शेखर जोशी – response.lokprabha@expressindia.com
चातुर्मास म्हणजे केवळ भरपूर सण, व्रतवैकल्य असे नसून त्याचा संबंध जीवनशैलीशीदेखील निगडीत आहे. ऋतुचक्राशी निगडित असणारे हे सण, व्रत एकूणच सात्त्विकतेशी जोडलेले आहेत.

आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत असणारा कालावधी ‘चातुर्मास’ म्हणून मानला जातो. हिंदू संस्कृतीत व्रत-वैकल्ये, उपास, पूजापाठ, अनुष्ठान, पारायण आदी धार्मिक कार्यासाठी हा चार महिन्यांचा कालावधी पवित्र समजला जातो. मराठी संस्कृतीमधील श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक असे चार महिने या चातुर्मास कालावधीत येतात. चातुर्मास कालावधीत ठिकठिकाणी धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. काळानुरूप चातुर्मास पाळण्याचे संदर्भ बदलले असले तरी आजही प्रत्येक जण श्रद्धावान माणूस जमेल तसे चातुर्मासाचे पालन करतो. त्यामुळे बदलत्या काळातही चातुर्मासाचे धार्मिक महत्त्व अबाधित आहे.

अंगाची काहिली करणाऱ्या वैशाख वणव्यानंतर (उन्हाळा) सर्वाना पावसाळ्याचे वेध लागतात. पहिल्या पावसानंतर सुटणारा मृद्गंध मनाला आणि शरीराला सुखावून टाकतो. रखरखीत झालेली धरणी पुन्हा हिरवीगार होणार असल्याची ती चाहूल असते. वाट पाहायला लावणारा हा पाऊस ज्येष्ठ महिन्यात सुरू होतो. आषाढ महिन्यातील त्याचे रौद्र रूप धडकी भरविणारे असते. पुढे श्रावणात पावसाचा जोर कमी होऊन ऊन-पावसाचा खेळ रंगतो. आणि या श्रावण महिन्यापासूनच पुढे भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक महिन्यापर्यंत आपल्या संस्कृतीत सण, उत्सव यांची रेलचेल असते. एकंदरीत श्रावण ते कार्तिक हे चार महिने आपल्याकडे एक उत्सव असतो आणि हाच उत्सव आपण ‘चातुर्मास’ म्हणून साजरा करतो. हिंदू संस्कृतीत व्रत-वैकल्ये, उपास, पूजापाठ, अनुष्ठान, पारायण आदींसाठी हा चार महिन्यांचा कालावधी पवित्र आणि महत्त्वाचा समजला जातो.

भारतीय ऋतुचक्राशी निगडित व्रते, उत्सव :

आषाढ शुद्ध एकादशीस ‘देवशयनी’ एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी देव झोपी जातात ते कार्तिक शुद्ध एकादशीस झोपेतून जागे होतात. त्यामुळे या एकादशीला ‘प्रबोधिनी’ एकादशी असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवसांत सूर्य कर्क राशीत असतो. भगवान श्रीविष्णूच्या उपासनेसाठी चातुर्मासाचा कालावधी सर्वश्रेष्ठ मानला जातो. चातुर्मासाच्या काळात काही नेम करावा, असे आपल्याकडे सांगण्यात आले आहे. केवळ पूजा, पारायण, व्रत किंवा धार्मिक कृतींपुरताच नेम मर्यादित नसून तो भोजनासाठीही सांगण्यात आला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत जी काही व्रत-वैकल्ये सांगितली आहेत किंवा आपले सर्व सण-उत्सव हे भारतीय ऋतुचक्राशी निगडित आहेत. याची सांगड आपले दिनचर्या, आहार-विहार यांच्याशी आपल्या पूर्वसुरींनी घालून ठेवली आहे. त्याचा संबंध आरोग्याशीही आहे हे विशेष. अमुक एक करा, तमुक एक करू  नका असे कोणाला सांगितले की पहिली प्रतिक्रिया का, कशाला अशीच असते. पण त्याला जर धार्मिकतेची जोड दिली, धर्माचा संबंध जोडला तर भीतीमुळे म्हणा किंवा जाऊ दे, अमुक एक केल्याने आपले नुकसान तर होणार नाही ना, मग करू या, अशा भावनेतून आपण जे नियम सांगितले आहेत, ते करायला तयार होतो. ऋषी-मुनींनी त्या त्या ऋतुमानात आपण कसे वागायचे याची सांगड सण-उत्सव आणि आपल्या आरोग्याशी घातली.

