मंडालेच्या तुरुंगात बंदिवासात असताना लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्य’ हा गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचे हे शताब्दी वर्ष. त्यानिमित्ताने रत्नागिरी येथे अलीकडेच एक कार्यक्रम झाला. त्याचा वृत्तान्त–
‘गीतारहस्य’ जन्मशताब्दीनिमित्त रत्नागिरी येथील ‘गीताभवन’ येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व गीताभवन यांच्या वतीने अलीकडेच एक अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. राजाभाऊ लिमये व डॉ. सुरेश जोशी यांच्या अथक परिश्रमामुळेच हा कार्यक्रम होऊ शकला.
गीता ही निवृत्तिमार्ग सांगणारी आहे, या विचाराचे खंडन करण्यासाठी या ग्रंथाचा जन्म आहे. खरे तर या ग्रंथाच्या शताब्दीची दखल सरकारी पातळीवर घेतली जाणे अपेक्षित होते, पण ती घेतली गेली नाही याची खंत आहे; पण राजाभाऊ लिमये (रत्नागिरी) व डॉ. सुरेश जोशी (देवरुख) या दोघांनी त्याची दखल घेतली आणि लोकमान्य टिळकांच्या जन्मगावी (रत्नागिरी जिल्ह्य़ात) हा कार्यक्रम घडवून आणला. हल्ली अशा उद्बोधनपर कार्यक्रमाला लोकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही; पण या कार्यक्रमाला दोन्ही दिवस १००–१५० च्या संख्येने उपस्थित राहून लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला व कार्यक्रमाचा आस्वाद घेतला यातच कार्यक्रमाचे यश आहे.
डॉ. सदानंद मोरे या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आले होते. त्याचबरोबर श्रीराम शिधये, डॉ. कल्याण काळे, डॉ. शं. वा. तळघट्टी, डॉ. धनंजय चितळे, डॉ. विद्याधर करंदीकर व प्रतिभा बिवलकर यांनी ‘गीतारहस्य’शी निगडित विविध विषयांवर निबंध वाचले. पंचांगकर्ते दा. कृ. सोमण हे समारोपाच्या कार्यक्रमासाठी आले होते. डॉ. मधु मंगेश कर्णिक अध्यक्षस्थानी होते.
डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या बीजभाषणात ‘गीतारहस्या’च्या संदर्भात संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व लोकमान्य टिळक हे चार प्रातिनिधिक पुरुष ठरतात, असे प्रतिपादन केले. यातील प्रत्येकाने आपापल्या बौद्धिक, शारीरिक व प्राप्त परिस्थितीनुसार आयुष्यात गीता जगून दाखविली. अनेक त्रुटींवर मात करत, संकटांना तोंड देत या चौघांनी आपापले ध्येय साध्य केले.
ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ लिहून गीतेतील कर्मप्रेरणा तळागाळात पोहोचविण्याचा सार्थ प्रयत्न केला, तोही किती लहान वयात, किती विरोधाला तोंड देऊन; पण त्या दु:खाचा चुकूनही उल्लेख ‘ज्ञानेश्वरी’त नाही. छत्रपती शिवाजी महाराज तर कर्मप्रवणच होते. संत रामदासांच्या साहाय्याने आयुष्याला चांगले वळण देऊन सर्वधर्मसमभाव खऱ्या अर्थाने त्यांनी जपला. शेवटपर्यंत ते कर्मप्रवणच होते. महात्मा फुले यांचे कार्य तर सर्वश्रुत आहेच. आज त्याच कार्याचे फळ म्हणून सर्व क्षेत्रांत स्त्रिया आघाडीवर दिसतात. लोकमान्य टिळक यांच्याबद्दल काय लिहावे? आज ‘गीतारहस्य’ व त्यांच्या इतर पुस्तकांचा नवेपणा शंभर वर्षांनंतरही गेलेला नाही. ‘ज्ञानेश्वरी’ हा जसा पहिला आदर्श पद्यग्रंथ तसा ‘गीतारहस्य’ हा पहिला आदर्श गद्यग्रंथ, असे मोरे यांनी सांगितले. म्हणून लोकमान्य टिळकांनी या पुस्तकाची किंमत सर्वाना परवडेल अशी तीन रुपये ठेवून पहिला ग्रंथ कसबा गणपतीला, पंढरपूरच्या विठोबाला व अण्णासाहेब पटवर्धन यांना दिला.
पारंपरिक व आधुनिक अशा दोन्ही पद्धतींचा अवलंब करणारा हा ग्रंथ आहे. प्रवृत्तिधर्म जर निष्काम मार्गाने आचरला, तर नक्कीच चित्तशुद्धी होऊन ज्ञानप्राप्ती होते, असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. टिळकांच्या दृष्टीने लोकसंग्रह हा केंद्रस्थानी होता. ‘निष्काम कर्मयोग’ हा शब्द संत तुकारामांनी प्रथम वापरला. ‘गीता’ हे नीतिशास्त्र आहे आणि सर्वानी नीतिनियमांप्रमाणे कसे वागावे त्यासाठी हा ग्रंथ मार्गदर्शक आहे.
या कार्यक्रमात प्रथम श्रीराम शिधये यांनी ‘लोकमान्य टिळक व गीता’ या विषयावर निबंधवाचन केले. अध्यात्माकडे पाहण्याच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे भारतीय संस्कृतीचा– मानवतेचा ऱ्हास होतो आहे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर निर्हेतुक कर्म पापाकडे नेत नाही. पापाचरणाला एक उद्देश असतो. त्यांनी राजा दिलीपाचे एक वाक्य उद्धृत केले की, ‘‘माझ्यासारखे पुरुषही कधी तरी नाश पावणाऱ्या या भौतिक देहाविषयी आस्था बाळगून असतात.’’ मग आपल्यासारख्या सामान्यांची काय कथा?
त्यानंतर डॉ. शं. वा. तळघट्टी यांनी ‘आद्य शंकराचार्य व लोकमान्य टिळक’ या विषयावर निबंध वाचला. तत्त्वज्ञानाचा संबंध व्यक्ती व त्यांनी बनलेला समाज यांच्याशी असतो. त्यांनी पुढे असे सांगितले की, टिळक कर्मयोगी, आद्य शंकराचार्य ज्ञानयोगी व संत ज्ञानेश्वर भक्तियोगी होते व त्यांनी तसे तसे लिखाण केले. परोक्ष ज्ञानाची अपरोक्ष अनुभूती येण्यासाठी ज्ञान व भक्तीची गरज असते. ‘‘आधी करावे कर्म। मग उपासना। उपासनामार्गे धर्म। धर्म मोक्षास पाववी।’’
त्यानंतर डॉ. कल्याण काळे यांनी ‘कर्मविपाक व कर्म सिद्धांत’ या विषयावरील आपला निबंध वाचला. कर्म, अकर्म व विकर्म असे कर्माचे तीन प्रकार आहेत. त्याचबरोबर नित्य, नैमित्तिक, काम्य व त्याज्य असेही कर्माचे प्रकार आहेत. मनुष्य आपल्या मनुष्यजन्मात केलेल्या चांगल्या–वाईट कर्माची फळे नंतर अनेक मनुष्यजन्म भोगत असतो; पण साधना अपूर्ण राहिली, तर नंतर लगेचच्या जन्मात ती साधना पूर्ण करण्याजोग्या वातावरणात तो जन्म घेतो. ‘‘शुचिनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽऽ भिजायते।’’
पण तरीही माणसाची जबरदस्त इच्छाशक्ती व प्रयत्न यामुळे प्राक्तन बदलू शकते. या कर्मफळालाच संसार, प्रकृती, माया या नावांनी ओळखले जाते. त्यात बदल करण्याचा अधिकार कोणालाच नाही.
