‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगांत’ ही ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार लिखित ट्रायोलॉजी २० वर्षांपूर्वी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी रंगमंचावर आणली होती. अलीकडेच ‘वाडा चिरेबंदी’चा पुन्हा प्रयोग झाला आणि येत्या १४ मे रोजी ‘मग्न तळ्याकाठी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्ताने चंद्रकांत कुलकर्णी यांची मुलाखत.
२१ वर्षांनंतर पुन्हा ‘मग्न तळ्याकाठी’ करताना काय फरक जाणवतो आहे?
आता माझीही रंगभूमीबद्दलची समजूत अधिक वाढली, नाटय़क्षेत्रातला अनुभव वाढला. नाटक तेच आहे. करणारी पात्रं आणि बघणारा प्रेक्षक मात्र वेगळा आहे. पण आता माझ्या दिग्दर्शन करण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल झाल्याचं जाणवतं. मला काही वेगळे अर्थ नव्याने उलगडले. मी स्पेस नाही बदलली. वाडा आहे तर त्याचं नेपथ्य तेच राहिलं. पण अभिव्यक्तीची, अभिनयाची अर्थपूर्णता जी होती ती काहीशी बदलली. एलकुंचवारांच्या नाटकांमध्ये विरामचिन्हे फार महत्त्वाची असतात. नातेसंबंधांबद्दल ते फार उघडपणे बोलत नाहीत. त्यांचे संवाद सूचक असतात. ते मितभाषी असतात. त्याला साहित्याची जोड असते. कधी जीवनाच्या तत्त्वज्ञानाची जोड असते. लेखकाचा हा आशय मला नटापर्यंत पोहोचवायचा असतो, कारण ते आशयाचे वाहक असतात आणि तो आशय ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. ही मधली महिन्याभराची प्रक्रिया माझ्यासाठी फार महत्त्वाची असते. ती एखाद्या स्रीच्या बाळंतपणासारखी असते. मग मात्र त्यानंतर मी प्रेक्षकांमध्ये बसून बघू शकतो. तेव्हा लेखकांचा, माझा आणि प्रेक्षकांचा एक भाग म्हणून बघत असतो. जे ठरवलं होतं ते होतंय का, उमटतंय का, ते रंगमंचाच्या बाहेर येतंय का, हे महत्त्वाचं असतं. खूप इंटरेस्टिंग गोष्टी या नाटकात आहेत. कंदिलाच्या प्रकाशात नाटक होत असताना त्याचं ट्रॅव्हेलिंग वेगळं होतं. जेव्हा रात्रीच्या वेळेला दोन माणसं बोलतायत आणि बाकीची माणसं झोपली आहेत, ते दाखवताना आव्हान असतं. एका वेळेला रंगमंचावर सात माणसं झोपली आहेत आणि प्रेक्षकांचा इंटरेस्ट कुठेही कमी होत नाही. (अनेकांनी प्रतिक्रिया दिली की, आम्हाला त्या घरामध्ये शिरल्यासारखं वाटतं.) हे वाटण्याचे क्षण जे असतात ते महत्त्वाचे असतात. नाटक म्हणून ते अभिजात आहेच, पण अंडरस्टँडिंगही महत्त्वाचं आहे. मी खेडय़ात वाढलोय, ज्या सामाजिक चळवळीचा मी एक भाग आहे, याच्याकडे तटस्थपणे बघताना मला हे नाटक कनेक्ट करतं. हे नाटक मला माझं वाटतं. आणि जेव्हा ते माझं वाटतं तेव्हा एलकुंचवार यांना जे नातेसंबंध कळले ते मला माझे वाटणं, हे त्यांच्या लिखाणाचं एक यश आहे. जर मला ते तेवढे माझे वाटतात तरच ते मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो. या नाटकावर माझं प्रेम आहे. लेखकांना काय सांगायचंय, हे कळतं. नटांबरोबरच्या माझ्या चर्चा, नाटकाची तालीम म्हणजे माझा अभ्यासवर्ग असतो, माझ्यासाठीही. नटांना सांगण्यापूर्वी मला ते संपूर्ण माहिती असावं लागतं, समजून घेतलेलं असावं लागतं. नट मूर्ख नसतात. ते अनुभवी नट आहेत. त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील असतो. त्याची मानसिक प्रक्रिया काय आहे. ते असं का म्हणतायत, हे असं का म्हणा, कसं म्हणायला हवं, हेदेखील त्यांना सांगायला हवं. शिवाय दिग्दर्शक म्हणून ती बांधणीही करता आली पाहिजे. शिवाय तंत्रज्ञांच्या बरोबर त्याचं चित्रही निर्माण करता यायला पाहिजे. नाटक हे जास्त अवघड आहे. कारण ते सलग होतं. ते प्रत्यक्ष रंगमंचावर घडताना आपण स्वत:वर अंधार करून घेऊन आपण ते बघतो. त्यातली एकाग्रताही इतर कलाकृतींपेक्षा जास्त असते. म्हणूनच आपल्याला कोणाचा मोबाइल वाजला तरी त्रास होतो. कारण आपण जास्त लक्ष देऊन ते बघत असतो. माझी नेहमीची थिअरी सांगतो की, नाटक आपण एवढं एकाग्र होऊन बघतो की तिथल्या तिथे आपलं उन्नयन होतं, आपल्याला ते कळतं. नाटककार जे साधारण वर्ष-दीड वर्षे रीसर्च करून लिहीत असतो, दिग्दर्शक दोनतीन महिने तेच समजून घेत असतो. नटांबरोबर तो महिनाभर राहतो. ते नाटक प्रेक्षकांना दोन तासांत कोणतीही ट्रिक न करता कळतं. कारण तुमची समजण्याची शक्ती त्या अंधाराने वाढवलेली असते. त्यामुळे चांगल्या नाटकातली वाक्यं तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतात, कम्पोझिशन्स, अभिनय लक्षात राहतो. तुमच्या कायम स्मरणशक्तीमध्ये हा अनुभव जातो. तो कायम राहतो. त्यामुळे तालमींमध्ये मी अडकलेलो असतो, अस्वस्थ असतो. त्याचा अंतिम परिणाम जेव्हा नाटकामध्ये होतो, तेव्हा ते सुखावणारं असतं. ही प्रक्रिया भरपूर वेळा केली तरी ती पुन: पुन्हा करायला आवडते.
आपण नाटकाच्या जवळ असणं आणि तिथपर्यंत नटांना नेणं, त्यांच्यामध्ये ते उतरवणं, त्यांच्याकडून ते काम करून घेणं. लेखकाला जे सांगायचंय ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, त्यासाठी कोणते अधिक प्रयत्न तुम्ही करता?
नक्कीच, जास्त कष्ट घ्यावे लागतात. नट हुशार असतो. त्याच्यामध्ये क्षमता असते. फक्त मला आतापर्यंत अनुभव आले की, नट थोडा स्वार्थीपण असतो. नट त्याच्यापुरतं बघत असतो. ते योग्यही असतं, कारण ती भूमिका पेलण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. नाटककार ही जन्मदाती आई मानली तर दिग्दर्शक हा बापही असतो, शिक्षक, मानसशास्त्रज्ञ आणि मित्रही असतो. कारण तालमींमध्ये नट व्यग्र असतो. मला हे पाठ करायचंय, मी हे कसं करू, असं नटाच्या मनात असतं आणि तो दिग्दर्शक या संस्थेवर विश्वास ठेवत असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही आन्सरेबल असता. ते तुमच्यात हवं. ते मला या अनुभवाने दिलं. कसं करता आलं पाहिजे, तुझं हे असं का होतंय, तुझे शब्द चुकतायत, आवाज चुकतोय, शब्दांवरचा जोर चुकतोय, तुला लहेजा पकडता येत नाहीए, तुझे शरीर कसं असायला हवं, याच्या तपशीलवार चर्चा माझ्या तालमीत घडत असतात. नाटक तालमीला जाण्यापूर्वी माझं ते मुखोद्गत असतं, विरामचिन्हांसकट. विरामचिन्हांनुसार अर्थ बदलतात, फरक पडतो. या सगळ्याचा म्हणण्यावर परिणाम असतो. लेखकाने विचार करून त्याची एक संवादाची लय लिहिलेली असते. प्रत्येक पात्राची लय वेगळी असते. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या शहरातला आहे, कुठल्या व्यवसायातला आहे, त्याच्यानुसार त्याची रचना केलेली असते. हे सर्व उलगडून नटांना सांगायचं असतं. हे करत असताना हे कसं दिसणार आहे, त्यासाठी नेपथ्यकाराबरोबर चर्चा करावी लागते. यामध्ये कुठे संगीत येणार आहे किंवा कुठे संगीत नको, हे संगीतकाराला सांगावं लागतं. अशी ती पूर्ण प्रक्रिया असते. मला असं वाटतं की, मी कुणी असाधारण नाही, चांगल्या दिग्दर्शकाची जी कार्यपद्धती असायला पाहिजे, जी आचारसंहिता चांगल्या दिग्दर्शकाची असायला हवी, ती मी पाळायचा गेली ३० वर्षे प्रयत्न करतो आहे. प्रत्येक कलाकृती मलाही शिकवते. मी ३०-४० नाटककारांची नाटकं केली, प्रत्येकाची शैली, भाषा वेगळी. मला ती अनुभवता आली. जवळपास १०० नटांबरोबर मी काम केलं, त्यांच्या वयोगट, शैली, समज यांच्यामध्येही फरक होता. डॉक्टर कुठला चांगला, तर ज्याला पटकन रोगनिदान करता येतं. त्याचप्रमाणे काय करायचं नाही, हे जर दिग्दर्शकाला सांगता आलं तर तो चांगला दिग्दर्शक. एखाद्या नटाला हे कर किंवा करू नको, असं सांगतो, तेव्हा तो विचारतो असं का, तेव्हा त्याची उत्तर तुम्हाला देता यायला हवीत. ही सगळी उत्तरं स्क्रिप्टमध्येच असतात. नट व्यग्र असतो, तो स्वकेंद्री होत जातो, त्याला त्याचे संवाद पाठ करायचे असतात, त्याला त्याची कृती लक्षात ठेवायची असते, त्याच्या कृतीवर समोरच्याचा प्रतिसाद अवलंबून असतो. नाटकाच्या लिखाणापासून ते रंगमंचावर येईपर्यंत सर्व नियोजित असतं, पण प्रेक्षकांना मात्र ते आत्ताच घडतंय, इतकं उत्स्फूर्त, सहज, नैसर्गिक वाटावं, ही ही नाटकामागची रचना असते. चांगल्या नाटकाचे पृथ:करण कधी कधी करता येत नाही, पण ते चांगलं चाललंय हे मात्र कळतं, कारण त्यामध्ये तुम्ही मग्न होता. चांगलं पुस्तक वाचताना, चांगली कविता ऐकताना, चांगलं संगीत ऐकताना, चांगलं चित्र बघताना तुमची तंद्री लागते का? त्यामधला जो अभिजातपणा असतो, शुद्धता असते, त्यामुळे त्याच्या बेसिक्स शोधण्याचा मागे मी लागलो आहे. ते का चागलं आहे? विराट कोहली खेळतो छान, पण अकरापैकी तोच का खेळतो छान? त्याच्यामागची मेहनत, शैली, त्याचं ज्ञान, तंदुरुस्ती, विचार आहेत. त्याचं एक गणित आहे. तुम्ही त्याला, परिस्थितीनुरूप अॅनलाइज करता. तशीच नाटकाचीही प्रक्रिया आहे.
‘वाडा’मध्ये सख्खे भाऊ लहानपणापासून एकत्र वाढलेले आहेत. शिक्षण, परिस्थितीमुळे त्यांच्यामध्ये बदल झाले. त्यामुळे या नात्यातला ओलावा दिसत नाही किंवा ते आदर्शवत वाटत नाही. अशी पात्रं नटांबरोबरच प्रेक्षकांपर्यंत कशी पोहचवता?
हे नाटक पाहून मला बोलक्या प्रतिक्रिया आल्या. काही जण म्हणाले, या नाटकातल्या पात्रासारखे मी वागतोय आणि त्याचा मला गिल्ट आलाय. ‘वाडा’ची गंमत म्हणजे या नाटकातील प्रत्येक पात्राचं म्हणणं आपल्याला त्या त्या वेळेला खरं वाटतं आणि तरीसुद्धा आपल्याला माहिती असतं की कुणी काही केलेलं नाहीए. परिस्थिती ही खलनायक आहे. प्रत्येक कुटुंबात हेच असतं. कुठल्याही कुटुंबात सारं काही आलबेल नसतंच. ताण असतातच, कारण त्यामध्ये अपेक्षा, कर्तव्य, जबाबदारी असते. काही सामाजिक पद्धत आपण नाकारतो, तो राग आयुष्यभर कायम राहतो. दोन सख्ख्या भावांमधले, आई-वडील, आई-मुलं यांच्यामधले गैरसमज कायम राहतात. भावांपैकी एकावर आई जास्त प्रेम करते, असं आयुष्यभर वाटत राहतं. ही जगण्याची व्यग्रता आहे. सरमिसळ आणि गुंतागुंत आहे. ती परिस्थितीमधून येते आणि ती परिस्थिती निमित्त असतं. आपल्या भारतीय कुटुंबपद्धतीचं वैशिष्टय़ म्हणजे ही कुटुंबपद्धती घरच्या स्त्रियांनी पेलून धरली आहे. त्याही अशा स्त्रिया की ज्या दुसऱ्या घरातून या घरात आल्या आहेत. पण त्या जेव्हा या घरात येतात, तेव्हा त्या सारं घर बघतात. या देशपांडे घरातली एकही बाई मूळची देशपांडे नाही, पण घर त्यांनी पेलून धरलंय. त्यामुळे जेव्हा एखादा मोठा नाटककार असं नाटक लिहितो, तेव्हा समाज येऊन ते पाहतो आणि त्याचे येणारे पडसाद पाहायला मिळतात. हजार नावांचे संदर्भ लागतात. नाटक फार मोठा पट व्यापतं. सिनेमात तसं नसतं. तुम्ही वेगवेगळे क्षण एकाच वेळी दाखवू शकता. पण नाटकात सांगण्यातून, बोलण्यातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं लागतं. ही थिएटरची गंमत. रंगमंचावरचा काळ कॉम्प्रेस केलेला असतो. घडणारं नाटक दोन तासांचं, पण त्याचं कथानक कदाचित चार मिनिटांचंही असू शकतं. मी जेव्हा आठ तासांचं नाटक करतो तेव्हा त्यामध्ये ३५ वर्षांचा कालावधी जातो. नाटकाचा वेळ आणि त्यातला काळ, या काळावर फार मोठी थिअरी लिहिली गेली.
समाजाने काही गोष्टी तुमच्यावर लादलेल्या असतात आणि त्या अपरिहार्य असतात, त्या तुमच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशा गोष्टींच्या या नाटकातील मांडणीविषयी काय सांगाल?
काही जणांना वाटतं हे नाटकं कौटुंबिक आहे. पण हे अजिबात कौटुंबिक नाटक नाही, ते सामाजिक नाटक आहे. बऱ्याच गोष्टींवर लेखक भाष्य करतो. जाती-पातीची उतरंड यावर तो बोलतो, राजकीय परिस्थितीवर बोलतो. दुसऱ्या भागात नैतिकमूल्यांवरही बोलतो. आपल्याकडे विशिष्ट जातीने विशिष्ट काम करायला हवं, ही धारणा आहे. वर्णव्यवस्था आहे, चातुर्वण्र्य त्यावर आधारित होता. या कल्पना आता बोथट झाल्या पाहिजेत, हे आधुनिक काळ आपल्याला शिकवतोय, पण अंगीकारता येत नाहीए. काही रीतीभाती सोडून द्यायला हव्यात, त्याचं सोशल सायन्स गेलेलं आहे, तरी आपण ते फॉलो करतो. आपल्याकडची गरिबी, खेडय़ातली रीतीभातीतली, हे करावंच लागतं, करायलाच हवं, असं म्हटलं जातं आणि आपण ऋण काढून सण साजरे करतो. किती कुटुंबं असं करतात, जर झेपत नसेल तर करू नये. आता मराठवाडय़ात दुष्काळ आहे, का या उन्हाळ्यात लग्नं करायची मला सांगा? पाऊस पडल्यावर नोव्हेंबरमध्ये केली तर काय फरक पडतो? लग्नं उन्हाळ्यात करायची, हे कृषिसत्ताकवरूनच ठरवलं आहे ना, जास्त शेतीची कामं नसतात, मुलांना सुट्टी असते, त्यामुळे यावेळी लग्न करतात, पंचाग आणि मुहूर्त निमित्तं आहेत त्याला. हे लग्नसमारंभ, उत्सव टाळता येणार नाहीत का? या नाटकात सामाजिक जाण तर आहेच पण भाष्यदेखील आहे. तो समाज प्रत्यक्षात लेखकाने रंगमंचावर आणला नाही आणि प्रत्येक वेळेला त्याची गरजही नसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला सामाजिक विषय मांडण्यासाठी पथनाटय़ंच करायला हवी, असंही नाही. नाटक हे अप्रत्यक्षपणे तुमच्यावर उपचार करत असतं. काय चांगलं ते सांगतं. चांगलं पुस्तक, चांगलं नाटक आपल्याला प्रगल्भ करतं. प्रत्येक वेळी आपण ते जगलेलो नसलो तरी ते जगणं बघून आपल्याला काही ना काही तरी मिळतं, हे खऱ्या अभिजात गोष्टींचं वैशिष्टय़ आहे. कलाकृतीची गंमत तीच आहे की आपण तिच्याशी स्वतला जोडतो. काहीच चांगलं होत नाही, अशी ओरड सुरू आहे तेव्हा काय चांगलं आहे, हे तुम्ही सांगायला हवं.
तुम्ही ‘वाडा’नंतर ‘मग्न तळ्याकाठी’ आणण्याचा जो ‘प्रयोग’ करताय, त्याबद्दल…
मी एक नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न करतोय. मला काही सकारात्मक संकेत मिळाले आणि ते मी पुढे नेले. मला जेव्हा प्रेक्षकांमधून हाक येते, की आम्हाला ‘मग्न तळ्याकाठी’ बघायचंय, तेव्हा माझं कर्तव्य आहे की, मी त्यांना ते दाखवलं पाहिजे. हा सिनेमासारखा सिक्वेल नाहीए. एक सिनेमा आला म्हणून त्याचा दुसरा भाग काढला. उलट लोक म्हणतायत की तुम्ही दुसरा भाग दाखवा. लेखकाला जर तो अपरिहार्यपणे वाटतोय तर मला ते करायलं हवं, ते लोकांपर्यंत पोहोचायला हवं. जर त्याचा समग्र अर्थ आपल्याला सर्वाना मिळून काढता आला, अनुभव घेता आला, तर फारच चांगलं आहे. माझा हा प्रयोग आहे, प्रयत्न आहे. मला विश्वास आहे की यालाही चांगला प्रतिसाद मिळेल. शेवटी हा संवाद एकतर्फी नाही, मी कामातून सतत प्रेक्षकांशी संवाद ठेवतोय. प्रेक्षकांना काही कळत नसतं, हे मानणाऱ्यांपैकी मी नाही. काही जण असं म्हणतात की प्रेक्षकांना काही कळत नसतं. मनमोहन देसाई जसे सांगायचे, प्रेक्षकांना बुद्धी नसते. माझ्या दृष्टीने रंगभूमीचा प्रेक्षक खूप सजग आहे, खूप परिपक्व आहे आणि ती परिपक्वता चांगल्या नाटककारांनी आणली आहे. प्रायोगिक नाटकांच्या चळवळींनी आणली आहे. माझी जबाबदारी आहे की, त्याची ती सजगता, जागरूकता आणि त्याची जी परिपक्वता आहे त्याला भिडणारं काही तरी खाद्य मी द्यायला हवं. नाहीतर विनोदी नाटकं येतंच राहतात. पण त्या विनोदामध्येही काही उपहास आहे का, तर ते मला आवडेल. नुसत्या मनोरंजनाला काही मतलब नाही. माझ्या मते नाटक हे केवळ मनोरंजनाचं माध्यम कधीच नव्हतं, कधीच असू नये आणि मी कधीच त्याकडे असं बघणार नाही. माझ्यासाठी ती सृजनशील प्रक्रिया आहे, त्यामध्ये एक गंमत आहे, त्यामधून विरेचन होतं, त्यामधून तुम्हाला जास्त कळतं. लेखक कशाला तरी प्रतिसाद देतो, त्याची थिअरी मांडतो. ती एक घुसळण आहे. नाटक बघून चर्चा होते, शेअरिंग आहे आणि हा दुतर्फी संवाद आहे. त्यामुळे तो खूप महत्त्वाचा आहे.
आत्ताच्या घडीला व्यावसायिकतेचे ठोकताळे न मांडता प्रयोग करणाऱ्या व्यक्ती फार कमी आहेत, दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांचा दर्जा कुठेतरी खालावलेला दिसतोय…
आपण चंगळवादी जास्त झालो आहोत. श्याम मनोहर म्हणतात ना डोक्याला ताप नको, तसं आहे हे. मी खूप काम करतो मला आता काही मनोरंजन पाहिजे. यामधूनच व्यसन निर्माण होतं. त्यामुळेच मनोरंजनाकडे सब-स्टँडर्ड म्हणून बघितलं जातं. चांगलं नाटक किंवा चांगला सिनेमा पाहण्याची अपरिहार्यता राहिलेली नाही. अजूनपर्यंत नाटकाचं महत्त्व का आहे, तर ते दोन आठवडय़ांमध्ये संपत नाही. त्याची पायरसी होत नाही. ते स्वत:हून जाऊन बघावं लागतं. ते सादर करावं लागतं. त्याचे सिनेमासारखे एकाच दिवशी चारशे शो होत नाहीत. एका वेळेला एकच शो होतो, त्यामुळे त्याचे उत्पन्नदेखील कमी आहे. प्रेक्षक संख्याही कमी आहे, पण त्याचे महत्त्वही तेवढेच आहे. ते हॅपनिंग आहे, त्यामुळे त्याचं महत्त्व आहेच, ते टिकवलं पाहिजे आपण. कॉर्पोरेट कल्चरमध्ये सोमवार-शुक्रवार काम करायचं, पैसे कमवायचे आणि शनिवार-रविवार खर्च करायचे. ते खर्च कुठे करायचे तर पिकनिक, परदेश वाऱ्या, वॉटर पार्क, क्लब हॉलिडे, पब, कॅसिनो, शॉपिंगमध्ये करायचे. स्वत:च्या संपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी लग्न करायचं, गाडय़ा घ्यायच्या. २०-२५ वर्षांपूर्वी निम्नवर्गीय माणूस महिन्यातले शंभर रुपये नाटकासाठी काढून ठेवत होता. पन्नास रुपये पुस्तकांसाठी काढून ठेवत होता. ती त्याला गरज वाटेनाशी झाली आहे. किंबहुना त्याचं उत्पन्न तर वाढलंय, पण त्याची ही गरज नाही म्हणून त्याने ते फेकूनच दिलं आहे. ती गरज निर्माण करण्यासाठी चांगले प्रयत्न झाले पाहिजेत, केले पाहिजेत, त्यांना दाखवले पाहिजेत. ‘वाडा’ पाहिल्यावर बरेच जण सांगतात की बरं झालं आम्ही हे नाटक बघितलं. काही जणांच्या बायकांनी, वडिलांनी, आजोबांनी आपापल्या कुटुंबियांना हे नाटक दाखवायला आणलं होतं. चांगलं नाटक बघून काय होतं? न बघून काय होतं, हे जोपर्यंत त्यांना कळणार नाही तोपर्यंत नाटकाचं महत्त्व सिद्ध होणार नाही. चांगलं नाटक, सिनेमा, चित्रप्रदर्शन त्यांनी पाहिलं तर त्यांना ते आवडेल, आपली प्रायोगिक रंगभूमी, आणि साहित्य चळवळीने प्रेक्षकांची अभिरुची वाढवली.
जेव्हा आपण अभिजात नाटक म्हणतो, तेव्हा एलकुंचवार, तेंडुलकर, मकरंद साठे, चं. प्र. देशपांडे यांच्यासारखी काही नावे पुढे येतात. पण सध्याच्या घडीला आपण एकांकिका स्पर्धामधूनही पाहिलं तर नवीन नाटककार येताना दिसत नाही, नवीन पाहायला मिळत नाही, याचं कारण काय वाटतं?
माझ्या मते महाराष्ट्रात असा चढउतार, असा बदल नेहमी येतो, इतर माध्यमांचा प्रभाव वाढतो , तेव्हा हे होतं, पण कालांतराने सारं काही सेटल होतं. १९७०-२००० या कालावधीमध्ये चांगली नाटकं आली, पण जिथून जागतिकीकरण सुरू झालं तिथून हा फरक पडायला लागला आहे. खरंच अभिव्यक्तिस्वातंत्र्य आपल्याला आहे का, याचा प्रश्न लेखकांना पडतो आहे. टीका करून काही उपयोग आहे का, मला मारहाण होईल का, लोकांना पटेल का, माझ्या लिखाणावर आक्षेप घेतला जाईल का असे प्रश्न काही लेखकांना पडत असावेत बहुधा. अग्रलेख हा तात्कालिक असतो, तो अपरिहार्यपणे रोज लिहायचा असतो. नाटक तसं नाही. एखादी घटना घडली की त्यावर नाटक काढायचं, हे प्रत्येक वेळी गरजेचं नसतं. नाटक हे दूरगामी हवं. कारण त्यातील घटनांचा परिणाम पुढे काही दशकं राहतो, ‘वाडा’ आताही लोकांना आवडतं, त्याचं कारण त्याला समकालीन महत्त्व आहे. रोजचं वर्तमानपत्र रात्री रद्दी होतं, असा विचार मी करत नाही. त्यातल्या लेखांचं पुस्तकही होतं, पण ते रोज लिहावं लागतं, मात्र नाटकाचं तसं नाही. नाटककारावर नाटक लिहिण्याची जबरदस्ती कोणी करत नाही, पण बरीच र्वष त्याला काही का लिहावंसं वाटत नाही, हे समजून घेतलं पाहिजं. ‘अधांतर’, ‘चाहूल’, ‘शोभायात्रा’, ‘साठेंचं काय करायचं’ अशी नाटकं येऊन बरेच दिवस झाले आहेत. आता या लेखकांनी लिहायला हवं. कदाचित ते ब्लॉक झाले असतील, ते वेगळे अर्थही लावत असतील. ते नक्की लिहितील, जेव्हा लिहितील तेव्हा या शांततेचा चांगला परिणामही दिसेल. आपण वाट पाहूया. तेंडुलकर म्हणायचे की मी काही फार मोठं केलं नाही, काळाने माझ्याकडून लिहवून घेतलं. तेच तसंच कुठेतरी असेल की, हा काळ लिहू देत नाहीए का? काळाचे पडसाद झिरपत नाहीत का, की झिरपूनही लेखकांना लिहिण्याचा आवेग येत नाहीए, की त्यांना लिहिण्याची भीती वाटतेय? पण जोपर्यंत त्यांना लिहिण्याची अपरिहार्यता वाटत नाही, तोपर्यंत ते लिहून होणार नाही.
तुमच्या काळात सामाजिक चळवळी उभ्या राहिल्या आणि त्याचा तेवढा परिणामही दिसत होता. पण सध्या ते होताना दिसत नाही, याबद्दल काय वाटतं?
चळवळींनी आमच्या पिढीची जाणीव वाढवली. आता चळवळी फार कमी झाल्या. आता त्या राजकीय हेतूंनी प्रेरित झालेल्या असतात. ज्या चळवळी होतायत त्या टिकत नाहीएत. ज्या माणसांवर विश्वास ठेवावा, ते थोडय़ा दिवसांनी फार वेगळे वाटतायत. फार वाईट काळ आपल्या वाटय़ाला सध्या आला आहे. एकीकडे ‘हेच चांगलं आहे,’ असं उच्च स्वरात सांगितलं जातं, तेव्हा बरं काही करणारी माणसं दबून जातात. पण काही चांगल्या गोष्टीही घडत आहेत. नाहीतर हा देश सोडून जावा लागेल. देश सोडायचं म्हटलं की त्याचाही बवाल होतो, त्याची जात-पात काढली जाते. हे एक वेगळं वातावरण आहे, पण त्यामध्ये आपण ठाम राहायला हवं. एखादी गोष्ट समजून घेऊन वेळच्या वेळी प्रतिसाद द्यायला हवा.
प्रसाद लाड – response.lokprabha@expressindia.com