रुचकर-शॉिपग विशेष
नरेंद्र जाधव – response.lokprabha@expressindia.com
मोठा इतिहास आणि प्रदीर्घ परंपरेमुळे भारतीय दागिने वैशिष्टय़पूर्ण आहेत. पूर्वीच्या काळी देवळांना असलेलं महत्त्व जसं दागिन्यांमध्ये प्रतििबबित झालं आहे, तसंच इथे आलेल्या आणि नंतर इथल्याच होऊन गेलेल्या आक्रमकांच्या संस्कृतीचाही इथल्या दागिन्यांवर प्रभाव जाणवतो.
भारतीय दागिन्यांना प्राचीन इतिहास आहे. आर्य, द्रविड काळापासून महिला तसंच पुरुष दागिने घालत असल्याचे दाखले उत्खननातून मिळाले आहेत. त्यामुळेच दैनंदिन व विशेष कार्यक्रम, सण, उत्सवात आपल्याकडे स्त्री आणि पुरुष अलंकार परिधान करतात. स्त्रियांचे मस्तकापासून ते पायापर्यंत घालण्यासाठी विविध अलंकार आहेत. यात डोक्यातील विविध रचनांची फुले, मांग टीक, चाप, बुगडी, कर्णफुले, विविध प्रकारचे हार, बांगडय़ा, वाकी, कंबरपट्टा, छल्ला, पंजण, जोडवी आदींचा समावेश होतो. काळानुसार दागिन्यांच्या रचना, वापरण्याची पद्धती बदलल्या असल्या तरी दागिन्यांना मागणी वाढती आहे.
पारंपरिक दागिन्यांचा भारतातील मागोवा घेतल्यास प्रत्येक प्रांतामधील दागिन्यांची रचना विशिष्ट असून, त्यांची नावेही वेगळी आहेत. मात्र, असे असले तरी मूळ भारतीय संस्कृतीशी या सर्व अलंकारांची नाळ जोडलेली आहे. दक्षिण भारतात प्रामुख्याने केरळ आणि तमिळनाडूमध्ये निसर्गातील फुले, पाने, वेली यांच्यापासून प्रेरणा घेऊन दागिन्यांची रचना केल्याचे जाणवते. तसेच, दक्षिणेतील अनेक मंदिरांमध्ये देव-देवता, गंधर्व यांचे सुरेख कोरीव काम केलेली शिल्पे आहेत आणि या रचनांचे प्रतििबब दागिन्यांमध्येही आले आहे. यालाच आपण टेम्पल कलेक्शन म्हणून ओळखतो. त्यात हार, पेंडंट, कर्णफुले, कंबरपट्टे प्रामुख्याने आहेत. भारतात अनेक परचक्रं आली. त्यांच्या संस्कृतीचा प्रभावही आपल्यावर पडलेला आहे. त्यातूनही वेगवेगळे दागिने विकसित झाले आहेत. अशा काही भारतीय दागिन्यांविषयी-
टेम्पल ज्वेलरी
पारंपरिक कार्यक्रमांमध्ये असे दागिने परिधान करण्याचा प्रघात आहे. हे दागिने देशातील देवळांवरील देवीदेवतांच्या शिल्पांपासून प्रेरित आहे. त्यामुळेच या दागिन्यांना टेम्पल ज्वेलरी म्हणतात. भारतीय संस्कृतीमध्ये विशिष्ट देवदेवतांचे छाप असलेले मुख्यत महाराष्ट्र व दक्षिणेस पाहावयास मिळतात. विशिष्ट प्रकारचे दुर्मीळ साचे (आवटी) वापरून दागिने पूर्णपणे हाताने घडवितात. कमीतकमी २५ ग्रॅमपासून पुढे हे दागिने उपलब्ध होऊ शकतात.
कुंदन ज्वेलरी
कुंदन दागिन्यांचा विकास मुगल शासन काळात मोठय़ा प्रमाणात झाला. कुंदन दागिन्यांना बिकानेरी व जयपुरी दागिनेदेखील म्हणतात. कुंदन दागिने हे प्रामुख्याने राजस्थानाशी संबंधित आहेत. कुंदन दागिन्यांमध्ये हिरे, पोलकी, मौल्यवान खडे वापरले जातात. २४ कॅरेटच्या सोन्यामध्ये खडे बसविण्याच्या पद्धतीस कुंदन म्हणतात. हिऱ्याच्या आकारानुसार सोन्याच्या पेटय़ा बनवून त्यात लाख वा सुरमा भरून त्यात हिरे बसवितात आणि यासाठी २४ कॅरेट सोन्याचा वापर होतो.
जुनागड ज्वेलरी
जुन्या पद्धतीने पलू पाडलेल्या हिऱ्यांना चक्री डायमंड म्हणतात. विशिष्ट प्रकारचे सोन्याचे घर करून हिरे हाताने बसवितात. विविध प्रकारची मौल्यवान रत्ने बसविली जातात. या पद्धतीचे काम जुनागडमध्ये विशिष्ट कारागीर करतात. त्यामुळे जुनागड नाव दागिन्यांत प्रसिद्ध झाले.
