राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक इत्यादी क्षेत्रांतील धुरीण ‘आपण खरंच स्वतंत्र झालो आहोत का?’ या प्रश्नाचा सतत ऊहापोह करत आले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्याच्या संकल्पनेची राजकीय मांडणी जोरकसपणे केली. ज्या पॉल सार्त् व सिमॉन द बुव्हा या पाश्चात्य विचारवंत जोडगोळीने मानवी अस्तित्वाला केंद्रस्थानी ठेवून मर्यादाविरहित स्वातंत्र्याची संकल्पना मांडली. महात्मा गांधी व अरविंद घोष यांनी आध्यात्मिक स्पर्श असलेली स्वातंत्र्य संकल्पना साकारली. आणि त्यांची ज्या पूर्वसूरींशी नाळ जोडलेली होती त्या उपनिषद्कालीन ऋ षी, महावीर, बुद्ध यांनी ‘मुक्ती’ च्या परिभाषेत स्वातंत्र्याची व्याख्या केली.
मोक्ष, मुक्ती याविषयी चर्चा सुरू झाली की तरुण पिढी त्यातून काढता पाय घेते. त्यांना हे सर्व कालबा व निर्थकही वाटते. या सर्वाचा विचार म्हातारपणी करावा, किंवा करूच नये, ‘लाइफ एन्जॉय करावं’ अशी त्यांची मनोधारणा असते. पण या गांभीर्याने घेण्याच्या गोष्टींबद्दलची तरुणाईची उदासीनता ‘स्वातंत्र्य’ संकल्पनेचे महत्त्व अधिकच अधोरेखित करते. ‘ब्लू व्हेल’सारख्या काल्पनिक खेळात गुंग होऊन आत्महत्या करणारी पौगंडावस्थेतील मुलं बघूनही त्यांना ‘स्वातंत्र्याबद्दल’ प्रश्न पडत नाहीत? की आपण स्वतंत्र आहोतच अशी त्यांची खात्री आहे?
आपण खरंच स्वतंत्र आहोत? काय खायचं, कुठलं शिक्षण घ्यायचं, अर्थार्जनाचा कुठला रस्ता, कुठले कपडे वापरायचे, लग्न कुणाशी करायचं, काय वाचायचं.. हे सगळं ठरवायला आपण स्वतंत्र आहोत का? आपण स्व-केंद्री आहोत की स्व-तंत्र आहोत? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती गोष्टी करताना, निर्णय घेताना ‘आपण सवयीचे गुलाम’ असल्याचा अनुभव येतो? सवयींचेच कशाला, धर्म, जात, लिंग, भाषा, समाज, पूर्वग्रह, हेवेदावे, मत्सर, मोहवशता अशा असंख्य घटकांचे आपण गुलाम असतो. मग आपण स्वतंत्र कसे? स्वतंत्र होण्यासाठी या गुलामगिरीतून मुक्तता नको का?
खोलात जाऊन विचार केल्यास असे दिसते की, आपण स्वेच्छेनेच ही मानसिक गुलामी पत्करली आहे. असे म्हटले जाते की ‘‘जो मनाचा गुलाम असतो तो साऱ्या जगाचा गुलाम असतो, व जो मनाला काबूत ठेवतो, तो साऱ्या जगावर राज्य करतो.’’ आपण गुलाम म्हणून जगायचे की राजा म्हणून याचा निर्णय प्रत्येकानेच करायचा आहे. पण हेही तितकंच खरं की गुलामगिरीची जाणीव आपली स्वातंत्र्यसंपादनाची भावना प्रबळ करते. आपलं मन ज्यांच्या गुलामगिरीत आहे त्यांच्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपली चिकित्सक बुद्धी, सदसद्विवेक यांची भूमिका महत्त्वाची ठरते. योग्यायोग्यतेची, सत्यासत्येचे परखड जाणीव करून देऊन बुद्धी स्वातंत्र्याचा मार्ग प्रशस्त करते.
स्वातंत्र्याची चर्चा करताना आणखी एक मुद्दा विशेष महत्त्वाचा ठरतो. आपल्याला गुलामगिरीत ढकलणाऱ्या बहुतांश घटकांचे निराकरण करून निर्मोही मनाने वावरणे, म्हणजे एका अर्थी संन्यस्त वृत्तीने जगणे; जळात राहून कलमपत्राप्रमाणे राहाणे. पण तुमच्या-आमच्यासारख्या संसारीजनांना असे अलिप्तपणे जीवन जगण्यापेक्षा लेकुरवाळ्या आईच्या समाधानी मनाने जीवन जगणे अधिक आकर्षक वाटेल. ‘‘माझं कुणीच नाही. पण मी सर्वाचा’’ यापेक्षा ‘‘सर्व माझेच आहेत व मीही सर्वाचा’’ ही सर्वाना निरपेक्ष प्रेमाच्या धाग्याने बांधणारी भावना आपल्याला अधिक समृद्ध करणारी व आपल्या सामाजिक अस्तित्वाला अर्थ प्रदान करणारी आहे.
सर्वसाधारण अनुभव असा असतो की प्रत्यक्ष ध्येयपूर्तीपेक्षा ध्येयाकडे होणारी वाटचाल ही अधिक आनंददायी, उत्कंठावर्धक व उत्साहजनक असते. ‘सर्व माझे व मी सर्वाचा’ हे ध्येय गाठण्यासाठी आपण जी वाटचाल करू ती आपल्या मानसिक गुलामगिरीचे जोखड भिरकावून देणारी व आंतरिक उन्नतीचा अधिकाधिक अनुभव देणारी असेल. तोच तर स्वातंत्र्याचा अनुभव!
या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सर्वाना अशा आंतरिक स्वातंत्र्यप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी, पूर्वग्रह व संकुचितता यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!