संतोष सिंग
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
त्यांचं कुटुंब हाच त्यांचा पक्ष असल्याचा मुद्दा जेव्हा जेव्हा उपस्थित केला जात असे, तेव्हा राम विलास पासवान आपल्या खास शैलीत हसत म्हणत, ‘मतदारच आम्हाला निवडून देतात. निवडणुकीचा प्रश्न असतो, तेव्हा जिंकण्याची क्षमता हाच एकमेव निकष असतो.’ त्यांच्या या उत्तराने सर्व प्रश्नांना पूर्णविराम मिळत असे.
खरंतर बिहारसाठी घराणेशाही काही नवी नाही. लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तब्बल ४४ वर्ष या राज्यावर सत्ता गाजवली. मात्र तरीही पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी वेगळी ठरते. आज या पक्षाच्या सहा खासदारांपैकी तीन ‘पासवान’ आहेत. जमुईचे खासदार चिराग पासवान, हाजीपूरचे पशुपती कुमार पारस आणि समस्तीपूरचे खासदार प्रिन्स राज. ही माहिती पुरेशी बोलकी आहे.
पासवान नेहमी त्यांचे लहान भाऊ पशुपती कुमार पारस यांचा उल्लेख आपले व्यवस्थापक म्हणून करत आणि त्यांचे सर्वात लहान भाऊ रामचंद्र पासवान यांचा उल्लेख स्वतचा मुलगा असा करत. त्या दोघांमध्ये १५ वर्षांचं अंतर होतं. या भावांमधल्या अतूट नात्याच्या अनेक कथा सांगितल्या जात. उदाहरणार्थ, पासवान दिल्लीतून घरी येत तेव्हा पारस स्वयंपाकघराचा ताबा घेत आणि ‘बडय़ा साहेबां’साठी कोणते पदार्थ करायचे, हे ते स्वत ठरवत. अशा कथा काहींसाठी कौतुकाचा तर काहींसाठी चेष्टेचा विषय ठरत. पक्षाचे विरोधक घराणेशाहीवर टीका करताना आणि पाठीराखे नातेसंबंधांची प्रशंसा करताना याला ‘भाई-भतिजावाद’ म्हणून संबोधत.
आज लोक जनशक्ती पार्टी फुटीच्या उंबरठय़ावर उभी आहे. पशुपती कुमार पारस आणि प्रिन्स राज हे (दिवंगत रामचंद्र पासवान यांचे पुत्र), रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. या घटनेनंतर पासवान कुटुंबीयांपैकी सर्वात पहिली प्रतिक्रिया आली ती रामविलास पासवान यांच्या विभक्त झालेल्या पत्नी राजकुमारी देवी यांची. ‘कुटुंबाने एकत्र राहणं गरजेचं आहे,’ असं मत त्यांनी व्यक्त केलं. ‘रामविलासजींनी त्यांचं कुटुंब एकत्र राहील याची नेहमी काळजी घेतली. पासवान कुटुंबाने एकत्र राहायला हवं,’ असं त्या सांगतात. राजकुमारी देवी सध्या बिहारमधल्या खगारीया जिल्ह्य़ातल्या शहारबनी येथील पासवान यांच्या वडिलोपार्जित घरात राहतात. त्यांच्या दोन मुली आशा आणि उषा पटणामध्ये राहतात.
सध्या कुटुंबातले वाद चव्हाटय़ावर आले आहेत. याचा कुटुंबावर आणि रामविलास पासवान यांनी २००० साली स्थापन केलेल्या पक्षावर काय परिणाम होईल, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
* पासवान बंधू
जामुन दास या मका पिकवणाऱ्या गरीब शेतकऱ्याचे ज्येष्ठ अपत्य असलेल्या रामविलास पासवान यांचा प्रवास शहारबनी गावातील कोसी भागातल्या पडक्या घरातून सुरू झाला. या भागाला दरवर्षी पुराचा तडाखा बसत असे. अशा स्थितीत पाच जणांचं कुटुंब तीन बिघा जमिनीच्या तुकडय़ावर तगवणं हे दास यांच्यासाठी आव्हान होतं. त्यातूनच त्यांचा मुलांना शिक्षण मिळवून देण्याचा निर्धार पक्का झाला असावा, असं म्हटलं जातं. रामविलास यांनी कायद्यातली पदवी मिळवली. त्याबरोबरच पोलीस उपअधीक्षक (डेप्युटी सुपरिंटेंडन्ट ऑफ पोलीस) या पदासाठी ते पात्र ठरले. त्यांच्या या यशाविषयी जामुन दास समाधानी होते. पण तरुण रामविलास पासवान यांच्या डोक्यात वेगळीच चक्रं सुरू होती. त्यांनी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. बाकी इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे. पासवान नऊ वेळा लोकसभेत निवडून गेले. त्यापैकी आठ वेळा ते हाजीपूर मतदारसंघातून तर एकदा रोसेरा मतदारसंघातून विजयी झाले. त्यांनी दोनदा राज्यसभेत प्रतिनिधित्व केलं. तब्बल सहा पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळांत त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केलं.