मीनाकारी ज्वेलरी
मीना काम असणारे दागिने अकबराच्या काळापासून प्रसिद्ध झाले. मीना कामासाठी दागिना सोन्यात घडवितात. दागिन्यावर नक्षी काढल्यावर त्यात रंग भरण्याच्या पद्धतीला मीना काम म्हणतात. यामुळे दागिना अधिक आकर्षक होतो. मीना करण्यापूर्वी नक्षी काम केलेला भाग स्वच्छ व पॉलिश करतात आणि त्यानंतर मीना नक्षी काम केलेल्या भागात भरली जाते. पूर्वी या दागिन्यांमध्ये विशिष्ट रंगच वापरले जात होते. आता काळानुसार अनेक रंग वापरतात. तसेच, यात मीनाकारी पेंटिंगप्रमाणे केली जाते. आता आधुनिक रचनांचे दागिने मीना कामात येतात.
थेवा ज्वेलरी
चित्तोडमध्ये विशिष्ट मारवाडी कुटुंबे थेवा दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहेत. थेवा हा राजस्थानी शब्द असून, याचा अर्थ सेटिंग (विशिष्ट पद्धतीने लावणे) आहे. नक्षीकाम केलेल्या सोन्याच्या पट्टीला थेवा की पट्टी किंवा सोने की चादर, असे म्हणतात. थेवासाठी सोन्याचा पत्रा आणि विशिष्ट प्रकारची रंगीत काच वापरतात. यात वापरण्यात येणाऱ्या काचेस चकाकी येण्यासाठी विशिष्ट प्रकारची प्रक्रिया केली जाते.
कलकत्ती ज्वेलरी (फिलिगरी वर्क)
सध्या दागिने घडविण्याच्या क्षेत्रात बंगाली कारागिरांचा टक्का अधिक आहे. बंगाली कारागिरांची एक विशिष्ट शैलीही आहे. फिलिगरी वर्क केलेले दागिने ही बंगालची ओळख आहे. असा दागिना घडविण्यापूर्वी सोन्याच्या तारेचे व टिकल्यांचे दागिन्याच्या नक्षीप्रमाणे मोजमाप करून कटिंग केले जाते. मेणाच्या पोळीवर कटिंग आणि चिकट असल्याने दागिन्याचे डिझाइन त्यावर घट्ट बसते. संपूर्ण डिझाइन मांडल्यावर प्लास्टर ऑफ पॅरिस भिजवून त्यावर ओतले जाते. प्लास्टरमध्ये अडकलेल्या डिझाइनच्या मागच्या भागावर डाग ठेवला जातो. बंगाली पद्धतीस फिलिगरी वर्क, असे म्हणतात. फिलिगरी कारागिरीच्या दागिन्यांमध्ये नक्षीप्रमाणे रिकाम्या जागा किंवा नक्षीला उठाव देण्यासाठी वापरण्यात येणारे सोन्याचे बारीक गोळे वापरले जातात त्याला रवा काम, असे म्हणतात.
डायमंड ज्वेलरी
हिऱ्याचे दागिने हे जगात अनेक शतकांपासून परिधान केले जात आहेत. पण हिऱ्याला विविध प्रकारचे आकार देण्याचे काम प्रामुख्याने भारतात झाले आणि हिऱ्याला पाडण्यात येणाऱ्या पलूंसाठी भारताचे योगदान मोठे आहे. कोहीनूर हा जगप्रसिद्ध हिरा भारताने जगाला दिलेली एक अमूल्य भेट आहे. त्यामुळे आधुनिक काळातही हिऱ्याच्या दागिन्यांना पलू पाडण्याचे प्रमुख काम भारतात होते. अगदी सुट्टय़ा हिऱ्याला पलू पाडण्यापासून हिऱ्या दागिन्यांची रचना भारतात मोठय़ा प्रमाणात होऊन त्यांची निर्यात विविध देशांत होते. हिऱ्याची किंमत ही कट, कलर, क्लॅरिटी, कॅरेट या चार ‘सी’जवरून (सी हे इंग्रजीतील आद्याक्षर) ठरते.
रोझ गोल्ड ज्वेलरी
हा दागिन्यांचा आधुनिक काळातही प्रकार असून, हिऱ्यांचे दागिने मुख्यत रोझ गोल्डमध्ये घडविले दिसतात. या दागिन्यास सोन्याचा रंग हा लालसर गुलाबी दिसतो आणि यामागचे मुख्य कारण म्हणजे यात सोन्याचे प्रमाण ७५ टक्के व अन्य धातूंचे प्रमाण २५ टक्के असते. हा पॉलिशचा प्रकार नसून सोन्यामध्ये विशिष्ट प्रकारचे धातू मिसळल्यामुळे सोन्याचा मूळ सोनेरी रंग बदलून त्यास ही लालसर गुलाबी रंगाची छटा येते. या प्रकारचे दागिने परदेशात मोठय़ा प्रमाणात वापरले जातात. जागतिक पातळीवर तसेच आपल्याकडेही हे दागने रोझ गोल्ड नावाने प्रसिद्ध आहेत.
कारवारी ज्वेलरी
रत्ने, मोती, पोवळे आदींचा वापर करून दागिने घडविण्याचे काम गेल्या दोनशे वर्षांपासून कर्नाटकमधील कारवारमध्ये होत आहे. तन्मणी, खोड, बुगडय़ा, चिंचपेटी, लफ्फा तसेच, मोत्यांचे हार, कुडय़ा आदी दागिने घडविण्यासाठी कारवार येथील कारागीर प्रसिद्ध आहेत.
(लेखक – पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.मध्ये डिझायनर)