प्रशांत ननावरे – response.lokprabha@expressindia.com
आजवर जे शब्दांच्या माध्यमातून लोकांसमोर मांडलं जात होतं ते व्हिडीओद्वारे सांगण्याची पद्धत अलीकडे लोकप्रिय होऊ लागली आहे. कारण व्हिडीओची भाषा ही कुठल्याही वयातल्या, स्तरातल्या आणि शिक्षित-अशिक्षित व्यक्तीला समजायला सोपी आहे. अशाच व्हिडीओच्या विविध प्रकारांपैकी सध्याचा सर्वाधिक लोकप्रिय प्रकार म्हणजे व्लॉग. व्हिडीओ आणि ब्लॉग यांच्या एकत्रीकरणातूनच व्लॉग या शब्दाची निर्मिती झाली असून वेगवेगळे विषय मांडण्यासाठी व्लॉगचा मोठय़ा कल्पकतेने वापर केला जाऊ लागला आहे. पूर्वी आठवडय़ातून एकदा किवा दोनदा प्रसिद्ध केली जाणारी ही व्हिडीओ डायरी आता दररोज प्रसिद्ध करण्याकडे अनेक व्लॉगर्सचा कल वाढू लागला आहे. व्लॉग म्हटलं की पहिल्यांदा यूटय़ूबचं नाव समोर येतं; पण यूटय़ूब अस्तित्वात येण्याआधी २००५ सालच्या सुरुवातीला याहूचं व्हिडीओ ब्लॉिगग लोकप्रिय झालं होतं. त्यानंतर महिन्याभरात म्हणजेच फेब्रुवारी २००५ साली यूटय़ूबचा जन्म झाला आणि वर्षभरातच यूटय़ूबला जगातील पाचव्या क्रमांकाचं सर्वात लोकप्रिय संकेतस्थळ होण्याचा मान मिळाला.

पूर्वी अनेक ब्लॉगर आपल्या ब्लॉगमध्ये लिखित मजकूर आणि फोटोंसोबत व्हिडीओचाही समावेश करायचे; पण यूटय़ूबचा विस्तार आणि लोकप्रियता वाढत गेल्यावर अनेकांनी थेट यूटय़ूबवरच व्लॉगिंग करायला सुरुवात केली. आवडणाऱ्या गोष्टी शूट करून त्या अपलोड करणं हा व्लॉगचा साधा फंडा आहे. यामध्ये अनेक जण मग स्वत:चा दिनक्रम सांगू लागले. या सर्वाधिक लोकप्रिय प्रकाराला लाइफस्टाइल व्लॉग म्हटलं जातं, तर काहींनी आपल्या आवडत्या विषयांना व्लॉग वाहिले. त्यामध्ये खाणं, प्रवास, मोटारबाइकिंग, कलाकुसरीच्या वस्तू बनवणं, व्यायाम, बाजारात नव्याने दाखल झालेल्या गॅजेट आणि उपकरणांची माहिती देणं, सौंदर्यप्रसाधनं यांसारख्या असंख्य विषयांचा समावेश होतो.

झटपट प्रसिद्धी आणि पैसा यामुळे आता व्लॉिगग हे करिअर म्हणून अनेकांना खुणावू लागलं आहे; पण त्या वाटेला जाताना काही मूलभूत गोष्टींची माहिती करून घेणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅमेरा आणि व्हिडीओ एडिटिंगची माहिती असणं. कारण यूटय़ूबवर व्लॉग सुरू केल्यावर ताबडतोब पसे मिळायला सुरुवात होत नाही. त्यासाठी यूटय़ूब चॅनेलला ठरावीक सबस्क्रायबर्स असणं आणि व्हिडीओला व्ह्य़ूज मिळणं आवश्यक असतं. त्यामुळे सुरुवातीचा आíथक भार स्वत:लाच सोसावा लागतो. हल्ली मोबाइल आणि गोप्रो कॅमेऱ्याचाही व्लॉिगगसाठी मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. त्यासोबतच माइक, ट्रायपॉड, लाइट्स, एडिटिंगसाठी लॅपटॉप, इंटरनेट कनेक्शन यांचाही भांडवलामध्ये विचार करणं आवश्यक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रामाणिक असणं. तुम्ही स्वत:ची डायरी लोकांसमोर व्लॉगच्या माध्यमातून मांडणार असाल तर लोकांना त्यातून प्रामाणिकपणाची अपेक्षा असते. ते पटलं तर लोक तुमच्यावर भरभरून प्रेम करतात. तसंच वेळोवेळी लोकांच्या प्रतिक्रियांना व्लॉगमध्ये सामावून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्यातूनच लोकांचा तुमच्यावरील विश्वास दृढ होत असतो आणि तुमचा ऑनलाइन परिवार वाढत असतो.

व्लॉगद्वारे लोकांशी संवाद साधताना उगाच पुस्तकी भाषा न वापरता मनमोकळेपणाने गप्पा मारता यायला हव्यात. त्यासाठी तुमच्याकडे बोलण्याचं आणि कॅमेऱ्याला न घाबरता सामोरं जाण्याचं कौशल्य हवं. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे स्वत:ला शूट करताना कॅमेरा अँगल, आवाज आणि प्रकाशाचंही भान ठेवावं लागतं. एकूणच तुम्ही स्वत:च सर्व भूमिका पार पाडत असल्याने त्याची पूर्वतयारी करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून आवश्यक तेवढंच शूट करून एडिटिंगमध्ये फार वेळ वाया जाणार नाही. कारण त्यापुढे योग्य पाश्र्वसंगीताची निवड करणं आणि ग्राफिक्सचा वापर करण्याचे सोपस्कार असतातच. ते करणं आवश्यक आहे, कारण त्यामुळे व्हिडीओमध्ये तोचतोचपणा राहत नाही.

एकदा का तुम्ही व्लॉगर म्हणून स्थिरावलात की, तुम्ही ज्या ब्रॅण्डच्या वस्तू वापरता त्यांच्यासोबत हातमिळवणी करू शकता. त्या प्रमोशनमधून तुम्हाला आणि कंपनीलाही फायदा होतो. शिवाय एखाद्या मान्यताप्राप्त ब्रॅण्डने तुमच्यावर विश्वास दाखवला तर त्याच्या शिफारसीने अनेक लहान-मोठे ब्रॅण्ड्स सहज जोडले जातात. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचणं जितकंकठीण आहे तितकंच कठीण तिथे टिकून राहणंसुद्धा आहे. त्यामुळे व्लॉगर म्हणून सुरुवात करताना नेमकं काय साध्य करायचं आहे याची सुरुवातीलाच आखणी करणं अत्यंत गरजेचं आहे.