पूर्वी जात्यावर दळताना ओव्या सुचायच्या व त्या म्हणता-म्हणता कधी दळण संपायचे ते कळायचे नाही. एकत्र कुटुंबाकरता दिवसाला जेवढे पीठ लागायचे तेवढे दळण होऊन पीठ मिळायचे. ती गरज होती. पण आता दूरदर्शनवरच्या मालिका कशाकरता दळण दळत आहेत? आंधळं दळतंय व कुत्रे पीठ खातंय; पण इथे आम्ही प्रेक्षक आहोत आणि आम्ही डोळस आहोत शिवाय बुद्धी नावाची चीज आहे; तेव्हा मालिकांचे दळण आम्ही सुबुद्ध लोकांनी बघायचे कारणच काय? आदत से मजबूर!
‘होणार सून मी त्या घरची’ मालिका सुरू झाली तेव्हा सर्वाना आवडली होती. हळुहळू प्रेक्षक त्यांत गुंतत गेले व प्रत्येक भागात नवीन काहीतरी बघायला मिळेल आणि गोष्ट पुढे सरकेल, असं वाटायचं! एकदा आठ दिवस न बघण्याचे ठरवले. दळण दळल्यावर पांढरे पीठ (गव्हाचे) पडणार ना? आता त्या अतिपीठाचे काय करायचे? लेखिका, दिग्दर्शक, कलाकार इ. पण कळत नाही, काय करावे बरे! प्रेक्षकांना गोष्ट पुढे सरकली असे वाटतच नाही; त्यामुळे त्याच वेळात दुसरी मालिका बघण्याचा योग येतो. संधी मिळते. प्रेक्षकही हुशार असतात. वाढवा- मालिका उगाच वाढवत राहिलात; तर त्याचा फायदा कोणाला? आर्थिकदृष्टय़ा नाही म्हणत; तर मनोरंजकदृष्टय़ा म्हणते. मनोरंजनाकरता आम्ही मालिका बघतो. त्यात किती पाणी घालाल? डाळ दिशेनाशी झालीच आहे. इतके पचकवणी काहीच आवडत नाही. फालतू मसाला ठासलात; तरी त्याला चव-ढव नसते.
‘पुढचं पाऊल’ स्टार प्रवाह- मराठीवरील मालिका कित्येक वर्षे चालली आहे. आता तर नवनवीन कलाकारांना घेऊन मालिका वाटेल त्या दिशेला वाहते आहे. अक्काबाईंचा पण कंटाळा आला आहे. सगळ्या भानगडींमध्ये नाक खुपसणार व (दादागिरी नाही) अक्कागिरी करणार. तिच्या सूनबाईचा रुपालीची कट-कारस्थाने बघून वीट आला आहे. मला वाटतं लेखकच चक्रम आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यातून/ लेखणांतून असे लेखन येत आहे. कलाकारांनापण कसा कंटाळा येत नाही? तोंड दाबून बुक्क्यांचा मार खातात- पैशांकरता! दोन मुलगे मारले, एक जिवंत केला; तरी पण कहाणीला काही जोर आला नाही. तरी बघते; म्हणून काही मंडळी नावे ठेवतात. काय करणार?
आता ‘खोटे- बोलणे’ पाप वगैरे काही नाही. खोटय़ाच्या पायावर अनेक मालिका सुरू आहेत. पाया भुसभुशीत असल्यावर टिकून राहते; त्यामुळे खोटेपणाच्या पायावर मालिका कशा काय लिहितात व चालतात? शाबासकी कोणाला द्यायची? मला वाटतं कलाकारांना द्यावी. कारण त्यांच्या सौंदर्यामुळे व कामामुळे प्रेक्षक बघतात. ‘का रे दुरावा’मधील आदिती- जय, ‘अस्सं सासर सुरेख बाई’मधील यश-महाजन- जुही नारायण आणि ‘नांदा सौख्य भरे’ यातील स्वानंदी- इंद्रनील या सर्व जोडय़ा योग्य, गोड असल्यामुळे प्रेक्षक त्या खोटय़ा- बोलणाऱ्या मालिकांना झेलता आहेत. एकदा खोटे बोलले की दशदा खोटे बोलावे लागते हा नियमच आहे. एक खोटे लपवण्याकरता दुसरे, तिसरे.. अशी खोटय़ांची मालिकाच तयार होते व खऱ्याचा विसर पडतो. मग काय दाहीदिशांनी मालिका वाढणारच. मग त्या गोष्टीला अर्थ असो वा नसो. ‘टी.आर.पी’ मिळाला की झाले! म्हणजे आम्हा प्रेक्षकांची चूकच आहे ना?
प्रेक्षकांमध्येही गट आहेत. ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या करमणूक (?) मिळते. त्यामुळे त्यांचा कल मालिकांकडे असतो. दिवस कसातरी जातो. पण संध्याकाळपासून दूरदर्शनचा सहारा घ्यावा लागतो. तेव्हा अनुभवी नागरिकांना मनोरंजन होईल, असे दाखवावे. जितक्या वाहिन्या तितक्या मालिका असतात. त्यामुळे काय बघावे, हे आपल्या हातात असते. पण, सर्वच मालिका पहिल्या पाच-सहा भागांनंतर रुळावरून उतरून इकडे-तिकडे पळतात. नाईलाजास्तव आम्ही ज्येष्ठ नागरिक मालिकांना शरण जातो.
निंदकाचे घर असावे शेजारी म्हटले आहे; म्हणून मालिकांच्या दळण्याला नावे ठेवते. पण दोष दाखवूनही मालिका सुधारत नाहीत. तेव्हा ‘जप-नामस्मरण’ करायचे म्हटले तरी किती करणार? तेव्हा कृपा करून आता वर्षभरात मालिका संपेल- असे बघावे. म्हणजे दर्जेदार मालिका तयार होतील. आजकालची तरुण मंडळी वेगवेगळ्या वाटा, वेगवेगळे विषय शोधतात. तेव्हा एखादी चांगली गोष्ट चांगली सुरू करून शेवट चांगला (अर्थपूर्ण) करावा.
रेखा केळकर – response.lokprabha@expressindia.com