशेष मेहनत घेणारे प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांच्याशी संवाद साधल्यानंतर लक्षात येते. सव्वाशे वर्षांच्या प्रदर्शनातील मूळ चित्रे मिळविणे किंवा अनेकांच्या बाबतीत त्यांच्या िपट्र्स मिळविणे हेही मोठेच लक्ष्य होते. राज्याचे माजी कला संचालक बाबूराव सडवेलकर यांनी बॉम्बे आर्ट सोसायटीच्या शंभराव्या प्रदर्शनाच्या निमित्ताने खूप मेहनत घेतली होती, त्याही वेळेस आपल्याकडे असलेली दस्तावेजीकरणाची अनास्था समोर आली होती. आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळेच आर्ट सोसायटीने विशेष प्रयत्न घेऊन सादर केलेले हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरते. पुन्हा ही सर्व चित्रे एकत्र केव्हा पाहायला मिळतील, याचा अंदाज बांधणेही कठीण आहे. शिवाय आताशा वाढत चाललेल्या नियम, अटी-शर्ती यांच्यामुळे चित्रे प्रदर्शनासाठी मिळणेही मुश्कील झाले आहे. भारतीय चित्रइतिहासाला प्रसिद्ध चित्रकर्ती अमृता शेरगिल यांच्या ज्या चित्रामुळे कलाटणी मिळाली व पुढचा कलाप्रवास वेगळा झाला, ते चित्र सध्या दिल्ली येथे एनजीएमएच्याच अधिकारात व अखत्यारीत आहे. पण एनजीएमएच्याच सहकार्याने होणाऱ्या प्रदर्शनासाठीही ते मिळणे मुश्कील झाल्याने त्याचीही िपट्रच पाहण्यावर रसिकांना समाधान मानावे लागणार आहे. यावरून या प्रदर्शनासाठी घ्याव्या लागलेल्या कष्टांची कल्पना यावी. तरीही महाराष्ट्र शासनाने या प्रदर्शनाचा भार बराच हलका केला आहे. शासकीय संग्रहालयातील चित्रे, तसेच जेजेमधील चित्रे शासनाने स्वखर्चाने इथे देऊ केली. अन्यथा त्याच्याही िपट्रस् पाहण्याची वेळ रसिकांवर आली असती.

pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
central government decision on classical languages in october 2024
संविधानभान : अभिजात भाषा म्हणजे काय?
Seven stalled projects on track soon speed up land acquisition process in five projects
रखडलेले सात प्रकल्प लवकरच मार्गी, पाच प्रकल्पांतील भूसंपादन प्रक्रियेला वेग
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!

दस्तावेजीकरणाची जी अनास्था आपल्याकडे संस्थात्मक पातळीवर आहे, त्याच्याहीपेक्षा अधिक भीषण अवस्था कलाकारांच्या कुटुंबांच्या पातळीवर आहे. त्याचाही प्रत्यय या प्रदर्शनाच्या आयोजनादरम्यान आला.  म्हणूनच या सर्व दिव्यांतून पार पडत साकारलेले हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरते.

१९ फेब्रुवारी १८८९ रोजी सोसायटीचे प्रदर्शन पार पडले. सुरुवातीच्या काही प्रदर्शनांमध्ये राजा रविवर्मा यांची चित्रे प्रदíशत झाली होती. त्याला पुरस्कार मिळाला नाही. मात्र त्याची विशेष चर्चा झाली. यातील दमयंती हे मूळ चित्र प्रदर्शनात आहे. याच प्रदर्शनात पेस्तनजी बोमनजी यांचाही रविवर्मांसोबत गौरव झाले, त्यांचे पारसी गर्ल हे चित्रेही इथे आहे. आजूबाजूला होणाऱ्या घडामोडींचा प्रभाव तत्कालीन चित्रकारांवर कसा पडत होता, त्याचा प्रत्यय इथे घेता येतो. म्हणजे तत्कालीन इंग्लंड आणि फ्रान्समधील कला चळवळीचा इथे होणारा परिणाम त्या वेळेस आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळत होता. कारण एरवी इतरत्र कला प्रदíशत करण्याची संधी चित्रकारांना फारशी उपलब्ध नव्हती. सुरुवातीस मनुष्याकृतीप्रधान चित्रांना मिळालेले प्राधान्य नंतर १९१० च्या सुमारास जे. पी. गांगुली यांच्या सीस्केपच्या निमित्ताने बदललेले दिसते. संपूर्ण प्रदर्शन बारकाने पाहिले तर असे लक्षात येईल की, काही चित्रकारांना सलग दोन किंवा तीन वष्रे पुरस्कार मिळाले आहेत. १८९४ पासून सोसायटीने सुवर्णपदक देण्यास सुरुवात केली, त्या वेळेस दुसरे सुवर्णपदक प्राप्त केलेल्या एम. व्ही. धुरंधर यांची चित्रेही प्रदर्शनात आहेत. गणपतराव म्हात्रे यांचे मंदिरपथगामिनी हे गाजलेले शिल्पही इथे आहे. मात्र शिल्पकृतींच्या बाबतीत काही गाजलेल्या व वैविध्यपूर्ण शिल्पकृतींच्या बाबतीत केवळ िपट्र्सवरच तहान भागवावी लागते, याची खंत आहे. अनेक पुरस्कार सुरुवातीच्या काळात इंग्रज चित्रकारांनी मिळवलेले दिसतात. यातील मेरी हेंडरसन यांचे १९३४ साली सुवर्णपदकप्राप्त चित्र हे न्यूड आहे. आज अशा चित्रांवरून गदारोळ किंवा वाद होऊ शकतो. न्यूड प्रदíशत करताना चित्रकार शंभर वेळा विचार करतात. १९३४ च्या या चित्रावरून यावरून तत्कालीन समाजाची चित्रविषयक अभिरुची कशी होती, तेही लक्षात येते.

