सहा महिन्यांपूर्वी अशोकची गुडघ्याची मोठी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. त्याला ऑपरेशन व्हायच्या आधीच मनात अनेक विचार येत. ‘मी नेहमीच कमनशिबी ठरलो आहे. नाही तर चार भावंडांमध्ये मलाच का ऑपरेशन करावे लागते आहे? साधारणत: मी काहीही करायचे म्हटले की अडचणीच फार येतात. तसेच या ऑपरेशनच्या वेळेस झाले नाही म्हणजे पुरवले! नंतर तरी मला नीट चालता-फिरता येईल का? नाही आले तर एवढे लाखो रुपये पाण्यात जातील.’ शस्त्रक्रिया यशस्वी झाली, पण शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या वेदना अशोकला सहन होईनात. फीजिओथेरपी करताना वेदनेने विव्हळे आणि त्याचे पालुपद सुरू होई, ‘मी काही धड चालू शकेन असे वाटत नाही.’

महेशचे हार्टचे ऑपरेशन ठरले. तोच त्याच्या बायकोला आणि मित्रांना समजावून सांगू लागला, ‘अरे आता बायपास सर्जरी म्हणजे खूप भयंकर घटना राहिलेली नाही. मी माहिती काढली आहे, डॉक्टरांशी चर्चा केली आहे. उलट आपण वेळेवर ऑपरेशन करतो आहोत हे चांगले. लवकर बरे होता येईल. पुढच्या महिन्या-दोन महिन्यांत मी माझे सगळे रुटीन छान सुरू करेन, अगदी ऑफिसलासुद्धा नीट जायला लागेन. मला खात्री आहे की, सांगितलेल्या सूचना पाळल्या की मी पुन्हा ठणठणीत होईन. एका आजारपणाने खचून जायचे नाही. आयुष्यात अजून खूप गोष्टी करायच्या आहेत, त्याच्यासाठीच हे ऑपरेशन करतो आहे. चांगले तेच घडेल.’

ऑपरेशन दोघांचेही यशस्वी झाले. पण अशोकला बरे व्हायला फार वेळ लागला. वेदना सहन होत नसत, त्यामुळे तो चालायला नाखूष असे. म्हणे, ‘एवढय़ा मोठय़ा ऑपरेशननंतरही मी आजारीच राहिलो.’ महेश मात्र म्हटल्याप्रमाणे ऑफिसला जाऊ लागला, सांगितलेले पथ्य, चालण्याचा व्यायाम इ. सर्व गोष्टी नियमितपणे करू लागला. असे का झाले? दोघेही चांगले बरे का नाही झाले? अशोकचे विचार अत्यंत निराशावादी, तर महेश प्रचंड आशावादी. दोघांच्या दृष्टिकोनातल्या या फरकामुळे आजारातून बरे होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झालेला दिसतो.

आशावाद म्हणजे मनातला हा विश्वास की भविष्यात चांगल्या गोष्टी घडतील. अगदी अडचणीच्या वेळीदेखील असे वाटणे, ‘आत्ता माझ्या मनासारखे घडत नसले तरी मला खात्री आहे की पुढे जाऊन मी परिस्थिती नक्की बदलू शकेन, सुधारू शकेन.’ आशावाद मनाला खूप मोठी शक्ती देतो. येणाऱ्या अडचणींना आव्हान म्हणून स्वीकारण्याचे, त्यांनी दबून न जाण्याचे बळ देतो. जितके सकारात्मक आणि आनंदी आपण असू तितके आपले आयुर्मान वाढते, आरोग्य वाढते. मनातली आशा शारीरिक आणि मानसिक आजारांपासून आपल्याला दूर ठेवते.

प्रत्येकाच्या मनात आशा-निराशेचा खेळ सुरू असतो. परंतु काही व्यक्ती मनात सतत आशावादी राहतात आणि आयुष्यात अनेक गोष्टी प्राप्त करतात. याउलट निराशावादी विचारांचा पगडा सतत मनात असेल तर तितकेसे यश मिळत नाही. मनात निर्माण होणारा ताणतणाव, आयुष्यात येणारी कठीण संकटे, प्रतिकूल परिस्थिती सगळ्याला तोंड देताना मनातला आशावाद मोठी मदत करतो. उदासपणा, चिंता,  राग, संताप, नोकरीतील कंटाळा, दैनंदिन आयुष्यातील संघर्ष, अनेक शारीरिक तक्रारी हे सारे आशावादी माणसापासून दूर जाते. या उलट त्याला जीवनात समाधान लाभते. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभते.

आशा-निराशेचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम शास्त्रीय संशोधनाने दाखवून दिला आहे. शरीरातील अंत:स्रावांवर मनातल्या आशेचा परिणाम होतो. प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पौंगडावस्थेतील मुला-मुलींमध्ये मन आशावादी असेल तर उदासीनता, अतिचिंता यांचे प्रमाण खूप कमी राहते. तसेच शैक्षणिक यश मिळायला फार मदत होते. मध्यमवयीन आणि वृद्ध यांमध्येसुद्धा रक्तदाबासारखा आजार कमी प्रमाणात आढळतो, हृदयरोगाचे प्रमाण कमी होते. कुठल्याही वेदनेचे प्रमाण कमी होते. आजारातून लवकर बरे व्हायला मदत होते. तसेच कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाचा सामना देण्याची शक्ती मिळते आणि आयुर्मान वाढते. एच. आय. व्ही. एड्ससारख्या रोगामध्येसुद्धा आशेच्या जोरावर प्रकृती सांभाळता येते. महिलांमध्ये तर स्तनाच्या कर्करोगामध्ये मनातल्या आशेचा प्रकृतीवर खूप चांगला परिणाम झालेला दिसून येतो.

स्वभावानेच आशावादी असलेल्यांचे बरे आहे! आपोआपच आरोग्य चांगले राहील, ते आयुष्यात यशस्वी होतील! स्वभावाने निराशावादी असलेल्यांना असे वाटू शकते. परंतु मन आशावादी बनवता येते. निराशेच्या मनोवस्थेतून आशेच्या दिशेने प्रवास करता येतो. ‘माझ्याच बाबतीत असे घडते, असेच नेहमी घडत राहणार, माझ्या संपूर्ण आयुष्यावर नेहमी येणाऱ्या संकटाचा कायम परिणाम राहणार.’ असे सतत म्हणणारा निराशावादी माणूस मनात आशा कशी बाळगायची ते शिकू शकतो आणि यशस्वीतेकडे वाटचाल करू शकतो. त्यासाठी काही गोष्टी अंगीकाराव्या लागतात. मानसिक विकारांचा सामना करतानासुद्धा मनात आशावादी दृष्टिकोन निर्माण करायला शिकवले जाते. त्यासाठी विचार आणि वर्तणूक यात बदल घडवणाऱ्या मानसोपचाराचा (cognitive behavior therapy) वापर केला जातो. मनातल्या नकारात्मक विचारांना आव्हान देऊन, त्या जागी नवीन सकारात्मक विचारांचे रोपण करणे, अडचणींकडे त्रयस्थपणे बघायला शिकणे, संकटाशी सामना करताना माहिती मिळवणे, उपाय शोधणे, त्यासाठी आवश्यक त्याची मदत घेणे अशा विविध पद्धती शिकता येतात. नियमित व्यायाम, योग्य आहार असे जीवनशैलीतील बदल करायला सुरुवात केली की त्याचाही फायदा होतो. रोज डायरी लिहिणे, त्यात आपल्याला आलेले चांगले अनुभव नोंदवणे, आपल्याला दिवसभरात ज्यांनी मदत केली त्यांची आठवण ठेवणे, त्यांच्याविषयी कृतज्ञता मनातल्या मनात व्यक्त करणे (अगदी बसमध्ये कोणी बसायला दिले तर त्याचीही आठवण मनाला प्रसन्न करते). याबरोबरच स्वत:विषयी आणि इतरांविषयी सकारात्मक विचार आणि भावना मनात बाळगणे, कोणाशी स्पर्धा करून तुलना करत न बसणे, परिस्थितीतील चांगले काय ते शोधणे या सगळ्याचा मनातला दृष्टिकोन आशावादी व्हायला मदत होते. आपल्या घराण्याचा, राष्ट्राचा इतिहासदेखील मनात आशा निर्माण करू शकतो. अनेक छोटय़ा छोटय़ा गोष्टी करता येतात. पुढील योजना बनवणे, त्या मनात घोळवणे, निराशेच्या क्षणी एखाद्या आशावादी मित्राला भेटणे, ‘आशाए खिले दिल की, उम्मीदे हसे दिल की, अब मुश्कील नहीं कुछ भी, नहीं कुछ भी’ यासारखे छानसे गाणे मनात गुणगुणणे, एखादे सकारात्मक, प्रेरणादायी, आनंददायी पुस्तक वाचणे या सगळ्याचा चांगला परिणाम होतो.

‘आशानाम् मनुष्यानाम्
कश्चित आश्चर्य शृंखला
यया बद्धा पद्धावन्ति,
मुक्तात् तिष्ठन्ति पंगुवत’

(आशा ही माणसाला बांधून ठेवणारी आश्चर्यकारक साखळी आहे. हिने बांधले असता माणूस उत्साहाने धावत सुटतो, आणि यापासून मुक्त माणूस पांगळा होतो.)

हे सुभाषितसुद्धा आशेचे समर्पक वर्णन करते.

स्वास्थ्य म्हणजे केवळ रोग नसणे नाही, तर आरोग्य चांगले असणे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य वृद्धिंगत करताना आपल्यामध्ये ज्या अनेक गोष्टी अंगी बाणवाव्या लागतात त्यात मनातील आशावाद खूप महत्त्वाचा ठरतो.
डॉ. जान्हवी केदारे – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader