श्रीयुत वागळ्यांना ऑफिसच्या कामानिमित्त परदेशी जायचे होते. वागळे राहायचे मुलुंडला व त्यांचे विमान होते रात्रीचे दहा वाजता. त्यामुळे संध्याकाळी सात वाजेपर्यंत विमानतळावर पोहोचणे आवश्यक होते. याच हिशोबाने त्यांनी टुरिस्ट गाडी मागविली होती. टुरिस्ट एजन्सीला साडेपाच वाजता गाडी पिकअपसाठी पाठवा असा निरोप देऊन वागळे निर्धास्त झाले होते.
घरच्या सर्वाचा निरोप घेऊन वागळे साहेब ५.२० ला तयार होऊन बसले होते. हळू हळू साडेपाच वाजले आणि इथे वागळे साहेबांची चुळबुळ सुरू झाली. गाडीच्या ड्रायव्हरचा पत्ताच नसल्याने शेवटी कंटाळून त्यांनी ५.४५ ला फोन लावलाच. ड्रायव्हर रामलालने, मी १० मिनिटांमध्ये येतच आहे असे सांगून वागळे यांची समजूत काढली. सहाला रामलाल पोहोचला. उशिरा येण्यामागचे काहीतरी थातुरमातुर कारण देऊन रामलाल, वागळे यांचे सामान गाडीत लावण्याचा प्रयत्न करू लागला.
गाडीला कॅरिअर नसल्याने डिकीमध्ये सर्व सामान ठेवावे लागणार होते. डिकीमध्ये रामलालने सामान ठेवले खरे, पण त्यामुळे डिकी काही केल्या बंदच होईना. डिकी उघडी राहत असल्याने दोरी बांधून डिकी बंद करण्याची वेळ रामलालवर आली. पण गाडीत दोरी नसल्यामुळे मग वागळे यांनाच आपल्या घरून सुतळी शोधून ती मागवावी लागली. या सर्व खटाटोपात अजून १५ ते २० मिनिटे वाया गेली.
शेवटी एकदाचा सव्वासहाला वागळे यांचा एअरपोर्टच्या दिशेने प्रवास चालू झाला. थोडय़ाच वेळात वागळे यांच्या लक्षात आले की गाडी हवा तसा स्पीड घेऊ शकत नाही. त्यांनी तसे रामलालला बोलूनही दाखविले. तो नुसताच केविलवाणे हसला. क्लच प्लेट नीट नाही हे त्यालाही ठाऊक होते. गाडीने पवई गाठले आणि गाडीच्या रेडिएटरमधून पाणी गळू लागले. रामलालने गाडी बाजूला घेतली. गाडीखाली जाऊन रुमाल बांधून गळती कशीबशी थांबविली. या सर्व प्रकारांमुळे ७ इथेच वाजले.
ऑफिसेस सुटण्याची वेळ झाल्याने आता ट्राफिकदेखील चांगलेच वाढले होते. गाडी प्रत्येक सिग्नलला आता थांबवावी लागत होती. वागळे आता चिंताग्रस्त होऊ लागले होते. शेवटी वैतागून वागळे रामलालला म्हणाले, लाल सिग्नल तोड, पण मला विमानतळावर पुढच्या दहा मिनिटांमध्ये पोहोचव. वाहतूक पोलिसाने लाल सिग्नल तोडला म्हणून दंड केला तर तो दंड मी भरेन असेही ते रामलालला सांगायला विसरले नाहीत.
आता रामलाल गाडी कशीही चालवत होता. वागळे जीव मुठीमध्ये धरून आता रामलालच्या रॅश ड्रायव्हिंगचा अनुभव घेत होते. रामलालने दोन-तीन लाल सिग्नल तोडलेदेखील. पण मरोळला वाहतूक हवालदाराने लाल सिग्नल तोडल्याबद्दल गाडी बाजूला घेतली व दंडही आकारला. साहजिकच वागळे साहेबांच्या खिशाला फोडणी बसली व वेळ वाया गेला तो वेगळाच. विमानतळावर वागळे साहेबांच्या नावाची शेवटची घोषणा होत असताना रामलाल कसाबसा वागळेंना घेऊन पोहोचला. विमान चुकले नाही म्हणून वागळे साहेबांनी रामलालच्या हातावर ५०० ची नोट टेकवली.