१९ व्या शतकाच्या पूर्वार्धातच सुरू झालेली भारतीय कलेच्या पुनरुज्जीवनाच्या चळवळीचे प्रतििबबही इथे आर्ट सोसायटीमधील पुरस्कारप्राप्त चित्रांमध्ये दिसते. त्यातील जी. एच. नगरकर यांचे लघुचित्रशैलीतील मात्र बंगाली प्रभाव घेऊन आलेले मूळ चित्र प्रदर्शनात आहे. याशिवाय ए. एक्स. ित्रदाद, ए. एच. मुल्लर यांचीही प्रसिद्ध चित्र इथे आहेत. हे चित्रेतिहासातील मलांचे दगड आहेत. एक काळ असा आला की, ज्यात सामान्य माणूस आणि सामाजिक जीवन अधिक प्रतििबबित झालेले दिसते. त्यात शिल्पकार र. कृ. फडके यांचे प्रवचन हे शिल्प आहे, त्याची केवळ िपट्र उपलब्ध आहे. एस. एल. हळदणकरांचे मोहमेडन पिलग्रिम आहे. चित्रकलेमध्येही इतर क्षेत्रांप्रमाणे विविध लाटा येतात, जातात, पुन्हा येतात. सामान्य जनांच्या चित्रणाच्या बाबतीत व अशा चित्रांना पुरस्कार मिळण्याच्या बाबतीत अशा लाटा दोनदा आल्या असे प्रदर्शनातील चित्रांतून दिसते. बॉम्बे रिव्हायवलिस्ट, प्रोग्रेसिव्ह आर्टस्टि ग्रुप यांची चढती कमान, तिचा प्रभाव असलेली वष्रे इथे अधोरेखित होतात. विशेष जाणवणारी बाब म्हणजे १९६० नंतरच्या अनेक कलाकारांची पुरस्कारप्राप्त मूळ चित्रे उपलब्ध झाली नाहीत. दस्तावेजीकरणाच्या बाबतीत आपल्याकडे असलेली उदासीनता यानिमित्ताने पुन्हा समोर येते. १९६० नंतरच्या काळात अमूर्त शैलीने ठाव घेतलेला दिसतो, तर नंतरच्या काळात आलेल्या व्यावसायिकतेमुळे या क्षेत्रात खूप बदल झाले. पण ते सर्वच या पुरस्कारप्राप्त चित्रांतून जाणवतीलच असे नाही. किंबहुना ते नसण्याची शक्यताच अधिक असेल. पण तरीही आजदेखील देशाच्या कानाकोपऱ्यांत असलेल्या अनेक कलावंतांसाठी बॉम्बे आर्ट सोसायटीचा पुरस्कार महत्त्वाचाच आहे. इतर क्षेत्रांमध्ये शहरांबरोबरच गावांतून येणारा सहभाग वाढलेला दिसतो तसाच तो बॉम्बे आर्ट सोसायटीच्या बाबतीतही पाहायला मिळतो. त्यामुळे शहरातील पेज थ्री संस्कृतीतील प्रथितयश व काही प्रयोगशील चित्रकार नंतर सोसायटीपासून दूर गेलेले असले तरी गावागावांतील चित्रकार या प्रदर्शनात सहभागी होताना दिसतात.

चित्रकलेचा इतिहास म्हणून आपण या चित्रांकडे पाहतो, त्या वेळेस एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे चित्रकलेच्या क्षेत्राला कलाटणी देण्याचे काम सोसायटीतील काही चित्रांनी केले. त्याचे चित्रकाराचे जेवढे श्रेय आहे तेवढेच श्रेय अधिक मोठा आवाका ठेवून त्या चित्राची निवड करणाऱ्या परीक्षकांनाही जाते. अमृता शेरगिल यांच्या चित्राची निवड झाली त्या वेळेस ती करणारे परीक्षक कोण होते, याचा तपशील बरेच काही सांगून जाणारा असतो. त्यामुळे कदाचित त्या त्या वेळच्या कलेतिहासावर वेगळा प्रकाशझोतही पडू शकतो. किंबहुना तसा वेगळा विचार व्हायला हवा. या प्रदर्शनाच्या निमित्ताने ‘बॉम्बे आर्ट सोसायटी इतिहास आणि वाटचाल भाग पहिला’ प्रकाशित करण्यात आला आहे. हे प्रदर्शन मार्चअखेपर्यंत सुरू राहणार असून त्यात दुसरा भागही प्रकाशित होणार आहे, असे समजते. या भागात याचा आढावा आहे किंवा नाही याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र कलेतिहासाच्या दृष्टीने या चित्रांची निवड करणारी मंडळी कोण होती, या प्रश्नालाही तेवढेच महत्त्व आहे. असो, असे असले तरी हे प्रदर्शन आवर्जून पाहावे असेच आहे.
विनायक परब –