नाशिकमध्ये नाताळची लगबग साधारणत: आठवडाभर आधीपासून सुरू होते. या काळात सलग दहा दिवस धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी कार्यक्रमांची रेलचेल असते. घरगुती स्तरावरही खास कार्यक्रमांची आखणी होते.
नाशिक शहर परिसरातील ख्रिस्ती बांधव आणि चर्चच्या आवारातून ‘जिंगल बेल.. जिंगल बेल.. जिंगल ऑल द वेल..’ चे सूर कानी पडण्यास सुरुवात झाली की, नाताळ सण जवळ आल्याचे समजावे. दिवाळीत ज्याप्रमाणे सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण अनुभवयास मिळते तितक्याच अभूतपूर्व उत्साहात नाशिक शहर परिसरात नाताळ साजरा होतो. या उत्साहाला महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळाच्या सहकार्याने सामाजिक बांधिलकीची जोड लाभल्याने उत्सवाची रंगत उत्तरोत्तर वाढत आहे.
नाशिक शहरात बाळ येशू मंदिरासह शतकाची वाटचाल करणारे सेंट आंद्रिया चर्च, शालिमार परिसरातील चर्च, त्र्यंबक नाका होली क्रॉस यासह जेलरोडवरील संत अॅना, देवळाली कॅम्पस्थित सेंट पॅट्रिक आदी चर्चमध्ये नाताळची लगबग साधारणत: आठवडाभर आधीपासून सुरू होते. इतर धर्माप्रमाणे ख्रिस्ती समाजातही काही पंथ आहेत. त्यातील काही केवळ येशूची आराधना करतात, तर काही येशू आणि त्यांची आई मेरी यांची प्रार्थना करतात. पंथ वेगवेगळे असले तरी नाताळ साजरा करण्याच्या त्यांच्या उत्साहात फरक पडत नाही. त्यांची भावना आणि उत्साह एकसारखाच असतो. नाताळच्या काळात सलग दहा दिवस धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी कार्यक्रमांची रेलचेल असते. घरगुती स्तरावरही खास कार्यक्रमांची आखणी होते. मुळात ‘ख्रिसमस’ शब्दाचा अर्थ येशूच्या जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना असा आहे. चर्चमधील एका पथकाला ‘कॅरेल’ म्हणण्यासाठी घरी निमंत्रित करण्यात येते. या पाश्र्वभूमीवर, ‘मिसा’ या धर्मग्रंथाचे सामूहिक वाचन व माळ जप होते. धार्मिक कार्यक्रमांच्या लगबगीत घर तसेच चर्च परिसरात येशूच्या जन्माचा देखावा तयार करण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू होते. मंगल कामनेचे प्रतीक म्हणून ‘ख्रिसमस ट्री’ला सजावटीत खास महत्त्व आहे. या उत्सवाच्या माध्यमातून धार्मिकतेसोबत सामाजिकता जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. त्या अनुषंगाने समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
या वेळी प्रसाद म्हणून केक देण्याची प्रथा असल्याने विशेष प्रकारच्या पुडिंगसह खेडय़ापाडय़ांत तांदळाच्या रव्यापासून तयार करण्यात आलेले केक व केळी जेवणात खास पदार्थ म्हणून वापरले जातात. चर्चला विद्युत रोषणाईसह आकर्षक सजावट करण्यात येते. येशू जन्माचा देखावा, ख्रिसमस ट्रीची सजावट पाहण्यासारखी असते. सांताक्लॉज चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करतो. त्याच्याकडून मिठाई वा मिष्टान्नांचे वाटप होते. वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या जातात.
नाताळ उत्सवाचे वेगळेपण होली क्रॉस चर्चचे फादर वेन्सी डिमेलो यांनी मांडले. महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळाच्या माध्यमातून नाताळ साजरा करताना आम्ही धर्म आणि परंपरा यापलीकडे विचार करतो. नाताळसाठी ‘सी’ या पंचसूत्रीवर आमचा भर असतो. त्यात नाताळ शुभेच्छा पत्र, कॅरल म्हणजे प्रार्थना, क्रिप अर्थात येशू जन्माचा गोठय़ातील देखावा, क्रॅकर्स म्हणजे फटाक्यांची आतषबाजी आणि केकचे वाटप. यापलीकडे जाऊन ‘कन्फेशन’ अर्थात प्रायश्चित, कमिटेड, कन्सर्न, कम्पेशन आणि ‘क्रिएटीव्हिटी’ला प्राधान्य देण्यात येते. उत्सव काळात आदिवासी पाडय़ावरील ग्रामस्थ तसेच नैराश्याने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जातो. नाताळ शुभेच्छा पत्रापेक्षा गरिबाला शिधापत्रिका मिळवून देणे, शिक्षण आणि आरोग्य या विषयावर आम्हाला काम करायचे असल्याचे डिमेलो यांनी सांगितले.
या वर्षी ‘धर्मापलीकडचा धर्म’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. सेंट जॉर्ज सायरन चर्चचे फादर जिओस आयसक यांनी प्रभु येशूच्या आईला मानणारा आमचा पंथ असल्याचे नमूद केले. आमची इंदिरानगर, वडाळा रोड, उपनगर, जेल रोड तसेच कामटवाडा परिसर येथे प्रार्थनास्थळे आहेत. एक डिसेंबरपासून नाताळ उत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने उपवास सुरू होतो. १६ ते २३ डिसेंबर या कालावधीत सायंकाळी घरी जाऊन कॅरल गायले जाते. प्रभु येशूकडे सामूहिक प्रार्थना, २४ डिसेंबरला रात्री चर्च परिसरात मुख्य पूजा आणि २५ डिसेंबरपासून धार्मिक कार्यक्रमासह सामाजिक बांधव या ठिकाणी येऊन एकमेकांना शुभेच्छा देतात. सर्वाना केक दिला जातो. एक जानेवारी रोजी सर्व चर्च एकत्रित सामूहिक कार्यक्रम करत असल्याचे त्यांनी सांगितले. सजावट, केक, देवाची प्रार्थना, देखावा यावर आमचा भर असतो, असेही त्यांनी नमूद केले.
चारुशीला कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com