लेखन क्षेत्रात करिअर करायचंय, मग मनोरंजन क्षेत्रात जा हे नेहमीचं उत्तर आता विसरा. लेखन आणि प्रवास या दोन्हीची आवड असणाऱ्यांना आता करिअरचं एक नवं दार खुलं झालं आहे; ट्रॅव्हल ब्लॉगिंगचं!
दहावी झाल्यानंतर करिअर कशात करायचं याचा विचार करून कोणत्या शाखेत जायचं हे ठरतं. काहींना बारावी झाल्यानंतर तर काहींना ग्रॅज्युएशननंतर करिअरची आणखी वेगळी वाट दिसू लागते. आवड आणि कौशल्य बघून जो तो आपापल्या आवडीनुसार करिअर निवडतो. पण सध्या या दोनच गोष्टी बघून चालत नाहीत, तर निवडलेल्या करिअरमध्ये आर्थिक स्थैर्य कितपत आहे हेही बघणं आवश्यक असतं. त्यानुसार त्यासंबंधीचे कोर्स, अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरी, व्यवसाय केला जातो. हा झाला करिअर करण्याचा सरळ, साधा मार्ग. पण काहींना काहीतरी वेगळंच सुचत असतं. काहींना प्रस्थापित नोकरीतून विश्रांती घ्यायची असते, तर काहींना त्यांची आवडच त्यांचं करिअर बनवायचं असतं. काहीजण या सगळ्यात वेगळं काही करायचं म्हणून धाडस करतात. तरुणांच्या भाषेत सांगायचं तर रिस्क घेतात आणि ते करूनही दाखवतात. हे अशक्य नक्कीच नाही. पण या वेगळ्या वाटेवर चालण्यासाठी गरज असते ती नियोजन आणि लक्ष केंद्रित करण्याची. सध्याचा जमाना डिजिटल आहे. सोशल साइट्स, वेबपेजेस, अॅप्स ही सगळी करिअरची नवी माध्यमं आहेतच. या माध्यमाचा वापर करून तुमची आवड आणि तुमचं कौशल्य एकत्रितपणे वापरता आलं तर एक उत्तम करिअर घडू शकतं हे सिद्ध केलंय सोनल क्वात्रा पलादिनी या तरुणीने. तिच्या फिरण्याच्या आवडीतून तिने तिचा ‘ड्रिफ्टर प्लॅनेट’ हा ब्लॉग सुरू केला. कमी कालावधीत तिचा ब्लॉग अनेकांपर्यंत पोहोचला आहे. या ब्लॉगमधून विविध देशांची माहिती ती वाचकांना देते.
सोनल मूळची दिल्लीची रहिवासी. सॉफ्टवेअरच्या एका कंपनीमध्ये एचआर विभागात ती नोकरी करत होती. एचआरची नोकरी म्हणजे तशी प्रतिष्ठेची आणि आर्थिकदृष्टय़ा स्थिर असणारी. अनेक र्वष नोकरी केल्यानंतरही सोनलचं मन काहीतरी वेगळं शोधत होतं. तिच्या नोकरीत ती आनंदी होती. पण तरी काहीतरी वेगळं करून पाहायची इच्छा तिला स्वस्थ बसू देईना. फिरणं ही तिची आवड, पॅशन. वेड म्हणूया हवं तर. तिला जगभर फिरायचं होतं. वेगवेगळ्या देशांमधल्या संस्कृती, राहणीमान, भाषा, ट्रेण्ड, खाद्यपदार्थ या सगळ्याचा तिला अनुभव घ्यायचा होता. या सगळ्या अनुभवांचं तिला लेखन करायचं होतं. तिने स्वत:चा ब्लॉग लिहिला. ठरवलं आणि एका झटक्यात हे सगळं अनुभवायला बाहेर पडणं असं तर शक्य नव्हतं. म्हणून तिने शांतपणे या सगळ्याचं नियोजन केलं. ती सांगते, ‘फिरण्याची आवड तर मला आधीपासून होतीच, पण माझी ही आवड मला लेखनाच्या माध्यामातूनही व्यक्त करायची होती. २०१५ मध्ये ऑगस्ट महिन्यापासून मी जिथे फिरायला जाई तिथला अनुभव लिहायला लागले. हाताशी नोकरी होती. ती अशी पटकन सोडली नाही. वर्षभर नोकरी आणि फिरून लिखाण करणं असा दुहेरी अनुभव मी घेतला. या वर्षभरात मी नोकरी करत असल्यामुळे पैशांची बचत केली. देशोदेशी प्रवास करून त्याबद्दल लिहिणं हे साहसी वाटत असलं तरी त्याचं नियोजन करणं तितकंच महत्त्वाचं होतं. त्यामुळे एक वर्ष नोकरी करून फिरण्याचे अनुभव लिहीत होते. दिवसा नोकरी आणि रात्री लेखन करायचे. एक वर्षांनंतर २०१६ च्या जून महिन्यात नोकरी सोडली आणि पूर्ण वेळासाठी ब्लॉगवर लक्ष केंद्रित केलं.’ सोनलने अतिशय नियोजन करून ब्लॉग रायटिंगच तिचं करिअर कसं बनू शकतं याचा विचार केला आहे.