पावसाळ्याच्या कालावधीत आपली पचनशक्ती मंद झालेली असल्याने या काळात पचण्यास हलका आणि कमी आहार घ्यावा असे सांगितले आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेदही ते मान्य करतो. त्यामुळेच चातुर्मासाच्या कालावधीत पर्णभोजन (पानावर जेवणे), अयाचित (न मागता मिळेल ते जेवणे), एकवाढी (सर्व पदार्थ ताटात एकदाच वाढून घेणे), मिश्र भोजन (सर्व पदार्थ ताटात एकदाच वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे), एकभुक्त (फक्त एकदाच जेवणे) असा ‘नेम’ करण्यास सांगितले आणि त्याला व्रताची जोड दिली. हा ‘नेम’ म्हणजे आपल्या निरोगी शरीरासाठी उपयुक्त आणि गरजेचा आहे. चातुर्मासाच्या काळात तुळशीची पूजा आणि प्रदक्षिणाही व्रत म्हणून करावी, असे सांगितले आहे. तुळस ही कफ, वातशामक, जंतुनाशक आहे. पावसाळ्याच्या दिवसात होणारी सर्दी, खोकला, ताप आदी आजारांवर तुळस हे रामबाण औषध आहे. श्रावण महिन्यातील मंगळागौर हा खास महिलांसाठी असणारा सण. मंगळागौरी देवीची पूजा झाल्यानंतर रात्र विविध खेळ खेळून जागविली जाते. या खेळात फुगडय़ा, झिम्मा, पिंगा आणि अन्य काही खेळ असतात. शारीरिक आरोग्यासाठी हे सर्व खेळ पूरकच आहेत. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेशोत्सवासाठी ‘पत्री’ म्हणजे वेगवेगळ्या झाडांची पाने लागतात. या पत्रींमध्ये पिंपळ, बेल, शमी, दुर्वा, धोत्रा, तुळस, माका, बोर, आघाडा, रुई/मंदार, अर्जुन, मरवा, केवडा, आगस्ती, कण्हेर, मधुमालती, डोरली, डाळिंब, जाई यांचा समावेश असतो. या सर्व औषधी असून शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सार्वजनिक आरोग्य चांगले राहण्यासाठी उपयुक्त आहेत. गणपतीसाठी लागणाऱ्या पूजेच्या निमित्ताने का होईना या वनस्पतींचे जतन आणि संवर्धन होईल, असा उद्देश या मागे होता.

चातुर्मासाची सांगड दैनंदिन आहार-विहाराशी :