सहा महिन्यांनी परत एकदा परदेशी जाण्याचा योग वागळे साहेबांना आला. मागच्या वेळचा रामलालचा अनुभव ताजा असल्याने वागळे साहेब शहाणे झाले होते. त्यांनी गाडी कॅरिअरवालीच पाठवा व ड्रायव्हर वेळेत पाठविला नाही तर पैसे कमी देऊ अशी तंबी टुरिस्ट एजन्सीला दिली होती. पण त्याचा काही खरेच उपयोग होईल याची त्यांना खात्री नव्हती.
पण आजचा दिवस काही वेगळाच होता. त्यांनी गाडी ५.३०ला बोलावली होती, पण अमोल ड्रायव्हर सव्वापाचलाच वागळ्यांच्या इमारतीपाशी येऊन उभा राहिला होता. तसे त्याने मोबाइलवरून वागळ्यांना कळविलेही. अमोल स्वत: वागळ्यांच्या घरी आला व त्यांचे सर्व सामान आधीच खाली घेऊन उतरला. गाडीला कॅरिअर असल्याने अमोलने सर्व मोठे सामान त्यावर नीट रचून ठेवले. दिवस पावसाचे असल्याने ते सामान प्लास्टिक शीटने झाकूनही ठेवले. डिकीमध्ये छोटे सामान ठेवून तो वागळे साहेबांची वाट पाहू लागला. बरोब्बर साडेपाचला वागळे साहेबांचा विमानतळाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. अमोलने गाडी मस्त मेन्टेन केल्याने प्रवास आरामदायक होत होता. ऑफिसेस सुटण्याच्या आधी निघाल्यामुळे रस्त्यावर वर्दळपण कमी होती, त्यामुळे लाल सिग्नलदेखील कमी मिळत होते. त्यामुळे अमोल विमानतळावर साडेसहालाच पोहोचला. वागळे साहेबांनी त्याला मीटरप्रमाणे पैसे दिले व चेक इनसाठी आत पाऊल ठेवले. टिपची कसलीही अपेक्षा न करता अमोलनेदेखील हसतमुखाने वागळे साहेबांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. चेक इन केल्यावर वागळे जरा शांतपणे कोचवर विसावले. पण आता त्यांच्या डोक्यात विचारचR चालू झाले व त्यांचेच त्यांना अपराधी वाटू लागले.
रामलाल ज्याच्या असंख्य चुकांमुळे आपले फ्लाइट मिस होता होता वाचले त्याला आपण टिप दिली, पण अमोल ज्याचे वागणे एकदम प्रोफेशनल होते त्याला आपण काहीही टीप दिली नाही. रामलाल उशिरा आला, त्याने त्याची गाडी व्यवस्थित मेन्टेन तर केली नव्हतीच, पण ग्राहकाला काय काय सुविधा आयत्या वेळी द्याव्या लागतील याचीपण त्याला जाण नव्हती. वेळेचे नियोजन केले नसल्याने जेव्हा वेळेशी शर्यत लावण्याची पाळी आली तेव्हा सर्व नियम-कानून धाब्यावर बसवून त्याने वर्तन केले ज्यामुळे आपल्याला आर्थिक भरुदड तर सहन करावाच लागला, पण सोबत मनस्तापपण सहन करावा लागला. पण तरीही आपण अंत भला तो सब भला या नात्याने त्याच्या चुकांवर पांघरूण घालून त्यालाच घसघशीत टीप दिली.
याउलट अमोल वेळेचे मार्जिन ठेवून आला. आपली गाडी सुव्यवस्थित ठेवण्याची काळजी त्याने घेतली. पाऊस पडेल या शक्यतेचा विचार करून खबरदारीचा उपाय म्हणून प्लास्टिकची तजवीज करून ठेवली. रामलालच्या आशाळभूत नजरेत टिप मिळावी असा भाव होता, पण अमोलच्या डोळ्यात मात्र आपण काम नीट पार पाडले व ते आपले कर्तव्यच होते ही भावना होती व आपण काय केले तर साधी टिप देण्याचीपण तसदी घेतली नाही.
या विचारचक्राला पुढे नेत वागळे साहेब ऑफिसमध्येदेखील असेच काहीसे घडते का याचा मागोवा घेऊ लागले. आणि त्यांना जाणवू लागले की इथेही क्राइंग बेबीलाच महत्त्व मिळत आहे व सायलेंट राहून उत्कृष्ट रिझल्ट देणाऱ्याला वालीच नाही. प्रसाद कधी वेळेवर ऑफिसला रिपोर्ट करत नाही. दिलेल्या कामासाठी काय पूर्वतयारी करावी लागेल याचा त्याला पत्ता नसतो. आधीच काम चालू करायला उशीर झालेला असतो, त्यात चुकीच्या माणसांना कामे डेलिगेट करतो, मग कामात चुका होतात. त्या निस्तरायला मग सगळ्यांना ओव्हरटाइम करायला लागतो. कंपनीचा वेळ, पैसा सर्व वाया जातो. लास्ट मिनिटला काम आपल्या टेबलवर आल्याने आपल्यालादेखील क्वालिटी टाइम देऊन त्याचे विश्लेषण न करताच वरिष्ठ व्यवस्थापनाला ते सोपवावे लागते. पण तिऱ्हाईत लोकांना मात्र प्रसाद व त्याची टीम किती जागून आणि मान मोडून कामे करतात असे वाटते. परत प्रसाद स्वत:साठी व त्याच्या टीमसाठी प्रमोशन मागायला सर्वात पुढे असतो ते वेगळेच. प्रसादमुळे, वरिष्ठांचा आपल्याला ओरडा पडू नये म्हणून मग आपणच कधीतरी बेसावध क्षणी, तू बाबा आधी काम पूर्ण कर; तुझ्या मागण्यांचा मग नक्की विचार करू असे आश्वासन देऊन फसलेलो असतो.
याउलट मंदारला काहीही काम द्या. त्या कामाला अजून कसे उठावदार करता येईल याच्यासाठी त्याच्याकडे कल्पना तयार असतात. ऑफिसच्या वेळेआधी दहा मिनिटे तो जागेवर असतो. दिलेल्या कामासाठी काय काय गोष्टी लागतील याची जुळवाजुळव त्याने आधीच केलेली असल्याने काम वेळेत सुरू होते. कामाचे डेलिगेशन योग्य त्या माणसांना केल्याने व जर एखादा टीममेट न आल्यास प्लान बी तयार असल्याने काम वेळेत पूर्ण होते व मंदार ठीक सहा वाजता ऑफिस सोडून आपल्या कुटुंबीयांना वेळ देण्यास घरी जातो, पण त्याच्या या शिस्तबद्ध कामामुळे लोकांचा मात्र गैरसमज होतो की हा काय वेळेवर पळणारा प्राणी, कामाचे प्रेशर नसलेला माणूस आहे. परत त्यात मंदार फळाच्या अपेक्षेने कर्म करत नसल्याने आपणही हा मागत नाही आहे ना पगारवाढ, मग आपण तरी का लक्ष द्या अशी आपमतलबी भूमिका घेतो. आपण परदेशातून परत आल्यावर आपली चूक सुधारली पाहिजे असा विचार करूनच आज वागळे साहेबांनी लंडनचे विमान पकडले व तेही मनातल्या मनात आपले डोळे उघडल्याबद्दल रामलाल व अमोलचे आभार मानूनच..