प्रा. डॉ. रमेश सूर्यवंशी – response.lokprabha@expressindia.com
महाराष्ट्राची बोली आणि प्रमाणभाषा मराठी. मराठी भाषा वाचविण्यासाठी, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी वैयक्तिक, संस्थांत्मक आणि शासनस्तरावरही आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाची राज्य मराठी विकास संस्था, साहित्य संस्कृती मंडळ, मराठी कोश मंडळापासून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गावागावांतील शाखेपर्यंत अनेक संस्था प्रयत्न करत आहेत. साहित्य संमेलने व चर्चासत्रांतही त्यावर चर्चा होत असतात. भाषेच्या प्रमाणीकरणासाठी ध्येय धोरणांमध्ये अनेकदा बदलही घडवून आणले गेले आहेत. अनेकदा शुद्धलेखनापासून प्रमाणलेखनापर्यंतच्या नियमांत बदल करण्यात आले आहेत. तीच बाब मराठी कोश मंडळाने, राज्य मराठी विकास संस्थेने आणि साहित्य संस्कृती मंडळानेही स्वीकारली आहे, हे स्वागतार्ह आहे.
बोली आणि प्रमाण भाषा
प्रमाण मराठी आणि बोली यांचा परस्पर संबंध नव्या पद्धतीने पुढीलप्रमाणे मांडता येणे शक्य आहे. दैनंदिन व्यवहारात जी बोलली जाते ती बोली. तीच खरी भाषा, ती शुद्ध किंवा अशुद्ध असण्याचा प्रश्नच नसतो. मात्र ग्रंथ, नियम, कायदे आणि जिथे बहुभाषक एकत्र येतात, तिथे वापरावयाची भाषा ती प्रमाण भाषा असते. तिला इंग्रजीत ‘स्टॅन्डर्ड लँग्वेज’ किंवा ‘िलक लँग्वेज’ही म्हणता येईल. मराठी ही महाराष्ट्राची प्रमाण भाषा- िलक लँग्वेज आहे. महाराष्ट्राचा व्यवहार मराठीतून चालतो. मात्र महाराष्ट्राच्या विविध भागांत विविध बोली बोलल्या जातात.
खानदेशात अहिराणी, मराठवाडय़ात मराठवाडी, मालवणमध्ये मालवणी, तर कोल्हापूरकडे कोल्हापुरी अशा बोली आढळतात. या प्रादेशिक बोली आहेत, तर भिल्ली, लाडशाखी, गुजरी, अहिराणी, गोरंमाटी, पावरी, परदेशी या प्रकारच्या जातीजमातींच्या बोली या सामाजिक बोली आहेत. विविध प्रादेशिक आणि समाजबोली बोलणाऱ्यांमधील भाषा व्यवहार सुकर व्हावेत, यासाठी विविध बोलींतील प्रमाण शब्द, प्रमाण वाक्यविन्यासाच्या पद्धतींना एकत्रित रूप देऊन, त्यासंदर्भात नियमावली करून प्रमाण मराठी भाषा तयार करण्यात आली. जगातील सर्वच प्रमाण भाषांची निर्मिती अशाच पद्धतीने झाली आहे. प्रमाण भाषा ही एखाद्या विशिष्ट जातीची किंवा समाजाची किंवा एखाद्या विशिष्ट भूभागाची भाषा नसते. ती ग्रंथांची भाषा असते. प्रमाण भाषा काही प्रादेशिक किंवा जाती जमातींच्या भाषांची आई नाही किंवा प्रादेशिक भाषा प्रमाण भाषेच्या उपबोलीही नाहीत. उलट प्रमाण मराठी भाषा ही या सर्व बोलींतून साकार झालेली आहे. त्यामुळे या सर्व बोलींतील शब्दांचा साठा हा प्रमाण मराठीचे वैभव वाढविणारा आहे.
मराठीच्या बृहत्कोशात मराठवाडी, (मराठवाडय़ाचीही स्वतंत्र बोली आहे. तिचाही स्वतंत्र बोली म्हणून अभ्यास व्हायला हवा.) वऱ्हाडी, अहिराणी यांसारख्या सर्वच बोलींचे शब्द यायलाच हवेत. या बोलींतील शब्द आणि वाक्यांच्या समावेशामुळे मराठीची शुद्धता हरपेल, ही भीती निराधार आहे. विविध बोलींतील, लेखक, कवी, कथाकार, नाटककार आपल्या जीवनानुभवांचे चित्रण करताना त्यांच्या बोलीतील शब्द सहजपणे वापरतात. मग अशा शब्दांना प्रमाण मराठीने आपल्या कोशात स्थान दिले नाही, तर मराठी परिपूर्ण प्रमाण भाषा होऊ शकणार नाही. कोणतीही प्रमाण भाषा इतर बोलींतील आणि इतर प्रमाण भाषांतील प्रचलित शब्द आपल्यात सामावून घेत असतेच. मराठीनेही तेच करायला हवे. मात्र तिची शुद्धता टिकविण्याच्या नादात ते टाळले जाते. इतर बोलींचे व भाषांचे शब्द, वाक्यविन्यास पद्धती स्वीकारणे हा प्रत्येक भाषेचा स्वभाव असतो. तरच ती भाषा जिवंत राहते, वाढते आणि टिकते. ऑक्सफर्डच्या इंग्रजी कोशाने जगातील बहुसंख्य भाषांतील शब्दांना सामावून घेतले आहे. मराठी टिकवावयाची असेल तर हे धोरण स्वीकारावे लागेल.
प्रत्येक भाषा किंवा बोली ही संस्कृतीत रुजलेली असते, असे सांगतिले जाते, असे असेल तर विद्वानांनी एकत्र येऊन तयार केलेले नियम आणि त्यांच्या चौकटीत वावरणारी प्रमाण भाषा कुठल्या संस्कृतीत रुजलेली असणार? मराठवाडा, विदर्भ, खानदेश या भूप्रदेशाची स्वतंत्र संस्कृती आहे. प्रत्येक बोली ही तिथल्या संस्कृतीत खोलवर रुजलेली असते. कृषी संस्कृती असेल तर बोली ही कृषी संस्कृतीत रुजलेली, वाढलेली असते. जसजशी स्थित्यंतरे होत जातात, आधुनिकीकरणाचा प्रभाव पडत जातो, तसतशी बोलीतही स्थित्यंतरे होत जातात. जुन्या चालीरीती, रिवाज, जुनी अवजारे, जुन्या कृषिक्रिया यांची जागा नव्याने घेतल्यानंतर बोलीतील जुनी शब्दावली जाऊन नवीन शब्दांना स्थान मिळते. त्यामुळे बोली अशुद्ध होत नाही. हीच बाब कोणत्याही प्रमाण भाषेची, आधीचे नियम हे त्या भाषेतील व्यवहारांत अडथळे निर्माण करत असतील तर कालांतराने ते नियमही बदलावे लागतात. या सर्व बोलींनी नवीन शब्दावली वा नियमावली स्वीकारली तर प्रमाण भाषेच्या वैभवात भरच पडते. ती अधिक मोठय़ा भूभागात स्वीकारली जाते. हे सर्व होण्यासाठी आपल्याला पारंपरिक प्रमाण मराठीची वर्णन करणारी मांडणीच बदलावी लागेल.
मराठीच्या अभ्यासाची नव्याने मांडणी
महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांमध्ये मराठी ही महाराष्ट्राची मुख्य बोली आहे. अहिराणी, मराठवाडी, मालवणी, कोल्हापुरी या तिच्या उपबोली आहेत हेच आजवर शिकविले गेले आहे. माझे मत याच्या अगदी विरुद्ध आहे आणि ते मराठीच्या परंपरावादी अभ्यासकांना मान्य नाही.
मराठी ही महाराष्ट्राची सर्वमान्य प्रमाण भाषा. सर्व सरकारी व बहुतेक बिगरसरकारी व्यवहार याच भाषेतून चालतात. या प्रमाण मराठीचे विविध प्रकार आहेत. हे प्रकार वा प्रभेद हे सामाजिक आणि प्रादेशिक या निकषांवर पाडता येतात. ते पुढीलप्रमाणे-
सामाजिक प्रभेद
मराठी बोलणाऱ्यांच्या जातीची छाप या प्रमाण मराठीवर पडते आणि मराठीचे रूप बदलते. ती त्या जातीची बोली अथवा त्या जातीची मराठी भाषा ठरते. अशा जातीनिहाय, समाजनिहाय बोलल्या जाणाऱ्या प्रमाण मराठीचे सामाजिक प्रभेद पुढील प्रमाणे आढळतात.
अहिराणी (अहिरांची बोली), लेवापाटीदार बोली : (लेवा पाटलांची बोलीचा प्रभाव असणारी मराठी), गुजरी बोली : गुर्जरांची बोलीचा प्रभाव असणारी मराठी, परदेशी (परदेशीची बोली), बंजारा बोली (बंजारा लोकांची बोली), भिल्ली बोली (भिल्लांची बोली) इ.
प्रादेशिक प्रभेद
प्रत्येक १२ कोसांवर भाषा बदलते, या उक्तीनुसार मराठीभाषा ज्या ज्या प्रदेशांत बोलली जाते, त्या त्या प्रदेशांत तिचे जे वेगळेपण आढळते ते वेगळेपण हे त्या प्रदेशाच्या नावाने ओळखले जाते. जसे..
वैदर्भी (विदर्भ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात बोलली जाणारी मराठी), पुढे नांदुरी, अकोल्याची बोली, नागपुरी, झाडीबोली (भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत बोलली जाणारी बोली), खानदेशी, (पुन्हा पुढे-नंदुरबारी, बागलाणी, जामनेरी, तप्तांगी), कोल्हापुरी, मराठवाडी आणि कोकणी (आता या कोकणी बोलीला स्वतंत्र भाषेचा दर्जा दिला गेला आहे), तंजावरी मराठी, नेपाळी मराठी (नेपाळी व अहिराणीत बरेच साम्य आहे), तमिळनाडूतील सौराष्ट्री मराठी (गुजरातमधील नव्हे), बऱ्हानपुरी मराठी (बऱ्हानपूपर्यंत अहिराणी बोलली जाते.)
प्रमाण मराठी ही संकल्पना अहिराणी, खानदेशी, मालवणी या प्रादेशिक मराठीहून किंवा भिली, लेवापाटीदार किंवा परदेशी या सामाजिक प्रभेदाहून विशाल आहे. अशा प्रकाराच्या मांडणीमुळे, प्रादेशिक अस्मिता जागविण्याचे व स्वतंत्र बोलीला मान्यता देण्याचे प्रकार थांबतील. सर्वानाच मराठी ही आपलीच बोली वाटेल. मात्र आपली बोली ही मराठीची उपबोली आहे, या भावनेतून विविध बोलींची उपसंमेलने उदयास येतात. या बोलींना स्वतंत्र भाषेचा दर्जा द्यावा, या मागणीला प्रोत्साहन मिळते. बोलींना स्वतंत्र दर्जा व पुढे त्या भाषिक प्रदेशाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याच्या मागण्या जोर धरतात. आज अहिराणी बोलीची स्वतंत्र ग्रामीण साहित्य संमेलने व अखिल भारतीय संमेलने तसेच झाडी बोलीची स्वतंत्र संमेलने, मराठवाडय़ात मराठवाडी बोलीची स्वतंत्र संमेलने होऊ लागली आहेत. हे सगळे मराठी या प्रमाण भाषेच्या विद्यापीठीय वर्णनातून घडते, हे लक्षात घ्यायला हवे. याच अभ्यासकांनी अहिराणी ही मराठीचा सामाजिक प्रभेद आहे व खानदेशी हा प्रादेशिक प्रभेद आहे अशी मांडणी केली तर कुणाचीही अस्मिता दुखावण्याचे कारण नाही. हे पूर्वीच झाले असते, तर कोकणी या स्वतंत्र बोलीचा जन्मही झाला नसता. ती मराठीचा एक प्रादेशिक प्रभेद म्हणून वावरली असती. असे झाले नाही, तर अहिराणी भाषिक अहिराणीला स्वतंत्र भाषेचा दर्जा मागतील, तसाच प्रकार वैदर्भीच्या व झाडीबोलीच्या बाबतीत होण्याची भीती आहे. विद्यापीठांनी व अभ्यासिकांनी प्रभेदाचा सिद्धांत स्वीकारला तर मराठी वाचविण्याचे प्रयत्न सुकर होतील. तिच्या बृहत्कोषात सगळय़ा प्रादेशिक व सामाजिक प्रभेदांचे सगळे शब्द चुटकीसरशी सामावले जाऊन मराठीचा शब्दकोश दसपटीने मोठा हाईल. विशेष म्हणजे यातून लयास जाणाऱ्या सगळय़ा बोलींचे संवर्धनही होईल. बोली वाचल्या तरच मराठी वाचेल ही भावना बळावेल.
या नव्या भूमिकेचे फायदे
अभिजात भाषेचा दर्जा लाभेल
मराठी या भाषेचे प्रमाणीकरणही हवे आहे, अन् अभिजात भाषेचा दर्जाही प्राप्त करून घ्यावयाचा आहे. कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी तिचे प्राचीनत्व सिद्ध करावे लागते. आजची प्रमाण मराठी ही काही प्राचीन नाही. ती आजची प्रमाण भाषा आहे. मात्र तिचे उपरोक्त सामाजिक व प्रादेशिक प्रभेद, पुढे तिचे कालिक भेद हे मात्र अभिजात दर्जा प्राप्त करण्यासाठी पात्र ठरू शकतात. ते प्राचीन आहेत. मग मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्यायचा असेल तर या प्राचीन बोलींना, मराठीच्या उपरोक्त सामाजिक आणि प्रादेशिक प्रभेदांना अव्हेरून चालणार नाही. प्राचीनत्व असणाऱ्या वा ज्यांना इतिहास आहे अशा शौरसेनी, मागधी, लाटी, प्राकृत, अपभ्रंश या सर्वाना टाळून प्रमाण मराठी ही संकल्पना स्पष्ट करता येणारी नाही.
मराठी भाषकांच्या संख्येत वाढ
सर्वानी ही भूमिका स्वीकारली तर मराठीभाषक एकसंघ राहील. त्याचसोबत महाराष्ट्रही एकसंघ राहील. संपूर्ण महाराष्ट्र किंवा संपूर्ण मराठी ही प्रत्येकाला आपली वाटेल. जनगणनेत अहिराणी, खानदेशी, परदेशी, लेवापाटीदार अशी नोंद न करता मराठी म्हणून नोंद केली जाईल व महाराष्ट्राची जनसंख्या ही मराठी बोलणाऱ्यांची संख्या ठरेल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचे बरेच अडसर दूर होतील. एकूण भाषिक भूगोल बदलेल.
