शेखर जोशी – response.lokprabha@expressindia.com
‘आश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी अर्थातच दसरा. नवरात्रोत्सवानंतर येणारा हा दिवस. भारतीय/हिंदू संस्कृतीत जे साडेतीन मुहूर्त मानले (चैत्रशुक्ल प्रतिपदा- गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया आणि दसरा हे तीन पूर्ण आणि बलिप्रतिपदा- दिवाळी पाडवा हा अर्धा) जातात त्यात दसऱ्याचा समावेश होतो. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा या सणाला/ उत्सवाला केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतातही अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हटले जाते ते अगदी खरे आहे. नवीन उपक्रमांचा शुभारंभ करणारा दसरा सण हा खरोखरच आनंदाची उधळण करणारा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘दसरा’ हा सण सुरुवातीला कृषीविषयक सण किंवा उत्सव म्हणून साजरा केला जात होताच. पावसाळा संपून आश्विन महिन्याच्या प्रारंभी नवीन पीक घरात येत असे. त्यामुळे शेतकरी हा उत्सव साजरा करत असत. शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधत असत. झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांचे तोरणही घराच्या किंवा दुकानाच्या प्रवेशद्वारावर लावले जाते. ते शुभदायक आणि मनाला प्रसन्नता देणारे असते.
धार्मिक, पौराणिक कथा
एका कथेनुसार महिषासुर नावाचा राक्षस लोकांना त्रास देत होता. तेव्हा आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून दशमीपर्यंत देवीने महिषासुराशी युद्ध करून त्याचा वध केला. त्यामुळे आश्विन शुक्ल दशमीस ‘विजयादशमी उत्सव’ साजरा करण्यास सुरुवात झाली. तर महाभारतातील कथेनुसार पांडव अज्ञातवासात राहण्यासाठी विराटाच्या घरी गेले होते. त्या वेळी त्यांनी आपली सर्व शस्त्रे जंगलात शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यानंतर पांडवांनी आपली सर्व शस्त्रे शमीच्या झाडावरून काढून शमीच्या झाडाची आणि शस्त्रांची पूजा केली. तो दिवस आश्विन शुक्ल दशमीचा होता. म्हणून या दिवशी विजयादशमी अर्थातच दसरा साजरा केला जातो.
भगवान श्रीराम यांनी याच दिवशी रावणाचा वध केला. त्यामुळे या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. अनेक ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन करून हा उत्सव साजरा केला जातो.
ऐतिहासिक परंपरा
पावसाळ्यात पेरलेले बी-बियाणे तयार होऊन आश्विन महिन्यात नवीन पीक, धान्य घरात आलेले असायचे. शेतीची कामेही पूर्ण झालेली असायची. एकाच घरात पुरुष मंडळी शेतीच्या कामासह आणि राजे-महाराजे यांच्याकडे सैनिक, शिपाई म्हणूनही काम करत असत. पावसाळ्याच्या दिवसांत शक्यतो लढाई किंवा स्वारीवर निघत नसत. पावसाळा संपल्यानंतर, शेतीची कामे आटोपल्यानंतर राजे-महाराजे आश्विन महिन्यात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरच नवीन लढाई, स्वारीसाठी सीमोल्लंघन करत असत. त्यांच्याकडे काम करणारे सैन्य अर्थातच सैन्यातील लोकही याच दिवशी आपल्या गावच्या सीमा ओलांडून बाहेर युद्धावर जाण्यासाठी निघायचे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तसेच पेशवाईच्या काळातही ही परंपरा होती.
विद्याभ्यासाचा श्रीगणेशा
दसरा हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त असल्याने शाळेतील विद्याभ्यासाचा श्रीगणेशा याच दिवशी करण्याची पद्धत आहे. सरस्वती देवी ही विद्येची अधिष्ठात्री मानली जाते. त्यामुळे लहान मुलांच्या विद्याभ्यासाचा या दिवशी श्रीगणेशा केला जात. दगडी पाटीवर अंकाची सरस्वती काढून त्याची पूजा केली जाते. आजही शाळा तसेच घरांमधून पाटीवर, वहीवर अंकांची सरस्वती काढून किंवा सरस्वती देवीच्या चित्राची/ प्रतिमेची, वह्य, पुस्तकांची पूजा केली जाते. राजे-महाराजे यांच्या वंशजांकडून आजही शस्त्रास्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. सर्वसामान्य लोक घरातील कात्री, कोयता, सुरी आदींची शस्त्र म्हणून प्रतीकात्मक पूजा करतात. घरी असलेल्या वाहनाचीही पूजा केली जाते. नवीन घर, वाहन खरेदी, नवीन उपक्रम, नवा उद्योग-व्यवसाय याचीही याच दिवशी सुरुवात केली जाते. सोन्याचे प्रतीक म्हणून आपटय़ाची पाने एकमेकांना दिली जातात.
उत्सव ‘ग्लोबल’ झाला
दसरा-विजयादशमी हा सण नाही तर आपले सर्वच सण आणि उत्सव आता केवळ पौराणिक किंवा धार्मिक राहिलेले नाहीत. तर ते सामाजिक आणि ‘ग्लोबल’ झाले असल्याचे ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी ‘लोकप्रभा’ला सांगितले.
अनेक महाराष्ट्रीय मंडळी गेल्या काही वर्षांपासून परदेशात मोठय़ा प्रमाणात स्थायिक झालेली आहेत. उच्च शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्तानेही भारतीय तरुण परदेशात गेलेले आहेत. तिथे ही सर्व भारतीय मंडळी आपले सर्व भारतीय सण, उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे करतात, एकत्र येतात. त्यामुळेच आपल्या सर्व भारतीय सणांना आता जागतिक स्वरूप प्राप्त झाले आहे.
दसऱ्याच्या दिवशी आपण सोन्याचे प्रतीक म्हणून आपटय़ाच्या झाडाची पाने एकमेकांना वाटतो. खरे तर आपल्या कोणत्याही धर्मग्रंथात किंवा धर्मशास्त्रात आपटय़ाची पाने वाटावी असे सांगितलेले नाही. एक प्रथा/परंपरा म्हणून आपण ते करतो. पण दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी या पानांचे जे काही होते म्हणजे ती कचराकुंडीत टाकून दिली जातात, रस्त्यावर पायदळी तुडवली जातात ते पाहून वाईट वाटते. अनेकदा आपटय़ाच्या झाडाच्या पानांऐवजी कांचन वृक्षाची पानेच सोने म्हणून वाटली जातात. कारण ती दिसायला एकसारखीच असतात. खरे तर आजच्या काळात पर्यावरण संवर्धन, जतन करण्याची अधिक गरज आहे. त्यातून ही झाडे तोडलीही जाणार नाहीत. अर्थात त्या त्या ऋतुमानात झाडांची तोडणी/छाटणी करणे आवश्यकच असते. त्यामुळे झाडे पुन्हा नव्याने बहरतात, त्यामुळे आपटय़ाची पाने तोडण्यात आणि वाटण्यात काहीही गैर नाही असाही एक मतप्रवाह आहे. मात्र त्यात तथ्य नाही. असो. पण आपल्याला एक करता येईल. दुसऱ्या दिवशी ही पाने कचऱ्यात, गटारात जाणार नाहीत किंवा पायदळी तुडवली जाणार नाहीत याची आपण सर्वानीच काळजी घेतली पाहिजे. सहकारी गृहनिर्माण संस्थांमधून ती एकत्र करून जाळली जावीत किंवा ही सर्व पाने एकत्र करून ती निर्माल्य/ ओल्या कचऱ्यापासून खत तयार करणाऱ्या संस्थांना द्यावीत असेही सोमण म्हणाले.
विजयादशमीच्याच दिवशी भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध केला. म्हणजेच अनीती, दुष्ट प्रवृत्ती यांचे निर्दालन केले. या दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वानीही आपल्या मनातील तामसी, वाईट, दुष्ट विचार, प्रवृत्ती यांचे तसेच समाजातील वाईट चालीरीती, प्रथा-परंपरा, रूढी, अंधश्रद्धा, गुन्हेगारी प्रवृत्ती, भ्रष्टाचार यांचे दहन करू या, म्हणजेच ते सोडून देऊ या. मी नीतीने, प्रामाणिकपणे माझे कर्तव्य पार पाडेन असा मनाशी निर्धार करू या. एखाद्या चांगल्या व समाजोपयोगी कार्याचा शुभारंभ करून एक नवी सुरुवात करू या, असेही सोमण यांनी सांगितले.
सोने लुटीची पुराणकथा
पैठण शहरात कौत्स नावाचा मुलगा वरतंतु ऋषींकडे वेदाभ्यास शिकला. त्यानंतर त्याने गुरुदक्षिणेविषयी विचारले, तेव्हा वरतंतु ऋषींनी गुरुदक्षिणा नको, असे सांगितले. तरी कौत्साचे समाधान झाले नाही. त्याने गुरुदक्षिणेविषयी आग्रह धरला. तेव्हा वरतंतु ऋषींनी १४ कोटी सुवर्णमुद्रा देण्यास सांगितले. कौत्स १४ कोटी सुवर्णमुद्रा आणण्यासाठी रघुराजाकडे गेला. रघुराजाने तीन दिवसांची मुदत मागितली. रघुराजाने त्यासाठी इंद्रावर स्वारी करायचे ठरविले. इंद्राला ते समजले. इंद्राने रात्री कुबेराकडून गावाबाहेरील आपटय़ाच्या आणि शमीच्या झाडावर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. रघुराजाने त्या सर्व सुवर्णमुद्रा कौत्सास दिल्या. त्या सर्व सुवर्णमुद्रा घेऊन कौत्स वरतंतु ऋषींकडे गेला. परंतु वरतंतुंनी त्यातील १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या. उरलेल्या त्यांनी स्वीकारल्या नाहीत. कौत्स त्या घेऊन रघुराजाकडे गेला. रघुराजाही त्या परत घेईना. शेवटी कौत्साने रघुराजाच्या सांगण्यावरून त्या उरलेल्या सर्व सुवर्णमुद्रा आपटय़ाच्या व शमीच्या झाडाखाली ठेवल्या आणि लोकांस त्या लुटून नेण्यास सांगितले. तो दिवस विजयादशमीचा होता. त्यामुळे या दिवशी आपटय़ाच्या व शमीच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा पडली.
शमीची पूजा
पांडव अज्ञातवास संपवून या दिवशी परत निघाले अशीही आख्यायिका आढळून येते. पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले अशी कथा आढळून येते. त्यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते.