विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com
साथीचं सावट हळूहळू दूर होऊ लागलं आहे. लसीकरणाने वेग घेतला आहे. आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. बऱ्याच काळानंतर सकारात्मक स्थिती निर्माण होऊ पाहत आहे. पण प्रदीर्घ आजारातून उठलेली व्यक्ती लगेच धावू शकत नाही. सुरुवात थोडी संथच असते. जागतिक सुवर्ण परिषदेचा अहवाल पाहता, सोनंही सध्या याच स्थितीतून जात असल्याचं दिसतं. गेल्या सहा महिन्यांत सोन्याला असलेली विविध स्वरूपांतील मागणी गतवर्षीच्या तुलनेत वधारली असली, तरी साथपूर्व काळापेक्षा कमीच राहिली आहे. पुढे येणाऱ्या सण-उत्सव आणि लग्नकार्याच्या मोसमात मात्र ती काही प्रमाणात वाढण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत ही जगातील सोन्याच्या दागिन्यांची एक मोठी बाजारपेठ आहे. दागिने खरेदीत आपला चीनपाठोपाठ दुसरा क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ युरोप, अमेरिका आणि आखाती देशांचा क्रमांक लागत असला, तरी हे प्रदेश दागिने खरेदीत आपल्या बरेच मागे आहेत. भारतात सर्वत्रच जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक प्रसंगात सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व असलं, तरी देशाच्या विविध भागांत खरेदी केल्या जाणाऱ्या सुवर्णालंकारांचं स्वरूप केवळ आर्थिक स्थितीच नव्हे तर राज्य, वयोगटागणिक बदलत जातं. दक्षिणेकडे भारदस्त दागिन्यांना प्राधान्य दिलं जातं, महाराष्ट्रात मात्र त्या तुलनेत नाजूक दागिने वापरले जातात. सोनं हे प्रामुख्याने प्रतिष्ठेचं प्रतीक म्हणून खरेदी करण्यात येत असलं, तरी गेल्या काही वर्षांत याच्या गुंतवणूकमूल्याकडे डोळसपणे पाहणाऱ्यांचं प्रमाण वाढू लागलं आहे.

दागिन्यांची मोठी बाजारपेठ असल्यामुळे भारतातल्या मागणीचे जगातील सोन्याच्या एकंदर मागणीवर लक्षणीय परिणाम होतात. काळ कितीही बदलला असला, तरी आजही दागिन्यांच्या स्वरूपातील सुवर्ण खरेदीचं प्रमाण अधिक आहे. साधारणपणे सणांच्या आणि विवाह मुहूर्ताच्या काळात हमखास दागिने खरेदी केले जातात. आर्थिक वर्ष २०२१-२२ची सुरुवात आश्वासक झाली होती, मात्र पहिल्याच महिन्याच्या अखेरीस रुग्णसंख्या वाढू लागली. त्याचे पडसाद दागिने खरेदीत उमटले. एप्रिल- मे हा विवाह मुहूर्ताचा काळ. मात्र याच काळात देशाच्या शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागांतही साथीची परिस्थिती गंभीर झाली. साधारण नोव्हेंबर २०२०पासून बसू लागलेली आर्थिक घडी पुन्हा विस्कटू लागली. ठिकठिकाणी पुन्हा टाळेबंदी लागू झाली. पेढय़ा खुल्या ठेवण्याचा वेळेवर आणि पेढीतील ग्राहकांच्या गर्दीवर मर्यादा आली. रोजगाराचा प्रश्न पुन्हा उभा ठाकला. अनेकांची बचत वैद्यकीय खर्चात संपली. आर्थिक मंदीचं सावट निर्माण झाल्यामुळे एप्रिलअखेरीपासून सुवर्णालंकारांची मागणी कमी होत गेली आणि मे महिन्यात त्यात मोठी घसरण झाली. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या सर्वेक्षणानुसार ग्राहकांच्या आत्मविश्वासाचा निर्देशांक मार्चमध्ये ५३.१ टक्के होता, तो मेमध्ये ४८.५ टक्के एवढा घसरला.

दुसऱ्या तिमाहीतही सुवर्णालंकारांची मागणी (३९०.७ टन) २०२०च्या तुलनेत काही प्रमाणात वाढली असली, तरी ती साथपूर्व काळातील मागणीपेक्षा बरीच कमी राहिली. पहिल्या सहामाहीतील दागिन्यांची मागणी २०१५ ते २०१९ या काळातील सरसरी मागणीपेक्षा १७ टक्के कमी होती. २०२१च्या पहिल्या तिमाहीतील सुवर्णालंकारांची मागणी ही २०१९च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत २६ टक्क्यांनी तर पहिल्या सहामाहीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी घसरली. कोविडच्या दुसऱ्या लाटेचा भारताला बसलेला जबर तडाखा जगभरातल्या सुवर्णालंकार खरेदीच्या आकडय़ांत प्रतिबिंबित झाला.

आर्थिक वर्ष २०२१-२२च्या पहिल्या तिमाहीत जगभरातील सोन्याची मागणी ८१५.७ टन एवढी म्हणजे आदल्या आर्थिक वर्षांच्या अखेरच्या तिमाहीएवढीच राहिली. त्यात वाढ झाली नाही. दुसऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी साधारण गतवर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या आसपास म्हणजे ९५५.१ टन (-१ टक्का) एवढी नोंदवली गेली. त्यामुळे पहिल्या सहामाहीतली सोन्याची मागणी ही गतवर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी म्हणजे एक हजार ८३३ टन एवढी राहिली.

