एकाच दिवसात तीन-चारदा एकच कार्टून पाहण्याचे केव्हाही अन् कसेही जमू शकणारी आताची लहान मुले ८०च्या दशकातील पिढीहून कार्टूनसमृद्ध असतील कदाचित; पण आठवडाभर एक भाग मुरवून पुरवून पाहणाऱ्या त्या पिढीइतकी काटरून समाधानी नाहीत. दूरदर्शनकालीन एका पिढीच्या कार्टून आवडीचा नॉस्टेल्जिया…
तो काळ आताइतके ‘कुटुंब रंगलेय टीव्हीत..’ म्हणण्याचा नव्हताच जराही. टीव्ही पाहणे आताइतके सोपे नव्हतेच थोडेही. चाळीवरच्या कौलांवरील किंवा पत्र्याच्या कोपऱ्याला अडकविलेल्या अकरा किंवा कितीशा काडय़ांच्या अँटिनाची दिशा बदलण्याची खटपट केल्यानंतर कुठे दूरदर्शनच्या एकमेव वाहिनीचे मुंग्याविरहित दर्शन घडत असे अन् ही दरएक वाडी, चाळीआड ही खटपट दिवसभर करणेही अजब वाटत नसे कुणाला. दूरदर्शनच्या त्या अल्पवेळाची सुरुवात आणि सनईच्या आवाजात गोलगोल फिरणाऱ्या बोधचिन्हाने सायंकाळी व्हायची. तेव्हा अचानक कुठल्याही कार्यक्रमात ‘व्यत्यय’ही होत असे आणि चित्रगीतासारख्या गाण्यांच्या कार्यक्रमांत ‘कृष्णधवल’ नावाची पाटीही येत असे. ब्लॅक अॅण्ड व्हाइट टीव्ही असणे कमीपणाचे वाटत नसे कुणाला. कुठलीशी टीव्ही कंपनी शेजाऱ्यांना जळवण्यासाठी हाच अमुक टीव्ही घेण्यास सांगणारी जाहिरात दाखवी, तरीही त्यातून कुणी शेजाऱ्याबद्दल असूया करीत नसे. ही जाहिरातही टीव्हीवर दोन-चार कुटुंबांकडून गुण्यागोविंदाने पाहिली जाई. रामायणाच्या आधी ५२ की ५४ जाहिराती लागत, त्याची मोजणी करत समूहाने रविवार सकाळ टीव्हीवरील रामभक्तीने चिंबून जाई. महाभारतातील प्रदीर्घ काळ रेंगाळत चाललेल्या घटनांबाबत कुणाचा आक्षेप नसे. तेरा भागांच्या मालिकांना ‘टीआरपी’चे कोंदण नव्हते लागले, तरी त्यांची चर्चा आठवडाभर घरांच्या उंबऱ्यांवर तांदूळ निवडताना होई. या सगळ्या आद्य टीव्हीदर्शन काळामध्ये भारतामध्ये कार्टूनची सुरुवात झाली. आज निव्वळ कार्टूनसाठी वाहिलेल्या वाहिन्या आहेत. १९८०च्या दशकात मात्र आठवडय़ातून जेमतेम तासभर कार्टून पाहायला मिळत असे. मिकी अॅण्ड डोनाल्ड, टॉम अॅण्ड जेरी, ही-मॅन, टेल्सपीन ते जपानी कार्टूनच्या आवृत्त्या पाहत इथला कार्टून पाहण्याचा काळ अतिशय संथगतीने विस्तारत गेला. आता तो प्रचंड मोठा झाला आहे.
ही-मॅनागमन!
कार्टून पाहण्याचे सरासरी वय चार ते आठ वर्षे धरले, तर भारतातील पहिली कार्टूनजाणिवा जागृत झालेली पिढी ही निव्वळ टीव्हीधार्जिणी होती. १९८० साली जन्मलेल्या पिढीला साधारण कार्टूनची पहिली ओळख झाली, ती दूरदर्शनच्या एकमेव वाहिनीवर सुरू झालेल्या ‘ही-मॅन’ मालिकेने.
