हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये चिलेशन थेरपी लोकप्रिय असली तरी तिच्याबद्दल त्यांना पुरेशी माहिती असतेच असं नाही. तिचे दुष्परिणाम समजेपर्यंत दुर्घटना घडून गेलेली असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नानावटी हॉस्पिटलच्या दरवाजातून बाहेर निघत असताना सहज समोरच्या बसस्टॉपवरच्या जाहिरात फलकावर नजर पडली. त्यावर लिहिलेले होते-
‘बायपास सर्जरी टाळा!
आमच्या आरोग्य केंद्राकडे
पाय वळवा!!
आमच्या येथे हृदयातील सर्व प्रकारचे ब्लॉक (block) साफ करून मिळतील. चिलेशन थेरपीने (chelation therapy) हृदयातील रक्तवाहिन्यांमधील अडथळे, ब्लॉक कोणत्याही शल्यचिकित्सेशिवाय, सर्जरीशिवाय नाहीसे करून मिळतील. संपर्क साधा इत्यादी.’
बसस्टॉपच्या बाजूलाच एका फाटक्या तंबूमध्ये देशी दवाखाना म्हणून बोर्ड लावला होता. त्यात वेगवेगळय़ा जडीबुटी ठेवलेल्या होत्या. बाजूलाच एका फलकावर मोडक्यातोडक्या भाषेत लिहिले होते-
‘सब मर्ज की दवा यहा मिलेगी. शारीरिक कमजोरी से लेकर मानसिक बिमारी तक, हृदयरोग से लेकर मज्जारोग तक, जवानी से हारे लोगों से संततिप्राप्ती तक सभी समस्यांओ का समाधान यहा मिलेगा.
हिमालयवासी बाबा कफनीनाथ जडीबुटीवाले..’
दोन्ही फलकांमध्ये मला बरेच साम्य वाटत होते. अशा फलकांद्वारे काही भोळय़ाभाबडय़ा रुग्णांना फसवण्याचा उद्देश एवढा स्पष्ट होता तरी पण लोक फसतात आणि अशा उपचार पद्धतींच्या मागे लागून आपल्या आरोग्याची अवहेलना करतात.
अ‍ॅन्जिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी याबद्दल वाटणाऱ्या भीतीमुळे हे रुग्ण अशा पद्धतीच्या औषधोपचाराकडे वळतात. प्रचंड प्रमाणात जो खोटा प्रचार केला जातो त्याला ही मंडळी बळी पडतात.
रात्री तीनला फोनची घंटी वाजली. होली स्पिरिट हॉस्पिटलच्या आय.सी.सी.यू.मधील डय़ुटी डॉक्टरचा फोन होता. आमच्या परिसरातील नगरसेविके चा नवरा हार्ट फेल्युअरने भरती झाला होता. त्याला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर (ventilator) ठेवून योग्य ते औषधोपचार सुरू केले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी रुग्णाला बघायला गेलो, त्या नगरसेविकेकडे विचारपूस केली, तेव्हा असे कळले की, रुग्णाने सर्व औषधे बंद करून चिलेशन थेरपी सुरू केली आहे. चिलेशन थेरपी देणाऱ्या डॉक्टरनेसुद्धा औषधे बंद करावी, असा सल्ला दिल्याचे समजले.
मला आठवते, या पाटील नावाच्या रुग्णाची मी अ‍ॅन्जिओग्राफी केलेली होती. त्याच्या हृदयाच्या दोन मुख्य रक्तवाहिन्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त अवरोध ब्लॉक होते. त्यांना लवकरात लवकर बायपास सर्जरी करून घ्या, असा सल्ला मी दिलेला होता, पण ते सर्जरी न करता चिलेशन थेरपीच्या नादी का लागले देवास ठाऊक!
प्रा. सदावर्ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापक. थोडेसे स्थूल व्यक्तिमत्त्व. पूर्वी कधी तरी चालताना छातीत दुखायचे म्हणून त्यांची अँजिओग्राफी केली त्यात सीव्हीअर ब्लॉक दाखवण्यात आले.