दुसऱ्या दिवशीच्या सत्रात प्रथम डॉ. धनंजय चितळे यांनी ‘गीतारहस्यातून दिसणारे टिळक’ या विषयावर निबंध वाचला. लोकांची मूळ शंका अशी की, अर्जुनाने निवृत्तीतून लढाई करण्याचे ठरवले, मग त्याला मोक्ष कसा मिळेल? कारण आपली एक चुकीची समजूत आहे की, मोक्ष हवा असेल, तर निष्क्रिय व्हावयास हवे; पण तसे कुठेच अपेक्षित नाही. कर्म करणे अत्यावश्यक आहे आणि ते कौशल्याने करणे म्हणजे ‘योग’ आणि ते कर्म कसे करावे ते सांगण्यासाठी ‘गीतारहस्य’. आपण एक तर आमच्या वेद, उपनिषदात सर्व आधीच सांगितलेले आहे, असे सांगून मोठेपणा मिळवणार किंवा पाश्चात्त्यांच्या ओंजळीने पाणी पिणार. हे दोन्ही नको. त्याऐवजी कर्मकर्तृत्व करा हे सांगण्यासाठी ‘गीतारहस्य’.
त्यानंतर प्रतिभा बिवलकर यांनी ‘गीतारहस्य एक कर्मयोगशास्त्र’ या विषयावर आपला निबंध वाचला. सर्वसामान्यपणे गृहस्थाश्रमात राहणाऱ्या सर्वानाच हा निबंध उद्बोधक ठरेल असा होता. कर्माचे फल पुढील पाच गोष्टींवर अवलंबून असते, असे त्यांनी सांगितले. १) कर्माचा उद्देश २) कर्माचे चिंतन ३) कर्म करण्याची पद्धती ४) कर्माचा परिणाम ५) कर्म करतानाची परिस्थिती. ‘गीतारहस्य’ हे संसारशास्त्र आहे, असे त्यांनी सांगितले. संसारात विविध कर्मे करताना जी कौशल्ये वापरतो तोच कर्मयोग. अति काय आणि नेमस्त काय ते ठरविणे कठीण असते. आपली कामावरील निष्ठा सर्वात महत्त्वाची, त्यानेच प्रतिष्ठा मिळते.
त्यानंतर डॉ. विद्याधर करंदीकर यांनी ‘गीतारहस्यातील पुरुषार्थ विचार आणि वर्णाश्रम विचार’ यावर निबंध वाचला. त्यात त्यांनी म्हटले की, पुरुष ज्याची इच्छा करतात तो पुरुषार्थ. समाजधारणेसाठी ज्या चौकटी आहेत त्यात कर्मयोग आहे. कोणत्याही काळात मुलगी व्हावी, ही मागणी नसे, तर समर्थ– बलवान मुलाचीच मागणी होत असे. धर्म हा कर्तव्यनियमांशी जोडलेला आहे. धर्मनियम पाळले जात नाहीत तेव्हा युद्ध होते. ‘गीतारहस्या’त लो. टिळकांनी कालसुसंगत विधाने केलेली आहेत; पण काळ कोणताही असला तरी नीतिनियम सोडून वागणे हे विसंगतच ठरते. समृद्ध गृहस्थाश्रमावरच देश मोठा होतो. यज्ञ – तप – दान या कृत्यांना गृहस्थाश्रम बळ पुरवतो म्हणून गृहस्थाश्रम हा सागर व इतर आश्रम हे नद्या, असे त्यांनी म्हटले.
यानंतर दा. कृ. सोमण यांनी आपल्या भाषणात या सर्व निबंधांचा आढावा घेतला. त्यांनीही तेच सांगितले की, निवृत्तीसाठी गीता सांगितली नाही, तर तू क्षत्रिय आहेस. तेव्हा तुला लढलेच पाहिजे. तेव्हा गीता प्रवृत्तीपरच आहे. मग हळूहळू निवृत्तीकडे कसे जायचे ते ‘गीता’ व ‘गीतारहस्य’ यांच्या सखोल अभ्यासातून कळते. कौशल्याने कर्म करणे म्हणजे योग. फलाशा न ठेवता कर्म करणे महत्त्वाचे. आसक्ती हे सर्व दु:खांचे मूळ आहे. आज कर्मयोग विसरल्याने आपली अशी अवस्था झाली आहे.
त्यानंतर अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांचे भाषण होऊन कार्यक्रम संपला.