हाती जादुई तलवार घेऊन ‘बाय द पॉवर ऑफ द ग्रेस्कल’चा मंत्र जपत आपल्या घाबरट वाघाला प्रचंड शक्ती देणारा ‘ही-मॅन’ हा कार्टून नरपुंगव त्या काळच्या बच्चेकंपनीचा हिरो बनला. जागतिकरणाच्या आधीच्या काही वर्षांमध्ये ही-मॅनने देशात विविध मार्गानी बस्तान बसविले होते.
यत्किंचितही इंग्रजी न कळणाऱ्या आमच्या पिढीने त्या काळात ही-मॅन तेव्हा पूर्णत: कसा समजून घेतला, हे आश्चर्यच आहे. इटर्निया नावाच्या कुठल्याशा राज्यात घडणाऱ्या या गोष्टीत ही-मॅन याच्या जिवावर उठलेला ‘स्कॅलटर’नामक शत्रू आहे. सातत्याने विजा चमकत दर्शन होणारे ‘कॅसल ग्रेस्कल’ बळकावण्यासाठी हा स्कॅलटर आपल्याकडील न संपणाऱ्या वाईट शक्तिंनिशी उभा ठाकला आहे. या ग्रेस्कलवर ताबा मिळाल्यावर म्हणे संपूर्ण विश्वावर राज्य करता येणे शक्य असल्याचा स्कॅलटरचा दावा होता. मात्र तलवारीतील गूढ शक्तीमुळे ही-मॅन जगातील सर्वशक्तिमान योद्धा म्हणून तयार होतो आणि स्कॅलटरचे मनसुबे हाणून पाडतो, ही त्या मालिकेतील प्रत्येक भागाची रूपरेषा असे. प्रत्येक भागाअंती ही-मॅन त्या भागातील गोष्टीचे तात्पर्य सांगत असे. ‘गर्वाचे घर खाली’पासून ‘खोटे बोलण्याचे तोटे’ आदी सर्व तात्पर्य ही-मॅनमधील गोष्टींमधून सुचविण्यात आल्याचे आठवते.
आमच्या पिढीला ही-मॅनने कार्टूनदीक्षा दिली. स्कॅलटरच्या त्या गूढ-भूताळ गढीची, नावाला जागणाऱ्या त्याच्या भीषण चेहऱ्याची, त्याच्या गडगडाटी हास्याची आणि त्याच्याकडून ही-मॅनच्या अंगावर सोडल्या जाणाऱ्या चित्रविचित्र आकाराच्या राक्षसांची भीती वाटूनही ही मालिका घराघरांत पाहिली जात होती.
ठाण्यातल्या आमच्या चाळीमधील सगळी मुले रविवारी सकाळी कुणा एकाच्या घरामध्ये सामूहिकरीत्या या मालिकेचा आस्वाद घेत. त्यानंतर दिवसभर या मालिकेतील पक्षी आणि बाई अशा दोन्ही रूपांत जाऊ शकणाऱ्या सॉर्सरस टीला, शक्तिशाली मॅन ऑफ आम्र्स आणि ही-मॅनसोबत असणारे छोटे विनोदी पात्र ऑर्को या ही-मॅनच्या मित्रांबद्दल बोलत. पाहिलेल्या गोष्टीतून कळलेले, ही-मॅनच्या ऐकलेल्या मंत्राचे समजलेले, उमजलेले (तद्दन चुकीचे) रूप घेऊन आपापला ही-मॅन मनात रुजवत.
स्कॅलटर हा भीतीदायक राक्षस त्या काळात साधारणत: सात-आठ वर्षांच्या असलेल्या पोरांतील अनेकांची दु:स्वप्ने तयार करण्यासाठी सज्ज होता. इटर्नियाचा राजपुत्र असलेला प्रिन्स अॅडम्स सर्वासमोर हाच तलवार हाती घेऊन म्हणणाऱ्या मंत्राने ही-मॅन अवतारात प्रगट होतो. सुपरहिरो सामान्यातून असामान्य ‘अल्टर इगो’मध्ये जातात, याची भारतातील एका पिढीची शिकवण संपूर्णपणे ही-मॅनने आम्हाला दिली.