आपली प्रगती केवळ आपल्यापुरतीच सीमित राहणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली. त्यांनी आपल्या भावांनाही सोबत घेतलं. आपला राजकीय वारसा त्यांच्यापर्यंत पोहोचवला. जनता परिवारातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी लोक जनशक्ती पार्टी हा पक्ष स्थापन केला. कुटुंबीयांचा राजकारणातला सहभाग आणखी वाढवणं त्यांना या पक्षामुळे सहज शक्य झालं.
१९७७ साली पासवान हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले, त्याच वेळी त्यांचे धाकटे भाऊ पारस खगारियातील अलौली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. शाळेत शिक्षक असलेले पारस या मतदारसंघातून सात वेळा निवडून आले. आपली काळजी घेतली जाईल याविषयी आश्वस्त असलेले पारस नेहमीच आनंदाने आपल्या मोठय़ा भावाच्या सावलीत राहिले. पासवान यांनीही पारस यांना कधी निराश केलं नाही. त्यांना लोक जनशक्ती पक्षाचं राज्य अध्यक्षपद देण्यात आलं. पक्षनिधीच्या विनिमयाचे आणि उमेदवारी देण्याचे अधिकारही त्यांना मिळाले.
दरम्यानच्या काळात पासवान यांचे सर्वात लहान भाऊ आणि विटभट्टी चालवणारे रामचंद्र यांच्या मनातही राजकारण प्रवेशाची इच्छा जागृत झाली. त्यांच्याविषयी सहानुभूती असणाऱ्या एका पत्रकाराने त्यांची ही इच्छा त्यांच्या मोठय़ा भावापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली. याविषयी कळल्यानंतर पासवान यांनी आपल्या लहान भावाला आपुलकीने विचारलं, ‘अय रे रामचंद्रा, तोय चुनाव लडभाय?’ (रामचंद्रा, तुलाही निवडणूक लढवायची आहे?)
आणि अशा प्रकारे सर्वात लहान बंधूंनीही राजकारणाच्या प्रांगणात प्रवेश केला. १९९९ मध्ये रामचंद्र जनता दलाच्या (युनायटेड) तिकिटावर रोसेरा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर ते समस्तीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवू लागले. या मतदारसंघातून २००९ साली ते पराभूत झाले मात्र त्यानंतर झालेल्या २०१४ आणि २०१९च्या निवडणुकांत त्यांनी विजय मिळवला. मात्र २०१९च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर काही महिन्यांतच त्यांचा हृदयरोगाने मृत्यू झाला. त्यानंतर समस्तीपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र प्रिन्स राज विजयी झाले.
थोडक्यात ही कौटुंबिक कथा एका दशकाहून अधिक काळ रंगली. पासवान पक्षाचा दिल्लीतला चेहरा होते. पारस यांच्याकडे राज्याची सूत्रं होती आणि रामचंद्र दोन्ही भावांसाठी साहाय्यभूत ठरत होते. पासवानांची पुढची पिढी वयात येईपर्यंत सारं काही व्यवस्थित सुरू होतं.
* कौटुंबिक रस्सीखेच
वादाची पहिली झलक दिसली, पासवान यांनी त्यांचा मुलगा चिराग याला राजकारणासाठी तयार करण्यास सुरुवात केली तेव्हा. चिराग हे पासवान यांच्या दुसऱ्या पत्नीचे- रीना यांचे पुत्र. अभियांत्रिकीतली पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी बॉलीवूडमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला, पण तिथे ते अपयशी ठरले होते. बिहारमधल्या अनिश्चिततेने भरलेल्या, निष्ठुर राजकारणात जुळवून घेणं त्यांच्यासाठी आव्हानच होतं, मात्र दरवेळी त्यांच्या पाठीशी ‘पापा पासवान’ उभे राहिले. लोक जनशक्ती पार्टी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष असताना आणि मोदी लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झालेले असताना २०१४ आणि २०१९मध्ये झालेल्या सलग दोन लोकसभा निवडणुकांत चिराग जामुई मतदारसंघातून निवडून आले.
तोपर्यंत त्यांच्याच पिढीतील आणखी एका पासवानांच्या मनात राजकारणात उतरण्याची इच्छा जागृत झाली होती. ते होते रामचंद्र पासवान यांचे पुत्र प्रिन्स राज. त्यांनी मदुराई कामराज विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय व्यवसाय या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली होती. त्यांनी त्यांच्या वडिलांचे सल्लागार म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली. ते चिराग ‘भय्यां’च्या निकटच्या वर्तुळात होते.
पण अल्पावधीतच काही समस्या निर्माण होऊ लागल्या. चिराग यांना संघटनात्मक निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचं स्थान मिळू लागलं आणि त्यांचे काका पारस यांचं लोक जनशक्ती पक्षातलं आणि विस्तारित कुटुंबातलं महत्त्व कमी होऊ लागलं, असं पक्षातल्या सूत्रांचं म्हणणं आहे. २०१९मध्ये पारस यांच्या जागी प्रिन्स राज यांची पक्षाचे राज्य अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. चिराग यांच्या आग्रहावरूनच ही नेमणूक करण्यात आल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे पारस दुखावले गेले.
नोव्हेंबर २०१९मध्ये राम विलास पासवान यांचं निधन झालं. त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून चिराग यांची निवड केली होती. कुटुंबात आधीच सुरू असलेल्या वादांत चिराग यांच्या आणखी एका वक्तव्यामुळे भर पडली. दिल्लीत राम विलास पासवान यांच्या निवासस्थानी झालेल्या ज्या बैठकीत पासवान यांनी चिराग यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ‘निवड’ केली होती, त्या बैठकीला पारस केवळ पाचच मिनिटं उपस्थित राहिल्याचं चिराग यांनी सांगितलं.
या दरम्यानच कोणत्या तरी टप्प्यावर या चुलत भावांतील नात्यात दरी निर्माण होऊ लागली. पक्षातले सूत्र सांगतात, राज्यातील अध्यक्ष म्हणून प्रिन्स आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून चिराग एकाच मुद्दय़ावर परस्परविरोधी मतं व्यक्त करत. चिराग यांच्या गोटात जावं की पारस यांच्या हे ठरवणं प्रिन्स यांच्यासाठी कठीण झालं होतं. पासवान यांच्या मृत्यूनंतर तणाव वाढत गेला. चिराग यांच्या १२ जनपथवरच्या निवासस्थानी पारस यांच्या भेटी तुरळक होत गेल्या आणि त्यांनी प्रिन्स यांना स्वत:च्या गोटात वळवून घेण्याचे प्रयत्न सुरू केले.
* पुढे काय?
असं सगळं सुरू असतानाच आणखी एक बॉम्बगोळा पडला, प्रिन्स यांच्याविरोधातली लैंगिक शोषणाची तक्रार! आता कुटुंब आणि त्याचाच विस्तारित भाग असलेला पक्ष इथून पुढे कुठे जाणार? पारस आणि प्रिन्स हेच लोक जनशक्ती पार्टी ठरतील का? पण आणखी एक जागा आहे, जी अजूनही रिक्त आहे- ती म्हणजे बिहारचा दलित चेहरा. माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे नेते जितन राम मांझी यांची कारकीर्द जवळपास संपल्यात जमा आहे. एकेकाळी राम विलास पासवान ज्या जागी होते ती जागा सध्याच्या पासवानांपैकी कोणी घेऊ शकेल का?
चिराग त्या शर्यतीत आहेत. त्यांच्या निकटवर्तीयांपैकी असलेल्या एका नेत्याच्या मते, ‘चिराग यांना बिहार पिंजून काढावा लागेल. ते भाजपाऐवजी एखाद्या पर्यायी आघाडीचाही विचार करू शकतात. सध्या तरी वाट पाहावी लागेल.’
response.lokprabha@expressindia.com