लोकसाहित्याचा परीघ विस्तारेल
महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील मराठीच्या सामाजिक व प्रादेशिक प्रभेद असणाऱ्या बोलींतील लोकसाहित्य हे प्रमाण मराठीचे लोकसाहित्य ठरेल व अभ्यासकांना एक वैभवशाली दालन खुले होईल. मन आणि भावना या सर्वत्र समान पातळीवर वावरत असतात. प्रदेश बदलला, शब्दांची फेरफार झाली तरी लोकसाहित्यात व्यक्त होणाऱ्या भावनांत समान दुवा आढळतो. म्हणी, वाक्प्रचार, जात्यावरची गाणी, झोक्यावरची गाणी, सण-उत्सवांची गाणी, विधीप्रसंगी म्हटली जाणारी गाणी ही प्रदेशनिहाय व समाजनिहाय वेगळेपण जपणारी असली तरी ते प्रमाण मराठीच्या सामाजिक व प्रादेशिक प्रभेदांचे लोकवाङ्मय ठरेल. त्यांची व्याप्ती मोठी ठरणारच. यातून मराठीच्या लोकसाहित्य या क्षेत्राचा परीघ हा कितीतरी पटींनी वाढेल.
शब्दकोश वाढेल व उसनवारी थांबेल
महाराष्ट्रातील सगळय़ाच बोली मराठीचेच सामाजिक किंवा प्रादेशिक प्रभेद असल्याने कोणत्याही शब्दांचे वावडे या मराठीला राहणार नाही. कोणताही शब्द हा ग्राम्य, गावंढळ राहणार नाही. याशिवाय कोणत्याही प्रादेशिक किंवा सामाजिक मराठीच्या प्रभेदातून लेखन करणारा लेखक हा मराठी लेखकच गणला जाईल. त्याने उपयोजिलेले प्रादेशिक वा सामाजिक शब्द हे प्रमाण मराठीच्या बृहत्कोशात सामावले गेल्याने ते इतर मराठी वाचकांना अर्थ समजण्याच्या दृष्टीने उपलब्ध राहतील. त्यामुळे साहित्यकृतीत उपयोजिलेले शब्द हे अनाकलनीय राहणार नाहीत व त्यांची समीक्षा करताना चुकांची शक्यताही कमी असेल.
शिवाय हल्ली मराठीकरणाच्या नावाखाली बरेच शब्द मराठीत नाहीतच म्हणून इंग्रजी शब्दांचे मराठीकरण करणे सुरू आहे. सुसंगत पर्यायी शब्द धुडांळणे सुरू आहे. अशा पर्यायी शब्दांसाठी बोली भाषांत शब्द उपलब्ध असतात. त्यांचा वापर करून मराठीही समृद्ध करता येईल. या प्रभेदांतील शब्दांच्या अर्थछटांचा अभ्यास होईल व त्या शब्दांना मानाचे स्थान मिळेल.
नवलेखकांना प्रोत्साहन
आजचे नवलेखक, नवकवी या आजच्या प्रमाण मराठी च्याधोरणांमुळे बुजतात, मागे हटतात, त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो. आपण वापरलेला शब्द हा आपल्या बोलीतील असल्याने मराठी समीक्षक तो स्वीकारतील की नाही या दडपणाखाली ते लेखन करतात. त्यामुळे त्यांच्या हातून व्हावयाच्या कसदार साहित्यनिर्मितीला खीळ बसते. आपण जसे बोलतो तसे लिहायचे नसते ही भावनाच मुळात नवनिर्मितीला मारक आहे. बोली भाषांचा स्वीकार केल्यास हे अडसर दूर होतील. त्यातून नवनवे साहित्यिक उदयाला येतील आणि मराठीेचा परिघ विस्तारेल.
उद्दिष्टे सफल होतील
महाराष्ट्र शासनाने ‘राज्य मराठी विकास संस्थे’ची स्थापना करून मराठीच्या वृद्धीसाठी जी उद्दिष्टे ठरविली आहेत, ती बोली भाषांचा स्वीकार करण्याच्या धोरणातून साध्य करणे सहज शक्य आहे. बहुजनांच्या बोलीभाषा व प्रमाण मराठी यांच्यातील देवाणघेवाण वाढवून मराठी भाषा लोकाभिमुख व समृद्ध करण्याचे उद्दिष्ट आपोआपच सफल होणार आहे. त्याचप्रमाणे वंचितांच्या हितासाठी आणि विकासासाठी माध्यम भाषेचा सर्जनशील वापर करण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरजच भासणार नाही.