याच काळात आपल्याकडे जनमानसात सुपरमॅनहूनही मोठी प्रतिमा असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या एका टप्प्यातील सिनेकरिअरचा अस्त होत होता. त्याचा शहेनशहा नावाचा चित्रपट दाखल झाला होता अन् या चित्रपटातील नायक नररत्न आपल्या साक्षात जादुई लोहरूपी हाताद्वारे सुपरहिरोसारखेच भीषण बचाव कार्य करत होता. शहेनशहाची स्फूर्ती ही-मॅन नाहीच; पण नंतर सिनेमाचा अन् कार्टून्सचा अभ्यास करताना ही-मॅन हा अरनॉल्ड श्वात्झनेगर याच्या पहिल्या ‘कोनान द बार्बेरिअन’ या चित्रपटाची स्फूर्ती असल्याचा संदर्भ लागला. ‘कोनान द बार्बेरिअन’ या चित्रपटानंतर सशक्त आणि बलाढय़ नरश्रेष्ठांची परंपरा हॉलीवूडमध्ये तयार झाली. सिल्व्हेस्टर स्टॅलिनच्या रॅम्बो ते आज जेसन स्टेथमच्या शक्तिपटांचे मूळ या ही-मॅनमध्ये होते. कार्टून कॅरेक्टरला सर्वाधिक ताकदवान रूपात पाहायला ही-मॅनने शिकविले.
ही टीव्ही मालिका भारतात किती लोकप्रिय होती, हे तिच्या प्रदर्शनानंतर काहीच दिवसांनी समोर आले. ही-मॅनची खेळणी भारतीय बाजारात येऊ लागली. खोडरबर आणि शैक्षणिक साहित्यामध्ये ही-मॅन अवतरला. ही-मॅन हा भारतात मार्केटिंग झालेले कार्टूनमधील पहिले उत्पादन होते. महागडा ही-मॅनचा बाहुला, त्याची खोडरबर स्वरूपातील विमाने घेणारी मुले शाळेतील वर्गात आणि नंतर चाळींमध्येही बहुसंख्य होती.
ही-मॅन आणि टेक्नॉलॉजी…
रे ब्रॅडबरीपासून १९५०-६० सालातील विज्ञानकथा लेखकांनी भविष्यातील जग चितारायला सुरुवात केली. ब्रॅडबरीच्या ‘फॅरनहेट ४५१’मध्ये एलसीडी टीव्हीला समांतर यंत्र होते. त्याच्याच कथांमध्ये मोबाइल फोन, वॉकमनसदृश यंत्रे वापरली जात होती. जॉर्ज लुकासच्या ‘स्टार वॉर’ चित्रपट मालिकेमध्येही अशी यंत्रे दिसतात. स्टार वॉर्सचा मोठा प्रभाव असलेल्या ही-मॅन मालिकेमध्येही स्कॅलटर आणि इतर पात्रांकडे जादूचे जे प्रकार आहेत, त्यात आजच्या व्हिडीओ मोबाइल, टॅबसारखी यंत्रणा पाहायला मिळते. ही-मॅनचे अस्तित्व शोधून काढणारी यंत्रणा तर आजच्या अॅडव्हान्स जीपीएस सिस्टीमहून अधिक उत्तम वाटावी, अशी तीसेक वर्षांपूर्वी कल्पिली गेली होती. त्याच्याकडे असलेल्या छडीवर मोठा पांढरा गोल असे. आज विचार केला, तर स्मार्टफोनचे स्मार्टपण फिके करून टाकू शकणारे मल्टिटास्किंग डिव्हाइस स्कॅलटर वापरीत असल्याचे स्पष्ट होते. त्यातून तो लांबच्या हस्तकाशी बोलू शके, ही-मॅन कुठे आहे, ते पाहू शके आणि ते संपल्यानंतर त्याच छडीने जादूचे अनंत कारनामे करून दाखवू शके.
थोडा इतिहास खेळउद्योगाचा…
ही-मॅन हा माव्र्हल आणि डीसीच्या सुपरहिरोंप्रमाणे नाही. त्याची निर्मितीच ही मुळी खेळउद्योगाची वृद्धी करण्यासाठी झाली होती. १९५९ साली ‘बार्बी’ ही बाहुली अमेरिकेतील लहान मुलींना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली. मग मुलींसाठीच खेळणे का, या विचारातून ‘जी.आय.जो.’ खेळणी मुलांसाठी तयार झाली. स्टार वॉर्स चित्रपटानंतर अमेरिकी बाजारात त्यातील पात्रांना घेऊन खेळण्यांची मोठी मालिकाच तयार झाली. याच काळात एका खेळणी उद्योगात नावाजलेल्या कंपनीच्या रॉजर स्वीट आणि डेव्हिड विकर या दोन डिझायनर्सनी ही-मॅननामक शक्तिशाली बाहुल्याची निर्मिती केली. कंपनीने यावर टीव्ही मालिकेची आखणी केली आणि अमेरिकी टीव्हीवर लोकप्रिय झाल्यानंतर ही-मॅनच्या बाहुल्याने बार्बीच्या विक्रीला आव्हान दिले, इतपत या ही-मॅनने बाजी मारली. थोडे गुगलल्यावर अमेरिकेसोबत तीस देशांमध्ये ही टीव्ही मालिका दाखविली जात होती, ही माहिती मिळते. त्या तीस देशांमध्ये भारताचाही समावेश होता. मी ही-मॅन पाहिला तो आनंदासाठी. कुतूहल, आकर्षण आणि नरश्रेष्ठाचे पहिले दिसलेले कार्टून उदाहरण म्हणून. त्यानंतर पैसे साठवून त्याच्या खेळण्यांसाठीही भरपूर गोष्टींत मन मारले. आता ती ही-मॅन भक्ती ग्लोबलायझेशनच्या आधी ग्लोबलाइज होण्याची पहिली पायरी वाटते. भारतात अनेकांच्या ही-मॅन आठवणी त्याच्या ताकदीहून मोठय़ा भरतील.
स्पायडरमॅन आणि मार्केटिंग
काळा सिनेमा किंवा न्वार चित्रपट हा पुढे कधी तरी सलग सिनेमे पाहिल्यानंतर लक्षात येणारी गोष्ट होती. पण ही-मॅन थोडा मनात रुजला असतानाच रविवारी संध्याकाळी टीव्हीवर चिमणराव मालिकेनंतर लागणाऱ्या ‘स्पायडरमॅन’ या कार्टून मालिकेने न्वारविषयक जाणिवा रुजविल्याचे आता जाणवते. ही मालिका सुरुवातीला पाहताना स्पायडरमॅनच्या मुखवटय़ातील रूप हे नायक की खलनायक कळायला कुठलाच मार्ग नव्हता. नायक सुंदर असल्याचा एक साधारण समज विकसित होत असताना मुळात कोळीरूपी चेहरा असलेला स्पायडरमॅन इमारतींवरून सहजगत्या आकाशभराऱ्या मारतो. त्याच्या हातातून निघणाऱ्या दोऱ्यांद्वारे तो दुष्ट शक्तींशी लढून इतरांना वाचवतो, तेव्हा तो नायकच आहे हे कळायला त्याचे काही भाग जावे लागले. या मालिकेनंतर आपल्या हातामधून स्पायडरमॅनसारखी दोऱ्या काढून दाखविण्याची शक्ती असल्याचे समजणारे महाभाग वर्गात दिसू लागले. याच काळात त्याचे मास्क, टी शर्ट, संपूर्ण पोशाखही भारतीय बाजारात मिळू लागले होते.
