भूषण प्रधान
स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. तसंच माझंही होतं. त्यातही मुंबईत घर असावं असं माझं स्वप्न. मी मूळचा पुण्याचा. पुण्यात माझं स्वत:चं घर होईल असं वाटायचं. पण, मुंबईत घर घेण्याचं स्वप्न कदाचित थोडं उशिरा पूर्ण होईल असं वाटायचं. पण, नुकतंच माझं मुंबईत स्वत:चं घर झालंय. खरंतर आजही माझा यावर विश्वास बसत नाही. करिअरसाठी मुंबईत आलो तेव्हा बोरिवली ते अंधेरी याच भागात भाडय़ाच्या घरात राहिलो होतो. त्यामुळे जेव्हा घर घेऊ तेव्हा शक्यतो याच भागात घ्यायचं असं मी ठरवलं होतं. मागच्या वर्षी कांदिवली पश्चिम भागात माझं स्वत:चं घर झालंय. घर घेऊन झालं म्हणजे बाजी मारली असं अजिबात वाटता कामा नये. त्या फक्त चार भिंती असल्या तरी त्यात आपलेपणा आपल्यालाच ओतावा लागतो. घर नीटनेटकं असावं याबाबत माझा नेहमी आग्रह असतो. एखाद्या वेळी असंही होऊ शकतं की, तुम्हाला तुमच्या मनासारखी एक गोष्ट घर घेताना तिथे मिळाली नसेल. पण, हरकत नाही. तुम्हाला हवी तशी तुम्ही ती बनवू शकता. माझ्या घराचा ताबा मला मिळाला तेव्हा माझ्या एका सिनेमाचं शूटिंग लांबणीवर गेलं होतं. तो वेळ मी घराच्या सजावटीसाठी सत्कारणी लावला. इंटिरिअर करताना मी स्वत: बारीकसारीक गोष्टींत लक्ष दिलं. त्यामुळे ती सगळी प्रक्रिया मी खूप एन्जॉय केली. ‘कॉफी आणि बरंच काही’ या माझ्या सिनेमाची कला दिग्दर्शिका पूर्वा पंडित हिने मला घरसजावटीसाठी मदत केली. सिनेमाचं कलादिग्दर्शन करताना जसं व्यक्तिरेखांच्या स्वभाववैशिष्टय़ांचा अभ्यास करून मग सेट तयार केला जातो तसंच तिने माझ्या स्वभाव, सवयी, आवडीनिवडीनुसार घरसजावटीचा सल्ला दिला. माझे आई-बाबा पुण्यात असतात. मुंबईत येऊन-जाऊन असतात. त्यामुळे मी दोन बेडरूमपैकी एकाची मूव्ही रूम केली आहे. सिनेमे बघण्याची आवड असल्याने तशी रूम तर हवीच! आईच्या म्हणण्यानुसार स्वयंपाक घर सजवलंय. तिथे माझा हस्तक्षेप नव्हता. व्हर्टिकलपेक्षा हॉरिझाँटल वॉर्डरोब तयार करून घेतले आहेत. माझ्या मते, घर हॅपनिंग, लाइव्हली ठेवायचं असेल तर फोटो फ्रेम्सशिवाय पर्यायच नाही. म्हणूनच माझ्या घरात फोटो फ्रेम्सही दिसतील. मला वाटतं या फ्रेम्समुळे एकटेपणा जाणवत नाही. सतत तुमच्यासोबत कोणीतरी आहे ही जाणीव तुम्हाला होत असते. मला झाडांची प्रचंड आवड असल्याने घराबाहेरच्या लॉबीत दहा-बारा झाडं लावली आहेत. खोल्यांमध्ये असलेल्या रंगांचाही विशेष विचार व्हायला हवा. ही रंगसंगती छान असायला हवी. मुंबईत आलो होतो तेव्हा फक्त एक बॅग आणि बाइक घेऊन आलो होतो. भाडय़ाच्या घरातून स्वत:च्या घरात जाताना माझं सामान प्रचंड वाढलं होतं. ‘स्वत:चं पहिलं घर’ हे सुखावणारं आहे. आपण जिथे राहतो त्या जागेत आपण गुंतत असतोच. पण, स्वत:च्या घराबाबतचं प्रेम, जिव्हाळा थोडा जास्त असतो. साधं, सुटसुटीत, नीटनेटकं घरही कुटुंबीय, नातेवाईक यांच्यासोबत फुलत जातं.
शब्दांकन : चैताली जोशी
response.lokprabha@expressindia.com @chaijoshi11

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा