जागतिक दर्जाचे सायकलपटू अशोक खळे यांच्या अपघाती मृत्यूनंतर आपल्या देशातील सायकलिंग आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या विविध समस्या यांची नीट चर्चा होण्याची गरज आहे.
जागतिक दर्जाचे भारतीय सायकलपटू अशोक खळे यांना सायकलिंग करताना झालेला अपघात, त्यांनी मृत्यूशी दिलेली झुंज आणि त्यानंतर गेल्याच रविवारी झालेले त्यांचे निधन यामुळे हौशी आणि व्यावसायिक या दोन्ही गटांमध्ये मोडणाऱ्या सायकलपटूंना मुळापासून हादरा बसला आहे. असे म्हणण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अशोक खळे यांच्या मृत्यूनंतर अनेक आघाडीच्या सायकलपटूंनी त्यांचा जीव की प्राण असलेले सायकलिंग कमी करण्याचा तर काहींनी थेट थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अनेकांनी खासगीत सांगितला, जाहीर बोलण्यास कुणीही तयार नाही इतकेच. आपल्या जीवापेक्षा अधिक मोल कशाचेही असू शकत नाही, या निर्णयाप्रत अनेकजण पोहोचले आहे.
सायकलपटूंना झालेले किंवा होणारे अपघात यात नवीन काहीच नाही. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील अनेक नामवंत सायकलपटूंना रस्त्यावरील अपघातांमध्येच आपले प्राण गमवावे लागले आहेत. भारतात वाहतुकीच्या नियमांना बगल देण्याचे प्रमाण अधिक असल्याने आपल्याकडे हे प्रमाण लक्षणीय आहे. २०१३, २०१५, २०१६ आणि २०१७ अशी चार वष्रे टूर दी फ्रान्स ही विख्यात सायकल स्पर्धा जिंकणारा ख्रिस्तोफर फ्रूमे यालाही यंदाच्याच वर्षी सायकल अपघाताला सामोरे जावे लागले. सुप्रसिद्ध इटालिअन व्यावसायिक सायकलपटू मायकेल स्कार्पोनी याला वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी सायकल अपघातात मरण आले. भारताच्या बाबतीत बोलायचे तर रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्या व्यावसायिक सायकलपटूंची एक मोठी यादीच द्यावी लागेल. १८ जून २०१३ रोजी नोयडा एक्स्प्रेस वेवर प्रशिक्षणादरम्यान झालेल्या अपघातात व्यावसायिक सायकलपटूंच्या चमूची प्रशिक्षक आणि अव्वल दर्जाची व्यावसायिक सायकलपटू रूमा चॅटर्जी हिचा मृत्यू ही भारतीय सायकलविश्वासाठी सर्वात मोठी धक्कादायक घटना होती. खरे तर त्या घटनेनंतर आपण खूप काही शिकणे अपेक्षित होते. पण त्याहीनंतर भारतात अनेक सायकलपटूंचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आणि आता आपण जागतिक दर्जाचा सायकलपटू अशोक खळे यांच्या अपघाती मृत्यूने गमावला. क्रिकेटच्या संदर्भाने बोलायचे तर अशोक खळे हे सायकलविश्वाचे सुनील गावसकर होते. गेल्या पिढीचे असा शब्दप्रयोग केला नाही त्याचे कारण म्हणजे आज वयाच्या साठीनंतरही भरपूर मायलेज केलेला आणि पहाटे साडेपाचला उठून ‘खोपोली बॅक’ करणारा सायकलपटू आजच्या कालखंडात आणि संदर्भातही तेवढाच ताज्या दमाचा आणि इतर स्पर्धकांच्या मनात धडकी भरवणारा असतो. सायकल हा त्यांचा श्वास होता. म्हणूनच २६ जुल २००५च्या तुफान पावसातही न चुकता एका हाती छत्री घेऊन दुसऱ्या हाताने सायकल पकडत सायकलिंग करणारा अशोक खळे हा भारतातील असा एकमेव सायकलपटू होता.
सायकल आणि बाइकचे व्हिल बाइंिडग करण्याचा व्यवसाय असलेले अशोक खळे आजही तेवढय़ाच उत्साहात आणि त्याच दमात सर्व स्पर्धामध्ये यशस्वी होत होते. शारीरिक तंदुरुस्तीची ही पातळी केवळ अतुलनीय अशी होती. म्हणूनच त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळेस भारतीय व्यावसायिक सायकलविश्वातील मांदियाळी पाहायला मिळाली. महत्त्वाचा प्रश्न आहे तो अशोक खळे यांना गमावल्यानंतर त्या घटनेतून आपण काही शिकणार की, त्यांचे जाणे असेच वाया जाऊ देणार आणि याहीपुढे देशातील व्यावसायिक तसेच हौशी सायकलपटूंचे प्राण रस्ते अपघातात जाणे आपण निव्वळ हातावर हात घेऊन पाहात राहणार हा आहे.
गेल्या १० वर्षांमध्ये भारतामध्ये सायकलिंग या खेळाला चांगले दिवस आले आहेत. पूर्वी मुंबईमध्ये जागतिक ब्रॅण्डच्या सायकलचे एकच दुकान बरीच वष्रे होते. त्यानंतर त्यांची संख्या दोन झाली. मात्र १० वर्षांपूर्वी सायकलविश्वाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आणि आता जागतिक ब्रॅण्डची सायकलखरेदी तुम्हाला भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात सहज करता येते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागणी असल्याशिवाय एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर पुरवठा होत नाही, असे अर्थशास्त्र सांगते. परिणामी भारताच्या कानाकोपऱ्यात आता हौशी सायकलपटूंचे जथ्थेच्या जथ्थे तयार झालेले दिसतात. त्यात स्टेट्स सिम्बॉल म्हणून केवळ प्रतिष्ठेपोटी किंवा दिखाव्यासाठी महागडय़ा सायकल विकत घेणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. अनेक हौशी सायकलपटू आठवडय़ाअखेरीस एखादी मोठी रपेट किंवा वर्षांतून एकदा किंवा दोनदा मोठी सायकल टूर करताना दिसतात. काही जणांनी तर इंधनाचे प्रदूषण टाळणारी आणि पर्यावरणपूरक म्हणून सायकल वापरण्यास सुरुवात केली आहे. माध्यमांनीही पर्यावरणपूरक म्हणून त्याला अधिकाधिक प्रसिद्धी देण्यास सुरुवात केली आहे. परिणाम म्हणजे हौशी सायकलपटूंच्या संख्येमध्ये देशभरात खूप मोठय़ा संख्येने वाढ झाली आहे. गेल्या १० वर्षांतील वाढ ही ५० टक्क्यांहून अधिक असल्याचे सायकल उत्पादक आणि वितरकांनी अधिकृतरीत्या जारी केलेली आकडेवारी सांगते. पण याच कालखंडात सायकल अपघातामध्ये मृत्यू पावलेल्यांची संख्याही ही ६६ टक्क्यांनी वाढल्याचे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्रालयाची आकडेवारी सांगते. यातील अनेक व्यावसायिक तसेच हौशी सायकलपटूंचा मृत्यू हा रस्ते महामार्गावर झाला आहे. मृत्यूची आकडेवारी उत्पादनाच्या आकडेवारीपेक्षा अधिक असणे हे वाईट लक्षण आहे.
या पाश्र्वभूमीवर आपण सायकलपटूंचा मृत्यू नेमका कशा पद्धतीने व कुठे झाला याचा शोध घेतला तर सुरक्षेच्या संदर्भातील अनेक त्रुटी सहज लक्षात येतात. अपघाताची सर्वाधिक शक्यता असलेला चालक म्हणून केंद्रीय आकडेवारी सायकलपटूंकडे निर्देश करते तेव्हा काही महत्त्वाच्या बाबी सायकलपटूंनीही समजून घेणे भारतासारख्या वाहनचालनाचे संकेत फारसे पाळले न जाणाऱ्या देशात महत्त्वाचे ठरते. रस्त्यावर असलेली किंवा त्यावरून प्रवास करणारे कोण असतात आणि त्यांचा सायकलपटूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेमका काय असतो हे समजून घेण्याचा प्रयत्न यात महत्त्वाचा ठरावा. नो एन्ट्रीमधून उलटय़ा दिशेने येणारे वाहनचालक, प्रचंड वेगात जाणारे डंपर्स (अपघातामध्ये यांच्यामुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी सर्वाधिक आहे. डंपर बाजूने प्रचंड वेगात निघून गेलानंतर भीतीने बावरलेल्या अवस्थेत सायकलपटूंकडून झालेल्या गडबडीमुळे अपघात झाला हे कारणही या आकडेवारीत खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक वेळेस थेट गाडी धडकण्याचेच अपघात होतो असे नाही), रस्त्यावर अनावश्यक साचलेली रेती- माती ही महत्त्वाची कारणे आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यावर सांडलेले तेल मग त्याचे प्रमाण कितीही कमी असले तरी वेगात येणाऱ्या सायकलपटूच्या अपघाती मृत्यूसाठी ते पुरेसे ठरते हेही आजवरच्या अभ्यासात लक्षात आले आहे. अनेक सायकलपटूंचा मृत्यू तर केवळ रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे झाला आहे. एरवी दुचाकी किंवा चारचाकीसाठी जो खड्डा फारसा अडचणीचा नसतो तोच वेगात येणाऱ्या सायकलपटूसाठी एखाद्या दरीसमान आणि त्याची दिशा वळविणारा किंवा चुकविणारा असू शकतो. क्षुल्लक वाटणारे रस्त्यावरचे कुत्रे हेदेखील सायकलपटूंच्या अपघातांसाठी कारण ठरले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सायकल हे इतर वाहनांपेक्षा सर्वाधिक कमी वेगात जाणारे वाहन आहे. त्यामुळे भारतासारख्या देशात कोणत्याही रस्त्यावर सायकलपटूंकडे अडचण म्हणून पाहिले जाते. वेगात जाणाऱ्यांना त्यांच्यामुळे वेग कमी करावा लागतो. रस्त्यावरची आपली जागा सायकलपटूने अनावश्यक व्यापली आहे, असे अनेक वाहनचालकांना वाटते. बाजूने वेगात गेलेली गाडी हेदेखील बावचळण्यासाठी व त्यामुळे जीवावर बेतण्यासाठी सायकलपटूंसाठी महत्त्वाचे कारण ठरू शकते. अशा अवस्थेत हेल्मेट न घालता रस्त्यांवरून सायकल चालविणे हे सुरक्षेच्या दृष्टीने अपघातास आमंत्रण देणारे ठरते. तुम्ही व्यावसायिक सायकलपटू आहात की हौशी यावर अपघाताची तीव्रता ठरत नाही. दोघांसाठीही अपघात तेवढाच प्राणघातक असतो, हा सर्वात महत्त्वाचा धडा आहे.
अशोक खळे जागतिक दर्जाचे सायकलपटू होते. ते नियम अतिशय काटेकोरपणे पाळायचे. सायकल रस्त्याच्या डाव्या बाजूनेच चालविणं यात त्यांच्याकडून तरी कोणतीही चूक होण्याची शक्यता नाही हे त्यांना गेली ३०-३५ हून अधिक वष्रे ओळखणारे कुणीही सहज सांगू शकेल. तरीही त्यांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला हे कटू वास्तव आहे. यातील दुसरा धडा म्हणजे तुम्ही वाहतुकीचे नियम पाळता याचा अर्थ लोक किंवा इतर वाहक-चालक ते नियम पाळतातच असे नाही. किंबहुना त्यामुळेच तुम्ही तुमच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेणे म्हणजेच स्वतच्या जीवाची हमी स्वतच घेण्यासारखे असते. एका लहानसा वाटेल पण खूप महत्त्वाचा ठरावा असा मुद्दा म्हणजे अनेक हौशी सायकलपटू वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. म्हणजे लाल सिग्नल असतानाही ते सायकल पुढे दामटतात. अशा वेळेस पाहणाऱ्याच्या किंवा इतर चालकांच्या मनात सायकलपटू हे वाहतुकीचे नियम न पाळणारे अशी प्रतिमा तयार होते, जी अतिशय घातक आहे. पण ज्या वेळेस ते सायकलपटूंनाही नियम पाळताना पाहतात तेव्हा त्यांच्याबद्दलची मनातील प्रतिमा अधिक उंचावते व आदरही उंचावतो. त्याचा फरक गाडी चालविताना सायकलपटूंची घेतली जाणारी काळजी यामध्ये परिवíतत होतो.
मुंबईसारख्या शहरात सायकलपटू आपल्या संकुलाबाहेर पडतो तेव्हा अनेकदा जवळच हमरस्ता किंवा महामार्ग असतो. तो थेट हमरस्त्यावरच असतो, याचे भान आता सायकलपटूंनी ठेवायला हवे. हमरस्त्यावर किंवा महामार्गावर तुमची काळजी घेत इतर वाहनचालक गाडय़ा चालविणार नाहीत. त्यामुळे आपली काळजी आपणच घ्यायला हवी. त्यामुळे हमरस्ता किंवा महामार्ग टाळणे हा पहिला मार्ग. तो टाळणे शक्य नाही असे असेल तर सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळणे. अनेक जण सायकल महागडी घेतात पण हेल्मेट घेताना पसे वाचविण्याचा विचार करतात. सिर सलामत तो सायकल पचास हे लक्षात ठेवा. उत्तम प्रतीचं हेल्मेट हे सर्वाधिक महत्त्वाचं. सायकल अगदी साधी असली तरी चालेल.
हातमोजे हा दुसरा महत्त्वाचा भाग. अनेक सायकलपटू अपघातात फेकले जातात तेव्हा हातापायाला होणाऱ्या जखमा नेहमीच्याच आहेत. हातमोज्यांमुळे त्या टाळण्यास मदत होते. डोळ्यावर गॉगल हा सुरक्षेचा नियमही अनेकजण पाळत नाहीत. बाजूला जाणाऱ्या वाहनाच्या वेगामुळे बारीक दगड डोळ्यात जाऊन डोळा गमवावा लागणाऱ्या सायकलपटूंची संख्याही अधिक आहे. त्याबद्दल कुणीच बोलत नाही. हे गंभीर आहे हेच आपल्याकडे अद्याप शासकीय स्तरावर मान्य झालेले नाही त्यामुळे त्याची आकडेवारी उपलब्ध होण्याची शक्यताही नाही. सायकलिंगसाठी विशिष्ट पॅण्ट महत्त्वाची असते. त्यामुळे शरीराच्या नाजूक भागांना होणारी दुखापत पुरुषांच्या बाबतीत टाळता येते. तुम्ही सायकल पुढे पाहून चालवता पण ९९ टक्के अपघात हे तुमच्या मागून आलेल्या वाहनांमुळे होत असतात. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना सायकलपटू दिसणे महत्त्वाचे असते. त्यासाठी सायकलचा मागचा दिवा असणे आणि रिफ्लेक्टर गीअर्स असणे सर्वाधिक महत्त्वाचे ठरते. भारतासारख्या देशात आताशा सकाळीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते म्हणून सायकलपटू रात्रीच्या किंवा पहाटेच्या अंधारात बाहेर पडतात. अशा वेळेस रिफ्लेक्टर गीअर्स सर्वाधिक महत्त्वाची प्राणरक्षकाची भूमिका बजावतात. मागून येणाऱ्या वाहन चालकाला तुम्ही दिसणे महत्त्वाचे असते. हमरस्त्यावरून जाताना शक्यतो गटागटांनी जाणे आणि त्या गटांनी शिस्त पाळणे महत्त्वाचे ठरते.