ज्येष्ठ पंचांगकर्ते विद्याधरशास्त्री करंदीकर यांनी सांगितले, एकूणच आपल्या ऋषीमुनींनी, पूर्वजांनी चातुर्मासातील सर्व व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांची सांगड दैनंदिन जीवनाशी आणि आरोग्याशी घातली आहे. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या कालावधीला चातुर्मास म्हणून ओळखले जाते. त्यातही चातुर्मासातील श्रावण महिन्यातच सर्वात जास्त व्रते आहेत असे दिसून येईल. श्रावण हे नाव श्रवण नक्षत्रावरून पडले असून श्रवण नक्षत्राची देवता भगवान विष्णू आहे. भगवान विष्णू यांना सृष्टीचा पालनकर्ता समजले जाते. त्यामुळे कोणत्याही देवाची पूजा केली तरी पूजेच्या शेवटी विष्णवे नमो, विष्णवे नमा: असे म्हणून विष्णूचे स्मरण केले जाते. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट विष्णूपासून निर्माण झाली ती परत विष्णूपाशीच पोहोचविणे हा यामागचा उद्देश आहे. श्रावण महिना म्हणजे पावसाचा मध्य. या काळात आपल्या पोटातील अग्नी मंद झालेला असल्याने व्रत-वैकल्य, उपास याच्या माध्यमातून आपले आरोग्य सांभाळणे हा या चातुर्मासाचा मुख्य उद्देश आहे. शरीराचा महत्त्वाचा अवयव आपले पोट. ‘पोट ठीक तर सर्व ठीक’ असे म्हणतात. त्यामुळे या दिवसात कमीतकमी आणि पचायला हलके असे खायचे असते. यालाच ‘नक्त’ व्रत असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यात गणेशोत्सवानंतर ‘महालय’ पक्ष येतो. त्याला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा असेही म्हणतात. महा म्हणजे मोठा आणि आलय म्हणजे उत्सव अशी त्याची फोड करून सांगता येईल. आपल्या कुटुंबातील दिवंगत झालेल्यांची आठवण करणे म्हणजे हा पंधरवडा आहे. पुढे अश्विन महिन्यात नवरात्रोत्सव येतो. वासंतिक आणि शारदीय अशी दोन नवरात्रे आपण साजरी करतो. दोन्हीचे वैशिष्टय़ म्हणजे वासंतिक नवरात्र गुढीपाडव्यापासून (चैत्र) आणि शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात येते. म्हणजे एक नवरात्र वर्षांच्या सुरुवातीला तर एक मध्यावर येते. अश्विन महिना म्हणजे पावसाळा संपून थंडीची चाहूल लागलेली असते. पावसाळ्यात मंद झालेल्या अग्नीला पुन्हा प्रज्वलित करण्याचा हा काळ असतो. कमकुवत झालेले शरीर बलवान करायचे असते. त्याची सुरुवात म्हणून या दिवसात एक धान्य फराळ, जे धान्य खाल ते भाजून खा, शक्तीचा संचय करा, असे सांगितले आहे.

पांडवांची शस्त्रे शमीच्या झाडावर 

नवरात्रोत्सव संपला की विजयादशमी अर्थात दसरा सण येतो. या दिवशी ‘अपराजिता’ नावाच्या देवीचे आणि शस्त्रांचे पूजन केले जाते. येथे एक संदर्भ लक्षात घेण्यासारखा आहे. पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या वृक्षावर ठेवली होती. त्यांनी दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करून शमीच्या झाडावरून शस्त्रे खाली काढली. ‘शमी गर्भात अग्नी’ असे वचन आहे. ऐरणीतील अग्नी जेव्हा प्रज्वलित करतात तेव्हा शमीच्या वृक्षाचीच लाकडे लागतात. जिथे अग्नी आहे तिथे लोखंड गंजत नाही. त्यामुळेच पांडवांनी आपली शस्त्रं शमीच्या वृक्षावर/ढोलीत ठेवली आणि वेळ आल्यावर त्याचा योग्य वापर केला. अश्विन महिन्यात आणि शरद ऋतूत येणाऱ्या या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. आरोग्यप्राप्तीसाठी हा उत्तम काळ मानला जातो. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत जागून नंतर आटवलेले दूध प्यायचे असते. अश्विनी नक्षत्राची देवता देवांचे वैद्य अश्विनीकुमार ही आहे. या काळात थंडीला सुरुवात झालेली असल्याने कफविकार वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी चंद्रप्रकाशात ठेवलेले आटीव गरम दूध पिऊन आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले आहे. चातुर्मासातील अश्विन/कार्तिक महिन्यात येणारा दिवाळी सण समृद्धीचे प्रतीक आणि आनंदाचा उत्सव आहे. कार्तिक महिन्यात येणाऱ्या कार्तिकी एकादशीनंतर चातुर्मासाची सांगता होते, अशी माहितीही करंदीकर यांनी दिली.