प्राध्यापक साहेब मला म्हणाले, ‘‘डॉक्टरसाहेब, चिलेशननं ब्लॉक विरघळतात हे मी कुठं तरी वाचलं आहे. ईडीटीए नावाच्या केमिकलने कॅल्शियम शरीराबाहेर फेकलं जातं हे मीसुद्धा मानतो. त्यामुळे मी बायपास सर्जरी न करता चिलेशन थेरपी घेईन. मग पुन्हा अ‍ॅन्जिओग्राफी करीन. जर ब्लॉक तेवढय़ाच प्रमाणात असतील किंवा वाढले असतील तर सर्जरी करीन. कमी झाले तर मी चिलेशन थेरपीचा पुरस्कर्ता होईन..’’
झाले! प्राध्यापक साहेबांनी एक वर्ष चिलेशन थेरपी- टोटल आर्टेरियल क्लिअरन्स थेरपी घेतली. जेव्हा एका वर्षांने त्यांची पुन्हा अ‍ॅन्जिओग्राफी केली तेव्हा रक्तवाहिन्यांमधील अवरोध ब्लॉक हा तसाच्या तसाच होता, किंबहुना थोडय़ा प्रमाणात वाढलेला होता. वैतागलेल्या प्राध्यापकांनी डोक्याला हात मारून पश्चात्ताप व्यक्त केला आणि आम्ही दिलेल्या सल्ल्यानुसार वागणार असल्याची ग्वाही दिली.
क्षीरसागर बाई आणि त्यांचा मुलगा उदास चेहऱ्यांनी माझ्या क्लिनिकमध्ये बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरून घरी काही तरी वाईट घडले आहे याची कल्पना येत होती; पण विचारू कसे, या विवंचनेत मी असताना क्षीरसागर बाईंनी हुंदक्यांना वाट करून दिली आणि रडतरडत त्या म्हणाल्या, ‘‘यांनी तुमचं ऐकलं असतं तर हे आज आपल्यात असते. ते त्या चिलेशन थेरपीच्या नादी लागले आणि जीव गमावून बसले.’’
मग मला आठवले, सहा महिन्यांपूर्वी वसंत गोपाळ क्षीरसागर यांची मी अ‍ॅन्जिओग्राफी केली होती आणि दोन स्टेंट टाकून अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला होता. आर्थिक कारणांमुळे किंवा थोडय़ा भीतीमुळे त्यांनी अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्याचे टाळले. वर्तमानपत्रातील जाहिरातीमुळे ते चिलेशन थेरपीच्या चक्रव्यूहात अडकले!
‘‘त्या चिलेशन थेरपीनेसुद्धा एक लाखाच्या खर्चात पाडलं की आम्हाला. तेवढय़ात ही प्लास्टी झाली असती की।’’ क्षीरसागर काकू बोलत होत्या, ‘‘तरी हे म्हणत होते की, काही दिवसांपासून छातीत दुखत आहे, पण हे चिलेशनवाले कुठं ऐकतात? गेले बिचारे जिवानिशी.’’
काकूंच्या दु:खाला शिव्याशापांची किनार आली.
असे किती तरी किस्से पाहायला, ऐकायला मिळालेत. किती तरी भरकटलेली, उद्ध्वस्त झालेली कुटुंबे जवळून पाहायला मिळाली. बऱ्याच जणांच्या बाबतीत फक्त ऐकायला आले, कारण बरीच कुटुंबे अनुभव सांगायला पुढेपण येत नाहीत, एवढी ती खचलेली असतात.
म्हणून हा लेख लिहिण्याचे प्रयोजन! चिलेशन थेरपी म्हणजे काय? त्यात नेमके काय करतात? त्याचे खरोखरच काही फायदे आहेत काय? त्याचे शास्त्रीय किंवा वैज्ञानिक औषधोपचाराच्या पद्धतीत स्थान काय? या सर्व गोष्टींचे वैज्ञानिक आणि वैचारिक विश्लेषण या लेखात अगदी निष्पक्षपातीपणे केलेलं आहे.
इतिहासाच्या पानांत डोकावताना
चिलेशन थेरपी यातील चिलेशन हा शब्द ग्रीक ‘चीले’ (chele म्हणजे पंजा) या शब्दापासून आला आहे. चिलेशन थेरपीमध्ये जे रसायन वापरतात ते असते, E.D.T.A. (Ethelene Diamine Tetra Acetic Acid) त्याची रासायनिक संरचना स्वरूप एखाद्या पंजाप्रमाणे (claw) असते.
१९३० साली हे द्रव्य सर्वप्रथम जर्मनीमध्ये तयार करण्यात आले आणि त्याचे सर्वाधिकार (patent) १९४१ साली अमेरिकेने स्थापित केले. ई.डी.टी.ए. हे पाण्यात (रक्तात) सहज विरघळणारे द्रव्य आहे आणि जड धातू, क्षार शोषून घेऊन ते लघवीवाटे शरीराबाहेर फेकण्यास मदत करते.
जेव्हा १९५२ मध्ये मिशिगन बॅटरी फॅक्टरीमध्ये अनेक कामगारांना जस्ताची विषबाधा झाली होती, तेव्हा या ई.डी.टी.ए. केमिकलचा औषधी म्हणून उपयोग करण्यात आला होता. त्याच्याद्वारे शरीरातील अतिरिक्त जस्त शरीराबाहेर लघवीवाटे उत्सर्जित केले गेले.
नंतर कालांतराने, १९५५ साली डेट्रॉइट, मिशिगन येथील शास्त्रज्ञ डॉ. नॉर्मन क्लार्क यांनी प्रतिपादन केले की, ई.डी.टी.ए. हे द्रव्य जर योग्य प्रमाणात शरीरात दिले गेले, तर शरीरातील अतिरिक्त कॅल्शियम आणि इतर हानिकारक जड धातू-क्षार यांचे योग्य प्रमाणात उत्सर्जन होऊ शकते. पुढे ते म्हणतात- ‘‘हे अतिरिक्त कॅल्शियम आणि जड धातू-क्षार हे हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे कढिणीकरण (Atherosclerosis), किडनीचे विकार (stones) आणि सांधेदुखी यांसारख्या आजारांचे कारण आहे. रक्तवाहिन्यांमध्ये हे क्षार, कॅल्शियम जमा होऊन रक्तवाहिन्या आपली लवचीकता हरवतात आणि त्यांच्या कढिणीकरणाला सुरुवात होते. नंतर पुढे रक्तवाहिन्यांमध्ये अवरोध (Blockage) निर्माण होऊन हृदयविकार होतो. जर ई.डी.टी.ए. अशा प्रकारच्या रुग्णांना दीर्घकाळ दिले, तर रक्तवाहिन्यांतील कढिणीकरण प्रक्रियांना आळा बसेल आणि त्यांच्यातील अवरोध कमी होण्यास मदत होईल.
या प्रायोगिक तत्त्वांना पुढे ठेवून १९५६ साली डॉ. नॉर्मन क्लार्क आणि डॉ. मोशय या दोन वैद्यकीय वैज्ञानिकांनी ई.डी.टी.ए.चा उपयोग हातापायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये अवरोध असलेल्या रुग्णांमध्ये सर्वप्रथम सुरू केला. नंतर १९६० साली डॉ. मेल्टझर यांनी हीच पद्धती हृदयविकारांच्या रुग्णांमध्ये वापरून पाहिली.
पुढे या दोन्ही प्रकारच्या रुग्णांचे डॉ. किटचेल यांनी विश्लेषण करून असा दावा केला की, ही ई.डी.टी.ए. थेरपी हृदयविकाराच्या रुग्णांना काहीही उपयोगी नाही. नंतर बरेच दावे-प्रतिदावे होत गेले.
१९७३ साली ‘अमेरिकन कॉलेज फॉर अ‍ॅडव्हान्समेंट इन मेडिसिन’ ही संस्था स्थापन झाली आणि या संस्थेने ‘चिलेशन थेरपी’चा व्यापक प्रसार सुरू केला.
नंतर डॉ. मॉर्टन वॉकर (१९८२, १९८५) आणि डॉ. इल्मर क्रॉटन (१९८९ आणि १९९०) यांच्या चार पुस्तकांनी चिलेशन थेरपीचा प्रचंड प्रमाणात प्रचार केला.
१९९० साली डॉ. इल्मर क्रॉटन यांचे ‘बायपासिंग द बायपास सर्जरी’ हे पुस्तक खूप गाजले आणि त्यानंतर चिलेशन थेरपीचा उपयोग मोठय़ा प्रमाणात होऊ लागला.
चिलेशन थेरपी देण्याची प्रक्रिया
ई.डी.टी.ए. हे रसायन ५० मि. ग्रॅ. प्रति किलो ५०० ते १००० मि. लिटर सलाइनमध्ये मिसळतात. हे ई.डी.टी.ए. निश्चित सलाइन रुग्णाला तीन ते चार तासांत शिरेमधून देण्यात येते. सोबत मोठय़ा प्रमाणात विटॅमिन बी आणि सी, मॅग्नेशियम, रक्त पातळ करण्याचे औषध haparin आणि लोकल अ‍ॅनास्थेस्टिक औषध देण्यात येते.
आठवडय़ातून तीनदा अशी औषधोपचार पद्धती देण्यात येते. अशी एकूण ४० ते १०० सीटिंग पूर्ण करण्याचा सल्ला चिलेशन थेरपी देणारी व्यक्ती देते.
सोबतच जीवनातील ताणतणाव कमी करणे, जीवनशैलीत योग्य असा बदल करणे, दारू आणि तंबाखू वज्र्य करणे, आहारात योग्य बदल करणे, योगधारणा यांबद्दल मार्गदर्शन करण्यात येते. या सर्व बाबी नक्कीच लाभदायक आहेत हे असंख्य प्रयोगांनी सिद्ध झाले, पण चिलेशन थेरपीची उपयुक्तता मात्र कुठल्याच प्रयोगांनी सिद्ध झालेली नाही, किंबहुना जी काही रुग्णांमध्ये सुधारणा होते, ती या अंगीकारलेल्या जीवनातील बदलांमुळेच (उदा. योग, जीवनशैलीतील बदल, ताणतणावांचे नियोजन, योग्य आहार-आचार-विचार-विहार) होते. चिलेशन थेरपीमुळे नाही, असे म्हणणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
असा हा चिलेशन थेरपीचा कार्यक्रम एक वर्ष चालतो, त्यावर सत्तर हजार ते एक लाख रुपये खर्च होतो. रुग्णाला किती फायदा होतो हे मोठे प्रश्नचिन्ह आहे; पण चिलेशन देणाऱ्या व्यक्तीला मात्र नक्कीच आर्थिक फायदा होतो हे खरे!
चिलेशन औषधोपचार पद्धतीचे दुष्परिणाम
आर्थिक दुष्परिणामाव्यतिरिक्त या थेरपीचे असंख्य दुष्परिणाम आहेत:
१) शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन हृदयाच्या गतीची अनियमितता (arrhythmias), हृदयाच्या स्नायूंची कमजोरी (heart failure), शरीराच्या इतर स्नायूंची कमजोरी (tetany) होऊ शकते.
२) ई.डी.टी.ए.सोबत जड धातू आणि क्षार मूत्रपिंडात अडकून निकामी होण्याचे प्रमाण खूप अधिक आहे.
३) ज्या शिरेतून हे औषध दिले जाते, त्या शिरेचे आजार (Thrombophlebitis, Vasculities) आणि तेथील त्वचेचे विकार (Dermatitis) खूप प्रमाणात आढळतात.
४) ई.डी.टी.ए. आणि इतर पदार्थाची अ‍ॅलर्जी होऊन शरीरावर चट्टे येणे (Urtiearia), खाज येणे, लाल व्रण येणे किंवा कधीकधी तीव्र प्रकारची जीवघेणी अशी रीअ‍ॅक्शन येऊ शकते.
५) ई.डी.टी.ए. थेरपीच्या वेळी ताप येणे, घाम येणे, हातपाय दुखणे, उलटी होणे, रक्तातील श्वेतपेशी कमी होणे यांसारखे प्रकार नेहमीच घडतात.
चिलेशन थेरपीचे खरे स्थान काय आहे?
१९६३ ते १९८५ सालात ज्या रुग्णांनी या औषधोपचार पद्धतीचा अवलंब केला, त्यांचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करण्यात आला आणि असा निष्कर्ष काढण्यात आला की- ‘चिलेशन थेरपी ही अत्यंत निरुपयोगी थेरपी असून तिचा रुग्णाला काहीही फायदा होत नाही, किंबहुना नुकसानच होते.’
हीच गोष्ट जर्मनीच्या डॉ. कर्ट डिहीम (हिडलबर्ग युनिव्हर्सिटी) आणि डॉ. हॉफ (फ्रँकफर्ट विद्यापीठ) यांनी मोठय़ा प्रमाणात केलेल्या चाचण्यांद्वारे सिद्ध झाली. डॉ. हॉफ यांनी तर चिलेशन थेरपीच्या अगोदर आणि नंतर अ‍ॅन्जिओग्राफी करून या थेरपीमध्ये काही तथ्य नसल्याचे दाखवून दिले.
१९९२ मध्ये डेन्मार्कच्या शल्यचिकित्सकांनी, २००४ मध्ये डॉ. विलारूस आणि इतर शास्त्रज्ञ, २००५ मध्ये डॉ. हेव्हस यांनी हीच गोष्ट वारंवार सिद्ध केली.
आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संघटनांचे मत
अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी (ए.सी.सी.) (१९८५, १९९०), अमेरिकन हार्ट असोसिएशन (ए.एच.ए.) (१९८९), अमेरिकन मेडिकल असोसिएशन (ए.एम.ए.) (१९८४), अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ फॅमिली फि जिशन (ए.ए.एफ.पी.) (२००५) आणि ए.एच.ए. व ए.सी.सी. गाइडलाइन्स (२००९) प्रमाणे-
‘चिलेशन थेरपी ही अत्यंत निरुपयोगी अशी औषधोपचार पद्धती असून तिचा रुग्णाला काहीच फायदा होत नाही, किंबहुना नुकसानच होते. म्हणून या उपचार पद्धतीचा अवलंब कोणी करू नये.’
अशा जागतिक स्तरावरील मान्यवर संघटनांनी याबाबत स्पष्ट, परखडपणे, सूचनात्मक जाणीव करून दिली आहे.
यू.एस.एफ.डी.ए. या मान्यवर संस्थेची या औषधोपचार पद्धतीने उपचार करण्यासाठी अमेरिकेमध्ये अधिकृत मान्यता नाही.
यू.एस. फेडरल ट्रेड कमिशन (एफ.टी.सी.) आणि यू.एस. नॅशनल कौन्सिल अगेन्स्ट हेल्थ फ्रॉड यांच्या मते, चिलेशन थेरपी ही अनैतिक आणि मूल्यहीन असा आरोग्यसेवेचा फ्रॉड आहे. त्यावर बंदी अत्यावश्यक आहे.
भारतातील आरोग्यसंहितेत चिलेशन थेरपीचे स्थान
भारतातील कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया (ए.पी.आय.) आणि इंडियन एफ.डी.ए. या मान्यवर संघटनांच्या मते चिलेशन थेरपी ही अनधिकृत आणि अयोग्य अशी उपचार पद्धती असून तिचा पुरस्कार करणे हे रुग्णावर अन्याय करण्यासारखे आहे. अशा पद्धतीवर कायमची बंदी आणण्याची मागणी या मान्यवर संघटना करीत आहेत.
चिलेशन थेरपी देणारे चिकित्सक मात्र स्वत: किंवा आपल्या नातेवाईकांना काही हृदयविकार असेल, तर हृदयरोगतज्ज्ञ असलेल्या डॉक्टरकडे पाठवतात. योग्य अशा व्यक्तीकडून औषधोपचार करून घेतात. स्वत:च्या जवळच्या नातेवाईकांवर यांनी चिलेशन थेरपीचा वापर केला आहे का, हा प्रश्न चिलेशन थेरपी देणाऱ्या चिकित्सकांना जरूर विचारावा.
सामान्य रुग्णांनी आता जागृत होण्याची वेळ आली असून अशा सुशिक्षित, पण वैद्यकीय सेवा करणाऱ्या भोंदूबाबांपासून सावध राहावे.
डॉ. गजानन रत्नपारखी – response.lokprabha@expressindia.com