बोलींचा सामाजिक अनुबंध :
आजच्या प्रमाण मराठीच्या स्वरूपाचा विचार करता ती सर्वसामान्यांची भाषा होऊ शकत नाही. मराठीतून न्यायदान वा कारभार करावयाचा म्हणजे सध्याच्या बंदिस्त प्रमाण मराठीतून तो करावयाचा, पुणेरी मराठीतूनच तो करावयाचा असा त्याचा आज तरी अर्थ होतो. आजची मराठी ही केवळ पोथी वाचणाऱ्यांनी सांगितलेल्या पोथीतील नियमांप्रमाणे बद्ध होत चालली आहे. याच मराठीने महाराष्ट्रातील बोलींचा शब्दसाठा सामाजिक आणि प्रादेशिक रूपे मानून स्वीकारला तर ती सर्वसामान्यांची वा बहुजनांची भाषा होऊ शकेल. आज दूरदर्शन किंवा आकाशवाणीवरून दिला जाणारा कोणताही सल्ला (जाहिरात वगळता) कितपत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो? प्रमाण मराठीतून ‘आता कुळवणी करावी’ असा सल्ला शेतकऱ्यांसाठी दिला, तर तो पुणे परिसर वगळता इतरांना कळणार नाही. विदर्भातील निवेदकाने जर ‘आता कास्तकारांनी डवरनी करावी’ असे वाक्य वापरले तर ते मराठी होत नाही आणि ते विदर्भाशिवायच्या इतरत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना कळतही नाही. त्याच वाक्याला पर्याय म्हणून अहिराणी ‘आता सेतकरीस्नी कोयपनी करवा’ असे म्हटले तर खानदेशव्यतिरिक्त ते कुणालाही कळणार नाही. सर्वसामान्य जनता आपण बोलतो ती प्रमाण मराठीच बोलतो हा समज करून बसली आहे. अन् प्रमाण मराठीवाल्यांनी त्यांना अव्हेरले आहे. विदर्भात, खानदेशात, मराठवाडय़ात सर्वत्र मराठीच बोलली जाते असे म्हटले तर विदर्भातील मराठी खानदेशातील शेतकऱ्यास का कळू नये? याचा अर्थ प्रमाण मराठी ही संपर्क भाषा म्हणून अपुरी पडते. तिने आजवर मराठीच्या प्रादेशिक व सामाजिक प्रभेदांतील वऱ्हाडी, मराठवाडी, अहिराणी शब्दांना अव्हेरले आहे. महाराष्ट्राची संस्कृती ही कृषी संस्कृती असून महाराष्ट्राच्या बोलीची पाळेमुळे ही त्या संस्कृतीत रुजलेली आहेत. केवळ कुळवणी या कृषी क्रियेसाठी डूब्बनं, डवरनं, कोयपनं आणि कुळवणी करणे हे प्रदेशानुरूप पर्यायी शब्द आहेत. हेच शब्द जर प्रमाण मराठीने स्वीकारले तर मराठीचा आजचा शब्दसाठा हा कमीत कमी दहा पटींनी वाढेल. प्रत्येक कृषी क्रियेला, कृषी अवजारांच्या अंगांना प्रदेशानुसार वेगळी नावे आहेत. मात्र ती नावे जर प्रमाण मराठी स्वीकारार्ह नसतील तर ती प्रमाण कशी?
मराठीने आजवर अशा प्रकारचे सोवळे बाळगले आणि त्या त्या प्रदेशातील प्रादेशिक मराठी जाणणाऱ्यांच्या मदतीशिवाय पुणेरी विद्वानांनी बोलीतील रुजलेले लोकसाहित्य, जुने लेख, संतसाहित्य यांची चुकीच्या पद्धतीने मांडणी करून चुकीचे अर्थ दिले. त्यामुळे लोकसाहित्य वा इतर लेखनाचा खरा अर्थ प्रमाण मराठी भाषकांपासून दूरच राहिला आहे.
याची काही उदाहरणे पाहता मराठीला सोवळय़ात ठेवण्याचे दुष्परिणाम जाणवतील. (आजवर मराठी वाचवा हा आक्रोश करणाऱ्यांनी मराठीच्याच प्रादेशिक व सामाजिक प्रभेद असणाऱ्या या बोलींपासून मराठी दूर ठेवणे म्हणजे मराठी वाचविणे हाच प्रचार आणि प्रसार केलेला आहे.) मराठीने आजवर पुण्यात, मुंबईत राहून बहुजनांच्या बोलीतील मराठीच्याच प्रादेशिक व सामाजिक रूपांत दडलेल्या लोकसाहित्याचे विकृतीकरण केलेले आहे त्याचे काही नमुने पुढीलप्रमाणे)
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या एका पुस्तकातील शब्द हे लोकसाहित्यातून घेऊन त्या शब्दांचा प्रमाण मराठीतून आणि प्रमाण इंग्रजीतून अर्थ दिला आहे. त्यासह लोकसाहित्यातील तो शब्द असणाऱ्या ओळीही दिल्या आहेत. अशी पद्धती स्वीकारण्याच्या उदात्त हेतूची मीमांसाही प्रास्ताविकात केलेली आहे. याचप्रमाणे अहिराणी लोकगीते, भिल्लांची गाणी यांसारख्या पुस्तकांतील काही शब्दांची तालिका पुढे देत आहे (अर्थात या ज्येष्ठ लेखकांच्या संशोधनाची व त्यांनी केलेल्या पायपिटीची, कष्टांची जाणीव ठेवून माफी मागून.).
पुस्तकातील दिलेला मूळ शब्द आणि त्याचा प्रमाण मराठीतील लेखकाने दिलेला अर्थ आणि योग्य अर्थ या क्रमाने शब्द दिले आहेत.
खोय : ना. स्त्री (अहि.) सवय, ऌुं्र३
जवारी बाजरीनी खोय मनी सांडायनी
खाल्ताना बांदले पांभर भाऊ मांडायनी
योग्य अर्थ : खोळ, झोळी; पेरणी करणारा बियाणांची खोळ, ओटी जी कंबरेभोवती बांधतो.
चावयनं : क्रि. (अहि.) चाळवणे, झोपेत बडबडणे, ३ ुी ्िर२३४१ुी ्रिल्ल २’ीस्र्
शेजी चावये तठे मन न रमये,
माय चावयस चंद्र माडीवर मावये.
योग्य अर्थ : गप्पा मारणे, गप्पागोष्टी करणे, बोलणे.
डवरा : ना.पु.(व) को. डुरा, (तु.डबरा) नदीच्या पात्रातील पाण्याचा खड्डा किंवा चर, ं ्िर३ूँ ्रल्ल ३ँी १्र५ी१ ुी िं ्िर३ूँ ऋ१ ६ं३ी१
पाणी वरून पडते काय पाहता वावरा धरा धलाल डवरा
योग्य अर्थ : शेती अवजार, डवरण्याचे साधन, कोळपे, कुळवणी करण्याचे अवजार .
पराई : ना स्त्री; बांधा, ठेवण, ऋ१े, ऋीं३४१ी
गावाच्या पारावरी बाई कुणी लावली बाई चीच
नटव्या बंधूजीची लहान पराई बोली उच्
योग्य अर्थ : परस्त्री, परकी, परक्याची लेक, जवळची
नसलेली.
फाटी : ना.स्त्री (व.) पाटी, ुं२‘ी३
कडू शेदोडीले उना फाटा फाटी पाला
अस्तुरीनी म्होरं काय बोली बानीवाला
योग्य अर्थ : फांदी, प्रत्येक फांदी (फाटी)
बायी येशात : क्रि.(अहि.) बांधून आला, बांधून याल, ूेी ुूं‘ ंऋ३ी१ ३८्रल्लॠ..
तुम्हनी मायनी माले गहिरं मारं
ते तुम्ही तिले आपला वावरमा फासमां
बायी येशात तधय ज मी खाटवरथून उठसू..
योग्य अर्थ : बायन – जाळणे, बायी येशात – जाळून
याल.
बेला : ना.पु.(म.) पैंजणासारखा पायातील दागिना, ं ‘्रल्ल िऋ ंल्ल‘’ी३
पायातले बेल वाजती.. पायातला बेला वाजे ठसंठसं..
योग्य अर्थ : जोडवे, पायांच्या बोटातील दागिना
लवना : ना.पु.(म.) सूप, ६्रल्लल्ल६्रल्लॠ ुं२‘ी३.
इठठल पव्हने जनाबाईला तातडी
साठीचं तांदूळ उभ्या लवन्यानं पाखडी
योग्य अर्थ : (कि.वि.) ओणवे होऊन, पुढे पुढे झुकून,
वाकून.
वदरणे : क्रि. आश्चर्य वाटणे, अभिमान वाटणे, ३ ुी २४१स्र्१्र२ी,ि ६ल्लीि१२३१४ू‘, ३ ुी ं६ी.ि
वनाच्या वाटेनं बापलेकाची लढाई
वदरुन पाहे सावळी सीतामाई
योग्य अर्थ : (श.अ.) वरून, वरच्या बाजूने
याचप्रमाणे वि. गो. पांडे यांनी अहिराणी लोकगीते या
पुस्तकांतील काही शब्दांचे अशा प्रकारे चुकीचे अर्थ
दिले आहेत.
दवेपोवया : पाचू माणिक मोती, पोवळे.
गंगा जमूना दोन्ही खेते, तठे काय देवपोवयाना रोपे
(खरी ओळ अशी- गंगा जमूना दोन्ही खेते, तठे काय
देवपह्याना रोपे)
झालेली चूक : मूळ शब्द हा देवपह्य असून देवपोवया नाही = देवकपाशी
नाटी : बहिणीचे नाव
लाडकी वं लेक, तू नाटी ल्हेसी का लूगडं
योग्य अर्थ : नाटी = साडी, लुगडय़ाचा प्रकार
वि. गो. पांडे यांनीही अहिराणी लोकगीतांच्या अभ्यासात काही शब्दांचे अर्थ दिलेले आहेत.
तोच प्रकार मराठवाडा विद्यापीठाच्या डॉ. सुदाम जाधव यांच्या भिल्लांची गाणी यासारख्या ग्रंथातूनही झालेल्या चुकांबाबतीत आढळतो.
शिकाडी नयी शाया मायबाप सनीमाले
(आई बाप सिनेमाला जात असत त्यांनी मला शाळा शिकविली नाही.)
ओळ अशी हवी – शिकाडी नई शाया मायबापस्नी माले
(आई-वडिलांनी मला शाळा शिकविली नाही.)
योग्य अर्थ : (अहिराणीत ‘सनी’ हा विभक्त प्रत्यय आहे. सनी = नी)
उनाया नाउन पायबैतीन लाडी : (नाउन= राहून, उन्हाळा असल्याने पाय पोळतात)
(ओळ अशी हवी – उनायाना उन पाय बैतीन लाडी..)
खरा अर्थ – उन्हायाना उन = उन्हाळय़ाचे उन्हं)
उन्हायाना उन पाय बैतीन लाडी
– ना हा विभक्त प्रत्यय आहे.
उन्हाया आणि नाऊन ही फोड चुकीची.
उपरोक्त सर्वच पुस्तकांतील शब्दार्थाचा, वाक्यविन्यासांचा विचार करता, या प्रकारच्या चुका होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आजवर मराठीच्या अभ्यासकांनी आणि कोशांनी अभ्यासकांना इतर बोलीतील शब्द उपलब्ध करूनच दिले नाहीत. त्या शब्दांना आजवर दूर लोटले. बोलींचे शब्द नाकारणे, त्यांचा अभ्यास नाकारणे म्हणजे ती बोली ज्या संस्कृतीत रुजली आहे, तीच नाकारणे अशा प्रकारे महाराष्ट्रातील या विविध बोली बोलणाऱ्यांची संस्कृती नाकारल्यावर उर्वरीत संस्कृतीतून महाराष्ट्राच्या संपूर्ण संस्कृतीचे दर्शन वा इतिहासाचे दर्शन घडू शकत नाही. बोली म्हटली म्हणजे समाज आलाच. खरे पाहता महाराष्ट्रातील असंख्य बोलीतील हजारो शब्द आजही महाराष्ट्रात सर्रास वापरले जातात; ते आजही प्रमाण मराठीत नाहीत. यासाठीच महाराष्ट्रातील सर्व बोली या प्रमाण मराठीचेच सामाजिक आणि प्रादेशिक प्रभेद म्हणूनच मांडणी होणे अपेक्षित आहे.
लोकजीवन हे बोलीत रुजलेले आहे. बोली आणि समाजजीवन विलग करता येणार नाही. खानदेशाच्या समाजजीवनाचे प्रतििबब खानदेशात बोलल्या जाणाऱ्या अहिराणी या बोलीतील लोकगीतात प्रतििबबित झालेले आपणास दिसेल. तर मराठवाडय़ाचे प्रतििबब हे मराठवाडी बोलीत. लोकगीतांप्रमाणेच कोणत्याही बोलीतील म्हणीच्या आधारे आपण ती बोली बोलणाऱ्या समाजाचे चित्रण उभे करू शक.तो. म्हणी सूत्रात्मक, अनुभवावर आधारित, प्रयोगक्षम, सत्यगर्भित, उपदेशपूर्ण, लयबद्ध असे लहान, परंतु परिपूर्ण म्हटले गेलेले वाक्य असते. समाजातील लोक जे जगतात, जे अनुभवतात तेच म्हणीत असते. बोलीच्या या वाङ्मय प्रकारात सामाजिक अनुबंध आढळतो. माहीत नसलेल्या समाजाची संस्कृती किंवा इतिहास किंवा त्या समाजावरील टिपण त्या बोलीत आढळणाऱ्या कोणत्याही लोकवाङ्मय प्रकाराच्या आधारे करता येऊ शकते. महाराष्ट्रभर बोलल्या जाणाऱ्या म्हणी या प्रदेशनिहाय वेगवेगळी रूपे धारण करून प्रचलित आहेत. त्याच म्हणी वेगळय़ा बोलीतून, त्या प्रदेशाच्या किंवा समाजाच्या प्रभावाने प्रभावित होऊन आलेल्या दिसतात. केवळ काही शब्द बदललेले दिसतात, तर काही ठिकाणी वाक्यरचना.
कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा द्यावयाचा तर तिच्या प्राचीनत्वाचा शोध घ्यावा लागेल. त्यासाठी प्राचीन, कालबाह्य झालेल्या या सगळय़ा बोलींचा, त्यातील लोकवाङ्मयाचा, म्हणी, वाक्प्रचारांचा अभ्यास करावा लागेल, त्या बोली आपणास जशा आहेत तशा स्वीकाराव्या लागतील, तरच मराठी ही प्रमाण भाषा आणि अभिजात भाषा होईल.