गोल्ड बार आणि नाण्यांची मागणी मात्र गेल्या १२ महिन्यांत सातत्याने वाढत राहिली. दुसऱ्या तिमाहीत २४३.८ टन विक्री होऊन पहिल्या सहामाहीतील बार आणि नाण्यांची विक्री ५९४ टनांच्या घरात गेली. त्यामुळे या काळात गोल्ड बार-नाणे खरेदीने २०१३ नंतरचा उच्चांक गाठला. मात्र पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत बार आणि नाणे खरेदीचे प्रमाण ३० टक्क्यांनी घटले. २०२१च्या दुसऱ्या तिमाहीत ‘गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड’ची मागणी २०२० च्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ५१ टक्के (२८४.५ टन) कमी राहिली.

यंदा भारतीय सुवर्ण बाजारातली सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे देशातल्या २५६ जिल्ह्य़ांमध्ये हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आलं. त्यामुळे सोन्यासंदर्भातल्या व्यवहारांची विश्वासार्हता वाढली असून त्यातूनही खरेदीला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोने म्हणजे ‘डेड इन्व्हेस्टमेन्ट’ असा समज मधल्या काळात निर्माण झाला होता. दागिन्यांच्या स्वरूपात सोने साठवून ठेवल्यास तो काही प्रमाणात खराही ठरतो. मात्र अडचणीच्या काळात, जागतिक आर्थिक संकटांत सोन्याची झळाळी कायम राहते. कोविड साथीच्या सुरुवातीच्या काळात अनेकांनी याचा अनुभव घेतला. जगावर संकट कोसळले असताना सोन्याचे दर मात्र वाढत गेले. २०१९मध्ये १० ग्रॅम सोन्याचा उच्चांक होता ३० हजार रुपये आणि २०२०मध्ये सोन्याने ५४ हजारांपर्यंत मजल मारली. गुंतवणुकीचे विभाजन करताना साधारण १० टक्के गुंतवणूक सोन्यात करावी, असा सल्ला बहुतेक गुंतवणूक सल्लागार देतात. सोन्यातील गुंतवणुकीतून साथीच्या कठीण आर्थिक काळात अनेकांनी उत्तम लाभ मिळवला. त्यामुळे सोन्यातल्या गुंतवणुकीसंदर्भातला सल्ला योग्यच असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं. त्यामुळेच आता सोन्याचे दर काहीसे खाली आले असताना अनेकजण या क्षेत्रात गुंतवणुकीचा विचार करू लागले आहेत. लग्नकार्यासाठी दागिने खरेदी करणाऱ्यांनाही ही संधी साधता येणार आहे.

सोनं खरंतर एक धातूच, पण त्याच्या झळाळीने आणि अन्य गुणधर्मानी त्याला अनन्यसाधारण महत्त्व मिळवून दिलं आहे. आपण परिधान करू शकतो, अशी ही एकमेव गुंतवणूक आहे. त्यामुळेच शेअर्स, म्युच्युअल फंड्सचं महत्त्व वाढत असतानाही सोन्याचं महत्त्व कायम आहे आणि राहणार आहे. त्यामुळे सोन्याची मागणी सध्या काहीशी रोडावली असली, तरी आज ना उद्या या क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येतील, फक्त थोडी प्रतीक्षा करावी लागेल. आर्थिक घडी पुन्हा बसू लागली असली, तरी गुंतवणूकदार आणि ग्राहक अद्याप सावध पवित्र्यात आहेत. सारं काही स्थिरस्थावर झाल्यावर कदाचित ते अधिक आत्मविश्वासाने गुंतवणूक आणि उत्साहाने खरेदी करू लागतील. येत्या दिवाळीत सोने खरेदी वाढण्याची शक्यता ‘यूगव्ह’च्या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहेच. दिवाळीनंतर लग्नांचा काळ सुरू होईल, त्यातून दागिने खरेदीला प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा सराफांना आहे. अनेक आर्थिक चढ-उतारांतून तावूनसुलाखून निघालेल्या या धातूची झळाळी येत्या काळात अधिक वाढेल, अशी गुंतवणूकदारांचीही अपेक्षा आहे.

उत्सवकाळात खरेदीला चालना

गुंतवणूक असो, गोल्ड बार आणि नाणी असोत वा दागिने यंदा सोन्याला कोविडपूर्व काळापेक्षा कमीच मागणी आहे, मात्र येत्या काळात ती वाढेल असे संकेत ‘यूगव्ह’ या जगभरातल्या बाजारांचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने दिले आहेत. संस्थेच्या सर्वेक्षणानुसार यंदाच्या दिवाळीत भारताच्या शहरी भागात राहणाऱ्यांपैकी ३७ टक्के नागरिक विजेवर चालणारी उपकरणे खरेदी करणार आहेत. तर २८ टक्के नागरिक येत्या तीन महिन्यांत सोने खरेदी करणार आहेत. सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांपैकी स्वत:साठी आणि कुटुंबीयांसाठी दागिने किंवा सुवर्ण योजनांच्या स्वरूपात खरेदी करणाऱ्यांचं प्रमाण ५८ टक्के आहे. गोल्ड फंड किंवा प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांचं प्रमाण ३८ टक्के आहे. वयोगटांचा विचार करता, जुनी पिढी सोने वापरासाठी तर नवी पिढी गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून खरेदी करणार असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे.

सर्वाधिक खरेदी चीन, अमेरिकेत

गेल्या सहा महिन्यांत सर्वाधिक सोने खरेदी चीन आणि अमेरिकेत झाली. चीनमधील कोविडची साथ भारताच्या तुलनेत लवकर आटोक्यात आली त्यामुळे तिथे दागिने खरेदीला चालना मिळाली. पूर्व आणि आग्नेय आशियातल्या लहान-मोठय़ा देशांतील बाजारांचा विचार करता मागणी गतवर्षीपेक्षा जास्त मात्र साथपूर्व काळाच्या तुलनेत ती कमीच होती.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dasara special gold gold market improving dd