‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ हा कार्यक्रम तीन वर्षांपूर्वी सुरू झाला. यातले कलाकार उत्तम असले तरी कार्यक्रमात हिणकस विनोदाचं लोण पसरलं होतं. त्यामुळे सो कॉल्ड हसवणाऱ्या या शोचंच आता हसं झालं आहे.
हसणं आणि हसवणं दोन्ही कठीणच. खळखळून उत्स्फूर्त हसावं असे प्रसंग मोजकेच घडतात आणि समोरचा आपली व्यवधानं, दु:ख विसरून हसेल यासाठी आपल्याकडे संवादाचं विशेष कौशल्य असायला हवं. गेल्या तीन वर्षांत भारतीय टेलिव्हिजनचा कॉमेडी स्टार बिरुदावली पटकावलेल्या कपिल शर्मा नामक व्यक्तीला दोन्ही जमतं- हसणं आणि हसवणंही. हाच त्याचा यूएसपी. स्टॅण्डअप कॉमेडिअन कपिलला केंद्रस्थानी ठेवून कलर्स वाहिनीने ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ हा कार्यक्रम तीन वर्षांपूर्वी लाँच केला. जराही हसू येणार नाही अशा स्किट्सरूपी कॉमेडी शोंची विविध वाहिन्यांवर चळत मांडलेली असताना हा शो लाँच करणं आव्हान होतं. पण अवघ्या तीन वर्षांत सर्वाधिक टीआरपी मिळालेला स्क्रिप्टेड शो हा मानही मिळवला. काही दिवसांपूर्वीच हा शो बंद होणार असल्याची बातमी थडकली आणि मनापासून आनंद झाला. तुम्ही अचूक वाचलंत- आनंदच झाला. हिणकस विनोदाचा फार्स अखेर बंद होतोय म्हणून हा आनंद!
कपिल, त्याची पत्नी, आजी आणि आत्या हे कोअर कुटुंब, सोबती आणि येणारे पाहुणे असा हा कॅनव्हास. यापैकी कपिल पुरुष आहे आणि तो पुरुषाचीच भूमिका करतो. मात्र बाकी सगळे पुरुष महिलांच्या भूमिकेत असतात. बॉलीवूड इंडस्ट्री, टीव्ही विश्व, मुंबई, महाराष्ट्र आणि आपला भारत यापैकी कुठेही पुरुषांमागचं स्त्रियांचं प्रमाण एवढं घटलेलं नाही की महिलांच्या रोलसाठी कोणी मिळू नये. पुरुषांनी महिलांची भूमिका करणं गैर नाही, पण तसं करताना बेंगरुळ, कुरूप, बीभत्स आणि हिडीस दिसणार नाही याचं तरी भान जपायला हवं. कुलीन, शालीन याची अपेक्षा नाहीच, पण किमान जे पडद्यावर दिसतंय ते किमान ग्रेसफुल तरी असावं.. ‘औरतों की इज्जत करे’ या तळटीपेसह संपणाऱ्या कार्यक्रमात महिलांची उडवली जाणारी खिल्ली, केला जाणारा अपमान अजूनही तमाम फेमिनिस्ट मंडळींपर्यंत पोहोचलेला नाही हेच आश्चर्य..!
भारतातल्या कोणत्याही संस्कृतीत महिला घरात दाखल होणाऱ्या कोणत्याही व्यक्तीशी बोलताना विशिष्ट गोष्टी फॉलो करतात. अनोळख्याा व्यक्तींना मिठय़ा-पाप्या, गदगदा हलवणं, मांडीवर बसणं, थिल्लर डान्स करणं असं कोण वागतं? दादी म्हणजे आजी. कुठल्याही घरात आदरणीय असणाऱ्या आजीला कपिलच्या शोने माकडचाळे करायला भाग पाडलं. येईल त्याच्याशी फ्लर्ट करणारी आत्या कुठल्या घरात असते? विनोद वेगवेगळ्या प्रकारचा असतो. शब्दच्छल, कोटी, व्यंगात्मक, उपहासात्मक, परिस्थितीजन्य असे अनेक प्रकार. पण कपिल्याच्या शोमध्ये जाडेपणावरून, रंगावरून, लग्न न होण्यावरून हिणवलं जाणाऱ्या टोमण्यांना विनोद म्हणतात. तीन वर्षांनंतरही विनोदाची कारणं बदललेली नाही. कोणाचा अपमान करून, खिजवून हसवण्याला काय अर्थ आहे?
आदर देण्याला प्रत्येक संस्कृतीत महत्त्व आहे, आपल्या संस्कृतीत अधिकच. कपिल सातत्याने शोमध्ये घरात काम करणाऱ्या माणसांना ‘दो टके के नोकर’ म्हणतो. हा कसला माज. कपिलचा शो यशस्वी होण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे तो स्वत: तृतीयपर्णी एलिट कल्चरचा नाही. ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ असं काही अभिनेत्रींचं वर्णन होतं. कपिल हा असा आपल्या शेजारपाजारचा वाटतो. त्याचे किस्से, अनुभव पॉप्युलर कल्चरचे असतात. भल्याभल्यांना तो चिमटे काढतो, कोपरखळ्या लगावतो. त्याच्या बोलण्यात, वावरण्यात सहजता आहे. त्याचं पटापटा स्पीडने बोलणं, पंचेसचं टायमिंग अफलातून आहे. ते प्रेक्षकांना भावतं. हे एन्कॅश करायचं सोडून वजाट दर्जाच्या गोष्टींवर लोकांना हसवतो असं म्हणणं कीव आणतं.
बरं कपिलच्या घरात सेलिब्रेटी येतात. हल्ली चित्रपटापेक्षा प्रमोशन महत्त्वाचं असतं. चित्रपट तयार झाला की न्यूजपेपर, न्यूज चॅनेलांच्या ऑफिसांच्या पायऱ्या झिजवणं, कॉलेजांना, सीसीडीला भेटी देणं याप्रमाणे कॉमेडी नाइटससदृश शोमध्ये जाऊन तासभर त्यांची नौटंकी सहन करणं याचेही सेलिब्रेटींना पैसे मिळतात. पोटाची खळगी भरण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये धक्के, धूळ, प्रदूषण खात माणसं पाच तास प्रवास करतात. मग सेलिब्रेटींना पैसे मिळत असतील तर कपिलचे शेलकी टोमणे, एसी स्टुडिओत बाई झालेल्या पुरुषांकडून आपली करमणूक करून घेण्याला त्यांची हरकत नसतेच. अगदी अमिताभ बच्चनपासून रणबीर कपूपर्यंत सगळे इथे येतात. थिल्लरपण़ा सहन करतात, सेल्फी काढतात आणि किती मज्जा असं म्हणावं लागतंच त्यांना- कारण सवाल प्रमोशनचा आहे. कपिलच्या शोमध्ये प्रेक्षकही असतात. बायका, लहान मुलंही असतात. त्यांनाही बाईच्या कपडय़ात दिसणाऱ्या पुरुषांच्या लीला बघताना काही छचोर बघतोय असं वाटत नाही. कदाचित त्यांनाही पैसे मिळत असावेत. प्रेक्षकांचा किमान स्वार्थ असतो- एरवी टीव्हीच्या पडद्यावर, गाडीत बंद काचांआड, बाऊन्सर्सच्या गराडय़ात असणाऱ्या सेलिब्रेटींना अनुभवता येतं.
या प्रेक्षकांच्या जोडीला एक लाफ्टर मशीनही असतं- नवज्योतसिंग सिद्धू. हसावं असं काही घडण्याआधीपासून सिद्धू हसत असतो. का तर पैसे मिळतात. खासदार, माजी क्रिकेटपटू, समालोचक असणारा माणूस एवढा हास्यास्पद असेल यावर विश्वास बसणं अंमळ कठीण आहे, पण टीव्हीमुळेच हा विश्वास दृढ झाला आहे. सामान्य माणसाला असंख्य प्रश्नांनी वेढलेलं असतं. या प्रश्नांची तीव्रता अच्छे दिनची बतावणी कमी करू शकलेली नाही. तर अशा समस्त वर्गाला सास-बहू, कटकारस्थानं, प्रेमप्रकरणं यापासून सुटकारा हवा असतो. डेली सोप पाहायची तर रोजच्या रोज कालपर्यंत काय घडलं याचं बॅगेज राहतं. या सगळ्यातून बाहेर पडत कपिल, कलर्स यांनी ‘येथेच छापून येथेच प्रसिद्ध’ सॉर्टऑफ कार्यक्रम अंगीकारला. नॉव्हेल म्हणजे चेतन भगतएवढीच रेंज असणाऱ्यांपासून, बेसिक हिंदी कळणारा वर्ग, सेलिब्रेटी माणूस म्हणून कसे वागतात याची अपार उत्सुकता असणारा चमू, दिवसभर काम केल्यानंतर दमून-भागून आलेला कष्टकरी अशा सगळ्यांसाठी हा शो चांगलं निमित्त ठरलं. कपिल मंडळींचा विनोद अंगविक्षेपी आणि हीन आहे हे समजण्यासाठी निखळ विनोद काय असतो हे पाहिलेलं, अनुभवणं गरजेचं. पण हे न अनुभवलेल्या वर्गासाठी कॉमेडी म्हणजे कपिल असा बेंचमार्क झाला. बेंचमार्कच एवढा खुजा असेल तर काय बोलणार.. कपिल आणि त्याचे सहकलाकार गुणी आहेत यात तिळमात्रही शंका नाही. सकस कंटेट आणि आहे त्या जैविक अवतारात काम मिळालं तर ही मंडळी धमाल करतील.
भारतात टीव्ही दिसायला लागल्यापासून अगदी आतापर्यंत असंख्य उत्तम विनोदवीर घडले. गुदगुल्या करणारा विनोद कोणालाही हवाहवासा असतो. हसणं ही गरज आहे. साहजिकच हसणंकेंद्रित कोणताही कार्यक्रम आपल्यासाठी स्ट्रेसबस्टर होऊ शकतो. पण कर्कश आवाज, उडय़ा मारणं आणि सर्कशसदृश हालचाली यामुळे हसणं कमी आणि ताप जास्त होतो. हसण्याचे फायदे माननीय गुगल तुम्हाला लगेच सांगेल. भल्या पहाटे सार्वजनिक ठिकाणी अक्राळविक्राळ हसणाऱ्या माणसांचा लाफ्टर क्लब हा जसा उपद्रव ठरतो तसाच हे शोपण वात आणतात. आपण नाइलाजास्तव असंख्य गोष्टी करतो. किमान हसणं तरी मनापासून यायला हवं.
गंमत म्हणजे कॉमेडी नाइट्सला फॅमिली शो म्हटलं जातं. पहिली-दुसरीपासून कॉमेडी नाइट्स पाहणारी मुलं त्याच छापाचे विनोद करणार, सांगणार आपल्या दोस्तांना. विनोदाचा आयक्यू पालकांनीच खाली आणून ठेवला तर ‘देख भाई देख’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘खिचडी’, ‘फ्लॉप शो’, ‘जबान संभाल के’, ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ यातला सॉफ्ट विनोद कसा आणि कधी कळणार? कॉमेडी नाइट्स आवर्जून पाहणारा सुजाण वर्गही आहे. पण हीच मंडळी साध्या- सोप्या विनोदाला तशीच दाद देऊ शकतील? उपहासात्मक विनोदी पॅटर्नवर आधारित शेखर सुमनचा ‘मूव्हर्स अँड शेकर्स’ कार्यक्रमही लोकप्रिय झाला होता. कपिलमंडळी प्रतिभावान आहेत, पण त्यांनी विनोदाची पातळी जपावी असा सल्ला सुमन यांनी दिलाय. आगीत स्टुडिओ जळून खाक झाल्यानंतरही अन्य ठिकाणी शूटिंग करून कार्यक्रम उभा करण्याची जिद्द असलेली कपिल आणि कंपनी यांनी हा सल्ला ऐकला तर त्यांचं आणि आपलं भलं आहे.
अभिरुची ही मोठी संकल्पना झाली. उपदेश, ग्यान, प्रबोधन, निरूपण सगळं एका बाजूला आणि हसणं दुसऱ्या पारडय़ात. लहान बाळ जेव्हा हसतं त्यात निर्लेपता असते. तसं काही तरी पाहायला मिळावं. हसणं आणि हसं होणं यापैकी आपली इयत्ता कोणती, हे आपणच ठरवणार!
ताजा कलम- सुधारित अपडेटनुसार कपिलचा शो दुसऱ्या एका वाहिनीवर येण्याची चर्चा आहे. हिणकस विनोदाचं हे लोण मराठी हवेलाही लागलं आहे. हिंदीत दुसऱ्या वाहिनीवर कपिलचे पाढे पंचावन्न राहतात की नवी हास्यबेरीज सुरू होणार हे समजेलच..!
‘औरतों की इज्जत करे’ या तळटीपेसह संपणाऱ्या कार्यक्रमात महिलांची उडवली जाणारी खिल्ली, केला जाणारा अपमान अजूनही तमाम फेमिनिस्ट मंडळींपर्यंत पोहोचलेला नाही हेच आश्चर्य..!
टीव्हीचा ‘पंच’नामा : हिणकस विनोदाचा फार्स..
कपिल, त्याची पत्नी, आजी आणि आत्या हे कोअर कुटुंब, सोबती आणि येणारे पाहुणे असा हा कॅनव्हास.
First published on: 01-01-2016 at 00:41 IST
मराठीतील सर्व छोटा पडदा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comedy nights with kapil