या लोकवाङ्मयाच्या, म्हणीच्या वा बोलीतील शब्दांच्या ऱ्हासासाठी सर्वत्र अश्लीलता, चालीरीती-रूढीतील बदल, नैसर्गिक संतुलन, आधुनिकीकरण, जातीयवाद, बोलीविषयीची व लोकवाङ्मयाविषयीची अनास्था इत्यादी कारणे सांगता येतील. या सर्व कारणांहून मोठे कारण हे प्रमाण मराठीने केलेली या प्रादेशिक प्रभेदांची, या बोलीची अवहेलना हेच आहे. मराठीची ही प्रादेशिक रूपे वा सामाजिक रूपे वा बोली हे ग्राम्यतेचे लक्षण, ती बोलणे म्हणजे गावंढळपणा असा या बोलीविषयीचा केलेला अपप्रचार हा आहे. महाराष्ट्रातील साधू-संत यांची वचने किंवा मराठीतील काही चित्रपट हे प्रसिद्ध होण्यामागच्या कारणाचा विचार केला तर त्यात बोलीभाषेचा वा मराठीच्या या सामाजिक व प्रादेशिक प्रभेदांचा वापर मोठय़ा प्रमाणावर केलेला आहे हेच लक्षात येईल. महाराष्ट्रातील सर्व संतांचे अभंग, वचने ही महाराष्ट्रभर जनसामान्यांपर्यंत पोहोचतात. आपला उपदेश सर्वाना कळावा म्हणून या संतांनी सर्वाचे शब्द महाराष्ट्र भ्रमंतीत आपल्या लेखनात, आपल्या बोलण्यात वापरले आहेत. आजही ज्ञानेश्वरीत, नामदेवगाथेत अहिराणीचे हजारो शब्द जसेच्या तसे आहेत. मात्र त्यांचे अर्थ प्रमाण मराठी वाचकांना पुस्तकाच्या शेवटी शब्दार्थात द्यावे लागतात. (अशा शब्दांची सूची अहिराणी शब्दकोश- प्रथम आवृत्ती १९९७ व द्वितीय आवृत्ती २०१३ च्या परिशिष्टात दिली आहे.) म्हणजे आजही मराठीच्या या सामाजिक आणि प्रादेशिक प्रभेदांचा, सामान्यांच्या बोलीचा अभ्यास केला, तर त्या बोलीतील शब्द वापरून लिहिलेल्या संतवाङ्मयाचा, पोथी-पुराणाचा अर्थ आजवर लावल्या गेलेल्या परंपरागत अर्थाहून निश्चितच वेगळा जाणवेल.
संस्कृत जशी सर्वसामान्यांना आकलन न होणारी भाषा होती, त्यामुळे लेखन-वाचन ही केवळ ठरावीक मंडळींचीच मक्तेदारी होती. तसाच प्रकार मराठीचे कवच घट्ट करणाऱ्म्यांनी मराठीच्या बाबतीत केला आहे. ग्रामीण भागातील लेखकांचे लेखन हे लेखनाला वाङ्मयाचा दर्जा देऊ शकत नाही. किंवा त्यांनी स्वीकारलेली मोडी लिपी ही लिपीच नाही. हा अपप्रचार सतत करण्यात येतो आहे. यातून दया पवारांच्या लेखनातील ‘चानी खात होतो’ किंवा रा.रं. बोराडेंच्या ‘नाळ पडलेल्या घोडय़ाप्रमाणे’ या शब्दांना विकृत अर्थ दिला गेला.
हल्ली ग्रामीण भागांतील पालकही आपल्या अपत्यांना इंग्रजी शाळेत पाठवीत आहेत. यापुढे ज्या मुलांचे शिक्षणच इंग्रजी माध्यमातून सुरू आहे अशी पिढी मराठीतून लेखन करताना अपवादानेच आढळेल. मग अशा वेळी गरीब, झोपडपट्टीतील, आदिवासी भागातील अन् ज्यांचे शिक्षण मराठीतून झाले आहे अशी पिढी मराठी कविता, कादंबरी लिहिती होणार आहे. मग मराठी जी जिवंत राहणार आहे ती याच पिढीच्या भरवशावर! अन् या पिढीतील वाङ्मय हे आदिवासी, दलित, शेतकरी किंवा मध्यमवर्गीय संस्कृती अन अनुभवांशी संबंधितच असणार आहे. अन् तेही त्यांच्याच शब्दात, त्यांच्याच बोलीत! त्यामुळे जी पिढी मराठी टिकवून ठेवणारी आहे, जतन करून ठेवणारी आहे त्यांना, त्यांच्या संस्कृतीला, त्यांच्या बोलीला, त्यांच्या शब्दावलीला अव्हेरून आता चालणारे नाही याचेही भान असायला हवे!