आपल्याकडे जी स्पायडरमॅन मालिका दाखविली जात होती, ती १९६०च्या दशकातील अमेरिकी आवृत्ती होती. यादरम्यान टीव्हीवर आणि सिनेमामध्ये त्याची अनेक रूपांतरे झाली. कॉमिक बुक लोकप्रिय होतेच. पण ती लोकप्रियता अमर्याद झाली २००२च्या सॅम रियामी दिग्दर्शित चित्रपटामुळे. जगभरामध्ये तिकीटबारीवर सर्वाधिक गल्ला करणारा चित्रपट म्हणून स्पायडरमॅनला मान्यता मिळाली. त्याच्या कॉमिक बुकपासून सर्व उत्पादनांची जागतिक विक्री अब्जावधीमध्ये गेली. भारतामध्ये २००७च्या मेमध्ये या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित झाला होता. तेव्हा झाडून साऱ्या चित्रगृहांमध्ये एक महिना कोणताच चित्रपट प्रदर्शित करण्यात आला नव्हता. स्पायडरमॅनची भोजपुरी आवृत्तीही तेव्हा प्रकाशित झाली होती. स्पायडरमॅन हे त्याच्या वकुबावरून लोकप्रिय की मार्केटिंगचा भाग म्हणून लोकप्रिय, हा प्रश्न तेव्हा उपस्थित झाला होता. तरी भारतात जो तो आपल्या आवडीच्या भाषेत पॉपकॉर्नसह आपापल्या टीव्हीवरील मालिकेतील स्पायडरमॅन शोधून त्याच्या तिकीटबारीवर जागतिक विक्रमात भर घालत होता.
काही गुणी कार्टून्स
मिकी माऊस अॅण्ड डोनाल्ड डक हीदेखील सुरुवातीची लोकप्रिय कार्टून कॅरेक्टर्स होती. ‘डक टेल्स’ नावाचे पूर्णपणे बदक नायक असलेले कार्टून डिस्नेची मालिका अमेरिकेत संपून वगैरे झाल्यानंतर भारतात दाखल झाली. अंकल स्क्रूच आणि त्याचे लुई, डुई आणि हुई या तीन पुतण्यांचे कारनामे, असे या कार्टून्सचे स्वरूप होते. अंकल स्क्रूचचे लकी कॉइन आणि त्याचा भला मोठा खजिना यांच्याभोवती त्या कथा गुंफल्या होत्या. हे काटरून संपल्यानंतर लगेचच टेल्सपिन नावाचे आणखी एक कार्टून लागायचे. बलू नावाचा त्यातील भालू हा विमानचालक होता. त्याचे पाण्यातल्या रेस्तराँजवळ उतरणारे विमान आणि जगभरातील वाईट गोष्टींना अपघाताने बदलण्याचा बलूचा शिरस्ता असा गमतीशीर प्रकार त्यात होता. यापैकी मिकी अॅण्ड डोनाल्ड जितके लोकप्रिय झाले, तितके बलू आणि अंकल स्क्रूच आपल्याकडे चालले नाहीत. आज फक्त ती कार्टून्स अनुभवलेल्यांच्याच लक्षात असतील. या बलूचे प्रत्येक हवाई कारनामे अद्भुत होते. विमानावर त्याचा जीव होता आणि ते विमान पळवून नेण्यासाठी त्याची विरोधक यंत्रणा कार्यरत होती.
जंगल बुक हे कार्टून टीव्हीवर लागले, तेव्हापासून लोकप्रिय होतेच, पण जवळजवळ तितक्याच तोडीची ‘टारो एक ड्रॅगन का बेटा’ ही जपानी कार्टून मालिका आपल्याकडे लागली होती. त्याचे अत्यंत सुंदर गाणे होते. या टारोवर जपानमध्ये सिनेमाही आला आहे. एका विशिष्ट काळात १०० माणसांचे बळ अंगी येणाऱ्या जंगलात अडकलेल्या या मुलाची गोष्ट जंगल बुकला काहीशी समांतर असली तरी ते कार्टून आणि त्यातील जपानी अॅनिमेशन आजही लक्षात आहे. ‘हव्वा मिठी तू आजा, पश्चिम से..’ असे ते होते. ते गाणे शोधायला यू टय़ूबवर गेलात, तर मूळ जपानी गाणे ऐकायला मिळते. या गाण्याविषयी आणि त्या जंगल बुकइतक्याच तोडीच्या मालिकेशी असलेल्या भावबंधाची प्रचीती त्याच्या कमेंटर्सवरून येईल. या गाण्याचा आणि त्या मालिकेच्या भागांचा कुठेच पत्ता नाही. तरीही यू-टय़ूबमध्ये टारोच्या जपानी गाण्यावरील कमेंट्सची गर्दी एका समविचारी कार्टूनप्रेमींना एकत्र करते.
१९९२ नंतर आलेल्या उपग्रह वाहिन्यांमुळे मुळात टीव्हीवर चॅनल्सचे असंख्य पर्याय उपलब्ध झाले. पुढे जोमाने कार्टून वाहिन्यांचे पीक आले, पण पूर्वी एका वाहिनीवर सर्वासाठी असलेल्या तासभराच्या कार्टून मालिका पाहण्यातली गंमत निघून गेली.
वय वाढले, जागतिकीकरणानंतर जगण्यातले सारे संदर्भ बदलले आणि अॅनिमेशनपटांचे नवे दालन डिस्ने-पिक्सारसोबत खुणावू लागले. टॉयस्टोरीपासून सुरू झालेला पिक्सारचा प्रवास अॅनिमेशन अबालवृद्धांसाठी करणारा ठरला.
सध्या अमेरिकी, जपानी कार्टून्ससोबत फ्रेंच कार्टून ऑगी अॅण्ड कॉक्रोचेस हेदेखील लोकप्रिय ठरले आहे. मूळ मूक कार्टून असलेल्या या मालिकेत भारतीय चित्रपट अभिनेत्यांचा आवाज घालून ते बदलून टाकण्यात आले आहे. गंमत म्हणजे यातील व्यक्तिरेखांचे ते आवाजच या मालिकेचा प्राण आहेत.
आज कार्टून वाहिन्या पुष्कळ आहेत. यू टय़ूबपासून डाऊनलोड करून स्वतंत्ररीत्या कार्टून आस्वाद घेण्याचे मार्गही भरपूर आहेत. डोरेमॉन, पोकेमॉन, शिनचॅन या कार्टून्सनी १९९५ नंतर जन्मलेल्या किमान तीनेक पिढय़ांना वेड लावले. अमेरिकी वॉल्ट डिस्नेच्या कार्टून्सहून अधिक जपानी कार्टून्स आज आपल्याकडे लोकप्रिय आहेत.
कार्टून पूर्वी छुपेपणे उत्पादन विक्रीचा अजेंडा घेऊन भारतात शिरले होते. आता थेटपणे ते इथली बाजारपेठ व्यापून बसले आहेत. आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मोठे जाळे कार्टून वाहिन्यांद्वारे आपली उत्पादने विकत आहेत. नूडल्स, पास्ता, बिस्किट्स आणि गॅझेट्स विकण्यासाठी कार्टून वाहिन्यांचा सर्वाधिक वापर होतो आहे. एकाच दिवसात तीन-चारदा एकच कार्टून पाहण्याचे केव्हाही अन् कसेही जमू शकणारी आताची लहान मुलांची पिढी १९८० च्या पिढीहून कार्टूनसमृद्ध असेल कदाचित, पण आठवडाभर एक भाग मुरवून पुरवून पाहणाऱ्या त्या पिढीइतकी कार्टून समाधानी नाहीत, हे वाईट आहे.
पंकज भोसले – response.lokprabha@expressindia.com