सायकल रपेटीसाठी निघताना सध्याच्या काळात मोबाइल सोबत असणे महत्त्वाचे असते. पण हल्लीचे मोबाइल हे स्क्रीन लॉक असलेले असतात त्यामुळे अपघात झालाच तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. मात्र सोबत आपले नाव, पत्ता, जवळच्या नातेवाईकाचा मोबाइल नंबर आणि रक्तगटाची माहिती असणे महत्त्वाचे ठरते. ही माहिती प्रत्येक सायकलपटूच्या खिशात असलीच पाहिजे. अशोक खळे यांच्या संदर्भात अशी कोणतीच माहिती नसल्याने सुरुवातीचा बराच वेळ वाया गेला. अपघातानंतरच्या सुरुवातीच्या काही तासांत मदत मिळाली तर प्राण वाचण्याची शक्यता ८५ टक्के असते. म्हणून त्या तासांना गोल्डन अवर्स म्हणतात. ही माहिती हाती असेल तर तो कालखंड गोल्डन अवर्स ठरतो, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. अनेकदा अपघातानंतर मोबाइल चोरीला जातात. अशा वेळेस ही चिठ्ठी महत्त्वाची ठरते. खळे यांच्या बाबतीत तर त्यांची सायकलही चोरीला गेली.
हमरस्त्यावर किंवा महामार्गावर सायकलस्वाराचा वेग हा इतर कोणत्याही गाडीएवढा नसतो. अशा वेळेस इतर चालकांना सायकलस्वार हा अडथळा वाटतो. व्यावसायिक सायकलपटू हे सरासरी ४०-४५ किमी. ताशी या वेगाने जातात, तर हौशी १०-२० किमी. ताशी या वेगाने जातात. अनेकदा शेजारी उभ्या असलेल्या वाहनातील कुणीतरी अचानक दरवाजा उघडणे, बाजूने जाणाऱ्या बसमधील कुणीतरी अचानक थुंकणे त्यामुळे सायकलस्वाराचे बावचळणे, एखादा दगड पुढच्या वाहनाच्या वेगामुळे आपल्या अंगावर अचानक येणे हीदेखील महत्त्वाची कारणे असल्याचे लक्षात आले आहे. सायकलला कट मारून जाणारे दुसरे वाहन खूपच घातक असते. राईड दीड तासांपेक्षा जास्त असेल तर शरीरातील क्षारांचे प्रमाणही कमी होत जाते. या साऱ्याची काळजी घेण्यासाठी पाणी किंवा स्पोर्ट्स ड्रिंक घेण्याची आवश्यकता असते. सध्या एक वाईट ट्रेण्ड सर्वत्र पाहायला मिळतो तो म्हणजे कानाला इअरफोन लावून गाणी ऐकत सायकल चालविणे. हा सर्वात घातक ट्रेण्ड असल्याचे भूपृष्ठ परिवहन मंत्रालयाच्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. त्यासंदर्भात जनजागरण करण्याची एक मोहीमही त्यांनी हाती घेतली होती. हमरस्त्यावर, खास करून महामार्गावर असताना त्यातही तुम्ही सायकल चालवत असाल तर तुमची पंचेंद्रिय तीक्ष्ण असणे महत्त्वाचे असते. नजर समोर असली तरी कान मात्र मागून येणाऱ्या वाहनाकडे असले पाहिजेत असे कसलेले सायकलपटू सांगतात. कारण मागच्या बाजूने वेगात येणारे वाहन खूप लांब असतानाच विशिष्ट कर्कश्य आवाजामुळे आधी ऐकू येते तो आपल्यासाठीचा इशारेवजा संकेत असतो. पण कानात इअरफोन असतील तर कान बंदच असतात. हे धोकादायक असल्याने टाळायला हवे.
सायकलस्वारांचे अनेक अपघात फ्लायओव्हर उतरताना झाल्याचे लक्षात आले आहे. उतरताना तुम्ही फ्लायओव्हरच्या डाव्या बाजूला असलात तरी तो उतरतो आणि मुख्य रस्त्याला जोडला जातो, त्या ठिकाणी तुम्ही रस्त्याच्या मधोमध असता. तुमच्या उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजूंनी वेगात वाहने पुढे जातात. अशा वेळेस अपघाताची शक्यता सर्वाधिक असते. या टप्प्यात बऱ्याच सायकलस्वारांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. वैज्ञानिक भाषेत बोलायचे तर सायकलस्वाराला इथे मिळालेला रिअॅक्शन टाइम कमी असतो. त्या कमी वेळेतच अपघात होतो. रिअॅक्शन टाइमचे गणित व्यक्तीनुसार वेगवेगळे असते. शेजारून येणारे वाहन तुम्हाला पाहिल्यानंतर किती वेगात ब्रेक दाबेल किंवा कोणता निर्णय घेईल हे तुम्हालाही ठाऊक नसते. अशा वेळेस सायकलस्वारांची अवस्था घाबरलेल्या प्राण्याप्रमाणे होते आणि अपघाताला आमंत्रण मिळते. हे टाळायचे असेल तर सायकलस्वारांनी फ्लायओव्हर्सचा वापर टाळणे सर्वात उत्तम असे जाणकार सांगतात.
सध्या फेसबुक सेलिब्रिटिजचे पेव फुटले आहे. फारसे मायलेज न केलेली मंडळीही सायकलपटूंना ज्ञान देऊ लागली आहेत. यांच्यापासून सावध असले पाहिजे. कारण यांच्यापकी अनेक मंडळी अवैज्ञानिक गोष्टीच अधिक सांगत असतात. महामार्गावर थांबून सायकलसह काढलेला सेल्फी हे त्यांच्या महामूर्खपणाचे सर्वात मोठे लक्षण असते. त्यांच्यापासून सावधान.
सायकल विकत घेताना आपल्या शरीररचनेनुसार तिची फ्रेम निवडणे महत्त्वाचे असते. उंची सारखी असली तरी दोन्ही पायांच्या मध्यभागापासून खालपर्यंतची प्रत्येकाची उंची वेगळी असते. तिच्याशी फ्रेमची उंची जुळावी लागते. त्यानुसार सीट व हँडलमधील अंतर अडजस्ट करावे लागते. मात्र हे प्राथमिक ज्ञानही नसल्याने रस्त्यावर अचानक थांबताना तोल ढळून अपघात झाल्याची उदाहरणेही अधिक आहेत.
पर्यावरणपूरक म्हणून सायकलला प्राधान्य देण्याचे सरकारी धोरण हे कागदावर खूपच छान आहे. पण प्रत्यक्षात तो एक विनोदच असल्याचे अनेकदा लक्षात येते. मुंबईत बीकेसीमधील सायकल ट्रॅकवर अनेकदा वाहनांचे पाìकग असल्याची छायाचित्रे प्रकाशित झाली आहेत. सायकल ट्रॅकमध्ये इतर वाहने येणारच नाहीत याची भारतात खात्री नसते. जिथे माणसांना चालण्यासाठी साधे पादचारी मार्ग अर्थात फूटपाथ नाहीत तिथे सायकल ट्रॅक हे चैनच ठरतात. त्याबद्दल न बोललेलेच बरे. मध्यंतरी सरकारी धोरणानुसार सायकल पाìकगसाठी मध्ये रेल्वेने सवलतीचा बोर्ड ठाणे स्थानकाजवळ लावला आणि प्रत्यक्षात त्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी गेलेल्या सायकलपटूला सुविधाच नसल्याचे लक्षात आले. व्यवसायाने पत्रकार असलेल्या या सायकलपटूने अखेरीस भांडून तो हक्क मिळवला. कामावर सायकलने जायचे तर त्याला प्रोत्साहन मिळायला हवे असे आपण म्हणतो, जवळपासचा प्रवास सायकलने करावा असे म्हणणे ठीक आहे. पण मॉलमध्ये चित्रपट पाहायला सायकलने गेल्यानंतर तिथे सायकल स्टॅण्डच नाही हे लक्षात येते तिथे काय करायचे. धोरणे आहेत पण अंमलबजावणीचे आणि पूरक गोष्टींचे काय? त्याकडे पूर्णपणे दुर्लक्षच आहे. सायकलची संस्कृती अद्याप आपल्याकडे रुजायची आहे, हेच यातून प्रकर्षांने लक्षात येते.