चातुर्मास आजच्या संदर्भात

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आहार-विहार याबाबतीत सर्व गोष्टी पाळता आल्या नाहीत तरीही जेवढे म्हणून शक्य असेल तेवढय़ा गोष्टी पाळल्या तर आपलेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. सध्या सर्वच क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आणि ताण-तणाव वाढले आहेत. यातून मन:शांती मिळविण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. आधुनिक विज्ञानानेही ताण-तणावापासून मुक्त होण्यासाठी ‘मेडिटेशन’ अर्थात ध्यान-धारणा करायला सांगितली आहे. चातुर्मासाच्या या काळात आपल्या इष्ट देवतेचे स्मरण, ठरावीक वेळेत शांत डोळे मिटून एका जागी मनात कोणतेही विचार न आणता बसून राहणे आपण करू शकतो. त्यासाठी आजच्या काळात जीवनाचा अविभाज्य भाग झालेले भ्रमणध्वनी, संगणक, दूरचित्रवाणी यापासून दूर राहण्याचा नेम आपल्याला करता येईल. दिवसभरातून ठरावीक वेळेतच मी भ्रमणध्वनी वापरेन, असे मनाशी ठरवू शकतो. ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण, महाभारत, दासबोध, अभंगगाथा यासारख्या धार्मिक ग्रंथांचे किंवा आपल्याला ज्या विषयाची आवड आहे त्या विषयाची पुस्तके या काळात आपण वाचण्याचे व्रत करू शकतो. नाहीतरी व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकच्या जमान्यात आपल्या प्रत्येकाचे वाचन कमीच झालेले आहे. चातुर्मासाच्या निमित्ताने का होईना तेवढीच आपल्याकडून काही चांगली पुस्तके वाचली जातील. ‘इडियट बॉक्स’ अर्थात दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका मी पाहणार नाही, कुटुंबीयांना वेळ देईन, त्यांच्याशी संवाद साधेन, गप्पा-गोष्टी करेन असेही ठरविता येऊ शकते. आपल्या घराजवळील वृद्धाश्रम, रुग्णालय, अनाथाश्रम येथे काही वेळ देऊन सामाजिक भानही जपता येऊ शकेल. चातुर्मासाला धार्मिकतेबरोबरच सामाजिक भान जपण्याची जोड देता आली तर आपल्या स्वत:साठीही हा चातुर्मास वेगळा आणि आनंददायी ठरेल.

म्हणून कांदा, लसूण वर्ज्य

चातुर्मासाच्या या काळात पावसाळा असल्याने एकूणच आपली पचनशक्तीही मंदावलेली असते. त्यामुळे या काळात कमी, हलका आणि पचायला सहज सोपा असा आहार घेणे सांगितले गेले आहे. कांदा, लसूण चातुर्मासात वज्र्य आहेत. मुळातच कांदा आणि लसूण हे पचायला जड आहेत. पचनशक्ती मंद झाल्याने तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाणेही आरोग्यासाठीही चांगले नाही. त्यामुळेच प्रू्वजांनी या चार महिन्यांत कांदा, लसूण खाऊ नका असे सांगितले आणि त्याला धार्मिकतेची जोड दिली. आषाढ महिन्यातील पहिली नवमी ‘कांदे नवमी’ म्हणून साजरी केली जाते. या दिवशी कांद्याची भजी करून खाल्ली जातात, कांद्याचा विपुल प्रमाणात वापर केला जातो. नंतर कांदा खाऊ नये त्यासाठी आधी ही सोय सांगितली आहे. मांस-मटण, मासे हेही पचायला जड असतात. त्यामुळे त्याचेही सेवन करू नये असे सांगितले गेले आहे.

Story img Loader