स्पेशल न्यू इयर केक कापताना सगळी सोसायटी एकसाथ नवीन वर्षांला भेटायची.. शुभेच्छांची देवाणघेवाण झाल्यावर निघताना प्रत्येकाच्या हातात गोड केकचा तुकडा आणि मनात साठवलेलं एक न्यू इयर असायचं..
‘‘ए मी काय म्हणतो, या वर्षी ना इथे काही सेलिब्रेट नको करू या, मस्तपकी बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ कॉन्ट्री काढून आणि भारी ठिकाणी जाऊ या. काय बोलता?’’ एकजण हळूच पिल्लू सोडायचा, ‘‘नको रे अन् खूप उशीर झालाय तसं पण, बुकिंग वैगेरे फुल झालं असणार आणि जे नाही झालंय त्याच्या किमतीत तर आपली पुढची चार न्यू इयर्स सेलिब्रेट होतील.’’ कोणीतरी टचकन टाचणी टोचल्यागत त्या प्लानमधली हवा काढून घ्यायचा, ‘‘अरे त्यापेक्षा आपण सगळे मस्त डिनरला जाऊ ना बाहेर, एकदम लॅव्हिश डिनर करू.’’ पुन्हा कुणाचं तरी दुसरं पिल्लू.. ‘‘ए लॅव्हिशवाल्या ते पशांचं जाऊ दे, जागा मिळेल का बसायला अन् इतकी गर्दी असणार की हॉटेलच्या रांगेतच नवीन वर्ष सेलिब्रेट करावं लागेल’’ अन् अजून एक फुगा शहीद! ‘‘मग मी काय म्हणतो..’’ ची गाडी पुढे अजून आर्धा तास गोल गोल फिरायची आणि पुन्हा आपल्या मूळ स्थानी परत..‘‘जाऊ दे, नेहमीचाच कार्यक्रम करू या.’’ या फुग्याला फोडण्याची हिंमत मात्र कोणत्याच टाचणीला व्हायची नाही. कारण तोपर्यंत संपलेले असायचे की सगळे फुगे!
मग सगळ्यांना कामं नेमून दिली जायची. पताका कोण लावणार, लाइटिंग कोण करणार, स्टेजची, माईकची व्यवस्था कोण करणार, अगदी मोठय़ा इव्हेंटसारखी नववर्षांच्या स्वागताची जय्यत तयारी असायची. रात्रीच्या थंडीत कट्टय़ावर प्लानिंग करत बसणं राघवला मनापासून आवडायचं. एकतर नवीन वर्ष येतंय आणि दुसरं म्हणजे गॅलरीतून ती त्याच्याकडे कुतूहलाने डोकावून बघतेय. गुलाबी थंडीचा रंग मग राघवच्या गालावरसुद्धा चढायचा आणि मग त्याच्या मनातलं ख्रिसमस गिफ्ट्ससुद्धा तेव्हाच मनोमन ठरून जायचं..
कमवायला लागल्यापासून लहानग्यांना ख्रिसमस गिफ्ट्स आणण्याची जबाबदारी राघवकडे असायची. न्यू इयरसाठी सजलेल्या बाजारातून ठिकठिकाणी ख्रिसमस डोकावायचा. ऋषी आणि विवेकसाठी रिमोटवर चालणाऱ्या गाडय़ा, लहान्या उज्ज्वल, तन्वीसाठी उडय़ा मारत चालणारी कोंबडी, दीप्तीसाठी मोठी रंगपेटी, सोसायटीतल्या लहानग्या सचिनसाठी नवी बॅट..सोसायटीतल्या बच्चेकंपनीला खेळणी आणि गिफ्ट्स घेताना राघवचं बालपण त्याचं बोट धरून त्याच्यासोबतच फिरायचं. आणलेली गिफ्ट्स वाटण्याची जबाबदारी कित्येक वर्षांपासून सोसायटीतल्या वर्गीस अंकलकडे असायची, तेसुद्धा कुठूनतरी सांताक्लॉजचा पोशाख. ती पांढरीशुभ्र दाढी-मिशी आणून सगळ्यांची हौस पुरवायचे.. एकदा ख्रिसमसला राघवने थोडं धाडस करून एक स्पेशल गिफ्ट घेतलेलं. ते कसंबसं घरच्यांपासून लपवत, हळूच कोणाच्याही लक्षात येऊ नये इतक्या शिताफीने तिच्यापर्यंत पोचवलेले ते इअरिरग्स.. त्या दिवशी त्याला उगीचच वर्गीसकाकांसारखं सांताक्लॉज असल्याच फििलग येत होतं..
राघवची सोसायटी खऱ्या अर्थाने एक ‘सोसायटी’ होती. बंद दारांपाठी असूनसुद्धा सारी घरं इथे मनाने जोडलेली होती. सण विशिष्ट धर्मासाठी नसून सगळ्यांना साजरे करण्यासाठीच असतात असा इथल्या लोकांचा ठाम विश्वास होता, म्हणूनच पाडव्यापासून ईदपर्यंत सगळे सण एकत्रच साजरे व्हायचे, त्यातपण न्यू इयर पार्टीचा मूड जरा वेगळाच असायचा. ठरल्याप्रमाणे पावभाजी, मिसळ पाव, बिर्याणी असे बेत असत, पण त्यावर दरवर्षीचा मेन्यू असूनसुद्धा सारे यथेच्छ ताव मारायचे. नंतर सोसायटीच्या व्हरांडय़ात घातलेल्या स्टेजवर दिनूकाकांचे हत्ती-मुंगीचे जोक्स, रानडेकाकांची स्पेशल साउंड इफेक्ट्सह रंगलेली भुताची गोष्ट, दिनेशच्या नवकविता, राधाकाकू आणि त्यांच्या मिस्टरांचे लता-रफींचे ड्युएट्स रंगायचे आणि गार गुलाबी थंडीत न्हाताना हळूच नवीन वर्ष यायचं. ठीक १२ वाजता आणलेला स्पेशल न्यू इयर केक कापताना सगळी सोसायटी एकसाथ नवीन वर्षांला भेटायची.. शुभेच्छांची देवाणघेवाण झाल्यावर पांगापांग व्हायची, निघताना प्रत्येकाच्या हातात गोड केकचा तुकडा आणि मनात साठवलेलं एक न्यू इयर असायचं..
केकवरून अचानक राघवला काहीसं आठवलं. त्याने फ्रिजमधून खास त्याच्यासाठी आलेल्या सुझी आंटीच्या हातच्या प्लम केकचा बॉक्स उघडला, त्यावर लिहिलं होतं डिअर सन राघव.. सुझी आंटीसाठी राघव म्हणजे त्यांचा मुलगाच होता. लहानाचा मोठा होताना सुझी आंटीचं घर म्हणजे राघवचं दुसरं घर होतं. इतकी र्वष सुझी आंटीच्या हातच्या प्लमकेकला सोकावलेल्या राघवसाठी या वेळीही स्वत: केलेला केक पाठवला. वाफाळती कॉफी केव्हाच थंडगार झाली होती. राघवचं मन मात्र त्या आठवणीच्या उबेने स्क्रीनवर दिसणाऱ्या फोटोजच्या कुशीत अलगद स्थिरावलं होतं. सुयशने राघवला पाठवलेले त्याच्या न्यू इयर सेलिब्रेशनचे फोटोज. नोकरीनिमित्त अमेरिकेत गेलेला राघव कित्येक र्वष भारतात परतलाच नव्हता. आज मात्र तो अगदी त्याच्या बिल्डिंगच्या कट्टय़ावर जाऊन बसलेला. त्याने काचेतून बाहेर पाहिलं, सगळीकडे ख्रिसमसचा खुमार चढला होता. नव्या वर्षांची लोक आतुरतेने वाट पाहत होते आणि राघव मात्र सुझी आंटीच्या हातचा प्लमकेक खात त्याच्या गुलाबी थंडीत रमला होता.. जुन्या आठवणींना नव्याने उजाळा देऊन..!
प्राची साटम – response.lokprabha@expressindia.com