एकुणात काय तर सरकारी धोरण कागदावर छान दिसते. प्रत्यक्षात अस्तित्त्वातच नसते. जगभरातील अनेक देशांनी सायकलला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यासाठी ते धोरण कागदावर न ठेवता सायकलिंग वाढलेल्या सर्वच देशांनी त्यासाठी इतर गोष्टी बाजूला ठेवत, कायदेशीर प्राधान्य देत सायकलचा मार्ग सुकर केला आहे. त्यांची इच्छाशक्ती त्यात प्रबळ असल्याने कायदेशीर मार्ग निघाले, हे भारतीयांना लक्षात घ्यावे लागेल.
सायकली वाढताहेत, सायकलस्वार वाढताहेत, त्यांचे गट, संस्था वाढताहेत अशा वेळेस सायकलिंग फेडरेशनची जबाबदारी अधिक वाढते. अशोक खळे यांचे निधन झाले त्या दिवशीही स्पर्धा घेऊन बक्षीस वाटप करणाऱ्या सायकलिंग फेडरेशनच्या वर्षांनुवष्रे पदालाच चिकटून राहिलेल्या पदाधिकाऱ्यांविषयी न बोललेलेच बरे. ती पराकोटीची असंवेदनशीलता होती. या सायकलिंग फेडरेशनने या क्षेत्रातील सुरक्षितता वाढावी आणि त्याचा वापर वाढावा म्हणून कोणते प्रयत्न केले याचा लेखाजोखा लिहायला घेतला तर सुरक्षा कार्यशाळांच्या संदर्भातील आकडेवारी ही पाटी कोरी असल्याचेच निदर्शक ठरणारी आहे, हे स्पष्ट होते. खरे तर अशा वेळेस त्यांनी पुढाकार घेऊन गोष्टी मार्गावर आणायला हव्यात. पण त्या पातळीवर आनंदच आहे.
अनेक वर्षांपूर्वी ऐन दिवाळीमध्येच अजित कांबळी नावाच्या आणखी एका दर्जेदार सायकलपटूला आपण गमावले होते. मरिन लाइन्सला पेट्रोल पंपजवळ झालेल्या त्या अपघाताचे अशोक खळे साक्षीदार होते. आता तेही आपल्यात नाहीत त्यांचेही अपघाती निधन व्हावे हा दैवदुर्वलिासच. यानिमित्ताने आणखी एक महत्त्वाची गोष्ट खळे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस व त्याही आधी उपचाराच्या वेळेस लक्षात आली. ते आजही छोटेखानी खोलीतच राहात होते. घाटांचा हा राजा प्रत्यक्षात मात्र दिनवाणे आयुष्य जगत होता. अंत्यसंस्काराच्याच ठिकाणी त्यांच्या कुटुंबीयांची हलाखी पाहून गावकऱ्यांवर मदतीचे आवाहन करण्याची वेळ ओढवली. जागतिक दर्जाच्या सायकलपटूसाठी, असे आवाहन करावे लागणे ही त्यांच्या कुटुंबीयांची किंवा गावकऱ्यांची नव्हे तर आपल्या भारतीय समाजाची नामुष्की आहे. आपले काहीतरी चुकते आहे. क्रिकेट म्हणजेच खेळ नव्हे हे कधीतरी आपल्याला कळायला हवे. त्याहीपलीकडे रोचक खेळ आहेत. त्यांना जागतिक स्तरावर खेळाचा दर्जा आहे. त्याकडे आणि तो खेळणाऱ्यांकडे समाजाचे लक्ष असायला हवे. आपण त्यात चुकलो आहोत हेच खळेंच्या निधनाने दाखवून दिले. त्याच वेळेस भारतात सायकलिंग हा खेळ नव्हे तर दुसाहस ठरते आहे, हेच अधोरेखित केले आहे.
(‘लोकसत्ता’ रविवार विशेषमध्ये १९ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखाचा मूळ तर्जुमा.)
विनायक परब – vinayak.parab@expressindia.com @vinayakparab