ज्यांच्याकडे लिखाणाचं कौशल्य आहे त्यांच्यासाठी ट्रॅव्हल ब्लॉग रायटिंग म्हणजे ब्लॉगवरील लेखन हे नवं व्यासपीठं खुलं झालं आहे. हे लेखन केवळ हौसेपोटी किंवा छंद आहे म्हणून केलं जायचं, पण आता ते अर्थार्जनाचं माध्यमही झालं आहे. यात करिअर करणाऱ्या इच्छुकांना प्रवास करण्याबद्दल तितकंच वेड असायला हवं. तसंच वेगवेगळ्या ठिकाणी जायची, तिथे तिथल्या राहणीमानाप्रमाणे राहायची तयारी असायला हवी. सोनलच्या ब्लॉगमध्ये केवळ त्या त्या ठिकाणचं प्रवासवर्णन नाही तर त्या जागांची वैशिष्टय़ं, तिथे जाण्याआधीच्या काही टिप्स, आवर्जून पाहावं, खावं अशा गोष्टींची माहिती अशा वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण त्यात वाचायला मिळतं.
सोनल गेल्या वर्षी दहा देशांमध्ये फिरून आली आहे. थायलंड, मलेशिया, फिलिपाइन्स, टर्की, जर्मनी, हंग्री, क्रोएशिआ, पोर्तुगाल, स्पेन, इंडोनेशिआ या देशांचा अनुभव आता सोनलच्या गाठीशी आहे. पुढच्या महिन्यात ती जर्मनीला जाणार आहे. परदेशातील प्रवासावर तिचा जास्त भर आहे. ट्रॅव्हल ब्लॉगर होण्यासाठी सर्वात आधी तुमचं ध्येय निश्चित करणं गरजेचं असतं. तुम्ही देशातील विविध ठिकाणी प्रवास करणार आहात, परदेश फिरणार आहात, देशातील जंगलं फिरणार आहात, समुद्रकिनारे बघणार आहात की सगळंच करणार आहात हे तुम्हाला सगळ्यात आधी ठरवावं लागेल. त्यानुसार तुम्हाला तुमच्या प्रवासाची व्यवस्थितरीत्या आखणी करता येईल. ट्रॅव्हल ब्लॉगर असलात तरी उचलली बॅग आणि निघालात फिरायला; तर असं नाही. यासाठी नियोजन करावे लागते.
ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून करिअर करण्यासाठी विशिष्ट अभ्यासक्रम नाही. त्यासाठी हवी तुमची प्रवास आणि लिखाणाबद्दलची आवड. सोनलची आवड तिला आज बराच अनुभव देते. ‘ड्रिफ्टर प्लॅनर’ या तिच्या ब्लॉग आणि वेबसाइटचं डिझाइनसुद्धा तीच करते. ती याबद्दल सांगते, ‘मी माझ्या ब्लॉग, वेबसाइटचं डिझाइन, सोशल मीडिया प्रमोशन, एखाद्या ठिकाणचे व्हिडीओही मीच करते. हे खरंतर आव्हान आहे. पण हे सगळं मी खूप एन्जॉय करते.’ ट्रॅव्हल ब्लॉगर हे शब्द खूप ग्लॅमरस वाटत असले तरी त्यामागची मेहनत बरीच आहे. विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण करून तुमचा बायोडाटा घेऊन नोकरी मिळवण्यासाठी फिरावं लागत नाही. पण, तुमचं नाव, काम प्रस्थापित करण्यासाठी तुम्हालाच जीवतोड मेहनत घ्यावी लागते. वेगवेगळ्या देशांचे, राज्यांचे परिवहन मंडळ, ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी यांच्यासोबत काम करून अशा ब्लॉगर्सना पैसे कमवता येतात. यातून मिळणारा पैसा व्यक्तिपरत्वे आणि ब्लॉगरने केलेल्या कामानुसार बदलत जातात. आतंरराष्ट्रीय ब्लॉगिंगवर लक्ष केंद्रित करणार असाल तर महिन्याला साधारण ३० ते ४० हजार रुपये इतकी कमाई होऊ शकते. जर देशांतर्गत ब्लॉगिंग करण्याचा विचार करणार असाल तर २० ते ३० हजार रुपये इतके मिळण्यास हरकत नाही. या पैशांमध्ये कमी-जास्त होऊ शकते. तुम्ही तुमच्या ब्लॉगचं जेवढं प्रमोशन कराल तेवढय़ा जाहिराती मिळू शकतात. शिवाय त्यातला मजकूर वाचनीय असावा लागतो. आणि यासाठी तुम्ही जास्तीतजास्त फिरणं आणि तिथल्या आकर्षक गोष्टी, जागा शोधून त्यावर सुंदर लेखन करणं हे तुमच्या हातात असतं. तुम्ही तुमच्या ब्लॉगच्या प्रमोशनसाठी सोशल मीडियाचा वापर उत्तमरीत्या करू शकता. सोनल इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, यूटय़ूब अशा सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवर सक्रिय असते. त्याचा फायदा होत असल्याचं ती सांगते.
ब्लॉगिंग म्हणजे एका जागी बसून लिखाण करणं ही व्याख्या आता बदलायला हवी. खास करून ट्रॅव्हल ब्लॉगिंगसाठी तर नक्कीच. कारण त्यासाठी भरपूर फिरणं आवश्यक असतं. अशा वेळी तुमच्या कुटुंबापासून तुम्ही बराच काळ दूर राहता. त्यामुळे तुमच्या या करिअरमध्ये तुमच्या कुटुंबाचाही पाठिंबा असणं गरजेचं असतं. सोनलचे कुटुंबीय तिच्या नेहमीच पाठीशी होते. तिची फिरण्याची आवड ते जाणतात आणि म्हणूनच त्यांनी तिला नेहमी पाठिंबा दिला आहे. तिचे आई-बाबा दिल्लीमध्ये राहतात. ‘वर्षांतून एकदा दिल्लीत माझ्या आईबाबांना भेटायला येते. तिथे मी साधारण एक महिना तरी राहते. मग माझी भ्रमंती पुन्हा सुरू होते. हे सगळं करताना तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा ठरतो. माझ्या घरच्यांनी मला कधीच कोणती बंधनं घातली नाहीत. ते नेहमीच माझ्या इच्छांना, स्वप्नांना समजून घेतात’, ती सांगते. या करिअरसाठी देशा-परदेशात सतत फिरावं लागणं या गोष्टी तुमच्या घरच्यांनी स्वीकारायला हव्यात. तरच तुमच्या करिअरचा प्रवास सुखाचा होऊ शकतो.
लेखनाची आवड, फिरण्याची इच्छा या दोन्ही गोष्टींची अचूक सांगड म्हणजे ट्रॅव्हल ब्लॉगिंग! योग्य नियोजन, ध्येयनिश्चिती, प्राधान्यक्रम आणि संवादकौशल्य या सगळ्या बाजू जमून आल्या तर ट्रॅव्हल ब्लॉगिंगमध्ये करिअर हिट झालंच म्हणून समजा. ब्लॉगिंग हा केवळ छंद राहिलेला नसून करिअरचंही एक माध्यम झालं आहे. त्यात आणखी नवनवीन प्रयोग करून हे ट्रॅव्हल ब्लॉगिंगचं क्षेत्र करिअरसाठी तुम्ही आणखी आकर्षक बनवू शकता.
लेखन आता अर्थार्जनाचं माध्यमही झालं आहे. त्यात नवनवीन प्रयोग करून ट्रॅव्हल ब्लॉगिंगचं क्षेत्र तुमच्यासाठी करिअर ठरु शकतं. त्यासाठी प्रचंड मेहनत आणि फिरण्याची तयारी हवी.
चैताली जोशी
response.lokprabha@expressindia.com